Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Monday, November 29, 2010

स्मृतीभ्रंश

  वृद्धावस्थेतील सर्वात नकोसा वाटणारा आजार म्हणजे विस्मरण. यामुळे त्या वृद्ध व्यक्तीनाही अतोनात त्रास होतो. या व्याधीची सुरवात छोट्याश्या गोष्टींनी होते. फ्रीजचं दार उघडणं आणि ते कशासाठी उघडलं हे ना आठवणं, कोणी घरी येणार असल्याचा निरोप सांगायला विसरणं. किल्या कुठे ठेवल्या हे ना आठवणं वगैरे.

कमलाबाई एकदा चष्मा हा शब्दच विसरल्या आणि सर्व घरात माझा गोपाळकृष्ण कुठे आहे म्हणून शोधू लागल्या. शेवटी त्यांच्या नातवाला त्यांनी विचारल्यावर नातवाने त्यांना सांगितलं, 'आजी, तुला गोपाळकृष्ण कशाला हवाय?' त्यावर त्या म्हणाल्या 'अरे, पेपर वाचण्यासाठी!' हे ऐकल्यावर ताबडतोब त्यांना काय हवंय ते नातवाला लक्षात येऊन त्यानेच चष्मा शोधून दिला. ही व्याधी पूर्णपणे टाळता येणे कठीण असते; यासाठी स्मरणाचं कार्य मेंदू कसं करतो ते पाहू.

    आपला मेंदू सर्वप्रथम विविध प्रकारची माहिती संवेदी ज्ञानेद्रीयांच्या द्वारे मिळवतो. म्हणजे आपण आपले डोळे, कान, जीभ, नाक आणि त्वचा या पाच इंद्रियांचा वापर त्यासाठी करतो. मिळालेली माहिती मेंदू साठवून ठेवतो.

यामध्ये दोन प्रकार आहेत. कित्येक वर्षापूर्वीची माहिती साठवणं उदा. आपण लहानपणी शिकलेली स्तोत्र, आरत्या, पाढे हे सर्व आपल्याला मुखोदगत असतं. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार म्हणजे अगदी नजीकच्या काळात घडलेल्या घटनांची माहिती साठवणं. या मध्ये अगदी नजीकच्या काळात भेटलेली व्यक्ती, शिकलेल्या गोष्टी, पाहिलेल्या घटना, स्थळे अशा सर्वांचा समावेश होतो. आपण एखादा प्रवास करून येतो. त्यात भेटलेल्या व्यक्ति काही काळ आपल्या लक्षात राहतात, हे या प्रकारचं एक उदाहरण.

मेंदूने साठवलेली ही माहिती आपल्याला गरज पडेल तेव्हा आपल्याला आठवणं हे मेंदूचे माहितीसंबंधीचे तिसरे कार्य. ही सर्व कार्ये बिनबोभाट चालू असतात. कित्येक वर्ष ही कामं विनासायास चालू असतात. याची आपल्याला कल्पनाही नसते. वृद्धावस्थेत जेव्हा स्मृतीभ्रंश होतो तेव्हा प्रथम या बाबतीत आपण विचार आणि काळजी करायला लागतो. ही कार्ये आता वृद्धावस्थेतही व्यवस्थित चालावी यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागतात आणि ते कोणते याचाच विचार आता आपण करणार आहोत.

    सर्वप्रथम मेंदूच्या माहिती घेणा-या कार्यामध्ये म्हणजे संवेदी ज्ञानेद्रीयांच्या कार्यात सुधारणा करण्यासाठी दृष्टीने काय करता येईल ते पाहू. डॉ.आर्थर विंटर आणि श्रीमती रुथ विंटर यांनी या संदर्भात काही व्यायाम सुचवले आहेत. आपण आता विचार करणार आहोत. योगामध्येसुद्धा उत्तम व्यायाम असतात ते आपल्या क्षमतेप्रमाणे जरूर करावेत. पण यांनी सुचविलेले व्यायाम आणि उपाय अतिशय सोपे, सहज आणि कुणालाही करता येण्यासारखे आहेत.

    संवेदी ज्ञानेद्रीयांपैकी सर्वात महत्वाचं ज्ञानेद्रीय म्हणजे डोळा. त्यामुळे त्याची काळजी घेणं खूप महत्वाचं ठरतं. डोळ्यावर ताण येईल अशा प्रकारे मंद प्रकाशात, बारीक टाईप असलेल्या मजकुराचं वाचन करू नये. सलग दोन तास वाचल्यानंतर १५ ते २० मिनिटे डोळ्यांना विश्रांती घ्यावी. डोळ्यांवर गार पाण्याच्या गुलाब पाण्याच्या घड्या ठेवणे, डोळ्यांवर आपले पंजे ठेऊन थोडा वेळ डोळे मिटून बसणे हे यावरचे काही उपाय. अ जीवनसत्व असलेल्या भाज्या, फळं, मोड आलेली कडधान्य, जवसाची चटणी, मासे, अक्रोड, बदाम यापैकी परवडेल ते सर्व आहारात ठेवणं आवश्यक आहे. डोळ्यात काहीही अजिबात घालू नये. टी.व्ही.सुद्धा जास्त पाहू नये. फार प्रखर प्रकाशाकडे पाहू नये. ओमेगा ३ फॅटी असिड योग्य प्रमाणात पोटात जाईल याची काळजी घ्यावी.

वृद्धावस्थेत होणारे डोळ्यांचे प्रमुख आजार म्हणजे मोतीबिंदू, काचबिंदू, दृष्टी अधू होणं आणि डोळ्यातील पडदा खराब होणं हे आहेत. यापैकी योग्य चष्म्याच्या सहाय्याने काही अंशी तरी अधू दृष्टीवर मात करता येते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दर सहा महिन्यांनी डोळ्यांची डॉक्टरांकडे जाऊन नेत्रतपासणी करून घेणं. कारण यापैकी कोणतीही व्याधी लवकर लक्षात आली तर पूर्ण बरी होऊ शकते. मोतीबिंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया करता येते. डोळ्यांच्या व्याधीवर आजकाल चांगली औषधेही आहेत.

    आता डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठीचे व्यायाम पाहू. एक छोटा टॉर्च प्रकाशित करून उजव्या हातात धरा. समोर बघत टॉर्च डोक्यावर न्या. फक्त डोळे हलवून टॉर्चकडे पहा. पाच आकडे सावकाश म्हणेपर्यत पहा. हात फिरवून हनुवटीखाली पोटापाशी आणा. फक्त डोळे हलवून त्याकडे पाच आकडे म्हणेपर्यत पहा. आता हलवून टॉर्च उजव्या कानाच्या रेषेत अर्धा फुटावर आणा. फक्त डोळे डाव्या हातात टॉर्चकडे पहा. पाच आकडे सावकाश म्हणेपर्यत पहा. हात फिरवून टॉर्च हनुवटीखाली पोटापाशी आणा. फक्त डोळे हलूवून त्याकडे पाच आकडे म्हणेपर्यत पहा. आता हात हलवून टॉर्च उजव्या कानाच्या रेषेत अर्धा फुटावर आणा. फक्त डोळे हलवून त्याकडे पहा. आता याच तिन्ही गोष्टी डाव्या हातात टॉर्च धरून करा.

हे सर्व व्यायाम (उजव्या व डाव्या हातात टॉर्च घेऊन प्रत्येकी) पाच वेळा करा. आता उजव्या हातात टॉर्च घेऊन तो हात उजवीकडे खांद्याच्या रेषेत सरळ ठेवा. फक्त डोळे हलवून त्याकडे पहा.

    मग तो हळूहळू हात हलवून चेह-याकडे नाकाच्या रेषेत व फुटावर आणा. आता त्याकडे पहा. आता तो हात डाव्या खांद्याच्या रेषेत नेता येईल तेवढा नेऊन पुन्हा फक्त डोळे हलवून त्याकडे पहा. हीच कृती डाव्या हातात टॉर्च घेऊन करा.

 वरील सर्व व्यायामांचे वेळी डोकं अजिबात हलवायचं नाही. फक्त डोळे हलवायचे आणि पाच आकडे म्हणायचे. एक चेंडू किंवा झाडाची फांदी यापासून पाच फुटावर येईल अशा प्रकारे टांगा. त्याला झोका देऊन तो हलत असताना त्याकडे दोन मिनिटे खुर्चीत बसून पहा.

    मग खुर्ची पलीकडच्या बाजूला किंवा त्याच बाजूला दुसरीकडे सरकवून हीच  कृती पुन्हा करा हे सोपे व्यायाम आणि योग्य आहाराद्वारे आपण आपली दृष्टी सुधारू शकतो.

No comments:

Post a Comment

Visit Our Page