Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Tuesday, March 8, 2016

स्त्री स्वास्थ्यरक्षण विशेष

स्त्री स्वास्थ्यरक्षण विशेष -
स्त्रियांच्या अवयवांमध्ये त्र्यावर्तचा म्हणजे बाह्ययोनि, गर्भाशयमुख, गर्भाशय, आर्तववाहिन्या, बीजांड ह्यांचा समावेश होतो. साधारणपणे मुठीच्या आकाराचा ओटीपोटामध्ये असलेला गर्भाशय हा अवयव असतो. त्याचे तोंड योनीमध्ये उघडते. स्त्रियांचे बहुतांश आजार त्र्यावर्ता योनीशी संबंधित असतात. महर्षी चाराकांनी “योनिव्यापद्” ह्या नावाने चरकसंहितेत ह्याची चर्चा केली आहे.
पाळी अनियमित येणे, पाळीमध्ये रक्तस्राव होणे, पाळी २-२ महिने न येणे, बीजांडामध्ये गाठी होणे, बाळ न होणे, मासिक पाळीमध्ये पोट दुखणे, वारंवार मूत्रप्रवृत्ती होणे, गर्भाशय – योनि खाली सरकणे, रजोनिवृत्ती, श्वेतप्रदर, रक्तप्रदर अशा अनेक प्रकारच्या समस्यांना स्त्रियांना सामोरे जावे लागते. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ह्यावर आपण चर्चा करणार आहोत.
स्त्री स्वास्थ्यासाठी सर्व महिलांना आरोग्यपूर्ण शुभेच्छा.........
1. मासिक पाळीपूर्व तणाव –
अनेक स्त्रियांमध्ये मासिकपाळीपूर्वी पोटात दुखणे, मळमळ, उलटी होणे, डोके दुखणे अशा तक्रारी पहावयास मिळतात. मलबद्धता, स्तन दुखणे ह्या तक्रारींशिवाय चिडचिडेपणा, राग येणे, छोटी गोष्ट मनाला लावून घेऊन रडणे इ प्रकार होतात. वास्तविक गर्भाशयाचे कार्य व मनोव्यापार ह्यांचा परस्पर संबंध आहे. पाळी चालू होण्यापूर्वी ४-५ दिवस अदोदर ह्या तक्रारींना सुरुवात होते. एकदा मासिक रजःप्रवृत्ती झाली की ह्या तक्रारी दूर होतात.
असे का होते?
ह्याचे निश्चित कारण स्पष्ट करता येत नसेल तरी अंतर्स्रावातील बदलामुळे किंवा जीवनसत्वाच्या अभावी असे होत असावे. बीजप्रसावामुळे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन पातळीमध्ये होणाऱ्या बदलामुळे असे होत असावे. पायरीडॉक्सीन आणि इफा (इसेन्शियल फॅटी अॅसिड) कमतरतेमुळे पाळीपूर्वी पोटात दुखते. बदलत्या जीवनशैलीमुळे फास्टफूडचा वापर जास्त प्रमाणात होतो. परिणामी असे होत असावे.
2. अनियमित मासिक पाळी –
मासिक पाळी २१ दिवसांच्या आत व दीड महिन्यापेक्षा उशिरा येत असल्यास बरोबर नाही. बीजविमोचानाची क्रिया होत नसल्यामुळे हे घडत असते. नियमित पाळीमध्ये रजःस्राव ४ ते ५ दिवस असतो. काही स्त्रियांना स्राव २ दिवस तर काहींना ७ दिवसांपर्यंत राहतो. रक्तस्राव ८ अंजली म्हणजे ८० ते १०० मिली असतो.
अनियमितता का होते?
मुलगी वयात येतांना व ऋतुमती झाल्यावर पहिले २ वर्ष पाळी अनियमित असते. अबीजप्रसवी पाळीत सुद्धा अनियमितता आढळते.
रक्त गोठण्याची प्रक्रिया, गर्भाशय अंतःस्तर जाड होणे, जंतुसंसर्ग, गर्भपात, स्राव, गर्भाशय मुखाचा कर्करोग, गर्भाशयात गाठी होणे, कॉपर टी, पांडुरोग ह्यामुळे सुद्धा अनियमित पाळी असते.
3. गर्भाशयात गाठी होणे –
अविवाहित स्त्रिया, वंध्यत्वाने पिडीत स्त्रिया एखादेच मूल असणाऱ्या बायका ह्यांना गर्भाशयात गाठी होऊ शकतात.
अबीजप्रसवी पाळीत इस्ट्रोजेनचा प्रभाव प्रोजेस्टेरॉनपेक्षा जास्त असतो. अशा स्त्रियांमध्ये गाठी तयार होण्याची प्रवृत्ती अधिक असते. शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात असतांना विविध प्रकारचे २० किलो वजनाचे फायब्रॉइड असलेली एकच स्त्री मी पहिली. नांदेड येथे डॉ. सुनील कदम, डॉ. नरेंद्र भंगाळे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया झाल्याचे मला आठवते. सोनोग्राफीमुळे ह्याचे निदान आता सोपे झाले आहे.
अगदी क्वचित प्रसंगी गाठीचे रुपांतर कर्करोगात होते. परंतु बऱ्याच वेळी ह्या गाठी सध्या असतात. त्यांची वाढ होत नसेल तर शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही. मिलिमीटरमध्ये असणाऱ्या गाठी आयुर्वेदोपचाराने कमी हतात. रजोनिवृत्तीनंतर अशा गाठी आकसून जातात.
4. पॉलिसिस्टिक ओव्हरी –
स्त्रीबीजकोशामध्ये साबुदाण्याच्या आकाराच्या फोलिकल आढळल्यास त्यास PCOS म्हणतात. बदलत्या जीवनशैलीमुळे हे होत असून ह्या संदर्भातील माहिती आपण वाचली असेल. तरीही अनुवंशिकता, गुणसूत्रबदल, चिंता – ताण – तणाव, स्पर्धात्मक युग, प्रदूषण इ बाबींचा विचार ह्यात करता येतो. उपाय न केल्यास मधुमेह, स्थूलता, अतिरक्तदाब, क्वचित वेळा गर्भाशय अंतःस्तराच्या कर्करोगाची शक्यता असते.
5. श्वेतप्रदर
धुपणी, पांढरे जाणे, अंगावर जाणे अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन स्त्रया येत असतात. ट्रायकोमोनास फंगस आणि बॅक्टेरियामुळे हा त्रास होतो. गुदमार्ग स्वच्छ असावा. मूत्रमार्ग – योनीमार्ग जवळ असल्याने रोगजंतूंचा प्रवेश योनीमार्गात होऊ शकतो. संभोग, अस्वच्छता, मधुमेह ह्यामध्ये हा त्रास होऊ शकतो.
रजोनिवृत्ती नंतर हा त्रास झाल्यास योनिपरीक्षण करून घ्यावे व पॅपस्मियर टेस्ट करून घ्यावी. योनि ओलसर राहण्यासाठी निसर्गतःच योनीमध्ये स्राव असतो. त्यास दुर्गंध नसल्यास व लक्षणे नसल्यास घाबरून जाऊ नये.
6. अंग बाहेर येणे –
काहीतरी बाहेर येणे, थेंबथेंब लघवी होणे, खोकल्यावर लघवी होणे, ओटीपोटात दुखणे, कपडे दुर्गंधित होणे अशा तक्रारी घेऊन जेव्हां स्त्रिया येतात तेव्हां हमखास गर्भाशय, मूत्राशय खाली आला आहे असे समजावे. अशा तक्रारी बायका अनेक वर्ष अंगावर काढतात. हा प्रकार कोणत्याही स्त्रीला होऊ शकतो. गर्भाशयाला आधार देणाऱ्या पेशी अशक्त झाल्यास असे होते. तीन पेक्षा जास्त बाळंतपणे, वारंवार गर्भपात, प्रवाहिका, मलबद्धता ह्यामुळे अंग बाहेर येऊ शकते. ह्यात योनीमार्गे गर्भाशय काढण्याचे शस्त्रकर्म करणे चांगले. सुरुवातीच्या काळात आयुर्वेदिक उपचार, योग, व्यायाम ह्यामुळे फरक पडू शकतो.
7. स्तनाचे विकार –
स्तनाच्या ठिकाणी गाठ असणे, सूज येणे, आकार बदलणे, स्तनाग्रातून स्राव येणे, स्तनाग्र आत ओढल्यासारखी होणे, दोन स्तनांमध्ये फरक जाणवणे, पाळीपूर्वी स्तनात दुखणे ह्या तक्रारींमध्ये मॅमोग्राफी तपासणी करावी. स्वतः तपासण्याची सवय लाऊन घ्यावी (स्वयं-स्तनपरीक्षण), उतीची परीक्षा, जागरुकता, ह्यामुळे पुढील धोके टाळता येतात.
8. हाडांचे विकार – अतिरक्तदाब
अतिरक्तदाब, हाडांचा ठिसूळपणा हा स्त्रियांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. आहाराकडे दुर्लक्ष, व्यायामाचा अभाव, शरीराची अयोग्य ठेवण, जमिनीवर बसण्याची सवय मोडल्यामुळे कॅल्शियमचा अभाव, बैठ्या जीवनशैलीमुळे हाडे दुखतात. पाठीला बाक येतो, उंची कमी होते, पाठीचा कणा – मनगट ह्यात थोडीशी दुखापत झाली की हाड तुटते. बोन डेन्सिटी तपासल्याने हे निदान होऊ शकते. हा आजार कित्येक दिवस दबा धरून बसत असल्याने त्यास सायलेंट किलर म्हणतात.
रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा, चिंता, मधुमेह ह्यामुळे अतिरक्तदाब आढळतो.
9. स्थूलता -
स्त्रियांनी नियमित दिनचर्या, व्यायाम करत आपली फिगर मेंटेन करावी. स्त्रियांच्या कमरेचा घेर ८८ सेंटीमीटरपेक्षा कमी असावा. BMI हा १८ ते २४ असावा.
10. कंबरदुखी –
वारंवार होणारे गर्भपात, बाळंतपण, कमकुवत स्नायु, पाठीचे माणके सरकणे, कॅल्शिय कमी होणे, लठ्ठपणा, पोट सुटणे, तळपाय सपाट असणे, पादत्राणाचा अयोग्य उपयोग, कॉम्प्यूटरचा वापर, उंच टाचांच्या चपला वापरणे ह्यामुळे कंबरदुखी होऊ शकते. मुलींना पाळीच्या अगोदर १-२ दिवस कंबरेचा त्रास होतो.
11. स्त्रियांना दाढी फुटणे –
मुलीच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन निर्मितीमुळे ही समस्या उद्भवते. हिरसुटीझम नावाने ही समस्या परिचित आहे. शरीराच्या विविध भागात केस वाढल्यास तपासणी करून निदान करता येते. अन्तःस्रावी ग्रंथींचे तज्ञ (एन्डोक्रायनोलॉजिस्ट) ह्यावर उपचार करतात. लेझर, ब्लीचिंग, फेशियल, व्हॅक्सिंग इ. मुळे ह्या समस्येवर बाह्यरूपाने मात करता येते.
12. रजोनिवृत्ती –
मासिकपाळी कायमची बंद होणे म्हणजे रजोनिवृत्ती. बीजकोष अकार्यक्षम झाल्यामुळे ही अवस्था येते. शुक्रधातु क्षीणता व क्षीणतेमुळे होणारी धातु विकृती, त्यामुळे चिडचिडेपणा, हाडे पोकळ होणे, केस गळणे, अंग रूक्ष होणे, झोप नीट न येणे, आवाज सहन न होणे, मलावरोध, पोट फुगणे, थकवा जाणवणे अशी लक्षणे होतात.
उपयुक्त औषधे –
1) अश्वगंधा, गोखरु, कवचबीज, शतावरी सिद्ध दूध किंवा काढा तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापरावा.
2) वसंतकुसुमाकर, पुष्पधन्वा, अशोकारिष्ट
3) चंदनबलालाक्षादि तैलाभ्यंग
4) फलमाह वटी, वृष्यवटी, च्यवनप्राश
5) रसधातुपाचक व शुक्रपोषक औषधे – अश्वगंधा, यष्टिमधु, कोहळा, शतावरी
6) औषधी गर्भसंस्कार संचातील औषधे तज्ञांच्या सल्ल्याने घ्यावीत
योनिधावनासाठी – त्रिफळा, हळद, कडुनिंब, चंदन काढा वापरावा. करंज तेल, बला तेल, जात्यादि तेल शतधौतघृत ह्यापैकी प्रकृतीनुसार वापर करावा.
वर्णन केलेल्या आजारांव्यतिरिक्त अनेक समस्या महिलांमध्ये आढळतात. त्यांची करणे शोधून चिकित्सा केल्याने पुढे होणारी गुंतागुंत टाळता येते. स्त्री शरीर म्हणजे निसर्गाने निर्माण केलेला एक चमत्कार आहे. जैविकदृष्ट्या स्त्री सबल असून कुटुंबाची जबाबदारी पेलण्याची विलक्षण शक्ती तिच्या अंगी आहे. आधुनिक युगात वावरतांना तिची खूप दमछाक होते. पण ती पेलण्याची क्षमता तिच्यात असतेच असे नाही. तिच्या भावनांना आदर द्यावा. स्त्री ही आदिशक्ती आहे. तिला शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्य लाभो ही जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अपेक्षा.
सर्वे भवन्तु सुखिनः l
लेखक –
प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति,
सहयोगी प्राध्यापक,
स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग,
रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय
मुंबई ४०० ०१८
+917738086299
+919819686299
subhashmarlewar@gmail.com
वैद्य हर्षदा कुलकर्णी
एम. एस. (स्त्रीरोग) स्कॉलर

No comments:

Post a Comment

Visit Our Page