Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Thursday, September 15, 2016

#घरोघरी_आयुर्वेद

#घरोघरी_आयुर्वेद

आयुर्वेद आणि निसर्गोपचार.

सर्वप्रथम हे स्पष्ट करतो की या दोन्ही स्वतंत्र शाखा आहेत. कित्येकांना हे दोन्ही एकच असल्याचा गैरसमज असतो; प्रत्यक्षात तसे नाही. आयुर्वेदाचा नेमका उत्पत्ती काळ सांगणे अवघड असून त्याला अनादि मानले जाते. निसर्गोपचार हे नाव वापरण्यास सुरुवात झाली ती १८९५ साली. जॉन शील यांनी हे नाव सुचवले. जर्मन चर्चमध्ये पाद्री असलेल्या सेबेस्टीयन नेप यांनी बेनेडिक्ट लस्ट या आपल्या शिष्याला ही प्रणाली शिकवून अमेरिकेला पाठवून दिले. थोड्क्यात युरोप आणि अमेरिकेच्या अंगाखांद्यावर वाढलेली ही पद्धती आयुर्वेदाच्या तुलनेत अगदीच नवीन आहे. किंबहुना आयुर्वेदाचेच सिद्धांत पूर्णतः न अभ्यासल्याने काहीशा विपर्यस्त प्रमाणात जन्माला आली आहे असेही म्हणता येईल.

आपल्याला हे ठाऊक आहे का?

शरीरात विषारी पदार्थ जमले की रोग होतात असे ही शाखा सांगते. 'औषध' ही संकल्पना निसर्गोपचाराला अमान्य आहे. केवळ आहारात आवश्यक बदल करणे, उपवास, जलपान, सूर्यप्रकाश, रंग, चुंबक इत्यादींचा उपयोग या पद्धतीत केला जातो. आयुर्वेदासारख्या भारतीय शास्त्राला विरोध करणाऱ्या स्व. मोहनदास करमचंद गांधी यांनी या विदेशात जन्मलेल्या चिकित्सा पद्धतीबाबत मात्र विशेष आग्रह धरल्याने ही पद्धती भारतात रुजली. त्यांच्या मतानुसार रामनाम हा सर्वोत्तम निसर्गोपचार आहे!
(माहिती साभार: आयुष मंत्रालय, भारत सरकार)

आता काही महत्त्वाचे मुद्दे.

१. आयुर्वेद आणि निसर्गोपचार या दोन्ही भिन्न आणि स्वतंत्र शाखा आहेत; इतकेच नसून या दोन्हींचे मूलभूत सिद्धांत हे एकसारखे नाहीत. किंबहुना बहुतांशी परस्पर विरोधी आहेत. त्यामुळेच या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे उपचार म्हणून देण्याचा दावा करणे ही दिशाभूल आहे. (दुर्दैवाने आज आयुर्वेदाचे स्वयंघोषित प्रवक्ते हेच करत आहेत.)

२. निसर्गोपचार हे औषधे या संकल्पनेवरच विश्वास ठेवत नसल्याने; निसर्गोपचारतज्ञांनी कोणत्याही वैद्यकीय शाखेची औषधे सुचवणे ही त्यांनी स्वतःच्याच शास्त्राशी केलेली प्रतारणा आहे असे म्हणणे वावगे ठरू नये.

३. या शाखेचे भरण पोषण पाश्चात्य देशांत झालेले असल्याने सोडियम, पोटेशियम वा प्रोटिन्स, कार्बोहायट्रेटस् याच परिभाषेत आहाराचे गुणांकन केले जाते. आयुर्वेदानुसार असे मूल्यांकन होत नाही हा एक महत्वाचा मतांतराचा मुद्दा आहे.

४. निसर्गोपचार या क्षेत्रात भारतात BNYS हा ५ १/२ वर्षांचा पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम उपलब्ध असून या पदवीधरांना आयुर्वेद वा होमियोपॅथी यांच्या पदवीधरांप्रमाणेच मान्यता देण्यात आली आहे. मात्र असा अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारी केवळ १० महाविद्यालये सध्या भारतात आहेत.

५. थोड्क्यात; गल्लोगल्ली चालवले जाणारे निसर्गोपचाराचे डिप्लोमा हे 'आयुष मंत्रालय मान्यताप्राप्त' गटात बसत नाहीत. इतकेच नव्हे तर २०१४ साली माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महत्वपूर्ण निर्णयानुसार; असे डिप्लोमा केलेल्या व्यक्तीने नावाआधी 'डॉक्टर' लावण्यास परवानगी नसून; तसे आढळल्यास त्यांवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. सामान्य जनतेची दिशाभूल करण्यात येऊ नये याकरता हा निर्णय अतिशय महत्वपूर्ण आहे.

६. आधुनिक वैद्यकशास्त्राचे कित्येक चिकित्सक हे निसर्गोपचाराला शास्त्रदेखील मानत नाहीत. आयुर्वेदीय वैद्यांचे मात्र तसे मत नाही. आम्हाला निसर्गोपचार तज्ञांबद्दल संपूर्ण आदर आणि आत्मीयता आहे. मात्र; निसर्गोपचाराची आयुष मंत्रालय मान्यताप्राप्त रीतसर पूर्णवेळ पदवी घेतलेल्या सन्माननीय चिकित्सकांनीच तसे उपचार करावेत असे आमचे मत आहे. शिवाय तसे करताना; आपल्याच शास्त्राच्या सिद्धांतांना जागून आयुर्वेदादि अन्य कोणत्याही शास्त्रातील औषधी देऊ नयेत अशी माफक अपेक्षादेखील आहे.

अर्थात; ही अपेक्षा बहुतांशी पूर्ण होतेच. दुर्दैवाने काही स्वयंघोषित फोकंपंडित मात्र पुष्पौषधी, बाराक्षार, इलेट्रोहोमियोपॅथी अशा विविध गोष्टींत आपले हात आजमावत असताना एक ना धड भाराभर चिंध्या करून निसर्गोपचाराचे नाव घेऊन प्रत्यक्षात मात्र त्या शाखेच्या नावाला बट्टा लावत असतात.

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

Monday, September 12, 2016

#सामान्य_आयुर्वेद

#सामान्य_आयुर्वेद

#Diabetes

एक रुग्ण रिपोर्ट घेऊन आला आणि म्हणाला, मी तर बिलकुल एका जागेवर बसत नाही, आळशासारखा पडून रहात नाही. गाडीतून फिरत नाही, का दिवसा झोपत नाही. रोज सकाळी उठतो, कामाला चालत जातो, दिवसभर काम करतो, तरी मला मधुमेह कसा झाला?

प्रमेहाचे बरेच प्रकार आहेत. तीन्ही दोषांमुळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रमेह होतात. सगळे वेगवेगळ्या हेतूंमुळे होतात. असे रुग्ण आल्यावर खोदून खोदून विचारल्यावर बऱ्याच गोष्टी उलगडतात. सडपातळ बांध्याच्या हा रुग्ण. त्याच्यात मधुमेह व्हावा असा हेतु मिळणं कठीण. पण हा होता दह्याचा शौकीन. दही खाल्ल्याशिवाय जेवण व्हायचंच नाही. कांदापोह्यांवर दही, वरण भातावर दही, पराठ्यांवर दही, भाकरीसोबत दही, मिसळीवर दही आणि दह्याबरोबर सुद्धा दही. आणि हेच होतं कारण.

मागे एकदा दह्यावर लिहिले होते. ते एका स्नेहीने शेअर केलं असता काहींनी दह्यामुळे मधुमेह होऊच शकत नाही. कारण दह्यामधे गुड बॅक्टीरिया असतात जे शरीराला उपयुक्त असतात. असा वाद घातला होता. आयुर्वेदात दही हा प्रमेहाचा हेतू सांगितला आहे.

१- काम कमी केल्याने, किंवा न केल्याने
२- अंगमेहनत आणि व्यायाम न केल्याने
३- दिवसा झोपल्याने
४- खूप पाणी, थंड आणि द्रवबहुल पदार्थ घेतल्याने
५- प्रमाणाबाहेर गोड, आंबट, खारट खाल्ल्याने
६- सुरा प्यायल्याने
७- भरपूर मांस खाल्ल्याने
८- ऊस, गूळ, दही यांचं अतीप्रमाणात सेवन केल्याने
.......प्रमेह होतो
हे झाले साधारण हेतू.
त्याच्याशिवाय इतर दोष वाढवणाऱ्या गोष्टीमुळे सुद्धा प्रमेह होऊ शकतो. त्यामुळे मी असंच करतो म्हणून मला हा रोग होणारच नाही असं समजण्याचं कारण नाही. प्रमेह मूडी आहे. तो बिना परवानगीचा कुणालाही भेट देऊ शकतो.

©वैद्य अमित पाळ
॥श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद॥
गोमंतक
email- dramitsva@gmail.com

Vaidya Amit Pal

सुख प्रसव आणि संगोपन काळाची गरज –भाग दुसरा

सुख प्रसव आणि संगोपन काळाची गरज –भाग दुसरा

एका रोपट्याला  योग्य वेळी  फळाफुलांनी बहर येण्यासाठी त्याची जोपासना/ ”संगोपन” उत्तम करायला हवे.याच फळातून पुढे उत्तम बीज तयार होते जे आपल्यासारखेच निरोगी सुधृढ रोपट्याची पुनंर्निर्मिती करते. तुकाराम महाराजांनी सांगितलेच आहे,”शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी”!

या जीव सृष्टीचा एक महत्वाचा घटक असल्यामुळे निसर्गाचे नियम आपल्यालाही लागू होतात! वयात येण्याचा कालवधी हा महत्वपूर्ण असतो.त्याच वेळी स्त्री अथवा पुरुष देहात बीज निर्मिती ला सुरुवात होते. फार पूर्वी मुलगी रजस्वला झाली की आनंदोत्सव साजरा केला जाई. रजस्वला होणे हे बीजनिर्मिती आणि त्या अनुषंगाने गर्भधारणा करण्यास सज्ज असे दर्शवित असे. निसर्ग नियमानुसार असणाऱ्या या गोष्टी बद्दल मात्र  “आमचा जन्म काही फक्त मुल जन्माला घालण्यासाठी नाही झालाय” अशी अनास्थाही विशिष्ठ वयात आणि विचारसरणीत  दिसून येते.

गर्भाशय अथवा तदनुषंगिक येणाऱ्या पाळीचे स्वास्थ्य हे फक्त पुनरुत्पादनाच्या दृष्टीनेच सांभाळायचे आहे असे नाही तर स्त्री देहाच्या संपूर्ण स्वास्थ्यासाठी सांभाळणे गरजेचे आहे. आपल्या शरीरात तयार होणारे मल मुत्र जसे योग्य वेळी,योग्य स्वरुपात आणि  योग्य प्रमाणात बाहेर पडायला हवे तसेच पाळीचे रक्त अथवा रजही! पाळीचे आणि शरीराचे स्वास्थ्य एकमेकांवर अवलंबून आहेत. पाळीतून बाहेर पडणारे रक्त म्हणजेच रज हे शरीरातच तयार होते.घेतलेल्या आहारचे रुपांतर पहिल्या रसधातुत जर उत्तम झाले तर त्त्यापासून उत्तम रज तयार होते. म्हणजेच तुमचा आहार कसा आहे आणि त्याचे पचन शरीरात कसे होतेय यावर पाळीचे रक्त कसे तयार होणार हे अवलम्बून असते. आपल्या #metabolism मध्ये बदल झाला की हे चक्र देखील बिघडते. म्हणूनच  वयाच्या काही  विशिष्ठ टप्प्यावर म्हणजे पाळी येताना(उत्पत्ती), गर्भधारणेत(स्थिती),आणि पाळी जाताना (लय )पाळीत आणि शरीरात जे बदल घडतात त्यासाठी यांच्या स्वास्थ्याबद्दलच्या  concept clear असल्या पाहिजेत .

आणि राहिला प्रश्न , आपला जन्म कशाकरिता झालाय चा ?  तर , बाईचा काय किंवा पुरुषाचा काय जन्म का झालाय याचा शोध घेणे हेच खरे तर जन्माचे उद्दिष्ट्य आहे.
असो, आपण नवीन जीवाची निर्मिती करू शकतो हि खरे तर अभिमानाची गोष्ट आहे.हे सांगण्याचे कारण म्हणजे, नुकतेच वयात येणाऱ्या मुलींशी  एक “हितगुज” झाले. पाळी सुरु होण्याच्या टप्प्यावर असणाऱ्या या मुलींन्ना या सर्वाची जेव्हा नैसर्गिक आणि शास्त्रोक्त माहिती सांगितली तेव्हा त्यांच्या मनात असलेली “ आपल्यालाच हि कटकट का?”  अशी नकारात्मक भावना जाऊन त्या जागी चक्क “ यस्स्स्स आपल्याला काहीतरी विशिष्ठ शक्ती आहे!” अशी सकारत्मक भावना आली.यामुळे आता त्या वयाच्या या विशिष्ठ टप्प्यावर उत्सुक आहेत पाळी सुरु होण्यासाठी! पाळीचे स्वरूप नेमके कसे असायल हवे? पाळी सुरु होण्याचे नैसर्गिक प्रयोजन काय?आपल्या संपूर्ण स्वास्थ्यावर पाळीचे स्वास्थ्य अवलंबून कसे असते, या पायाभूत माहितीमुळे त्या नक्कीच उत्तम भविष्य साकारणार यात शंका नाही!

यालाच म्हणतात “संगोपन” , जे सुरु होते बीजापासून..............

क्रमशः
वैद्य ज्योत्स्ना पेठकर ९७६४९९५५१७
डॉ. सुहास हेर्लेकर ९४२२५००३४६
परिवर्तन आयुर्वेद
सुख प्रसव आणि संगोपन

सुख प्रसव आणि संगोपन – काळाची गरज!

सुख प्रसव आणि संगोपन – काळाची गरज!

पुनरुत्पादन हा सृष्टीचा नियम आहे. निसर्गातल्या तीनही ऋतुंमध्ये उत्पत्ती,स्थिती आणि प्रलय या द्वारे पुनरुत्पादनाचे नियमन केले जाते. पृथ्वीवर आढळणाऱ्या सर्वच जीवांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे पुनरुत्पादन चालूच असते!

सृजनाचे अथवा पुनर्निर्मितिचे हे कार्य अत्यंत नैसर्गिक आहे. ‘ब्रह्मांडी ते पिंडी’ या न्यायाने निसर्गाचे नियम आपल्या शरीरालाही लागू पडतात. सुपीक भूमीवर पडलेले उत्तम बीज जसे अनुकूल हवामान,पोषण आणि ऋतु मिळाल्यावर भूमीतून तरारून वर येते त्याचप्रमाणे उदरात जीव तयार होत असतो.दोन जीव परस्परांच्या ‘स्नेहातून’ एका नवीन जीवाला जन्म देत असतात.

हि साधी सोपी नैसर्गिक गोष्ट सध्या दुरापास्त झालीये.

लग्नाचे वाढेलेले वय,धकाधकीचे जगणे,सतत चिंता-ताण,ऋतुचर्या –दिनचर्या पाळण्याचा अभाव, योग्य अन्न सेवन आणि व्यायाम करण्याबद्दलची अनास्था, कामशास्त्रा बद्दलची अपुरी,अयोग्य माहिती,शरीराला खूप ठिकाणी गृहीत धरणे, या आणि अशा कितीतरी गोष्टींमुळे आपण नैसर्गिक तत्वांपासून दुरावत चाललोय.

मुल होत नाही म्हंटल्यावर आधी येतात त्या होर्मोन टेस्ट आणि त्यांच्या आकड्यात झालेले बदल.मग सुरु होते hormonal चिकित्सा! पण इथे हा विचार केला जात नाही की hormones का बदलेलेत? कुणीही हि दखल घेत नाही की पाळी कशी येते? फक्त महिन्याच्या महिन्याला येणे गरजेचे नाही तर पाळीचे स्वरूपही निरोगी हवे. आपल्या शरीरातील संप्रेरके अथवा hormones स्वतःहून कमी जास्त होत नसतात.त्यामागे कारण असते आपले बिघडलेले चयापचय!

यावर काम करणे खरच कठीण असते?
याला वेळ लागेल म्हणून चटकन गुण येण्यासाठी वापरलेला हा shortcut त्वरित फलदायी असतो? तर मुळीच नाही. लागणारा वेळ लागतोच तिथेही.आणि वैद्यकीय भाषेत सांगायचे तर मुळ संप्राप्ती तशीच ठेवून बीज तयार होत नाहीये मग ते artificially stimulate करून वाढवले तरीही फलित होत नाही अथवा फलित झाले तरी त्या गर्भधारणेत अनेक complications होऊ शकतात.( सरसकट होतात असे नाही कृपया हा मुद्दा ध्यानात घ्या). अशा pregnancy चा बहुतेक काळ हा विविध medicines मध्ये जातो याचे पडसाद प्रत्यक्ष प्रसव/ delivery च्या वेळी जाणवतात. गर्भधारणा झाल्यानंतर नॉर्मल delivery साठी केलेले प्रयत्न तोकडे पडतात कारण मुळातच “ सुख प्रसवाचा” प्रवास हा तुमच्या पाळी सुरु होण्याच्या कालावधीपासून सुरु होतो तो कधी लक्षातच घेतला जात नाही.

गर्भधारणा हि नैसर्गिकपणे आणि सुखकर व्हावी, ९ महिन्यांचा कालावधी हा कुठल्याही complication शिवाय,कमीत कमी medicines युक्त असावा, प्रत्यक्ष प्रसव हा नॉर्मल असो व सीझर तो “सुख प्रसव” असावा. बाळंतपणा नंतरही सुतिका परिचर्या पाळली जावी  हेच खरे माता बालक स्वास्थ्य !!!

माता बालक स्वास्थ्य सगळ्यांनाच हवेय,त्यासाठी फक्त supplements चा प्रोग्राम हाती घेऊन चालणार नाही तर त्याच्या मुळाशी जाऊन काम करायला हवेय.
यासाठीच हि संकल्पना आहे “सुख प्रसव आणि संगोपन”...............
क्रमश:

वैद्य ज्योत्स्ना पेठकर ९७६४९९५५१७
डॉ. सुहास हेर्लेकर ९४२२५००३४६
परिवर्तन आयुर्वेद
सुख प्रसव आणि संगोपन

#घरोघरी_आयुर्वेद

#घरोघरी_आयुर्वेद

परदेशी खाद्यपदार्थ वाईट असतात का?!

'ब्रेड, नुडल्स, पास्ता इत्यादि गोष्टी आरोग्यास अपायकारक आहेत असे म्हणणे असेल तर परदेशातील लोक अशाच गोष्टी खाऊनही निरोगी कसे असतात?' अशा काहीशा आशयाचा प्रश्न काल-परवा विचारला गेला. खरं तर यावर त्या त्या देशातील खाद्यसंस्कृती आणि पदार्थ यांवर सविस्तरपणे एखादे पुस्तक लिहिता येईल इतका मोठा विषय आहे. तरी यावरील स्पष्टीकरण थोड्क्यात देतो.

१. वरील पदार्थ वाईट आहेत असे विधान सरसकट नसून ते आपल्या देशातील वातावरण, लोकांच्या पूर्वापार चालत आलेल्या सवयी इत्यादी लक्षात घेता 'आपल्या देशात खाण्यासाठी अयोग्य आहेत'. जिथे जे पिकतं तिथे ते खावं हा सर्वमान्य सिद्धांत आहे. जिथे भुईमूग, तीळ यांचं तेल उपलब्ध होतं तिथे ऑलिव्ह ऑइल वा सोयाबीन ऑइलची आवश्यकता नाही. कोकणात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गहू खाण्याची सुरु झालेली प्रथा आणि त्यामुळे वाढलेले रोग यांबद्दल जुन्या जाणत्या लोकांना विचारून पहा. मी काय म्हणतोय ते सहज लक्षात येईल. एक अमेरिकन माणूस वर्षभरात सरासरी जितके चीज खाऊन फस्त करेल तितकं चीज आपणही वर्षभरात खाल्लं तर पचन बिघडून रोग कसे निर्माण होतात हे प्रयोग म्हणून आपापल्या जबाबदारीवर करून पहावा! ताहिनी ही गोष्ट इस्राईल, लेबनन यांसारख्या देशांत आवर्जून खाल्ली जाते. आपल्या देशात खाल्यास मात्र त्याने रक्तपित्त नावाचा रोग होतो असे आयुर्वेद सांगतो. इतका अभ्यास आपल्या पूर्वजांनी करून ठेवला आहे.

२. आम्ही भारतीय परदेशी गोष्टींचे आपल्या सोयीने अनुकरण करण्यात पटाईत आहोत. इटलीत बनवला जाणारा पास्ता हा बहुतांशी ताजा बनवलेला तर आमच्याकडे मिळणारा पॅकेटबंद असतो. युरोपीय देश वा मध्य आशियामधील देशांत मिळणारा ब्रेड हा पदार्थ कोरडा खाणे अपशकुन मानले जाते! त्याला बटर वा ऑलिव्ह ऑइल लावूनच खावे असा प्रघात आहे. आपल्याकडे मात्र ब्रेड खाणे हे स्टेट्सचे लक्षण मानले जाते; मात्र आम्ही 'ऑइल फ्री; घी फ्री' आहार घेण्यात धन्यता मानतो. फ्रान्ससारख्या देशांत जेवणासह वाईन घेण्याची पद्धत आहे. ही वाईन नशा करण्यासाठी घेण्याचा उद्देश नसून प्रामुख्याने मांसाहार पचण्यास तिचा उपयोग होतो. आमच्याकडे मात्र 'बसणे' हा प्रमुख कार्यक्रम असतो. पिणं हे झिंगण्यासाठी नसेल तर त्यात मजाच काय? असा होरा असतो. दारूसोबत जमलंच तर आम्ही काहीतरी खातो; तेदेखील चटपटीत आणि तेलकट!!

३. याशिवाय असे कित्येक परदेशी पदार्थ आहेत जे मुळातच वाईट आहेत; ते कोणत्याही देशात खाल्ले गेले तरी दुष्परिणाम दाखवणारच. उदाहरणार्थ किण्वीकरण करून तयार केलेला ब्रेड किंवा चायनीज पदार्थांत वापरले जाणारे व्हिनेगर, सोया सॉस, अजिनोमोटो यांसारखे पदार्थ. ही यादीदेखील बरीच वाढवता येईल; मात्र विस्तारभयास्तव थांबतो. त्या त्या देशांतदेखील हे पदार्थ खात असलेल्या लोकांना कोणत्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते हे जाणून घ्यायचे असल्यास त्या देशांतल्या आरोग्य विभागाने वेळोवेळी जाहीर केलेल्या सूचना वा WHO शी संलग्न संशोधने अवश्य पहावीत.

बहुतांशी पारंपरिक आहार संस्कृती ही त्या त्या देशातील वातावरणासाठी पोषक आहे. त्यामुळे आपल्या मातीत जे पिकतं तेच शक्यतो खावं; हाच आरोग्याचा मूलमंत्र जगातील प्रत्येक देशासाठी आहे. याकरताच अमेरिका नामक तुलनेत नव्याने जन्माला आलेल्या देशाने जी स्वतंत्र खाद्यसंस्कृती निर्माण केली ती सर्वाधिक घातक मानली जाऊन जगभरातील खाद्य संस्कृतीबद्दल सजग असणाऱ्या देशांत अमेरिकन आहार पाहून तोंड मुरडले जाते. आम्ही भारतीय मात्र देशी गायींचे दूध, तूप सोडून टेबल बटर आणि देशी जव सोडून पिवळ्या-गुलाबी पाकिटातील ओट्ससारख्या निकृष्ट पदार्थांचा आस्वाद (?) मिटक्या मारत घेत आहोत हे दुर्दैव.

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

Thursday, September 8, 2016

मुळव्याध होण्याच्या पुर्विची लक्षणे

😁 मुळव्याध होण्याच्या पुर्विची लक्षणे 😁

मुळव्याधचा त्रास होण्यापुर्वी भुक कमी होणे, मल साफ न होणे, मांड्या गळुन जाणे, पिंडरया दुखणे, चक्कर येणे, अंगास ग्लानी वाटणे, डोळे सुजणे, मलावरोध असणे वा पातळ मल होणे, आतड्यात कुरकुर शब्द होणे, पोटात गुडगुड होणे, वजन कमी होणे, ढेकरा फार येणे, लघ्विला अधिक होणे, मल कमी प्रमाणात तयार होणे, अन्नावर वासना नसणे, घशाशी आंबट येणे, पाठ उरप्रदेशी दुखणे, आळस, शरीराचा रंगात बदल, इंद्रिय निशक्त होणे, राग फार येणे, इतर आजार होतील अशी भिती वाटणे अशी लक्षणे मुळव्याध होण्यापुर्वी कमी अधिक प्रमाणात दिसतात. यातील जेवढी जास्त लक्षणे दिसतात. तेवढा आजार जास्त बलवान असतो. मुळव्याध होण्याच्या पुर्विच अटकाव घालता येतो. पण बहुतेक वेळा रक्त पडायचे स्वतः थांबत नसताना उपचाराचा विचार केला जातो. तोपर्यंत भुक कमी झाल्याने आजार लगेच पुर्ण दुरूस्त होत नाही.उपचाराने रक्त पडायचे थांबते पण आजाराचा पुनरूद्भव टाळण्यासाठी भुक वाढविणे आवश्यक असते. भुक वाढली असता पुन्हा त्रास सहज होत नाही. भुक कमी असेल तर पुन्हा पुन्हा त्रास सहन करावा लागतो. आयुर्वेद औषधी उपचारही सल्ल्याशिवाय घेउ नयेत. कारण काही औषधी गरम गुणधर्माच्या असल्याने त्रास वाढण्याचा धोका असतो. चांगल्या ताकाचा उपयोग आहारात थोडे शेंदेलोण घालुन करावा. ताकाने भुक वाढावयास मदत होते..

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड
9028562102, 9130497856

Wednesday, September 7, 2016

कृमी /जंत

कृमी / जंत
लहानांपासून तो मोठ्यापर्यंत सर्वाना पिडणाऱ्या कृमी रोगाबद्दल आज पाहू. रक्त, विकृत कफ व शरीरातील मळ यापासून कृमी उत्पन्न होतात असे आयुर्वेद सांगतो.
कृमिंची कारणे
घाणेरड्या, गलिच्छ जागी, खूप ओलावा असलेल्या जागी व तुंबून राहिल्रेल्या गटारात लगेच किडे तयार होतात हे आपण पाहतो. असेच काहीसे वातावरण शरीरात तयार झाल्यास जंत उत्पन्न होतात. वारंवार अजीर्ण होणे, अजीर्ण असतानाच जेवणे हे कृमिना पोषक वातावरण तयार करते. गोड पदार्थ हे पचण्यास जड व शरीरात ओलावा व चिकटपणा उत्पन्न करतात (गोड खाल्ल्यावर जीभ चिकट होते हे आपण अनुभवलेच असेल) म्हणून अति गोड खाणे, जेवणानंतर “स्वीट डिश” खाणे ही कृमिंसाठी गोड बातमीच असते. पिठूळ पदार्थ (जसे मैदा, ब्रेड, नान, ग्लुकोज बिस्किटे) हि पचण्यास जड व आतड्यास चिकटून बसणारी आहे. सतत खाल्ल्याने अजीर्ण, बद्धकोष्ठ होऊन शेवटी कृमिना उत्पन्न करण्यास ते कारणीभूत ठरतात.
आयुर्वेदाने बाल्यावस्था ही सोळा वर्षापर्यंत सांगितली आहे. ह्या काळात शरीरात कफ दोष वाढलेला असतो. कफाचे स्निग्ध, शीत, हे गुण कृमींच्या उत्पत्तीस पोषक असल्याने लहान मुलांना कृमींचा त्रास जास्त होतो.
केवळ अजीर्नानेच नव्हे तर कृमी हे मातीत उत्पन्न होऊन त्वचेतून आपल्या शरीरात प्रवेश करतात पण हे सूक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्याने केवळ आधुनिक शास्त्राने शोधून काढले असा समज असला तरी तो चूक आहे, “काश्यप संहिता” या ग्रंथात कृमीपासून संरक्षणास घरासमोरील अंगणात वावडिंगाचा काढा शिंपडावा असा संदर्भ सापडतो.
लक्षणे
कफज कृमी – पातळ शौचास होणे, उल्टी, ताप, सर्वांगास खाज येणे, जेवण नकोसे होणे किंवा सतत खा-खा सुटणे, शरीर बारीक होणे व चेहऱ्यावर पांढरे डाग येणे ही काही प्रमुख लक्षणे.
पुरीषज कृमी- बद्धकोष्ठ किंवा पातळ संडास होणे, त्वचा कोरडी होणे, शरीर बारीक होणे, गुड मार्गास खाज येणे व पोटात दुखणे (विशेष करून बेंबीच्या ठिकाणी) ही प्रमुख लक्षणे आहेत.
रक्तज – केस गळणे, डोक्यावर एकाद्याच भागाचे केस जाणे, पापण्या गळून पडणे, नखामध्ये विकृती ही लक्षणे दिसतात तर अंगावर पिताम येणे, अंगास खाज सुटणे व त्वचेचे रोग सुद्धा रक्तातील न दिसणाऱ्या पण सूक्ष्म जन्तुनी होऊ शकतात.
वरील लक्षणांसोबत इतर अनेक लक्षणे सुद्धा दिसून येतात. सतत असणारा कोरडा खोकला, छातीत दुखणे  व चक्कर  येणे हेही कृमिंमुळे होऊ शकते.
उपाय
सर्वात प्रथम कृमिचा नाश करून त्यांना शरीरातून बाहेर फेकणे हाच प्रथम उपचार असतो म्हणून वरील लक्षणे दिसताच वैद्यांचा सल्ला घ्यावा. यानंतर शरीरात पुन्हा कृमि तयार होऊ नयेत यासाठी उपाय योजना करावी. भूक लागल्यावर जेवणे. गोड, आंबट, पिठूळ पदार्थ कमी खाणे, मटकी व पालेभाज्यांचा अति वापर टाळणे, रात्रीचे जेवण शक्य तितक्या लवकर जेवणे, गरम पाणी पिणे व जेवणात एखादा कडू पदार्थ असणे किंवा आठवड्यातून १ वेळा उपवास करणे ,कडू किरायत्याचा रस घेणे हे उपाय कृमी पुन्हा तयार होण्यास प्रतिबंध करतात. आपल्या स्वयंपाकघरातील हळद ही कृमिंवर उत्तम औषध आहे. (कृमिघ्नी हे तिचे पर्यायी नाव आहे).लहान मुलांना जंत झाल्यास हळद व गुळ घालून गोळ्या तयार करून दिवसाला १-२ खाण्यास द्याव्या. कृमिंचा नायनाट करण्यास व परत परत त्रास न  होण्यास आयुर्वेदीक चिकित्सा फायदेशीर ठरते.
#रहस्यस्वास्थ्याचे
©वैद्य आदित्य मो. बर्वे , गोवा
BAMS, DpK, PGDHHM, B.A (SANSKRUT)
8888597293

Tuesday, September 6, 2016

जल संस्कार विशेष

🍀 जलसंस्कार विशेष 🍀

दिवा श्रृतं पयो रात्रौ गुरूतामधिगच्छति |
रात्रौ श्रृतं दिवा पीतं गुरूत्वमधिगच्छति ||
      
दिवसा तापवलेले पाणी रात्रीला पचावयास जड होते
         तर रात्री तापवुन सकाळपर्यंत ठेवलेले पाणीही पचावयास जड होते

तत्तु पर्युषितं वह्निगुणोत्सृष्टं त्रिदोषकृत् |
गुरूम्लपाकं विष्टम्भि सर्वरोगेषु निन्दितम् ||

अशा प्रकारचे शिळ्या गुणधर्माचे पाणी अग्निमांद्यकर, पचावयास जड, वातपित्तकफ या तिघानांही बिघडवणारे, शरीरातील आंबटपणा वाढविणारे, मलमुत्रांचा अवरोध करणारे असल्या कारणाने सर्व रोगांत निषिध्द मानले आहे.

   ☘ दोन वेळा तापवणे 🍀

श्रृतशीतं पुनस्तप्तं तोयं विषसमं भवेत् |
निर्युहो$पि तथा शीतः पुनस्तप्तो विषोपमः ||

तापवुन थंड झाल्यानतंरचे पाणी जर पुन्हा तापविले तर ते विषासमान होते. तसेच तयार झालेला काढा जर पुन्हा तापविला तर तोही विषासमानच गुणधर्माचा होऊन शरीरासाठी त्रासदायक ठरतो
  ( दोन वेळा गरम केलेले आहारीय खाद्यपदार्थ हे विषसमान गुणधर्माचे बनुन विविध चेंगट आजार उत्पन्न करून शरीरासाठी मारक ठरतात.)

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड
Mob -- 9028562102, 9130497856

Visit Our Page