Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Tuesday, October 20, 2015

सुलभ प्रसव व सुप्रजेसाठी उपाययोजना.........

सुलभ प्रसव व सुप्रजेसाठी उपाययोजना.........

सुलभ प्रसव, सुप्रजा व प्रजनन आरोग्य ही संकल्पना चरक, काश्यपादि काळापासून चिंतनीय मानली जाते. ह्यासाठी महर्षि काश्यप ह्यांनी ‘काश्यपसंहिता’ हा ग्रंथ साकारलेला आहे. ह्या ग्रंथात बालकांच्या सुदृढपणाचे रहस्य दडलेले आहे. ह्याउलट चरकसंहिता, अष्टांगसंग्रह इ. ग्रंथात माता व बालक ह्या दोघांच्या जीवित्वाची हमी, सुलभ प्रसवाचे उपाय, सुप्रजा व यशस्वी बाळंतपणाची जबाबदारी तत्कालीन समयी घेण्यात आलेली आहे. त्यामुळे सुप्रजननाची संकल्पना अनादि कालापासून चालत आलेली आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
प्रजनन आरोग्यामध्ये प्रजनन क्षमता, प्रजनन नियमन व गरोदरपणापासून प्रसवापर्यंत सर्व अवस्था सुखरूप होणे ह्या गोष्टींचा समावेश होतो. गरोदरपण व लैंगिक आजारांचा संसर्ग ह्या भीतीपासून मुक्त करणे, लिंगभेद, वृद्धत्व, स्त्रियांना सक्षम करणे, मासिक पाळीतील आरोग्य इत्यादि विषयांचा समावेश प्रजनन आरोग्यामधे होतो. ह्या लेखामधे सुलभ प्रसव व सुप्रजा ह्या दोन बाजूंचा आपण परामर्ष घेऊया.
सुप्रजा निर्मिती कशासाठी ?
भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली आहे. ह्यात गर्भाधानापासून अंतेष्टीपर्यंत सोळा संस्कार वर्णन केलेले दिसतात. हे संस्कार क्रमाने गर्भाधानापासून प्रसवापर्यंत व बालकाच्या जन्मापासून विवाहापर्यंत केल्यास सुप्रजा निर्मिती होऊ शकते. यंत्रतंत्र युगात जगत असताना हे कसे शक्य आहे? असा विचार दांपत्याच्या मनामध्ये येऊ शकतो. पालकांनी आता विचार करायला हवा की देशाची शक्ती केवळ लोकसंख्येवर नव्हे तर सुसंस्कारित अपत्यांना जन्म देण्यामध्ये आहे. देशाच्या प्रतिमेची काळजी आता प्रत्येकानेच करायला हवी.
मातृत्व ही प्रेमाचा गौरव करणारी घटना आहे. ह्यासाठी डझनावारी मूलं जन्माला घालण्याची आवश्यकता नाही. सुसंस्कारित अशी एक किंवा दोन अपत्ये पुरेशी आहेत. जन्मच द्यावयाचा असेल तर जन्म देण्यायोग्य विवेकानंद, शिवाजी, ज्ञानेश्वर, श्रीकृष्ण, बुद्ध, नागार्जुन, चरक, सुश्रुत आणि काश्यप ह्यांना द्यायला हवा, जो मातापित्यांची प्रतिमा उजळवेल, आपल्या परिवाराचा व देशाचा विकास करेल अशांनाच जन्माला घालावे.
सुप्रजाजनन शक्य आहे काय?
मनुष्याचा शारीरिक व बौद्धिक विकास होऊ लागला तेव्हा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य पण त्याला मिळाले. स्त्री-पुरुषांनी केवळ आनंदासाठी एकत्र येणे वेगळे मात्र सुप्रजननासाठी दोघे जेव्हा एकत्र येतात तेव्हा काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. आपण इतर गोष्टींमध्ये वैज्ञानिक चिंतन करतो, पण स्वत:बाबत मात्र ते करत नाही. स्वतःबाबत मात्र आपण मोठे अवैज्ञानिक आहोत. बागेतील फुलझाडांची आपण जशी काळजी घेतो तसेच आपल्या बाबतीतही करायला हवे. एखादी गोष्ट घडण्यापूर्वी त्या गोष्टीबद्दल सर्वांगीण विचार करावा. गोष्ट घडून गेल्यावर उहापोह करण्यात अर्थ नाही. म्हणून विवाहाबाबत शास्त्रमर्यादा पाळावी. शास्त्रविहित वयात विवाह होऊन गर्भधारणा झाल्यास मूल अधिक संपन्न होण्याची शक्यता आहे. गर्भाधानासाठी उत्तम शुक्र, निकोप स्त्रीबीज, दोहोंची व्याधिविरहित शरीरे म्हणजेच प्रजनन – विषयक कुठलाही आजार नसावा. ह्यासाठी दांपत्याने वैज्ञानिक तपासणी, उपचार ह्यांचा उपयोग करून घ्यायला हवा. कारण लुळी-पांगळी, वजनाने कमी, बुद्धिहीन, कायम आजारी असलेली मुले जन्माला येण्यापेक्षा मुलाला जन्मच न देणे निश्चितच योग्य ठरेल.
बाळाचे जीवन गर्भधारणेपासूनच सुरु होत असते. म्हणून दांपत्याने आधीपासून आचार रसायनाचे सेवन करावे. प्रत्येक दांपत्याने असा संकल्प करावा की, जो पर्यंत मी सदाचार व ध्यान करण्यास समर्थ होत नाही तो पर्यंत मी मुलाला जन्म देणार नाही. कारण चंगेजखान, नादिरशहा, हिटलर, रामन-राघवन, सद्दाम हुसैन, लादेन अशांना जन्म देऊन काय फायदा ?
बुद्धिहीनांनी लोकसंख्या वाढविणे देशाच्या दृष्टीने धोक्याचे ठरत आहे. बुद्धिहीन वर्गाला समज देऊन प्रजनन थांबविणे, कुटुंबनियोजन सक्तीचे करणे, सुप्रजाजनन, दोन मुलांमध्ये अंतर ठेवणे आता गरजेचे झाले आहे. कुटुंबनियोजन ऐच्छिक ठेवल्यास सुप्रजाजनन, प्रतिभा, बुद्धिमत्ता ह्यांची क्षती होण्याची शक्यता आहे. सुप्रजा निर्मितीबद्दल सूक्ष्मपणे विचार विचार करून आचरण केले तर देशाची प्रतिमा निश्चितच विकसित होईल ह्यात शंका नाही.
आयुर्वेद पंचकर्म आणि सुप्रजा :-
सुप्रजा निर्मितीसाठी प्रजोत्पादनास योग्य काळ, शुद्ध गर्भाशय, स्त्रीबीज, पुरूषबीज, दांपत्याचे सर्व शारीरिक व मानसिक भाव कारणीभूत ठरतात. म्हणूनच स्त्री व पुरुष ह्या दोघांनीही गर्भाधानापुर्वी स्नेहन, स्वेदन व आयुर्वेदातील पंचकर्मोपचार तज्ञाकडून करून घ्यावेत. शरीर शुद्धी झाल्यावर सात्विक आहार-विहार करावा. पुरुषाने औषधीसिद्धी तूप व स्त्री ने तेल व उडिदाचा प्रयोग वैद्याच्या मदतीने करावा. गर्भाधानकाळामधे पहिल्या महिन्यापासून ते दहाव्या महिन्यापर्यंत आयुर्वेदात वर्णन केलेली गर्भिणी परिचर्या व मासानुमासिक चिकित्सा करावी. ह्या चिकित्सेमुळे बाळाची वाढ उत्तम होते. गर्भपाताची भीती राहत नाही. गर्भिणी विषाक्ततेची शक्यता राहत नाही. पूर्णमास व प्राकृत प्रसव होतो. मृतगर्भ जन्माला येत नाही. पहिल्या तीन महिन्यांमधे होणाऱ्या उलट्या व मळमळ थांबते. गरोदरपणात मातेस झटके येत नाहीत व रक्तदाबही नियंत्रित राहतो. योनिगत रक्तस्त्राव होत नाही, सूतिका रोगाची भीती राहात नाही. शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. ह्या सर्व गुणांमुळे गर्भिणी स्त्रियांनी ही औषधे घेऊन गरोदरपणामधे होणाऱ्या गुंतागुंती टाळाव्यात. ही औषधे महाराष्ट्रात अनेक आयुर्वेद रुग्णालयातून अनेक तपे वापरात आहेत. गेल्या पस्तीस वर्षापासून म.आ.पोदार रुग्णालयात ही वापरात असून यशस्वी बाळंतपणाचे रहस्य ह्यात दडलेले आहे. समाधानी माता व तिच्या कुशीत झोपलेलं गुटगुटीत बाळ हा कुटुंबाच्या दृष्टीने आनंदाचा क्षण आहे. त्यासाठी खालील औषधे प्रत्येक मातेने आवर्जून वापरावीत.
औषधे वापरण्याची पध्दत :-
जुनी पद्धत - औषधांची पाच ग्रॅम भरड रात्रभर पाण्यात भिजत घालावी. औषधाच्या वजनाच्या दुप्पट पाणी घालून अर्धे पाणी उरेपर्यंत मंद आचेवर काढा तयार करावा. मिश्रण गाळून घ्यावे व तो काढा सकाळ – संध्याकाळ दोन वेळा घ्यावा. अशी ९ महिनेपर्यंत काढे देण्याची पूर्वी पद्धत होती.
अक्षय फार्मा रेमेडीज ह्या अनुभवसिद्ध औषध निर्मिती कंपनीने ह्या औषधी पाठांवर सखोल शास्त्रीय संशोधन करून त्यांना गोळ्यांच्या स्वरुपात सादर केले आहे. पाठांमधील प्रत्येक वनस्पतीचा सुयोग्य परिचय व त्याची कार्मुकता शास्त्रीय पद्धतीने अभ्यासून प्रसिद्ध केली आहे. ह्यात विशिष्ट नॅनोटेक्नोलॉजी सदृश शास्त्रीय निर्माण पद्धती वापरून ह्या गोळ्या गुणधर्माने अधिक श्रेष्ठ बनविल्या आहेत. काही अनुपलब्ध किंवा संदिग्ध वनस्पतींच्या ऐवजी श्रेष्ठ गुणांच्या प्रातिनिधिक द्रव्यांचा वापर करीत हे पाठ प्रचारात आणण्याचे कौतुकास्पद कार्य केले आहे. पूर्वीच्या काढ्यांपेक्षा ह्या गोळ्या घेण्यास अधिक सुलभ आहेत. स्त्रीच्या ऋतुचक्राच्या अनुषंगाने २८ दिवसांचा महिना व २८० दिवसांची म्हणजेच १० महिन्यांची गर्भावस्था ह्या शास्त्रीय सिद्धांतावर आधारित १० महिन्यांचे १० पाठ निर्माण केले.
गर्भिणी मासानुमासिक पाठ
पहिला महिना: यष्टिमधु, सागाचे बीज, शतावरी, देवदार
दुसरा महिना: आपटा, काळेतीळ, मंजिष्ठा, शतावरी
तिसरा महिना: शतावरी, प्रियंगु, श्वेत सारिवा
चौथा महिना: अनंतमूळ, कृष्णसारिवा, कुलिंजन, कमलपुष्प, यष्टिमधु
पाचवा महिना: रिंगणी, डोरली, शिवण फळ, वटांकुर, वड साल
सहावा महिना: पृश्निपर्णि, बला, शिग्रु, श्वदंष्ट्रा (गोखरू), मधुपर्णिका
सातवा महिना: शृंगाटक, कमलगट्टा, द्राक्ष, कसेरु, यष्टिमधु, शर्करा
आठवा महिना: कपित्थ, बिल्व, बृहति, पटोल, इक्षु, निदिग्धिका
नववा महिना: सारिवा, अनंता, शतावरी, यष्टिमधु
दहावा महिना: शतावरी, यष्टिमधु, सुंठ, देवदार
कुसंतती पेक्षा वांझ राहणे केव्हाही उत्तम :-
श्रीसमर्थ, श्रीचक्रधर, छत्रपती शिवाजी सारखा नरश्रेष्ठ मानव जातीचे कल्याण करतो. “आमचे काय बुवा?” म्हणून देवावर हवाला ठेवणारे दांपत्य क्लिब समजावे. म्हणून सर्वांनी शास्त्राज्ञा पाळून विधिपूर्वक सुप्रजाजनन करावे. चांगली संतती व्हावी ही प्रत्येकाची इच्छा असते, पण कृती मात्र नसते. नुसती फुंकर मारून बासरी वाजत नाही. उत्तम रागदारी बाहेर पडण्यास बोटांचा युक्तिपूर्वक उपयोग करावा लागतो. त्याचप्रमाणे सुप्रजननासाठी योग्य कृती घडली पाहिजे. संतती एकच असावी व ती पुरुषोत्तत्म अशा स्वरुपाची असावी. कन्या असेल तर ‘स्त्रीत्व’ असणारी शूर साम्राज्ञी असावी, अन्यथा खंडोगती प्रजा काय कामाची ?
सुलभ प्रसव म्हणजे काय ?
योनिमार्गाने, डोक्याकडून, माता व बालकाला कुठल्याही प्रकारची इजा न होता होणारी प्रसूती ह्यास सुलभ प्रसव म्हणता येईल.
सुलभ प्रसूतीसाठी मातृत्वाचे खालील नियम प्रत्येकाने लक्षात ठेवावे:-
1. गर्भवती स्त्री ने धुम्रपान व मद्यपान करू नये. त्यामुळे बालकास इजा होऊ शकते.
2. गर्भवती राहिल्यापासून प्रसूती होईपर्यंत दहा वेळा तज्ञांकडून तपासणी करावी.
3. प्रसूती वेळेपर्यंत मातेचे वजन दहा किलोने वाढले पाहिजे.
4. दहा तास विश्रांती, ज्यात झोप – दुपारी दोन तास व रात्री आठ तास.
5. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण दहा ग्रॅम पेक्षा कमी नसावे.
6. दहा महिन्यांपर्यंत मातेचे लसीकरण पूर्ण झालेले असावे.
7. पहिला डोस – अठरा आठवड्यात, दुसरा डोस – चोवीस आठवड्यात
8. गरोदरपणातील जोखिमीची प्राथमिक चिह्ने व लक्षणांचे ज्ञान असावे
9. गरोदर मातेला रुग्णालयात नेण्याचे नियोजन असावे.
10. प्रसूती प्रशिक्षित व्यक्तींकडून करून घ्यावी.
11. कळा सुरु झाल्यापासून दहा ते बारा तासात प्रसव पूर्ण झाला पाहिजे.
12. बालकाचे श्वसन, रोदन, ध्वनि, रंग, प्रतिक्रिया ह्या गोष्टी व्यवस्थित असाव्यात.
13. प्रसूतीपश्चात दहा आठवड्यांपर्यंत तपासणी करावी.
14. दहा महिन्यांपर्यंत बालकास स्तनपान द्यावे.
15. बालकाच्या वयाच्या दहाव्या महिनापर्यंत लसीकरण पूर्ण झालेले असावे.
16. आईचे दूध हेच बाळासाठी सर्वोत्तम आदर्श असे अन्न आहे. ‘केवळ स्तनपान’ आणि ‘बाळ रडेल तेव्हाही स्तनपान’ हा मंत्र सर्व मतांनी लक्षात ठेवावा. स्तनपान शक्यतो दोन वर्षेपर्यंत चालू ठेवावे.
गरोदरपणासाठी वर्णन केलेली सर्व औषधे घ्यावीत त्याबरोबर विशिष्ट वनस्पतींनी युक्त काढयांचा अस्थापन बस्ति आठव्या महिन्यात घ्यावा. नवव्या महिन्यापासून प्रसूतीपर्यंत योनीभागी ‘सुप्रसव पिचु तेलाचा’ पिचु दररोज रात्रभर ठेवावा. ह्या पिचुधारणेने विटपाचे कठीणत्व जाऊन त्याठिकाणी मृदुत्व येते, प्रसवमार्गात स्निग्धता निर्माण होते, योनीमार्गात लवचिकता निर्माण होऊन स्नायूंची शक्ती वाढते. ह्यामुळे विटपछेद (एपिझिओटॉमी) करण्याची वेळ येत नाही.
सुखप्रसवासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सकारात्मक विचार मातेला देता येतात. प्रसुतीच्या वेळी अशा सूचना वारंवार देऊन सुख-प्रसव घडून आणता येतो. ह्याला आश्वासन चिकित्सा म्हणतात. गर्भिणी परीक्षणामुळे व विविध तपासण्यांमुळे जोखमीच्या शक्यता शोधून काढणे सहज शक्य आहे. सुख प्रसव ही नक्कीच अवघड बाब नाही. ह्या चिकित्सा घेण्याची मातेची मानसिक तयारी हवी. केवळ प्रसूतीतज्ञ कुशल असून भागणार नाही.
प्रजनन आरोग्यातील आयुर्वेदाचा सहभाग :-
सर्वंकष प्रजनन व बाल आरोग्य सेवा ह्यात एकूण पन्नास प्रकारच्या सेवा शासन पुरवीत असते. ह्यात आयुर्वेदाचा सहभाग पुढील प्रमाणे असू शकतो.
माता – बाल संगोपन :-
प्रसूतीपूर्व तपासणी
प्रसूतीपश्चात काळजी
प्रशिक्षित व कुशल व्यक्तीमार्फत प्रसूती
सर्वंकष प्रजनन व बाल आरोग्य सेवा :-
१) लैंगिक शिक्षण
२) विवाहपूर्व समुपदेशन
३) आहार – विहार सल्ला
४) बालआरोग्य शालेय प्रशिक्षणात आयुर्वेदाचा सहभाग
५) स्पष्ट कारण नसलेल्या वंध्यत्वाबाबत मार्गदर्शन व उपचार
६) बालक अतिसारसंबंधी आयुर्वेदोक्त उपचार
७) प्रसवकालीन गुंतागुंतीचे व्यवस्थापन
८) चाळीशी नंतरची घ्यावयाची आरोग्य विषयक काळजी
९) स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान करणे.
महाराष्ट्र शासनाकडून अपेक्षा :-
1. आयुर्वेद पदवी व पदव्यूत्तर प्रशिक्षण घेतलेल्या संबंधीत विषयातील तज्ञांना आधुनिक प्रशिक्षण सक्तीने द्यावे.
2. स्त्री व पुरुष टाका व बिनटाक्याचे वंध्यत्वीकरण शस्त्रकर्म प्रशिक्षण इच्छुक वैद्यकीय व्यावसायिकांना द्यावे.
3. सुरक्षित गर्भपाताचे प्रशिक्षण इच्छुक वैद्यकीय व्यावसायिकांना मिळण्याची व्यवस्था करावी
4. राज्य सेवेतील आयुर्वेद वैदकीय अधिकारी वर्ग - २ व वर्ग - ३ ह्यांना आयुर्वेदिक औषधांचा वापर करण्याची सक्ती करावी
5. जिल्हा आयुर्वेद विस्तार अधिकारी ह्यांच्या आयुर्वेद ज्ञानाचा वापर पूर्ण जिल्ह्यात करून आयुर्वेदाव्यतिरिक्त इतर कामे त्यांच्यावर लादू नयेत.
प्रजनन आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी एकात्मिकरित्या झाली तर स्त्रियांचे सर्वांगीण आरोग्य आणि पर्यायाने समाजाचेच आरोग्य सुधारण्यासाठी प्रजनन आरोग्य सेवेचा दीर्घकाळ उपयोग होईल असे वाटते.
लेखक –
प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति,
सहयोगी प्राध्यापक,
स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग,
रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय
मुंबई ४०० ०१८
+917738086299
+919819686299
subhashmarlewar@gmail.com

No comments:

Post a Comment

Visit Our Page