Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Tuesday, June 7, 2016

पुंसवन गदारोळ का ??

#घरोघरी_आयुर्वेद

पुंसवन......गदारोळ का??

गेल्याच आठवड्यात आयुर्वेद असा शब्द कानावर पडताच पोटात मुरडा होणाऱ्या एका वृत्तपत्राने आयुर्वेदोक्त पुंसवन विधीच्या संबंधाने विनाकारण वातावरण कलुषित करण्याचा असफल प्रयत्न केला. पुंसवनाचे वर्णन आयुर्वेदीय ग्रंथातून वगळण्याचा विचार चालू असल्याच्या थापादेखील या भिकार वर्तमानपत्राने मारल्या. मात्र या नादानपणापायी विनाकारण आयुर्वेदासंबंधित गैरसमज निर्माण होत आहेत हे जाणवल्याने याविषयी लिहित आहे.

पुंसवन विधीची प्रक्रिया चरकसंहिता या ग्रंथात आली असली तरी त्याची पार्श्वभूमी तेथे विशद करण्यात आलेली नाही. ती विशद करण्यात आली आहे वाग्भटाचार्यकृत 'अष्टांगहृदय' या ग्रंथात. या ग्रंथावरील अरुणदत्त टीकेचा आधार घेऊन आणि गुरुवर्य वैद्य अनिल पानसे आणि वैद्य हृषीकेश म्हेत्रे यांसारख्या अष्टांगहृदय या ग्रंथाच्या अभ्यासकांचे या टीकेबाबत मार्गदर्शन घेऊन याविषयाचा अभ्यास केल्यावर जी तथ्ये सापडली ती वाचकांसमोर मांडत आहे. अर्थात त्यांचे मार्गदर्शन हे टीकेच्या अर्थापुरते मर्यादित असून त्या अनुषंगाने केलेल्या विधानांची जबाबदारी मात्र सर्वस्वी माझी आहे.

१. पुंसवनविधी करण्याचा योग्य काळ हा गर्भधारणा झाल्यावर आणि गर्भलिंग 'व्यक्त' होण्यापूर्वी म्हणजे गर्भाधान झाल्यावर एक सप्ताह पूर्ण इथपासून ते एक महिना पूर्ण होण्याच्या आत असा सांगितला आहे. आजच्या घडीला सुमारे ९८% वेळेस गर्भधारणा झाल्याची खात्री ही मासिक पाळी चुकल्यावर म्हणजेच एक महिना पूर्ण झाल्यावर केली जाते. थोड्क्यात; आयुर्वेदाला अपेक्षित काळाची मर्यादा इथे ओलांडली जात असल्याने पुंसवन करताच येत नाही.

२. पुंसवनविधी हा फक्त 'पुष्य' या नक्षत्रावर करायचा आहे. म्हणजेच तो केल्या जाणाऱ्या स्त्रीची गर्भधारणा झाल्यावर एक आठवडा ते एक महिना या कालावधीत पुष्य नक्षत्र असायला हवे. आजकाल ज्याला probability असे म्हटले जाते ती probability या अटीमुळे कितीतरी प्रमाणात खालावते हे सत्य थोडासा विचार केल्यास कोणीही सांगू शकेल!

३. गर्भाचे लिंग हे गर्भधारणा होतानाच निश्चित झाले आहे असे आयुर्वेद सांगतो. तरीही असा विधी का सांगितला गेला? त्याचे फलित किती असेल? यावर आयुर्वेदाचे उत्तर आहे....'अत्यल्प'! का? कारण जर दैव बलवत्तर असेल तर शंभर वेळा प्रयत्न करूनही अशा प्रयत्नांना यश मिळणार नाही आणि बहुतांश वेळेस दैवच बलवत्तर असते असे अरुणदत्त स्पष्टपणे म्हणतात.

४. ही सारी चर्चा संपवण्यापूर्वी वाग्भट असे सांगतात की; पुंसवन हा विधी पुत्रप्राप्ती या उद्देशाने केलेला नसून कन्याप्राप्ती करून घेण्याची इच्छा असल्यास याच विधीत अमुक-अमुक बदल करावेत. थोड्क्यात; आयुर्वेद कुठेही Gender Biased नाही हे सुज्ञांच्या सहज लक्षात येईल.

आता काही महत्वाचे मुद्दे;
१. पुंसवनाचे हे उल्लेख आयुर्वेदीय संहितांमधील तत्कालीन सामाजिक-राजकीय परिस्थितीनुसार आलेले संदर्भ इतक्याच दृष्टीने पाहिले जातात. त्यापलीकडे जाऊन ते शिकवण्यास विशेष प्रयत्न घेणे वा तसे करण्यास उत्तेजन देणे हे प्रकार घडत नाहीत.

२. पुत्र असल्यास त्यालाच जगवा आणि स्त्रीभ्रूणहत्या करा असे संदेश आयुर्वेदाचे नाहीत. याच्या अगदी विरुद्ध जे जे उत्तम असे या जगात आहे ते सर्व स्त्रीच्या ठायीच आहे असे मत आचार्य चरक नोंदवतात!

३. आयुर्वेद हे फक्त भारताचेच शास्त्र आहे का? तसे मत असल्यास जाहीरपणे मांडावे आणि त्याच्या संवर्धनासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत. पण तसे नसेल आणि ते भारतात जन्मलेले पण जागतिक पातळीवर कुठेही वापरले जाणारे शास्त्र आहे असे मत असेल तर जगाच्या पाठीवर आज कित्येक देशांत गर्भलिंग तपासणीच सोडा; निवड करणेदेखील कायद्याने मान्य केले आहे. तिथल्या लोकांना यासंबंधी अधिक संशोधन करणे शक्य आहे.

४. या पुंसवनविधीमुळे भारतात किती प्रमाणात स्त्रीभ्रूणहत्या झाल्या याची आकडेवारी सादर करता येईल का? करता येत नसल्यास एरव्ही 'एव्हिडन्स बेस्ड रिसर्च'च्या गप्पा मारणारे लोक याबाबत गदारोळ का करत आहेत? हा दुटप्पीपणा नाही का?!

५. आज आधुनिक विज्ञानातील सोनोग्राफी, बीबीटी चार्ट, स्पर्म व्हॉशच्या पद्धती यांसारख्या ज्या अनेक गोष्टींतून गर्भलिंग निदान होऊ शकते; किंबहुना तसे झाल्याच्या नोंदणीकृत घटना आहेत.....अशा पद्धतींवरदेखील सरसकट बंदी घातली जाणार का? का आयुर्वेदाकरताच तुघलकी कायदयांचा बडगा दाखवण्यात पौरुषार्थ मानणार?!

आता सगळ्यात कळीचे दोन मुद्दे मांडतो आणि थांबतो. आजच्या कायद्याच्या दृष्टीने पुंसवनविधीसारखे विधी हे गुन्हा ठरत असतील तर कायद्यापेक्षा उच्च कोणीही नाही या भावनेने कायद्याचे पालन झालेच पाहिजे असे आमचे स्पष्ट मत आहे. किंबहुना तसेच आमच्या वैद्यांकडून होत आहे असा आमचा दावा आहे. मात्र; याकरता सुमारे तीन- साडेतीन हजार वर्षांपूर्वीच्या ग्रंथातील संदर्भच वगळावे अशी मागणी करणे हा निखालस मूर्खपणा आहे.

आयुर्वेदीय संहितांचे प्रत्यक्ष वाचन न करताच त्यात काय दिले आहे यावर अधिकारवाणीने बोलणाऱ्या व्यक्तींनी यापुढे दहा वेळा विचार करावा. आणि हिंदुत्वाशी प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष संबंधित असलेल्या आयुर्वेदादि शास्त्रांवर असे हल्ले करून स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्या दलालांनीदेखील हे लक्षात ठेवावे की ते आगीशी खेळत आहेत. आयुर्वेद इतका सहजी नष्ट होणारा नाही. हजारो वर्ष आम्ही टिकून आहोत....कायम असू.

सरटेशेवट; आयुर्वेदीय वैद्य आणि वाचकवर्गाला एकच विनंती करतो की हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायला हातभार लावा. माध्यमांच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडायला आज तुम्हा सगळ्यांची साथ गरजेची आहे.

केला जरी पोत बळेची खाले ।
ज्वाळा तरी तें वरती उफाळे ।

जय आयुर्वेद!

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

No comments:

Post a Comment

Visit Our Page