Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, September 14, 2011

श्रावण मास, नको तब्येतीला त्रास !


श्रावण मास, नको तब्येतीला त्रास !

सणवार साजरे करणे यासारखा आनंद मनुष्याला इअतर कशात मिळत असेल असे मला वाटत नाही. वर्षभर आपण कोणते ना कोणते सण, उत्सव साजरे करीतच असतो. मात्र चातुर्मास म्हणजे या सगळ्या सणवारांचा राजा असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या चातुर्मासाला धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्व आहे. मंगळागौर, नागपंचमी,नारळी पौर्णिमा, गणपती, नवरात्र, दसरा, द्वाळी असे अनेक सण, उत्सव याच काळात साजरे होतात. असे असले तरी या चार महिन्यांमध्ये श्रावण महिन्याचे महत्व जरा अधिकच आहे.
      धर्मशास्त्रानुसार चातुर्मासाचा आरंभ आषाढी एकादशीला होतो. या एकादशीलाच “शयनी एकादशी” असेही म्हणतात. कारण या दिवशी भगवान विष्णु शयन करतात, झोपी जातात आणि कार्तिकी / प्रबोधिनी एकादशीला ते जागे होतात अशी समजुत आहे. जेव्हा देव झोपलेले असतात त्या काळात असुरांचे, राक्षसांचे बळ वाढलेले असते. सर्वत्र त्यांचेच साम्राज्य पसरलेले असते. अशावेळी मनुष्याने या असुरांपासुन स्वतःचे रक्षण करणे आवश्यक आहे. हे राक्षस, असुर म्हणजे कोणी प्राणीमात्र आहेत असे समजण्याऐवजी काम, क्रोध, लोभ, द्वेष, असुया , मत्सर यासारखे षड्-रिपु म्हणजेच असुर होय असे मला वाटते. आयुर्वेदानुसार सत्व हा मनाचा गुण आहे आणि रज व तम हे मनाचे दोष आहेत. यापैकी रज व तम वाढले की काम-क्रोध आदी भाव मनात वाढीस लागतात. थोडक्यात कामक्रोधादी भावांचा नाश करण्यासाठी मनाचा सत्व गुण वाढविणे हा योग्य उपाय आहे. म्हणुनच चातुर्मासात किंवा श्रावणात यम, नियम, आहाराविषयीचे नियम, धार्मिक ग्रंथांचे पठण, तुलसीपूजन, दानधर्म, उपवास, लंघन, देवदर्शन यासारख्या सात्विकता वाढविणा-या गोष्टींचा अवलंब करणे फायद्याचे ठरते यात शंका नाही.
      ज्याप्रमाणे आपले वागणे आपल्या मनावर प्रभाव टाकत असते त्याचप्रमाणे आपला आहारदेखिल मनावर प्रभाव करीत असतो आणि मनाचा आहारावर प्रभाव पडत असतो. उदाहरणासाठी आपल्याला सांगता येईल कि नासके, खराब, व्यवस्थित न शिजवलेले अन्न मनामध्ये उद्विग्नता, घृणा निर्माण करते आणि परिक्षेच्या काळात मनावर आलेल ताण भूक कमी करतो, अपचन-अजीर्ण-अम्लपित्त यासारखे त्रास निर्माण करतो. थोडक्यात अन आणि आहार यांचा खुप जवळचा संबंध आहे. श्रावण महिना म्हणजे पावसाळ्याचा काळ आहे. त्यामुळे मुळातच निसर्गतः शरीरात वातदोष वाढलेला असतो, भूक मंदावलेली असते. जर या काळात पथ्य पाळले नाही तर पचन बिघडून वेगवेगळे शारीरिक त्रास सुरु होतो आणि मनालाही त्याचा त्रास होतो.
      चातुर्मास आणि त्यातही श्रावण म्हणजे नुसती उपास-तापासांची रेलचेल असते. खरंतर मूळ शब्द “उपास” हा नसून तो आहे “उपवास”. त्या शब्दाची फोड होते उप + वास. “उप” म्ह्णजे जवळ आणि “वास” म्हणजे राहणे. “देवाच्या जवळ राहणे” असा लाक्षणिक अर्थ उपवास या शब्दातून व्यक्त होतो आणि नुसतेच देवाच्या जवळ राहणे असे नाही तर देवाजवळ तहानभूक विसरून राहणे अपेक्षित आहे. व्यवस्थित खाऊन-पिऊन देवाची पूजा अचना करायला मन तयार होणार नाही. उपवासाला भरपूर खाल्लेल्या खाण्याने आलेले आळस , सुस्ती हे मनाला आणि शरीराला स्वस्थता लाभू देणार नाहीत आणि म्हणुनच उपवासाने पूर्ण लंघन, एकभूक्त किंवा लघ्वशन अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र “एकादशी आणि दुप्पट खाशी” ही म्हण प्रत्ययास येते. उपवासाला चालणा-या पदार्थांची यादी पाहिली कि ज्यांनी या गोष्टी उपवासाला चालतात असे ठरविले त्यांचे खूप कौतुक (?) वाटते. हे सगळे पदार्थ पचायला जड या श्रेणीत बसतात. उपवासाला आणि चातुर्मासात चालणारे आणि न चालणारे पदार्थ म्हणजे भगर, साबुदाणा, शिंगाडा, राजगिरा, बटाटा, रताळी, दही, ताक, कांदा आणि लसुण असे आहेत. यातील कांदा आणि लसुण सोडून इतर सगळे पदार्थ उपवासाला चालत असले तरी त्यांचे गुणधर्म बघितल्यानंतर आपण आपलेच ठरवायचे की त्यांचे सेवन उपवासाला करायचे कि नाही ?

१)     भगर – भगरीलाच वरी असेही नाव आहे. बहुधा जेथे नाचणी पिकते तिथेच भगरही पिकते. याचा भात, लाट्या, पीठ तयार करून वापर केला जातो. वरी गोड, तुरट रसाची असून वृष्य (मैथुनक्षमता वाढविणारी ) आहे. शरीरातील वात आणि पित्त यांचा नाश करणारी असल्याने थोड्या प्रमाणात खायला हरकत नाही.
२)     साबुदाणा – एका प्रकारच्या स्टार्चपासूनहा पदार्थ बनविला जातो. ताडासारख्या जातीच्या वृक्षापासून हा तयार होतो. खिचडी किंवा तळलेला वडा या स्वरूपात हा पचायला अतिशय जड असणारा हा पदार्थ आहे. त्यामुळे उपवासाला अजिबात खाऊ नये. अगदिच खायचाच असेल तर दुधात बनविलेली खीर बरी. पण आव, अपचन, भूक नसणे यात या कडे बघूही नये. मुळात ज्यांना साबुदाणा खुप आवडतो त्यांनी एकदा साबुदाण्याच्या कंपनीला भेट द्यावी. नंतर साबुदाणा खायची इच्छा मरते हे मात्र नक्की.
३)     शिंगाडा – पाण्यात तयार होणारी ही वेल आहे. याची फळे आपण वापरतो. शिंगाडा गोड रसाचा, थंड गुणाचा, पचायला जड, पित्त-रक्तविकार,दाह यांचा नाशक आहे. बळ देणारा शिंगाड्याच्या पीठाचा शिरा तहान, जुलाब, संग्रहणी, गर्भस्त्राव यात उपयुक्त असला तरी कमी मात्रेत खाण्यास योग्य आहे.
४)     राजगिरा – पुरुषभर उंचीचे हे झुडुप असते. याची लागवड केली जाते. याच्या बियांमध्ये पुष्कळ पौष्टीक गुण आहेत. लघवीला साफ करणार आणि रक्तातील दोष दूर करणारा राजगिरा मूळव्याधीतही फायद्याचा आहे. पचायला हलका असल्याने सर्व उपवासाला चालणा-या पदार्थांमध्ये याचा नंबर एक लागतो.
५)     बटाटा व रताळी – कंदमूळ या प्रकारात मोडणारे हे दोन्ही पदार्थ गोड रसाचे, थंड, पचायला जड, बळ वाढविणारे आहेत. कच्चा बटाटा दाह करणारा आणि कैफ आणणारा आहे. मात्र उकडल्यावर हे दोष कमी होतात ( नष्ट नाही. ). मधुमेही, संग्रहणी, जुलाब व पोटात मुरडा येणा-या रोग्यांनी बटाटा टाळावा. आग होणे, लघवीच्या तक्रारीत रताळी उपयुक्त आहे. पण हे दोन्ही पदार्थ तारतम्याने खावे.
६)     दही आणि ताक – दही हे उष्ण ( थंड अजिबात नाही ) , बूक वाढविणारे, पचायला जड, पचल्यावर आंबट रस तयार करणारे, पित्त-रक्तविकार-सूज-मेद-कफ वाढविणारे आहे. त्यामुळे उपवासाला इतर पदार्थ पचन बिघडविणारे असतांना त्यात भरीसभर म्हणुन दही अजिबात खाऊ नये. मात्र दह्यात चारपट पाणी टाकुन, रवीने घुसळुन लोणी काढलेले ताक मात्र ह्या पृथ्वीवरचे अमृत आहे. ताक हे तुरट गोड रसाचे, पचल्यावर गोड होणारे, पचायला हलके, उष्ण, तृप्ती देणारे आणि वातनाशक आहे. म्हणुन उपवासाला दह्यापेक्षा ताक चांगले. मात्र अंगाची आग, रक्तपित्त, चक्कर येणे यात ताक टाळावे.
७)     कांदा आणि लसुण – वर आपण उपवासाला आणि चातुर्मासात चालाणा-या (?) पदार्थांची माहिती पाहिली. पण कांदा आणि लसुण हे न चालणरे पदार्थ आहे. कांदा हा भरपूर औषधी गुणयुक्त असला तरी तो रज आणि तम दोष वाढविणारा आहे तसेच तो अमेध्य (बुध्दीला उपयुक्त नसणारा) आहे. त्यामुळे चातुर्मासात किंवा श्रावणात जेव्हा मनाचा सत्व गुण वाढणे अपेक्षित आहे तेव्हा कांदा त्याला मारक ठरतो कारण तो रजोतमोवर्धक आहे. राहू चोरून अमृत प्यायला, त्यामुळे त्याचा गळा कापतांना जे अमृताचे थेंब खाली पृथ्वीवर पडले त्यातुन लसुणाची उत्पत्ती झाली अशी एक कथा आहे. थोडक्यात असुरांपासुन लसणाची उत्पत्ते झाली आहे त्यामुळे तो याकाळात वर्ज्य आहे. अन्यथा लसुणामध्ये औषधी गुण ठासून भरलेले आहेत.
उपवासाला चालणारे पदार्थ, त्यांचे गुणधर्म बघितल्यानंतर “एकादशी अन दुप्पट खाशी” ही म्हण खोटी पाडली पाहिजे असे वाटते. कारण आपण फक्त उपवासाला भरपूर खातो आणि इतर वेळी मात्र फार पथ्याने राहतो अशी परिस्थीती नाही. आणि म्हणुनच इतर काळात केलेल्या अपथ्यामुळे शरीरात तयार झालेले दोष उपवासाने, लंघनाने कमी करण्यासाठी उपवास हा कडकडीत करून पचनशक्तीला  काम करायला अवसर दिला पाहिजे तर तो उपवास आपल्याला लाभेल.
      लंघनाने होणारे फायदे वाचले तर तुम्हीही माझ्या म्हणण्याला दुजोरा द्याल यात शंका नाही.
“विमलेन्द्रियता सर्गो मलानां लाघवं रुचिः ।
क्षुत्तृट्सहोदयः शुध्दहृदयोद्गारकण्ठता ॥
व्याधीमर्दवमुत्साहः तन्द्रानाश्चलंघिते ॥“ ( अष्टांग हृदय/सुत्र/१४)
थोडक्यात सर्व इंद्रिये (कर्मेन्द्रिय,ज्ञानेन्द्रिय,मन) प्रसन्न होणे, शरीरातील मळ बाहेर टाकला जाणे, अंगाला हलकेपणा येणे, रुची उत्पन्न होणे, भूक आणि तहान यांचा एकाचवेळी योग्य प्रादुर्भाव होणे, हृदय आणि कंठ शुध्द होणे, शुध्द ढेकर येणे ( कडवट-आंबट ढेकर नसणे), शारीरिक रोगांचा जोर कमी होणे, उत्साह वाढणे आणि झापड- तंद्रा कमी होणे हे सगळे फायदे लंघनाने होतात.
      हे सगळे पाळले गेले तर आपल्या पूर्वीच्या आचार्यांना उपवासाने अपेक्षित असलेले ध्येय आपण गाठू शकू, नाही का ?


                                                                 वैद्य . मनीष जोशी,
७, गुंजाळ एव्हेन्यु, महिला बँकमागे,
इंदिरानगर,
नाशिक – ४२२००९
फोन – ९४२०४६२०५ / ९८८११५०२७२


॥ एकांगवीर रस ॥

॥ एकांगवीर रस ॥

शुद्धगन्धं मृतं सूतं कांतं वंगं च नागकम्‌ ।
ताम्रं चाभ्रं मृतं तीक्ष्णं नागरं मरिचं कणा ॥
सर्वमेकत्र संचूर्ण्यं भावयेच्च पृथक्‌ त्र्यहम्‌ ।
वराव्योषकनिर्गुण्डीवन्हिकार्द्रकजैः द्रवैः ॥
शिग्रुकुष्टद्रवेणापि ततो धात्र्या द्रवेण च ।
विषमुष्ट्यार्कहाटैःश्च आर्द्रकस्य रसैस्तथा ॥
रसश्चैकांगवीरोsसौ सुसिद्धो रसराड्‌ भवेत्‌ ।

पक्षघातं चार्दितं च धनुर्वातं तथैव च ॥
अर्ध्दांगं गृध्रसीं वापि विश्वाचीमपबाहुकम्‌ ।
सर्वान्वातामयान्हन्ति सत्यं सत्यं न संशयः ॥

भारत भैषज्य रत्नाकर
प्रथम खण्ड
एकारादि-रस
पृष्ठ क्र॰ १९५
पाठ क्र॰ ५८५

मूळ पाठ
वृद्ध निघण्टुरत्नाकर॰ वातव्याधीचिकित्साप्रकरणम्‌
================================॥
मूळ पाठ

सर्व आर्ष ग्रंथांत 'एकांगवीर रस' ,
सर्वप्रथम वृद्ध निघण्टु रत्नाकर मध्ये लिखित स्वरुपात दिसतो.

भारत भैषज्य रत्नाकर पाहिल्यास
इतर कोणत्याही ग्रंथात हा पाठ नसल्याचे दिसते.

एक पाठ असल्याने विशेषशुद्धी किंवा पाठ विनिश्चयाची विशेषत्वाने
गरज नाही.

तरीही वृद्धवैद्यक परंपरेत काय सांगितले आहे हे जाणून घेणे ही
आवश्यक आहे.

त्यासाठी, उपलब्ध ग्रंथसंपदेतील, "आयुर्वेदीय औषधिगुणधर्मशास्र" ह्या
"वैद्यपंचानन गंगाधरशास्री गोपाळराव गुणेशास्रीं"च्या चिकित्सानुभव व
औषधी कल्पांचे सुस्पष्ट आयुर्वेद-शास्रीय विवेचन वाचनाचाच मार्ग
आद्य व अग्र्य ठरतो.

१.    शुद्धगन्धं    =    शुद्ध गंधक
२.    मृतं सूतं     =    मारीत पारद
३.    कांतं     =    कान्त लौह भस्म
४.    वंगं च     =     वंग भस्म
५.    नागकम्‌ ।    =    नाग भस्म
६.    ताम्रं     =    ताम्र भस्म
७.    चाभ्रं मृतं     =    अभ्रक भस्म
८.    तीक्ष्णं     =    तीक्ष्ण लौह भस्म
९.    नागरं     =    सुंठ
१०.    मरिचं     =    मिरे
११.    कणा ॥    =    पिप्पली
सर्वमेकत्र संचूर्ण्यं ,
भावयेच्च पृथक्‌ त्र्यहम्‌ ।
१.    वरा        =    त्रिफळा क्वाथ  
२.    व्योषक        =    त्रिकटु क्वाथ  
३.    निर्गुण्डी        =    निर्गुडी क्वाथ
४.    वन्हि        =    चित्रक क्वाथ
५.    शुद्धार्द्रकस्य रसैस्तथा ॥    =    शुद्ध आल्याचा स्वरस
६.    शिग्रु        =    शेवगा त्वक् क्वाथ
७.    कुष्टद्रवेणापि ततो     =    कोष्ठ क्वाथ
८.    धात्र्या द्रवेण च ।    =    धात्री क्वाथ
९.    विषमुष्टी        =    कुचलाबीज क्वाथ
१०.    अर्क        =    रुई मूळ क्वाथ
११.    हाटैःश्च         =    कांडवेल क्वाथ
१२.    आर्द्रकस्य रसैस्तथा ॥    =    आल्याचा स्वरस *

मात्रा     =    १/२ ते १ गुंज      
    =    ६० mg to १२० mg

काल    =    स, व्यानोदान /  व्यानोदान / अपानौ

फलश्रुती    =  
१.    पक्षाघातं
२.    अर्दितं
३.    अनुर्वातं
४.    अर्धाड्गं
५.    गृध्रसीं
६.    विश्वाची
७.    अवबाहुकम्‌
८.    सर्वान्वातामयान्‌
॥ =============॥ पक्षाघाते एकांगवीर रसः ॥ ===============॥
पक्षाघात अथवा अर्धांगवायु => (कोणाला होतो ?)
हा विकार १. त्रासिक, चिडखोर, संतापी

२. ज्यांच्या रक्तवाहिन्या उपदंशादिक विकारांच्यामुळे विकृत झालेल्या असतात,
अश्या माणसांना होतो.
 पक्षाघाताची सम्प्राप्ति कशी घडते ??=================>>
मनाच्याविरुद्ध काही गोष्टी झाल्यामुळे
असल्या तिडतिड्या माणसात
एकाएकी संताप येऊन
एकदम सर्व शरीरभर खळबळ उडून जाते,
त्यामुळे =>
१ } विकृत झालेल्या रक्तवाहिन्यांत रक्तसंचय जास्त होऊन
त्याचा दाब हा मेंदू व वातवाहि केंद्रे ह्यांवर होऊन
पक्षाघात उत्पन्न होतो;

किंवा

२} रक्तवाहिनी फुटून तिच्यातून रक्तस्राव होऊ लागतो.
आणि
रुधिराचा साठा...
ज्ञानकेंद्राच्या बाजूला झाल्यामुळे
त्या माणसाची जाणीवनेणीव नष्ट होते,
किंवा
थोड्या अंशाने कमी होते.
शरीरातीळ संचालनक्रियेवर त्याचा ताबा रहात नाही.
स्नायुंच्यामुळे शरीरातील चलनवलनादि व्यापार सुरु असतात.
स्नायुंवरचा ताबा कमी झाल्यामुळे
ते व्यापार होईनासे होऊन
रोगी विगलित झाल्यासारखा होतो,
चलनवलनादिकाच्या कार्यास विरोध येतो,व्यत्यय येतो
म्ह्णून
आयुर्वेदात त्याची गणना "वातविकृतीत" केली आहे.

ह्या आजारात साधारणतः
अवस्थाभेदाने दोन तर्‍हेची चिकित्सा करता येते.
अ ] तीव्र अवस्थेत
रक्तवाहिनी फुटून रक्ताचा स्राव झालेला असतो,
त्याचे
१ .प्रसादन करणे
२. फुटलेल्या रक्तवाहिनीचे घटक नवीन तयार होऊन
ती सांधली जाऊल अशी तजवीज करणे,
आणि

ब ] जुनाट अवस्थेत
रक्तवाहिनी फुगण्याची अथवा फुटण्याची शरीरास लागलेलि सवय नाहीशी
करण्याचा प्रयत्न करणे.
आपल्या इकडे रक्तप्रसादन करणारी जी औषधे आहेत;
त्यात =>
१. ताप्यादि लौह
२. स्वर्णमाक्षिक भस्म
३. शिलाजतु
४. गुग्गुल
ही मुख्य आहेत.
याच्या योगाने रक्ताचे प्रसादन होऊन फुटलेली रक्तवाहिनी सांधते.
रक्तवाहिनी सांधली गेली म्हणजे थोडा कालपर्यंत बरे वाटते.
परंतु पुनः पूर्ववत्‌ कारण घडल्यास रोग्यास पुनः पक्षाघाताचा झटका येतो.
म्हणून रक्तवाहिन्यांना जडलेली ही सवय नाहीशी करणारे असे एखादे औषध या

जुनाट अवस्थेत देणे जरुर असते.
आयुर्वेदाच्या उपपत्तीप्रमाणे रक्ताचे वहनकार्य वायूच्या प्रेरकत्वामुळे घडून येत असते.
वाताच उद्रेक जास्त झाला म्हणजे रक्ताचे उद्वहन कार्यही जास्त वेगाने होते.
रक्तवाहिनीची फुटण्याची सवय नाहीशी करावयाची असल्यास
रक्ताचे उद्वहनकार्य बेतावर आणने जरुर असते.
हे कार्य एकांगवीराच्या योगाने चांगल्या प्रकारे घडून येते. ॥ =============॥ अर्दिते धनुर्वाते अर्धाड्गे एकांगवीर रसः ॥ ===============॥

पक्षाघात हा केवळ शरीराच्या अर्ध्या भागालाच होतो असे नाही,
तर कित्येक वेळेला
फक्त
एका हाताला
किंवा
एका पायाला
किंवा
कमरेच्या खालील भागाला
किंवा
तोंडाच्या एका बाजूला
अशा प्रकाराने
निरनिराळे पक्षाघात होतात.

ह्या सर्व ठिकाणी विशिष्ट स्नायूंची चलनवलनादि शक्ति कमी झालेली असते.
ह्या सर्व प्रकारात
एकांगवीर रस निरनिराळ्या अनुपानांबरोबर द्यावा.

धनुर्वाताच्या विकारात शरीराच्या कोणत्या तरी भागात अभिघातजन्य
किंवा
इतर अशी जखम झालेली असते
आणि ती जखम व्रणचिकित्सेच्या अनुरोधाने नीट चिकित्सित न झाल्यास आणि

दूषित झाल्यास त्या जखमेतून धनुर्वाताचे विवक्षित जंतू शरीरात प्रविष्ट होऊन

वातप्रकोपास निमित्तकारण होतात,
वातदोष स्नायू, व शिरा यात प्रकुपित होऊन सर्व शरीराला धनुष्याप्रमाणे वाकवितो,
आणि म्हणूनच यास धनुर्वात म्हणतात.
यालाच अपतानक, आयाम इत्यादि संज्ञा लक्षानुरोधे प्राप्त झालेल्या आहेत.

ह्या रोगाच्या प्रथमावस्थेत=>मोठ मोठाले झटके येऊन सर्वांग वाकते,
दाभाड बसते,
मनुष्यास शुद्धि असते,
परंतु गिळण्याची सोय असत नाही,
ह्या अवस्थेत ==>>"कालकूट रसा"<<== चा चांगला उपयोग होतो.
परंतु
दवीतीयावस्थेत =>तीव्रावस्था नाहीशी झाल्यानंतर, सर्वांगास एक प्रकारचा लुळेपणा आलेला असल्यास व स्नायूंची शक्ति क्षीण झाल्यासारखी असल्यास
==>>"एकांगवीरा"चा<<== त्यानंतर उपयोग होतो. ॥ ==========॥गृध्रसीं / विश्वाचीम्‌ / अपबाहुके एकांगवीर रसः ॥==========॥

कुल्ल्यापासून प्रारंभ होऊन
कंबर => मांड्या => गुडघे => जांघाडे व पायापर्यंत
वारंवार चमका निघतात.
सगळा पाय ताठल्यासारखा होतो.
पाय लुळा पडल्या सारखा होतो.
अति तीव्र वेदना कित्येक वेळेला होतात.
सुयांनी टोचल्यासारखे होते.
पण जागच्या जागी जखडल्यासारखा होतो
आणि
जरा वेळ पाय उभा केला,
की वारंवार त्यात स्पंद उत्पन्न होतात.
ह्या विकारास गृध्रसी अशी संज्ञा आहे.
गृध्रसीत वातप्रधान लक्षणे असता एकांगवीर द्यावा.

हाताच्या बोटांपासून वेदना सारख्या चढत चढत जाऊन हात अगदी भारावून जातात. बोटांनी काही काम होऊ शकत नाही यत्किंचित उचलले किंवा काही धरले, की सर्व बोटांतून सारख्या मुंग्या येऊन धरलेला जिन्नस पडून जातो, व तो केव्हा पडला ही जाणीव रहात नाही. या अवस्थेत एकांगवीर चांगला उपयोग होतो.

एकांगवीरात
कांत-वंग-नाग -ताम्र-अभ्रक-तीक्ष्णलोह ही बॄंहण, जीवन व रसायन औषधे आहेत.
वातरोगांत बृंहण हेच शमन असते. या न्यायाने ही वातशामक औषधे आहेत.

पारद कज्जली - रसायन, योगवाही  व जंतुघ्न अशी आहे.
भावना = वातप्रशमन करणार्‍याच औषधांच्याच आहेत.
हे औषध अत्यंत तीक्ष्ण आहे.
त्यामुळे त्याचा उपयोग वातप्रधान कीवा कफप्रधान विकारांत करावा.
पित्तानुबंध सता उपयोग करणे इष्ट नसते.
संदर्भ ग्रंथ = 
"आयुर्वेदीय औषधिगुणधर्मशास्र" By
"वैद्यपंचानन गंगाधरशास्री गोपाळराव गुणेशास्रीं




वैद्य प्रशांत प्रभाकर वाघमारे


श्री पुनर्वसु आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्रयश श्री प्लाझा ; दुकान क्रमांक : ०६ ; सेक्टर - ८;
सानपाडा ; नवी मुंबई -४००७०५.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
९८६७ ८८८ २६५
--
Vd. P.P.W.Shree Punarvasu AcPc & RcYashShree Plaza.
Shop  No. - 6 ; Sector - 8.
Near 7th Day Heigh-School.
Sanpada;Navi Mubai- 400705.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
9867 888 265
 
JOIN US ON facebook :
श्री पुनर्वसु आयुर्वेदीक चिकित्सालय ; सानपाडा ; न. मुं.-७०५
 
VISIT OUR WEBSITE :

Visit Our Page