Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Tuesday, October 20, 2015

सुप्रजनन - आयुर्वेदाच्या चष्म्यातून

सुप्रजनन - आयुर्वेदाच्या चष्म्यातून
गर्भावस्थेत किंवा प्रसूतीच्या दरम्यान माता-बालक मृत्यूचे प्रमाण अन्य देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक आहे. लोकसंख्येच्या मानाने अपुऱ्या वैद्यकीय सुविधा हे त्याचे एक महत्वाचे कारण नक्कीच आहे. त्याशिवाय मुलीचे लग्नाचे वय हा देखील दुसरा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे.
आयुर्वेदानुसार पुत्रप्राप्तीसाठी मुलीचे वय १६ वर्ष तर मुलाचे २१ वर्ष असावे. ह्या वयात गर्भधारणा झाली तर होणारे अपत्य सुदृढ होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. शिक्षणाचा वाढता कालावधी, स्वतंत्र कुटुंबपद्धती, लग्नासाठी कायद्याची वयोमर्यादा, आर्थिक स्थैर्याची निकड, कार्यक्षेत्रात पदोन्नती अशा अनेक बाबींमुळे लग्नाचे वय वाढत जाते. परिणामी गर्भधारणा उशिरा होते. तणावग्रस्त जीवनशैली, धकाधकीचे वेळापत्रक, अनैसर्गिक रसायने व कृत्रिम रंगांनी ठासून भरलेली फास्ट फूड्स, व्यायामाची उणीव अशा कारणांमुळे शरीरात पेशीघातक परमाणूंची (फ्री रॅडिकल्स) निर्मिती होते. ह्या फ्री रॅडिकल्सचा घातक परिणाम जननयंत्रणेवर सातत्याने होत असतो. त्यात नव्याने भर पडली आहे विद्युतचुंबकीय उपकरणांची.
मोबाईल फोन, कॉम्प्युटर स्क्रीन, टीव्ही स्क्रीन, मायक्रोव्हेव, फ्लुरोसंट लाईट्स, ब्ल्यू टूथ सारखी असंख्य उपकरणे दैनंदिन व्यवहारात आता अगदी जीवनावश्यक होत आहेत. त्यांचा अनिष्ट परिणाम पुरुष आणि स्त्रीच्या जननक्षमतेवर अगदी रजोदर्शन काळापासून तर रजोनिवृत्तीपर्यंत होत असतो. पॉलिसिस्टिक ओव्हरियान सिंड्रोमचा (पी.सी.ओ.एस.) वाढता प्रादुर्भाव हा कदाचित त्याचाच परिणाम असू शकेल. विद्युतचुंबकीय लहरींपासून होणाऱ्या घातक किरणोत्सर्जामुळे संप्रेरकांचे (हॉर्मोनल) संतुलन बिघडते व त्यातूनच ह्या विकाराची बहुधा उत्पत्ती होते असे निष्कर्ष सापडतात.
दहा महिन्यांची गर्भावस्था:
अगदी ऋग्वेदापासून तर सत्यनारायणाच्या कथेपर्यंत मानवी गर्भावस्थेचा काळ दहा महिन्यांचा असल्याचे संदर्भ वाचण्यात आले आहेत. ह्याशिवाय चरक संहिता, काश्यप संहिता, हारित संहिता, भावप्रकाश अशा आयुर्वेदीय ग्रंथातही गर्भावस्था दहा महिन्यांचीच असल्याचे म्हटले आहे. ह्याबद्दल विचारमंथन करतांना अष्टांगहृदयातील एक श्लोक आठवला “मासि मासि रजः स्त्रीणां रसजः स्रवति त्र्यहम् l”. ह्याचा अर्थ स्त्रीला दर महिन्याला ऋतुस्राव होतो व तो तीन दिवस असतो. ह्या श्लोकाच्या आधारे महिना शब्दाचा अर्थ ग्रंथकर्त्यांना हा ऋतुदर्शनाचा कालावधि अपेक्षित आहे हे स्पष्ट दिसते. प्रत्यक्षात हा काळ २८ दिवसांचा असतो. असे १० महिने म्हणजे बरोबर २८० दिवस होतात. जगातील ८५% प्राकृत प्रसूती ह्या २८० व्या दिवशी होतात असा संदर्भ मिळतो. त्यादृष्टीने महिना म्हणजे २८ दिवसांचा कालावधी मानणे नक्कीच शास्त्रशुद्ध आहे. आयुर्वेदाच्या बिनचूकपणाचे हे एक उदाहरण नक्कीच समजता येईल.
अष्टांगहृदयात अशा दहा महिन्यांच्या गर्भावस्थेसाठी दहा औषधी कल्प दिले आहेत. ह्या कल्पांना सामान्यतः “मासानुमासिक कल्प” म्हणतात. २८ दिवसांच्या महिन्याच्या गणतीनुसार हे कल्प नक्कीच योग्य आहेत. सखोल अभ्यास केल्यावर लक्षात येते की हे कल्प गर्भाच्या सर्वांगीण पोषणासाठी व मातेच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. ह्या कल्पांचा वापर गर्भधारणेचा संकल्प निश्चित केल्यावर सुरु करावा. प्रत्येक कल्प हा येणाऱ्या पुढच्या महिन्याच्या पूर्वतयारीच्या दृष्टिकोनातून तयार केला आहे.
“औषधी गर्भसंस्कारांचे“ पूर्वकर्म . . . पंचकर्म:
गर्भधारणेपूर्वी काही विशिष्ट उपाययोजना करावी असा आयुर्वेदाचा सल्ला आहे. त्यात प्रथम पंचकर्मांने शरीरशुद्धी करून दोषांचे योग्य संतुलन साधणे हे एक महत्वाचे कार्य आहे. पंचकर्मात वमन (उलटी करणे), विरेचन (जुलाब), बस्ति (औषधी द्रव्यांच्या सहाय्याने एनिमा), नस्य (नाकात औषध टाकणे) व रक्तमोक्षण (रक्त काढणे) अशा ५ क्रिया आहेत. ह्याच पाच क्रियांना ‘शुद्धिक्रिया’ असेही म्हणतात. शुद्धी म्हणजे स्वच्छता. अर्थात ह्या क्रियांमुळे शरीर स्वछ होते, दोषांचे संतुलन राखले जाते. ही स्वच्छता करण्यामागे एक वेगळा विचार आहे.
गर्भधारणेच्या प्रक्रियेत पुरुषबीजाचे स्त्रीबीजाबरोबर मिलन घडून गर्भधारणा होते. म्हणजेच स्त्री शरीरात हा एक नवीन पाहुणा येतो. आपल्या घरी कोणी पाहुणा येणार असेल त्यावेळी आपण घराची जशी स्वच्छता करतो, सर्व वस्तू आपापल्या जागी ठेवतो, फ्लॉवर पॉट सजवतो, पडदे-चादरी बदलतो तसेच सर्व काही ह्या पाहुण्यासाठी पण केले तर पाहुणा आनंदित होणारच. येणारा पाहुणा सुद्धा जर आनंदी स्वभावाचा, निरोगी, मनमिळावू व स्वच्छ असेल तर भेटीचा आनंद द्विगुणित होतो. दररोज मल मुत्र साफ होत असले तरी सुद्धा अशी शरीर शुद्धी का करावी असा प्रश्न आपल्या मनात नक्कीच येईल. घरी दररोज झाडझूड करूनही आपण सणासुदीला जेव्हा कपाटे, पलंग व अडगळीच्या जागा स्वच्छ करण्यास सुरुवात करतो त्यावेळी लक्षात येते की अशा ठिकाणी किती घाण साठली आहे. ही स्वच्छता जर अशा प्रसंगी केली नाही तर त्याचे अनिष्ट परिणाम पुढे नक्कीच पहावयास मिळतात. ह्या दृष्टिकोनातून गर्भधारणेपूर्वी पंचकर्मांचे महत्व निर्विवाद आहे हे स्पष्ट आहे.
निरोगी व सशक्त पुरुषबीजासाठी . . . .
निरोगी गर्भधारणेसाठी आयुर्वेदाने सुदृढ पुरूषबीज व स्त्रीबीजाच्या निर्मितीवर विशेष भर दिला आहे. विद्युतचुंबकीय उपकरणांपासून निर्माण होणाऱ्या किरणोत्सर्जनाचा दुष्परिणाम पुरुष व स्त्रीबीजावर होतो. अशा दोषांचे निराकरण करण्याची किमया आयुर्वेदीय औषधी कल्पांमध्ये आहे. आयुर्वेदिक व्यावसायिक दैनंदिन चिकित्सेत असे कल्प वापरत आहेत. शुक्रवर्धक, वाजीकर, शुक्रस्तंभक असे विविध गुण वनस्पतींमध्ये आढळतात. ह्याशिवाय रेडिओ प्रोटेक्टिव गुणधर्मही त्यापैकी काही वनस्पतींत आढळतात. अशा कल्पांचे सेवन पुरुषाने किमान २ महिने करावे आणि मगच गर्भधारणेचा संकल्प करावा. व्यावसायिकांनी डोळसपणे औषधी कल्पांतिल घटकांचा विचार करून मगच चिकित्सेत वापर करावा.
निरोगी व सक्षम स्त्रीबीजासाठी . . . .
पुरुषबीजाप्रमाणेच स्त्रीबीजही निरोगी व गर्भधारणेसाठी सक्षम असणे नितांत आवश्यक आहे. आयुर्वेदात सुयोग्य फलधारणेसाठी अत्यंत प्रभावी औषधी कल्प वर्णन केलेले आहेत. बीजकोषातून स्त्रीबीजाची परिपक्वता योग्यवेळी होण्यासाठी व गर्भाशयाची स्थिती सुधारून गर्भधाराणेसठी योग्य करण्यासाठी ह्या औषधी कल्पांचा उपयोग होतो. नवीन संशोधनात असे निदर्शनास आले आहे की फलघृत पाठातील १८ वनस्पतींपैकी १० वनस्पती रेडिओ प्रोटेक्टिव आहेत. “एतत्परं च बालानां ग्रहघ्नं देहवर्धनं” (अष्टांगहृदय, उत्तरस्थान ३३/६७) ह्या श्लोकानुसार ‘ग्रहघ्न’ ह्या शब्दाचा अर्थ ग्रंथकर्त्यांना “ग्रहांपासून उत्पन्न होणाऱ्या कॉस्मिक किरणांपासून संरक्षण” असा अभिप्रेत असावा असे वाटते. ग्रंथनिर्मितीच्या काळात मोबाईल किंवा अन्य विद्युतचुंबकीय उपकरणे नसल्याने ग्रहांच्या स्वरूपात किरणोत्सर्जन असा तर्क करणे चुकीचे होणार नाही. अशा किरणोत्सर्जाचा दुष्परिणाम, त्यापासून संरक्षण करण्याची गरज आणि उपाय शास्त्राने आपल्याला सांगितले आहेत.
पहिल्या महिन्यासाठी -
रजोदर्शनाचा अपेक्षित दिवस उलटून गेल्यावरच बहुधा गर्भधारणा झाल्याचे लक्षात येते. तोपर्यंत पहिला महिना संपत आला असतो किंवा संपून गेलेला असतो. मग पहिल्या महिन्यासाठी सांगितलेला औषधी कल्प नेमका केव्हा सुरु करावा असा संभ्रम निर्माण होतो. पहिल्या महिन्याच्या पाठाचा सखोल अभ्यास केल्यावर आपल्या लक्षात येईल की ह्यातील वनस्पती गर्भधारणेची पूर्वतयारी करण्यासाठीच योजलेल्या आहेत. ह्या पाठातील पहिलीच वनस्पती आहे ‘जेष्टमध’. छातीत साठलेल्या घट्ट कफाला पातळ करून बाहेर काढून टाकण्यासाठी ह्या वनस्पतीचा वापर सर्वांना माहिती आहे. गर्भाशय व बीजवाहिनीमध्ये असलेल्या अंतस्त्वचेची रचना व श्वासवाहिनीतील रचना ह्यात साधर्म्य आहे. जेष्टमधाचा उपयोग ह्याही ठिकाणी “कफनिस्सारक” स्वरूपाचा होतो. योनिमुखासमीप श्लेष्मल पेशी फार घन असतील तर पुरूषबीज फालावाहिनी पर्यंत जाऊ शकत नाहीत. जेष्टमध सेवनामुळे ह्या श्लेष्मल पेशींना द्रवता किंवा तनु स्वरूप प्राप्त होते व बीजवहनाचे कार्य सुरळीत होते. ह्याचा दुसरा फायदा म्हणजे फलधारणा झाल्यावर बीजवाहिनीतून फलकोश गर्भाशयात स्थानापन्न होण्यास मदत होते. बीजवाहिनीतील स्निग्धपणा सुधारल्यामुळे फलकोष विनाअडथळा प्रवास करू शकतो आणि बीजवाहिनीअंतर्गत गर्भधारणा (एक्टोपिक प्रेग्नन्सी) होण्याची शक्यता टळते. ह्या सर्व गुणधर्मांचा विचार करता गर्भधारणेची पूर्वतयारी करण्यासाठी हा एक उत्तम कल्प ठरतो. मूत्रतपासणी करून गर्भधारणा निश्चिती झाल्यावर शेवटच्या रजस्त्रावाच्या दिवसापासून २९व्या दिवशी दुसऱ्या महिन्याचा कल्प वापरण्यास सुरुवात करावी.
दुसऱ्या महिन्यासाठी -
गर्भावस्थेच्या दुसऱ्या महिन्यात फोलिक अम्लाची विशेष गरज असते. ह्या पाठात वर्णन केलेल्या काळ्या तिळामध्ये फोलिक अम्ल प्रचुर मात्रेत उपलब्ध आहे. काही गर्भिणींमध्ये अंतःस्रावी ग्रंथींचे संतुलन बदलल्यामुळे पहिल्या तीन महिन्यात रजःस्रावाच्या नियत काळात हलका रक्तस्राव होतो. शिवाय मळमळ, उलट्या, पित्त, घशाशी जळजळ अशी लक्षणे होतात. ह्या लक्षणांवर नियंत्रण करण्याची क्षमता ह्या पाठात आहे.
तिसऱ्या महिन्यासाठी –
तिसऱ्या महिन्यात मॉर्निंग सिकनेस (मळमळ, उलट्या, भूक मंदावणे, चक्कर, आळस) अशी लक्षणे उत्पन्न होतात. नैसर्गिक गर्भपोषक व्हिटामिन्स A, B 1, B 2, C, E तसेच मँग्नेशियम, फॉस्फ़रस, कॅल्शियम ह्यांचा संतुलित संगम साधण्याचे कौशल्य ह्या वनस्पतींच्या मिश्रणात आहे. गर्भारपणातील मधुमेहाचे नियंत्रण व मळमळ उलट्या काबूत ठेऊन गर्भपोषणाचे कार्य चोखपणे करणारा हा पाठ ग्रंथात वर्णन केलेला आहे.
चौथ्या महिन्यासाठी -
होर्मोन्सचे संतुलन व्यस्त झाल्यामुळे गर्भावस्थेच्या ह्या काळात मधुमेह व उच्च रक्तदाब हेउपद्रव अधिक संभवतात. ह्याच काळात गर्भनाभी नाडीचे कार्य सुरळीतपणे चालू होते. त्यासाठी उत्तम शर्करा नियामक, पेशीरक्षक व इम्युनोग्लोब्युलिन्स वहनकार्य सुधारून गर्भाची व गर्भिणीची काळजी घेणारा हा गुणकारी पाठ ह्या काळात अतिशय उपयुक्त ठरतो.
पाचव्या महिन्यासाठी -
ह्या काळात गर्भाचा आकार वाढून मणक्यांवर थोडा अधिक भार पडू लागतो. त्यामुळे पाठदुखी सुरु होते. उदराचा दाब वाढल्यामुळे गुदभागातील शिरांवर दाब पडून मुळव्याधीचा त्रास होऊ लागतो. यकृत प्लीहेची निर्मिती होऊन रक्तपेशी तयार होऊ लागतात. रक्तकण निर्मितीसाठी उपयुक्त वनस्पतींचा अंतर्भाव ह्या पाठात आहे. नैसर्गिक कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न व झिंक असल्यामुळे पाठदुखीवर ह्या वनस्पती उपयोगी तर होतातच शिवाय जंतुसंसर्ग नियामक (अँटिबॅक्टेरियल) गुणांमुळे संसर्गजनित रोगांपासून बचाव होतो.
सहाव्या महिन्यासाठी -
ह्या महिन्यात गर्भिणीच्या वजनात जवळपास ६ किलो वाढ होते. त्यामुळे पाठदुखी अधिक वाढू शकते. गर्भाशयाचा आकार वाढतो व मुत्रप्रवृत्ती वारंवार होऊ लागते. पायांवर सूज येऊ लागते, चेहऱ्यावर आणि मानेवर शिरांचे जाळे दिसू लागते. जननेन्द्रियाकडे व स्तनांकडे रक्ताभिसरण वाढते. मळमळ, उलट्या, घशाशी जळजळ ही लक्षणे कमी होतात. परंतु मूत्रमार्गात जंतुसंसर्ग होण्याची शक्यता ह्या काळात जास्त असते. काळजी न घेतल्यास हा जंतुसंसर्ग वृक्कांना इजा होऊ शकते. ह्या लक्षणांचे नियंत्रण करण्याचे वृक्कसंरक्षक, शोथनाशक, कॅल्शियम, लोह, प्रथिने, ताम्र आणि बी व्हिटॅमिनस् युक्त गुण ह्या पाठातील वनस्पतींमध्ये आहेत.
सातव्या महिन्यासाठी -
गर्भावस्थेच्या निरनिराळ्या अवस्थांमध्ये विविध हॉर्मोन्सची आवश्यकता बदलत असते. सातव्या आणि आठव्या महिन्यात खासकरून प्रोजेस्टेरॉन नावाच्या हॉर्मोनची गरज सर्वाधिक असते. हे प्रोजेस्टेरॉन नैसर्गिक स्वरुपात प्राप्त करून देणारी वनस्पती ह्या पाठात सापडते. आधुनिक यंत्रणा, रसायनशाळा, प्रयोगशाळा अशी कोणतीही सुविधा नसतांना हजारो वर्षांपूर्वी ही वनस्पती आयुर्वेदात कशी शोधून काढली असेल हे कोडे आज सुटणे शक्य वाटत नाही. ह्या काळात गर्भाची रोगप्रतिकारक्षमता विशेष वाढीस लागते. आयुर्वेदात ह्याला ‘ओज’ म्हणतात. मातेच्या शरीरातून हे ओज, बालकाच्या शरीरात गर्भ-नाभी नाडी द्वारे जाऊ लागते परंतु काहीशा अस्थिर स्वरुपात असते. हे काम स्थिर स्वरुपात करण्यासाठी सातव्या महिन्याच्या पाठातील वनस्पती उत्तम कार्य करतात.
आठव्या महिन्यासाठी -
ह्या महिन्यात सेवन करण्यास सांगितलेल्या बहुतेक सर्व वनस्पती मुळांच्या स्वरूपात आहेत. ह्यात एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे मुळे झाडाला स्थैर्य देतात व जमिनीतील पोषक घटक झाडाच्या पाना-फुलांपर्यंत पोचवतात. आठव्या महिन्यात गर्भाला स्थैर्य देऊन पोषण करणे ह्या दोन सर्वात महत्वाच्या गोष्टी ह्या मुळांच्या माध्यमाने साध्य होतात. गर्भपोषणासाठी माल्टोझ, आयनोसिटॉल सारख्या आवश्यक अशा विविध जातीच्या शर्करा व अमिनो अॅसिड्स ह्या वनस्पती संयुगातून मिळतात. प्रभावी पेशीरक्षकांबरोबरच (अँटिऑक्सिडंट) यकृत, हृदय, वृक्क (किडनी), फुप्फुस, अस्थि-स्नायु व गर्भाशय ह्या रचनांना बळ देण्याचे कार्य ह्या संचामुळे होते. स्तन्य निर्मितीसाठी उपयुक्त यंत्रणा देखील ह्याच वनस्पतींनी कार्यान्वित होते.
नवव्या महिन्यासाठी -
बालकाचे शिर श्रोणी प्रदेशात स्थिर होते व बहुतेक प्रसूती पर्यंत त्याच स्थितीत राहते. ह्या काळात रसनेन्द्रिय पूर्णपणे कार्यक्षम होते. बालकाला गोड आंबट अशा चवी कळू लागतात. हात पाय ताणण्याची आणि भरपूर हालचाली करण्याची किमया सुरु होते. फुफ्फुसेही पूर्ण सक्षम झालेली असतात. ३५ व ३६ व्या आठवड्यात बालकाची लांबी (बालक उभे राहू लागल्यानंतर उंची म्हणतात) अधिक वाढत नाही कारण गर्भाशयाची क्षमता मर्यादित असते. ह्या काळात गर्भिणीला मूत्रप्रवृत्ती करण्यास जरा त्रास वाटतो. ह्या पाठातील वनस्पतींचा विशेष उपयोग गर्भाशयाच्या स्नायूंना सामर्थ्य देण्यासाठी होतो. जखमा लवकर भरून काढण्यासाठी तसेच स्तन्यप्रवर्तनासाठी आवश्यक गुण ह्या संचात आहेत. श्लेष्मल संस्थेचे पोषण करण्याच्या गुणामुळे प्रसव मार्गातील ओलावा किंवा स्निग्धपणा सुधारून प्रसवकार्य सुलभ करण्यास ह्या वनस्पती उपयोगी ठरतात.
दहाव्या महिन्यासाठी -
दहावा महिना, बालकाच्या आगमनाची हुरहुर लावणारा महिना. प्रसूतीच्या आधी १ ते २ आठवडे बालकाचे श्वसनाचे व्यायाम कमी होत जातात. गर्भजल मोठ्या प्रमाणात श्वसन मार्गात शोषले जाते. त्याचा परिणाम बालकाच्या श्वासाची घुर-घुर ह्या लक्षण स्वरूपात जन्मानंतरही काही काळ राहतो. गर्भजल कमी होऊन बालकाच्या त्वचेवर एक चिकट असा पांढरा कवचसदृश थर तयार होतो. ह्याला ‘व्हर्निक्स’ म्हणतात. हा थर घालवण्यासाठी गायीचे तूप आणि सैंधव हलक्या हाताने चोळावे. ह्याने त्वचा स्वच्छ होते, कांती उत्तम राहते व जंतुसंसर्गापासून संरक्षण होते. वृक्क (किडनी), फुप्फुस, अस्थि-स्नायु व गर्भाशय ह्या रचनांना बळ देण्याचे कार्य ह्या संचामुळे होते. स्तन्य निर्मितीसाठी उपयुक्त यंत्रणा देखील ह्याच वनस्पतींनी कार्यान्वित होते. गर्भावस्थेत एकंदरीत अधिक विश्रांती आणि सकस आहार घेण्यामुळे अन्नाचे पचन मंदावते आणि आमाची निर्मिती होते. ‘आम’ हा घटक अनेक रोगांचे मूळ होऊ शकतो म्हणूनच ह्या पाठात सुंठीचा समावेश केलेला दिसतो.
गर्भावस्थेतील अन्य काही लक्षणे -
स्ट्रेच मार्क्स (तणाव चिन्ह), प्रसूतीनंतर येणारा थकवा, दुधाची कमतरता, वयामुळे प्रसवमार्गात निर्माण होणारा कोरडेपणा, स्नायूंची शक्ती आणि लवचिकता कमी होणे अशा अनेक अडचणींवर खात्रीशीर उपाय आयुर्वेदात वर्णन केलेले आहेत. त्याबद्दल थोडक्यात माहिती:
स्ट्रेच मार्क्स -
स्ट्रेच मार्क्सला आयुर्वेदात ‘किक्किस’ म्हणतात. त्वचेचा रंग बदलणे, जळजळ होणे, खाज सुटणे, सुरकुत्या पडणे अशी लक्षणे गर्भिणीच्या उदर त्वचेवर होतात. गर्भाची जसजशी वाढ होते तसतशी ही लक्षणे वाढत जातात. कधीकधी तर त्वचा अगदी जळल्यासारखी दिसू लागते. ह्या लक्षणाची दखल आयुर्वेदाने आधीच घेतली आहे. सौंदर्य हे केवळ चेहऱ्याच्या त्वचेवर अवलंबून नसते तर शरीराच्या अन्य भागांवरही सौंदर्याच्या दृष्टीने लक्ष ठेवण्याची गरज आहे. म्हणून ग्रंथात ह्यावर खात्रीशीर उपाय वर्णन केला आहे. गर्भावस्थेच्या चौथ्या महिन्यापासून हा उपाय करण्याची आवश्यकता असते. “कुवस्त्रता शुभ्रतया विराजते” असे एक संस्कृत सुभाषित आहे. म्हणजे एखादे वस्त्र जरी हलक्या दर्जाचे असले तरी ते स्वच्छ असल्यास शोभून दिसते. कोणाचा वर्ण गोरा किंवा काळा असला तरी नितळ, स्वच्छ असेल तरच शोभतो. किक्किस पासून संरक्षण करण्यासाठी कणेर, मंजिष्ठा, दारुहळद, यष्टिमधु, तुळस, पटोल पत्र, निंब, वाळा आणि चंदन ह्यांचा ताजा लेप उदरावर करावा असे ग्रंथात सांगितले आहे. त्याऐवजी ह्याच वनस्पतींनी सिद्ध केलेले तीळ तेल वापरले तरी चालू शकते.
प्रसुतीनंतरचा थकवा -
गर्भधारणा झाल्यापासून गर्भाच्या पोषणासाठी मातेच्या शरीरातून प्रत्येक धातूचा सारभाग सूक्ष्म प्रमाणात वापरला जातो, त्यातूनच गर्भाचे सर्व अंग प्रत्यंग तयार होतात. परिणामी गर्भिणीच्या शरीरात क्षीणता निर्माण होते, सर्व धातु दुर्बल होतात, त्यांची झीज होते. ही झीज भरून काढण्यासाठी, गर्भाशयाची शिथिलता घालवण्यासाठी, त्याचा प्राकृत संकोच होण्यासाठी, प्रसव काळातील श्रमांचा परिहार करण्यासाठी आणि त्यामुळे होणारा वातप्रकोप टाळण्यासाठी २५ वनस्पतींनी सिद्ध केलेले खास तेल ग्रंथात दिले आहे. अभ्यंगाचे आचरण नियमितपणे करावे. ह्याने वार्धक्य, श्रम व अनेक प्रकारचे वातरोग नियंत्रणात राहतात. अभ्यंगाने दृष्टी सुधारते, शरीर धष्टपुष्ट होते, आयुष्य वाढते, झोप शांत लागते, त्वचेची कांती सुधारते व शरीर सुदृढ बनते. डोके, कान व पाय ह्या भागांना तर अगदी नियमितपणे अभ्यंग करावे. अभ्यंगाचे हे लाभ ग्रंथात दिलेले आहेत. दिलेल्या २५ वनस्पतींनी सिद्ध केलेले हे तेल सूतिकेला अभ्यंगासाठी अत्यंत उपयुक्त आहे. प्रसूतीनंतर किमान २ महिने ह्या तेलाने अभ्यंग करावे.
दुधाची कमतरता -
स्तनपान काळात बालक सर्वस्वी मातेच्या दुधावरच अवलंबून असते, किंबहुना श्वसनासाठी प्राणवायू व्यतिरिक्त सर्वच पोषणाची संपूर्ण जबाबदारी मातेचीच असते. अशा अवस्थेत मातेच्या दुधाचे गुण सर्वोत्तम तर हवेतच आणि प्रमाणही मुबलक असणे नितांत गरजेचे आहे. नारायणी, क्लीतक, विश्वा, निशा, शृंगाटक, कलौंजी, चंद्रिका, कसेरू अशा अत्युत्तम गुणकारी वनस्पतींचे मिश्रण नियमितपणे घेतल्यास बालकाच्या सर्वांगीण पोषणाची व मातेच्या स्वास्थ्याची हमी नक्कीच देता येते. स्तनपानामुळे बालकाची रोगप्रतिकारक्षमता उत्तम राहते हे सिद्ध झाले आहे म्हणून अशा उत्पादनाची आवश्यकता अनिवार्य आहे.
प्रसवमार्गात कोरडेपणा -
आधी वर्णन केलेल्या, मुख्यतः वयाच्या वाढीमुळे प्रसवमार्गातील स्निग्धता किंवा ओलावा कमी होतो, स्नायूंची शक्ती आणि लवचिकता कमी होते, श्रोणिभागात ताठरपणा (रिजिडिटी) वाढतो. त्यामुळे प्रसवक्रियेत अडथळा येऊन फोर्सेप्स, एपिझिओटॉमी किंवा सिझर करण्याची पाळी येऊ शकते. अशी आपत्ती टाळण्यासाठी सुश्रुताचार्यांनी ‘मधुर कषाय द्रव्यांनी युक्त स्नेह दुधाबरोबर सिद्ध करून’ बस्ति व पिचुधारणासाठी वापरण्यास सांगितले आहे. त्रिफळा, यष्टिमधु व हरिद्रा ह्या वनस्पती स्वगुणांनी बस्ति व पिचुधारणासाठी सर्वश्रेष्ठ ठरतात. ह्या सिद्ध तेलाचा मात्राबस्ति आठवड्यातून २ वेळा व पिचुधारण दररोज रात्री ९व्या महिन्यापासून तर प्रसूती होईपर्यंत करावा. नुसते तीळ तेल वापरूनही अनेक वैद्यांनी ह्या प्रयोगाचे किती लाभ होतात हे सिद्ध केले आहेत.
शेवटी थोडक्यात महत्वाचे -
तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार सकस आहार, सुयोग्य व्यायाम, पंचकर्म, मानसिक स्वास्थ्य, उत्तम औषधयोजना अशा सर्व बाबींचा संतुलित वापर केल्यास माता-बालक स्वास्थ्य सर्वोत्तम राहण्यात काही कमतरता राहू शकत नाही. मानसिक, आध्यात्मिक किंवा भावनिक संस्कारांव्यातिरिक्त “औषधी गर्भसंस्कार” करणे म्हणजेच “गर्भविकास व मातृपोषणाचा अद् भुत संगम” साधणे होय.

No comments:

Post a Comment

Visit Our Page