Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Friday, September 16, 2016

#घरोघरी_आयुर्वेद

#घरोघरी_आयुर्वेद

संशोधने आणि त्यांचे अन्वयार्थ!!

'उच्च रक्तदाबावर टॉमेटो खाणे हे लाभदायी आहे'
असे एक संशोधन सांगते. असे कोणीही काहीही सांगितले की खात्री न करताच; आपल्याकडे धडाधड फॉरवर्ड करणाऱ्यांची कमतरता नाही. त्यातच अशी पोस्ट एका महनीय व्यक्तींच्या अधिकृत पेजवर दिसल्याने कुतूहल वाढले. या विषयी अधिक अभ्यास केल्यावर समोर आलेल्या बाबी मजेशीर होत्या.

ज्या संशोधनानुसार टोमॅटो हे उच्च रक्तदाबावर उपयुक्त आहेत असे सांगितले जाते त्यात लायकोपेन  या घटकाची भूमिका सगळ्यात महत्त्वाची मानली गेली. (वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने विचार करता; टॉमेटो हा लायकोपेनियासी नामक कुळातील आहे.) हे संशोधन भारतात झालेले नाही. त्यामुळे त्याची आपल्या देशातील उपयुक्तता साशंक आहे. शिवाय हे संशोधन टोमॅटोच्या नेमक्या कोणत्या प्रजातीवर झाले तसेच आपल्या देशात सध्या पिकणाऱ्या टॉमेटोच्या प्रजाती कोणत्या? यांची खातरजमा केलेली न करताच अशा पोस्ट्स पुढे पाठवल्या जात असल्याचे दिसून आले. आपल्याकडील टोमॅटोच्या कित्येक प्रजातींत लायकोपेनचे प्रमाण परदेशी प्रजातीच्या तुलनेत कमी आहे. या व्यतिरिक्त टॉमेटो हा भारतीय पदार्थ नाही हाही मुद्दा इथे महत्वाचा आहेच. एरव्ही स्वदेशी-विदेशी च्या नावाने टाहो फोडणारे लोक अशा पोस्ट्स प्रसवताना ही गोष्ट मात्र सोयीस्करपणे विसरतात; ही सखेद आश्चर्याची गोष्ट आहे.

असो; तर या संशोधनानुसार दिवसाला २०० ग्रॅम टॉमेटो; तोदेखील कच्चा खाल्यासच रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत 'होवू शकते' असा निष्कर्ष आहे. याचाच अर्थ असा की त्यापेक्षा कमी मात्रेत टोमॅटो खाणे हे रक्तदाब कमी करण्यास उपयुक्त ठरणारे नाही. विचार करा; २०० ग्रॅम कच्चा टोमॅटो म्हणजे जवळपास पाव किलो!! (आपल्या देशात ही मात्रा अधिक वाढेल.) किती रक्तदाबाचे रुग्ण तयार होतील या गोष्टीला? हा प्रकार म्हणजे रोगापेक्षा इलाज भयानक आहे. त्यातही केवळ सहा आठवडे हा प्रयोग झाला आहे. म्हणजे जेमतेम दोन महिने. सलग काही महिने/ वर्षे टॉमेटो सेवन केल्याचे तोटे काय असतील यावरचा अभ्यास?? यावर काही उत्तर नाही.

थोड्क्यात अशा संशोधनांना स्थळ-काळ यांनुसार प्रचंड मर्यादा असतात. त्यांवरून सरसकट निष्कर्ष काढून लोकांना 'आता हाणा टमाटे' अशा धर्तीवर सांगता येत नाहीत. विधीनिषेध समजावून घ्यावे लागतात. प्रकृती आदि घटकांचा विचार करावा लागतो. त्या त्या खाद्यपदार्थाचे गुणधर्म नीट लक्षात घ्यावे लागतात. उच्च रक्तदाब म्हणजे काही सर्दी खोकला नाही की घरबसल्या असले प्रयोग करून पाहता यावेत.

गुगलवर सहज ज्या विटा सापडतील त्यांवरून इमले बांधून पोस्ट प्रसवण्याचे उद्योग करणारे आणि विकीपीडियाला संदर्भ म्हणून नमूद करण्याचे हास्यास्पद उद्योग करणारे लोक जनतेची किती दिशाभूल करत आहेत आणि त्यांनी केलेली ही दिशाभूल किती महागात पडेल याचा डोळसपणे विचार करा. मागे एकदा 'जवस आणि गुडघेदुखी' या विषयीदेखील असेच डोळे उघडण्यास प्रवृत्त करणारे लिखाण केल्यावर राज्यभरातून आलेल्या फोनकॉल्सच्या संख्येवरून किती लोकांपर्यंत सोशल मीडिया या माध्यमातून पोहचून आपण जनजागृती करू शकतो याचा अंदाज मला आला. तशीच सजगता या निमित्ताने पुन्हा एकदा निर्माण व्हावी आणि उठसुट आल्या-गेल्या प्रत्येक संशोधनाचा अन्वयार्थ न लावताच त्याचा प्रचार प्रसार आपल्याकडून होऊन आरोग्याशी संबंधित असे गैरसमज पसरवण्यात आपण भागीदार होऊ नये इतकीच या निमित्ताने इच्छा!!

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

No comments:

Post a Comment

Visit Our Page