Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Thursday, June 2, 2016

व्यायाम

* *आरोग्यसूत्रम्-३* *
२ जून २०१६

व्यायाम !!

*शरीरायासजनकं कर्म व्यायामसंज्ञितम् ।* सुश्रुतसंहिता सूत्रस्थान २४.३८

कालच्याच आरोग्यसूत्रात बघितले की व्यायाम हा नेहमीच पथ्य आहे; पण तो बलवान व स्निग्ध आहार घेणाऱ्यांसाठी !! शीतऋतुत (थंडीत) आणि वसंत ऋतुत तर विशेषतः व्यायाम अतिपथ्यकर आहे.
आयुर्वेदात दिनचर्या अध्यायात व्यायामाचे वर्णन असल्यामुळे व्यायाम ही रोज करण्याची गोष्ट आहे, हे स्पष्ट होते.
तरुणपणात कोल्हापूरवासी असलेले एक गृहस्थ सांगत होते की, “डॉक्टर, एके काळी खच्चून व्यायाम केलाय्. रंकाळ्यात उडी टाकली की एका दमात दुसऱ्या टोकाला जावून पोचत असू.” त्यावर म्हणले, “अहो, पण आता गुडघेदुखी सुरु झाली, त्याचे काय?” सारांश असा की, रोज केलेला व्यायाम त्या दिवसापुरताच असतो. शिवाय, या नित्याच्या व्यायामाने शरीरातील बल वाढून शारीरिक क्षमता वाढावयास हवी. उतारवयसुद्धा बलवान् असायला हवे.
यासाठी आयुर्वेदाने काही युक्त्या सांगितल्या आहेत; त्या विचारात घेतल्या तर शरीर बळकट राहून सांध्यांची झीज, इ. होणाऱ्या गोष्टी टळतील.

व्यायाम बलवान आणि स्निग्ध आहार घेणाऱ्या लोकांसाठी पथ्य आहे. दुर्बल व रोगग्रस्त, आहारात  स्निग्धांश कमी घेणाऱ्यांनी व्यायाम वैद्याच्या सल्ल्यानुसारच करावा.

*व्यायाम किती करावा?*
कोणताही ऋतु असो, व्यायाम अर्धशक्तिने करावा. अर्धशक्ति म्हणजे शारीरिक क्षमतेच्या निम्म्या प्रमाणात!
अर्धशक्ति याचाच अर्थ half of the physical strength असा आहे. आयुर्वेदाने किती वेळ व्यायाम करावा? याचे काही गणिती उत्तर दिलेले नसून प्रत्येकाच्या शरीरसामर्थ्यावर अवलंबून असलेली गोष्ट असल्याने त्याचे काही लक्षणांच्या आधारे वर्णन केले आहे.

*अर्धशक्तिचे लक्षण *
हृदिस्थानस्थितो वायुः यदा वक्त्रं प्रपद्यते ।
व्यायामं कुर्वतो जन्तोः तद्बलार्धस्य लक्षणम् ॥ सु.चि.२४.४८
शारीरिक आयास / व्यायाम सुरु केल्यानंतर ज्यावेळी तोंड उघडून श्वास घ्यावा लागेल, ती अर्धशक्तिची मर्यादा आहे. यापेक्षा अधिक व्यायाम केल्यास त्याने श्रम होतात, तो व्यायाम राहत नाही.
व्यायाम ही कधीतरी / अति प्रमाणात करण्याची क्रिया नाही. ही क्रमाक्रमाने वाढवत नेण्याची क्रिया आहे. *व्यायामश्च शनैः शनैः ।* व्यायाम हळूहळू, अर्धशक्तिने पण नियमितपणे (रोज) करावा.
कालांतराने असे लक्षात येईल की मनुष्याची अर्धशक्ति वाढतेय्. म्हणजे, सुरुवातीला तीन किलोमीटर धावल्यानंतर जर तोंड उघडून श्वास घ्यावा लागत असेल तर कालांतराने असे लक्षात येते की नियमित केलेल्या व्यायामाने आता चार किलोमीटर धावूनही श्वास घेण्यासाठी तोंड उघडावे लागत नाहीये. व्यायामातील सातत्याने हीच अर्धशक्ति वाढत जाते. शरीरक्षमता वाढते. ही प्रक्रिया अचानकपणे घडून येत नाही, ही दीर्घकालाने सतत प्रयत्नाने साध्य होणारी गोष्ट आहे.

हा अर्धशक्तिने व्यायाम करण्याचा नियम जर पाळला तर अतिरेकी व्यायामापासून मनुष्य दूर राहतो आणि क्रमाक्रमाने बलही वाढत जाते. अन्यथा अतिव्यायामाने होणारे पित्तप्रकोप, भ्रम, छर्दि (उलटी), तृष्णा (तहान), कास (खोकला), ज्वर, इ. विकार उत्पन्न होवू शकतात.

ज्यांच्या शरीरात वात व पित्तप्रकोप झाला आहे अशा रुग्णांनी आणि विकार नसताना भोजन केल्यानंतर किमान दीड तासपर्यंत तरी व्यायाम करु नये.

*व्यायाम प्रकार*
हल्ली व्यायामप्रेमींसाठी असंख्य व्यायामप्रकार उपलब्ध आहेत. पूर्वी मृगया (शिकार), द्वंद्वयुद्ध, शरसंधान, गदायुद्ध, सूर्यनमस्कार, आसने, आखाडा, पोहणे, अश्वारोहण, गजारोहण असे अनेक प्रकार प्रचलित होते. सर्व प्रकारांचा विचार केला तर सामान्यतः *चल व्यायाम* आणि *स्थिर व्यायाम* असे दोन प्रकार करता येतील.

शरीराला चपळपणा यावा यासाठी चल प्रकारचा तर शरीरातील बळ स्थिर व्हावे यासाठी आसनांसारखा स्थिर व्यायाम आवश्यक आहे. शरीरातील जडपणा कमी होईपर्यंत चल व्यायामाचा आश्रय घ्यावा, शरीर सुडौल, नेटके झाल्यानंतर शरीरस्थैर्यासाठी स्थिरव्यायाम करावेत.

स्थूलपणा कमी करण्यासाठी व्यायामासारखे दुसरे साधन नाही. * न च अस्ति सदृशं तेन किञ्चित् स्थौल्यापकर्षणम् ।* व्यायामी व्यक्तीस कुणीही सहज पराभूत करु शकत नाही. या व्यक्तीवर जरा (म्हातारपण) आक्रमण करु शकत नाही. शरीरातील मांसधातु स्थिर होतो. वयास अनुरूप असे शरीर होते. म्हातारपण दिसू लागलेले तरुण पुनः बलवान् होतात. कोणतेही अन्न पचवण्याची क्षमता उत्पन्न झाल्यामुळे या लोकांसाठी पथ्य-अपथ्याचा फारसा विचार करण्याची गरज पडत नाही. श्रम, औष्ण, शैत्य सहन करण्याची क्षमता प्राप्त होते. श्रेष्ठ आरोग्यलाभ होतो. *आरोग्यं चापि परमं व्यायामादुपजायते ।*

*व्यायामानंतर काय करावे?*
शरीराला झालेल्या आयासामुळे जो थकवा येतो, तो दूर करुन मगच नित्याच्या व्यवहाराला सुरुवात करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी व्यायामानंतर सर्व शरीराचे मर्दन करावे. हलक्या हाताने अंग रगडावे, त्याने स्नायु शांत होतात. उद्वेजित झालेले शरीर प्रसन्न आणि स्थिर होते. हे करणे शक्य नसेल तर किमान श्वासगति स्थिर होईपर्यंत पडून राहणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा व्यायामामुळे झालेल्या वातप्रकोपामुळे शरीराची उद्विग्न अवस्था कायम राहते. शवासन इ. मुळे शरीरातील गतिमान झालेल्या सर्व क्रिया शांत होतात म्हणून शवासन करण्याचेही हेच प्रयोजन आहे.

हल्ली व्यायामानंतर विविध प्रकारचे रस पिण्याचे फॅड प्रचलित झाले आहे. व्यायामानंतर (वजन कमी करणे हा हेतू असेल तर विशेषतः) थोडे कोमट पाणी प्यावे. दूध किंवा कोणताही घन आहार घेवू नये. शरीरातील चयापचय क्रिया व्यायामानंतर गतिमान झाल्याने व्यायामानंतर आपण जे आहार घेवू तो तत्काल शोषला जावून अंगी लागतो; आणि वजन कमी करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी वजन कमी होत नाही.

निष्कर्ष एवढाच की तारतम्याने अतिरेक न करता नियमितपणे, चिकाटीने आणि आयुर्वेदाने सांगितलेल्या युक्तीने व्यायाम केला तर परम आरोग्याची प्राप्ती होईल यात शंकाच नाही !

*वैद्य नीलेश कुलकर्णी*, पुणें.
 +९१-७७९८६२७८२३ / +९१-८८०५३३५५१२
vd.nilesh@gmail.com

No comments:

Post a Comment

Visit Our Page