Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, June 1, 2016

हिंग

आयुर्वेद  सांगतो ~ हिंग !


पूर्वी जेव्हा स्वयंपाक घरी व्हायचा तेव्हा हिंगाची फोडणी जरूर दिली जायची . विशेष करून वरणाला . सगळ्या भाज्या आमट्या याचा बेस हा कांदा टोमेटो याचा लगदा किंवा सभ्य भाषेत 'प्युरी ' हा नसल्यामुळे मसाल्याच्या पदार्थात वैविध्यता होती . प्रत्येक जिन्नस जिभेवर आपली चव आणि सुंगंध याची नोंद देऊन जायचा . हिंग हा त्यातला महत्वाचा भाग आहे .

सध्या ज्या आणि जितक्या काही पोटाच्या आणि पचनाच्या वाढलेल्या तक्रारी आहेत त्यामागे पारंपारिक मसाल्याचा सुटलेला हात हे महत्वाचे कारण आहे . जड जड खायचे पण ते पचवायचे कसे ?हा प्रश्न काश्मीर पासून कन्या कुमारी पर्यंत आहे . . . कारण सर्वत्र अत्यंत वेगाने पसरलेल्या पंजाबी खाण्यात नक्की मसाला काय असतो हेच समजत नाही . . आपल्याकडे दोन पर्याय असतात . . ग्रीन ग्रेव्ही किंवा रेड ग्रेव्ही . . विषय संपला !! अर्थात पंजाबी पदार्थ हे पंजाबी घरात उत्तम होत असतील आणि काही घरात असे पदार्थ खाल्यावर हॉटेल मध्ये आपण काय 'कचरा ' खातो याची सुद्धा जाणीव होईल . त्यामुळे आक्षेप हा पंजाबी पदार्थावर नसून तो व्यावसायिक रित्या बनवण्याचा पद्धतीवर आहे याची नोंद घ्यावी .

तर आपण खाल्लेले जड अन्न हे अन्नच पचवते असे सांगतिले तर कोणाचा विश्वास बसेल ?? हे सत्य आहे प्रभू . . . भारतीय आहारशास्त्रात तशी योजनाच केली आहे . हिंग हा यातील एक प्रधान योद्धा ! हिंगाचे काही गुण पाहू :-

१. पाचक - यावर काही लिहिण्या आधीच तुम्हाला 'हिंगोली ' आठवली असेल ( हिंगोली गाव नाही हो . . गोळी ) . पोट गच्च भरले आहे . ढेकर अडकली आहे किंवा ती बाहेर यायला पण रस्ता नाही . अस्वस्थ होत आहे . . अशा वेळी तोंडात हिंगोली टाकतो आपण .. यातील हिंग हा महत्वाचा घटक .

हिंग हा गुणाने  उष्ण  आणि तीक्ष्ण आहे . त्यामुळे त्याचे पाचन आणि अग्नी दीपन याचे कार्य उत्तम प्रकारे घडते .

तसेच एखाद्या ठिकाणी वेदना असेल तर वेदना कमी करायला हिंगाचा लेप लावतात .

२. वात आणि कफ नाशक :- हिंगाचा उपयोग अनेक वात आणि कफजन्य व्याधींवर करतात .

३. पित्त वर्धक :- हिंगाचे आणि पित्ताचे गुण समान असल्याने हिंग हा पित्त वर्धक आहे . त्यामुळे पित्त प्रकृतीच्या लोकांनी याचा वापर जपून करावा .

४. रोगघ्नता :- हिंग हा शूल (वेदना ) , उदर , पोट फुगी , पोटात झालेले जंत आणि गुल्म नावाचा रोग यांचा नाश करतो .

इत्यादी !!

हिंग हा 'निर्यास ' स्वरुपात संकलित केला जातो . त्यामुळे त्यांचे संग्रहण ते आपल्या हातात येई पर्यंत त्यात काय आणि कोणत्या प्रकारची भेसळ झालेली असते याचा अंदाज करता येत नाही . त्यामुळे चांगल्या कंपनीचा हिंग वापरावा . त्यामुळे अपाय होत नाही !

हिंगाची हि थोडक्यात माहिती . असा बहुगुणी हिंग स्वयंपाकात जरूर असावा . . !!

वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
आयुर्वेद कोश (https://www.facebook.com/aarogyakosh/ )
९१७५३३८५८५

(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)

No comments:

Post a Comment

Visit Our Page