Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Saturday, September 17, 2016

चाई पडणे

चाई पडणे
चाई पडणे तर आयुर्वेद शास्त्रात ‘इंद्रलुप्त’ असे म्हणतात.

आजकाल केसांच्या तक्रारी फारच वाढू लागल्या आहेत. त्यात चाई पडणे म्हणजे डोक्यावर अचानक एखाद्या ठिकाणी साधारण एक रुपयाच्या आकाराचा गोल चट्टा पडतो. त्यातील सर्व केस गळून गेलेले असतात. यास व्यवहारात चावी लागणे, चाई पडणे तर आयुर्वेद शास्त्रात ‘इंद्रलुप्त’ असे म्हणतात. याचे ढोबळमानाने दोन प्रकार केले जातात. एकात फक्त त्या ठिकाणचे केस जातात, तर दुसऱ्या प्रकारात केसांच्या मुळाखालील त्वचेत खड्डा पडलेला असतो. पहिला प्रकार बरा करायला सोपा आहे, तर खड्डा पडलेला असल्यास तो प्रकार लवकर बरा होत नाही. ही चाई शरीराच्या वेगवेगळ्या भागांवरही पडू शकते, त्यामुळे काहींना ती डोक्यावर, दाढी, मिशा किंवा सर्वागावर कुठेही आढळते. गंमत म्हणजे या प्रत्येक प्रकारात त्याचे निदान बदलते, कारण सगळे केस हे एकसारखे वाटत असले तरी त्यांचा संबंध आपल्या शरीरातील वेगवेगळ्या सप्तधातूंशी आलेला असतो. उदाहरणार्थ, सर्वागावरील केस हे लोम प्रकारात मोडतात व ते रस धातूशी संबंधित असतात. ते सुकुमार असतात. ते त्वचेत जास्त खोलवर असले व चमकदार असले की रक्ताशी संबंधित असतात व मांस धातूशी संबंधित केस मांस धातूच्या मार्गाप्रमाणे मार्गक्रमण करतात. त्यामुळे स्नेहन करतानासुद्धा अनुलोम, प्रतिलोम असे शब्द वापरले जातात. यांच्या गतीनुसार स्नेहनाची दिशा ठरवली जाते, तर शरीरात ज्या ठिकाणी मेद धातू अधिक असतो त्या ठिकाणी केस नेहमी कमी प्रमाणात पाहायला मिळतात. जसे की स्तनाचा, पोटाचा व मागचा बसण्याचा भाग. स्त्रियांमध्येसुद्धा मेद वाढू लागला, वजन वाढू लागले, की केस गळणे लगेच वाढते. अस्थी धातूचा आणि केसांचा तर जवळचा संबंध आहे, कारण आयुर्वेदानुसार अस्थीतूनच केसांची उत्पत्ती होते. म्हणून व्यवहारात अस्थिसार लोकांचे केस सुंदर व लांब पाहायला मिळतात. बऱ्याचदा हडकुळ्या असणाऱ्या या अस्थिसार स्त्रियांचे केस पाहा, ते लांबसडक व छान असतात. शुक्र धातूशी संबंधित केस हे शरीरात शुक्राची अभिव्यक्ती जाणवू लागली म्हणजे मुले वयात येऊ  लागली की व्यक्त होऊ लागतात. जसे दाढी, मिशाचे केस, काखेतील-जांघेतील केस. तसेच प्रत्येक केसाच्या पतनानंतर त्या ठिकाणी परत केस येण्याचे कामसुद्धा शुक्रधातूच करत असतो. म्हणून आजकाल ज्या मुलांमध्ये हस्तमैथुन, स्वप्नदोष अशा कारणांमुळे तरुण वयात टक्कल पडू लागले आहे त्यांना केस वाढविणाऱ्या औषधांबरोबरच शुक्रवृद्धीची औषधेपण वापरावी लागतात. तसेच याच काळात मुलींमध्ये पाळीच्या तक्रारी असल्यास चेहऱ्यावर अंगावर अनावश्यक लव वाढू लागते. केस गळणे, पिकणे वाढते यांमध्ये प्रथम मासिक पाळी सुधारल्याशिवाय त्यांच्या केसांच्या तक्रारींमध्ये काहीही फरक पडताना दिसत नाही. तसेच बालपणीचे केस, तरुणपणीचे केस आणि म्हातारपणीचे केस वेगवेगळे असतात. म्हणजेच आपण पाहिलंत की, केसांच्या आजाराची कारणे प्रत्येक व्यक्तीनुसार, त्याच्या वयानुसार व धातूनुसार बदलत असतात. म्हणून केस गळणे, पिकणे अथवा अनावश्यक केस येणे, चाई पडणे, टक्कल पडणे अशा केसांच्या तक्रारी ऐकायला सोप्या वाटत असल्या तरी योग्य निदान करून चिकित्सा केल्याशिवाय बऱ्या होत नाहीत. नाही तर केसही जातात आणि पैसेही जातात. म्हणून तर केसांच्या एवढय़ा तेल, शाम्पू इत्यादींच्या जाहिराती व प्रॉडक्ट्स मुबलक असूनसुद्धा लोकांच्या तक्रारी काही कमी होत नाहीत. फक्त मीठ व लिंबू अनावश्यकपणे जास्त घेणे कमी केले तरी केसांच्या निम्म्या तक्रारी कमी होतात. अक्रोड, बदाम, मनुके, नारळाचे खोबरे केस वाढवायला मदत करतात, तर साधे जयपाल बी, गुंजा बी किंवा दगडीपाला चाईच्या ठिकाणी तीन दिवस चोळून लावलं तरी त्यातील पहिल्या प्रकारच्या चाईवर केस येतात. आपल्या केसांचे परीक्षण करून, आपली प्रकृती, आजार यानुसार विचार करून आयुर्वेद शास्त्रोक्त उपचार तुम्हाला गेलेले केससुद्धा परत आणून देऊ  शकतात. मग उगीच केशारोपण, सिलिकॉन हेअर, विग अशा कृत्रिम गोष्टींच्या मागे धावून नैसर्गिक सौंदर्य हरवून घेण्यात काय अर्थ आहे? लक्षात ठेवा वयोमानासुसार टक्कल पडणे हीसुद्धा प्रकृती आहे. कित्येक जणांना टक्कलसुद्धा छान दिसते. मात्र आपली मानसिकता आजार बरा करण्याऐवजी ती झाकण्याकडेच वाढू लागली आहे.. म्हणूनच आता म्हणावेसे वाटते- ‘विचार बदला.. डोके बदलेल.’

वैद्य हरीश पाटणकर
पुणे
harishpatankar@yahoo.co.in

No comments:

Post a Comment

Visit Our Page