Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Sunday, February 19, 2017

आयुमित्र

*आयुमित्र*

*बुद्धीबळ*

बुद्धीबळ किंवा चेस नावाचा खेळ आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. ह्या खेळात बुद्धीच्या जोरावर समोरच्याला हरविणे अपेक्षित असते. आपल्या बुद्धी चातुर्याने समोरच्या राजाची कोंडी करायची असते आणि सामना जिंकायचा असतो. असा हा रंजक खेळ खेळण सगळ्यांनाच काही जमत नाही. ज्याची बुद्धी तल्लख तोच ह्यात जिंकू शकतो.

आपल्या आजूबाजूच्या समाजात २ प्रकारच्या लोकांचे वर्ग आपल्याला बघायला मिळतात. एक बौद्धिक श्रम करणारे आणि दुसरा वर्ग आहे शारीरिक श्रम करणारा. नोकरदार आणि  व्यापारी वर्ग हा बौद्धिक श्रम करणारा तर मजदूर वर्ग हा शारीरिक श्रम करणारा आहे. एका कडे बुद्धी आहे व एका कडे बळ आहे म्हणून दोगेही एकमेकांवर अवलंबून असतात. परंतु दोघेही परीपूर्ण नाहीत.

श्री. समर्थ रामदास स्वामी मात्र ह्याला अपवाद. समर्थ जेव्हडे बुद्धिवान होते तेव्हडेच बलवानहि होते. समर्थ रामदासस्वामी हे बलोपासक होते. हि बलोपासना स्वतः पुरता मर्यादित न ठेवता रामदासांनी सामान्य लोकांपर्यंत पोचवली. बल-बुद्धीचे प्रतिक म्हणजे भगवान मारुती. त्यांनी मारुतीची मंदिरे संपूर्ण देशभरात विविध प्रांतात उभारली आणि लोकांना बलोपासना शिकविली. सोबतच मन बुद्धी स्थिरतेसाठी मनाचे श्लोक समर्थांनी सामान्यांना दिले. ज्याप्रमाणे समर्थांकडे बल आणि बुद्धीचा मेळ होता तसाच बल-बुद्धीचा मेळ छत्रपती शिवाजी महाराजांकडे सुद्धा होता. युद्धकौशल्या सोबतच गनिमी कावा सुद्धा त्यांच्याकडे होता. त्याच जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी केली.

काल शिव जयंती झाली आज श्रीरामदास नवमी आहे. काल छत्रपती शिवाजींचा जन्म झाला होता आणि आज समर्थ रामदासांनी सज्जन गडावर देह ठेवला होता. दोघेही जगाचे मार्गदर्शक  आहेत. लोकांच्या हृदयात दोगेही अमर झाले आहेत आणि दोघेही परिपूर्ण आहेत.  म्हणून फक्त बौद्धिक श्रम आणि फक्त शारीरिक श्रम मनुष्याला पूर्णत्व देत नाही त्यासाठी दोघांची सांगड असवी लागते.  जे शारीरक श्रम करीत नाहीत त्यांना स्थौल्य, बिपी, डायबेटीस, मानसिक ताणताणाव असे आजरा होत आहेत. म्हणून डॉक्टर कडे गेल्यावर त्यांना पाहिला सल्ला शारीरक श्रम करण्याचा मिळतो. म्हणून स्वतःचे आणि समजाचे स्वास्थ्य चांगले ठेवायचे असेल तर शारीरिक बळ आणि बुद्द्धी दोन्ही मिळवावे लागतील.

चला तर बलबुद्धीचे उपासक होऊया, बुद्धी आणि बळ वाढवूया, समाज घडवूया.

*जय जय रघुवीर समर्थ*

*–वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, जळगाव* *8379820693/7588010703* *drbhushandeo@gmail.com*

http://wp.me/p7ZRKy-7A

Saturday, February 11, 2017

आयुमित्र

*आयुमित्र*

*लाईक, कमेंट, शेअर आणि आयुर्वेद*

सोशल मिडीयाचा वापर आता आपली जनता खूप प्रमाणात करायला लागली आहे. विशेषतः तरुण मुल-मुली तर भरपूरच. राजकारण, मनोरंजन, मैत्री, आरोग्याच्या टिप्स, अभ्यासाच्या टिप्स, आध्यात्मिक टिप्स आणि प्रेमप्रकरणापासून तर थेट लग्न जुळे पर्यंतच्या घटना सोशल मिडियाच्या माध्यमातून सुरु असतात. सोशल मिडियाचा  अनेक लोक खुबीने फायदा करून घेऊ शकतात. परंतु ज्यांना नाही जमल त्यांना मानसिक पीडेतूनसुद्धा जाव लागत. आपण ह्यातून विविध प्रकारच्या लोकांशी संवाद करू शकतो, त्यांच्या विषयी जाणून घेऊ शकतो. शांती पसरविण्यापासून थेट आतंकवाद पसरविण्यापर्यंत लोक ह्याचा वापर करतांना दिसतात.

माझे फेसबुकवर १००० मित्र, मी whats app वर ३०-४० ग्रुप चा एडमीन, twiter वर ….इतके फॉलोअर्स. माझ्या प्रोफाईल पिक्चरला माहितीये १ तासात किती लाईक मिळाले ते? २०० लाईक मिळाले भाऊ आणि त्यात ३० लव पण मिळाले. तुमच्या सारख नाही फक्त १० -१२ लाईक वर गेम खल्लास. असा तोरा मिरवणारे आपल्याला दिसतातच. तर दुसरी कडे मला २ दिवस झाले पोस्ट टाकून अजून फक्त १०च लाईक एकही कमेंट नाही. झाडावर चढून स्ल्फी काढला आणि प्रोफाईल टाकला तरी फक्त एक लाईक नो कमेंट. त्याला/तिला तर भरपूर लाईक मिळतात मला का नाही मिळत? माझे मित्र मला का लाईक देत नाहीत? त्याचे ५००० मित्र माझे तर फक्त 500च मित्र. माझे मित्र का वाढत नाही? अशे नैराश्याच्या गर्तेत टाकणारे अनेक प्रश्न आजकाल सोशल मिडिया वापरणाऱ्यांना पडत आहेत.

आपल्या वाढदिवसाचे, ट्रीपवर जाऊन केलेल्या मौज-मस्तीचे, बायको सोबत हनीमून चे, लग्नाचे, गर्लफ्रेंड सोबतचे अशे अनेक इव्हेंट्स चे फोटो फेसबुक आणि whats app वर शेयर केले जातात. हे सगळ बघून जेव्हा एखाद्याची बायको नवऱ्याला म्हणते. बघा ते कसे फिरताय, मौज मजा करताय, आपण तर कधी जाताच नाही. नवरा म्हणतो बघ तिने कशी जीन्स घातलीये तुला तर जीन्स होणारच नाही. अश्याप्रकारे ह्यातून एक प्रकारची इर्षा, द्वेष आणि कलह सुद्धा निर्माण होतो. आणि हि सगळी मौज मजा माझ्या आयुष्यात का नाही? मी एव्हडा/एव्हडी सुंदर का नाही?, मला कुणी वाढदिवसाला फेसबुक वर शुभेच्छा का दिल्या नाही? whats app वर दोन्ही रेषा कधीच निळ्या झाल्या मग उत्तर का देत नसेल बर? असे एक न अनेक प्रश्न पडून तरुण नैराश्यात जात आहेत. तसेच द्वेष , इर्षा, काम, क्रोध ,लोभ ह्या भावना मनात निर्माण होत आहेत.

फ्री वाला जिओ, ३G, ४G चे इंटरनेट प्लान, आणि प्रत्येकाकडे असलेला मोबाईल ह्यामुळे ह्याचे प्रमाण आणखीनच वाढले आहे. सोशल मिडीयाचा शारीरिक व मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो ह्याबद्दलचे अनेक संशोधन सुद्धा जगभरात सुरु आहेत. सोशल मिडिया वापरत असताना त्याचे चांगले व वाईट परिणाम आपल्यला अनुभवास येतात. सोशल मिडीयावर मिळालेले लाईक, कमेंट व शेअर हे म्हणजे आपल्यला लागलेलं चागल्या किंवा वाईट व्यक्तिमत्वाच लेबल नसते. हे लक्षात घेणे गरजेच आहे. ज्याचे फेसबुक वर १००० मित्र असतात. त्यांना आपल्या अपार्टमेंटमध्ये /गल्लीत कुणी ओळखत नाही अशीही परिस्थिती कधी कधी बघयला मिळते, आणि जे फेसबुक वर नाहीत अश्यांना सुद्धा जग ओळखते आणि त्यांचेही अनंत चहाते असतात.

ह्यासाठी आयुर्वेदाने आधीच सांगून ठेवले आहे  कि,  ज्यांना इह लोकी स्वतःचे भले करून घ्यायचे आहे त्यांनी कठोर बोलणे, आवश्यकतेपेक्षा जास्त बोलणे, चुगली, लोभ, इर्षा, मात्सरता, राग, द्वेष, ह्यांचे वेग धारण केले पाहिजे. (संदर्भ-अ.हृ. सु.-४/२५) सोशल मिडिया वापरतांना सुद्धा आयुर्वेदाच्या ह्या सूत्राचे भान आपण ठेवायला हवा.  समोरच्याला (मुद्दाम) त्रास देणाऱ्या कमेंटचा वेग धारण केला, फोटो बघून निरर्थक हेवे-दावे, इर्षा, लोभ  मनात येत असतील तर त्यांना थांबविण्याचा आवर्जून प्रयत्न केला तर  नक्क्कीच मानसस्वास्थ्य आपले आणि समोरच्याचे सुद्धा चागले राहील असा विश्वास आहे.

*–वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, जळगाव* *8379820693/7588010703*
*drbhushandeo@gmail.com*
http://wp.me/p7ZRKy-7a

Saturday, February 4, 2017

आलं लसूण लिंबू आणि व्हिनेगरयुक्त औषध हृदयविकाराकरिता सर्वत्र प्रसिद्ध झालं आहे. त्याविषयी

✨✨

शुभ प्रभात

आलं लसूण लिंबू आणि व्हिनेगरयुक्त औषध हृदयविकाराकरिता सर्वत्र प्रसिद्ध झालं आहे. त्याविषयी :

आलं - लसूण आणि लिंबूरस यांचे गुणकार्य आयुर्वेदात स्पष्टच वर्णित आहेत.

आर्द्रक उर्फ आलं किंवा त्यापासून वाळल्यानंतर बनणारी सुंठ हे तर "विश्वभेषज" या पर्यायी नावाने सन्मानित आहे. (सुंठ आणि आल्यातला एक फरक या निमित्ताने लक्षात घ्या. तो असा की, वाळून तयार झालेले सुंठ हे पित्तशामक कार्य करते. त्यामुळे 'गरम पडणे' असा प्रकार सहसा होत नाही. मात्र ओलं आलं हे गरम पडू शकतं, याची नोंद घ्यावी.) आर्द्रक हे प्रामुख्याने अग्निवर कार्य करीत असल्याने त्याचा अनेक आजारांवर उत्कृष्ट परिणाम होत असतो. अग्निमांद्य हे अनेक आजारांचे मूळ कारण आहे. आलं आणि सुंठही अग्निमांद्य दूर करणारं आहे. ज्याचा अग्नि प्राकृत, तो स्वस्थ असे म्हटले तरी चालेल.

दुसरा घटक लसूण. हीदेखिल स्वास्थ्याकरिता निसर्गाची एक अनमोल देणगी आहे, असे आपण म्हणू शकतो. आवळ्याप्रमाणे लसूण यातही एकूण सहापैकी पाच प्रकारचे रस (किंवा चवी म्हणा हवं तर) असतात. मधुर (गोड), अम्ल (आंबट), लवण (खारट), कटु (तिखट), तिक्त (कडू), कषाय (तुरट) अशा सहा प्रकारच्या चवी किंवा रस आयुर्वेदाने मान्य केले आहेत. त्यांपैकी तब्बल पांच रस आवळा आणि लसूण यात असतात. त्यामुळेच रसायन म्हणजे माणसाला तरुण ठेवणाऱ्या औषधांमध्ये त्यांचे स्थान वरचे आहे. तारुण्य तेव्हाच टिकून राहील, जेव्हा काही आजार न होता सातही धातू उत्कृष्ट स्थितीत असतील. रसायन द्रव्ये हेच कार्य करीत असतात. लसूणही कफ वात शामक असल्याने हृदयास कफावरोधजनित वेदनांपासून दूर ठेवण्यास सक्षम आहे.

लिंबूरस प्राधान्याने अम्लरसात्मक असून उत्कृष्ट पाचक कार्य करणारा आहे.

वरील फॉर्मुल्यात वापरलेले सफरचंदाचे व्हिनेगर हे base म्हणून कदाचित वापरलेले असावे. सफरचंद हे कफकर असले तरी व्हिनेगरचे गुणकार्य थोडे वेगळे असणार आहेत. कुठल्याही पदार्थावर संस्कार किंवा प्रक्रिया केली असता त्याच्या गुणांमध्ये बदल होत असतात. लसूण आल्याच्या रसाने होऊ शकणारा पित्तप्रकोप त्याने टाळला जाऊ शकत असेल कदाचित.

असो. प्रत्येक वस्तूचे शरीरावर ढोबळमानाने होणारे परिणाम लक्षात घेता उपरोक्त फॉर्म्युला उपयुक्त असू शकेल असे मानण्यास हरकत नाही.

मात्र आयुर्वेदात एकच एक उपाय सरसकट सर्वांना सारखाच उपयुक्त ठरेल असे नसते. रुग्णाची प्रकृति, वय, बल, तो करीत असलेला व्यवसाय आणि तो राहत असलेले ठिकाण तसेच ऋतुमान या सर्वांचा विचार औषध ठरविताना करावा लागतो. या अनुषंगाने वरील मिश्रण हे कफ वात प्रकृतीच्या रुग्णांना विशेष उपयुक्त ठरू शकेल. त्याबरोबरच वैद्यांकडून वैयक्तिक पातळीवर उपदेशित पथ्यापथ्य आणि अन्य औषधं ही महत्त्वाची असतील. विषय हृदयाचा असल्यामुळे वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक. वरील उपाय घरीच करीत राहून केवळ त्यावर विसंबून राहून चालणार नाही. सतत सु-शिक्षित वैद्य किंवा डॉक्टरांच्या संपर्कात राहून प्रकृतीत होणारे बदल लक्षात घेत सावधगिरीने असे उपाय करू त्यांचे लाभ मिळविणे श्रेयस्कर असते. आजाराची गंभीरता - साध्यासाध्यता ही तज्ञासच समजू शकते. त्यामुळे संपर्कात राहून प्रयोग करणे हितकर ! कारण हृदय सद्य प्राणहर प्रकारचे मर्म आहे, हे विसरून चालणार नाही !!

आपल्या शंकेचे समाधान झाले असावे, ही अपेक्षा व्यक्त करतो.

धन्यवाद !!

*वैद्य - दीपक शिरूडे*
    जळगांव ४२५००२
      ९४०३५८७८७९

🐢🐢🐢🐢🐢🐢🐢

Visit Our Page