Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Saturday, June 11, 2016

आरोग्यदायी जीवन जगा

आरोग्यदायी जीवन जगा
 सध्याच्या आधुनिक धावपळीच्या युगात प्रत्येकजण ताण - तणावाखाली आढळतो . सतत व्यवसायाचा ध्यास, पैसे कमविण्याची धावपळ  स्वतःसाठी तर वेळच नाही . राहणीमान बदलले, जीवनशैली बदलली, आहाराच्या, झोपेच्या वेळा बदलल्या. निसर्ग नियमाच्या विरुध्द सर्व काही सुरु आहे. यामुळे  कमी वयामध्ये मधुमेह, रक्तदाब, थायरॉईड , आम्लपित्त, मलबध्दता, निद्रानाश अशा आजारांनी  ग्रासलेले दिसून येत आहे. . रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे, वारंवार सर्दी - खोकला, अलर्जी , अतिसार असे आजार व्हायला लागले आहेत. अशा आजारावर घरगुती औषधांपेक्षा आधुनिक औषधांचा मारा केला जातो . याचा प्रतिकार क्षमतेवर परिणाम तर होतोच तसंच इतर रोगांनाही आमंत्रित केलं जातं . अशी वेळ आपण आपल्यावर का येऊ द्यावी ? आयुर्वेदात सांगितलेल्या  दिनचर्या, त्रतुचर्या यातील        काही साध्यासोप्या गोष्टी नित्य नियमाने पाळल्या तर बदलत्या लाइफस्टाइलने शरीराला दिलेला ताण आपल्याला सहजपणे पेलता येईल .  आजारापासून बचाव करण्यासाठी  आपली प्रक्रती व आपली दैनंदिन कार्यशैली ओळखून दिनचर्या बनवायची आहे . त्यासाठी या काही साध्या पण महत्त्वाच्या टिप्स .
 शरीर फिट व फाईन ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक असते. मला दिवसभर घरी खूप काम असते, घरातील सर्व कामे मीच करते तरीही माझे वजन वाढते अशी तक्रार खूप लोकांची असते. व्यायाम आणि थकवा यातला फरक ओळखता आला पाहिजे . मुद्दाम वेगळा केला जातो तो खरा व्यायाम . कारण त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेमुळे आपण दिवसभर काम करतो . पण  दिवसभर घरी जे काम  केले जाते  तो केवळ थकवा असतो.
कोणताही व्यायाम करताना त्याचे निकष व्यवस्थित लक्षात घेणं आवश्यक असतं. जराही कमी किंवा जास्त व्यायाम केला गेला , तर त्याचे चुकीचे परिणाम होऊ शकतात. नेमका किती आणि कसा व्यायाम करावा , याविषयी...
व्यायामामध्ये आपल्याला सोसेल, दररोज सहज होइल असा व्यायाम करावा.दररोज चालण्याचा व्यायाम करावा. ४ ते ६ किलोमिटर जाणे येणे करावे. आपले चालणे भराभर असावे, एका  मिनिटाला १०० ते १२० लांब लांब पावले पडायला हवी.  झपझप चालावे , चालताना दम लागणे आवश्यक आहे. घाम येणे आवश्यक आहे. लयबध्द पध्दतीने चालावे, चालताना पायांमध्ये योग्य मापाची पादत्राणे घालावीत. घराच्या बाहेर चालायला जाणे शक्य नसेल तर घरच्या घरी ५-१० मिनीटे दंड बैठका, ५-१० मिनीटे दोरीच्या उडया , ५-१० मिनीटे सिट अप्स , ५-१० मिनीटे पायरया चढ उतर करणे,  १०-२०  मिनीटे  घराच्या गच्ची वर  चालणे असा व्यायाम करावा, ५ ते १० मिनीटे सायकल चालवावी.  एकुण ४० ते ६० मिनिटांचा दररोज व्यायाम होणे महत्त्वाचा. नियमित  व्यायाम  करणे हे वजन कमी करण्यामागची गुरुकिल्ली आहे. .
ताणतणावांचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे . ताणामुळे शरीराचं चक्र बिघडून हृदयरोगांसारखे आजार होतात . योगसाधना , विशेषतः प्राणायामामुळे ताण कमी करता येतो . आयुर्वेदातील शिरोधारा केल्याने ताण-तणाव कमी होण्यास मदत होते.
 आपण सकाळची न्याहारी टाळतो , दुपारी मोजकंच जेवतो आणि रात्री भरपेट जेवतो . हे सर्वस्वी चुकीचं आहे . सकाळचा नाश्ता राजा सारखा खावा, दुपारचे जेवण कर्मचारया सारखे करावे व रात्रीचे जेवण भिकाऱ्या सारखे करावे .
जेवणात साध्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा वापर करावा . मैद्याचे पदार्थ टाळावेत. वेळेवर जेवण करावे, कडकडुन भुक लागू द्यावी, नुसतेच वेळ झाली म्हणून जेवण करु नये. पुर्वी खाल्लेले अन्न पचू द्यावे. पचन न झालेलं अन्नही त्रासदायक असतं . ते आमाच्या रूपात शरीरात जिथेतिथे साठत आणि त्यामुळे आळशीपणा वाढीला लागतो . पुढे सांधे कठीण होऊन दुखू लागतात . त्यानंतर डायबेटिस , उच्च रक्तदाब आणि हृदरोगही उद्भवतात .आहारात  तेल-तुपाचा नियंत्रित वापर करावा. निव्व्ळ तेल तुप बंद करु नये. तेल - तूप वाईट नाही . उलट आयुर्वेदातली बहुसंख्य औषधं तेला - तुपातच बनतात . पण तेला - तुपात पदार्थ तळले की सगळंच बिघडतं . हे तळलेले पदार्थ शरीरासाठी अत्यंत घातक असतात. तहान लागेल तेव्हाच पाणी प्यावं आणि भूक लागेल तेव्हाच खावं , आणि लघूशंका, दीर्घशंका असल्यास आणि त्यांच निवारण वेळेवर होणे आवश्यक असते. हे गणित बिघडलं तर आजाराला निमंत्रण मिळतं .  अती तळलेले आणि मसालेदार पदार्थ, शिळे पदार्थ अन् पोषणमूल्य नसलेले आणि पचण्यास जड असलेले पिझ्झा, चिप्स, वेफर्स यांसारखे ‘फास्ट फूड’ खाऊ नका.  शाकाहार, तसेच सात्त्विक आहार घ्या ! मांसाहार तसेच तमोगुणी आहार टाळा !    दूध, लोणी, गायीचे तूप, ताक, तांदूळ, गहू, डाळी, पालेभाज्या, फळे यांसारखे किंवा यांपासून बनवलेले सात्त्विक अन्नपदार्थ सेवन करा. पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी मिताहार करा !  जेवतांना पोटाचे दोन भाग अन्न सेवन करा. तिसरा भाग पाण्यासाठी आणि चौथा भाग वायूसाठी रिकामा ठेवा.
 शरीर हे एक यंत्र आहे . ते सुरळीत चालावं म्हणून त्याचं सर्व्हिसिंग करणं आवश्यक आहे . हे सर्व्हिसिंग म्हणजे आयुर्वेदिक पंचकर्मं . ऋतुबदलानुसार पंचकर्मं करावीत .
 शक्य तेवढं निसर्गाच्या सान्निध्यात राहावं . आपण निसर्गाचाच एक छोटा अंश आहोत . आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या ' विहारा ' मध्ये निसर्गात राहणं अपेक्षित आहे .
 रात्रीची झोप आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे . कारण या झोपेदरम्यान शरीर दुरुस्तीचं काम चालू असतं . ही झोप शरीराला रिचार्ज करते .
आधुनिक जीवन पद्धतीच्या नावाखाली आपण शरीरासोबत मनमानी करतो आणि त्याचा परिणाम म्हणून प्रतिकार शक्ती यंत्रणा बिघडते . अनेक रोगांना सामोरं जावं लागतं . आता सर्वच इंद्रियांचा आदर करण्याची वेळ आली आहे . हृदय याची अधूनमधून चौकशी करावी . तुला काय आवडतं ? कशाचा त्रास होतो ? माझं तुझ्याकडे लक्ष आहे असं तुला वाटतं का , असं विचारावं . याच प्रकारे लिव्हर, किडनी, मेंदु कडे लक्ष द्यावे, त्याची चौकशी करावी. पंचेंद्रिंयाची काळजी घ्यावी. ही आपली इंद्रियं दिवसरात्र आपल्यासाठी काम करतात. बऱ्याच वेळा जास्त काळ कामही करतात. कामावर कधीही दांडी नसते, की कामगार दिन म्हणून सुट्टी नसते. ज्यास्त वेळ टिव्ही बघणे, कानाला इअर फोन लावुन मोठमोठयाने संगीत ऐकणे, याप्रमाणे इद्रिंयाचे अतिश्रम टाळावे, अन्यथा चष्मा लागतोच, कानांचा बहिरेपणा निर्माण होतो. अर्थात हे फक्त बोलण्यापुरतंच मर्यादित नव्हे तर त्यानुसार त्या अवयवाची काळजी घेणारी कृतीही करायला हवी.  आपल्या आनंदात शरीरातील अवयवांनाही समाविष्ट करुन घ्यावे. आज माझे किडनी, लिव्हर, मेंदु , फुफ्फुस, ह्रदय सर्व आनंदी आहेत अशा घोषणा द्याव्यात. डाव्या छातीवर थपकी मारुन ऑल इज वेल म्हणावे. रोजचा व्यायाम चुकवू नका. तरुण वयात शरीर सगळंकाही सहन करेल म्हणून त्याच्यावर अती श्रम, अती कष्ट लादू नका. आणि हो या सर्वासोबत मानसिक शांतताही राखा. ताणतणाव रहित जीवन जगा, ध्यान, धारणा, योगासने, प्राणायाम करा.
 स्वतःचं आरोग्य जसं समजून घेतलं पाहिजे तसंच आजारसुद्धा समजून घ्यायला हवा . त्यामुळे त्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येऊन लवकर बरं होण्यास मदत होते . छोट्या - मोठ्या आजारावर लगेच औषधं घेऊ नयेत . थोडासा संयम बाळगावा . निसर्गाला तो बरा करण्यासाठी थोडासा अवधी द्यावा . पेन किलर किंवा आधुनिक औषधांचा वापर टाळावा . शक्य तेथे आयुर्वेदिक औषधी वापरावीत.
 डॉ. पवन लड्डा
 पत्ता  : लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
 पद्मा नगर, उदय पेट्रोल पंपा मागे,
 लातुर. पिन कोड ४१३५३१
 मो. ०९३२६५११६८१
 Email- laddapvn@gmail.com

No comments:

Post a Comment

Visit Our Page