Pages

Wednesday, June 29, 2016

घरोघरी आयुर्वेद

#घरोघरी_आयुर्वेद

पावसाळा सुरु झाला आहे. आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी रस्त्याच्या कडेला लागलेल्या ठेल्यावरून काहीतरी चमचमीत खाण्याचा मोह अनेकांना अनावर होतो. यादिवसांत मात्र विशेषतः तसे न करण्याची काळजी घ्या. केवळ पाणीपुरीच नाही तर तुमच्या दृष्टीने 'हेल्दी' वाटणारे एखादे सँडविचदेखील महागात पडू शकते. त्यात घातल्या गेलेल्या भाज्या प्रत्येकवेळेस नीट धुतल्या गेल्या असतीलच असे नाही. त्यामुळे एकंदरीतच जपा.

रस्त्याच्या बाजूला निखाऱ्यांवर भाजलेले आणि वरून तिखट-मीठ-लिंबू लावलेले कणीस म्हणजे तर कित्येकांचा जीव की प्राण. पण हे निखारे अनेकदा स्मशानातून पळवून आणलेल्या साहित्यातून बनलेले असतात; असा अहवाल गेल्याच वर्षी प्रसिद्ध झाला आहे याकडे दुर्लक्ष करू नका. घरी शिजवलेले ताजे-गरम अन्नच खा. क्वचित कधी नाईलाजास्तव बाहेरचे अन्न खाल्ले गेले तर त्यावर भाजलेली बडीशेप जरूर खा. ती पचनास मदत करते.

असे अन्न दुषित असल्यास पोटात दुखणे, मळमळणे, उलटी वा जुलाबासारखे त्रास होवू लागतात. अस्वच्छ अन्न बाधल्याने अतिसार सुरु झाल्यास तो औषधे घेऊन लगेच थांबवू नये. शरीरात गेलेला हानिकारक घटक बाहेर टाकण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला त्याने खीळ बसते. असा अतिसार लगेच थांबवला गेल्यास ते घटक शरीरात तसेच साठून कालांतराने पुन्हा त्रास करू शकतात. याकरताच आयुर्वेद तातडीने अतिसार थांबवण्यास सुचवत नाही. शरीरातील पाणी कमी होवू नये याची मात्र अवश्य काळजी घ्यावी. अगदी साखर-मीठ पाणीदेखील अशावेळी उत्तम काम करते. (मधुमेही वगळता)

मात्र; वरीलप्रमाणे लक्षणे दिसल्यास तातडीने आपल्या वैद्यांना दाखवा. या लक्षणांवर स्वतःच्या बुद्धीने औषधे घेऊ नका. अन्नातून विषबाधा झाली असल्यास मोठा फटका बसू शकतो.

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

No comments:

Post a Comment