Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, June 1, 2016

शिवांबू

#घरोघरी_आयुर्वेद

'शिवाम्बू'

शिवाम्बु चिकित्सा अथवा स्वमूत्र प्राशन करणे ही हंगामी प्रसिद्ध पावणारी गोष्ट आहे. त्वचा उत्तम राहण्यापासून ते पचन सुधारणे इथपर्यंत विविध लाभ या चिकित्सेने होतात असा दावा केला जातो. याच्या पुष्टीसाठी स्व. मोरारजी देसाई यांचे उदाहरणदेखील दिले जाते.

ही स्वमूत्र प्राशन पद्धती आयुर्वेदाची देणगी आहे असे जरी सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र तसे नाही. शिवाम्बूचा संदर्भ 'डामर तंत्र' या ग्रंथात आढळतो. हा ग्रन्थ आयुर्वेदाचा नसून तंत्रविद्येचा आहे. थोड्क्यात; स्वमूत्र प्राशन हे आयुर्वेदाने सुचवलेले नाही.

मग आयुर्वेद याबाबत काय सांगतो? कोणतेही मूत्र हे उष्ण आणि तीक्ष्ण गुणांनी युक्त असल्याने पित्त वाढवते. (याकरताच आम्ही गोमूत्रदेखील वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नये असे सतत सांगत असतो.) आयुर्वेदाने आठ उपयुक्त प्राण्यांच्या दुधाचे गुणधर्म वर्णन केले आहेत. यात मनुष्याचा अर्थात मातृस्तन्याचादेखील उल्लेख आढळतो. याच प्राण्यांच्या मूत्राचे औषधी गुणधर्मदेखील आयुर्वेदात वर्णन केलेले आहेत. मात्र यावेळेस 'मानवी मूत्र' वगळले आहे. सुश्रुतसंहितेत मात्र 'मानुषं तु विषापहम्।' अर्थात; मानवी मूत्र हे विष दूर करणारे आहे असा त्रोटक संदर्भ सापडतो. आजही गावाकडे विंचू वा सापाच्या दंशावर त्या माणसाचे मूत्र लावणे हा प्रकार आढळतो. बेअर ग्रील्ससारखे सुप्रसिद्ध परदेशी 'सरव्हाइव्हर्स'देखील असा वापर करण्याबद्दल त्यांच्या पुस्तकांत माहिती देतात. मात्र; आयुर्वेदाचा आणखी एक सिद्धांत असे सांगतो की विषाने विष दूर होते! थोड्क्यात विषहरणाचे काम करणारे मानवी मूत्र स्वतः विषारी गुणांनी युक्त असणार.

आधुनिक शास्त्रानुसार मूत्रनिर्मितीत किडनीद्वारे 'सिलेक्टिव्ह रिअँबसॉरप्शन' सारखी प्रक्रिया घडताना शरीराला आवश्यक घटक पुन्हा शोषले जातात आणि केवळ टाकाऊ घटक उत्सर्जित केले जातात. आपल्या शरीराबाहेर उत्सर्जित केले जाणारे पदार्थ पुन्हा आपल्याच शरीरात घ्यावे असे मत असणाऱ्या व्यक्ती घाम आणि मल या अन्य उत्सर्जित पदार्थांबाबत काय भूमिका घेणार?! (पशुवैद्यकाचा अभ्यास करता; गायींसारख्या प्राण्याच्या किडनीची रचना आपल्यासारखी नसल्याने वरील उपयुक्त प्रक्रिया त्यांच्यात योग्य प्रमाणात घडत नाही. त्यामुळे त्यांच्या मूत्रात मानवी शरीरास उपयुक्त पदार्थ मिळू शकतात.)

इतकी सारी माहिती देऊनही स्व. मोरारजीभाईंचा दाखला देण्याचा मोह अनावर होणाऱ्यांनी त्यांच्या दैनंदिन आहाराचीदेखील माहिती जरूर घ्यावी. आणि तरीही शिवाम्बुपानाचा हट्टच असेल तर अगदी ग्लास काठोकाठ भरून शिवाम्बुपान करावे. मात्र कृपा करून त्याचे बिल आयुर्वेदाच्या नावावर मात्र फाडू नये!!

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

No comments:

Post a Comment

Visit Our Page