Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Saturday, June 4, 2016

प्रसूतिपश्चात काळजी

प्रसूतिपश्चात काळजी

*** वैद्य गोपाल म. जाधव***
(एम.डी. स्त्रीरोग तज्ज्ञ)

स्वातंत्र्योत्तर काळात देशाने जगाच्या स्पर्धेत विलक्षणीय गरुडभरारी घेतली. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, वैद्यक, क्रीडा इ. अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय व क्रांतिकारक बदल झाले. त्यामुळे मनुष्यजीवन अधिक सुकर, सुखद व वेगवान बनले. यामुळे पूर्वापार अस्तित्वात असलेल्या अनेक प्राचीन भारतीय रूढींना खीळ बसली. संयुक्त कुटुंबपध्दती हा अतिशय मूलभूत वारसादेखील भारतीय जनमानसांमधून हद्दपार होण्याच्या उंबरठयावर आहे. त्यामुळे कुटुंबातील आबालवृध्दांपासून ते मानवी समूहाच्या प्रत्येक घटकांवर विपरीत परिणाम संभवतो आहे, नव्हे होत आहे.
कुटुंबनियोजनाच्या प्रभावी उपाययोजनेने तसेच साक्षरता व उन्नत विचारसरणीसारख्या अंगीकरणाने दाम्पत्यांना होणाऱ्या अपत्यांची संख्या एक किंवा दोनपर्यंत मर्यादित झाली. या विलक्षण स्पर्धेत आपले बालक यशस्वीरीत्या टिकावे म्हणून बालसंवर्धन व सक्षमीकरणाकडे माणसं साहजिकरीत्या आकर्षली गेली. गर्भिणी परिचर्या, गर्भसंस्कार, प्रसवपूर्व मार्गदर्शन यांच्या दुकानदारीचा अक्षरश: ऊत आला असून ज्या बाबी सहजपणे कुटुंबातच होणे अपेक्षित होते त्यासाठी आता तज्ज्ञ लोकांकडून विशेष मार्गदर्शनाची गरज भासत आहे.
'सूतिका' अर्थात प्रसूत झालेली स्त्री. प्रसूती ही जरी स्वाभाविक बाब असली तरी बदलत्या जीवनशैलीत या अवस्थेला सामोरे जाण्यास सक्षमपणे तयार नसतात व त्यातून काही मनस्ताप व काही शारीरिक आजार उत्पन्न होऊ शकतात. म्हणून हा विषय नमूद करणे क्रमप्राप्त आहे.
खरं तर सूतिकेच्या बाबतीत बऱ्याच वेळा अन्यायच होतो. सामाजिक विसंगतेचं ते एक जागतं प्रतीक आहे, कारण एखाद्या कुटुंबात नव्या पाहुण्याची चाहूल लागली की, आनंदोत्सवाचा असा धबधबा सुरू होतो की, त्या गर्भिणी स्त्रीचे प्रत्येक जण आपापल्या परीने कोडकौतुक करून तिच्या संगोपनामध्ये मदत करतो. शेकडो चित्रपटांमधून स्त्रीला पहिल्या वांत्या (उलटया/ओकाऱ्या) होताच तिच्यासाठी आंबट पदार्थ आणण्यासाठी केलेली धावपळ दर्शविली असेल, पण बाळाच्या जन्मानंतर मातेच्याही आरोग्याचे रक्षण महत्त्वाचे असते हे कधी कुणाला मांडावे वाटले नाही. घराघरातून गर्भिणीची घेतली जाणारी काळजी ही अप्रत्यक्षरीत्या बाळाची असते व प्रसवानंतर सर्वांचे लक्ष पुन्हा बाळावरच केंद्रित होऊन त्या बाळाला सुखरूपपणे जन्माला घालणाऱ्या मातेची आबाळ होतेच होते. त्यातही प्रसूतीवेळी टाके पडले असतील, चिमटा (Forcep) किंवा व्हॅक्युम पध्दतीचा प्रसव अथवा सिझेरीयन पध्दतीने प्रसूति झाल्यास तिच्या वेदनांमध्ये अधिकच भर पडते. अशा नवप्रसूत मातांच्या सर्वसाधारण समस्या खालील कारणांमुळे होतात.
1) प्रसव प्रक्रियेमुळे शरीरात उत्पन्न झालेले स्वाभाविक दौर्बल्य.
2) बाळाच्या रडण्यामुळे अथवा त्याच्या संगोपनामुळे  दुर्बलावस्थेत मातेवर पडणारा अतिरिक्त कामाचा ताण.
3) वारंवार झोपमोड होणे.
4) स्वत:च्या आरोग्यापेक्षा बालकाची काळजी अधिक घेण्याची प्रवृत्ती.
5) विविध कारणांनी भूक मंदावणे. आहारातील वैषम.
6) मानसिक व भावनाप्रधान कारणांनी होणारा त्रास.
7) कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य न मिळणे अथवा वैचारिकदृष्टया मागास कुटुंबात स्त्रीची होणारी कुचंबणा.
8) झालेले अपत्य मुलगी असल्यामुळे होणारा त्रास.
9) व्यसनी पती, आर्थिक कारणे तसेच पूर्वीची लहान मुले असल्यास मातेच्या दु:खाला परिसीमा नसते.
10) शेतकरी, मजूर, कामगार स्त्रिया यांच्याकडेही सूतिका अवस्थेत पूर्णत: दुर्लक्ष होते व अशा स्त्रियांच्या स्वाभिमान व आरोग्य यांचे काही महत्त्व असते हे संपूर्णत: दुर्लक्षिले जाते.
11. नोकरीनिमित्त घराबाहेर पडणाऱ्या स्त्रियांना कामाचा ताण, बाळापासून होणारी ताटातूट, रजेचा अभाव अथवा तत्सम कारणांमुळे मातृत्व त्रासदायक ठरते.
यापैकी अनेक स्त्रियांच्या नशिबी एकापेक्षा अनेक कारणास्तव त्रासदायक प्रसंग येतात व अशाप्रसंगी योग्य सहकार्य, सहानुभूती व चिकित्सेच्या अभावी माता व बालक यांच्या जीवनावर दूरगामी परिणाम होतात. त्यामुळे सूतिका अवस्था जनसामान्यांनी गांभीर्याने घेण्याची बाब असून त्याबाबत जागरूक होणे आवश्यक आहे. अन्यथा निकोप व निरोगी समाजाचे स्वप्न पाहणाऱ्यांच्या प्रयत्नांना पुरेसे यश लाभणार नाही, हे निश्चित.
सदर बाबतीत आपणास पुढीलप्रमाणे खबरदारी घेता येईल.
अ) प्राथमिक काळजी : ही अवस्था सामान्यपणे बालकाच्या जन्मापासून पहिला आठवडा पूर्ण होईपर्यंतची आहे. वरकरणी पाहिले तर हा रुग्णालयातील काळ होय. प्रसवाच्या स्वरूपानुसार तीन, पाच किंवा सात दिवसांनी माता व बालक यांना रुग्णालयातून निर्गमीत करण्याची पध्दत असते. (प्रसूतीनंतर दुसऱ्याच दिवशी सुटी मागणाऱ्यांची संख्या कमी नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रावर हा अनुभव हमखास येतो.)
1) प्रसवानंतर रक्तस्राव होणे अपेक्षित नसते. त्याकडे स्वत: रुग्णा व सोबतीच्या व्यक्तीने प्रकर्षाने लक्ष देणे आवश्यक आहे.
2) प्रसवानंतर मल-मूत्र यांचे प्राकृतपणे विसर्जन होणे आवश्यक आहे. गर्भाशय संकोचक औषधे नियमित घ्यावीत.
3) प्रसवानंतर तत्काळ बालकास दूध पाजवण्यास घेणे आवश्यक आहे. बालकाने मातेच्या स्तनांना स्पर्श करणे, चोखणे इ. मुळेच स्तन्यनिर्मिती होते.
4) प्रसवपथाला टाके पडले असल्यास रुग्णेने त्या भागावर ताण पडणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
5) टाके दररोज स्वच्छ ठेवणे व निर्जंतुक औषधाने साफ करणे आवश्यक आहे.
6) बालकास झोपवून दूध पाजू नये अथवा झोपेत बाळ अंगाखाली दबणार नाही याची प्रकर्षाने काळजी घ्यावी.
ब) द्वितीयक काळजी : ही अवस्था रुग्णालयात यशस्वीपणे उपचार करून घरी परतल्यानंतरची असून एकदा ही अवस्था संपली की, तिची काळजी घेणे आवश्यक नसल्याचे सर्वांना वाटते. म्हणून घरी आल्यानंतरही मातेचे आरोग्य हा विषय संपत नाही. वास्तविकपणे एका बाळाच्या निर्माणार्थ खर्ची पडलेल्या शक्तीच्या पुनर्भरणाचा हा काल असून ग्रामीण भागातील असंख्य रुग्णांच्या बाबतीत ही काळजी घेतली जात नाही. परिणामी अशा शक्तिहीन व दुर्बल माता तशाच अवस्थेत पुन्हा गर्भवती बनतात व दुर्दैवाची मालिका सुरूच राहते. त्यामुळे रुग्णालयांतून घरी आणलेल्या प्रसूत स्त्रीसाठी खालील बाबी अनिवार्य आहेत.
1) सुमारे एक ते दीड महिना कष्टाची कामे टाळणे.
2) रोज किमान सहा तास झोप झालीच पाहिजे. त्यातील किमान दोन तास तरी झोप सलग असावी.
3) सकस व संपूर्ण आहाराचे कटाक्षाने सहा महिन्यांपर्यंत सेवन.
4) शरीराच्या स्वच्छतेची कटाक्षाने काळजी घेणे.
5) घराबाहेरील पदार्थ सेवन करणे टाळणे.
6) दर दोन तासांनी बाळास दूध पाजणे व त्यानंतर स्तनातील उरलेले दूध काढून टाकणे.
7) दूध पाजताना नेहमी ताठ बसणे व पाठीच्या कण्यास आधार देणे आवश्यक आहे.
8) गरोदरपणातील रक्तवर्धक व कॅल्शियमयुक्त गोळयांचे तीन ते सहा महिन्यांपर्यंत सेवन करणे.
9) प्रदर, ज्वर, सनशोथ, शूल, उदरशूल यांसारख्या कारणांसाठी आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा तत्काळ सल्ला घेणे.
10) बालकास प्रखर वारा, प्रकाश, गोंगाट, माणसांची वर्दळ यांपासून दूर ठेवावे. वातानुकूलित घरातही फार थंड वातावरण असू नये.
11) संतती प्रतिबंधन अवश्य करावे. त्यासाठी योग्य मार्गदर्शनाने उपचारपध्दतीचा अवलंब करावा.
12) प्रसूतीपश्चात तूप, बदाम, काजू, मेथी लाडू यांचा प्रमाणबध्द वापर करावा. अति संतपर्णाने वजन वाढण्यापलीकडे काही साध्य होत नाही.
13) दुधाचे पदार्थ, शतावरी, भात यांसारख्या उपचारांनी तसेच माता आनंदी राहिल्याने स्तन्यप्रादुर्भाव उत्तम होतो. होत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
14) बालकाच्या लसीकरणासाठी तत्पर राहणे व नियमित वेळेवर योग्य लसीचा डोस बालकास द्यावा.
15) सुरक्षित मातृत्व व बालसंवधनार्थ दोन अपत्यांमध्ये किमान तीन वर्षांचे अंतर ठेवावे.
गर्भिणी व सूतिका महिलांसाठी शासन स्तरावर विविध  योजना राबवल्या जात असून त्यात 'जननी सुरक्षा योजना', 'जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम', 'अब्दुल कलाम पोषण आहार योजना' इ.बाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याचा योग्य लाभ घेऊन राष्ट्रीय 'माता-बाल संगोपन' कार्यास मदत करून सामाजिक विकासामध्ये योगदान द्यावे.
                                           - साहाय्यक प्राध्यापक
                                     शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नांदेड
                                        भ्रमणध्वनी : 8087043758
                                      gmahadev2009@gmail.com

No comments:

Post a Comment

Visit Our Page