Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Saturday, December 5, 2015

स्त्री वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

स्त्री वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

      दाम्पत्याने विवाहानंतर किमान तीन वर्ष सतत प्रयत्न करूनही गर्भधारणा न होणे ह्याला वंध्यत्व म्हणतात. वंध्यत्वाचे वैद्यकीय कारण पुरुष किंवा स्त्री दोघांपैकी एकात किंवा दोघांमध्येही असू शकते. नेमके कारण शोधून त्याची चिकित्सा केल्याने गर्भधारणा होणे शक्य असते. नेमके कारण लक्षात आले नाही तर मात्र स्त्रीलाच दोषी ठरवून ‘पुनर्विवाह’ करण्याची मानसिकता अजूनही भारतात, विशेषतः अशिक्षित किंवा अति उच्चभ्रू समाजात दिसते.
३१ ते ४० वयोगटातील सुमारे ६३% विवाहित जोडप्यांना वंध्यत्व निवारणासाठी वैद्यकीय चिकित्सेचा आधार घ्यावा लागतो. ज्यामध्ये सुमारे ४१% पुरुषांमध्ये शुक्रबीज दोष तर सुमारे ४०% स्त्रियांमध्ये बीजकोषात साबुदाण्याप्रमाणे लहान कोष तयार होणे (PCOS) हा विकार सापडला. स्त्री वंध्यत्व ही एक फार मोठी समस्या आहे आणि त्यावर आयुर्वेदीय उपचार पद्धतीचा वापर करण्याची नितांत गरज आहे असे जाणवते. ह्या लेखात पुरुष व स्त्री वंध्यत्व ह्यापैकी फक्त स्त्री वंध्यत्व हाच विषय केंद्रित केला आहे.
आयुर्वेदात वर्णन केलेल्या ‘ऋतु, क्षेत्र, अम्बु आणि बीज’ ह्या ४ गोष्टी सुस्थितीत असतील तर गर्भधारणा होण्यास बहुदा अडचण येत नाही. आधुनिक वैद्यक शास्त्रात दिलेली वंध्यत्वाची कारणे देखील ह्या चार मध्ये सामावतात असे आपल्या लक्षात येईल.
     ऋतु - म्हणजे गर्भधारणेसाठी सुयोग्य काळ. स्त्रीसाठी वय वर्ष १६ पासून पुढे आणि मासिक रजःस्रावाच्या १० व्या दिवसापासून १८ व्या दिवसापर्यंत हा काळ गर्भधारणेसाठी योग्य असतो. म्हणूनच स्त्रीला ह्या काळात ‘ऋतुमती’ म्हणतात.
     क्षेत्र – गर्भाशय, बीजवाहिन्या, बीजकोष ह्या सर्व भागांना एकत्रितपणे ‘क्षेत्र’ समजावे. ह्यातील कोणत्याही भागात दोष असेल तर गर्भधारणा होऊ शकत नाही.
     अम्बु - झाडांच्या वाढीसाठी जसे खतपाणी तसेच गर्भाशयाच्या व गर्भाच्या पोषणासाठी जे जे काही आवश्यक घटक ते सर्व म्हणजेच "अम्बु". आधुनिक वैद्यक शास्त्राप्रमाणे इस्ट्रोजिन, प्रोजेस्टेरॉन, प्रोलॅक्टिन इ. संप्रेरकांचा समतोल असणे येथे अभिप्रेत आहे. ऋतुस्राव, गर्भधारणा, गर्भपोषण, स्तन्यनिर्मिती, रजोनिवृत्ती अशा सर्व स्थिती सुरळीत होण्यासाठी शरीरातील अन्तःस्रावी ग्रंथींचे कार्य अविरतपणे चालू असते. गर्भावस्थेत ह्यांचा समतोल गर्भाच्या पोषणासाठी अनिवार्य असतो.
     बीज - जन्मतः स्त्रीबीजकोषात ठराविक संख्यने सूक्ष्म स्वरुपात स्त्रीबीज दडलेली असतात. दर महिन्याच्या ठराविक दिवशी एक एक बीज परिपक्व होते व त्याचे पुरूषबीजाबरोबर मीलन झाले तर गर्भधारणा संभवते, अन्यथा मासिक स्रावाच्या वेळी स्त्री शरीरातून हे बीज बाहेर टाकले जाते. स्त्री व पुरुषबीजे निरोगी असली तरच गर्भधारणा व्यंगरहित घडते, निरोगी व सुदृढ बालक जन्माला येते.
स्त्री वंध्यत्वाची प्रमुख कारणे – आधुनिक वैद्यक शास्त्रानुसार
     • अनियमित रजःप्रवृत्ती (Irregular menstruation) किंवा रजःप्रवृत्ती न होणे (Amenorrhea) त्यामुळे स्त्रीबीज परिपक्वता न होणे (Anovulatory cycle) (अम्बु दोष)
वयाच्या साधारण १३ – १४ व्या वर्षी स्त्रीला प्रथम रजःप्रवृत्ती सुरु होते. संप्रेरकांच्या असंतुलनामुळे रजःप्रवृत्तीचे कालचक्र अनियमित होते. मानसिक ताण, आहारातील वैषम्य, हॉर्मोन्सच्या गोळ्या वारंवार घेणे, वजनाचे चढ-उतार, अति श्रम, जीर्ण आजार, केमोथेरपी, क्षकिरणांचा दुष्परिणाम अशा अनेक कारणांमुळे रजःप्रवृत्ती अनियमित होते. कारणांचा विचार करून चिकित्सेची आखणी करावी लागते.
     • गर्भाशयातील अंतस्त्वचेला (Endometritis) व बीजवाहिनीला शोथ (Salpingitis) त्यामुळे बीजवहनात अडथळा (Tubal obstruction) (क्षेत्र दोष)
ट्युबरक्युलोसिस किंवा लैंगिक आजारांमुळे होणारे जंतुसंसर्ग झाल्याने गर्भाशयाच्या व बीजवाहिनीच्या अंतस्त्वचेला सूज येते.
    • पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम (PCOS) (अम्बु विकृतीमुळे झालेला क्षेत्र दोष) –
बीजकोषात साबुदाण्याप्रमाणे कोष तयार होणे - सुमारे ४०% स्त्रियांमध्ये आजकाल हा विकार लहान वयातच झालेला आढळतो. बदलत्या जीवनशैलीचा परिणाम, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, चरबी वाढणे, थायरॉइड विकृती, मानसिक ताण, जीर्ण आजार, विद्युत चुंबकीय उपकरणांचा बेसुमार वापर ह्यासारख्या कारणांमुळे हॉर्मोन्सचे संतुलन बिघडणे ही ह्याची प्रमुख कारणे आहेत.
   • वंक्षणभागातील अवयवांचा शोथ (PID) (क्षेत्र दोष)
योनिमार्गात जंतुसंसर्ग झाल्यास गर्भाशय मुखाचे स्राव त्याचे नियंत्रण करण्यास समर्थ असतात. शरीराची एकंदर रोगप्रतिकारक्षमता खालावाल्यास हे जंतुसंक्रमण वंक्षण भागात पसरून शोथ निर्माण करतात.
   • गर्भाशय अंतरस्तर अस्थानता (Endometriosis) (क्षेत्र दोष)
ह्या अवस्थेत स्तराची जाडी वाढते आणि गर्भाशयाच्या आसपास जागा मिळेल त्या ठिकाणी हे स्तर पसरत जातात. त्यामुळे बीजवाहिनीत अडथळा निर्माण होतो व गर्भधारणेला प्रतिबंध होतो.
   • गर्भाशयात ग्रंथि होणे (Uterine fibroids) (क्षेत्र दोष)
ह्या ग्रंथी होण्याचे नेमके कारण अवगत नाही. परंतु ग्रंथी निर्माण झाल्यावर इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरोन संप्रेरकांची वाढ होते वा चिकित्सा करणे कठीण होते.
   • बीज परिपक्वता दोष व बीजकोशाला इजा होणे (Anovulatory cycle) (बीजदोष)
संप्रेरकांच्या संतुलनात, विशेषतः हायपोथॅलॅमसच्या क्रियेत बिघाड झाल्याने बीज परिपक्वता अनियमित होते. ह्याचा परिणाम प्रजनन यंत्रणांवर होऊन वंध्यत्व येते.
    • टॉर्च - (TORCH); आय.जी.जी. व आय.जी.एम.
विशिष्ट रोगांच्या समुच्चयाला टॉर्च संज्ञा दिली आहे. ह्या अंतर्गत खालील रोगांचा अंतर्भाव आहे -
T – TOXOPLASMOSIS
O – Other infections (Syphilis, Varicella Zoster, Parvovirus B-19, Listerosis & Coxsackie Virus)
R – RUBELLA
C – CYTOMEGALOVIRUS
H – HERPES SIMPLEX VIRUS – 2
     मानवी शरीरातल्या अति महत्वाच्या यंत्रणा, रचना किंवा अवयव यांचे संरक्षण करण्यासाठी शरीराची स्वतंत्र यंत्रणा सतत राबत असते. त्या यंत्रणेचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी प्लासेन्टल बॅरियर हा एक उंबरठा आहे. गर्भाचे पोषण मातेच्या रक्तापासून होत असते. त्यामुळे मातेच्या रक्तात काही दोष असले तर त्याचा परिणाम गर्भावर होऊ नये म्हणून हे बॅरियर गर्भ रक्षणाचे काम करते. परंतु काही जीवाणू किंवा विषारी द्रव्य ह्या बॅरियर मधून पण पार होतात. त्यामुळे गर्भस्राव, गर्भपात, मृतगर्भ किंवा व्यंग असलेला गर्भ उत्पन्न होतो. हा विषय आधुनिक वैद्यक शास्त्रात TORCH म्हणून वर्णन केलेला आहे. गेल्या काही वर्षात टॉर्च इन्फेक्शन बद्दल बरीच चर्चा होतांना दिसते. त्याबद्दल थोडी पण महत्वाची माहिती असणे आवश्यक आहे.
     संसर्गामुळे शरीरातील रोगप्रतिकार प्रणाली कार्यान्वित होते व त्या त्या जंतूंच्या विरोधात प्रतिद्रव्ये (Antibodies) निर्माण होतात. ह्या प्रतिद्रव्यांचे मापन करून टॉर्च संसर्गाचे सामर्थ्य किती आहे हे ठरविता येते. ही प्रतिद्रव्ये दोन प्रकारची असतात, आय.जी.जी. व आय.जी.एम. भूतकाळात झालेल्या संसर्गामुळे आय.जी.जी. प्रकारची प्रतिद्रव्ये रक्तात आढळतात तर नजीकच्या काळात झालेल्या आशुकारी संसर्गामुळे आय.जी.एम. प्रकारची प्रतिद्रव्ये रक्तात आढळतात. आय.जी.जी. प्रतिद्रव्ये आढळणे हे स्त्री स्वास्थ्याच्या दृष्टीने अनुकूल असते कारण त्या जंतूंच्या संसर्गाची भीती गर्भावस्थेत उरत नाही. ह्याउलट आय.जी.एम. प्रकारची प्रतिद्रव्ये रक्तात आढळली तर त्याची चिकित्सा करणे आवश्यक ठरते. आय.जी.एम. हे नुकत्याच झालेल्या संसर्गाचे द्योतक आहे व हे सूक्ष्म जंतु गर्भपोषणास अपाय करू शकतात. अयोग्य वाढ झाल्याने असा गर्भ मातेच्या उदरात टिकून रहात नाही. त्यामुळे गर्भस्राव, गर्भपात किंवा अकाली प्रसव होण्याची भीती राहते.
     • गर्भधारणक्षमता खालावणे (AMH)
अॅंटिम्युलेरियन हॉर्मोन चे प्रमाण बीजकोशाची प्रजनन क्षमता दर्शविते. पेशीविघातक परमाणुंच्या (Free radicals) आघातामुळे व वाढत्या वयामुळे हे प्रमाण खालावत जाते. १.० नॅनोग्रॅम/मि.ली. हे प्रमाण गर्भधारणेसाठी उत्तम समजले जाते. ०.७ ते ०.९ हे मध्यम व त्यापेक्षा कमी असणे हीन समजले जाते. PCOS विकारात मात्र हे प्रमाण विकृत स्वरुपात वाढलेले दिसते.
    • बीजवाहिनी अंतर्गत गर्भधारणा (Ectopic pregnancy)
स्त्रीबीज व शुक्रबीजाचे मिलन बीजवाहिनीत झाल्यावर अंडकोष (Zygote) फलित होतो. पुढे साधारणतः ८ ते १० दिवसांनी गर्भाशयात तो स्थानापन्न होतो. इस्ट्रोजेनमुळे बीजवाहिनीत ओलावा किंवा स्निग्धपणा येऊन ही क्रिया घडते. हे स्राव कमी प्रमाणात स्रावित झाले तर बीजवाहिनीत हा अंडकोष अडकून राहतो व बीजवाहिनी अंतर्गत गर्भधारणा होते.
    • शल्यकर्माचे विपरीत परिणिती (Postsurgical complication)
वंक्षण किंवा उदराच्या अधोभागातील शल्यकर्मामुळे त्या ठिकाणी तंतुमय पेशी (Adhesions) उत्पन्न होतात. ह्यामुळे गर्भाशय व बीजवाहिनींवर दबाव वाढतो जो प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो.
    • सहज विकार (Congenital Defects)
क्वचित प्रसंगी गर्भाशय व इतर प्रजनन यंत्रणेची निर्मिती होत नाही, गर्भाशय मुख सुईप्रमाणे अतिशय लहान असते, गर्भाशयात पटल असते, गर्भाशये दोन असतात, पुरेशी वाढ होत नाही. अशा विकारांचे परिणाम वंध्यत्वास कारणीभूत होतात.
     रोगनिदाना साठी काही प्रमुख चाचण्या
सर्व्हायकल म्युकस टेस्ट – ह्यात गर्भाशयमुखाचा स्राव घेऊन परीक्षण करतात. हा स्राव इस्ट्रोजेन संप्रेरकाच्या प्रभावाने होत असतो. स्त्रीबीज परिपक्व झाले की हा स्राव हलका पिवळसर रंगाचा होतो व तसे न झाल्यास हा स्राव घट्ट व चिकट राहतो. स्राव घट्ट असता शुक्रबीज गर्भाशयात सहजतेने जाऊ शकत नाही. अशा वेळी गर्भधारणा होत नाही.
ट्यूबल पेटन्सी – बीजकोषात तयार झालेले स्त्रीबीज बीजवहन नलिकेत येऊन थांबते. त्याठिकाणी शुक्रबीज येऊन शुक्र आणि स्त्रीबीजाचे मीलन होते. त्याकरिता ह्या बिजवाहिनीचा मार्ग मोकळा असावा लागतो. मार्गात अडथळा असेल तर हे मीलन न झाल्याने गर्भधारणा होत नाही. ही नलिका तपासण्यासाठी काही पद्धती आहेत.
  १. हिस्टोसालपिंजोग्राफी. ह्यात क्षकिरण यंत्राखाली रुग्णेला झोपविले जाते. क्षकिरण अपारदर्शक (X-ray opaque) द्रव्य गर्भाशयात प्रविष्ट करून ते बीजवाहिनीतून जाते किंवा नाही हे पाहिले जाते.
  २. लॅप्रोस्कोपी - बेंबीजवळ लहानसा छेद करून सूक्ष्म दुर्बीण आत घातली जाते. गर्भाशय, बीजवाहिन्या आणि आसपासचे संपूर्ण भाग व त्यातील दोष ह्यातून स्पष्ट दिसतात व त्यांची चिकित्सा ह्याच दुर्बिणीच्या सहाय्याने करता येतो.
   सोनोग्राफी - सोनोग्राफीच्या सहाय्याने गर्भधारणेसाठी योग्य काळ अगदी अचूकपणे कळू शकतो. बीजाची वाढ, परिपक्वता योग्यप्रकारे होते किंवा नाही हे स्पष्टपणे दिसते. गर्भाशय शोथ, एन्डोमेट्रिओसिस, बीजवाहिनी शोथ असल्यास तेही स्पष्ट दिसतात.
स्त्री वंध्यत्व - आयुर्वेदीय चिकित्सा सूत्रांचा संकलित विचार -
वंध्यत्व आणि गर्भावस्थेतील समस्यांचे आधुनिक वैद्यक शास्त्रात केलेले वर्णन PCOS, PID, AMH, Endometriosis, TORCH, Ectopic pregnancy अशा निरनिराळ्या पारिभाषिक संज्ञा वापरून केले आहे. काळ व भाषेच्या भिन्नतेमुळे आयुर्वेदात ह्या परिभाषा नाहीत. तरीही हे सर्व रोग, लक्षणे आणि उपद्रव आयुर्वेदोक्त “ऋतु, क्षेत्र, अम्बु, बीज” ह्या चौकटीतच चपखल बसल्याचे आपल्या लक्षात येईल. स्त्रीरोग, वंध्यत्व, दहा महिन्यांच्या गर्भावस्थेतील प्रत्येक टप्प्यात होणारे बदल, गर्भ व गर्भिणीची पोषक घटकांची नेमकी गरज ओळखून त्या त्या अवस्थेची चोख भरपाई करणारे कल्प सादर करणारे आयुर्वेद हे जगातील एकमेव वैद्यक शास्त्र आहे.
आयुर्वेदात वर्णन केलेला चिकित्सा क्रम आणि कल्प ह्यावर नक्कीच लाभदायक ठरतात.
चिकित्साक्रम व कार्यकारण विचार –
पंचकर्म - बस्ति चिकित्सा
          बस्ति चिकित्सा : गर्भधारणेपूर्वी यथोचित पंचकर्म चिकित्सा करून शरीरशुद्धी करावी ही संकल्पना आपण जाणतोच. त्यातही बस्ति चिकित्सा सर्वात महत्वाची आहे. ही चिकित्सा उभयतांनी करावी. ह्याने गर्भाशयातील अंतस्त्वचेला व बीजवाहिनीला शोथ व त्यामुळे बीजवहनात अडथळा, वंक्षणभागातील अवयवांचा शोथ (PID), गर्भाशयाच्या अंतस्त्वचेचा अवाजवी रोगट विस्तार (Endometriosis) ह्या विकारांवर मात करता येते.
अपानोऽपानगः श्रोणिवस्तिमेढ्रोरुगोचरः । शुक्रार्तवशकृन्मूत्रगर्भनिष्क्रमणक्रियः ।। अष्टांगहृदय, सूत्रस्थान १२/९)
अपानवायु गुदस्थानी रहात असून कटि, शिस्न व मांड्या ह्या ठिकाणी संचार करतो. तो शुक्र, आर्तव, मल, मूत्र व गर्भ ह्यांना योग्य काळी शरीराबाहेर काढण्याचे कार्य करतो. त्यामुळे वंध्यत्व चिकित्सा करतांना अपानवायूचा विचार महत्वाचा आहे.
        बस्ति चिकित्सेने अपानवायुचे अनुलोमन होऊन आतड्यातील मळाचे खडे सहजपणे बाहेर पडल्याने बीजकोशाला प्राणवायुयुक्त रक्ताचा पुरवठा सुरळीत होतो, परिणामी त्याचे प्राकृत कार्य सुधारते. ‘भीतीने गर्भगळीत होणे’ हा जरी वाक्प्रचार असला तरी ह्यात शास्त्र दडलेले आहे. अपान वायु प्राकृत अवस्थेत असेल तर तो योग्य काळपर्यंत गर्भ टिकवून धरतो आणि विकृत झाला तर मात्र हमखास गर्भाला बाहेर टाकतो असा बोध ह्यातून घ्यावा. म्हणून गर्भावस्थेत अपानाला सर्वात जास्त महत्व आहे. आतड्यातील अपान वायु, मळाचे खडे हे गर्भाशयाच्या आजूबाजूच्या रक्तवाहिन्यांवर व बीजवाहिन्यांवर दाब निर्माण करू शकतात. हा दाब नाहीसा करण्यासाठी बस्ति चिकित्सा महत्वाची ठरते. बस्ति चिकित्सेने अपानाचे कार्यही सुरळीत होते.
                 कृत्स्ना चिकित्सापि च बस्तिरेकैः । । अष्टाङ्गहृदय, सूत्रस्थान १९-८७
अपान वायूच्या विकारांसाठी बस्ति हीच सर्वश्रेष्ठ चिकित्सा आहे.
अपानवायु कशाने बिघडतो ?
                 अपानो रूक्षगुर्वन्नवेगाघातातिवाहनैः । यानयानासनस्थानचङ्क्रमैश्चातिसेवितैः ।।
                 कुपितः कुरुते रोगान्कृच्छ्रान्पक्वाशयाश्रयान् । मूत्रशुक्रप्रदोषार्शोगुदभ्रंशादिकान्बहून् ।। अ. हृदय,   निदानस्थान १६/२७-२८
        रूक्ष व गुरु अन्न सेवन, वेगांचा अवरोध, अतिशय कुंथणे, गाडीघोड्यावरून प्रवास करणे, फक्त बैठे काम करणे, सतत उभे राहणे, बेसुमार चालणे अशा कारणांमुळे अपानवायु कुपित होतो. ह्याने पक्वाशयाच्या आश्रयाने होणारे मूत्राघात, प्रमेह, शुक्रदोष, मूळव्याध, गुदभ्रंश सारखे कष्टसाध्य व्याधी उत्पन्न होतात.
ग्रंथात वर्णन केलेल्या ह्या कारणांव्यतिरिक्त काळानुसार इतर कारणांचाही विचार करणे आवश्यक आहे. जसे – अति प्रमाणात मैद्याचे पदार्थ सेवन करणे, कार्बोनेटेड शीतपेयांचे बेसुमार सेवन, कंबरेचा पट्टा (बेल्ट) फार घट्ट बांधणे, अतिप्रमाणात मांसाहार करणे, घाई घाईने व न चावता जेवण करणे, मोड आलेल्या कडधान्यांचे अधिक सेवन करणे, अकाली झोप घेणे व रात्र-रात्र न झोपणे (शिफ्ट ड्युटीज, रात्रीचे ड्रायव्हिंग मुळे) अशी अनेक कारणे अपानवायु बिघडवतात.
        मैद्यामुळे पाचक स्रावांना पचनयंत्रणेत येण्यास अडथळा होतो, शीतपेयांमुळे पाचकस्रावांची शक्ती कमी होते, कंबरेचा पट्टा कसून बांधण्यामुळे आतड्यांची चलनवलन गती मंदावते, मांसाहार पचण्यास जड असल्याने पाचकस्रावांना पचनास पुरेसा वाव मिळत नाही, घाईने जेवतांना अन्नाबरोबर भरपूर प्रमाणात हवा अन्नमार्गात घेतली जाते, कडधान्य पचनयंत्रणेत जाऊन आंबतात व फसफसतात, जागरणाने शरीराचे बायोलॉजिकल क्लॉक बिघडते. म्हणून अपानाचे संतुलन राखण्यासाठी ह्या सर्व गोष्टींचा विचारपूर्वक वापर करावा, कोणत्याही प्रकारचा अतिरेक होत नाही ह्याची खात्री करावी.
         मानसिक संतुलन उत्तम असेल तर गर्भ स्थिर राहतो व बिघडल्यास गर्भपात घडतो. स्वास्थ्यपूर्ण गर्भाधान होण्यासाठी उभयतांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे महत्वाचे आहे. भीती, चिंता, क्रोध, मानसिक दडपण निर्माण झाल्यास त्याचा पियुशिका ग्रंथींच्या संप्रेरकांवर (हॉर्मोन्सवर) परिणाम होतो. ह्याने प्रजनन क्षमताही कमी होते. औषधी चिकित्सा करतेवेळी हा मुद्दाही लक्षात घेणे गरजेचे आहे.
    औषधी चिकित्सा – (अ) प्रजांकुर नस्य (ब) फलमाह (क) प्रथमाह
वंध्यत्व निराकरण व्हावे, स्वास्थ्यपूर्ण गर्भाधान व्हावे, गर्भात दोष राहू नयेत, गर्भस्राव किंवा गर्भपात होऊ नये, गर्भ व गर्भिणीपोषण होऊन सुप्रजनन व्हावे म्हणून आयुर्वेद शास्त्राने गर्भस्थापक नस्य, फलसर्पि व मासानुमासिक पाठांची रचना केली आहे. त्यांचा अंतिम परिणाम प्रत्यक्षातही दिसून येतो. ह्यातील प्रत्येक वनस्पतीचा स्वतंत्रपणे सखोल अभ्यास केल्यावर आयुर्वेदाच्या मौलिक खजिन्याचे महत्त्व लक्षात येते.
अनेकविध जंतुसंसर्गांच्या संदर्भात एक गोष्ट सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे वैयक्तिक रोग-प्रतिकार शक्ति. गर्भिणीच्या शरीरातील ही शक्ती, जीवाणू व विषाणूंपासून गर्भाचे रक्षण करते. एकाच प्रकारचे विषाणू किंवा जीवाणू भिन्न शरीरात प्रविष्ट केले असता प्रत्येकाची प्रतिक्रिया निराळी असते. कोणाला रोगाची सौम्य लक्षणे निर्माण होतात तर कोणाला अतिशय तीव्र. म्हणूनच सर्व पाठांमध्ये निरनिराळ्या प्रकारे रोग-प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विशिष्ट वनस्पतींचा वापर केलेला आढळतो. काही वनस्पतींमुळे पांढऱ्या पेशी वाढतात तर काही यकृताचे कार्य सुधारतात. काहींनी रक्तातील लोहाचे प्रमाण वाढते तर काही पेशी रक्षक (Antioxidant) म्हणून कार्य करतात. काहींनी मूत्रवह संस्थेचे कार्य सुधारते तर काही मज्जा संस्थेला बळ देतात. नैसर्गिक स्वरुपात उपलब्ध असलेली जीवन सत्वे, खनिजे, लोह, कॅल्शियम, विविध प्रकारची संप्रेरके ह्या पाठांतील वनस्पतींमध्ये आहेत. थोडक्यात काय तर गर्भ व गर्भिणीच्या सर्वांगीण स्वास्थ्यासाठी एक “अभेद्य सुरक्षा कवच” ह्या पाठांच्या सेवनामुळे प्राप्त होते.
प्रजांकुर नस्य चिकित्सा - विश्लेषण:
       पंचकर्मांपैकी किमान विरेचन, नस्य आणि बस्ति चिकित्सेचा प्रयोग करावा. बीजदोष नाहीसे करण्यासाठी, बीज सामर्थ्यवान होण्यासाठी व उत्तम गर्भधारणा होण्यासाठी ह्या क्रिया आवश्यक आहेत.
हायपोथॅलॅमस, पियुशिका ग्रंथी आणि बीजकोशातून स्रावित होणाऱ्या संप्रेरकांचा समतोल स्त्रीच्या प्रजनन यंत्रणेला प्रामुख्याने उपयुक्त असतो. हायपोथॅलॅमस मधून गोनडोट्रॉपिन रीलीझिंग हॉर्मोन उत्पन्न होते. त्याचा प्रभाव फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आणि ल्युटिनायझिंग हॉर्मोनवर होतो ज्यामुळे मासिक रजःस्रावाचे चक्र वयाच्या १२ - १४ व्या वर्षापासून (पौगंडावस्थेपासून) ५० - ५२ वर्षे वयापर्यंत (रजोनिवृत्तीपर्यंत) चालू राहते. ह्यांच्या संतुलनामुळे स्त्रीबीज प्रवर्तन, परिपक्वता आणि बीजकोशातून इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन निर्मिती होते. ह्यांच्याच प्रभावाने स्तनपुष्टी, गर्भाशयाची वाढ, योनिमार्गातील ओलावा निर्माण होतो. ‘एन्डोमेट्रिऑसिस’ (गर्भाशयाची अन्तस्त्वचा इतरत्र पसरणे) विकाराची चिकित्सा करण्यासाठी एक प्रकारच्या रासायनिक द्रव्याचे नस्य (स्प्रेच्या रूपाने) आधुनिक वैद्यक शास्त्रात दिले जाते. नासामार्गे प्रविष्ट केलेल्या ह्या औषधाने हॉर्मोन्सचे संतुलन साधले जाते व सदर रोगाची चिकित्सा सफल होते. ह्यातून निष्कर्ष काढता येतो की नस्य चिकित्सेचा उपयोग स्त्री प्रजनन यंत्रणेवर हमखास होतो. ह्या विषयी आयुर्वेदीय ग्रंथात नमूद असलेल्या “गर्भस्थापक” नस्याचा विचार नक्कीच शास्त्राच्या भक्कम सूत्रांवर आधारित आहे हेही स्पष्ट होते.
         नस्य चिकित्सेची ही महती आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वी जाणून उपयुक्त वनस्पतींचे पाठ ग्रंथात विषद केले. त्यांना नव्याने अभ्यासून व शास्त्राच्या चौकटीत बसवून “प्रजांकुर नस्य” सिद्ध घृत स्वरुपात अक्षय फार्मा रेमेडीजने सादर केले आहे. ह्याचा वापर नस्य स्वरुपात गर्भधारणेच्या संकल्पापासून गर्भधारणा निश्चिती पर्यंत उभयतांनी करावयाचा आहे.
        चरक संहिता ह्या आद्य ग्रंथात महर्षी चरकाचार्यांनी काही विशिष्ट वनस्पतींचे वर्गीकरण ‘गर्भस्थापक औषधी’ म्हणून केले आहे. ह्याचे समर्थन काश्यप संहिता, सुश्रुत संहिता अशा ग्रंथातही नमूद आहे. ‘औषधी गर्भसंस्कार’ संकल्पनेचा आधार ग्रंथ “अष्टांगहृदय” ह्यामध्ये देखील महर्षी वाग्भट ह्यांनी त्याचे समर्थन करून औषध सेवनाचे विविध मार्ग व स्वरूप सांगितले आहे.
नस्याचे लाभ –
      ततः प्रजास्थापनाख्या दशौषधीः शिरसा दक्षिणेन च पाणिना धारयेत्। एताभिश्च सिद्धं पयो घृतं वा पिबेत्। . . . .  अष्टांगसंग्रह शारीर १ – ६२
    ऐन्द्रीब्राह्मीशतवीर्यासहस्रवीर्याऽमोघाऽव्यथाशिवाऽरिष्टावाट्यपुष्पीविष्वक्सेनकान्ता इति दशेमानि प्रजास्थापनानि भवन्ति . . . . सूत्रस्थान चरक ४/१८ (४९)
    लक्ष्मणादिनस्यदानं गर्भस्थापनार्थं, स्थितगर्भायाश्चमासत्रयाल्पान्तरे पुत्रापत्यजननार्थं नस्यदानमिति ll . . . . . . . सुश्रुत, शारीर २-३२
       “पिण्यासाठी व शिरोभागी धारण करण्यासाठी” सदर पाठाचा वापर करावा असा शास्त्रादेश आहे. शिरोभागी धारण करणे म्हणजेच ‘नस्य स्वरुपात वापर करणे’ असा अर्थ शास्त्रकारांना येथे अभिप्रेत आहे. “नासाहि शिरसो द्वारं” ह्या प्रस्थापित संकल्पनेनुसार व आधुनिक वैद्यकानुसारही नस्य हे प्रजनन संस्थेवर उत्तम कार्य करते. म्हणून ‘प्रजांकुर घृत’ नस्य रूपाने वापरावे. शास्त्राधार व आप्तवचन ह्या दोन्ही दृष्टिकोनातून ह्याचा वापर नस्य स्वरुपात करणे योग्यच आहे. काही द्रव्यांचे शोषण नाकाच्या मार्गाने त्वरित होते. हीच द्रव्ये पोटात घेतल्याने त्यावर अनेक पाचक स्रावांची क्रिया घडते व ‘ब्लड ब्रेन बॅरियर’ यंत्रणेमुळे कार्यकारी घटकांचे शोषण शिरोभागात होण्यास अडथळे निर्माण होतात. नाकाच्या श्लेष्मल स्तरातून ही द्रव्ये मेंदूच्या संपर्कात येतात व रसरक्तातही त्यांचे शोषण त्वरित होते. नाकातून प्रविष्ट केलेले द्रव्य अत्यल्प काळात रक्तसंवहनात पसरते. इंजेक्शन द्वारा दिल्या गेलेल्या औषधाइतक्याच कमी वेळात ह्याचा परिणाम होतो.
घृत हेच माध्यम का ?
       नस्य चिकित्सेत चूर्ण वापरल्यास नाकाच्या श्लेष्मल त्वचेत व्यवस्थितपणे शोषले जात नाही म्हणून नस्य हे द्रव स्वरुपात असावे. द्रव पदार्थांमध्ये जल आणि स्नेह असे दोन मुख्य प्रकार आहेत. त्यापैकी स्निग्ध द्रव्य (स्नेह) हे स्वभावतः मध्यवर्ती मज्जासंस्थेला सात्म्य असतात.
       स्निग्ध द्रव्यांतील भिन्न घटक हे बीजकोशाची प्रजनन क्षमता वाढविण्यात निपुण असतात. ह्यात फिश ऑईल, ऑलिव्ह ऑईल अशा स्निग्ध द्रव्यांचा समावेश आधुनिक वैद्यक शास्त्रात केला आहे. भारतात तूप निर्माण करण्याचे शास्त्र पुरातन काळापासून अवगत आहे. आयुर्वेदात ह्याला घृत म्हणतात. तुपामध्ये डिकोसाहेग्झिनॉइक अॅसिड (DHA) म्हणजे ओमेगा – 3, ह्याशिवाय ओमेगा – ६ सारखे प्रजनन क्षमता वाढविणारे उत्तम घटक आहेत. प्रसुतीच्यावेळी DHA योग्य प्रमाणात असणाऱ्या स्त्रियांची मुले ह्याचे प्रमाण कमी असलेल्या स्त्रियांच्या मुलांपेक्षा बौद्धिकदृष्ट्या जास्त सक्षम असतात. वजन वाढण्याच्या भीतीने ह्याचे सेवन हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे कदाचित वंध्यत्वाचे प्रमाणही वाढत असावे. आयुर्वेदानुसार घृत, तैल, वसा, मज्जा हे ४ स्निग्ध पदार्थ आहेत. ह्यापैकी ‘सामान्य-विशेष’ सिद्धांतानुसार ‘मज्जा’ हा स्निग्ध पदार्थ मध्यवर्ती मज्जासंस्थेला (CNS) नक्कीच अधिक पोषक ठरेल ह्यात शंका नाही. परंतु उपलब्धी, प्राणिज स्रोत, मनुष्याची मानसिकता आणि घृताचे गुण ह्यांचा विचार करून “घृत” हेच माध्यम नस्यासाठी वापरणे योग्य ठरते.
प्रजांकुर घृत नस्य -
प्रत्येक १० ग्रॅम प्रजांकुर घृतामधील घटकद्रव्ये व प्रमाण:
ऐन्द्री (Citrullus colocynthis), दुर्वा (Cynodon dactylon), अमोघा (Sterospermum suaveolens), विश्वक्सेना (Callicarpa macrophylla), अव्यथा (Hibiscus mutabilis), शिवा (Terminalia chubula), ब्राह्मी (Bacopa monnieri), वाट्यपुष्पी (Sida cordifolia), शतवीर्या (Asparagus racemosus), बहुपाद (Ficus benghalensis) प्रत्येकी २५० मिलिग्रॅम; गो घृत १० ग्रॅम; गो दुग्ध ४० ग्रॅम
वापरण्याची पद्धत (पुरुष व स्त्रियांसाठी) : बाटली प्रथम गरम पाण्यात ठेवून प्रजांकुर (घृत) पातळ करावे. पाठीवर झोपून ६ - ६ थेंब दोन्ही नाकपुड्यांत सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयाच्या वेळी टाकावे. २ - ३ मिनिटे तसेच पडून राहावे. गर्भधारणेच्या संकल्पापासून गर्भनिश्चिती पर्यंत हे नस्य करावे.
फलमाह (विलेपित वटी) :
मञ्जिष्ठाकुष्ठतगरत्रिफलाशर्करावचाः ॥
द्वे निशे मधुकं मेदां दीप्यकं कटुरोहिणीम् । पयस्याहिङ्गुकाकोलीवाजिगन्धाशतावरीः ॥
पिष्ट्वाक्षांशा घृतप्रस्थं पचेत्क्षीरचतुर्गुणम् । योनिशुक्रप्रदोषेषु तत्सर्वेषु प्रशस्यते ॥
आयुष्यं पौष्टिकं मेध्यं धन्यं पुंसवनं परम् । फलसर्पिरिति ख्यातं पुष्पे पीतं फलाय यत् ॥
म्रियमाणप्रजानां च गर्भिणीनां च पूजितम् । एतत्परं च बालानां ग्रहघ्नं देहवर्धनम् ॥
. . . . अष्टांग हृदय, उत्तरस्थान ३४/६३ – ६७
           ह्याचे सेवन सर्वप्रकारचे योनिदोष व शुक्रदोष ह्यासाठी हितावह आहे. हे आयुष्यवर्धक, पौष्टिक, बुद्धिवर्धक, धनवर्धक व उत्तम पुंसवन आहे. ऋतुकाळी घेतले असता गर्भधारणा होते म्हणून यास फलसर्पि असे म्हणतात. ज्या स्त्रियांची मुले जगत नाहीत त्यांस व गरोदर स्त्रियांस हे हितावह आहे. हे मुलांच्या ग्रहावर उत्तम असून त्याने त्यांचे शरीर चांगले पुष्ट होते.
            "फलमाह" हा पाठ अष्टांगहृदयात नमूद "फलसर्पि" मधील वनस्पतींनी निर्माण केला आहे. ह्या पाठातील वनस्पतींनी स्त्रीशरीराची रोग प्रतिकार क्षमता उत्तम प्रकारे वाढते, पेशी रक्षणाचे व स्त्रीबीज बलवर्धनाचे कार्य घडते. रजःप्रवृत्ती अजिबात न होणे किंवा अनियमित असण्याने स्त्रीबीज परिपक्व न होणे ह्यातून घडणाऱ्या वंध्यत्वावर उत्तम परिणाम करणारा हा स्वयंसिद्ध ग्रंथोक्त कल्प आहे. ह्यातील वनस्पती मोबाईल व इतर विद्युतचुंबकीय लहरींपासून प्रजनन यंत्रणेत कार्यरत असलेल्या अवयवांचे संरक्षण व संप्रेरकांचे संतुलन करतात. गर्भाशयात उत्पन्न होणाऱ्या ग्रंथींवरही (Uterine fibroids) ह्यातील वनस्पती उत्तम नियंत्रण करतात.
          मानवाने सेवन केलेल्या प्रत्येक घटकाचा परिणाम हा शरीरातील प्रत्येक पेशीवर होत असतो किंबहुना सर्व पेशींची जडणघडणच आहारातून किंवा औषधातून होत असते. आहारातून काही दोषयुक्त पदार्थ सेवन केले गेले तर त्याचा परिणाम इतर शारीरिक पेशींवर जसा होतो तसाच स्त्री बीजकोशातील बीजांवरसुद्धा होतो. ह्या बीजांना दोषमुक्त करण्यासाठी आयुर्वेदाच्या तिजोरीतला एक मौल्यवान पाठ म्हणजेच "फलमाह". ह्या पाठामध्ये असलेल्या प्रत्येक वनस्पतीचा उपयोग सुलभ गर्भधारणेसाठी व पुढे गर्भस्थैर्यासाठी नेमका कसा होतो?
     "फलमाह" - विज्ञाननिष्ठ निरूपण:
      गर्भावस्थेत क्ष-किरणांचा अनिष्ट परिणाम गर्भावर होतो हे आता सिद्ध झाले आहे. दैनंदिन जीवनात आजकाल आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवनवीन उपकरणांचा वापर वाढत आहे. मोबाईल फोन, मायक्रोवेव्ह, अनेक प्रकारची विद्युत उपकरणे, वाय फाय, फ्लुरोसंट ट्यूबलाईट, कॉर्डलेस फोन, ब्लूटूथ ह्या व अशा अनेक उपकरणांपासून विद्युत-चुंबकीय लहरी निर्माण होतात. शिवाय वातावरणात देखील अनेक प्रकारचे किरणोत्सर्जन सातत्याने चालूच असते. ह्या लहरींमुळे पेशींमधील डी एन ए वर आघात होतो. परिणामी पेशींची विकृत वाढ झपाट्याने होऊ लागते. ही वाढ कॅन्सर स्वरुपाची पण होऊ शकते. विद्युत-चुंबकीय लहरींचा विपरीत परिणाम स्त्रीच्या प्रजनन संस्थेवर होतो. गर्भिणी व गर्भ ह्या दोहोंवर ह्या लहरींचा होणारा परिणाम ह्या विषयी काही संशोधन -
     १) मायक्रोवेव्ह, हेअर ड्रायर, मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाह असणारे क्षेत्र अशा ठिकाणी काम करणाऱ्या गर्भिणींच्या बालकाला लहान वयातच दमा होण्याची शक्यता तीनपट अधिक असते
    २) गर्भिणी व गर्भ दोघांनाही मोबाईल फोन व टॉवर ह्यातून निर्माण होणाऱ्या लहरींच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. त्यातील किरणोत्सर्जामुळे गर्भवाढीसाठी कार्य करणा-या सूक्ष्म पेशींवर आघात होतो. वार (Placenta) ही गर्भरक्षणासाठी निसर्गनिर्मित रचना असते. ह्या लहरी, वारीचे संरक्षक कवच भेदून गर्भपात किंवा गर्भव्यंग उत्पन्न करू शकतात. गर्भावस्थेत ह्या लहरींचा परिणाम झालेल्या बालकात पुढे पौगंडावस्थेत मानसिक दोष निर्माण होतात.
ह्या उपकरणांपासून दूर राहणे तर आता शक्यच नाही. मग ह्याचे दुष्परिणाम कमी कसे करता येतील? काही संरक्षक कवच वनस्पतींपासून आपण मिळवू शकतो का? किरणोत्सर्जना पासून गर्भिणीचे व गर्भाचे संरक्षण कसे साधता येईल?   "फलमाह" पाठातील वनस्पतींचे लाभ गर्भधारणेपुर्वी व गर्भावस्थेत आहेतच. शिवाय विद्युत-चुंबकीय लहरींचा दुष्परिणाम टाळण्यासाठी देखील होण्याची शक्यता आहे. ह्याविषयी जगभरात झालेल्या संशोधनातून प्राप्त झालेले काही निवडक निष्कर्ष, माहिती व प्रत्येक वनस्पतीच्या गुणधर्मांचे थोडक्यात वर्णन पाहूया.
     मंजिष्ठा: मंजिष्ठा वनस्पतीत अलिझारिन नामक एक लाल रंगाचे द्रव्य असते ज्यामुळे रक्तपेशींमधील बीजदोष अर्थात विषारी परमाणु (फ्री रॅडिकल्स) आघातामुळे डी. एन. ए. वर होणारा दुष्परिणाम टाळता येतो. ही वनस्पती विद्युत-चुंबकीय लहरींचा आघात ६७% इतक्या प्रमाणात कमी करू शकते.
अक्कलकारा: ह्याच्या सेवनाने ल्युटिनायझिंग हॉर्मोन व फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन नामक अन्तःस्रावी ग्रंथींच्या स्रावांचे सुयोग्य संतुलन राखले जाते. स्त्रियांच्या बीजकोशामध्ये दडलेले बीज योग्यवेळी परिपक्व होण्यासाठी पियुशिका ग्रंथीच्या पुढच्या भागातून स्रवणाऱ्या ह्या हॉर्मोनची नितांत गरज असते. ह्याने एच.ए. टायटर आणि IgG मध्ये वाढ होऊन रोगप्रतिकारक्षमता उत्तम राखली जाते. अशाप्रकारे अक्कलकारा स्त्रीबीज परिपक्वतेच्या कार्यात निपुण आहे.
      तगर: गर्भाशयाच्या पेशींवर अवसादक कार्य तगराने होते म्हणजेच आकुंचन प्रसरण क्रिया ह्याने शांत होते. त्याचबरोबर प्रोस्टाग्लानडिन वरही अवसादक कार्य होत असल्याने सूज व वेदना शमन करण्याचे कार्य ह्याने साधते. ह्या वनस्पतीतील पेशीरक्षक गुण प्रसिद्ध आहेत व त्यांची क्रिया मुख्यतः मेंदुच्या कोषिकांवर होते. मानसिक ताण, निद्रानाश, चंचलता अशा लक्षणांवर अत्यंत उपयुक्त आहे. तगर मूळ उत्तम रेडिओ प्रोटेकटिव्ह असून किरणोत्सर्जजन्य विविध दुष्परिणाम पेशीतील डी एन ए वर होऊ देत नाही.
      त्रिफळा म्हणजेच हरीतकी, आमलकी व बिभितकी ह्यांचे समप्रमाणात मिश्रण. ह्या आयुर्वेदोक्त रसायन द्रव्यामुळे रक्तातील T जातीच्या पांढऱ्या पेशी व NK पेशींमध्ये वाढ होऊन रोगप्रतिकारक्षमता सुधारते.
      हरीतकी: जंतूसंसर्गा पासून बचाव करून शरीराची रोगप्रतिकारशक्ती सतत वाढवणारे हे एक श्रेष्ठ फळ आहे. पचन उत्तम ठेऊन शरीराला हलकेपणा देणे हा हरीतकीचा स्वभाव आहे. मेंदू, हृदय, यकृत, प्लीहा, प्रजनन संस्था, अस्थिसंधी, त्वचा, मूत्र विसर्जन संस्था किंवा शरीरातील इतर कोणतीही यंत्रणा असो, हरीतकी त्यांची सर्वतोपरी काळजी घेते.
     बिभीतक: विविध विषारी रसायनांमुळे किंवा आहारातील रासायनिक रंग, अन्नसंरक्षक घटक इ. च्या सेवनाने यकृत विकार होतात व गर्भाधारणेमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. बिभीतकाने यकृताचे कार्य उत्तम राखले जाते व गर्भनिरोधक अडथळे दूर केले जातात. ह्याशिवाय ह्यातील पेशीरक्षक गुण गर्भस्थापनेस सहाय्य करतात.
     आमलकी: ही वनस्पती सप्तधातु पोषक, म्हणजेच शरीर वाढीच्या प्रत्येक टप्प्यात आवश्यक असलेल्या पोषणाची सर्वांगीण क्षमता धारण करते. ह्यातील अस्कोर्बिक अम्ल वंध्यत्व नाहीसे करण्यात कमालीचे उपयुक्त आहे. पौगंडावस्थेत होणारे बदल, प्रजनन यंत्रणेला बळ देणे, अन्तःस्रावी ग्रंथींचा समतोल साधून गर्भस्थापनेस योग्य वातावरण तयार करणे अशा विविध गुणांनी समृद्ध आहे.
     वेखंड: वेखंडात उत्तम पेशिरक्षक गुण आहेत. त्यातील प्रोअॅन्थोसायनिडीन्स मुळे प्रजनन संस्थेच्या यंत्रणेवर विशेष कार्य होते व त्याला बळ प्राप्त होउन कार्य सुधारते. वेखंडाने रोगप्रतिकारक्षमताही वाढते.
     हरिद्रा: काही रासायनिक औषधांमुळे जननक्षमता नाश पावते. त्या औषधांपासून निर्माण होणारे घातक परमाणु संपूर्ण प्रजनन संस्थेवर आघात करून वंध्यत्व निर्माण करतात. हळदीच्या सेवनाने ही क्षमता पूर्ववत होऊ शकते. हळदीच्या आभ्यंतर प्रयोगाने रेडिएशनचे दुष्परिणाम हटतात. त्याचबरोबर SOD-1 आणि PRDX-1 मध्ये बदल होऊन रोगप्रतिकारक्षमता वृद्धिंगत होते.
     दारुहळद: ज्वरहर, जंतुसंसर्ग नाशक, यकृत शोधक, प्रमेह नाशक, कर्करोग निवारक, पेशीरक्षक, रक्तातील चरबी नियंत्रक अशा गुणांनी दारुहळद परिपूर्ण आहे. ह्यातील बर्बेरिन नामक रसायन मेंदूतील सिरोटोनिन व डोपामाईन्स चे संतुलन साधून मानसिक ताणतणाव नियंत्रण करण्यात उपयोगी आहे.
     यष्टिमधु: रेडिएशनमुळे संभवणारे बीजदोष, होणारा अंतस्त्वचा शोथ (म्युकोसायटिस), कष्टार्तव अशा स्थितीत लाभ होतो. ह्याचे उत्तम पेशीरक्षक म्हणून पण कार्य अवगत आहे.
      सारिवा: इम्युनोग्लोब्युलिन्स चे स्राव वर्धन व अडिनोसिन डिअमायनेझचे कार्य सुधार अशा दोन प्रकारे कार्य करून रोगप्रतिकार क्षमता सुधारण्यासाठी सारिवा उपयुक्त आहे. विद्युत-चुंबकीय लहरींमुळे यकृतावर होणारा दुष्परिणाम व डी एन ए वरील आघात ह्यांचे सारिवा मुळे संरक्षण होते.
       कुटकी: यकृतरोग निवारणात अग्रगण्य स्थानावर असलेली अशी ही कुटकी. त्यातील पिक्रोलिव्ह नावाचा घटक रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यात फारच उपयोगी आहे. कुटकी सेवनाने मॅक्रोफेज मायग्रेशन इंडेक्स (MMI) मध्ये वाढ होते, यकृताचे कार्य उत्तम राहते, सार्वदेहिक प्रतिकारशक्तीमध्ये कैक पटीने वाढ होते.
       विदारीकंद: विदारीकंदामुळे गर्भाशय, बीजकोष, गर्भाशय ग्रीवा आणि योनिमार्गातील ग्लायकोजेन चे संहनन सुधारते. ह्याशिवाय विदारीकंदामध्ये श्रेष्ठ पेशीरक्षक व रोगप्रतिकार क्षमता वर्धक गुण आहेतच.
      हिंगु: स्त्रियांच्या वंध्यत्वावर, अकाली होणाऱ्या गर्भस्रावावर, कष्टार्तव, श्वेतप्रदर, रक्तप्रदर अशा मासिक स्रावाच्या अनेक समस्यांवर हिंगाचा उपयोग होतो. ह्याने प्रोजेस्टेरॉनच्या स्रावात वाढ होते.
     शतावरी: स्त्री वंध्यत्वावर उत्तम कार्य करणारी ही वनस्पती आहे. शतावरीने शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा जागृत होते, प्रजनन यंत्रणेमधील सूज हटते, योनिमार्गातील ओलावा वाढतो, कोषातील बिजांची परिपक्वता वेळेवर होते, गर्भधारणेसाठी गर्भाशयाची स्थिती सुधारते, गर्भस्राव व गर्भपात होण्यापासून प्रतिबंध होतो, गर्भाची केंद्रीय मज्जा यंत्रणा व सुषुम्ना ह्यांचे कवच सांधण्याची क्षमता असलेले फोलिक अम्ल शतावरीमध्ये प्रचुर प्रमाणात आहे. अन्तःस्रावी ग्रंथींचे संतुलन राखून स्तन्यवाढीचे कार्य सुधारते. हिच्या सेवनाने पेश्यांतर्गत मायटोकॉनड्रिया वर कार्य होऊन रेडिएशनचा यकृतावर होणारा दुष्परिणाम टाळता येतो. त्यामुळे गर्भस्थापना व पोषणाची संपूर्ण जबाबदारी सांभाळण्याची क्षमता ह्या एका वनस्पतीमध्ये आहे. संपूर्ण गर्भावस्थेत जरी शतावरी सेवन केली तरी यत्किंचितही अपाय नाही उलट अनेक फायदेच होतात इतकी ती गुणकारी आहे. शतावरीमध्ये व्हिटॅमिन ए , बी १, बी २, सी, ई तसेच मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, आयर्न व फोलिक अम्ल आहे.
      अश्वगंधा: अश्वगंधाने गोनाडोट्रोपिन हॉर्मोन्स चे स्राव वाढून बीज परिपक्वतेस चालना मिळते व त्यामुळे वंध्यत्वावर मात करण्यात यश प्राप्त होते. अश्वगंधा सर्वश्रेष्ठ पौष्टिक आणि रोगप्रतिकार क्षमता वर्धकही आहे. हिच्या सेवनाने विद्युत-चुंबकीय लहरींमुळे होणारे दुष्परिणाम लक्षणीय मात्रेत कमी होतात व अपेक्षित परिणामात वृद्धी होते.
"फलमाह" च्या प्रत्येक विलेपित गोळीतील घटक व प्रमाण:
मंजिष्ठा (Rubia cordifolia), अक्कलकारा (Anacyclus pyrethrum), तगर (Valeriana wallichii), त्रिफला, शर्करा, वचा (Acorus calamus), हरिद्रा (Curcuma longa), दारुहरिद्रा (Berberis aristata), यष्टिमधु (Glycyrrhiza glabra), सारिवा (Hemidesmus indicus), अजमोदा (Apium graveolens), कटुका (Picrorrhiza kurroa), विदारीकंद (Pueraria tuberosa), हिंगु (Ferula narthex), अश्वगंधा (Withania somnifera) प्रत्येकी ३० मिलीग्रॅम; शतावरी (Asparagus racemosus) 60 mg; भावना द्रव्य - शतावरी (Asparagus racemosus) आवश्यकतेनुसार
सेवन विधी: (गर्भधारणा निश्चिती पर्यंत) २ - २ गोळ्या रोज दोन वेळा, घोटभर दुधाबरोबर, जेवणानंतर
गर्भधारणा निश्चिती नंतर प्रसूती पर्यंत: १ - १ गोळी रोज दोन वेळा, घोटभर दुधाबरोबर जेवणानंतर
प्रथमाह (विलेपित वटी) :
    मधुकं शाकबीजं च पयस्या सुरदारु च । . . . . अष्टाङ्गहृदय, शारीर स्थान, अध्याय २, श्लोक ५४
यष्टिमधु, शाकबीज, शतावरी व देवदार ह्या वनस्पतींचे संतुलित मिश्रण म्हणजेच "प्रथमाह". वास्तविक मूळ ग्रंथानुसार पयस्या म्हणजे क्षीरकाकोली वापरण्याचे विधान असले, तरी ही एक संदिग्ध वनस्पती आहे. त्यामुळे शास्त्रसंमत प्रातिनिधिक द्रव्य असलेल्या शतावरीचा वापर केला आहे.
    यष्टिमधु: गर्भधारणा होण्यापूर्वी स्त्रीबीज वाहिन्यांमधील श्लेष्मल अंतस्त्वचेची स्निग्धता संपन्न राहण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. गर्भधारणेच्या वेळी स्त्री-बीज व पुंबीजाचे मीलन बीजवाहिनीत होते. साधारणतः १० दिवसांनी हा फलित बीजकोष गर्भाशयात स्थानापन्न होतो. बीज वाहिनीतील स्निग्धता ह्या क्रियेसाठी आवश्यक असते. यष्टिमधु मधील ग्लाब्रीन व ग्लाब्रीडीन ह्या अल्कलॉइड मुळे इस्ट्रोजीनसदृश कार्य होते. बीजवाहिनी मधील श्लेष्मा व त्याचा स्निग्धपणा त्याने वाढतो. यष्टिमधु चे कार्य अशा प्रकारे गर्भस्थापनेच्या दृष्टीने उपयोगी होते अर्थात "बीजवाहिनी अंतर्गत गर्भधारणेची " (Ectopic pregnancy) शक्यता कमी होते.
     बीज दोष हा गुणसूत्रांमध्ये असतो व तो गर्भामध्ये येऊ शकतो. म्हणून गर्भधारणा होण्यापूर्वी बीजदोष निवारण करणे जरुरीचे आहे. यष्टिमधु मध्ये गुणसूत्रांमधील बीजदोष निर्मूलनाची क्षमता आहे. इथाइल मिथेन सल्फोनेट नामक विषारी द्रव्य पेशीतील डी. एन. ए. वर आघात करतात व त्याने बीजातील गुणसूत्र विकृत होतात. यष्टिमधु चा उपयोग ह्या विकृतीच्या निवारणासाठीही होतो.
     शाक बीज: हे बीज विविध प्रकारच्या १५ प्रथिनांनी संपन्न आहे. यकृताचे कार्य उत्तम राखण्याचे सामर्थ्यही ह्यात आहे. गर्भाशयातील अंतस्त्वचेची घनता कमी होणे हे वंध्यत्वाचे एक प्रमुख कारण आहे. ही घनता पूर्व स्थितीत आणण्याचे सामर्थ्य ह्यातील प्रथिनांमध्ये आहे. ज्यामुळे गर्भस्थापना होण्यास योग्य वातावरण निर्माण होते.
     शतावरी: गर्भाशयात झालेल्या शस्त्राघात जन्य गाठी (Surgical adhesions) आपल्या स्वगुणांनी नष्ट करण्याचे एकमेवाद्वितीय कार्य शतावरीने साध्य होते. त्यामुळे अर्थातच गर्भधारणेला अडथळा निर्माण करणारी एक आपत्ती नाहीशी होते. ह्याशिवाय शतावरी मुळे गर्भाशयातील अंतस्त्वचेचे पोषण उत्तम रीतीने होते व गर्भस्थापना होणे सहज सुलभ होते. सर्वांगीण मनोकायिक पोषण करणे हा तर शतावरीचा स्थायी भावच आहे.
       सुरदारु: पेशी चयापचय क्रियेत काही घातक परमाणु (Free radicals) तयार होतात. हे परमाणु गर्भाशयाच्या स्वास्थ्याला हानी पोचवतात. ह्या हानी पासून संरक्षण करण्याचे सामर्थ्य सुरदारुतील मटेरीसिनॉल, नॉरट्रकिलोजेनिन व डायबेंझिल-बुटायरो-लॅक्टोलिग्नान अशा तीन पेशीरक्षकांच्या सहाय्याने चुटकीसरशी साध्य होते.
"प्रथमाह"च्या प्रत्येक विलेपित गोळीतील घटक व प्रमाण
यष्टिमधु (Glycyrrhiza glabra), शाक बीज (Tectona grandis), शतावरी (Asparagus racemosus), सुरदारु (Cedrus deodara) प्रत्येकी १२५ मिलीग्राम
भावना द्रव्य: शतावरी (Asparagus racemosus) १२५ मिलीग्राम
सेवन विधी: २ - २ गोळ्या रोज दोन वेळा घोटभर दुधाबरोबर, जेवणापूर्वी
लेखक –
प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
लेखक –आयुर्वेद वाचस्पति
सहयोगी प्राध्यापक, पोदार वैद्यक महाविद्यालय व रुग्णालय, वरळी, मुंबई
भ्रमणध्वनी - +919819686299
ईमेल – subhashmarlewar@gmail.com
drjalukar@akshaypharma.com

1 comment:

  1. अत्यंत उपयुक्त व मोलाची माहिती!

    ReplyDelete

Visit Our Page