Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Sunday, August 28, 2016

जादूचा डबा......!!!

#सामान्य_आयुर्वेद

जादूचा डबा......!!!

अरे काय झालं? एवढा काय शिंकतोयस? काल दहीहंडी फोडताना भिजला असणार, थांब एकच मिनिट.......
आणि आतून एक डबा येतो. त्यातून एक एक एक स्ट्रिप्स् बाहेर पडतात. सगळ्या अर्धवट फाडलेल्या. कधीतरी आजारी असताना कुठल्यातरी डाॅक्टरने दिलेली औषधं तशीच राहतात. आणि ही औषधं राहतात, नेहमीच, न चुकता.

दिलेली औषधं वेळेत संपवण्याचा कार्यक्रम केला तर अशी औषध रहात नाहीत. पण जरा कुठे बरं वाटायला लागलं की औषध थांबतं आणि त्याला स्टँडबायवर ठेवलं जातं. "वत्सा, तू आता या दिव्य डब्यामधे स्थानापन्न होऊन वाट बघ. म्हणजे येत्या कलियुगामधे जेंव्हा मनुष्यगण पुन्हा रोगग्रस्त होतील तेंव्हा तुझा पुनर्जन्म होईल आणि तू पीडित जनांच्या कामी येऊन तुला मोक्षप्राप्ती होईल." असा वरदान घेऊन त्या गोळ्या हायबरनेट होतात.

मग कुणी कलियुगीन मानव हंडी फोडताना भिजतो आणि गोळ्यांचा मोक्षासाठी डब्यातून पुनर्जन्म होतो.

प्रत्येक घरात एक डबा असतो. त्यात सगळी औषधं असतात. तापावर ही गोळी, खोकल्यावर ते पातळ औषध, सर्दीवर ती कॅप्सूल; आणि बरंच काही.

औषध वेळेत न संपवणे हा एक रोग. 'डाॅक्टर हे औषध कशावर?' या प्रश्नामागचा उद्देश बऱ्याचदा उत्कंठा नसून, पुढे कधी वापरता येईल, असाच असतो.

खोकल्यावर औषध घेतलं जातं, मग सर्दी होते. सर्दीच्या गोळ्या अवतरतात, त्या घेतल्या जातात, सर्दी सुकते; आणि शिंका सुरू होतात. शिंकांची गोळी प्रकटते आणि शिंका थांबवते; आणि ताप येतो. मग तापाच्या गोळ्या मर्त्यलोकी येतात आणि ताप उतरतो. मग थंडी वाजून ताप येतो. अरे बापरे हा काय नवीन प्रकार? अंग एवढं गरम असून सुद्धा थंडी कशी वाजते? याच्यावर काही गोळ्या आहेत का??????........ म्हणून अखंड डब्बा दर्शन होतं. आणि समजतं आपण मोठ्या संकटात अडकलोय. या राक्षसाला मारणारं शस्त्र अापल्याकडे नाहीये.

मग सर्व देवतांनी संकटसमयी भगवान विष्णूंना आठवल्यासारखं आपल्याला भगवान वैद्य आठवतात. मग वैद्य विचारतात, "कुणी सांगितलं होतं या गोळ्या घ्यायला?"
("तुम्हीच," असं हे मनातल्या मनात)

मग काय......वैद्यकाकांचा खर्च वाचवायला जाऊन खर्च वाढतो.

म्हणून योग्य वेळी वैद्यांचा सल्ला घेणे नेहमीच उत्तम. तो सल्ला पाळून सर्व औषधे वेळच्या वेळी संपवणे आणखीनच उत्तम. कारण औषध आणि त्यांचं प्रमाण रुग्णाच्या अवस्थेवरून ठरवूनच दिलेलं असतं. एक्स्ट्रा गोळ्या बॅकपसाठी नसतात, तर त्यामागे वैद्याचा विचार असतो. आपल्याला दिलेलं औषध दुसऱ्याला लागू पडेलच असं नाही. म्हणून आपल्याला दिलेलं औषध आपणच घ्यावं, वैद्याच्या सल्ल्याने, संपूर्ण.....

तुम्ही सांगताय ते एकदम मान्य, पण.........
डबा मात्र आम्ही मेन्टेन करून ठेवणारच, अगदी व्यवस्थित.

[म्हणून प्रिस्क्रिप्शन्स् एवढ्या खतरनाक लिपीमधे लिहिण्याची प्रथा सुरू झाली असावी.]

©वैद्य अमित पाळ.
॥श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद॥
गोमंतक
email- dramitsva@gmail.com

Vaidya Amit Pal

No comments:

Post a Comment

Visit Our Page