Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Thursday, December 8, 2016

शारीरिक आणि मानसिक स्नेहन आणि आपले आरोग्य

*आयुमित्र*

*शारीरिक आणि मानसिक स्नेहन आणि आपले आरोग्य*

    हिवाळ्याचे दिवस आहेत थंडीपण खूप पडली आहे आणि वातावरण सुद्धा थंड झाले आहे. ह्या बाह्य वातावरणाचा परिणाम आपल्या शरीरावर सुद्धा झालेला दिसून येतो. त्वचा कोरडी पडते, भूक वाढते, लघवीला वारंवार लागते. पावसाळ्यात व हिवाळ्यात वातावरणातील शील गुणामुळे शरीरातील वात वाढतो. तसेच शरीरातील रुक्षता वाढते आणि सांधेदुखी, अंगदुखीचे त्रास सुरु होतात. तर उन्हाळ्यात वातावरणात उष्ण गुण वाढलेला असतो ह्यामुळे शरीरातील उष्ण गुण वाढतो आणि रुक्षता सुद्धा वाढते. ह्यामुळे शरीरात दाह निर्माण होतो. स्नेहनाची खरी गरज हि हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा ह्या तिन्ही ऋतूत असते.

*शारीरिक स्नेहन म्हणजे काय?*

       स्नेहन म्हणजे तूप व तेल ह्यांचा शरीरातील उष्णता, रुक्षता, कोरडेपणा म्हणजेच वात आणि पित्त कमी करण्यासाठी उपयोग करणे होय. बाह्यस्नेहन म्हणजे त्वचेचा कोरडेपणा व उष्णता कमी करण्यासाठी तेल व तुपाचा उपयोग करणे होय. आभ्यंतर स्नेहन म्हणजे तेल व तूप हे शरीराच्या आतील दाह/उष्णता/पित्त व शीतता/रुक्षता/वात कमी करण्यासाठी उपयोग करणे होय. वात वाढला असेल तर तीळ तेल हे उत्तम आहे. पित्त कमी करण्यासाठी गाईचे तूप हे उत्तम आहे, असे आयुर्वेद सांगते.  दररोज अंगाला तेल लावणे( अभ्यंग करणे) व जेवणात तेल व तुपाचा वापर करणे हे सुद्धा स्नेहनच आहे. आणि ते केलेही पाहिजे.

*मानसिक स्नेहन म्हणजे काय?*

     जसे तेल व तूप वापरून शरीरातील कोरडेपणा, उष्णता, रुक्षता, दाह, अंगदुखी ह्या घालवता येतात तसेच मानाचे विकार सुद्धा कमी करता येतात.  काही कारणाने मनातील राज व तम गुण वाढतात आणि मनस्ताप(उष्णता/दाह), निराशा(रुक्षता), निरसता/एकाकी पणा(कोरडेपणा) निर्माण करतात.  ह्यावर सुद्धा स्नेहनाचा उपयोग करता येतो. ते स्नेहन कोणते? तर ते स्नेह म्हणजे “सत्व गुण वाढविणारे घटक” होय. सत्वावजय चिकित्सा सांगताना आयुर्वेद म्हणतो कि आध्यत्मिक ज्ञानाने, सात्विक आहाराने( दूध, तूप, फलाहार आदी) सत्वगुण वाढवता येतो. हा सत्वगुण वाढून मनात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, माया, ममता, आदर निर्माण होतात. ह्यांचा उपयोग करून नात्यात आलेली रुक्षता, एकाकीपणा, मनस्ताप व निराशा नक्कीच कमी करता येईल.  

चला तर शरीराला व मनाला स्वस्थ ठेवूया, स्नेहन करूया.

( वरील स्नेहन विषयक माहिती हि स्वस्थ व्यक्तींसाठी आहे. स्थूलता, सूज, इत्यादी विकार असल्यास आपल्या वैद्यांचा सल्ला घ्यावा. आभ्यंतर स्नेह व बाह्य स्नेह मात्रासुद्धा त्यांच्याच सल्ल्याने घ्यावी.)

*-वैद्य भूषण मनोहर देव.*

*ज्योती आयुर्वेद, जळगाव 8379820693/7588010703

drbhushandeo@gmail.com

http://wp.me/p7ZRKy-5a

No comments:

Post a Comment

Visit Our Page