Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Sunday, September 23, 2012

तुळस ही गणेश पूजनात निषिद्ध का?

भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा अपवाद वगळता तुळस ही गणेश पूजनात निषिद्ध का? त्याची कथा...

धर्मध्वज राजाची लावण्यवती कन्या 'वृंदा' ही उपवर झाली होती. तीने आपल्या पित्यास माझे लग्न विष्णूशी लावून द्या असा हट्ट धरला. त्यावर धर्मध्वजाने तिला दैवी वरा
चा ध्यास सोडून मानवी वर सुचविण्यास सांगितले. परंतु वृंदाने त्यांचे ऐकले नाही. ती विष्णूवनात जाऊन चतुर्भुज विष्णूचे ध्यान व जप करुन लागली. वृंदेने एकचित्ताने एक लक्ष वर्ष उग्र तप केले व त्याच्या प्रभावाने तिला अंतर्ज्ञान प्राप्त झाले.

एकदा वृंदेने भागीरथी नदीच्या तिरावर विघ्नेश्वर गणेशास ध्यानमग्न पाहिले. अंतर्ज्ञानाने तिला गणेश हा विष्णूरुप असल्याचे ज्ञान झाले व ती गणेशावर मोहित झाली. वृंदेने श्रीगणेशाचे ध्यान भंग केले. डोळे उघडताच तो म्हणाला, "हे माते, तू कोण आहेस? माझ्या ध्यानाचा भंग का करत आहेस? गणेशउपासनेत एकचित्त असणा-याची एकाग्रता भंग करणा-यास नरकात जावे लागते, त्यामुळे पुन्हा माझ्या ध्यानात भंग आणू नकोस" त्यावर वृंदा म्हणाली "मी धर्मध्वजाची कन्या असून नाना तपांनी प्रभावयुक्त आहे, मला तुझ्याशी विवाह करायचा आहे तरी माझा त्वरित स्वीकार कर ". त्यावर गणेशाने तिला समजावले, "मी तुझ्याशी विवाह करु शकत नाही. विवाह करुन मी मोहपाषात अडकणार नाही. तू तुझ्या तपासम तुल्यबळ असा वर पहा".

गणपतीच्या नकाराने संतापलेल्या वृंदेने, "तू विवाह करशीलच" असा शाप दिला. शापास प्रतिउत्तर म्हणून गणेशाने वृंदेस, "तू वृक्ष होऊन मूढ योगीत पडशील" असा शाप दिला. हा दारुण शाप ऐकताच वृंदा घाबरुन थरथर कापू लागली व तिने गणाधीशाची क्षमा मागितली.

दयावान गणेशाने तिची तपश्चर्या लक्षात घेऊन तिला सांगितले, "देवी तू येथून जा, वनात तुला असूर भेटेल त्यावर तू आसक्त होशील, असूर मरताच पतिव्रते तू आपल्या देहास चितेच्या अग्नीत त्यागशील व वृक्षरुप तुळस होशील. महाविष्णूस शाप देऊन शिळारुपी शाळीग्राम करशील. त्यानंतर भावी काळात विष्णूची पत्नी म्हणून निरंतर रममाण होशील. माझ्या कृपेने तू धन्य होशील. देवांना तुझी पुत्रपुष्पे सदैव मान्य होतील. अन्य काष्ठासम तुला त्रैल्योक्यात कोणीही मानणार नाही तर तुझ्या काष्ठांच्या माळा सकळ जन गळयात भक्क्तीभावाने घालतील. विष्णूची पत्नी म्हणून मानव तुजला पुजतील. तथापि, मला तू वर्ज्य असशील यात मात्र संशय नाही."

गणेशास वंदन करुन चिंताक्रांत वृंदा वनात तप करण्यासाठी निघून गेली. वृंदा एकचित्त 'गणेश नाममंत्र जपत ' तप करत होती. दीड लक्ष वर्षे उलटून गेल्यावर गणेश प्रसन्न झाले व तिच्यासमोर प्रकट झाले. हर्षभरीत वृंदा त्यांना प्रणाम करुन स्तुतिस्तोस्त्र गाऊन पूर्वी केलेल्या चुकीची क्षमा मागू लागली. त्यावर गणेशाने तिला वरदान दिले "तू गाणपत्य होशील. वर्षातून एकदा तुला माझ्या पूजेत स्थान मिळेल. भाद्रपद शुक्ल चतुर्थीस तुझे पत्र मला भक्तीभावाने वाहिल्यास ते मला पावन होतील. भाद्रपद शुक्ल चतुर्थीस मला वाहिल्या जाणा-या एकवीस प्रकारच्या पत्रीत तुझ्या पत्रांचाही समावेश असेल व केवळ त्या दिवशीच तुझे पत्र मला वाहिलेले चालेल अन्य दिवशी तुझे पत्र माझ्या पूजनात चालणार नाही."

असे बोलून श्रीगणेश अंतर्धान पावले व वृंदेचे मन प्रसन्न व हर्षोत्फुल झाले.

सर्व पूजांमध्ये महत्त्वाचे स्थान असणा-या तुळशीस गणपती पूजनात निषिद्ध मानले जाते. परंतु, वर्षातून एकदा गणेश चतुर्थीस (भाद्रपद शुक्ल चतुर्थीस) तिचा समावेश गणेश पूजनात केला जातो. त्या दिवशी गणपतीला वाहिल्या जाणा-या एकवीस पत्रींमध्ये तुळसही असते.

गणेशास भाद्रपद शुक्ल चतुर्थीस वाहिल्या जाणा-या एकवीस पत्री पुढीलप्रमाणे आहेत: (१) पिंपळ, (२) देवदार, (३) बेल, (४) शमी, (५) दूर्वा, (६) धोतरा, (७) तुळस, (८) भृंगराज / माका, (९) बोर, (१०) आघाडा, (११) रुई/मांदार, (१२) अर्जुन/अर्जुनसादडा, (१३) मरवा, (१४) केवडा/केतकी, (१५) अगस्ती/ हादगा, (१६) कन्हेर/ करवीर, (१७) मालती/मधुमालती, (१८) डोरली/बृहती, (१९) डाळिंब, (२०) शंखपुष्पी/विष्णुकांत, (२१) जाई/चमेली.
http://www.facebook.com/umesh.kulkarni.35

No comments:

Post a Comment

Visit Our Page