Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Saturday, March 19, 2016

सुरक्षित मातृत्व : गर्भिणी परिचर्या

सुरक्षित मातृत्व : गर्भिणी परिचर्या
गर्भवती स्त्री ज्या वातावरणात राहते, जो आहार घेते, त्या काळात ती ज्या ताणतणावातून जात असते, जी औषधे घेते ह्या सगळ्यांचे बरे-वाईट परिणाम होणाऱ्या बाळावर होत असतात. हे परिणाम कधी जन्मतःच दिसून येतात. तर कधी त्याच्या भविष्याच्या आजारातून ते प्रकट होतात. अनेकविध लढाया लढत बाळाला जन्माला घालण्याचे दिव्य माता करत असते तेव्हा गर्भधारणेच्या काळात मातेने स्वत:ला कसे जपायला पाहिजे ह्याचा विचार तिच्या कुटुंबाने करायला हवा. तरच श्रेष्ठ बालक जन्माला येऊन माता-पित्याचे सार्थक करेल व माता पित्याच्या आनंदाचे कारण होईल. कवी कुसुमाग्रजांच्य
ा कवितेत बदल करून म्हणावेसे वाटते की, “मातेच्या गर्भात उद्याचा, उज्ज्वल उष:काल”
माता पित्यांनी अपत्य निर्मितीच्या घटनेचा अर्थ समजून घेतला पाहिजे. धर्मशील आणि असामान्य अपत्य प्राप्तीसाठी पति-पत्नीने एकमेकांत तदात्म पावण्याच्या क्षणी तद्रूपता अनिवार्य असते. माता पित्याने गर्भनिर्मितीच्य
ा वेळी मिलनासाठी केवळ ‘शारीरिक सज्जतेचा’ नव्हे तर, ‘मानसिक सायुज्याचा’ क्षण हा विचार करावा. गर्भधारणेपासून मूल होईपर्यंत आई-वडिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो.
प्रसन्नतेने, आनंदाने केलेले भोजन देहाच्या कोषाची वृद्धी करते, पण असंतोषाने पंच पक्वान्नाचे केलेले भोजन मनामध्ये असंतोष निर्माण करते. म्हणून मातेने गर्भावस्थेत आपल्या आहाराकडे अधिक लक्ष द्यावे. आहाराबरोबरच गर्भवतीचा विहार, दैनंदिन जीवनशैली, मनाची प्रसन्नता यांनाही विशेष महत्त्व आहे.
पूर्वीच्या काळी जनजीवन निसर्गाशी एकरूप होते. त्यामुळे स्त्री पुरुष सर्वसाधारणपणे निसर्गाशी लयबद्ध जीवन व्यतीत करीत होते. त्यामुळे सुप्रजजननासाठी वेगळ्या मार्गदर्शनाची गरज नव्हती. परंतु अलीकडे विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे व्यक्तीनिष्ठ जगण्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. इसवी सनापूर्वी महर्षी चरक यांनी गर्भिणी परिचर्येला महत्त्व दिले आहे. गर्भिणी परिचर्येमुळे उत्तम रोगप्रतिकारक शक्ति निर्माण होऊन सद्गुणी व मेधावी अपत्य प्राप्ती होते. श्रेयेसी व मनोवांच्छित प्रजोत्पादनाचे हे मूळ रहस्य आहे.
सुरक्षित मातृत्वासाठी जगातील पाच देश सर्वोत्तम आहेत. त्यात डेन्मार्क, स्वीडन, नॉर्वे, आइज्लँड, वॉशिंग्टन व युरोपीय देशाचा समावेश आहे. आफ्रिका हा देश सुरक्षित मातृत्वासाठी अत्यंत धोकादायक आहे. मनुष्य जीवनाला एक निश्चित अर्थ व प्रयोजन प्राप्त होण्यासाठी प्रत्येक गरोदर स्त्रीने गर्भिणी परिचर्येचे पालन करणे अत्यावश्यक आहे. केवळ गर्भवती झाल्यावर योगायोगाने जन्माला आलेले बालक म्हणजे संतती ह्याउलट योग्य परिचर्या पालन केल्यानंतर निर्माण होणारे बालक ह्यास ‘श्रेयसी बालक’ म्हणावे किंवा ‘चरकाचार्यांची श्रेयसी प्रजा’ अशी माझी धारणा आहे. प्रजजन ही बाब नैसर्गिक नसून मैथुन हा मजेचा विषय नाही. श्रेयसी प्रजेचे स्वप्न उभयतांनी पाहून मग संततीप्राप्तीचा संकल्प करावा हा ह्या लेखाचा उद्देश आहे. गर्भिणी परिचर्येतील महत्त्वाच्या विषयावर ह्या लेखात प्रकाश टाकला जाईल.
गर्भिणी आहाराबद्दल ह्यापूर्वी दोन लेखांमध्ये सविस्तर मार्गदर्शन केल्याचे आठवत असेलच. सुप्रजजननासाठी गर्भवती स्त्रीच्या जीवनशैलीचे नियोजन असणे आवश्यक आहे. ह्यामध्ये सामान्य दिनचर्या, ऋतुचर्या अंतर्भुत आहे. परिचर्येची सुरुवात ब्राह्म मुहूर्तापासून अपेक्षित आहे. कारण ह्या काळात विविध प्रकारचे उपयुक्त संप्रेरके शरीरामध्ये निर्माण होत असतात. आयुर्वेद तज्ञांनी गर्भ गर्भाशयात २८० दिवस म्हणजे १० महिने कसा वाढतो ह्या संदर्भातील विविचेन केलेले आहे. गर्भपोषण आणि मातृपोषण हा परिचर्येचा गाभा आहे. गर्भिणी परिचर्येत वापरण्यात येणाऱ्या औषधींमुळे १० महिन्यांच्या काळात कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. व वारंवार होणारे गर्भपात गर्भिणी शोथासारखे त्रास सुध्दा परिचर्येमुळे आटोक्यात आले आहेत. गर्भ विकासासाठी १० महिन्याच्या औषधोपचार संकल्प पहिल्या महिन्यांपासून केल्यास गर्भाचे योग्य पोषण होऊन गर्भिणीचे बल टिकून राहते.
प्रथम आपण महर्षी चरक व आचार्य सुश्रुत यांच्या परिचर्येचा संक्षिप्त मागोवा घेऊ.
१) पहिल्या महिन्यामध्ये देशी गायीचे ताजे दूध व मधुर, शीत द्रव आहार घ्यावा. ह्यामध्ये गव्हाची गरम पोळी, दूध, साजूक तूप, भाज्या घातलेला पराठा, शिरा, कणिक किंवा नारळ घातलेल्या करंज्या असा आहार घ्यावा.
२) मधुर औषधांनी सिद्ध केलेले देशी गायीचे दूध प्यावे. वात दोषांचा प्रकोप करणारा आहार (वांगी, मोड आलेली कडधान्ये, बटाटे इ.) घेऊ नये.
३) आहारामध्ये दूध, तूप, मध, लोणी, साखर यांचा समावेश करावा. तिसऱ्या महिन्यापासून सहावा महिना पूर्ण होईपर्यंत गर्भिणीस हेमप्राश ६ थेंब रोज सकाळी द्यावेत. ह्याने गर्भाच्या ज्ञानेन्द्रियांची क्षमता व बालकाची रोगप्रतिकार क्षमता वाढते.
४) लोणी, दुधाचे पदार्थ व ताजे दही – भात खाण्यास हरकत नाही. देशी गायीच्या दुधापासून काढलेले लोणी शक्य झाल्यास खावे. जर्सी गायीचे दूध व त्यापासून केलेले पदार्थ योग्य नाहीत. ह्या काळात डाळिंब हृदयाला पोषक असल्यामुळे तसेच अग्निदीपक असल्यामुळे हितकर आहे.
५) “पंचमे मनः प्रतिबुद्धतरं भवति ||” पाचव्या महिन्यात बीजरूप मनाचे व्यक्तीकरण होते. रक्त धातू, मांस धातू पुष्ट होतात. त्यामुळे दूध, तुपाचा वापर बंद करू नये. विशेषतः स्त्रिया दूध, तूप सेवनास राजी नसतात. त्यामुळे आचार्यांनी ह्यावर भर दिलेला दिसतो.
६) “षष्ठे बुद्धी: ||” बुद्धीच्या विकासासाठी सहाव्या महिन्यात औषधी सिद्ध दूध, गोक्षुर सिद्ध तूप, मुगाचे कढण हमखास वापरावे.
७) “सप्तमे सर्वांग प्रत्यंग विभाग: ||” मधुर औषधी सिद्ध दूध, तूप तसेच भोजनामध्ये पहिला घास साजूक तूप व भाताचा असावा. ह्या महिन्यात स्तनाग्रास तेल लावून स्तनाग्रे बाहेर हळूहळू ओढवीत. योनिभागी तिळाच्या तेलाने तर्जनीद्वारे अभ्यंग करावा. ह्या महिन्यात लघवीला आग व जळजळ होऊन संसर्ग होण्याची शक्यता असते म्हणून मीठ कमी खावे. औषधी गर्भसंस्कार संचात वर्णित औषधांच्या जोडीला मज्जाधातू पोषक औषधे वापरण्यास हरकत नाही. अस्थि पोषणासाठी शतावरी, गुळवेल, शुंठी, चंदन सुध्दा मी वापरत असतो.
८) “अष्टमे अस्थिरी भवति ओज: ||” मुगाचे कढण दूध तुपासह तसेच आस्थापन अनुवासन बस्तीचा वापर तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करावा. सुप्रसव तेलाचा पिचुधारण प्रयोग दररोज रात्री प्रसूतीच्या दिवसापर्यंत करावा. निर्जंतुक केलेल्या कापसाचा पिचु योनीमार्गात ठेऊन सकाळी काढून टाकावा. ह्याने प्रसवमार्गात स्निग्धता निर्माण होते, स्नायूंची लवचिकता सुधारते, मार्ग निर्जंतुक राहतो व प्रसूती अगदी सहज सुलभ होते.
९) “नवम दशम एकादश द्वाद्शानाम् अन्यतम् जायते | अतो अन्यथा विकारी भवति ||” नवव्या महिन्यात गर्भ सर्वांग प्रत्यंगांनी युक्त होतो. योग्य विल पाहून मग सुतिकागार प्रवेश अर्थात रुग्णालयामध्ये प्रवेशित करावे.
१०) “नवमे विविधान्नानि दशमे....|” दहावा महिना बालकाच्या आगमनाची चाहूल लावणारा असतो. ह्या महिन्यात उपरोक्त आहार तसाच चालू ठेवावा. ह्या महिन्यात आचार्यांनी विविध अन्न सेवन करण्यास सांगितले आहे. ह्यामध्ये दूध, तूप, इ. नी युक्त आहार सेवन करावा.
११) प्रसूतीनंतर बाळंतिणीने किमान २ ते ३ महिने सूतिकाभ्यंग तेलाने दररोज स्नानापूर्वी अभ्यंग करावे. गर्भावस्थेत व प्रसूतीदरम्यान पडलेला ताण व धातूंची झीज ह्या अभ्यंगाने लवकर भरून निघते.
योगासने व गर्भिणी परिचर्या
तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास व प्राणायाम करावा.
१) पहिल्या तिमाहीतील योगासने - वज्रासन, सिद्धासन, सुखासन, कटिचक्राचसन
२) दुसऱ्या तिमाहीतील योगासने - भद्रासन, मार्जारासन, ताडासन, त्राटक
३) तिसऱ्या तिमाहीतील योगासने - पर्वतासन, प्राणायाम – शीतली, सित्कारी, भ्रामरी
आचार विषयक नियम – (काय करू नये)
१) भूक नसताना जेऊ नये. नाहक उपवास करू नये. गर्भाची वाढ मातेच्या अन्नग्रहणातून होत असते हे विसरू नये.
२) पंचकर्म करू नये.
३) रात्रीचे जागरण टाळावे.
४) बॅडमिंटन, धावणे, कब्बडी, खो-खो तसेच घरामध्ये धावपळ करू नये.
५) प्रवास टाळावा.
६) शक्यतो शारीरिक संबध टाळावा.
काय करावे –
१) कोमट पाण्याने नियमित स्नान करावे.
२) अवस्थेस अनुसरून सैल व सूती कपडे घालावेत.
३) झोपण्यास व बसण्यासाठी अधिक उंच नसलेली बैठक किंवा शय्या असावी.
४) मन प्रसन्न ठेवावे. सभोवतालचे वातावरण प्रसन्न राहण्यासाठी घरामध्ये निसर्ग चित्रे व बालकांची चित्रे लावावीत. विनोदी पुस्तके, नाटके पाहण्यास हरकत नाही.
५) कार्यालीन कामे नियोजनपूर्वक करावी. वरिष्ठांशी वाद टाळावा.
६) सकारात्मक जीवनशैली अंगिकारावी.
गर्भवतीसाठी संगीत –
संगीत तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अहिरभैरव, कलावती, दीपक, पुरिया, दरबारी कानडा हे राग ऐकावेत. ह्या रागांवर आधारित गाणी गर्भपोषणासाठी व मनः स्वास्थ्यासाठी उपयुक्त ठरतात.
पित्याचा सहभाग
‘पितृत्व’ हे पण स्त्री मुळे मिळालेलं वरदान आहे. त्यामुळे पतीने गरोदरपणात पत्नीची साथ द्यावी. गर्भाची होणारी वाढ, बाळाचे वजन व प्राथमिक ज्ञान पित्याला असावे. बलाचा ७०% विकास गर्भावस्थेत होत असतो म्हणून भावी पित्याने गर्भवतीच्या आहाराकडे लक्ष द्यावे व तिच्या मनाचा विचार करा.
गर्भाधारणेपूर्वी तज्ञांकडून पंचकर्म उपचार करून घ्यावा.
स्त्री व पुरुषाची शरीरशुद्धी करून जनुकातील विकृतीची तीव्रता कमी करता येते. आनुवंशिकता सर्वसाधारणपणे डी.एन.ए. मुळे ठरवली जाते. डी.एन.ए. ची रचना बदलता येत नाही परंतु गर्भवतीचा आहार, मानसिक ताणतणाव, प्रदूषण, पर्यावरण इ. चा जनुकावर ठसा उमटतो आणि त्याची अभिव्यक्ती बदलते. हे जनुकीय बदल पुढच्या अनेक पिढ्यांमध्ये आनुवंशिकतेने धारण केले जातात. वाढणारा गर्भ आपल्या पोषणासाठी सर्वस्वी आईवरच अवलंबून असतो. तिच्याकडून पुरेसे पोषण मिळाले नाही तर अवयवांचे पोषण नीट होत नाही. गर्भास आहार न मिळाल्यामुळे गर्भाच्या वाढीसाठी लागणारी संप्रेरके व त्यांचा स्त्राव कमी होतो हे गरोदर उंदराच्या मादीवर प्रयोग करून सिद्ध झाले आहे. गरोदर उंदराच्या मादीला फॉलिक अॅसिड व व्हिटामिन B12 युक्त आहार दिला. तेव्हा तिला निरोगी पिल्ले झाली. दुसऱ्या मादीला अशाप्रकारचा आहार दिला नाही. तिला पिवळसर बारीक पिल्ले झाली. ह्याचाच अर्थ आहाराचा परिणाम गर्भस्थ बालकावर होतो. १९४४ – ४५ साली हॉलंडमध्ये दुष्काळ होता. तेथील गर्भवती स्त्रियांवर त्याचा परिणाम होऊन त्यांच्या बाळांना मधुमेहाचे प्रमाण दिसून आले, तसेच आहाराचा परिणाम मेंदूतील हायपोथॅलॅमिक ग्रंथीवर होऊन भूक नियंत्रणामध्ये फरक पडला आणि ही मुले तारूण्यामध्ये खुप लठ्ठ झाली. गरोदर मातेने कोकेन किंवा फेनिटॉईन सारखी औषधे घेतल्यास ह्याचा परिणाम गर्भावर होतो व बालपणी ल्युकेमिआ, मेंदूचा कर्करोग होण्याची शक्यता असते. अशा मुलांना पुढे सिझोफ्रेनियासारख्या आजारांना तोंड द्यावे लागते. गोरोदर माता मानसिक तणावाखाली असेल तर अॅड्रिनॅलिन, ऑक्सिटोसिन इ. हॅार्मोन्स तयार होतात. परिणामी बाळाच्या हृदयाचे ठोके वाढतात. भविष्यात अशा बाळांना मानसिक व्याधीला सामोरे जावे लागते. म्हणून पतीने आपल्या गरोदर पत्नीस प्रसन्न ठेवावे.
लेखक – प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति
सहयोगी प्राध्यापक, पोदार वैद्यक महाविद्यालय व रुग्णालय, वरळी, मुंबई
भ्रमणध्वनी - +917738086299/ +919829686299
ईमेल – subhashmarlewar@gmail.com
वैद्य संतोष जळूकर
संचालक – अक्षय फार्मा रेमेडीज (इंडिया) प्रा. लि.
मुंबई
भ्रमणध्वनी - +917208777773
ईमेल – drjalukar@akshaypharma.com

Tuesday, March 15, 2016

#‎घरोघरी_आयुर्वेद‬

“तुम्ही वैद्य लोकं खाण्याची खूप पथ्य सांगता बुवा.....लोक त्यांच्या आवडीचं खातायत हे तुम्हाला बघवतच नाही. म्हणून मी आयुर्वेदापासून चार हात लांब असतो.”
काही कामाच्या निमित्ताने चेन्नईत दौऱ्यावर असताना एका हॉटेलमध्ये जेवायला बसल्यावर आमच्यासह असलेल्या एका मध्यमवयीन व्यक्तींनी हा बॉम्ब टाकला.
“इथे प्रश्न रुग्णाच्या आवडीचा नसून; त्याच्या भल्याचा आहे. जे पदार्थ खाऊन आरोग्याला अपाय होतो असेच पदार्थ आम्ही टाळायला सुचवतो. त्यात आम्हाला आनंद मिळतो असं कोणाला वाटत असल्यास करणार काय?” इति मी.
“कसला काय अपाय होणार आहे? माझाच आहार बघा आता....आणि सांगा काय अपाय होणार आहे.”
असं म्हणून या गृहस्थांनी अट्टाहासापायी चिकन स्वीट कॉर्न सूप, तंदुरी चिकन, तंदुरी रोटी, पनीर बटर मसाला, चिकन बिर्यानी आणि शेवट ‘स्वीट डिश’ म्हणून आईसक्रीम असा त्यांच्या ‘आवडीचा’ आहार घेतला. त्यात भर म्हणजे हे गृहस्थ संपूर्ण जेवणभर पाण्याऐवजी कोल्ड्रिंकच पीत होते. आईसक्रीम मागवण्यापुर्वी वाडगाभर दही खाऊन मग त्यांनी मला विचारलं;
“काय मग...तुम्ही यालाच विरुद्धाहार म्हणता नं? काही नसतं तसं. खायचं बिनधास्त. तुमचा आयुर्वेद काय सांगेल आता माझ्या या आहाराबद्दल?”
मी केवळ हसून उत्तर देण्याचं टाळलं.
“सांगा की वैद्यराज. उत्तर द्यावच लागेल”
“आयुर्वेद हे माणसांसाठीच शास्त्र आहे हो. तुमच्यासारख्यांनी दुर्लक्ष करावं आयुर्वेदाकडे!!” अखेरीस आमचा फटका बसलाच.
चेन्नईचा निसर्ग आपल्या स्वभावाला जागलाच आणि रात्री मुसळधार पाऊस पडला. सकाळी ६ वाजता माझ्या दारावर थाप पडली. दार उघडतो तर काय; या सद्गृहस्थांच्या पत्नी हजर!
“डॉक्टर; ह्यांना पहाटेपासून ताप आहे. तुम्ही तपसायला येता का?”
मी लगेच तपासायला गेलो. नाडी परीक्षण आणि उदर परीक्षण केल्यावर अजीर्ण झाल्याचे निदान करून दिवसभर भूक लागल्यावर पेज अन्यथा लंघन आणि सुंठीचे गरम पाणी घेण्यास सुचवलं आणि माझ्या कामाला लागलो. संध्यकाळपर्यन्त त्यांचा ताप उतरला आणि ठणठणीत झाले.
आपले वैद्य जे पथ्य सांगतात त्यांमागे काही कारणं असतात हे नेहमी लक्षात ठेवा. पथ्य पाळणाऱ्या मनुष्याला औषधांची गरजदेखील पडत नाही असं सांगणारं एकमेव शास्त्र म्हणजे आयुर्वेद.
‘पथ्य-बिथ्य काही नसतं. आडवं-तिडवं कसंही खायचं. काही होत नाही.’
असं ज्यांना वाटतं त्यांनी लक्षात नेहमी ठेवा......वेळ सांगून येत नसते. आग लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा सुरुवातीपासूनच काळजी घेतलेली काय वाईट?
© वैद्य परीक्षित स. शेवडे
(आयुर्वेदतज्ज्ञ- लेखक- व्याख्याते)
श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद; डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

व्यायामबद्दल थोडेसे


व्यायामबद्दल थोडेसे

काही दिवसांपूर्वीची गोष्ट. 22 वर्षीय एक तरुण मुलगा आमच्याकडे दवाखान्यात आला. त्याचे नाव अमोल .त्यास विचारले की काय तक्रार आहे तर म्हणाला ,हात पाय खूप दुखतात आणि जेवण पण पचत नाही . वेळेवर शौचास होत नाही दोन तीन वेळा जावे लागते.
त्याचे पूर्ण इतिवृत्त विचारले तेव्हा कळले कि साहेब जिम मध्ये जातात . मग कौतुकाने म्हणाला जिम एअरकंडिशन आहे. मी म्हटले व फारच सुंदर .व्यायाम करायचा का तर घाम गाळण्यासाठी आणि तो पण एअरकंडिशन जिम मध्ये म्हणजे बुडत्याचा पाय खोलात.जेवणाची वेळ कोणती तर दुपारी २ ला आणि व्यायामाची ४ वाजता.मग काय त्या अन्न पचनासाठी आलेल्या पाचक स्रावांचा पण गोंधळ उडाला असेल एवढं नक्की.त्यामुळेच अपचन आणि अनियमित मलप्रवृत्ती आणि एअरकंडिशन मध्ये व्यायाम हे साक्षात सांधेदुखीला आमंत्रणच जणू. 
हे समजावून सांगताच साहेबांच्या डोक्यात प्रकाश पडला.मग म्हणे मला कोणी सांगितलेच नाही हे.मग आता कळले ना मग सुधारणा करा.
डॉक्टर तुम्ही बोलला तसच करणार व्यायाम सकाळी करेन आणि दुपारी १.०० वाजेपर्यंत जेवण करेन असे बोलून आणि सात दिवसांची औषधे घेऊन समाधानाने अमोल घरी गेला.
चुकीच्या पद्धतीने एखादी गोष्ट केली तर त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो याचे साक्षात उदाहरण आणि काय! इतर व्यायामविषयक माहिती पुढील भागात......
वैद्य दत्तप्रसाद प्रभु
090294 74927

श्री विश्वदत्त आयुर्वेद,
योग आणि पंचकर्म सिद्धिविनायक अपार्टमेंट जिजामाता चौक कुडाळ
,सिंधुदुर्ग
राज्य महाराष्ट्र
संपर्क-8411849757
 


090294 74927

Tuesday, March 8, 2016

स्त्री स्वास्थ्यरक्षण विशेष

स्त्री स्वास्थ्यरक्षण विशेष -
स्त्रियांच्या अवयवांमध्ये त्र्यावर्तचा म्हणजे बाह्ययोनि, गर्भाशयमुख, गर्भाशय, आर्तववाहिन्या, बीजांड ह्यांचा समावेश होतो. साधारणपणे मुठीच्या आकाराचा ओटीपोटामध्ये असलेला गर्भाशय हा अवयव असतो. त्याचे तोंड योनीमध्ये उघडते. स्त्रियांचे बहुतांश आजार त्र्यावर्ता योनीशी संबंधित असतात. महर्षी चाराकांनी “योनिव्यापद्” ह्या नावाने चरकसंहितेत ह्याची चर्चा केली आहे.
पाळी अनियमित येणे, पाळीमध्ये रक्तस्राव होणे, पाळी २-२ महिने न येणे, बीजांडामध्ये गाठी होणे, बाळ न होणे, मासिक पाळीमध्ये पोट दुखणे, वारंवार मूत्रप्रवृत्ती होणे, गर्भाशय – योनि खाली सरकणे, रजोनिवृत्ती, श्वेतप्रदर, रक्तप्रदर अशा अनेक प्रकारच्या समस्यांना स्त्रियांना सामोरे जावे लागते. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ह्यावर आपण चर्चा करणार आहोत.
स्त्री स्वास्थ्यासाठी सर्व महिलांना आरोग्यपूर्ण शुभेच्छा.........
1. मासिक पाळीपूर्व तणाव –
अनेक स्त्रियांमध्ये मासिकपाळीपूर्वी पोटात दुखणे, मळमळ, उलटी होणे, डोके दुखणे अशा तक्रारी पहावयास मिळतात. मलबद्धता, स्तन दुखणे ह्या तक्रारींशिवाय चिडचिडेपणा, राग येणे, छोटी गोष्ट मनाला लावून घेऊन रडणे इ प्रकार होतात. वास्तविक गर्भाशयाचे कार्य व मनोव्यापार ह्यांचा परस्पर संबंध आहे. पाळी चालू होण्यापूर्वी ४-५ दिवस अदोदर ह्या तक्रारींना सुरुवात होते. एकदा मासिक रजःप्रवृत्ती झाली की ह्या तक्रारी दूर होतात.
असे का होते?
ह्याचे निश्चित कारण स्पष्ट करता येत नसेल तरी अंतर्स्रावातील बदलामुळे किंवा जीवनसत्वाच्या अभावी असे होत असावे. बीजप्रसावामुळे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन पातळीमध्ये होणाऱ्या बदलामुळे असे होत असावे. पायरीडॉक्सीन आणि इफा (इसेन्शियल फॅटी अॅसिड) कमतरतेमुळे पाळीपूर्वी पोटात दुखते. बदलत्या जीवनशैलीमुळे फास्टफूडचा वापर जास्त प्रमाणात होतो. परिणामी असे होत असावे.
2. अनियमित मासिक पाळी –
मासिक पाळी २१ दिवसांच्या आत व दीड महिन्यापेक्षा उशिरा येत असल्यास बरोबर नाही. बीजविमोचानाची क्रिया होत नसल्यामुळे हे घडत असते. नियमित पाळीमध्ये रजःस्राव ४ ते ५ दिवस असतो. काही स्त्रियांना स्राव २ दिवस तर काहींना ७ दिवसांपर्यंत राहतो. रक्तस्राव ८ अंजली म्हणजे ८० ते १०० मिली असतो.
अनियमितता का होते?
मुलगी वयात येतांना व ऋतुमती झाल्यावर पहिले २ वर्ष पाळी अनियमित असते. अबीजप्रसवी पाळीत सुद्धा अनियमितता आढळते.
रक्त गोठण्याची प्रक्रिया, गर्भाशय अंतःस्तर जाड होणे, जंतुसंसर्ग, गर्भपात, स्राव, गर्भाशय मुखाचा कर्करोग, गर्भाशयात गाठी होणे, कॉपर टी, पांडुरोग ह्यामुळे सुद्धा अनियमित पाळी असते.
3. गर्भाशयात गाठी होणे –
अविवाहित स्त्रिया, वंध्यत्वाने पिडीत स्त्रिया एखादेच मूल असणाऱ्या बायका ह्यांना गर्भाशयात गाठी होऊ शकतात.
अबीजप्रसवी पाळीत इस्ट्रोजेनचा प्रभाव प्रोजेस्टेरॉनपेक्षा जास्त असतो. अशा स्त्रियांमध्ये गाठी तयार होण्याची प्रवृत्ती अधिक असते. शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात असतांना विविध प्रकारचे २० किलो वजनाचे फायब्रॉइड असलेली एकच स्त्री मी पहिली. नांदेड येथे डॉ. सुनील कदम, डॉ. नरेंद्र भंगाळे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया झाल्याचे मला आठवते. सोनोग्राफीमुळे ह्याचे निदान आता सोपे झाले आहे.
अगदी क्वचित प्रसंगी गाठीचे रुपांतर कर्करोगात होते. परंतु बऱ्याच वेळी ह्या गाठी सध्या असतात. त्यांची वाढ होत नसेल तर शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही. मिलिमीटरमध्ये असणाऱ्या गाठी आयुर्वेदोपचाराने कमी हतात. रजोनिवृत्तीनंतर अशा गाठी आकसून जातात.
4. पॉलिसिस्टिक ओव्हरी –
स्त्रीबीजकोशामध्ये साबुदाण्याच्या आकाराच्या फोलिकल आढळल्यास त्यास PCOS म्हणतात. बदलत्या जीवनशैलीमुळे हे होत असून ह्या संदर्भातील माहिती आपण वाचली असेल. तरीही अनुवंशिकता, गुणसूत्रबदल, चिंता – ताण – तणाव, स्पर्धात्मक युग, प्रदूषण इ बाबींचा विचार ह्यात करता येतो. उपाय न केल्यास मधुमेह, स्थूलता, अतिरक्तदाब, क्वचित वेळा गर्भाशय अंतःस्तराच्या कर्करोगाची शक्यता असते.
5. श्वेतप्रदर
धुपणी, पांढरे जाणे, अंगावर जाणे अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन स्त्रया येत असतात. ट्रायकोमोनास फंगस आणि बॅक्टेरियामुळे हा त्रास होतो. गुदमार्ग स्वच्छ असावा. मूत्रमार्ग – योनीमार्ग जवळ असल्याने रोगजंतूंचा प्रवेश योनीमार्गात होऊ शकतो. संभोग, अस्वच्छता, मधुमेह ह्यामध्ये हा त्रास होऊ शकतो.
रजोनिवृत्ती नंतर हा त्रास झाल्यास योनिपरीक्षण करून घ्यावे व पॅपस्मियर टेस्ट करून घ्यावी. योनि ओलसर राहण्यासाठी निसर्गतःच योनीमध्ये स्राव असतो. त्यास दुर्गंध नसल्यास व लक्षणे नसल्यास घाबरून जाऊ नये.
6. अंग बाहेर येणे –
काहीतरी बाहेर येणे, थेंबथेंब लघवी होणे, खोकल्यावर लघवी होणे, ओटीपोटात दुखणे, कपडे दुर्गंधित होणे अशा तक्रारी घेऊन जेव्हां स्त्रिया येतात तेव्हां हमखास गर्भाशय, मूत्राशय खाली आला आहे असे समजावे. अशा तक्रारी बायका अनेक वर्ष अंगावर काढतात. हा प्रकार कोणत्याही स्त्रीला होऊ शकतो. गर्भाशयाला आधार देणाऱ्या पेशी अशक्त झाल्यास असे होते. तीन पेक्षा जास्त बाळंतपणे, वारंवार गर्भपात, प्रवाहिका, मलबद्धता ह्यामुळे अंग बाहेर येऊ शकते. ह्यात योनीमार्गे गर्भाशय काढण्याचे शस्त्रकर्म करणे चांगले. सुरुवातीच्या काळात आयुर्वेदिक उपचार, योग, व्यायाम ह्यामुळे फरक पडू शकतो.
7. स्तनाचे विकार –
स्तनाच्या ठिकाणी गाठ असणे, सूज येणे, आकार बदलणे, स्तनाग्रातून स्राव येणे, स्तनाग्र आत ओढल्यासारखी होणे, दोन स्तनांमध्ये फरक जाणवणे, पाळीपूर्वी स्तनात दुखणे ह्या तक्रारींमध्ये मॅमोग्राफी तपासणी करावी. स्वतः तपासण्याची सवय लाऊन घ्यावी (स्वयं-स्तनपरीक्षण), उतीची परीक्षा, जागरुकता, ह्यामुळे पुढील धोके टाळता येतात.
8. हाडांचे विकार – अतिरक्तदाब
अतिरक्तदाब, हाडांचा ठिसूळपणा हा स्त्रियांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. आहाराकडे दुर्लक्ष, व्यायामाचा अभाव, शरीराची अयोग्य ठेवण, जमिनीवर बसण्याची सवय मोडल्यामुळे कॅल्शियमचा अभाव, बैठ्या जीवनशैलीमुळे हाडे दुखतात. पाठीला बाक येतो, उंची कमी होते, पाठीचा कणा – मनगट ह्यात थोडीशी दुखापत झाली की हाड तुटते. बोन डेन्सिटी तपासल्याने हे निदान होऊ शकते. हा आजार कित्येक दिवस दबा धरून बसत असल्याने त्यास सायलेंट किलर म्हणतात.
रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा, चिंता, मधुमेह ह्यामुळे अतिरक्तदाब आढळतो.
9. स्थूलता -
स्त्रियांनी नियमित दिनचर्या, व्यायाम करत आपली फिगर मेंटेन करावी. स्त्रियांच्या कमरेचा घेर ८८ सेंटीमीटरपेक्षा कमी असावा. BMI हा १८ ते २४ असावा.
10. कंबरदुखी –
वारंवार होणारे गर्भपात, बाळंतपण, कमकुवत स्नायु, पाठीचे माणके सरकणे, कॅल्शिय कमी होणे, लठ्ठपणा, पोट सुटणे, तळपाय सपाट असणे, पादत्राणाचा अयोग्य उपयोग, कॉम्प्यूटरचा वापर, उंच टाचांच्या चपला वापरणे ह्यामुळे कंबरदुखी होऊ शकते. मुलींना पाळीच्या अगोदर १-२ दिवस कंबरेचा त्रास होतो.
11. स्त्रियांना दाढी फुटणे –
मुलीच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन निर्मितीमुळे ही समस्या उद्भवते. हिरसुटीझम नावाने ही समस्या परिचित आहे. शरीराच्या विविध भागात केस वाढल्यास तपासणी करून निदान करता येते. अन्तःस्रावी ग्रंथींचे तज्ञ (एन्डोक्रायनोलॉजिस्ट) ह्यावर उपचार करतात. लेझर, ब्लीचिंग, फेशियल, व्हॅक्सिंग इ. मुळे ह्या समस्येवर बाह्यरूपाने मात करता येते.
12. रजोनिवृत्ती –
मासिकपाळी कायमची बंद होणे म्हणजे रजोनिवृत्ती. बीजकोष अकार्यक्षम झाल्यामुळे ही अवस्था येते. शुक्रधातु क्षीणता व क्षीणतेमुळे होणारी धातु विकृती, त्यामुळे चिडचिडेपणा, हाडे पोकळ होणे, केस गळणे, अंग रूक्ष होणे, झोप नीट न येणे, आवाज सहन न होणे, मलावरोध, पोट फुगणे, थकवा जाणवणे अशी लक्षणे होतात.
उपयुक्त औषधे –
1) अश्वगंधा, गोखरु, कवचबीज, शतावरी सिद्ध दूध किंवा काढा तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापरावा.
2) वसंतकुसुमाकर, पुष्पधन्वा, अशोकारिष्ट
3) चंदनबलालाक्षादि तैलाभ्यंग
4) फलमाह वटी, वृष्यवटी, च्यवनप्राश
5) रसधातुपाचक व शुक्रपोषक औषधे – अश्वगंधा, यष्टिमधु, कोहळा, शतावरी
6) औषधी गर्भसंस्कार संचातील औषधे तज्ञांच्या सल्ल्याने घ्यावीत
योनिधावनासाठी – त्रिफळा, हळद, कडुनिंब, चंदन काढा वापरावा. करंज तेल, बला तेल, जात्यादि तेल शतधौतघृत ह्यापैकी प्रकृतीनुसार वापर करावा.
वर्णन केलेल्या आजारांव्यतिरिक्त अनेक समस्या महिलांमध्ये आढळतात. त्यांची करणे शोधून चिकित्सा केल्याने पुढे होणारी गुंतागुंत टाळता येते. स्त्री शरीर म्हणजे निसर्गाने निर्माण केलेला एक चमत्कार आहे. जैविकदृष्ट्या स्त्री सबल असून कुटुंबाची जबाबदारी पेलण्याची विलक्षण शक्ती तिच्या अंगी आहे. आधुनिक युगात वावरतांना तिची खूप दमछाक होते. पण ती पेलण्याची क्षमता तिच्यात असतेच असे नाही. तिच्या भावनांना आदर द्यावा. स्त्री ही आदिशक्ती आहे. तिला शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्य लाभो ही जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अपेक्षा.
सर्वे भवन्तु सुखिनः l
लेखक –
प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति,
सहयोगी प्राध्यापक,
स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग,
रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय
मुंबई ४०० ०१८
+917738086299
+919819686299
subhashmarlewar@gmail.com
वैद्य हर्षदा कुलकर्णी
एम. एस. (स्त्रीरोग) स्कॉलर

Friday, March 4, 2016

डिलिव्हरीनंतर नेमकं काय करायचं आणि काय नाही?

डिलिव्हरीनंतर नेमकं काय करायचं आणि काय नाही?


   सध्याच्या काळात हा एक यक्षप्रश्नच झाला आहे. खरं तर हा काही गहन प्रश्न नाही. पण दुर्दैवाने एखाद्या शास्त्राची काहीही माहिती नसलेले लोक ‘असं काही शास्त्र नसतंच’ अशी अवैज्ञानिक विधानं करून आपली मतं लोकांच्या डोक्यावर थापण्याचे प्रकार करत असतात त्यातलाच हा भाग. काही मुद्दे क्रमाने पाहूया.
- तेलाचे मालिश करावे का?
   पूर्वीपासूनच बाळ-बाळंतीण यांना कोमट तेलाने मालिश करण्याची पद्धत आपल्याकडे होती. प्रसूतीच्या काळात या दोघांवरही शारीरिक ताण पडत असल्याने वात वाढीला लागतो. हा वात आटोक्यात आणण्यासाठी दोघांनाही कोमट बला तेल किंवा अगदी सध्या तीळ तेलाचे मालिश करणे आवश्यक ठरते. त्यामुळे तसे मालिश अवश्य करावे.
- पोट बांधणे 
    बाळंतीणीचा गर्भाशय प्रसूतीनंतर त्याच्या मूळ आकारावर पुन्हा जायला; म्हणजे आक्रसायला सुरुवात होते.
अशा स्थितीत वात वाढू नये. तसेच शरीर बेढब दिसू नये याकरता आयुर्वेदाने सांगितलेला मार्ग म्हणजे उदरपट्टबंधन अथवा पोट बांधणे. यासाठी पंचाचा वापर केला जातो. अर्थात; ही क्रिया नैसर्गिक प्रसूतीनंतर आणि आपल्या वैद्यांच्या सल्ल्यानेच करायची आहे.
- काय खावं?
     बाळासाठी अर्थातच मातेचे दूध हेच सर्वोत्तम अन्न आहे असे थोर आयुर्वेद वैद्य श्रीमद्वाग्भटाचार्य ‘मातुरेव पिबेत् स्तन्यं तत् परं देहवृद्धये|’ इतक्या स्पष्ट शब्दांत सांगून गेले आहेत. बाळंतीणीच्या आहाराबाबत काळजी दुहेरी असते. इथे स्वतःच्या शरीराची झीज भरून काढणे आणि बाळासाठी स्तन्यनिर्मिती नीट व्हावी या दोन्ही बाबी महत्वाच्या असतात. वेगवेगळ्या खीरी, लाडू यांचा आहारात समावेश करावा. आईस्क्रीम वा दह्यासारखे पदार्थ शक्यतो टाळावेत. असे पदार्थ मातेच्या आहारात असल्यास तिच्या दुधामार्फत बाळापर्यंत अतिरिक्त कफ पोहचून त्यास त्रास होवू शकतो.
- बाळगुटी द्यावी का?
    अलबत द्यावी. मात्र याविषयी आपल्या वैद्यांकडून संपूर्ण माहिती करून घ्यावी. (बाळगुटी या विषयावरील विस्तृत लेख लवकरच प्रकाशित होणाऱ्या #घरोघरी_आयुर्वेद या माझ्या पुस्तकात वाचायला मिळेल.) वयाचे एक वर्ष पूर्ण होईपर्यंत बाळगुटीचा उपयोग अवश्य करावा.
     बाळंतपण झाल्यावर वरील गोष्टी करू नका असं सांगण्याची सध्या फॅशन निघाली आहे. या गोष्टी नेमक्या का आणि कशा करतात हेच असे सांगणाऱ्यांना माहित नसते. त्यामुळे; वरीलपैकी कोणत्याही गोष्टी करू नयेत असा सल्ला कोणीही दिल्यास दुर्लक्ष करा. आणि यांपैकी कोणत्याही गोष्टींबद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी आपल्या जवळच्या वैद्यांचे चिकित्सालय गाठा. पिढ्यानपिढ्या या देशातले लोक बाळ-बाळंतीणीची व्यवस्थित काळजी घेत आहेत. ते जणू मूर्खच होते असे चित्र रंगवून परदेशी कंपन्यांच्या चकचकीत वेष्टनातली ‘बेबी किट्स’ वा ‘टॉनिक’ गळ्यात मारण्याच्या उद्योगांपासून सावधान!!
© वैद्य परीक्षित स. शेवडे
(आयुर्वेदतज्ज्ञ- लेखक- व्याख्याते)
श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद; डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

केसांच्या आरोग्यासाठी

आयुर्वेदातुन आरोग्याकडे
केसांच्या आरोग्यासाठी
आजच्या जागतिकीकरणाच्या काळात शरीरात कितीही त्रास असतिल तरी तेवढे लक्ष दिले जात नाही. पण लोकांना दिसणारा केंसासारखा शरीराचा भाग बिघडला की लगेच अनेकांची झोप उडते.
केस हा आयुर्वेदानुसार हाडांचा मळ सांगितला आहे. केसांच्या तक्रारी मध्ये केस गळणे, पिकणे, कोंडा होणे या तक्रारींचा समावेश करता येईल.
केस हा पितृज वडीलांकडुन येणारा अवयव आहे त्यामुळे ज्या वयात वडीलांना केसांच्या तक्रारी सुरू त्याच वयात मुलांतही दिसु शकतात. किंबहुना आजच्या प्रदुषण युक्त आधुनिक काळात ह्या तक्रारी वडीलांना ज्या वयात उत्पन्न झाल्या त्यापेक्षा कमी वयात मुलांत दिसतात.
आधुनिक आहार, रासायनिक घटकांचा वाढता वापर खाण्यासाठी व तेल शाम्पु आदी बाह्य रूपाने केसांच्या तक्रारीसाठी कारणीभुत आहे.
पुर्णपणे कारणे टाळणे अशक्य आजच्या काळात पण काही गोष्टी नक्कीच केसांच्या आरोग्यासाठी करता येतील.
१. केसांना खोबरेल तेल नक्की लावावे. तेलाने केसांचे व पर्यायाने शरीराचे पोषण होते.
२. फ्रीजयुक्त पदार्थांचा वापर केस गळणारया लोकांनी पुर्णपणे टाळावा. वापर अधिक केस गळणे थांबवण्याची अपेक्षा करू नये.
३. साध्या मीठाऐवजी शेंदेलोण वापरावे. त्याचे आहारातील प्रमाण आवश्यकतेपेक्षा अधिक नसावे.
४. केसात कोंडा अत्याधिक प्रमाणात असेल तर वैद्याकडुन सल्ला घ्यावा व आहार विहार त्यानुसार करावा.
५. केसांचे व शरीराचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी विरूध्द आहाराचे सेवन टाळावे. यात मिल्कशेक, फ्रुटसलाड, शिकरण, फ्रीजचा अत्याधिक वापर, मुगाची खिचडी+ दुध आदींचा समावेश होतो.
नित्य विरूध्द आहारी लोकांनी केसांच्या गळती थांबवण्यासाठी केलेले प्रयत्न सफल होणे अतिशय कठीण आहे.
केस पिकणे हे पित्तप्रकृती लोकांत, अनुवांषिकतेमुळे, मीठ क्षारांचा वापर आहारात अधिक प्रमाणात असेल तर उत्पन्न होऊ शकते.घडलेल्या कारणांच्या विरूध्द केलेले उपाय प्रयत्न सफल होऊ शकतात. अनुवांषिकतेमुळे उत्पन्न केसांच्या तक्रारी बीजदोषाने असल्याने दुरूस्त होण्यास अत्यंत कठीण असतात.

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र
पावडेवाडी नाका
नांदेड
9028562102, 9130497856

Visit Our Page