Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Sunday, January 31, 2016

महाभूताग्नि


दीर्घकाळपासून पडलेला एक प्रश्न आणि त्याचे सुचलेले उत्तर आज मांडणार आहे. सर्वांनी त्याचे परीक्षण करावे अशी विनंती आहे.
महाभूताग्नि कोठे असतात व त्यांचा role नेमका काय आहे ? असा हा प्रश्न आहे. मूळ सूत्र आहे चरकातील चि. 15 मध्ये
अन्नमिष्टं ह्युपहितमिष्टैर्गन्धादिभिः पृथक् ।
देहे प्रीणाति गन्धादीन् घ्राणादीनीन्द्रियाणि च ।।
भौमाप्याग्नेयवायव्याः पंचोष्माणः सनाभसः ।
पंच आहारगुणान्स्वान्स्वान्पार्थिवादीन् पचन्ति हि ॥
यथा स्वं स्वं च पुष्णन्ति देहे द्रव्यगुणाः पृथक् ।
पार्थिवाः पार्थिवानेव शेषाः शेषांश्च कृत्स्नशः ॥ च. चि. 15/12-14
आणि चक्रपाणिदत्त टीके मध्ये म्हणतो – भौमादयः पञ्चोष्माणः पार्थिवादिद्रव्यव्यवस्थिता जाठराग्निसंधुक्षितबला अन्तरीयं द्रव्यं पचन्तः स्वान् स्वान् पार्थिवादीन् पूर्वपार्थिवगन्धत्वाद्यविलक्षणान् गुणान् निर्वर्तयन्ति ।
संपूर्ण टीका येथे लिहीत नाही. ती मुळातून वाचण्यासारखी आहे.
प्रकरण अधिकरण ही पाहण्यासारखे आहे. प्रथम अग्निचे महत्त्व, त्यानंतर जाठराग्नि, त्यानंतर अवस्थापाक, त्यानंतर हे महाभूताग्निचे सूत्र, त्यानंतर धातुगत पचन व धात्वग्निंचे वर्णन असा क्रम आहे. त्यातही जाठराग्निच्या action चा starting point (अन्नमादानकर्मा तु ....) व End Point (एवं रसमलाय ....) वर्णन केलेला आढळतो. त्याच पद्धतीने धात्वग्निंच्या action चा ही Start point व End point उपलब्ध होतो. मात्र महाभूताग्निच्या action ला Starting point व End point काय असे शोधावे लागते. जाठराग्निसंधुक्षितबला ... म्हणजे जाठराग्निचे कार्य सुरु झाले की महाभूताग्निचे काम सुरु होते असे म्हणता येईल. End point शोधण्यासाठी मात्र बरेच विवेचन करावे लागेल.
महाभूताग्नि कोठे असतात या प्रश्नाचे उत्तर चक्रपाणिदत्त देतो – पार्थिवादि द्रव्यव्यवस्थिता. म्हणजे हे भूताग्नि द्रव्यांमध्येच असतात. कोणत्या द्रव्यांमध्ये – आहारद्रव्यांमध्ये की शारीर द्रव्यांमध्ये ? त्याचे उत्तर दोन्ही द्रव्यांमध्ये असतात. आहारद्रव्यांमधील भूताग्निचा role वेगळा व शारीरद्रव्यांमधील भूताग्निचा role वेगळा.
आहारद्रव्यांमधील भूताग्नि
आहारद्रव्यांमध्ये भूताग्नि कोठून येतो ? सर्व सजीवांमध्ये (सेन्द्रिय असा चरकाचा शब्द) जाठराग्नि असतो व त्याचा अंश प्रत्येक द्रव्यामध्ये असतो. जाठराग्निच्या अस्तित्वामुळे हा द्रव्यांमधील अग्नि हा active राहतो. (अन्नस्य पक्ता सर्वेषां पक्तृणामधिपो मतः । तन्मूलास्ते हि तद्वृद्धिक्षयवृद्धिक्षयात्मकाः ।। वा. शा. 3-71). येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आपण जे अन्न म्हणून सेवन करतो ते सजीव सृष्टीतीलच असावे लागते. ( मी येथे सर्वसामान्य व्यक्तींबद्दल बोलतो आहे. योगाच्या क्षमतेने वायुभक्षण करुन राहणाऱ्या ऋषिंबद्दल बोलत नाहीये. त्यांची क्षमता थोडी भिन्न असावी. त्याच्या विषयी विवेचन करता येईल असे वाटते. पण ते विषयांतर होईल). आपण सजीव नसलेली दोन द्रव्ये सेवन करतो. जल आणि लवण. परंतु जलाचा role हा medium म्हणून आणि लवणाचा रसबोधनासाठी. त्यापैकी लवण नात्युपयुञ्जीत । आणि जल पिबेत् स्वस्थो अपि अल्पशः । महत्त्वाचे हे की केवळ जल किंवा लवण सेवन करुन आपण जगू शकत नाही. म्हणजे त्यांचा आहार म्हणून उपयोग नाही हे स्पष्ट आहे. तस्मात् आपला आहार हा सजीव सृष्टीतीलच असावा लागतो. असे का याचे उत्तर भूताग्निमध्ये आहे. आहारसेवन केल्यावर जाठराग्निची क्रिया सुरु झाल्यावर द्रव्यातील भूताग्निदेखिल प्रज्ज्वलित होतो व त्याची जोड मिळाली तरच जाठराग्निचे कार्य पूर्ण होऊ शकते. द्रव्यामध्ये भूताग्नि active नसेल तर केवळ जाठराग्नि द्रव्याचे पचन करु शकत नाही. त्याची दोन उदाहरणे देता येतात. एक – मृद्भक्षणजन्य पांडुमध्ये वाग्भट सांगतो - स्रोतांस्यपक्वैवापूर्य कुर्याद्रुद्ध्वा च पूर्ववत् । सेवन केलेली माती अपक्व एव ..... राहते. वस्तुतः जाठराग्निला काय अडचण आहे त्या मातीचे पचन करायला ? तर त्या मातीमध्ये भूताग्नि आवश्यक तेवढा नाही आणि तो जाठराग्निने active करता येईल इतका नाही. दुसरे उदाहरण – विष – तेही असेच अपाकि. जरी ते जिवंत सृष्टीतील असले तरी त्यातील भूताग्नि active नाही म्हणून ते मारक आहे.
याच अनुषंगाने आणखी एका प्रश्नाची उकल होते. आपण चिकन, फळे, भाजी आणतो आणि शिजवतो व त्याचे सेवन करतो. शिजवण्यापूर्वी व नंतरही त्याला एक विशिष्ट Shelf Life असते. ते कशावर अवलंबून आहे. चिकन मारलेली आहे. फळे झाडावरुन तोडलेली आहेत. म्हणजे आत्म्याचा संबंध नाही हे उघड आहे. मग हे Shelf Life कशावर ठरते. तर त्यातील भूताग्नि काही काळ अस्तित्वात असतो. (म्हणून तर व्यक्तीच्या मृत्युनंतर काही काळ शरीरस्पर्श उष्ण असू शकतो). Refrigerator मध्ये ठेऊन किंवा अन्य काही मार्गाने आपण तो preserve करु शकतो. मात्र जेव्हा तो अग्नि एका मर्यादेपेक्षा कमी होतो तेव्हा ते अन्न “मरते”. आता ते अन्न म्हणून उपयोगी पडू शकत नाही कारण जाठराग्निमुळे active होण्यासाठी त्यात भूताग्नि नाही. त्यानंतर असे चिकन, अशी फळे “कुजतात”. चरकाच्या “शान्ते अग्नौ म्रियते” या सूत्राचा हा वेगळा अर्थ आहे. द्रव्यातील अग्नि शांत झाला की अन्न मरते.
या पद्धतीने लावलेल्या अन्वयाचे अनेक उपयोग आहेत. आयुर्वेदातील औषधांना Route of Excretion का नाहीत आणि allopathy च्या औषधांना ते का आवश्यक आहेत  यातून समजते. रसशास्त्राच्या प्रक्रियांचाही अर्थ नीट उलगडतो. आयुर्वेदाची औषधे ही सजीव सृष्टीतून आलेली असल्यामुळे त्यांचे रीतसर पचन होते. त्या द्रव्यांपैकी Harmful भाग असलाच तर जाठराग्निच त्याला बाजूला काढतो व दोष-धातु-मल यामध्ये त्याचे रुपांतर घडवून आणतो. त्यामुळे Side-effect इ. ची शक्यता बऱ्याच प्रमाणात नष्ट होते. (बऱ्याच प्रमाणात म्हणायचे कारण असे की कोपन द्रव्ये असतील तर त्यांच्या प्रभावामुळे अनिष्ट परिणाम होतीलच). मात्र allopathy ची अनेक औषधे ही chemically derive केलेली असल्यामुळे, द्रव्य आहे म्हणजे रस-वीर्य-विपाक-प्रभाव-गुण आहेत म्हणून त्यांचे कर्म घडेलच, परंतु ते शरीरामध्ये assimilate होऊ शकणार नाही. शरीराला त्याला बाहेर टाकावे लागेल कारण जाठराग्नि ते पचवू शकत नाही. म्हणून त्या औषधांना route of excretion आवश्यक आहे. आणि तो route उपलब्ध नसेल तर ती औषधे वापरता येत नाहीत. आयुर्वेदाच्या औषधांना हे बंधन नाही.
हाच प्रश्न रसशास्त्राच्या औषधांच्या बाबतीत येतो. रसशास्त्रातील अनेक औषधे खनिज स्वरुपाची आहेत. रसशास्त्राच्या प्रक्रियांमध्ये भावना, पुट, कुपिपक्व व पोट्टली अशा अनेक पद्धतीने त्या द्रव्यांमध्ये अग्नि स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला आढळतो. या सर्व प्रक्रिया जर व्यवस्थित केल्या तर या मूलतः खनिज असणाऱ्या द्रव्यांमध्ये अग्नि स्थिर होतो व तो भूताग्नि म्हणून उपयोगी पडतो. त्यामुळे ही औषधे safe होतात. असा अग्नि बाहेरुन द्रव्यामध्ये स्थिर करता येतो याची अनेक उदाहरणे आहेत. उष्णोदकाचे गुण हे याची साक्ष देतात. पाणी उकळून विशिष्ट प्रमाणात आटवले की त्याची दीपन, पाचन अशी कर्मे करण्याची क्षमता वर्णन केलेली आढळते ती याचमुळे. मृत्युच्या वेळी अधिक मात्रेमध्ये हेमगर्भ वापरला असेल तर त्या व्यक्तीचे शरीर अधिक काळ अधिक प्रमाणात उष्ण राहते असा अनुभव गुणे शास्त्रींनी नोंदवलेला आहे. ही दृष्टी ज्या रसशास्त्राच्या ऋषिंना होती त्यांच्या विषयी अतीव आदर वाटत राहतो. रसशास्त्राची निर्मिती आयुर्वेदाच्या तत्त्वांवरच झालेली आहे याचा हा महत्त्वाचा पुरावा आहे.
शारीरद्रव्यांमधील भूताग्नि
शारीरद्रव्यांमधील भूताग्निचा role हा थोडासा भिन्न आहे. धात्वग्निंचे कार्य पूर्ण झाल्यावर पोषक धात्वंश ज्यावेळी प्रत्यक्ष धातुंचे पोषण करतो त्यावेळी पोषक अंश व पोष्य धातु हे दोन्ही पांचभौतिकच आहेत. तेव्हा त्या पोषक अंशापैकी पृथ्वि महाभूताने पोष्य धातुमधील पृथ्वि महाभूताचे पोषण व्हायचे असते. त्यावेळी त्या शारीरद्रव्यामधील पृथ्विमहाभूताग्नि हा पोषक धातुमधील पृथ्वि महाभूताचे पचन करुन घेतो. त्या अर्थाने पार्थिवाः पार्थिवान् एव ..... या सूत्राची व पार्थिवा आहारद्रव्यगुणा देहगतान् पार्थिवानेव द्रव्यगुणान् पुष्णन्ति या चक्रपाणि टीकेची संगती लागते. असे असल्यामुळे भूताग्निच्या क्रियेचा End point दिलेला आढळत नाही. किंबहुना या पद्धतीने आहारद्रव्याचे शारीरधातुमध्ये पूर्ण रुपांतर झाल्यावरच भूताग्निचे कार्य संपते असे म्हणता येईल.
या सर्व विवेचनाचे महत्त्व व्यवहारामध्ये खूपच आहे. Cancer सारख्या व्याधिंमध्ये याचे महत्त्व राहणार आहे. जी द्रव्ये – आहार किंवा औषधी – आवश्यक तेवढ्या महाभूताग्निंनी युक्त नसतील ती सर्व द्रव्ये अपाकि व म्हणून विषवत् होऊ शकतात. मग ती Chemical Fertilizers असोत, हवेतील Pollutants असोत किंवा Chemically तयार केलेली औषधे (Allopathy ची किंवा नीट प्रक्रिया पूर्ण न केलेली रसशास्त्राची) असोत, ही सर्व अपाकि व म्हणून विषच ठरणार आहेत. कारण त्यांच्यामध्ये आवश्यक तेवढा महाभूताग्नि नाही व अशी द्रव्ये ही Carcinogenic असणार आहेत. (किंबहुना नवीन Studies मध्ये, नेहमी वापरली जाणारी pain killers सुद्धा carcinogenic आहेत असे स्पष्ट होते आहे) तसेच Cancer सारख्या व्याधिंच्या चिकित्सेमध्ये अग्नि व त्यातही महाभूताग्निचे महत्त्व यातून स्पष्ट होते.
दीर्घकाळ पडलेल्या प्रश्नांची मला सुचलेली उत्तरे मी या लेखामध्ये मांडलेली आहेत. वैद्य विवेक साने यांच्या गुरुवर्य कोल्हटकर प्रतिष्ठानच्या गुरुपौर्णिमा 2014 च्या कार्यक्रमामध्ये केलेल्या व्याख्यानाची मदत मला हा लेख लिहीताना झालेली आहे हे मी कृतज्ञतापूर्वक नमूद करु इच्छितो.
प्रामुख्याने नवीन वैद्य व विद्यार्थ्यांसाठी हा लेख लिहीलेला आहे. ज्येष्ठ, श्रेष्ठ व ज्ञानवृद्ध वैद्यांना हे बालकाचे बोल वाटतील अशी खात्री आहे. तरीही त्यांनी त्यातील चुका व त्रुटींकडे दुर्लक्ष न करता त्या मला सांगाव्यात म्हणजे मला माझ्या दृष्टीकोनामध्ये सुधारणा करता येतील अशी विनंती आहे.
वैद्य रसिक श्रीराम पावसकर
vaidyapawaskar@hotmail.com
पुणे

3 comments:

Visit Our Page