Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Saturday, June 4, 2016

चायनीज अगरबत्ती

आयुर्वेद कोश ~ चायनीज अगरबत्ती !!

ज्या घरात देव , देवपूजा आणि देवाला मानणारे लोक आहेत त्या घरी अगरबत्ती ही घरचे पावित्र्य असते . सकाळी होणारा घंटीचा आवाज , पाठीमागून येणारे स्तोत्रांचे शब्द . . . आणि अगरबत्तीचा सुवास यातून जे सात्विक वातावरण तयार होते त्या सम तेच ! प्रथम ही गोष्ट स्पष्ट करतो की अगरबत्ती ही डीओ ची आजी नाही . फक्त आणि फक्त सुवास आणि सुगंध निर्माण करणे हे अगरबत्ती चे काम नाही !!

ज्या घरात बाळ - बाळंतीण आहेत त्या घरी तिन्ही सांजेच्या वेळी  रामरक्षा म्हणून , जेथे कोणी आजारी आहे त्या घरात मृत्युंजय मंत्र म्हणून अगरबत्तीचा जो अंगारा उरतो तो कपाळी लावणे हे आपल्या पाहण्यात आहे . मंदिरातून अगरबत्ती -धूप यांच्यातून निघालेला अंगारा घरी घेऊन येणे , एखाद्या ठिकाणी यज्ञ झाला असेल तर तो यज्ञ शांत झाल्यावर त्यातील भस्म घरी आणून ठेवायची पद्धत सुद्धा जुनी . . . आता ही श्रद्धा की अंधश्रद्धा ?? असे वाद घालू -उकरू पाहणाऱ्यांसाठी ही पोस्ट नाही . . .

अरुंधतीने एका यज्ञातील भस्म हाती घेऊन , मृत्युंजय मंत्राने अभिमंत्रित करून लावल्याने मृत झालेली व्यक्ती जिवंत झाली असे संदर्भ आहेत . गुरुचरित्रात २९ साव्या अध्यायात भस्म यावर आहे . जाबाल स्मृती पाहीली तर त्यात भस्म हे पाप नाशक म्हणून सांगितले आहे . भोलेनाथ शंकर यास भस्म किती प्रिय हे वेगळे सांगायला नको . असा अंगारा आणि भस्म याचा महिमा आहे . . मग बंबातली राख आणि देवा समोर लावलेल्या अगरबत्ती /धूप यातून पडलेला अंगारा यात फरक काय ?? दोन्ही राखच की . . .

नदीतले पाणी , नाल्यातले पाणी आणि तुमच्या 'आर ओ ' मधून बाहेर पडलेले पाणी यात फरक काय ? सगळे पाणीच की . . . चला उद्यापासून नदीचे पाणी डायरेक्ट पिऊयात . . . ?? यात फरक आहे तो संस्कारांचा . . . देवा समोरील अगरबत्ती  असो किंवा होम कुंडातील भस्म यावर मंत्र इत्यादी गोष्टींचा होणारा संस्कार त्यांचे कार्य बदलतो . . . . हे पटत नाही ? ठीक आहे . . ते पटावेच अशी आमची सक्ती नाही . . .

सध्या आपण अगरबत्ती आणायला गेलो की आपला निकष काय असतो ?? सुगंधी वासाचे धुराडे कमीत कमी किमतीत मिळायला हवे . . . भारतीय शास्त्रांना मात्र हे अपेक्षित नाही . . धूपन हा अंगराग  या संकल्पनेतील सहावा प्रकार आहे . अंगराग  म्हणजे घामाची दुर्गंधी नाहीशी करून शरीर सुंदर बनवणे . . ! यातील धूपन करण्यास काय वापरावे असा संकेत आहे ?? वास्तविक धूप हा झाडाचा निर्यास आहे . त्याच्या समवेत श्री चंदन , सरल , साल , देवदार , खदिर यापासून धूप काढला जातो . यापैकी गुग्गुळ यापासून काढलेला धूप हा सर्वोत्तम मानला जातो .

भारतीय शास्त्रे पाहीली तर या धुपांचे विषघ्न , सर्पनिर्मोचन , पाप नाशन , दैत्य नाशन असे प्रकार आढळतात . आयुर्वेदात सुद्धा धूम पान , धूपन चिकित्सा ही वेगवेगळ्या व्याधीत सांगण्यात आलेली आहे . त्यात वापरली जाणारी द्रव्ये सुद्धा बदलतात . अगरु , चंदन , मुस्ता, शिलारस ,कस्तुरी , तूप , गंध , गुग्गुळ , हरीतकी , जटामासी इत्यादी ही सामान्यपणे वापरली जाणारी सुगंधी द्रव्ये . . पान यांचा उपयोग केवळ सुगंध देणे आहे  का ?? नक्कीच नाही . . .

घरी पूजा करताना किंवा शोडषोपचार  पूजा पाहताना तुम्ही धूप -दीप - नैवेद्य हा क्रम पहिला असेल . . भारतीय शास्त्रांचा सूक्ष्म विचार पहा . . हाच क्रम शरीरावर लावला तर आधी धूप म्हणजे शरीर तसेच आजूबाजूचे वातावरण निर्जंतुक करून घेणे . . त्यानंतर शरीरातील अग्नी प्रज्वलित झाला की नैवेद्य (भोजन ) ग्रहण करणे . . हा नियम आपण पाळायला काय हरकत आहे ?? एसी रूम १०० % निर्जंतुक आहे असा दावा कोण करेल पान निंब पानाचा धूप केल्यावर ती खोली निर्जंतुक होईल याची खात्री देणे सहज शक्य आहे . . . सायंकाळी देवाची धूप आरती केल्यावर राक्षस पळून जातात असे म्हणतात . यातील राक्षस म्हणजे 'हा हा हा ' असे हसणारे ३ दात बाहेर असणारे आणि केसाळ असे अक्राळ विक्राळ प्राणी गृहीत न धरता राक्षस म्हणजे आजूबाजूची दुर्गंधी ,वातावरणातील जीव जंतू , मनाची अप्रसन्नता , मरगळ असे मानायला काय हरकत आहे ?? हे सर्व दूर होतात ते 'औषधी ' वनस्पतींचा धूप केल्याने . . . सध्या आपण हे करतो का ??

नाही . . . सध्या जे 'से नो टु अगरबत्ती इट मे क्रीएट केंसर ' असे जे सुरु आहे ते 'रसायनांच्या ' ज्वलनामुळे . . आयुर्वेदात एकीकडे धूम  ही चिकित्सा सांगितली आहे आणि दुसरीकडे धूम सेवन हे व्याधींचे कारण सांगतिले आहे . . असे का ?? तर तुम्ही धूर कोणत्या गोष्टीचा घेता यानुसार त्याचे शरीरावर फायदे होणार की तोटे हे ठरत असते . . . चायनीज अगरबत्ती हा यातलाच 'तोटेबाज ' व्यवहार !!

जिथे जिथे आम्ही कमी तेथे तेथे आम्ही चायनीज अशा बेस वर मार्केट सुरु आहे . अगरबत्ती क्षेत्रातील भारतातली मंदी ओळखून चायनीज ड्रेगोन ने आपले हात पाय या क्षेत्रात पसरले आहेत . या अगरबत्ती मध्ये 'फेनोबुकार्ब ' नावाचे हानिकारक घटक आढळल्याचे 'बॉम्बे टेक्सटाइल रिसर्च असोसिएशन आणि हिंदुस्तान इनसेक्ट कंट्रोल असोसीएशन ' यांनी सांगितले आहे . चीन मधून 'टनांनी ' या उदबत्याची आयात होते . आकर्षक पेकिंग , कमी किंमत आणि भरपूर काड्या यामुळे या 'टनांची ' भारतात विक्री सुद्धा दणक्यात होते . यात असलेले 'फेनोबुकार्ब ' हे  भात आणि कापूस यांच्यावर कीटक नाशक म्हणून फवारले जाते . तसेच याचे मनुष्याच्या आरोग्यास अत्यंत हानिकारक परिणाम आहेत .

हे कीटक नाशक श्वसन मार्गाने शरीरात गेल्यास श्वसन संस्थेचे विकार , डोळे आणि त्वचेची जळजळ , अस्वस्थता , अतिशय घाम येणे , हृदयाचे ठोके मंदावणे किंवा भरभर पडणे असे धोके निर्माण होऊ शकतात . भारतासह अनेक देशात बंदी असलेले हे केमिकल चायनीज अगरबत्ती मधून तुमच्या आमच्या घरात घुसत आहे . याने आपल्याला अपाय  झाले तर दोष कोणाचा ?? भारतीय शास्त्रांचा नक्कीच नाही . .

धूपन चिकित्सा ही एक उत्तम चिकित्सा पद्धती आहे . यात वापरली जाणारी द्रव्ये ही केवळ सुगंध निर्माण करत नाहीत तर माणसाच्या स्वास्थ्यास हितकारक असे वातावरण तयार करतात . काही आजारात 'चिकित्सा ' म्हणून कार्य करतात . . पण ते 'शास्त्रीय ' पद्धतीने वापरले तर आणि तरच . . . केवळ सुगंध बाहेर फेकणारी धुराडी या मर्यादित आणि संकुचित पद्धतीने धूपन /धूप याचा विचार केला तर तो दोष भारतीय शास्त्रांचा किंवा आयुर्वेदाचा नाही !!

प्रयोगशाळेत बनवलेल्या अगरबत्ती काय 'गुण उधळतील ' हे आम्ही सांगू शकत नाही . . . पण भारतीय परंपरेने सांगितलेल्या पद्धतीने , ती द्रव्य वापरून तयार केलेले मिश्रण . . . त्याचे ज्वलन होत असताना होणारा धूर आणि ज्वलन झाल्यावर उरलेला अंगारा किंवा भस्म हे हितकारक असते . . देह आणि मन याची शुद्धी करणारे !!

वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
आयुर्वेद कोश
(https://www.facebook.com/aarogyakosh/ )

(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)

No comments:

Post a Comment

Visit Our Page