Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Saturday, July 23, 2016

दूर ठेवा संधीवात

दूर ठेवा संधिवात
वयाच्या चाळिशीनंतर हाडांची झीज होणे, त्यामुळे सांधे दुखी सुरू होणे हे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. मात्र, जीवनशैलीतील   बदल, आहारावरील नियंत्रण , नियमित व्यायाम, आयुर्वेदिक औषधी व पंचकर्म याच्या योगाने संधीवात दूर ठेवता येऊ शकतो.
वृद्धत्व ही निसर्गचक्रातील एक अवस्था आहे. शरीरातील अवयवांची आणि त्यांच्या क्रियांची झीज व्हायला लागते. या झिजेच्या प्रक्रियेत एक प्रमुख अवयव चाळिशीनंतर झिजायला लागतो, तो म्हणजे हाडे. आणि त्यामुळे होते वेगवेगळ्या प्रकारची सांधेदुखी किंवा संधिवात.
संधिवात होण्याची अनेक कारणे आहेत. काहींच्या हाडांत जन्मजात विकृती असते. सूज, दाह, जंतूंचा प्रादुर्भाव झाल्याने अपघातामुळे हाडांना मार लागण्यामुळे किंवा तुटणे सरकण्यामुळे विविध प्रकारच्या कर्करोगांनी हाडांना पोचणाऱ्या इजेमुळे, वयोमानानुसार मणक्‍यांची/ हाडांची होणारी झीज, शिवाय हाडे ठिसूळ होण्यामुळे, या आणि अशा अनेक कारणांमुळे संधिवात होत असतो.
आपल्याला काही सवयी लागलेल्या असतात त्यामुळे अशा दुखण्यांना आपण स्वतःहूनच निमंत्रण देत असतो. उदाहरणार्थ- बसण्याची, उभे राहण्याची पद्धत, जास्त वजन असणाऱ्यांच्यासुद्धा शरीराचा भार गुडघ्यांवर पडल्यामुळे तेथील सांध्यांतील हाडांवर, संधिबंधांवर परिणाम होऊन पायांना बाक येणे, गुडघे दुखणे, सुजणे, हालचाली करताना त्रास होणे, खाली उठता-बसता न येणे, अशा तक्रारी सुरू होतात. वाकण्याची पद्धत, व्यायामाचा अभाव, जास्त वजन उचलणे, नैराश्‍य, मानसिक ताण, व्यावसायिक चिंता या सर्वांमुळेही सांधेदुखी आपल्या नकळत सुरू होऊन वाढत जाते. स्त्रियांमध्ये खाली बसून भांडे धुणे, कपडे धुणे, स्वंयपाक करण्याची पध्दत यामुळे गुडघ्याच्या स्नायुंवर, हाडावर ताण पडतो.
पचनाच्या तक्रारींमुळे किंवा जास्त प्रमाणात अनियमित खाल्ल्याने, मलप्रवृत्तीच्या अनियमितपणामुळे अन्नपचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे शरीरात एक प्रकारची विषारांची किंवा आमाची निर्मिती होते. तो “आम’ सांध्यांच्या ठिकाणी साठून वातदोषांच्या साह्याने तेथे विकृती निर्माण करून आमवाताची सुरवात होते. तसेच स्त्रियांच्या रजोनिवृत्तीच्या काळात शरीरात जे काही अंतःस्रावी ग्रंथीच्या स्रावात बदल होतात त्यामुळे वजन वाढते. हाडे झिजायचे प्रमाणही या काळात अधिक असल्याने संधिवात या वयात सुरू होतो.
सध्या मध्यम व उच्च वर्गातील रुग्णांमध्ये वाढती सांधेदुखी घेऊन येणारे रुग्ण अतिप्रमाणात येत आहेत. त्यावरुन त्यांचे निदान आम्ही करत असतांना ते बहुधा संधिवाताच्या, आमवात, वातरक्त इत्यादी गंभीर प्रकारातील आढळतात. लड्डा आयुर्वेदिक मधील पंचकर्म चिकित्सा संधिवातासाठी खूप उपयोगी पडते. यात स्नेहन-स्वेदनपूर्वक बस्तिचिकित्सा, रक्तमोक्षणासारखी चिकित्सा केली जाते.
स्नेहन – यात स्नेहन/मसाज हा विशिष्ट औषधी तेलाने दुखणाऱ्या सांध्याला विशिष्ट पद्धतीने करावा. हा तज्ज्ञ व्यक्तींकडूनच करून घ्यावा. सांध्याच्या रचनेनुसार मसाज करण्याची दिशा ठरते. यासाठी विविध औषधी तेलांचा उपयोग होतो. दुखणाऱ्या सांध्यांबरोबरच सर्वांगाला औषधी तेलाचा मालिश केल्यास फायदा होतो. मसाजामुळे अस्थिधातूतील वाताचे शमन होते. हाडांची झीज होत नाही. अस्थिसंधी, मांस, स्नायू यांचे पोषण होते. पर्यायाने दृढता वाढून तेथील दुखणे कमी होते, सूज कमी होते. हालचालींना सुलभता येते.
स्वेदन – विशिष्ट औषधी द्रव्यांची वाफ विशिष्ट पद्धतीने दुखणाऱ्या सांध्यांना देण्यात येते. उदाहरणार्थ – नाडीस्वेद, पिण्डस्वेद, वालुकापोट्टली स्वेद. जेव्हा एखाद्या हाडाला पोषणाची आवश्‍यकता ?सेल, तेथील रक्तपुरवठा सुरळीत करावयाचा असेल तेव्हा पिण्डस्वेद पत्रपोट्टली स्वेद करता येतो. यासाठी साठेसाठीचा भात, गाईचे दूध, गुळवेल, देवदार- निर्गुंडीसारखी औषधी द्रव्ये वापरली जातात. त्यांचा उपयोग हाडांची झीज कमी होण्यास आणि तेथील घनता वाढवण्यात होतो.
बस्ती – या स्नेहन-स्वेदनानंतर, म्हणजेच मसाज आणि शेकानंतर काही औषधी द्रव्यांच्या काढ्यांचा आणि औषधी तेलांचा बस्ती किंवा एनिमा दिला जातो. बस्तिचिकित्सा ही वातावरची श्रेष्ठ चिकित्सा सांगितली आहे. सांधेदुखीबरोबरच पचनाच्या तक्रारीसाठी वजन कमी करून पर्यायाने गुडघ्यांवरील भार कमी करण्यासाठी या उपचारांचा उपयोग होतो. या सर्व पंचकर्मांच्या क्रिया या तज्ज्ञ वैद्यांकडूनच करून घ्याव्यात. याशिवाय आभ्यंतर औषधोपचारामध्ये गुग्गुळ कल्प उपयोगी पडतात.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सर्वसामान्य जनतेत कामाच्या व्यापाने व इतर कारणाने अवेळी भोजन, विरुध्द आहार, भूक लागली नसतांना पण जेवणे, तेल तुपाचे पदार्थ, अति स्निग्ध, जड असे भोजन करणे व लगेचच फिरणे, तसेच सदा काही ना काही खात राहणे. नुसते पडुन वा बसून राहणे. थंड कुलरसमोर वा वातानुकुलीन रुममध्ये जास्त काळ राहणे. रोज दिवसा झोपणे, लठ्ठ होण्याच्या इच्छेपोटी अति स्निग्ध पदार्थ जसे तूप, बदाम, काजू, शेंगदाणे, दूध व त्याची विकृती, बासुंदी, दही, श्रीखंड आदी खाणे. आईसक्रीम खाणे, फ्रीजचे अतिथंड पाणी सतत पिणे, रात्री कामास कंटाळून रोज भात, खिचडी खाणे अशा आहार व विहाराने दुषित अशा (विकृत आहार रस भाव) आम या विषारी घटकाची, मेदाची वृध्दी होते. त्यामुळे लठ्ठपणा (मेदवृध्दी), आमवात (सांधेदूखी) आदि आजारांचे पाहुणे शरीरात येतात. तेव्हा अशा सांधेदुखीच्या रुग्णांना त्यांचे पथ्य म्हणजे त्यांनी भूक लागल्याशिवाय जेवू नये. आहारात स्निग्ध पदार्थ, तांदळासारखे पदार्थ, दूध व त्यांची विकृती, तसेच जड अन्न इ. खाणे टाळावे. तसेच फ्रीजचे अतिथंड पाणी पिणे, थंड पेय इ. टाळावे. कोष्ण पाणी पिणे, दिवसा शरीरास शक्यतोवर सतत व्यायामात राहील असे शरीर हालचालीत ठेवणे. यातच प्रात: फिरणे, घरची कामे करणे इ. पथ्यांनी वरील रोग्यास बराच फायदा होईल. तसेच सांधेदुखीत सांधे हालचालीत राहिल्याने पुढील उपद्रव होणे टळतील. सांधेदुखीचे पथ्यापथ्य सांगताना सध्याच्या बदलत्या हवामानाचा (काळाचा) विचार पण एक प्रमुख मार्गदर्शक ठरतो. तेव्हा उन्हाळ्यात ऊन न पडणे, पाऊस पडणे तसेच हिवाळ्यात पाऊस पडणे वा पावसाळ्यात उन पडणे या बदलत्या वातावरणाचा शरीरावर तसेच सांधेदुखीवर प्रभाव हा पडतो. पण कालाचा परिणाम टाळणे हे अपरिहार्य आहे. त्यावर तोडगा म्हणजे आयुर्वेदातील व्यापक असा पंचकर्म उपचार, स्वस्थ वृत्त, व ऋतकालीन दिनचर्या इ. होय. तसेच काही रुग्णांत आढळणारे सांधेदुखीचे आगळे वेगळे स्वरुप म्हणजे सांध्यात ठणका असणे, दिवसा व रात्री झोप न लागणे, छोटे सांधे दुखणे, अतिशय वेदना, स्पर्शसहत्व, सार्वदेहीक दाह, दौर्बल्य , पांडुता असणे, भूक न लागणे इत्यादी लक्षणे, जी श्रीमंत व सामान्य वर्गात पण आढळतात, त्यांची कारणमिमांसा लावली असता ती म्हणजे दूषित रक्ताची (वात रक्तांची) सांधेदुखी लक्षणे होत.  अश्या रुग्णात मंदाग्नी असताना जेवणे, अजीर्ण झाले तरी खाणे तसेच आंबलेली खारट, आंबट, गोड असे पदार्थ खाणे, त्यातच चाट भांडारवरील पदार्थ अधिक सातत्याने खाणे, दही सतत खाणे, थंड पेये, फळांचा रस थंड असा पिणे, मांसाहार इ. खाणे, अति चहा पिणे, अति मद्यपान करणे, धुम्रपान करणे, रात्री जागरण करणे, अति फिरणे, तसेच आहार व विहार वात व रक्त अशा दोन्ही गोष्टीस प्रकुपित व दुषित करतो. असे दुष्ट व वात संधिस्थानात, शोथ, ठणका आदी पूर्वरुपात्मक लक्षणे उत्पन्न करतात. अशा रोग्यात त्यांनी आपला आहार विहार बदलला पाहिजे. व प्रामुख्याने वरील सातत्याने घडणा­या गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्यामुळे त्यांच्या सांधेदुखीचे निराकरण व उपचार हा पथ्याने साधता येईल. अशा प्रकारे सांधेदुखीच्या आजारावर व इतर अनेक आजारांवर आपल्याच आहार विहारातून प्रारंभी पथ्यापथ्याने व आयुर्वेदातील इतर व्यापक उपचाराने विजय मिळविणे सहज शक्य होईल.
डॉ. पवन लड्डा
लड्डा आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय
पद्मा नगर, बार्शी रोड लातूर.
मो. ०९३२६५११६८१

Tuesday, July 19, 2016

मधुमेह आणि रक्त तपासणी

मधुमेह आणि रक्त तपासणी : मधुमेहाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत , त्यामुळे त्याबद्दलची जागरुकता असणे हि तितकेच महत्वाचे आहे . आज आपण थोडक्यात समजून घेऊ कि आपल्याला कोणकोणत्या रक्त तपासणी करून घ्याव्या लागतात . सद्या बरेचसे मधुमेही रुग्ण उपाशी पोटाची आणि जेवनांनंतर 2 तासा नंतरची साखर तपासत असतात , FBSL n PPBSL . किमान या तपासण्या करणे हि गरज आहे , जर आपल्याला मधुमेहाची लक्षणं दिसत असतील तर किमान लघवीतील साखर , वरती सांगितल्याप्रमाणे उपाशी पोटी आणि जेवनांनंतरची साखर तपासणे गरज आहे . हे झाले नवीन रुग्णांसाठी मग ज्यांना ऑलरेडी  मधुमेह आहे जे औषध अथवा इन्सुलिन घेतात त्यांच्यासाठी काय फक्त वरील तपासण्या पुरेश्या आहेत का ? याच उत्तर निश्चितच नाही अस आहे , कारण जेव्हा आपण उपाशी पोटी व जेवणानंतर 2 तासानी शुगर तपासतो तेव्हा आपल्याला त्यात्या वेळेची रक्तशर्करा समजत असते, मात्र जेव्हा आपण औषध घेत असतो तेव्हा त्या औषधांच्या परिणाम होण्याच्या कालावधी नुसार दिवसभरात रक्तातील साखरेचे प्रमाण हि कमी अधिक होत असते जे आपल्याला वरील तपासण्या करून समजत नाही अथवा खरच आपली साखर नियंत्रणात आहे का हे देखील समजत नाही . मग आपली साखर नियंत्रणात आहे हे कळणार तरी कसे ?? या साठी आपल्याला एक HbA1C या तपासणीचा आधार घ्यावा लागतो , सध्या भाषेत सांगायचं झालं तर हिमोग्लोबिन ला चिकटलेली साखर , या तपासणीत आपल्याला मागील 90 दिवसात आपली साखर किती नियंत्रणात होती याची माहिती कळते व त्यावरून आपल्याला हे पण कळते कि खरच आपली साखर नियंत्रणेत आहे का , म्हणून मधुमेही रुग्णांनी दर 3 महिन्यांनी हि तपासणी करून घेणे गरजेचे आहे , तसेच जर तुमी इन्सुलिन घेत असाल तर आपली साखर रात्री , सकाळी , दुपारी , संध्याकाळी अशा वेगवेगळ्या वेळी तपासून पाहिली पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या रक्तातील साखरेचा अंदाज येईल . योग्य तपासण्याचा आधार , आहार , व्यायाम व योग ,औषध  आणि पंचकर्म यांचा वापर केल्यास आपण मधुमेह आटोक्यात ठेवू शकतो.
   डॉ.सचिन रामकृष्ण पाटील एम.डी. पंचकर्म   9823347244
डॉ.निलेश पाटील एम.डी. पंचकर्म
 9970278707
 वेदाग्नी डायबेटिस केअर क्लिनिक व पंचकर्म सेंटर पुणे ,बेळगाव

Sunday, July 17, 2016

#घरोघरी_आयुर्वेद


आचार्य चरकांची दूरदृष्टी की अवैद्यांची पुरातन परंपरा?!
'काही लोक वैद्यांसारखा पोषाख धारण करतात. आपल्या तावडीत कोणी रोगी सापडतोय का याचा शोध घेत सर्वत्र भटकत राहतात. एखादा रोगी सापडला की आपण जगातले असाध्यतम रोगही बरे केले आहेत अशा डिंग्या मारू लागतात. त्या रुग्णाने आधी जे उपचार घेतले असतील ते कसे चूक होते हे तावातावाने सांगू लागतात. आधीच्या वैद्यांची यथेच्छ निंदा करतात. आपण खूपच कमी पैसे घेतो वा काहीही प्राप्त करण्यासाठी उपचार करत नाही असे गोड बोलून रुग्णाच्या नातेवाईकाला आपल्या जाळ्यात फसवतात.
रुग्ण हातात आला की दहा वेळा त्याला तपासण्याचे ढोंग करतात. चेहऱ्यावर गंभीर आव आणतात. रुग्ण आपल्या आवाक्याबाहेर जातोय असं लक्षात आल्यावर मात्र त्यालाच 'तू पथ्य पाळत नाहीस; तुझ्याकडे नीट लक्ष दिले जात नाही; तुझ्याकडे मानसिक धैर्य नाही.' अशी वाटेल ती कारणे सांगू लागतात. रुग्ण मरणासन्न स्थितीत पोहचला की मात्र हे लोक तिथून काढता पाय घेऊन अन्यत्र निघून जातात.
असे लोक आपल्याला खूप ज्ञान आहे असे भासवणारे हे लोक विचारलेल्या प्रश्नांना कधीच उत्तरे देत नाहीत. विद्वान वैद्य समोर दिसल्यावर मात्र ते तोंड लपवून पळ काढतात. अशा लोकांना 'छद्मचर' म्हणजे वैद्यांचे सोंग आणणारे असे म्हणतात. खरा वैद्य हा प्राणदान करत असल्याने त्याला 'प्राणाभिसर' म्हणतात तर अशा कुवैद्यांना रोग देणारे 'रोगाभिसर' म्हणतात. असे ढोंगी हे साक्षात यमराजाचे सेवक असतात. वायूभक्षण करणाऱ्या विषारी सर्पांप्रमाणे ते असतात. अशांचा सर्वथा त्याग करावा.'
वरील भावानुवाद चरक संहिता या ग्रंथातील सूत्रस्थानात आलेल्या २९ व्या अध्यायातील सूत्रांचा आहे. आपल्या आजूबाजुची सद्यपरिस्थिती पहा; आचार्य चरकांची 'दूरदृष्टी' काय होती ते लक्षात येईल. किंवा अशा अवैद्यांचा इतिहास हा आयुर्वेदात कोणतीही 'डिग्री' देण्याची पद्धत नव्हती तेव्हापासूनचाच आहे हे लक्षात येईल!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

Saturday, July 16, 2016

गोमुत्र गुणधर्म

#आयुर्वेदाकडुन_आरोग्याकडे

        🌿 गोमुत्र गुणधर्म 🌿

गोमुत्रं कटु तीक्ष्णोष्णं क्षारं तिक्तकषायकम् |
लघ्नग्निदीपनं मेध्यं पित्तकृत्ककफवातह्रत् || भा.प्र.

गोमुत्र तिखट, तीक्ष्ण, उष्ण, खारट, तुरट, हलके, अग्निदीपन करणारा, पित्तवर्धक पदार्थ आहे...

गाईचे दुध व तुप हे जीवनीय रसायन पदार्थ आहेत त्यामुळेच ते नित्य सेवनीय रसायन गुणधर्मात वर्णिलेले पदार्थ आहेत.

काही संदर्भ 👇🏻👇🏻👇🏻
१. क्षीरं जीवनीयानां | च.सु. २५
२. क्षीरघृताभ्यासो रसायनानां | च.सु.२५

दही हा असेवनीय पदार्थात सांगितलाय त्यामुळेच नियम पाळुन विशिष्ट काळातच उपयुक्त आयुर्वेदीय शास्रानुसार गुणधर्म खालील link मध्ये वाचावयास मिळतील 👇🏻👇🏻👇🏻
http://ayushdarpanmarathi.blogspot.in/2015/12/blog-post_61.html?m=1

क्षारं पुंस्त्वोपघातिनां | च.सु. २५

क्षार पुरूष शक्ती ( मैथुन शक्ती) नाश करणारा आहे.
  गरज नसताना कुणाचेही ऐकुन गोमुत्र पिणे वा गोमुत्र अर्क घेणे हे शुक्रक्षयाचे कारण ठरते. शुक्रक्षयातुन पुढे कुठलेही आजार होऊ शकतात.
त्यामुळे नीट विचार करून व आयुर्वेदीय शास्रानुसार चिकित्सा करणारया वैद्याकडुनच चिकित्सेचा सल्ला घ्यावा.
ज्यांना मनाने वा कुणाचे तरी ऐकुन गोमुत्राचे औषधी प्रयोग स्वतः च्या शरीरावर करावयाचे आहेत त्यांनी आयुर्वेदीय उपाय न म्हणता स्वः उपाय वा तत्सम व्यक्तीचे उपाय मानुन करावेत. काही दुष्परिणाम झाले तर स्वतः लाच दोषी मानाने आयुर्वेदीय शास्राला नाही..
धन्यवाद....🙏🏻🙏🏻🙏🏻

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
Mob no - 9028562102, 9130497856
( For what's up post send your request messege on above mob no )

Friday, July 15, 2016

हलके फुलके

#सामान्य_आयुर्वेद
हलके फुलके
आपण जे काही खातो, ते आपल्याला पोषण देतं. ते किती पोषण देतं हे मात्र त्या आहारावर अवलंबून असतं. आपल्या आवश्यकतेनुसार आपण योग्य तो आहार ठरवायचा आसतो. प्रत्येक आहार पदार्थाची क्षमता वेगळी असते. आज आपण त्याला कॅलरीजमधे मोजतो. पण कुठला आहार किती कॅलरीज् देतो हे आपल्याला कुठे माहिती आहे? कुठल्या पदार्थाची न्यूट्रिटिव वॅल्यू किती आहे हे मोजणे कठीणच काम.
मग करावं काय? कसा ठरवायचा योग्य आहार? आयुर्वेद काय सांगतं?
खाणं जास्त झालं की अंग जड होतं आणि त्यापेक्षा कमी झालं तर अंग जड होत नाही याचा अनुभव तर असेलच. यासोबतच एखादा पदार्थ कमी खाल्ला तरी सुद्धा अंग जड होतं. अर्थात जो पदार्थ पचायला जड तो खाल्ल्यावर जडपणा वाढवतो; आणि जो पचायला हलका तो याच्या उलट अनुभव देतो.
या जड आणि हलक्याच्या फिल्टरमधून आहार घातला की आपण काय खावे अाणी किती खावे याचा अंदाज घेणे कठीण जात नाही. एवढेच नाही तर कुठली गोष्ट किती जड हे सुद्धा समजेल.
भात जास्त खाल्ला की अंग जड होते. म्हणजे भात जड.
भाताचा पदार्थ चिकन बिर्यानी जड कारण त्यामुळे जास्त सुस्ती येते. पण वेज बिर्यानी त्यापेक्षा कमी जड, कारण ती चिकन बिर्यानीएवढी सुस्ती उत्पन्न करत नाही. पुलाव हा बिर्यानीपेक्षा कमी जड. त्यात सुद्धा मांसाहारी पुलाव हा शाकाहारी पुलावापेक्षा जड. आणि पुलाव साध्या स्टीम्ड् राईस पेक्षा जड.
म्हणजेच भात कॅटॅगरीमधे बिर्यानी सर्वात जड असून साधा भात सर्वात हलका आहे.
अबब, म्हणजे जड भातात पुन्हा जड आणि हलकं आहे तर......
आहेच,
तसंच स्टफ्ट् पराठा सगळ्यात जड, त्यापेक्षा हलका नान, त्यापेक्षा हलकी रोटी, त्यापेक्षा हलकी चपाती आणि त्यापेक्षा हलके फुलके.
अर्थात बनवताना वापरलेली सामग्री आणि बनवण्याची प्रक्रिया यावरून काय किती जड आणि किती हलके हे ठरते. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला हे सर्व समजून घेता येते.
©वैद्य अमित पाळ
॥श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद॥
गोमंतक
email- dramitsva@gmail.com
Vaidya Amit Pal

'आयुर्वेदीय औषधांची कायदेशीर संज्ञा'

अभ्यासपूर्ण लेख....जरूर वाचा!!
'आयुर्वेदीय औषधांची कायदेशीर संज्ञा'
(आयुर्वेदिक औषधी उत्पादने म्हणजे काय ?: लेखमाला क्रमांक १)
- अमृत करमरकर
सर्वप्रथम कोणत्याही उपचार पद्धतीच्या औषधांचे व्यावसायिक विपणन करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे आपण ज्या देशात ते औषध विक्री करणार असतो त्या देशांचा विक्री परवाना (मार्केटिंग ऑथोरायझेशन) घेतले पाहिजे. या लेखामध्ये आपण भारताचा विचार करू यात. भारतामध्ये औषधे मग ती अॅलोपॅथी, आयुर्वेदिक, सिध्द, युनानी किंवा होमिओपॅथीची असोत त्यांना भारताचा ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स कायदा १९४० (सुधारित २००५, २००८) (नवीन सुधारित आवृत्ती २०१५ ची असून तिची संसदेमधील मान्यता अजून विचाराधीन आहे) लागू आहे.
सेक्शन ३ मध्ये आयुर्वेदिक, सिध्द आणि युनानी औषधे यांची संज्ञा खालील प्रमाणे दिलेली आहे: सेक्शन ३.७ अ नुसार अशी सर्व औषधे ज्यांचा शरीराच्या अंतर्गत घेण्यासाठी किंवा बाह्य उपयोगासाठी वापर केला जातो जसे की निदान, उपचार, उपशमन, किंवा प्रतिबंध यांच्यासाठी [आजार किंवा विकार जो माणसांमध्ये किंवा जनावरांमध्ये होतो, आणि उत्पादन केले जाते] जी अधिकृत पुस्तकांमध्ये दिलेल्या सुत्रीकरणानुसार (फॉर्म्यूला) बनविली आहेत [अशा पुस्तकांची नावे पहिल्या शेड्युलमध्ये दिलेली आहेत] [पहा: पृष्ठ २७-२८ : ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स कायदा १९४० (सुधारित २००५)]. अशी पुस्तके आयुर्वेदासाठी ५४ सी पर्यंत, सिध्द साठी ५५ ते ८४ पर्यंत, आणि युनानी साठी १ ते १३ अशी आहेत. या पुस्तकांमध्ये आयुर्वेदीय पुरातन संहिता (चरकसंहिता इ.), भैषज्य रत्नावली, निघंटू रत्नाकर, इ. यांचा समावेश होतो.
तर औषध (सर्व प्रकारच्या पॅथीसाठी) या संज्ञेमध्ये (सेक्शन ३.४.ब) i) माणूस किंवा प्राणी यांच्यामध्ये शरीराच्या अंतर्गत घेण्यासाठी किंवा बाह्य उपयोगासाठी ज्याचा वापर केला जातो जसे की निदान, उपचार, उपशमन, किंवा प्रतिबंध यांच्यासाठी कोणतेही आजार किंवा विकार जे माणूस किंवा प्राणी यांना होतात, ज्यामध्ये अशी उत्पादने जी डास पळवून लावण्यासाठी माणसाच्या शरीरावर लावली जातात त्यांचा देखील समावेश होतो; ii) असे पदार्थ (अन्नाव्यतिरिक्त) जे शरीराचे कार्य किंवा रचना यांवर परिणाम करता किंवा जंत इत्यादीचा नाश किंवा कीटक यांचा नाश करता जे माणसाला किंवा प्राण्यांना आजार घडवितात. iii) असे सर्व पदार्थ जे औषधाचे घटक आहेत जसे की रिकाम्या जिलेटीनच्या कॅप्सूल्स, आणि iv) अशी डीव्हाइस जी अतंर्गत किंवा बाह्य उपयोगासाठी असतात ज्यांचा वापर निदान, उपचार, उपशमन, किंवा प्रतिबंध यांच्यासाठी माणूस किंवा प्राण्यांमध्ये केला जातो.
जीएसआर ६६३ (ई) मध्ये संज्ञा ३ एच मध्ये दिलेल्या पेटंट किंवा प्रोप्रायटरी औषध याचा अर्थ असा की ज्याचे सूत्रीकरण (फॉर्म्यूला) वर उल्लेखलेल्या ५७ ग्रंथात आहे आहे परंतु त्यांमध्ये इंजेक्शन्स (पॅरेनटेरल्स) चा समावेश होत नाही.
हे लक्षात घेतले तर असे दिसून येते की आयुर्वेदिक औषध म्हणजे
१) ज्याचे सुत्रीकरण (फॉर्म्यूला) वर उल्लेखलेल्या ५७ ग्रंथात आहे (आता हे लक्षात घ्या हे फॉर्म्यूला या ग्रंथामध्ये श्लोक स्वरुपात आहेत. त्यामुळे त्यातील प्रत्यक्ष प्रमाण हे संस्कृत येत असलेल्या व्यक्तीकडून माहिती करून घेतले पाहिजे)
२) हे फॉर्म्यूला संस्कृत मध्ये असल्याने या ग्रंथातील काही फॉर्म्यूले घेऊन आयुर्वेदिक फॉर्म्युलरी ऑफ इंडियाची निर्मिती भारत सरकारच्या फार्माकोपियल लॅबोरेटोरी ऑफ इंडियन मेडिसिन यांनी केली आहे. १९७८ सालापासून याचे आजपर्यंत २ भाग प्रसिद्ध झाले असून त्यामध्ये श्लोकाबरोबरच औषधांचे आजच्या सिस्टीमनुसार प्रमाण (किलोग्राम) मध्ये दिलेले आहे.
३) औषध निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी औषधी झाडे तसेच खनिजे यांचे मोनोग्राफ दिलेले आहेत, याबरोबरच क्वालीटेटीव, क्वांटीटेटीव चाचण्या दिलेल्या आहेत.
म्हणजेच आज बाजारात जे काही औषध आयुर्वेदिक या नावाने विकले जाते ते पूर्णतः आयुर्वेदीक आहे असे म्हणायचे असेल तर त्यावर ग्रंथाचे नाव, श्लोक क्रमांक लिहलेला असेल, किंवा आयुर्वेदिक फॉर्म्युलरी ऑफ इंडियाचा फॉर्म्यूला क्रमांक असेल तरच ते आयुर्वेदिक समजावे.
हे लक्षात घेतले पाहिजे की अशी औषधे जी वरील संज्ञेनुसार पूर्णपणे आयुर्वेदिक आहेत त्यांना भारतीय कायद्यानुसार नैदानिक अनुसंधान (क्लिनिकल रिसर्च) करणे गरजेचे नाही. भारतीय कायद्यानुसार हि औषधे शतकानुशतके आयुर्वेदिक परंपरेमधून आली असल्याने त्यांना क्लिनिकल रिसर्च गरजेचा नाही.
परंतु या संज्ञेत न बसणारी म्हणजेच वैद्य तसेच औषध कंपन्यांनी सुरु केलेली औषधे ज्यांचे फॉर्म्यूला या पुस्तकात नाहीत त्यांना क्लिनिकल रिसर्च शिवाय आयुर्वेदिक म्हणून मार्केटिंग साठी मान्यता दिली जाऊ नये असे ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स कायदा तसेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसिएमआर) ची मार्गदर्शक तत्वे सांगतात. क्लिनिकल रिसर्च या प्रक्रीयेविषयी पुढील भागात सविस्तर चर्चा केली जाईल.
आता परदेशातील संज्ञा पाहूयात. एक तर आयुर्वेद या ग्रंथाला फार्माकोपिया सारखी मानके देणारा ग्रंथ म्हणून मान्यता नाही कारण आयुर्वेद हा एक ग्रंथ नाही आहे. आणि आयुर्वेदाची तत्वे सांगणारे ऋषीमुनींपासून ते प्रभाकर ओगले किंवा इत्यादी विद्वान आयुर्वेदाचार्यानी लिहिलेले ग्रंथ अनेक आहेत. त्यामुळे विचारामधील एक वाक्यता दिसून येत नाही. (विचारातील फरक का एक्स्पायरी प्रकरणामध्ये ठळकपणे चर्चिला जाईल). त्यामुळे परदेशात आयुर्वेद हि संज्ञा नाहीच आहे. तिथे आयुर्वेदिक फॉर्म्यूला हे एक तर पॉलीहर्बल या विभागामध्ये, किंवा फंक्शनल फुड्स किंवा न्यूट्रास्यूटीकल्स मध्ये गणले जातात.
लेखकाविषयी:
©अमृत करमरकर. अमृत करमरकर हे फार्मासिस्ट (बी फार्म) असून क्लिनिकल रिसर्च मध्ये क्रॅनफिल्ड विद्यापीठ, ब्रिटन मधून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे, तसेच ते सध्या क्लिनिकल रिसर्च मध्ये पी.एचडी करीत आहेत. इनक्लीनीशन औषधनिर्माण कंपनीचे ते संचालक आहेत. संपर्क: +९१७२०८८९३२५०
#आयुर्वेद, #Ayurveda, #legal, #inclinition #regulatory, #regulatoryaffairs, #pharmaceuticals

Wednesday, July 13, 2016

रे सुलतान

आयुर्वेद कोश ~ रे सुलतान !!

सलमान खान चा सिनेमा येऊन गेला की 'हंगामी ' पैलवानांची संख्या वाढायला लागते . गल्लो गल्ली आणि जिम मध्ये असे 'सुलतान ' हुप्पा हुय्या करायला सुरुवात करतात . विशेष करून नुकतीच मिसरूड फुटायला लागलेली पोरं आणि झिरो फिगर ची क्रेझ असलेल्या तरुणी यांना तर ' जिम ' म्हणजे 'मस्ट ' असते . जिम ला जाण्यास किंवा स्वस्थ राहण्यास आमचा विरोध नाही . परंतु झटपट 'सुलतान ' होण्याच्या नादात जे काही वाईट परिणाम शरीरावर होतात त्यावर प्रकाश टाकण्या साठी लेखन प्रपंच . . .

स्वास्थ्य किंवा फिट राहणे याचे अंतिम ध्येय हे 'मसल पम्प ' करणे हे नसते . किंवा मस्क्युलर असे सुलतान हे स्वस्थ असतातच असे नाही . त्यामुळे फिटनेस म्हणजे मसल पम्प हे समीकरण डोक्यातून प्रथम काढून टाकायला हवे . ते पम्प करायचेच असतील तर प्रथम -

1. शरीर म्हणजे काय ? हे समजायला हवे .
2. स्नायूंची रचना आणि भार वाहन क्षमता जाणून घेतली पाहिजे .
3. व्यायाम करायची 'शास्त्रीय ' पद्धत समजून आणि शिकून घ्यायला हवी .
4. वजन उचलत असताना आणि ठेवत असताना 'श्वासोच्छ्वास ' कसा असावा ? याबाबत 'अचूक ' मार्गदर्शन घ्यायला हवे .
5. आहार काय असावा आणि काय नसावा याबाबत 'तज्ज्ञांकडून ' सल्ला आणि मार्गदर्शन घ्यायला हवे.
6. प्रारंभी आपली 'ताकद ' किती आहे हे आपल्याला समजायला हवे .
7. ती ताकद 'अभ्यासाने + सरावाने ' वाढते हे मान्य करायला हवे . इत्यादी !

या प्रारंभिक गोष्टी व्यायाम सुरू करायच्या आधी लक्षात घ्यायला हव्यात . त्यांचा अभ्यास करायला हवा .शारीरिक क्षमतांना आणि मर्यादांना त्यांच्या अंतिम क्षणापर्यंत 'ताणणे ' हे योग्य नाही . आयुर्वेदिक भाग सांगायच्या आधी 'मॉडर्न ' लोक काय म्हणतात ते सांगतो -

जिम मध्ये अतिशय केलेला व्यायाम ' ओव्हर ट्रेनिंग सिंड्रोम ' यास जन्म देतो . Journal of Athletic Training यात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार या सिंड्रोम मध्ये काय होते पहा -

> अतिशय दमल्याची , शक्तिपात झाल्याची भावना
>स्नायू आणि सांध्यात वेदना
>डोके दुखी
>निद्रा नाश
>रोग प्रतिकारक क्षमता कमी होणे .
>भूक मंदावणे
>वजन कमी होणे
>प्रचंड तहान लागणे - विशेष करून रात्री .
>हृदयावर ताण येणे . इत्यादी !

हा सिंड्रोम विशेष करून 'एथलेट्स ' मध्ये पाहायला मिळतो . परंतु आपले 'सुलतान ' हे एथलेट्स पेक्षा कमी नसतात . सकाळ संध्याकाळ 'हेवी वर्क आऊट ' करणाऱ्या सुलतान मध्ये ही लक्षणे सहज आणि लवकर पाहायला मिळतात .

आयुर्वेदानुसार व्यायाम हा 'अर्धशक्ती ' करावा . यात व्यायाम करणाऱ्याचे हित आहे . व्यायाम करत असताना घशाला कोरड पडली की अर्धशक्ती व्यायाम झाला असे समजावे . त्यात ज्यांना सुलतान व्हायचेच आहे त्यांनी वसंत , हेमंत आणि शिशिर ऋतू मध्ये थोडा अधिक व्यायाम केला तर चालतो पण बाकी ऋतूत अर्ध शक्ती व्यायाम करणे उत्तम . जर हुप्पा हुय्या करत व्यायाम केला तर खोकला , ज्वर , ओकारी , दम लागणे , श्वास इत्यादी रोग आहेतच . . या सोबत 'व्यायाम शोष  ' नावाचा एक रोग होऊ शकतो !

क्षय किंवा शोष म्हणजे सामान्य भाषेत सुकणे . . बल हानी होणे !! आपल्या ताकदी पेक्षा अधिक व्यायाम , वजन उचलणे , कुस्ती करणे इत्यादी क्रिया केल्याने शरीरातील रसादि धातूंचा क्षय होऊन शरीर कृश होणे , कापणे (थरथरणे ) , बल , कांती (शरीराचे तेज ) , तोंडाची चव , अग्नी (पचन शक्ती ) कमी होते . यातून एक शब्दात सांगायचे तर 'चरख्यातून पिळून काढलेल्या उसासारख्या मनुष्य बलहीन , तेज नसलेला , वाळलेला दिसायला लागतो ' अशा व्यायामाचा काही उपयोग है क्या 'रे सुलतान ? '

व्यायाम करत असताना शास्त्रीय दृष्टिकोनातून व्यायाम , त्याला पूरक असा आहार , दोहोंना बल देणारी निद्रा (झोप ) ही अत्यावश्यक असते . मला बारीक व्हायचंय म्हणून मी डाएट पण करणार आणि जिम मध्ये 100 किलो चे 'स्कॉट्स ' पण मारणार हे 'धाडस ' अत्यंत चुकीचे आहे . एकदम 'हार्ड कोअर ' व्यायाम सुरू आणि आहार 'टोटली बंद ' यातून तुझ्या शरीराचे नुकसान होतं 'रे सुलतान ' !!

व्यायाम करणे , जिम ला जाणे यास कोणताही विरोध नाही . . पण त्याच्या 'अतिरेकाने ' नसत्या वयात नसती दुखणी निस्तरावी लागतात याचे वाईट वाटते . अनेकदा पंचविशीत केलेली 'सुलतान ' गिरी चाळीशीत डोके वर काढते त्यावेळी डोक्याला हात मारून घेणे यापलीकडे हातात काहीच रहात नाही . त्यामुळे शेवटी इतकंच लक्षात ठेव 'रे सुलतान ' . .

> व्यायाम ही हुय्या हुप्पा करायची गोष्ट नाही . ते शास्त्र आहे .
>व्यायामातले शास्त्र कळले तर 'स्वास्थ्य ' नाही कळले तर 'दवाखाना '
>व्यायाम -आहार - झोप यांचा समतोल 'अत्यावश्यक ' .
>आहार /सप्लिमेंट /मांसाहार सुरू करत असताना आधी आपल्या पचन शक्ती चा विचार .
>कमी वेळेत अधिकाधिक मसल्स पम्प करण्याचा अट्टाहास चूक .
>शारीरिक क्षमता ओढून ताणून व्यायाम करणे म्हणजे साहस .
>मुख्य व्यायामाच्या आधी 'वॉर्म अप ' आणि नंतर 'मसल्स रिलॅक्स ' करणे . तेलाने मसाज करणे आवश्यक . . .
> एसी मध्ये व्यायाम करणाऱ्यांना 'मनाचा मुजरा ' इत्यादी !!

स्टिरॉईस आणि सप्लिमेंट यावर स्वतंत्र लिहीनच . . पण 'खून मे तेरी मिट्टी . . मिट्टी मै तेरा खून . . ' असलेल्या 'जुनुनी सुलतान ' च्या स्वास्थ्याची काळजी वाटली म्हणून वास्तवाची थोडीफार कल्पना देणारा लेख लिहिला . . . सिर्फ तेरे लिये . . रे सुलतान !!

वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
9175338585

आयुर्वेद कोश (https://www.facebook.com/aarogyakosh/ )

(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)

दुधाचे मित्र व शत्रु

#आयुर्वेदाकडुन_आरोग्याकडे

      ✔  दुधाचे मित्र व शत्रु ✖

             🌺 दुधाचे मित्र 🌺

सहकारफलं चैव गोस्तनी माक्षीकं घृतम् |
नवनीतं श्रृंगबेरं पिप्पलीं मरिचानि च ||
सिता पृथुकसिन्धुत्थं पटोलं नागराभयाः ||
क्षीरेण सह शस्यन्ते वर्गेषु मधुरादिषु ||

आंबा, मनुका, मध, तुप, लोणी, मिरे, पिपल्ली, साखर, सैंधव मीठयुक्त चिवडा, पडवळ, सुंठ आदी पदार्थ दुधासह खाण्यासाठी हितकारक असतात.

खालील पदार्थ दुधासह खाल्ले तरी चालतात.
१. आंबट पदार्थांत आवळा
२. गोड पदार्थांत साखर
३.भाज्यामध्ये पडवळ
४. तिखट पदार्थांत आर्द्रक
५.तुरट पदार्थांत यव
६.मीठामध्ये शेंदेलोण

           ✖ दुधाचे शत्रु ✖

मत्स्यमांसगुडमुद्गमूलकैः कुष्ठमावहति सेवितं पयः |
शाकजाम्बवसुरादिसेवितं मारयत्यबुधमाशु सर्पवत् ||

दुधासह मासे, मांस, गुळ, मुगदाळ, मुळा खाल्ल्याच्या परिणामी त्वचेचे आजार उत्पन्न होतात.
भाज्या, जामुन, सुरा मद्यजन्य पदार्थ दुधासह घेतले असता तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात क्वचित मरणही येऊ शकते.

🍋🍊🍐 फळांसह दुध 🍼🍼🍼

क्षीरे विरूध्दान्यैकन्ध्यं सह वै भुज्यते यदि |
बाधीर्यमान्ध्यं वैवर्ण्य मुकत्वं चाथ मारणम् ||

दुधासह फळे खाणे वा फळांचा juice  दुधयुक्त खाणे हे बधिरता, आंधळेपणा (डोळ्याचा नंबर तीव्र गतीने वाढविणारे), त्वचेचे वैवर्ण्य त्वचाविकार कारक, मुकेपणा, काही वेळा मृत्युचे कारणही ठरू शकते..
विरूध्द अन्न कधीही त्रासदायकच फक्त तात्काळ त्रास न देता ते काळाच्या संस्काराने त्रास देते यात काहीच शंका नाही..

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
Mob no -- 9028562102, 9130497856
For what's up post send your request messege on above mob no

#आयुर्कामः

#घरोघरी_आयुर्वेद
#आयुर्कामः
"डॉक्टर; मला संबंध ठेवायला अडचण येते. 'ती अवस्था' फार काळ टिकतच नाही." तो
"कधीपासून त्रास आहे?" मी
"सध्याच. गेले काही महिने फार त्रास जाणवतोय." तो
"नाही हो डॉक्टर. लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच हा प्रॉब्लेम आहे. आता तर खूपच वाढलंय प्रकरण." ती
पुरुष जननेंद्रियाला उत्तेजना न येणे वा आलेली उत्तेजना पुरेसा काळ न टिकणे याला क्लैब्य किंवा Erectile dysfunction असे म्हणतात. या समस्येमुळे स्वाभाविकपणे शरीरसंबंध ठेवण्यास अडसर निर्माण होतो. भारतात दर वर्षी सुमारे १ कोटी रुग्णांना ही समस्या भेडसावते असे आकडेवारी सांगते.
कारणे:
- भय, चिंता, क्रोध इत्यादी मानसिक भावांनी अस्वस्थ असणे.
- मनोविकारांवरील उपचारासाठी वापरली जाणारी आधुनिक वैद्यकातील औषधे (Antidepressants)
- प्रजनन संस्थेतील अवयवांशी संबंधित शस्त्रक्रिया
- तिखट, आंबट आणि खारट चवीचे आणि उष्ण असणाऱ्या खाद्यपदार्थांचे अत्यधिक सेवन
- अतिप्रमाणात शरीरसंबंध ठेवणे (आयुर्वेदीय ऋतुचर्या यासंबंधी नियमदेखील सांगते.)
- मधुमेहासारख्या रोगाचा दुष्परिणाम
- जन्मजात असलेला दोष
- धूम्रपान, तंबाखू खाणे वा मद्यपान अशी व्यसने
- पॉर्न फिल्म्स अतिरेकी प्रमाणात पाहणे इत्यादि.
उपचार:
- सर्वसाधारणपणे पहिल्याच वेळेस शरीरसंबंध ठेवताना बहुतेक पुरुषांना या अडचणीला सामोरे जावे लागते. त्यात चिंता करण्यासारखे काही नसून पुढील पुढील प्रसंगी हा प्रश्न आपोआप सुटतो. हीच परिस्थिती प्रत्येक वेळेस राहिल्यास मात्र उपचार घेणे आवश्यक ठरते.
- बहुतांशी वेळा ही समस्या मानसिक बाबींशी संबंधित असल्याने औषधांसहच समुपदेशन महत्वाचे ठरते.
- मधुमेही रुग्णाला ही समस्या असल्यास मधुमेहावरील उपचारदेखील आयुर्वेदानुसार घेणे अधिक लाभदायी ठरते.
- व्यसनांमुळे ही समस्या उद्भवत असल्यास त्या व्यसनांचा त्याग करण्यातच शहाणपण आणि 'अर्धे उपचार' दडलेले आहेत.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्लैब्य किंवा Erectile dysfunction याबाबत आयुर्वेदाच्या माध्यमातून उत्तम परिणाम मिळवणे शक्य असले तरी आपल्याला अशी समस्या असल्यास; तातडीने आयुर्वेदीय वंध्यत्व उपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ज्यांना आपला पुरुषी अहंकार कुरवाळत बसायची सवय असते; त्यांच्याकडे पश्चात्ताप करण्यावाचून फार काही शिल्लक राहत नाही हे सत्य कायम लक्षात ठेवावे.
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदीय वंध्यत्व उपचार तज्ज्ञ
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

Monday, July 11, 2016

खास पावसाळ्यासाठी आयुर्वेदीय पाककृती: 'मुदग यूष'

#घरोघरी_आयुर्वेद

खास पावसाळ्यासाठी आयुर्वेदीय पाककृती: 'मुदग यूष'

साहित्य आणि कृती:

साधारणपणे कडधान्ये वापरून यूष तयार केले जातात. याकरता; ज्या कडधान्याचे यूष बनवायचे आहे ते कडधान्य ५० ग्रॅम घ्यावे. त्यामध्ये ६५० मिली पाणी घालावे आणि मध्यम आचेवर शिजवण्यास ठेवावे. कडधान्ये व्यवस्थितपणे शिजल्यावर तसेच पाणी सुमारे निम्मे आटल्यावर तयार झालेले मिश्रण एकत्रित घोटून व त्यानंतर गाळून घ्यावे. अशाप्रकारे तयार झालेल्या युषामध्ये वर दिल्याप्रमाणे आपल्या आवडीनुसार प्रकार करता येतात. आयुर्वेदात प्रामुख्याने मुगाचे यूष हे अधिक प्रमाणात नमूद केल्याचे दिसते. पावसाळ्यासाठी खास मुद्ग यूष बनवत असताना त्यात डाळिंबाचा रस घालून; त्याला आंबट-गोड चवीचे करावे. याने पावसाळ्यात शरीरात वाढणारा वात आणि साचणारे पित्त आटोक्यात राहतात.

अन्य गुणधर्म:

- मुगाचे कढण हे पचायला हलके असते आणि वाताला कमी करते.
- शस्त्रक्रिया झाल्यावर घ्यावयाचा आहार अथवा प्रसुतीनंतर घेण्यासाठी म्हणून त्यात तूप व खडीसाखर मिसळून दिल्यास उपयुक्त ठरते. (मधुमेहींना मध घालून द्यावे.)
- पित्ताचा त्रास होवून पोटात दुखत असल्यास खडीसाखर मिसळून यूष द्यावे.
- अतिसारामध्ये सुंठपूड घालून यूष द्यावे.
- कफाचे विकार असल्यास वा मधुमेहींनी यूष घ्यायचे असल्यास त्यात सैंधव, हिंग व सुंठ घालून घ्यावे.
- उलटी होणे, जुलाब होणे, वारंवार तहान लागणे अशा तक्रारींवर मुग भाजून तयार केलेल्या मुद्ग युषामध्ये लाह्या आणि मध मिसळून दिल्यास अधिक लाभ होतो.
- वातामुळे सांधे दुखणे वा संधीवातासारखा त्रास असल्यास मुद्ग युषामध्ये तूप घालून द्यावे.

या पावसाळ्यात गरमागरम मुदग यूष ची मजा चाखा. मस्त खा आणि स्वस्थ राहा.

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

(छायाचित्र: प्रातिनिधिक, नेटवरून साभार)

Sunday, July 10, 2016

आयुर्वेद की महती . . जहांगीर की जबानी !!

आयुर्वेद कोश ~ आयुर्वेद की महती . . जहांगीर की जबानी !!

हिंदुस्थानावर मोघलांनी बरीच वर्ष राज्य केले . त्या 'बादशाह ' लोकांपैकी 'जहांगीर ' होय . तर हा जहांगीर आपली रोजनिशी लिहीत असे . . त्याला 'तुजूक ए जहांगीर ' किंवा ' जहांगीर नामा ' असे नाव आहे . मूळ पर्शिअन भाषेतली ही  संपूर्ण रोजनिशी उपलब्ध आहे .तिचा हिंदी अनुवाद सुद्धा उपलब्ध आहे . त्यात आलेला आयुर्वेद संदर्भ शेअर करत आहे . . .

जहांगीरच्या दरबारात एक भारतीय बल्लवाचार्य दाखल झाला . 'मासळी ' शिजवण्याच्या त्याची खासियत होती . बादशहाच्या दरबारी नोकरी करायची इच्छा त्याने व्यक्त केली . त्यावर बादशाह म्हणाला की 'तू तुझी कला दाखव . ती पसंत पडली तर तुला नोकरीला ठेवू '

त्या दिवशी बल्लवाने शाही बावर्ची खान्यात मासळी तयार केली . बादशाह  यास ती मासळी प्रचंड आवडल्याने त्याने बल्लवास नोकरीवर ठेवून घेतले . अनेक दिवस बल्लव बादशहास उत्तम असे जेवण खायला घालत असे . बादशाह आवडीने ते खात असे . एक दिवस मात्र तो बल्लव सापाचे तुकडे करून , सापाचे मांस बादशहास मासळी म्हणून खायला घालत असे ,हे उघडकीस आले . बादशाह समोर बल्लवाने याची कबुली दिली . . . बल्लव इतके सर्प आणत कोठून असे याबाबत बादशहास उत्सुकता निर्माण झाली . . . त्याने बल्लवास हुकूम केला की तू सर्प कोठून आणतोस हे आम्हास बघ्यायचे आहे . .

एके दिवशी बादशाह आपला लवाजमा आणि बल्लव घेऊन अरण्यात गेला . तेथे थोडी जागा मोकळी करून दुधाची कढई भरून ठेवली होती . त्या जागेपासून दूर अशी बादशाह व त्याच्या लावाजम्याची बसायची सोय केली . बल्लव मंत्र म्हणू लागल्यावर त्या अरण्यातून विविध सर्प बाहेर आले . . . त्या सर्पांचा प्रमुख आला . . ते सर्व सर्प त्या कढई मधील दूध पिऊ लागले . . . मुख्य सर्प मात्र बादशहा यास हवा होता . . तशी त्याने बल्लवास आज्ञा केली . . बल्लव यावर म्हणाला '' या सर्पास पकडणे म्हणजे साक्षात मृत्यू आहे . . तरीही आपणास हा सर्प हवा असेल तर माझी विनंती मान्य करा . . या सर्पाने मला दंश केला तर मला पुरून किंवा जाळून न टाकता काळ्या रंगाच्या बैलाचे पोट चिरून मला त्यात ठेवा आणि बंगाल मधील बारिसाल  येथे असणाऱ्या माझ्या बहिणीला 40 दिवसांच्या आत बोलवा . आणि तिला ही हकीकत सांगा ''

मुख्य सापाला पकडताना त्याने बल्लवास दंश केला आणि तो मरणासन्न झाला . बादशाह ने त्यास काळ्या बैलाच्या पोटात बल्लवास घालून बैलाचे पोट शिवले . त्याच्या बहिणीस सांगावा पाठवला .

त्या बल्लवाची बहीण दिपाबाई दिल्लीत दाखल झाल्यावर तिला ही सर्व हकीकत सांगण्यात आली . तिने राजाकडून 3 दुधाने भरलेल्या कढया मागवून घेतल्या . त्या कढइत तिने तिच्याजवळ असलेले औषध टाकले . बल्लवाचे शरीर बैलाच्या पोटातून काढून त्या प्रथम कढई मध्ये टाकले . संपूर्ण कढई मधील दूध हिरवे झाले . त्या नंतर तिने दुसऱ्या कढई मध्ये आपल्या जवळील औषध टाकले . त्या दुसऱ्या कढई मध्ये बल्लवाचे शरीर टाकले आणि त्या कढई मधील दूध सुद्धा हिरवे झाले . तिसऱ्या कढईत औषध टाकून त्यात बल्लवाचे शरीर टाकले असता दूध हिरवे झाले नाही . पण बल्लवाच्या शरीराची मात्र हालचाल होऊन तो शुद्धीत / जिवंत जाहला !!

गोष्ट संपली . . आता शंका घेण्याचे आणि विवादाचे मुद्दे . .

1. मेलेला किंवा मरणासन्न माणूस काळ्या बैलाच्या पोटात 40 दिवस कसा राहील ?
2. बैलाच्याच पोटात का ?
3. तिने कोणते औषध दुधात घातले ?
4. मंत्र म्हंटल्यावर साप जंगलातून आले असे कसे ?
5. साप दूध पीत नाहीत असं म्हणतात मग इथे असे उल्लेख कसे ?
6. ही गोष्ट 'प्रयोगशाळेत ' सिद्ध होऊ शकते का ?? इत्यादी गुणिले अनंत !!

काळाच्या ओघात अनेक दुवे अनेक विद्या या नष्ट झाल्या आहेत . विष चिकित्सा आणि त्यावरील उपक्रम याचे संदर्भ संहितेत सापडतात . परंतु त्यावर आणि त्याच्या आधारावर 'यशस्वी ' चिकित्सा करणारी गुरु शिष्य परंपरा सध्या 'ज्ञात ' नाही . आदिवासी भागात किंवा ग्रामीण भागात भोंदू लोक विष उतरवायचा नावाखाली जे अघोरी प्रकार करतात त्याचे समर्थन ना आयुर्वेद करतो ना भारतीय शास्त्रे . .

ही गोष्ट शेअर करण्याचा हेतू असा की जहांगीर याच्या काळापर्यंत आयुर्वेद आणि वनस्पती शास्त्र किती प्रगत , प्रगल्भ आणि अग्रेसर होते याचा अंदाज आपल्याला बांधता यावा . 1627 मध्ये जहांगीर वारला . . त्यामुळे किमान 16 व्या शतका पर्यंत भारतीय शास्त्रे यशाच्या शिखरावर होती असे म्हणायला हरकत नाही . त्या नंतर मात्र आपली इतकी झपाट्याने घसरगुंडी झाली की आता आपल्याला 'असे काही होऊ शकते का ? ' किंवा ' असे काही झाले असेल का ?' असा प्रश्न पडतो आणि वाद घालायला आपण बाह्या सरसावून तयार होतो . . .

सदर घटना ही ' तुजूके जहांगीर ' मधील आहे . . . यावर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा विषय . . आम्हाला मात्र असे संदर्भ मिळाल्यावर आनंद वाटतो भारतीय शास्त्रांच्या प्रगतीचा आणि दुःख सुद्धा वाटते सदर समृद्ध वारसा आणि ज्ञान कालौघात लुप्त झाल्याचे !!

वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
आयुर्वेद कोश (https://www.facebook.com/aarogyakosh/ )

9175338585

(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)

नेत्र आणि आयुर्वेद

#नेत्रायु

नेत्र आणि आयुर्वेद

आयुर्वेदीय औषधांनी डोळ्यांचे आजार बरे होतात का? आयुर्वेदामध्ये डोळ्यांच्या आजारावर औषधे आहेत का? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार रुग्णांकडून केला जातो. सर्व प्रकारचे उपचार करून थकल्यावर रुग्ण आयुर्वेदाकडे वळतात.

यासाठीच योग्य वेळी उपचार घेतल्यास हमखास फरक पडतो.
 वरील सर्व प्रश्नांची उत्तर खूपच सोपे आहे. सर्व शरीर तसेच मनावर उपचार करणाऱ्या चीकीत्सापद्धातीमध्ये डोळ्यांचे आजार का बरे ठीक होऊ नयेत? आयुर्वेदामध्ये नेत्र व त्याचे विकार तसेच त्यावर करायची चिकित्सा याचे सखोल वर्णन आहे.

आयुर्वेदाच्या प्रयोजनानुसार डोळ्यांचे स्वास्थ्य/ आरोग्य अबाधित राखण्यापासून वर्णन आले आहे. यामध्ये अंजने, नस्य ,शिरोभ्यंग, पादाभ्यंग आणि इतर व्यायाम यांचा समावेश होतो. हल्ली लहान वयातच मुलांना डोळ्यांचे विकार उद्भवतात, हे रोग होऊच नयेत म्हणून घ्यावयाच्या संकल्पनांचे वर्णन आयुर्वेदामध्ये आहे.

या सर्व गोष्टींचे पालन करून जर विकार उद्भवले तर त्यांच्र उत्तर सुद्धा आयुर्वेदाकडे आहे. आयुर्वेदामध्ये सर्व ग्रंथांमध्ये मिळून १०० पेक्षा जास्त व्याधींचे वर्णन आले आहे. यामध्ये त्यांचे उपप्रकार ,अवस्था यांचेही सखोल वर्णन आले आहे. त्याअनुषंगाने या रोगांवरचे उपचार यांचेही वर्णन आहे. औषधोपचाराचे विविध मार्ग (Routes of Administration), विविध पद्धती (therapuetics) याबद्दल माहिती आहे. तसेच काही व्याधीमध्ये शस्त्रक्रियेचे वर्णन आले आहे.

त्यामुळे अशा संपन्न चिकित्सापद्धतीचा डोळ्यांसाठी वापर करून घेण्यास आपण नक्कीच उत्सुक असाल जेणेकरून डोळ्यांचे आरोग्य अबाधित राहील.

© वैद्य निखिल माळी, MS (Ayu)
'श्रीव्यङ्कटेश नेत्रालय', चिपळूण
+91 94 21 300591

(लेखक आयुर्वेदीय नेत्ररोगतज्ज्ञ आहेत.)

Friday, July 8, 2016

आहाराचा आयुर्वेदोक्त क्रम

#आयुर्वेदाकडुन_आरोग्याकडे

🌺 आहाराचा आयुर्वेदोक्त क्रम 🌺

अश्नीयात्तन्मना भुत्वा पूर्वं तु मधुरं रसम्|
मध्ये$म्लसवणौ पश्चात्कटुतिक्तकषायकान्|| सार्थ भावप्रकाश

जेवनाच्या सुरूवातिला गोड पदार्थ, जेवनाच्या मध्ये आंबट खारट पदार्थ, तर जेवणाच्या शेवटी तिखट, कडु, तुरट पदार्थ खावेत.
            वरील प्रमाणे आहार का घ्यावा याविषयी शास्रोक्त माहिती...
   १. आयुर्वेदीय शास्रानुसार आहार पचनाचा पहिला काळ हा कफाचा असतो. मुखापासुन पोटाच्या वरच्या भागापर्यंत खालेल्या अन्नामध्ये कफ मिसळुन अन्नाचा संघात मोडतो. पचनाची क्रिया योग्य रितीने पुढे नेतो. त्यामुळे अन्नपचनाच्या सुरूवातिला कफवर्धक गोड पदार्थ खावेत.
२ पोटातील खालच्या भागातुन अन्न पुढे आतड्यात जात असताना पित्ताद्वारे अन्नाचे पचन होते. आंबट खारट पदार्थ शरीरात पित्त वाढवितात. ज्यामुळे गोड कफयुक्त अन्नाचे पचन सुस्ती आळस न येता होते. त्यामुळेच जेवणाच्या मध्ये आंबट खारट पदार्थ घ्यावेत.
३. पित्ताद्वारे अन्नाचे पचन पुर्ण झाल्यानंतर शेवटी आतड्यामधुन तिखट तुरट कडु रसांच्या साहाय्याने आवश्यक पोषक भाग शरीरात शोषला जातो आणि मलभाग शरीराच्या बाहेर पडतो. यामुळेच आहाराच्या शेवटी तिखट तुरट कडु पदार्थ खाणे उपयोगी असते...
  गोड पदार्थंत गहु ज्वारी भात यांचा समावेश होतो. ह्यात गोडवा कमी प्रमाणात असतो...
                 या क्रमाशिवाय आहार घेणे जसे sweet dish icecream जेवणाच्या शेवटी घेतले तर मलभाग जास्त तयार होतो पोषक रस योग्य रितीने शोषला जात नाही, पचन बिघडते. तसेच जेवणाच्या सुरूवातिला starters सुप मसाला पापड आदी खाल्ली असता अन्नाचा संघात ज्या कफाने मोडतो तो कफ योग्य मात्रेत तयार होत नाही. अन्नाच्या पचनाची दिशाच बिघडते.
          त्यामुळेच नेहमी हॉटेलात जेवणारया लोकांत पचनाशी संबधीत आजार तक्रारी अधिक असतात. कारण क्रमाच्या विरूध्द घेतलेला आहार hoteling चा परिणाम म्हणता येइल याला....
योग्य मात्रेतच नाही तर योग्य क्रमानेही आहार घेणे आवश्यक. अन्नपचनासाठी व शरीराच्या पोषनासाठी (अन्न अंगाला लागण्यासाठी)  आयुर्वेदीय क्रमानुसारचे आहारसेवन आवश्यक आहे.

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
 9028562102,  9130497856
(for what's up post send your messege on above mob no)

फॅट टॅक्स !!

दैनंदिन आयुर्वेद - फॅट टॅक्स !!

भारतात कधी , कशावर आणि का टॅक्स लागेल याची शाश्वती नाही . पण म्हणतात ना कुछ टॅक्स अच्छे होते है . . काय ? असं कोण म्हणतं ? तुम्ही -आम्ही आणि तब्येतीची काळजी असणारा प्रत्येक जण यापुढे म्हणेल कारण . . केरळ सरकारने ज्यात 'चीज ' चा मुक्त हस्ताने वापर केलेला आहे अशा पदार्थांवर 14.5 % फॅट टॅक्स आकारण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे . . . या 'धाडसा ' बाबत सरकारचे विशेष अभिनंदन !!

भारताला मधुमेहाची राजधानी , लठ्ठ पणाची राजधानी इत्यादी 'जागतिक ' स्तरावर म्हणवून घेणे हे काही भूषण नाही . लाईफ स्टाईल डिसॉर्डर्स याबाबत आपण पुढे असणे हे खरे तर आपल्या संस्कृतीचा आणि शास्त्रांचा पराभव आहे . आपण बरेच खातो पण नक्की काय खायचे ? हे जाणून घ्यायला आपण पाश्चात्य लोकांकडे आशेने बघत बसतो . . आता ते लोक काय 'खा वरण भात तूप ' सांगणार नाहीत . . ते सांगणार ज्यूस प्या , फ्रुट्स खा , स्प्राऊट्स खा . . . . . . . चीज खा !!  झाले . . आपले लोक 'हाण पांड्या ' (अ )न्यायाने सुरू . . . तर भारतात फोफावणारे चायनीज चे लाल गाडे (गल्लीतल्या पक्याने फोडणी घातलेले नूडल्स आणि मन्चुरिअन ) तसेच चीज चे झिजणारे डोंगर हा चिंतेचा विषय आहे . . .

सॅन्डविच पासून ते दाबेली पर्यंत आणि डोसा पासून ते सामोश्या पर्यंत यत्र तत्र सर्वत्र चीज खाणाऱ्या मानवा पुढील निरीक्षणे -संशोधन वाच -

1.  Journal of the National Cancer Institute  यांच्या मते चीज स्तनाच्या कर्करोगाची शक्यता वाढवतो .

2. American Academy of Pediatrics  यांच्या मतानुसार चीज हा लहान मुलांच्यात होणाऱ्या डायबेटिज चे प्रमाण वाढवतो . तसेच रक्तातील 'आयर्न ' याचे प्रमाण कमी करतो .

3. European Journal of Cancer.यांच्या मते चीज चे अतिसेवन मूत्राशयाचा कर्करोग निर्माण करू शकतो .

4. चीज याचे सेवन मलबद्धता निर्माण करते .

5. acne होण्यामागचे प्रधान कारण चीज आहे . ( कोणताही फेस वॉश वापरला तरी पिंपल्स जात नाहीत आणि आहारात बदल करा हे पटत नाही )

6. हृदयरोगाचे वाढणारे प्रमाण .

7. लठ्ठ पणा इत्यादी !

असा हा लाडका चीज अपाय करू शकतो . तरीही आपण तो खातच राहतो कारण आपल्याला त्याची 'सवय ' लागते . स्पष्ट शब्दात सांगायचे तर 'व्यसन ' लागते . कल्पना करा की चीज शिवाय सॅन्डविच खात आहात . . आताच तोंड कडू झाले असेल !!

चीज याचा उल्लेख 'आयुर्वेदात ' नाही . परंतु लोकांचे 'स्वास्थ्य रक्षण ' हा हेतू आणि जबाबदारी मात्र आयुर्वेदात आहे आणि आयुर्वेदाने ती प्रत्येक आयुर्वेदाचार्यास दिलेली आहे . पोटाचा घेर वाढतो , तिशीत हृदयरोग होतो हे समोर दिसत असले तरी त्यामागे आपण आपल्या शरीरावर केलेले अनिर्बंध अत्याचार असतात . चीज हा त्या अत्याचारामागचा प्रमुख 'व्हिलन ' !!

कधीतरी , ट्राय म्हणून चीज खायला हरकत नाही . पण हा कधीतरी आठवड्यातून 8 दिवस नसावा इतकीच माफक अपेक्षा . . . त्यामुळे हा टॅक्स खरंच स्वागतार्ह्य आहे . . . 20 रुपयांना मिळणारी चीज दाबेली जेव्हा तिशी ओलांडेल तेव्हा 10 मधले किमान 6 लोक 'पर्यायी ' खाण्याचा विचार करतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही . . . कारण . .

भारत हा असा देश आहे जिथे लोक 'तूप ' यास फॅटी , अन हेल्दी मानतात आणि चीज यास 'आरोग्य दूत ' मानतात !!

वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
दैनंदिन आयुर्वेद (https://www.facebook.com/aarogyakosh/ )

(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)

कानात दडे, बहिरेपणा – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

कानात दडे, बहिरेपणा – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

कानात दडे बसून ऐकायला कमी येणे हा एक न दुखणारा पण त्रासदायक आजार आहे. ह्या आजाराचा त्रास रोग्याला कमी होतो पण त्याच्याशी बोलणाऱ्यांचा घसा मात्र नक्कीच दुखायला लागतो. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हा विकार नेमका काय आहे, त्याची कारणे आणि सोपे घरगुती उपाय अशी ह्या लेखाची रूपरेषा आहे.

आयुर्वेदानुसार कानात दडे किंवा बहिरेपणा म्हणजे कानाची सर्दी. सर्दी झाल्यावर ज्याप्रमाणे वास येत नाही, म्हणजेच त्या इंद्रियाचे काम मंदावते त्याचप्रमाणे कानाला सर्दी झाली की ऐकू येणे मंदावते. म्हणून सर्दीसाठी जे उपचार सांगितले आहेत तेच उपचार ह्या कानाच्या सर्दीसाठी करावेत. नाकाच्या सर्दीमध्ये नाकाच्या आतल्या श्लेष्मल त्वचेला (म्युकस मेम्ब्रेनला) सूज येते तशीच सूज इथे कानाच्या पडद्याला येते. सर्दी म्हणजे ओलेपणा. नाकाच्या भागात जास्त झालेले किंवा साठलेले पाणी शरीर बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सतत नाक वहाते. पडद्याच्या सूजेमुळे श्वासमार्ग आकुंचित होऊन शिंका येतात. श्वासोच्छवासाच्या क्रियेत बाह्य वातावरणाचा सतत संपर्क येत असल्यामुळे नाकाला सर्दी लवकर होते. अशी सर्दी जास्त काळ टिकून राहिली तर त्याचा विस्तार वाढून पुढे कानाच्या पडद्यापर्यंत पोचतो. म्हणून सर्दी बरेच दिवस राहिल्यामुळे कानात दडे बसण्याची सुरुवात होते आणि बहिरेपणा सुरु होतो.

तबला किंवा डमरूचे चामडे ओले झल्यावर त्याचा नाद किंवा आवाज बरोबर येत नाही त्याचप्रमाणे कानाचा पडदा ओला - दमट झाल्यामुळे त्याचा आवाज बरोबर येत नाही आणि तो मेंदूपर्यंत सहजगत्या पोचत नाही. काहीवेळा कानाच्या पडद्याचा ताण कमी होऊनही कानात दडे बसतात. तबल्याच्या वाद्या घट्ट करून जसा त्याचा नाद सुधारता येतो त्याप्रमाणे तोंडात हवा दाबून हा ताण कमीअधिक करता येतो. घाटात प्रवास करतांना किंवा विमानप्रवासात असा अनुभव बहुतेक सर्वांनाच येतो. असे दडे सहजपणे सुटतात, त्यासाठी काही औषधोपचार करण्याची गरज नसते. कानाच्या सर्दीमध्ये दडे बसून बहिरेपणा येण्याच्या आजाराला नाकाच्या सर्दीप्रमाणे पथ्यपाणी आणि औषधोपचार करावे लागतात.

पथ्यपाणी विचार –
ओलसरपणा किंवा दमटपणा हे ह्या आजाराचे मुख्य कारण आहे. त्यामुळे तहान नसतांना उगाचच जास्त पाणी पिऊ नये हे सर्वात महत्वाचे पथ्य लक्षात ठेवावे. विशेषतः झोपण्यापूर्वी किमान तासभर अगोदर पाणी पिणे टाळले पाहिजे. अर्थातच सरबत, दूध, चहा, कॉफी, मद्य किंवा तत्सम कोणताही द्रव पदार्थ पाण्याप्रमाणेच ओलसरपणा किंवा दमटपणा वाढवेल हे ध्यानात ठेवावे. रोज डोक्यावरून स्नान करणे टाळावे. पाण्यामुळे निर्माण झालेला ओलेपणा कमी करण्यासाठी ह्याठिकाणी ऊब निर्माण करणे गरजेचे आहे. तबला किंवा डमरूच्या चामड्याला शेक देऊन ज्याप्रमाणे कोरडे करण्याची पद्धत आहे तसेच ह्यात करण्याची गरज आहे.

सोपा घरगुती उपचार –
हिंगाचा मुगाएवढा खडा आणि लसणाच्या पाकळीचा चण्याएवढा तुकडा एका तलम सूती कापडात गुंडाळून रात्री झोपतांना कानात ठेवावा व सकाळी काढून टाकावा. ह्याने कानाच्या पडद्याला शेक मिळतो आणि त्यातील ओलसर दमटपणा नाहीसा होतो. सर्दी ज्याप्रमाणे नाकातून पुढे कानात प्रवेश करते त्याच तत्वावर औषधी चिकित्सा करण्याचा मार्ग देखील नाकातूनच करावा. सर्दीमध्ये ज्याप्रमाणे नस्य चिकित्सा केली जाते, त्याचप्रमाणे षड्बिंदू तेल, पंचेंद्रियवर्धन तेल, अणु तेल ह्या तेलांचा उपयोग प्रकृती आणि लक्षणांनुसार करावा. पोटातून घेण्यासाठी नागगुटी, लक्ष्मीविलास, चित्रकहरीतकी अवलेह ह्यापैकी सुयोग्य औषधाची निवड करावी.  

कानाचे यंत्र –
कानात दडे बसून ऐकायला कमी येणे सुरु झाले की सामान्यतः कानाचे यंत्र लावून घेण्याची पद्धत आहे. ह्या यंत्रात मायक्रोफोन, अॅम्प्लीफायर आणि स्पीकर असे मुख्य तीन भाग असतात. मायक्रोफोनमुळे बोलण्याचा आवाज ग्रहण केला जातो, अॅम्प्लीफायरच्या सहाय्याने तो मोठा (लाऊड) केला जातो व स्पीकरच्या सहाय्याने हा आवाज कानाच्या पडद्यावर पोचवला जातो. मोठा किंवा कर्णकर्कश आवाज कानाच्या वातनाड्यांना कमकुवत बनवतो आणि पडद्याला अधिकच कमजोर बनवतो. वर निर्देशित साध्या सोप्या घरगुती आणि विना खर्चाचे प्रयोग करूनही उपयोग झाला नाही तरच फक्त असे यंत्र बसविण्याचा विचार करावा. कान हे एक महत्वाचे ज्ञानेन्द्रीय आहे, त्याच्या चिकित्सेत हेळसांड करून कायमचे अपंगत्व येणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे.

डॉ. संतोष जळूकर
संचालक, अक्षय फार्मा रेमेडीज, मुंबई

दूरध्वनी - +917208777773

ईमेल – drjalukar@akshaypharma.com

Monday, July 4, 2016

ड्रिंक्स ची संस्कृती

#घरोघरी_आयुर्वेद  #आयुर्कामः

'ड्रिंक्सची संस्कृती'

आजकाल आपल्याकडे विशेषतः शहरांत मद्यपानाची प्रवृत्ती ही वाढू लागली आहे. 'पार्टी कल्चर' हीच सध्या संस्कृती होऊ पाहत आल्याने मद्यपानाला 'ड्रिंक्स घेणे' असे सभ्य नाव आणि सन्मानाचा सामाजिक दर्जा आपण देऊ केला आहे. पुरुष असोत वा स्त्रिया; अगदी तरुणांमध्येही मद्यपान लक्षणीय प्रमाणात दिसून येत आहे.

खरंतर मद्याचा इतिहास हा जुना आहे. आयुर्वेदात मद्याचे गुण-दोष वर्णन केलेले आहेत. (याविषयी स्वतंत्रपणे लिहीन.) आहारात मद्याचा वापर हा भारतीयांना काही नवीन नाही. असे असले तरी पूर्वीपासूनच आपल्याकडे स्त्रियांनी मद्यपान करणे प्रशस्त मानलेले नाही. यामागे 'पुरुषप्रधान संस्कृती' आहे असा कांगावा काहीजण करतात. शरीररचना आणि क्रियेच्या नजरेतून पाहिल्यास सत्य मात्र याहून भिन्न असल्याचे दिसते. पुरुषांच्या शरीरात सुमारे ६२% पाणी तर स्त्रियांच्या शरीरात ५२% पाणी असते. या पाण्याच्या कमी प्रमाणामुळेच स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत मद्यपानाचे दुष्परिणाम अधिक जाणवतात. याशिवाय स्त्री आणि पुरुष यांच्या शरीरातील उत्प्रेरके- संप्रेरके यांचे प्रमाण वेगवेगळे असल्यानेदेखील मद्यपानाचे दुष्परिणाम त्यांना अधिक जाणवतात.

ब्रिटिश मेडिकल जर्नलच्या निरीक्षणानुसार नियमित मद्यपान हे स्त्रियांमधील वंध्यत्वाला कारणीभूत ठरू शकते असे आढळले आहे. हे सर्व वाचून; पुरुषांनी सुटकेचा निःश्वास टाकू नये. मद्यपानाचे परिणाम शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता या दोहोंवरही होत असल्याने 'मूल होत नाही' अशी तक्रार असणाऱ्या जोडप्याने मद्यपानाचा त्याग करणे गरजेचे आहे.

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

खान आणि पचन

#सामान्य_आयुर्वेद

खान आणि पचन
(खान म्हणजे खानावळितलं खान, बाॅलिवुडमधलं नाही)

मी आणि माझा मित्र खाण्याची स्पर्धा लावायचो. कोण जास्त खातो याची स्पर्धा. तोच जिंकायचा बऱ्याचदा. अनलिमिटेड जेवणाची पाटी दिसली की आम्ही एक दिवस ठरवणार आणि मग गेट सेट गो. हे आम्ही नेहमी करायचो नाही. कारण आपण किती खाऊ शकतो हे माहिती असलं तरी आपण किती खावं आणि किती काळाने खावं, हे सुद्धा माहिती होतं.

आपण किती खावं हे दोन गोष्टीवर अवलंबून असतं. एक म्हणजे आपलं शरीर आणि दुसरे म्हणजे आपला अाहार. आपलं शरीर एका वेळेस किती आहार घेऊ शकतं आणि किती आहार पचवू शकतं या दोन्ही बाबी महत्वाच्या असतात. म्हणजेच आपण किती खाऊ शकतो आणि किती पचवू शकतो.

मी एका वेळेस ३० गुलाबजामुन खाऊ शकतो. ही झाली खाण्याची क्षमता. पण एवढे गुलाबजामुन खाल्यावर दिवसभरातली बाकीची कामं सुरळीत होतात का? नाही. पेंग येते, अंग जड वाटतं, जांभया येतात, काही काम करता येत नाही, अजीर्ण होतं. म्हणजेच ३० गुलाबजामुन ही झाली खायची क्षमता, जी आहे पचवायच्या क्षमते पलीकडे.

पण १५ गुलाबजामुन खाल्ले असता हे सगळं होत नाही. काहीच त्रास होत नाही आणि सर्व कामे सुरळीत होतात. असे असेल तर १५ ही झाली पचवायची क्षमता.

त्यामुळे आपण किती जास्त खाऊ शकतो यापेक्षा किती व्यवस्थीत पचवू शकतो याला जास्त महत्व द्या, म्हणजे निरोगी राहणे सोपे होईल.

©वैद्य अमित पाळ
॥श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद॥
गोमंतक
email- dramitsva@gmail.com

Vaidya Amit Pal

Visit Our Page