Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Friday, March 31, 2017

आयुमित्र

*आयुमित्र*

*​उन जरा जास्त आहे.*

     मार्च महिन्यातच मे महिन्याचा फील येतोय. ग्लोबल वार्मिंगमुळे दर वर्षी थोडे थोडे तापमान वाढत चालले आहे. प्रत्येक दशकाला ०.१५ ते ०.२० डिग्री सेल्सियस हे तापमान वाढत चालले आहे असे नासाचे म्हणणे आहे. वाढत्या तापमानाने रस्त्यावर चालणे मुश्कील होते, दुचाली चालविणे कठीण होते. थोडावेळ जरी गाडी उन्हात राहिली कि ती हॉटसीट बनून जाते. अमिताभ बच्चनने म्हंटल तरी त्या हॉटसीट बसायची हिम्मत होत नाही. ह्या उन्हाळ्यात कुलरहि काम करणार नाहीत अस दिसतंय. त्यामुळे कुलर रेझिस्टन्स निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक सज्जन ए.सी. चा पर्याय सेव्ह द वाटरच्या सेवाभावी नावाखाली निवडताना दिसत आहे. कारण  *उन जरा जास्त आहे.*

वाढलेल्या तपमानामुळे शरीरातील पाण्याचा अंश कमी होत जातो. पाण्याचे प्रमाण कमी होणे ह्यालाच डीहायड्रेशन असे म्हणतात. उन्हाळ्यात आरोग्याची काळजी म्हणून खालील उपाय आपण करू शकता. 

बाहेर पडताना छत्री, रुमाल, टोपी ह्यापैकी आपल्याला सोयीस्कर समरसंरक्षण निवडून घर बाहेर पडा.
पाय पूर्णपणे झाकले जातील असे पादत्राण वापरा. 

गाडीवर बाहेर जात असल्यास हेल्मेट वापरा. डोळ्यांच्या संरक्षणासाठी सनग्लास वापरा.

पाणी पितांना हळूहळू आणि खाली बसून पाणी प्या. घाई घाईत जास्त पाणी पिऊ नका. पाणी पिण्याचे प्रमाण नेहमीपेक्षा वाढवू शकता पण अतिसेवन टाळा. तहान असल तेव्हडेच पाणी प्या. 

उन्हातून आल्यावर लगेच थंड कुलर किवा ए.सी. मध्ये बसू नका. लगेच चिल्ड पाणी, पेय पिऊ नका. 

काकडी, टरबूज, खरबूज ह्यांचे सेवन करा ह्यात जलीय अंश जास्त असल्याने पूरक ठरतात.

ताक, मठ्ठा हे गुणाने उष्ण असतात हे लक्षात घेणे महत्वाचे. 

लहान मुलांची व वृद्धांची विशेष काळजी घ्या.

      उन्हाळ्यात घसा, ओठ, त्वचा ह्यांना कोरड पडते. सोबतच निरुत्साहीपणा, थकवा हि लक्षणे दिसतात ह्यासाठी वरील उपाय नक्की करावेत.

शरीरातील जलतत्व कमी झाल्याने मुत्राचे प्रमाण सुद्धा कमी होते, हे कमी झाल्याने मूत्राचा रंग पिवळा होतो आणि लाघवी करतांना आग/जळजळ/उन्ह्ळी होऊ शकते. तसेच जुलाब, ताप व उलटी हि लक्षणे सुद्धा उन्हाळ्यात  काहींमध्ये आढळून येतात अश्यावेळी आपल्या वैद्यांशी संपर्क करावा व योग्य तो उपचार करून घ्यावा.

चला तर उन्हापासून संरक्षण करा आणि काळजी घ्या कारण *उन जरा जास्त आहे.*

*-वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, जळगाव*
*8379820693/7588010703*
*drbhushandeo@gmail.com*
http://wp.me/p7ZRKy-7U

Wednesday, March 15, 2017

बल (शक्ती) कमी करणारी कारण

👇🏻बल (शक्ती) कमी करणारी कारणे💪🏻

अभिघाताभ्दयात्क्रोधाच्चिन्तया च परिश्रमात् |
धातूनां संक्षयाच्छोकाद्बलं संक्षीयते नृणाम् ||

अभिघाताने --- शस्र वा इतर कुठल्याही कारणाने मार लागला असेल तर शक्ती कमी होते.
    
मानसिक वेगांमुळे
मनात नेहमी भिती राग चिंता दुःख यापैकी कुठल्याही १ कारणाने शक्ती कमी होते. कारण भिती चिंता व राग आदी कारणांनी अन्नपचन योग्य रितीने न झाल्याने शरीराचे पोषण होत नाही.

परिश्रमाने -- अत्याधिक प्रमाणात परिश्रमाने देखील शरीरातील शक्तीचा क्षय होतो.

धातुंचा क्षय -- कुठल्याही कारणाने शरीरातील रस रक्तादी ७ धातूचा क्षय होत असेल तर बल कमी होते.
       उदाहरण पाहावयाचे झाल्यास मुळव्याध असताना जीव रूपी रक्त शरीरातुन बाहेर पडते. अधिक प्रमाणात रक्त शरीरातुन बाहेर पडले तरी देखील बल कमी होते.
   बल कमी कारणारया कारणानुसार काही वेळा मानसिक वेगांचे धारण व मनावरील उपाय जे शास्रात सांगितलेले आहे ते करावे लागतात.
           सप्तधातुंपैकी कुठल्याही धातुचा क्षय असेल तर त्या धातुंना वाढविणारया आहार विहार औषधींचा बलवर्धनार्थ उपयोग करावा लागतो.
           परिश्रमासाठी सद्यतर्पण श्रमनाशक आहार औषधींचा उपयोग करावा लागतो..
  शक्ती  वर्धनार्थ फक्त पौष्टीक पदार्थ खुप वेळा कामी येत नाहीत.

वैद्य गजानन मॅनमवार
Mob -- 9028562102, 9130497856

Friday, March 3, 2017

आयुमित्र

*आयुमित्र*

*रोगकारक आमरस*

आम शब्द वाचल्यावर पटकन आपल्या डोळ्यासमोर येतो तो पिवळसर गोड आंबा. आंबा कोणाला आवडत नाही. सगळेच चवीने खातात. आमरस म्हंटला कि कैरीचे पन्हे डोळ्यासमोर येते तर कुणाच्या समोर आंब्याचा रस येत असेल. असो. पण आज मला आंब्याविषयी चर्चा नाही करायची आहे. आम रसा विषयी करायची आहे.

           आपण जेवण केल्यावर खाल्लेलं अन्न हे आमाशयात(stomach) जमा होते. पुढे अन्नाचे पचन सुरु होते. खर तर अन्न दातांनी चाऊन खाण्यापासूनच पचन क्रिया सुरु होते. अन्न निट ३२ वेळा चाऊन-चाऊन खाल्ल असेल. त्यात लाळ मिसळली गेली असेल. सगळ्यात महत्वाच  जाठाराग्नी उत्तम असेल तर पूर्ण अन्नाचे पचन होते. परंतु जर अग्नी मंद असेल तर पूर्ण अन्नाचे पचन होत नाही. नीट पचलेला आहार पुढे जाऊन शरीराचे पोषण करणारा  रस धातू बनतो आणि न पचलेला आहार ह्या पासून आम-रस बनतो. आम म्हणजे कच्चा/न पचलेला असा ह्याचा अर्थ आहे.

           पुढे  हा आमरस दोष धातूच्या ठिकाणी जाऊन रोग उत्पन्न करतो. अन्नपचन व्यवस्थित असल्यास आमरस तयार होत नाही आणि पुढे रोगही उत्पन्न होत नाहीत. आमदोष उत्पन्न होऊ नये ह्यासाठी अन्नाचे पचन निट होणे महत्वाचे आहे. भूक लागणे हा जाठराग्नी प्रज्वलित असल्याचा इंडिकेटर आहे. बऱ्याच लोकांना भूक असो का नसो वेळ झाला म्हणून खायची सवय असते. परंतु भूक लागेल तेव्हाच जेवणे योग्य आहे. आधी खाल्लेलं अन्न पचत नाही तोवर पुन्हा काहीही खाऊ नये.  पचायला जड असे पदार्थ जेवणाच्या सुरवातीला घेणे योग्य असते. कारण जेव्हा जाठराग्नी प्रज्वलित असतो तेव्हा जड अन्न सुद्धा सहज पचवून टाकतो. साधारण गोड पदार्थ पचण्यास जड असतात.  आंब्याच्या रसाची स्वीट डिश हि सगळ्यात आधी घेतली म्हणजे त्याचे पूर्ण पचन होईल. नाहीतर शेवटी घेतल्यास आंब्याच्या रसाने आमरस तयार होईल.

 भोजन सेवनाचे नियम आयुर्वेदाने ह्यासाठीच संगुन ठवले आहेत. आमरस तयार झालाच तर गरम पाणी, सुंठ हे फार उपयोगी आहे. पण आपल्या वैद्यांच्या सल्याने ते कसे, कधी व किती घ्यावे हे ठरवून घ्यावे. चलातर मग शरीरात आमरस होण्यापसून टाळूया. निरोगी राहूया.

*–वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, जळगाव*
*8379820693/7588010703*
*drbhushandeo@gmail.com*
http://wp.me/p7ZRKy-7G

Thursday, March 2, 2017

आयुमित्र

*आयुमित्र*

*वाद-प्रतिवाद आणि आयुर्वेद*

विविध प्रसिद्धी माध्यमे, इलेक्ट्रोनिक मिडिया, सोशल मिडिया ह्यावरून आपल्याला सतत कुठल्यान कुठल्या विषयावरून वाद सुरु असलेले दिसतात. एकमेकांवर ओरडणे, किंचाळणे पासून तर थेट श्रीमुखावर हाताचा ठसा उमटवे पर्यंत हि चर्चा विकोपाला गेलेली असते. बघणारा श्रोता आणि सोशल मिडिया वरील वाचक सुद्धा आता ह्या प्रकाराला कंटाळत चालला आहे. ह्यामुळे संवेदनशील आणि महत्वाच्या विषयाचे गांभीर्य कमी होत जाताना दिसते आहे. वाद-प्रतिवाद(डिबेट) नक्कीच झाला पाहिजे. परंतु ह्याची काही पद्धती असली पाहिजे व काही नियम असले पाहिजे. आयुर्वेदने वैद्यांना वाद-प्रतिवाद करण्याचे काही नियम सांगितले आहेत. मला वाटते ते नियम सर्व क्षेत्रातील विद्वानांनी नक्कीच फॉलो करायला हवे.

*आयुर्वेद काय म्हणते?*

आयुर्वेदाने डिबेटलाच संभाषा म्हंटले आहे. दोन विद्वानांनी/पक्षांनी केलेल्या संभाषेतून ज्ञानप्राप्ती होते, संदेह, शंका दूर होत असतात. संभाषा कोणासोबत करावी, करू नये. एकमेकांचे गुणदोष ओळखून वाद-प्रतिवाद कसा करावा? संभाषेचे प्रकार इत्यादी विस्तृत माहिती आयुर्वेदाने चरक संहितेत वर्णन केली आहे.

आयुर्वेदाने संधाय संभाषा व विगृह्य संभाषा असे दोन प्रकार वर्णन केले आहेत. संधाय संभाषा म्हणजे जी चर्चा मित्रता ह्या भावाने होते. वादी-प्रतिवादी हे क्रोधरहित, समोरच्याचा आदर ठेऊन चर्चा करणारे, सहनशीलता असणारे, भाषेत आदर व गोडवा असणारे असतात. ह्या चर्चेतून निश्चित निर्णय/ज्ञान मिळत असतो. तर विगृह्य प्रकारात एक दुसऱ्याचा पराभव करण्याचा प्रयत्न केला जातो. पूर्वपक्षाचा दृष्टीकोन लक्षात न घेता विपरीत अर्थ घेऊन मेरे मुर्गी कि एकीच टांग हा attitude ठेवून समोरच्याला हरविण्याचा प्रयत्न असतो. साहजिकच हि चर्चा निष्फळ ठरते. संधाय संभाषा हि संवाद घडविते तर विगृह्य केवळ वितंडवाद घडविते.

आजकाल आपण बघतो संवाद न होता वादच जास्त होतात. कशी चर्चा करावी ह्यापेक्षा कसे भांडावे हेच जास्त शिकायला मिळते. चर्चेतून ज्ञान मिळत नाही आणि शंकाहि दूर होत नाहीत. फक्त मीच खरा. बाकी सब पानी कम हेच जास्त बघयला मिळते. मला वाटते ज्यातून आपल ज्ञान वाढेल, बोलण्याच कौशल्य वाढेल, शंका दूर होतील अश्याच चर्चा आपण बघाव्या किंवा वाचाव्यात आणि चर्चा करतांनाहि नियमांचे भान ठेवून करावी जेणेकरून आपल्या श्रोत्यांचा अपेक्षाभंग होणार नाही. (संदर्भ- च.वि. ८/१५,१६)

(सूचना- ह्या ठिकाणी सविस्तर संभाषा विधी वर्णन केलेला नाही. चरक संहितेत वर्णन केला आहे. जिज्ञासूंनी संहितेतून जरूर जाणून घ्यावे.)

*-वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, जळगाव*
*8379820693/7588010703*
*drbhushandeo@gmail.com*
http://wp.me/p7ZRKy-7E

Visit Our Page