Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Friday, June 24, 2016

आयुर्वेद आणि मंत्रशास्त्र

#घरोघरी_आयुर्वेद
आयुर्वेद आणि मंत्रशास्त्र
आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे असे मानले जाते. स्वाभाविकपणे मंत्रोपचारांचे अनेक संदर्भ आयुर्वेदात सापडतात. ज्वरात शिव-उपासना असो वा सान्निपातिक ज्वरात विष्णूसहस्रनाम पठण असे कित्येक संदर्भ चरकसंहितेत येतात. रसशास्त्र या विषयात तर मंत्रांना अनन्यसाधारण महत्व आहे. पारा शुद्ध करण्याच्या संस्कारांत 'अघोर मंत्राचा' जप केला जातो. फार कशाला; 'दैवव्यपाश्रय' नामक उपचारांचे एक अंग आयुर्वेदाने वर्णन केले आहे. यात मंत्रांचा समावेश होतो.
हे मंत्र आपल्या मनावरदेखील अतिशय सकारात्मक बदल घडवत असतात. त्रिवेन्द्रमच्या पद्मनाभ मंदिरात पहाटेच्या पूजेसाठी अवश्य जा. मी काय म्हणतोय ते लक्षात येईल. मुळात शब्दांचा आपल्या मनाशी निकटचा संबंध असतो. त्यामुळेच कोणी आपल्याला उद्देशून अपशब्द उद्गारला वा आपले कौतुक केले की त्या-त्या प्रकारच्या भावना मनात उत्पन्न होतात. कोणी शिवी दिल्यावर खूष झालेला असा 'शहाणा माणूस' माझ्या तरी पाहण्यात नाही!
'शब्दो नित्यः|' म्हणजे शब्द अविनाशी असतात असे आपले शास्त्र सांगते. आकाश या महाभूताशी संबंधित असल्याने आणि आकाश (म्हणजे पोकळी) सर्वत्र व्यापलेले असल्याने हे शब्द नित्य असतात. अर्थात; हा तात्विक चिंतनाचा विषय असल्याने इथे अधिक स्पष्ट करणे शक्य नाही. केवळ भारतीय दर्शनांच्या तत्वज्ञानाची झलक म्हणून हा मुद्दा मांडला. आधुनिक शास्त्राच्या दृष्टीने ध्वनी लहरींचा परिणाम अभ्यासण्यासाठी cymatics सारख्या शाखांत काम केले जात आहे. ध्वनी लहरींच्या सहाय्याने जलद गतीने तुटलेले हाड सांधण्यास मदत होते असा निष्कर्ष प्रयोगांती निघाला आहे. अर्थात; या विषयी अधिक संशोधन होण्यास पुष्कळ वाव आहे. आधुनिक विज्ञान या क्षेत्रात संशोधनाच्या पहिल्या पायरीवर आहे.
आता या उपचारांची दुसरी बाजूदेखील पाहू. आचार्य सुश्रुतांनी सर्पविषावरील उपचार वर्णन करताना त्यातही मंत्रोपचाराचा आवर्जून उल्लेख केला आहे. हो; आपल्याकडे सापाच्या दंशावरचे उपचार होते. आपले पूर्वज अगदीच काही 'प्रतिगामी' आणि 'अडाणी' नव्हते!! याविषयी वेगळा लेखांक तयार करेन. तूर्त विषयसूत्र धरून चालू. या ठिकाणी सुश्रुताचार्य म्हणतात की; हे मन्त्र नेहमी सत्य बोलणे आणि तप करणे यांनी वाचासिद्धी प्राप्त झाली आहे अशा ब्रह्मर्षी वा देवर्षींनीच उच्चारायचे आहेत. उठसूट कोणीही हे मंत्र पुटपुटत बसल्याने काही उपयोग नाही. 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही' ही म्हण रूढ होण्यामागे हीच विचारप्रणाली आहे. थोड्क्यात; वैद्याने उपचार करत असताना या मंत्रांचा 'आधार घेणे' अपेक्षित आहे पण त्यांच्यावरच 'अवलंबून राहणे' नाही. औषधोपचार करणे हे वैद्याचे प्रमुख कर्तव्य. आणि वैद्येतरांनी तर मंत्रचिकित्सेच्या फंदात पडूच नये. कितीही अवडंबर माजवले तरी आपण कोणी ब्रह्मर्षी वा देवर्षी नाही याची जाणीव गावोगावी आणि गल्लोगल्ली दिसणाऱ्या अशा तथाकथित 'मंत्रचिकित्सकांनी' ठेवावी आणि आयुर्वेद वा भारतीय संस्कृती यांची ढाल करून रुग्णांच्या जीवाशी खेळ करू नये. रुग्णांनीदेखील अशा भोंदूपणापासून सावध रहावे. कारण 'मागणी तसा पुरवठा' हा अर्थशास्त्राचा आवडता सिद्धांत आहे!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

No comments:

Post a Comment

Visit Our Page