Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Sunday, January 2, 2011

ओरल पर्ल्स

सर्वागीण आरोग्याच्या विचारात दंत आणि मुखारोग्यही महत्त्वाचं ठरतं. मासिक पाळी, गर्भावस्था, रजोनिवृत्ती या अवस्थांमध्ये स्त्रियांच्या शरीरातील बदलणा-या हार्मोन्स लेव्हल्समुळे दात आणि हिरडय़ांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. दातांची हानी फक्त चेह-याच्या सौंदर्यावरच नव्हे तर शरीरावरही विपरीत परिणाम करते.

कुटुंब आणि समाजाच्याही आरोग्याची गुरुकिल्ली स्त्रीकडेच असते. पण ब-याचदा स्त्री स्वत:च आपल्या आरोग्याबद्दल सजग नसल्याचं दिसून येतं. सर्वागीण आरोग्याच्या विचारात दंत आणि मुखारोग्यही महत्त्वाचं ठरतं. कारण शरीराचं द्वार असणारं ‘मुख’ बळकट नसेल तर प्रकृतीही निरोगी असू शकत नाही. दातांची हानी फक्त चेह-याच्या सौंदर्यावरच नव्हे, तर शरीरावरही विपरीत परिणाम करते.
मासिक पाळी, गर्भावस्था, रजोनिवृत्ती या अवस्थांमध्ये स्त्रियांच्या शरीरातील बदलणाऱ्या हार्मोन्स लेव्हल्समुळे दात आणि हिरडय़ांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. वयात येणा-या मुलींमध्ये हिरडय़ांच्या विकारांचं प्रमाण अधिक दिसतं. मुखदुर्गंधी, तोंडात आणि गालाच्या आतील त्वचेवर फोड येणं (अल्सर), हिरडय़ांतून रक्त येणं इत्यादी समस्या उद्भवतात. याकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य उपचार करून घेणं गरजेचं ठरतं.
गर्भावस्थेत हार्मोनल लेव्हलच्या चढ-उतारामुळे स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिकतेवर परिणाम दिसून येतो. या अवस्थेत हिरडय़ा संवेदनशील, नाजूक बनतात. अशा स्थितीत जर दाताभोवती किटण जमलेलं असेल, तर हिरडय़ांना इजा होऊन त्यांचा दाह होतो. कालांतराने त्यातून रक्त, पू येऊन दात हलायला लागतो. हिरडय़ांच्या विकारासोबतच जर एखादा दात किडला असेल तर ही कीड दाताच्या मुळाशी पोहोचून आतल्या पल्पला इजा पोहोचवते. परिणामी दाताच्या मुळाशी सूज येऊन असहय़ वेदना होतात.

सर्वसामान्यपणे दंतविकारात आढळून येणारी लक्षणं गर्भावस्थेत प्रकर्षाने जाणवतात आणि भयंकर त्रासदायक ठरतात. शिवाय उपचाराच्या वेळी भीतीने चक्कर येणं, दम लागणं, धडधडणं, रक्तदाब वाढणं अशी लक्षणं संबंधित स्त्रीच्या गर्भावस्थेत अडचणीची आणि त्रासदायक ठरतात. उपचाराच्या वेळी वापरण्यात येणारी औषधं आणि बधिरीकरणासाठी लागणारी द्रव्याऔषधे स्त्रीच्या उदरात वाढणा-या बाळाच्या आरोग्यासाठी अयोग्य ठरतात. म्हणूनच गर्भ राहण्यापूर्वीच स्त्रीने आपलं आरोग्य निरोगी ठेवणं आवश्यक आहे.
इतर चाचण्यांसोबतच दंतवैद्याकडे जाऊन आपले दात व मुख नीट तपासून घेऊन शक्य असेल, तर उपचार करून घ्यावेत. गर्भावस्थेतील अडचणी लक्षात घेता पहिले तीन महिने आणि शेवटचे तीन महिने तसे सुरक्षित असले तरी या दिवसांत शस्त्रक्रिया, किचकट उपचार, एक्स-रे आणि विविध औषधी यांचा मारा टाळावा. आई होताना वाढलेली जबाबदारी पेलताना स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणं साहजिक असतं. या काळात मुखारोग्य नीट न जोपासलं गेल्यास दंतक्षय, दातांची कीड या विकाराचं प्रमाण बळावतं. शिवाय दंत स्वच्छतेमध्येही अनियमितता आल्यास हिरडय़ांच्या विकारांचं प्रमाणही वाढतं. परिणामी पायोरियासारखा रोग होऊन दात गमवावे लागतात. त्यामुळेच वेळीच संबंधित उपचार करून घ्यावेत. गर्भातील अर्भक सुदृढ राहण्यासाठी गर्भवती स्त्रीने स्वत:च्या आरोग्याबद्दल जागरूक असणं महत्त्वाचं असतं. फॅशनच्या नावाखाली स्त्रियांमध्येही आजकाल व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढत आहे. मद्यपान, धूम्रपान, गुटखा, तंबाखूचं सेवन स्त्रीच्या आरोग्यासाठीही घातक ठरतं. त्यामुळे मुख कर्क रोगासारख्या जीवघेण्या आजारालासुद्धा आमंत्रण मिळण्याची शक्यता असते. रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांनी आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. या काळात शरीराच्या इतर व्याधीसोबतच दातांशी निगडित समस्याही जोर धरतात. दात शिवशिवणं, हलणं, दातांची मुळं उघडी पडणं, अकाली दात काढल्यामुळे चर्वणांवर परिणाम होऊन संपूर्ण आरोग्य ढासळणं, दात, हिरडय़ा, जबडा आणि त्यांचा सांधा दुखणं, दात किडणं असे अनेक विकार जडतात. आधीच ढासळत चाललेल्या शारीरिक शक्ती आणि रजोनिवृत्तीच्या वेळेस होणाऱ्या शारीरिक बदलांमुळे दंतसमस्या जास्त त्रासदायक ठरतात. आज दंत-तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे चाळिशीनंतरही दात न काढता अनेक आधुनिक पर्यायांद्वारा उपचार करणं शक्य झालं आहे. या नवनवीन उपचार पद्धतींचा अवलंब करून दंत आरोग्यासोबतच संपूर्ण आरोग्यही अबाधित ठेवता येतं.

दिवसांतून दोन वेळा ब्रश करावा.
हिरडय़ांना नियमित मसाज करावा.
काहीही खाल्ल्यास लगेच चूळ भरावी म्हणजे अन्नकण अडकून हिरडय़ांचे विकार व दंतक्षय होणार नाही.
आहारात रेषेयुक्त, भाज्या, फळं, कडधान्य इत्यादींचा समावेश करावा.
वर्षातून किमान दोनवेळा दंततज्ज्ञांकडून आपल्या दातांची तपासणी करून घ्यावी.
गर्भावस्था राहण्यापूर्वीच आपले दंतारोग्य तपासून घ्यावं. रोग आढळल्यास लगेच उपचार करून घ्यावेत.
औषधांचा अयोग्य, निर्थक, अनावश्यक वापर टाळावा.
दंतारोग्यास घातक ठरणा-या सवयींपासून दूर राहावं.
आजकाल अनेक आधुनिक उपचार पद्धती सहज उपलब्ध आहेत. दात किडल्यावर सिमेंट, चांदी किंवा कम्पोझिट, सिरॅमिक फीलिंग यांसारखे दातांच्या सौंदर्यात भर घालणारे पर्याय उपलब्ध आहेत.
चेह-याचं सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी दात काढणं शक्यतो टाळावं. ‘रूट कॅनेल ट्रीटमेंट’ करून दात पुन्हा क्रियाशील ठेवता येतो.
दात अकाली काढल्यास, स्ट्रोक पडल्यास उपलब्ध विविध पर्याय निवडून वेळेत दात बसवून घ्यावेत.
स्वत:सोबत आपल्या कुटुंबाचं आरोग्य आपल्या हाती आहे, ही जाण स्वत: स्त्रीने ठेवायला हवी. स्वत:च्या आरोग्याकडे जागरूकतेने पाहून आपणच आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.


डॉ. संगीता अंभोरे
http://www.prahaar.in/mukta/4353.htmlNo comments:

Post a Comment

Visit Our Page