Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Saturday, February 4, 2017

आलं लसूण लिंबू आणि व्हिनेगरयुक्त औषध हृदयविकाराकरिता सर्वत्र प्रसिद्ध झालं आहे. त्याविषयी

✨✨

शुभ प्रभात

आलं लसूण लिंबू आणि व्हिनेगरयुक्त औषध हृदयविकाराकरिता सर्वत्र प्रसिद्ध झालं आहे. त्याविषयी :

आलं - लसूण आणि लिंबूरस यांचे गुणकार्य आयुर्वेदात स्पष्टच वर्णित आहेत.

आर्द्रक उर्फ आलं किंवा त्यापासून वाळल्यानंतर बनणारी सुंठ हे तर "विश्वभेषज" या पर्यायी नावाने सन्मानित आहे. (सुंठ आणि आल्यातला एक फरक या निमित्ताने लक्षात घ्या. तो असा की, वाळून तयार झालेले सुंठ हे पित्तशामक कार्य करते. त्यामुळे 'गरम पडणे' असा प्रकार सहसा होत नाही. मात्र ओलं आलं हे गरम पडू शकतं, याची नोंद घ्यावी.) आर्द्रक हे प्रामुख्याने अग्निवर कार्य करीत असल्याने त्याचा अनेक आजारांवर उत्कृष्ट परिणाम होत असतो. अग्निमांद्य हे अनेक आजारांचे मूळ कारण आहे. आलं आणि सुंठही अग्निमांद्य दूर करणारं आहे. ज्याचा अग्नि प्राकृत, तो स्वस्थ असे म्हटले तरी चालेल.

दुसरा घटक लसूण. हीदेखिल स्वास्थ्याकरिता निसर्गाची एक अनमोल देणगी आहे, असे आपण म्हणू शकतो. आवळ्याप्रमाणे लसूण यातही एकूण सहापैकी पाच प्रकारचे रस (किंवा चवी म्हणा हवं तर) असतात. मधुर (गोड), अम्ल (आंबट), लवण (खारट), कटु (तिखट), तिक्त (कडू), कषाय (तुरट) अशा सहा प्रकारच्या चवी किंवा रस आयुर्वेदाने मान्य केले आहेत. त्यांपैकी तब्बल पांच रस आवळा आणि लसूण यात असतात. त्यामुळेच रसायन म्हणजे माणसाला तरुण ठेवणाऱ्या औषधांमध्ये त्यांचे स्थान वरचे आहे. तारुण्य तेव्हाच टिकून राहील, जेव्हा काही आजार न होता सातही धातू उत्कृष्ट स्थितीत असतील. रसायन द्रव्ये हेच कार्य करीत असतात. लसूणही कफ वात शामक असल्याने हृदयास कफावरोधजनित वेदनांपासून दूर ठेवण्यास सक्षम आहे.

लिंबूरस प्राधान्याने अम्लरसात्मक असून उत्कृष्ट पाचक कार्य करणारा आहे.

वरील फॉर्मुल्यात वापरलेले सफरचंदाचे व्हिनेगर हे base म्हणून कदाचित वापरलेले असावे. सफरचंद हे कफकर असले तरी व्हिनेगरचे गुणकार्य थोडे वेगळे असणार आहेत. कुठल्याही पदार्थावर संस्कार किंवा प्रक्रिया केली असता त्याच्या गुणांमध्ये बदल होत असतात. लसूण आल्याच्या रसाने होऊ शकणारा पित्तप्रकोप त्याने टाळला जाऊ शकत असेल कदाचित.

असो. प्रत्येक वस्तूचे शरीरावर ढोबळमानाने होणारे परिणाम लक्षात घेता उपरोक्त फॉर्म्युला उपयुक्त असू शकेल असे मानण्यास हरकत नाही.

मात्र आयुर्वेदात एकच एक उपाय सरसकट सर्वांना सारखाच उपयुक्त ठरेल असे नसते. रुग्णाची प्रकृति, वय, बल, तो करीत असलेला व्यवसाय आणि तो राहत असलेले ठिकाण तसेच ऋतुमान या सर्वांचा विचार औषध ठरविताना करावा लागतो. या अनुषंगाने वरील मिश्रण हे कफ वात प्रकृतीच्या रुग्णांना विशेष उपयुक्त ठरू शकेल. त्याबरोबरच वैद्यांकडून वैयक्तिक पातळीवर उपदेशित पथ्यापथ्य आणि अन्य औषधं ही महत्त्वाची असतील. विषय हृदयाचा असल्यामुळे वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक. वरील उपाय घरीच करीत राहून केवळ त्यावर विसंबून राहून चालणार नाही. सतत सु-शिक्षित वैद्य किंवा डॉक्टरांच्या संपर्कात राहून प्रकृतीत होणारे बदल लक्षात घेत सावधगिरीने असे उपाय करू त्यांचे लाभ मिळविणे श्रेयस्कर असते. आजाराची गंभीरता - साध्यासाध्यता ही तज्ञासच समजू शकते. त्यामुळे संपर्कात राहून प्रयोग करणे हितकर ! कारण हृदय सद्य प्राणहर प्रकारचे मर्म आहे, हे विसरून चालणार नाही !!

आपल्या शंकेचे समाधान झाले असावे, ही अपेक्षा व्यक्त करतो.

धन्यवाद !!

*वैद्य - दीपक शिरूडे*
    जळगांव ४२५००२
      ९४०३५८७८७९

🐢🐢🐢🐢🐢🐢🐢

No comments:

Post a Comment

Visit Our Page