Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Sunday, July 17, 2016

#घरोघरी_आयुर्वेद


आचार्य चरकांची दूरदृष्टी की अवैद्यांची पुरातन परंपरा?!
'काही लोक वैद्यांसारखा पोषाख धारण करतात. आपल्या तावडीत कोणी रोगी सापडतोय का याचा शोध घेत सर्वत्र भटकत राहतात. एखादा रोगी सापडला की आपण जगातले असाध्यतम रोगही बरे केले आहेत अशा डिंग्या मारू लागतात. त्या रुग्णाने आधी जे उपचार घेतले असतील ते कसे चूक होते हे तावातावाने सांगू लागतात. आधीच्या वैद्यांची यथेच्छ निंदा करतात. आपण खूपच कमी पैसे घेतो वा काहीही प्राप्त करण्यासाठी उपचार करत नाही असे गोड बोलून रुग्णाच्या नातेवाईकाला आपल्या जाळ्यात फसवतात.
रुग्ण हातात आला की दहा वेळा त्याला तपासण्याचे ढोंग करतात. चेहऱ्यावर गंभीर आव आणतात. रुग्ण आपल्या आवाक्याबाहेर जातोय असं लक्षात आल्यावर मात्र त्यालाच 'तू पथ्य पाळत नाहीस; तुझ्याकडे नीट लक्ष दिले जात नाही; तुझ्याकडे मानसिक धैर्य नाही.' अशी वाटेल ती कारणे सांगू लागतात. रुग्ण मरणासन्न स्थितीत पोहचला की मात्र हे लोक तिथून काढता पाय घेऊन अन्यत्र निघून जातात.
असे लोक आपल्याला खूप ज्ञान आहे असे भासवणारे हे लोक विचारलेल्या प्रश्नांना कधीच उत्तरे देत नाहीत. विद्वान वैद्य समोर दिसल्यावर मात्र ते तोंड लपवून पळ काढतात. अशा लोकांना 'छद्मचर' म्हणजे वैद्यांचे सोंग आणणारे असे म्हणतात. खरा वैद्य हा प्राणदान करत असल्याने त्याला 'प्राणाभिसर' म्हणतात तर अशा कुवैद्यांना रोग देणारे 'रोगाभिसर' म्हणतात. असे ढोंगी हे साक्षात यमराजाचे सेवक असतात. वायूभक्षण करणाऱ्या विषारी सर्पांप्रमाणे ते असतात. अशांचा सर्वथा त्याग करावा.'
वरील भावानुवाद चरक संहिता या ग्रंथातील सूत्रस्थानात आलेल्या २९ व्या अध्यायातील सूत्रांचा आहे. आपल्या आजूबाजुची सद्यपरिस्थिती पहा; आचार्य चरकांची 'दूरदृष्टी' काय होती ते लक्षात येईल. किंवा अशा अवैद्यांचा इतिहास हा आयुर्वेदात कोणतीही 'डिग्री' देण्याची पद्धत नव्हती तेव्हापासूनचाच आहे हे लक्षात येईल!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

No comments:

Post a Comment

Visit Our Page