Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Sunday, June 5, 2016

वैश्विक तपमान-वृध्दी

॥ श्री धन्वन्तरये नमः ॥

माझ्या एका खास मित्राच्या सूचनेनुसार यावेळी एका दैनंदिन जीवनासंबंधी विषयाबद्दल विचार मांडीत आहे.
                                वैश्विक तपमान-वृद्धी
हा सध्याचा ज्वलंत विषय आहे. पूर्वी लिहिल्याप्रमाणे, निसर्गाला आपल्या मनाप्रमाणे वाकवू इच्छिणा-या मानवाच्या वेड्या हट्टापायी स्वतःच ही परिस्थिती मानवाने ओढवून घेतली आहे. त्याची जी कारणे समोर आली आहेत त्यांचे (उदा. - जंगलतोड, डोंगरांचे सपाटीकरण, मानवनिर्मित विविध प्रदूषणे इ.) निराकरण करणे, हे काही आपल्या हाती नाही. ते काम शासन आणि शासकीय अधिकारी यांचे आहे.
पण हा 'ताप' आपल्यापुरता काहीसा कमी करणे हे आपण आयुर्वेदाच्या मूलभूत नियमांच्या आधारे नक्कीच करू शकतो. पर्यावरणतील तपमान-वृद्धीचा परिणाम प्रत्येक सजीवावर होतो. "वृद्धिः समानैः सर्वेषाम्" या नियमाप्रमाणे स्वाभाविकतःच प्रत्येक मानवाच्या शरीरांत 'ऊष्ण' या गुणाची वृद्धी होते. त्यामुळे या गुणाचे नियंत्रण करणे आवश्यक ठरते. यासाठीच्या उपाय-योजनांचे त्रिविध वर्गीकरण करावे लागेल -
१) आहार, २) विहार आणि ३) औषधे
आहार
आपण ज्या प्रकारचा आहार करतो, त्याप्रकारचा परिणाम शरीरावर आढळून येतो. शरीर कृश करणारा आहार घेतला तर वजन कमी होते. शरीर पुष्ट करणारा आहार घेतला तर वजन कमी होते. त्याचप्रमाणे ऊष्ण गुणात्मक आहार घेतला तर शरीरांतील ऊष्णता वाढते. हा नियम लक्षांत घेतला तर चाणाक्ष वाचकांच्या लक्षांत येईल की global warming च्या या जमान्यांत शरीरांतील ऊष्णता कमी करणारा आहार घ्यायला हवा. आपण जो आहार घेतो तो गोड, आंबट, खारट, कडु, तिखट आणि तुरट या सहा रसांनी युक्त असायला हवा. त्या त्या रसात्मक आहाराचे गुणधर्म देखील आयुर्वेदिक ग्रंथांत वर्णन केले आहेत.
"रसाः कटु, अम्ल, लवणाः वीर्येण ऊष्णाः यथोत्तरम् ॥"
- अष्टांगहृदय, सूत्र. १०/३६.
आयुर्वेदाचे मार्गदर्शन असे आहे की - तिखट, आंबट आणि खारट या तीन रसांनी युक्त खाद्य पदार्थ क्रमाने एकाहून एक अधिक प्रमाणांत ऊष्ण गुणाचे असतात. याचा अर्थ असा की, या तीन रसांनी युक्त आहार शक्यतो टाळायला हवा. हे सामान्य सूत्र लक्षांत घेता आहाराचे स्वरूप साधारणतः पुढीलप्रमाणे असावे -
धान्यापैकी एक वर्षाचे जुने तांदुळ/गहू चालतील; पण वरी, नाचणी नको.
कडधान्यापैकी मूग, मसुर, हरभरे चालतील; पण वाल, वाटाणे, तूर, कुळिथ नको.
भाज्यांपैकी पालक, दुधी, पडवळ, केळफुल चालेल; पण शेवगा, लाल भोपळा, वांगी(विशेषतः भरली वांगी) नकोत.
फळांपैकी आवळा, डाळिंब, खजूर,काकडी, केळी, नारळ, कोहाळा, अंजीर चालेल; पपई, अननस, काश्मिरी आंबट फळे, चिंच नको.
दुभत्यापैकी दूध, तूप, लोणी चालेल; दही, आंबट ताक नको.
कंदमुळांपैकी कांदा, शिंगाडा, रताळी, साबुदाणा चालेल; लसूण, मुळा, आळूच्या मुंडल्या, नवलकोल नकोत.
 मांसाहारापैकी बोकड, डुक्कर, भेकरे (हरीण) चालेल; मासे, कोंबडा, अंडी अजिबात नको.
बाकी खाद्यपदार्थांपैकी कोथिंबीर, चारोळ्या, साखर तसेच प्यायला लाह्यांचे पाणी, ऊंबराचे पाणी चालेल. पण शक्यतो बाहेरचे चटपटीत, तेलकट टाळावे, पंजाबी, चायनीझ डिश, आंबवलेले, खारवलेले पदार्थ टाळावे, पापड, लोणची, गरम मसाला, बेकरीचे पदार्थ घेऊ नयेत.
 अन्य पथ्य -
 पिण्यासाठी धण्याजि-याचे पाणी वापरावे. दररोज नवे बनवावे. साळीच्या लाह्यांचे पाणी देखिल चालेल. वाळ्याची जुडी टाकलेले पाणी उत्तम.
 काळ्या मनुका, खजूर यांचा कोळ काढून बनवलेले सरबत प्यावे.
  चंदन/रक्तचंदन उगाळून ते गंध दुपारच्या वेळी पोटांत घ्यावे.
 साखर घालून ताजे दूध प्यावे. (शक्यतो पिशवीचे नको).
 हंगामांत ताजे आवळे खावे.
 उंबराचे फळ स्वच्छ धुऊन साखरेबरोबर खावे.
विहार
• शक्यतो उन्हांत फिरणे टाळावे, जावेच लागले तर संपूर्ण अंग झाकले जाईल असे फिक्या रंगाचे सुती/रेशमी कपडे घालून जावे. डोळ्यांवर गॉगल व डोक्यावर टोपी, कॅप, ओढणी, रुमाल इ. असावे.
• आगीजवळचे काम टाळावे.
• ऊन्हांतून घरी आल्यावर तोंडावर पाणी मारावे व हात-पाय गार पाण्याने धुवावे. कानांच्या पाळ्यांना थंड पाणी लावावे. गार पाण्यांत बसावे.
• दुपारी केळींच्या बागेत वा थंडगार सावलीत बसावे. सायंकाळी दुर्वांच्या लॉनवरून चालावे. रात्री शक्य त्या वेळी चांदण्यांत बसावे. एअरकंडिशनरचा वापर करावा.
• शक्य असेल त्यांनी मोत्यांचे, प्रवाळाचे (पोवळ्याचे) दागिने वापरावे.
• ऊष्माघात झाल्यास केळीच्या/कमळाच्या पानांवर गुंडाळून झोपवावे किंवा शरीर ओल्या कापडाने गुंडाळावे.
• वाळा, चंदन, मोगरा, गुलाब, कापूर यांचा सुवास घ्यावा (शरीर व मनाचा दाह कमी होतो). गुलाब, मोगरा, जाई,वाळा, पाचु इ. सुगंधी फुलांचे हार/वेण्या घालावे.
• शिंगाडा-पीठ, आरारूट यांची दुधातील खीर तूप घालून खावीऔषधे
औषधे शक्यतो वैद्याच्या सल्ल्याने घ्यावी.
गुलकंद, ऊशीरासव, चंदनासव, कामदुधा रस, चंद्रकला रस इ. चा वापर वैद्याच्या सल्ल्याप्रमाणे करावा.
पंचकर्म
वैद्याच्या सल्ल्याप्रमाणे अंगाला चंदनबलालाक्षादि तेलाचा मसाज,रक्तमोक्षण, विरेचन यांपैकी क्रिया योजाव्या.
वरील सर्व गोष्टी या दिग्दर्शन्मात्र आहेत. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, चालू असलेला ऋतु, शरीरांत असणारे अन्य व्याधी यांनुसार वर उल्लेख केलेल्या उपचारांत फरक पडू शकतो, याची कृपया नोंद घ्यावी.

- प्रा. वै. मुरलीधर प्रभुदेसाई,
सावंतवाडी, जि. - सिंधुदुर्ग.
संपर्क - 9422435323

No comments:

Post a Comment

Visit Our Page