Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Friday, July 15, 2016

'आयुर्वेदीय औषधांची कायदेशीर संज्ञा'

अभ्यासपूर्ण लेख....जरूर वाचा!!
'आयुर्वेदीय औषधांची कायदेशीर संज्ञा'
(आयुर्वेदिक औषधी उत्पादने म्हणजे काय ?: लेखमाला क्रमांक १)
- अमृत करमरकर
सर्वप्रथम कोणत्याही उपचार पद्धतीच्या औषधांचे व्यावसायिक विपणन करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे आपण ज्या देशात ते औषध विक्री करणार असतो त्या देशांचा विक्री परवाना (मार्केटिंग ऑथोरायझेशन) घेतले पाहिजे. या लेखामध्ये आपण भारताचा विचार करू यात. भारतामध्ये औषधे मग ती अॅलोपॅथी, आयुर्वेदिक, सिध्द, युनानी किंवा होमिओपॅथीची असोत त्यांना भारताचा ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स कायदा १९४० (सुधारित २००५, २००८) (नवीन सुधारित आवृत्ती २०१५ ची असून तिची संसदेमधील मान्यता अजून विचाराधीन आहे) लागू आहे.
सेक्शन ३ मध्ये आयुर्वेदिक, सिध्द आणि युनानी औषधे यांची संज्ञा खालील प्रमाणे दिलेली आहे: सेक्शन ३.७ अ नुसार अशी सर्व औषधे ज्यांचा शरीराच्या अंतर्गत घेण्यासाठी किंवा बाह्य उपयोगासाठी वापर केला जातो जसे की निदान, उपचार, उपशमन, किंवा प्रतिबंध यांच्यासाठी [आजार किंवा विकार जो माणसांमध्ये किंवा जनावरांमध्ये होतो, आणि उत्पादन केले जाते] जी अधिकृत पुस्तकांमध्ये दिलेल्या सुत्रीकरणानुसार (फॉर्म्यूला) बनविली आहेत [अशा पुस्तकांची नावे पहिल्या शेड्युलमध्ये दिलेली आहेत] [पहा: पृष्ठ २७-२८ : ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स कायदा १९४० (सुधारित २००५)]. अशी पुस्तके आयुर्वेदासाठी ५४ सी पर्यंत, सिध्द साठी ५५ ते ८४ पर्यंत, आणि युनानी साठी १ ते १३ अशी आहेत. या पुस्तकांमध्ये आयुर्वेदीय पुरातन संहिता (चरकसंहिता इ.), भैषज्य रत्नावली, निघंटू रत्नाकर, इ. यांचा समावेश होतो.
तर औषध (सर्व प्रकारच्या पॅथीसाठी) या संज्ञेमध्ये (सेक्शन ३.४.ब) i) माणूस किंवा प्राणी यांच्यामध्ये शरीराच्या अंतर्गत घेण्यासाठी किंवा बाह्य उपयोगासाठी ज्याचा वापर केला जातो जसे की निदान, उपचार, उपशमन, किंवा प्रतिबंध यांच्यासाठी कोणतेही आजार किंवा विकार जे माणूस किंवा प्राणी यांना होतात, ज्यामध्ये अशी उत्पादने जी डास पळवून लावण्यासाठी माणसाच्या शरीरावर लावली जातात त्यांचा देखील समावेश होतो; ii) असे पदार्थ (अन्नाव्यतिरिक्त) जे शरीराचे कार्य किंवा रचना यांवर परिणाम करता किंवा जंत इत्यादीचा नाश किंवा कीटक यांचा नाश करता जे माणसाला किंवा प्राण्यांना आजार घडवितात. iii) असे सर्व पदार्थ जे औषधाचे घटक आहेत जसे की रिकाम्या जिलेटीनच्या कॅप्सूल्स, आणि iv) अशी डीव्हाइस जी अतंर्गत किंवा बाह्य उपयोगासाठी असतात ज्यांचा वापर निदान, उपचार, उपशमन, किंवा प्रतिबंध यांच्यासाठी माणूस किंवा प्राण्यांमध्ये केला जातो.
जीएसआर ६६३ (ई) मध्ये संज्ञा ३ एच मध्ये दिलेल्या पेटंट किंवा प्रोप्रायटरी औषध याचा अर्थ असा की ज्याचे सूत्रीकरण (फॉर्म्यूला) वर उल्लेखलेल्या ५७ ग्रंथात आहे आहे परंतु त्यांमध्ये इंजेक्शन्स (पॅरेनटेरल्स) चा समावेश होत नाही.
हे लक्षात घेतले तर असे दिसून येते की आयुर्वेदिक औषध म्हणजे
१) ज्याचे सुत्रीकरण (फॉर्म्यूला) वर उल्लेखलेल्या ५७ ग्रंथात आहे (आता हे लक्षात घ्या हे फॉर्म्यूला या ग्रंथामध्ये श्लोक स्वरुपात आहेत. त्यामुळे त्यातील प्रत्यक्ष प्रमाण हे संस्कृत येत असलेल्या व्यक्तीकडून माहिती करून घेतले पाहिजे)
२) हे फॉर्म्यूला संस्कृत मध्ये असल्याने या ग्रंथातील काही फॉर्म्यूले घेऊन आयुर्वेदिक फॉर्म्युलरी ऑफ इंडियाची निर्मिती भारत सरकारच्या फार्माकोपियल लॅबोरेटोरी ऑफ इंडियन मेडिसिन यांनी केली आहे. १९७८ सालापासून याचे आजपर्यंत २ भाग प्रसिद्ध झाले असून त्यामध्ये श्लोकाबरोबरच औषधांचे आजच्या सिस्टीमनुसार प्रमाण (किलोग्राम) मध्ये दिलेले आहे.
३) औषध निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी औषधी झाडे तसेच खनिजे यांचे मोनोग्राफ दिलेले आहेत, याबरोबरच क्वालीटेटीव, क्वांटीटेटीव चाचण्या दिलेल्या आहेत.
म्हणजेच आज बाजारात जे काही औषध आयुर्वेदिक या नावाने विकले जाते ते पूर्णतः आयुर्वेदीक आहे असे म्हणायचे असेल तर त्यावर ग्रंथाचे नाव, श्लोक क्रमांक लिहलेला असेल, किंवा आयुर्वेदिक फॉर्म्युलरी ऑफ इंडियाचा फॉर्म्यूला क्रमांक असेल तरच ते आयुर्वेदिक समजावे.
हे लक्षात घेतले पाहिजे की अशी औषधे जी वरील संज्ञेनुसार पूर्णपणे आयुर्वेदिक आहेत त्यांना भारतीय कायद्यानुसार नैदानिक अनुसंधान (क्लिनिकल रिसर्च) करणे गरजेचे नाही. भारतीय कायद्यानुसार हि औषधे शतकानुशतके आयुर्वेदिक परंपरेमधून आली असल्याने त्यांना क्लिनिकल रिसर्च गरजेचा नाही.
परंतु या संज्ञेत न बसणारी म्हणजेच वैद्य तसेच औषध कंपन्यांनी सुरु केलेली औषधे ज्यांचे फॉर्म्यूला या पुस्तकात नाहीत त्यांना क्लिनिकल रिसर्च शिवाय आयुर्वेदिक म्हणून मार्केटिंग साठी मान्यता दिली जाऊ नये असे ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स कायदा तसेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसिएमआर) ची मार्गदर्शक तत्वे सांगतात. क्लिनिकल रिसर्च या प्रक्रीयेविषयी पुढील भागात सविस्तर चर्चा केली जाईल.
आता परदेशातील संज्ञा पाहूयात. एक तर आयुर्वेद या ग्रंथाला फार्माकोपिया सारखी मानके देणारा ग्रंथ म्हणून मान्यता नाही कारण आयुर्वेद हा एक ग्रंथ नाही आहे. आणि आयुर्वेदाची तत्वे सांगणारे ऋषीमुनींपासून ते प्रभाकर ओगले किंवा इत्यादी विद्वान आयुर्वेदाचार्यानी लिहिलेले ग्रंथ अनेक आहेत. त्यामुळे विचारामधील एक वाक्यता दिसून येत नाही. (विचारातील फरक का एक्स्पायरी प्रकरणामध्ये ठळकपणे चर्चिला जाईल). त्यामुळे परदेशात आयुर्वेद हि संज्ञा नाहीच आहे. तिथे आयुर्वेदिक फॉर्म्यूला हे एक तर पॉलीहर्बल या विभागामध्ये, किंवा फंक्शनल फुड्स किंवा न्यूट्रास्यूटीकल्स मध्ये गणले जातात.
लेखकाविषयी:
©अमृत करमरकर. अमृत करमरकर हे फार्मासिस्ट (बी फार्म) असून क्लिनिकल रिसर्च मध्ये क्रॅनफिल्ड विद्यापीठ, ब्रिटन मधून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे, तसेच ते सध्या क्लिनिकल रिसर्च मध्ये पी.एचडी करीत आहेत. इनक्लीनीशन औषधनिर्माण कंपनीचे ते संचालक आहेत. संपर्क: +९१७२०८८९३२५०
#आयुर्वेद, #Ayurveda, #legal, #inclinition #regulatory, #regulatoryaffairs, #pharmaceuticals

No comments:

Post a Comment

Visit Our Page