Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Saturday, March 19, 2016

सुरक्षित मातृत्व : गर्भिणी परिचर्या

सुरक्षित मातृत्व : गर्भिणी परिचर्या
गर्भवती स्त्री ज्या वातावरणात राहते, जो आहार घेते, त्या काळात ती ज्या ताणतणावातून जात असते, जी औषधे घेते ह्या सगळ्यांचे बरे-वाईट परिणाम होणाऱ्या बाळावर होत असतात. हे परिणाम कधी जन्मतःच दिसून येतात. तर कधी त्याच्या भविष्याच्या आजारातून ते प्रकट होतात. अनेकविध लढाया लढत बाळाला जन्माला घालण्याचे दिव्य माता करत असते तेव्हा गर्भधारणेच्या काळात मातेने स्वत:ला कसे जपायला पाहिजे ह्याचा विचार तिच्या कुटुंबाने करायला हवा. तरच श्रेष्ठ बालक जन्माला येऊन माता-पित्याचे सार्थक करेल व माता पित्याच्या आनंदाचे कारण होईल. कवी कुसुमाग्रजांच्य
ा कवितेत बदल करून म्हणावेसे वाटते की, “मातेच्या गर्भात उद्याचा, उज्ज्वल उष:काल”
माता पित्यांनी अपत्य निर्मितीच्या घटनेचा अर्थ समजून घेतला पाहिजे. धर्मशील आणि असामान्य अपत्य प्राप्तीसाठी पति-पत्नीने एकमेकांत तदात्म पावण्याच्या क्षणी तद्रूपता अनिवार्य असते. माता पित्याने गर्भनिर्मितीच्य
ा वेळी मिलनासाठी केवळ ‘शारीरिक सज्जतेचा’ नव्हे तर, ‘मानसिक सायुज्याचा’ क्षण हा विचार करावा. गर्भधारणेपासून मूल होईपर्यंत आई-वडिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो.
प्रसन्नतेने, आनंदाने केलेले भोजन देहाच्या कोषाची वृद्धी करते, पण असंतोषाने पंच पक्वान्नाचे केलेले भोजन मनामध्ये असंतोष निर्माण करते. म्हणून मातेने गर्भावस्थेत आपल्या आहाराकडे अधिक लक्ष द्यावे. आहाराबरोबरच गर्भवतीचा विहार, दैनंदिन जीवनशैली, मनाची प्रसन्नता यांनाही विशेष महत्त्व आहे.
पूर्वीच्या काळी जनजीवन निसर्गाशी एकरूप होते. त्यामुळे स्त्री पुरुष सर्वसाधारणपणे निसर्गाशी लयबद्ध जीवन व्यतीत करीत होते. त्यामुळे सुप्रजजननासाठी वेगळ्या मार्गदर्शनाची गरज नव्हती. परंतु अलीकडे विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे व्यक्तीनिष्ठ जगण्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. इसवी सनापूर्वी महर्षी चरक यांनी गर्भिणी परिचर्येला महत्त्व दिले आहे. गर्भिणी परिचर्येमुळे उत्तम रोगप्रतिकारक शक्ति निर्माण होऊन सद्गुणी व मेधावी अपत्य प्राप्ती होते. श्रेयेसी व मनोवांच्छित प्रजोत्पादनाचे हे मूळ रहस्य आहे.
सुरक्षित मातृत्वासाठी जगातील पाच देश सर्वोत्तम आहेत. त्यात डेन्मार्क, स्वीडन, नॉर्वे, आइज्लँड, वॉशिंग्टन व युरोपीय देशाचा समावेश आहे. आफ्रिका हा देश सुरक्षित मातृत्वासाठी अत्यंत धोकादायक आहे. मनुष्य जीवनाला एक निश्चित अर्थ व प्रयोजन प्राप्त होण्यासाठी प्रत्येक गरोदर स्त्रीने गर्भिणी परिचर्येचे पालन करणे अत्यावश्यक आहे. केवळ गर्भवती झाल्यावर योगायोगाने जन्माला आलेले बालक म्हणजे संतती ह्याउलट योग्य परिचर्या पालन केल्यानंतर निर्माण होणारे बालक ह्यास ‘श्रेयसी बालक’ म्हणावे किंवा ‘चरकाचार्यांची श्रेयसी प्रजा’ अशी माझी धारणा आहे. प्रजजन ही बाब नैसर्गिक नसून मैथुन हा मजेचा विषय नाही. श्रेयसी प्रजेचे स्वप्न उभयतांनी पाहून मग संततीप्राप्तीचा संकल्प करावा हा ह्या लेखाचा उद्देश आहे. गर्भिणी परिचर्येतील महत्त्वाच्या विषयावर ह्या लेखात प्रकाश टाकला जाईल.
गर्भिणी आहाराबद्दल ह्यापूर्वी दोन लेखांमध्ये सविस्तर मार्गदर्शन केल्याचे आठवत असेलच. सुप्रजजननासाठी गर्भवती स्त्रीच्या जीवनशैलीचे नियोजन असणे आवश्यक आहे. ह्यामध्ये सामान्य दिनचर्या, ऋतुचर्या अंतर्भुत आहे. परिचर्येची सुरुवात ब्राह्म मुहूर्तापासून अपेक्षित आहे. कारण ह्या काळात विविध प्रकारचे उपयुक्त संप्रेरके शरीरामध्ये निर्माण होत असतात. आयुर्वेद तज्ञांनी गर्भ गर्भाशयात २८० दिवस म्हणजे १० महिने कसा वाढतो ह्या संदर्भातील विविचेन केलेले आहे. गर्भपोषण आणि मातृपोषण हा परिचर्येचा गाभा आहे. गर्भिणी परिचर्येत वापरण्यात येणाऱ्या औषधींमुळे १० महिन्यांच्या काळात कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. व वारंवार होणारे गर्भपात गर्भिणी शोथासारखे त्रास सुध्दा परिचर्येमुळे आटोक्यात आले आहेत. गर्भ विकासासाठी १० महिन्याच्या औषधोपचार संकल्प पहिल्या महिन्यांपासून केल्यास गर्भाचे योग्य पोषण होऊन गर्भिणीचे बल टिकून राहते.
प्रथम आपण महर्षी चरक व आचार्य सुश्रुत यांच्या परिचर्येचा संक्षिप्त मागोवा घेऊ.
१) पहिल्या महिन्यामध्ये देशी गायीचे ताजे दूध व मधुर, शीत द्रव आहार घ्यावा. ह्यामध्ये गव्हाची गरम पोळी, दूध, साजूक तूप, भाज्या घातलेला पराठा, शिरा, कणिक किंवा नारळ घातलेल्या करंज्या असा आहार घ्यावा.
२) मधुर औषधांनी सिद्ध केलेले देशी गायीचे दूध प्यावे. वात दोषांचा प्रकोप करणारा आहार (वांगी, मोड आलेली कडधान्ये, बटाटे इ.) घेऊ नये.
३) आहारामध्ये दूध, तूप, मध, लोणी, साखर यांचा समावेश करावा. तिसऱ्या महिन्यापासून सहावा महिना पूर्ण होईपर्यंत गर्भिणीस हेमप्राश ६ थेंब रोज सकाळी द्यावेत. ह्याने गर्भाच्या ज्ञानेन्द्रियांची क्षमता व बालकाची रोगप्रतिकार क्षमता वाढते.
४) लोणी, दुधाचे पदार्थ व ताजे दही – भात खाण्यास हरकत नाही. देशी गायीच्या दुधापासून काढलेले लोणी शक्य झाल्यास खावे. जर्सी गायीचे दूध व त्यापासून केलेले पदार्थ योग्य नाहीत. ह्या काळात डाळिंब हृदयाला पोषक असल्यामुळे तसेच अग्निदीपक असल्यामुळे हितकर आहे.
५) “पंचमे मनः प्रतिबुद्धतरं भवति ||” पाचव्या महिन्यात बीजरूप मनाचे व्यक्तीकरण होते. रक्त धातू, मांस धातू पुष्ट होतात. त्यामुळे दूध, तुपाचा वापर बंद करू नये. विशेषतः स्त्रिया दूध, तूप सेवनास राजी नसतात. त्यामुळे आचार्यांनी ह्यावर भर दिलेला दिसतो.
६) “षष्ठे बुद्धी: ||” बुद्धीच्या विकासासाठी सहाव्या महिन्यात औषधी सिद्ध दूध, गोक्षुर सिद्ध तूप, मुगाचे कढण हमखास वापरावे.
७) “सप्तमे सर्वांग प्रत्यंग विभाग: ||” मधुर औषधी सिद्ध दूध, तूप तसेच भोजनामध्ये पहिला घास साजूक तूप व भाताचा असावा. ह्या महिन्यात स्तनाग्रास तेल लावून स्तनाग्रे बाहेर हळूहळू ओढवीत. योनिभागी तिळाच्या तेलाने तर्जनीद्वारे अभ्यंग करावा. ह्या महिन्यात लघवीला आग व जळजळ होऊन संसर्ग होण्याची शक्यता असते म्हणून मीठ कमी खावे. औषधी गर्भसंस्कार संचात वर्णित औषधांच्या जोडीला मज्जाधातू पोषक औषधे वापरण्यास हरकत नाही. अस्थि पोषणासाठी शतावरी, गुळवेल, शुंठी, चंदन सुध्दा मी वापरत असतो.
८) “अष्टमे अस्थिरी भवति ओज: ||” मुगाचे कढण दूध तुपासह तसेच आस्थापन अनुवासन बस्तीचा वापर तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करावा. सुप्रसव तेलाचा पिचुधारण प्रयोग दररोज रात्री प्रसूतीच्या दिवसापर्यंत करावा. निर्जंतुक केलेल्या कापसाचा पिचु योनीमार्गात ठेऊन सकाळी काढून टाकावा. ह्याने प्रसवमार्गात स्निग्धता निर्माण होते, स्नायूंची लवचिकता सुधारते, मार्ग निर्जंतुक राहतो व प्रसूती अगदी सहज सुलभ होते.
९) “नवम दशम एकादश द्वाद्शानाम् अन्यतम् जायते | अतो अन्यथा विकारी भवति ||” नवव्या महिन्यात गर्भ सर्वांग प्रत्यंगांनी युक्त होतो. योग्य विल पाहून मग सुतिकागार प्रवेश अर्थात रुग्णालयामध्ये प्रवेशित करावे.
१०) “नवमे विविधान्नानि दशमे....|” दहावा महिना बालकाच्या आगमनाची चाहूल लावणारा असतो. ह्या महिन्यात उपरोक्त आहार तसाच चालू ठेवावा. ह्या महिन्यात आचार्यांनी विविध अन्न सेवन करण्यास सांगितले आहे. ह्यामध्ये दूध, तूप, इ. नी युक्त आहार सेवन करावा.
११) प्रसूतीनंतर बाळंतिणीने किमान २ ते ३ महिने सूतिकाभ्यंग तेलाने दररोज स्नानापूर्वी अभ्यंग करावे. गर्भावस्थेत व प्रसूतीदरम्यान पडलेला ताण व धातूंची झीज ह्या अभ्यंगाने लवकर भरून निघते.
योगासने व गर्भिणी परिचर्या
तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास व प्राणायाम करावा.
१) पहिल्या तिमाहीतील योगासने - वज्रासन, सिद्धासन, सुखासन, कटिचक्राचसन
२) दुसऱ्या तिमाहीतील योगासने - भद्रासन, मार्जारासन, ताडासन, त्राटक
३) तिसऱ्या तिमाहीतील योगासने - पर्वतासन, प्राणायाम – शीतली, सित्कारी, भ्रामरी
आचार विषयक नियम – (काय करू नये)
१) भूक नसताना जेऊ नये. नाहक उपवास करू नये. गर्भाची वाढ मातेच्या अन्नग्रहणातून होत असते हे विसरू नये.
२) पंचकर्म करू नये.
३) रात्रीचे जागरण टाळावे.
४) बॅडमिंटन, धावणे, कब्बडी, खो-खो तसेच घरामध्ये धावपळ करू नये.
५) प्रवास टाळावा.
६) शक्यतो शारीरिक संबध टाळावा.
काय करावे –
१) कोमट पाण्याने नियमित स्नान करावे.
२) अवस्थेस अनुसरून सैल व सूती कपडे घालावेत.
३) झोपण्यास व बसण्यासाठी अधिक उंच नसलेली बैठक किंवा शय्या असावी.
४) मन प्रसन्न ठेवावे. सभोवतालचे वातावरण प्रसन्न राहण्यासाठी घरामध्ये निसर्ग चित्रे व बालकांची चित्रे लावावीत. विनोदी पुस्तके, नाटके पाहण्यास हरकत नाही.
५) कार्यालीन कामे नियोजनपूर्वक करावी. वरिष्ठांशी वाद टाळावा.
६) सकारात्मक जीवनशैली अंगिकारावी.
गर्भवतीसाठी संगीत –
संगीत तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अहिरभैरव, कलावती, दीपक, पुरिया, दरबारी कानडा हे राग ऐकावेत. ह्या रागांवर आधारित गाणी गर्भपोषणासाठी व मनः स्वास्थ्यासाठी उपयुक्त ठरतात.
पित्याचा सहभाग
‘पितृत्व’ हे पण स्त्री मुळे मिळालेलं वरदान आहे. त्यामुळे पतीने गरोदरपणात पत्नीची साथ द्यावी. गर्भाची होणारी वाढ, बाळाचे वजन व प्राथमिक ज्ञान पित्याला असावे. बलाचा ७०% विकास गर्भावस्थेत होत असतो म्हणून भावी पित्याने गर्भवतीच्या आहाराकडे लक्ष द्यावे व तिच्या मनाचा विचार करा.
गर्भाधारणेपूर्वी तज्ञांकडून पंचकर्म उपचार करून घ्यावा.
स्त्री व पुरुषाची शरीरशुद्धी करून जनुकातील विकृतीची तीव्रता कमी करता येते. आनुवंशिकता सर्वसाधारणपणे डी.एन.ए. मुळे ठरवली जाते. डी.एन.ए. ची रचना बदलता येत नाही परंतु गर्भवतीचा आहार, मानसिक ताणतणाव, प्रदूषण, पर्यावरण इ. चा जनुकावर ठसा उमटतो आणि त्याची अभिव्यक्ती बदलते. हे जनुकीय बदल पुढच्या अनेक पिढ्यांमध्ये आनुवंशिकतेने धारण केले जातात. वाढणारा गर्भ आपल्या पोषणासाठी सर्वस्वी आईवरच अवलंबून असतो. तिच्याकडून पुरेसे पोषण मिळाले नाही तर अवयवांचे पोषण नीट होत नाही. गर्भास आहार न मिळाल्यामुळे गर्भाच्या वाढीसाठी लागणारी संप्रेरके व त्यांचा स्त्राव कमी होतो हे गरोदर उंदराच्या मादीवर प्रयोग करून सिद्ध झाले आहे. गरोदर उंदराच्या मादीला फॉलिक अॅसिड व व्हिटामिन B12 युक्त आहार दिला. तेव्हा तिला निरोगी पिल्ले झाली. दुसऱ्या मादीला अशाप्रकारचा आहार दिला नाही. तिला पिवळसर बारीक पिल्ले झाली. ह्याचाच अर्थ आहाराचा परिणाम गर्भस्थ बालकावर होतो. १९४४ – ४५ साली हॉलंडमध्ये दुष्काळ होता. तेथील गर्भवती स्त्रियांवर त्याचा परिणाम होऊन त्यांच्या बाळांना मधुमेहाचे प्रमाण दिसून आले, तसेच आहाराचा परिणाम मेंदूतील हायपोथॅलॅमिक ग्रंथीवर होऊन भूक नियंत्रणामध्ये फरक पडला आणि ही मुले तारूण्यामध्ये खुप लठ्ठ झाली. गरोदर मातेने कोकेन किंवा फेनिटॉईन सारखी औषधे घेतल्यास ह्याचा परिणाम गर्भावर होतो व बालपणी ल्युकेमिआ, मेंदूचा कर्करोग होण्याची शक्यता असते. अशा मुलांना पुढे सिझोफ्रेनियासारख्या आजारांना तोंड द्यावे लागते. गोरोदर माता मानसिक तणावाखाली असेल तर अॅड्रिनॅलिन, ऑक्सिटोसिन इ. हॅार्मोन्स तयार होतात. परिणामी बाळाच्या हृदयाचे ठोके वाढतात. भविष्यात अशा बाळांना मानसिक व्याधीला सामोरे जावे लागते. म्हणून पतीने आपल्या गरोदर पत्नीस प्रसन्न ठेवावे.
लेखक – प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति
सहयोगी प्राध्यापक, पोदार वैद्यक महाविद्यालय व रुग्णालय, वरळी, मुंबई
भ्रमणध्वनी - +917738086299/ +919829686299
ईमेल – subhashmarlewar@gmail.com
वैद्य संतोष जळूकर
संचालक – अक्षय फार्मा रेमेडीज (इंडिया) प्रा. लि.
मुंबई
भ्रमणध्वनी - +917208777773
ईमेल – drjalukar@akshaypharma.com

No comments:

Post a Comment

Visit Our Page