Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
Showing posts with label आहारयोग. Show all posts
Showing posts with label आहारयोग. Show all posts

Wednesday, July 13, 2016

रे सुलतान

आयुर्वेद कोश ~ रे सुलतान !!

सलमान खान चा सिनेमा येऊन गेला की 'हंगामी ' पैलवानांची संख्या वाढायला लागते . गल्लो गल्ली आणि जिम मध्ये असे 'सुलतान ' हुप्पा हुय्या करायला सुरुवात करतात . विशेष करून नुकतीच मिसरूड फुटायला लागलेली पोरं आणि झिरो फिगर ची क्रेझ असलेल्या तरुणी यांना तर ' जिम ' म्हणजे 'मस्ट ' असते . जिम ला जाण्यास किंवा स्वस्थ राहण्यास आमचा विरोध नाही . परंतु झटपट 'सुलतान ' होण्याच्या नादात जे काही वाईट परिणाम शरीरावर होतात त्यावर प्रकाश टाकण्या साठी लेखन प्रपंच . . .

स्वास्थ्य किंवा फिट राहणे याचे अंतिम ध्येय हे 'मसल पम्प ' करणे हे नसते . किंवा मस्क्युलर असे सुलतान हे स्वस्थ असतातच असे नाही . त्यामुळे फिटनेस म्हणजे मसल पम्प हे समीकरण डोक्यातून प्रथम काढून टाकायला हवे . ते पम्प करायचेच असतील तर प्रथम -

1. शरीर म्हणजे काय ? हे समजायला हवे .
2. स्नायूंची रचना आणि भार वाहन क्षमता जाणून घेतली पाहिजे .
3. व्यायाम करायची 'शास्त्रीय ' पद्धत समजून आणि शिकून घ्यायला हवी .
4. वजन उचलत असताना आणि ठेवत असताना 'श्वासोच्छ्वास ' कसा असावा ? याबाबत 'अचूक ' मार्गदर्शन घ्यायला हवे .
5. आहार काय असावा आणि काय नसावा याबाबत 'तज्ज्ञांकडून ' सल्ला आणि मार्गदर्शन घ्यायला हवे.
6. प्रारंभी आपली 'ताकद ' किती आहे हे आपल्याला समजायला हवे .
7. ती ताकद 'अभ्यासाने + सरावाने ' वाढते हे मान्य करायला हवे . इत्यादी !

या प्रारंभिक गोष्टी व्यायाम सुरू करायच्या आधी लक्षात घ्यायला हव्यात . त्यांचा अभ्यास करायला हवा .शारीरिक क्षमतांना आणि मर्यादांना त्यांच्या अंतिम क्षणापर्यंत 'ताणणे ' हे योग्य नाही . आयुर्वेदिक भाग सांगायच्या आधी 'मॉडर्न ' लोक काय म्हणतात ते सांगतो -

जिम मध्ये अतिशय केलेला व्यायाम ' ओव्हर ट्रेनिंग सिंड्रोम ' यास जन्म देतो . Journal of Athletic Training यात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार या सिंड्रोम मध्ये काय होते पहा -

> अतिशय दमल्याची , शक्तिपात झाल्याची भावना
>स्नायू आणि सांध्यात वेदना
>डोके दुखी
>निद्रा नाश
>रोग प्रतिकारक क्षमता कमी होणे .
>भूक मंदावणे
>वजन कमी होणे
>प्रचंड तहान लागणे - विशेष करून रात्री .
>हृदयावर ताण येणे . इत्यादी !

हा सिंड्रोम विशेष करून 'एथलेट्स ' मध्ये पाहायला मिळतो . परंतु आपले 'सुलतान ' हे एथलेट्स पेक्षा कमी नसतात . सकाळ संध्याकाळ 'हेवी वर्क आऊट ' करणाऱ्या सुलतान मध्ये ही लक्षणे सहज आणि लवकर पाहायला मिळतात .

आयुर्वेदानुसार व्यायाम हा 'अर्धशक्ती ' करावा . यात व्यायाम करणाऱ्याचे हित आहे . व्यायाम करत असताना घशाला कोरड पडली की अर्धशक्ती व्यायाम झाला असे समजावे . त्यात ज्यांना सुलतान व्हायचेच आहे त्यांनी वसंत , हेमंत आणि शिशिर ऋतू मध्ये थोडा अधिक व्यायाम केला तर चालतो पण बाकी ऋतूत अर्ध शक्ती व्यायाम करणे उत्तम . जर हुप्पा हुय्या करत व्यायाम केला तर खोकला , ज्वर , ओकारी , दम लागणे , श्वास इत्यादी रोग आहेतच . . या सोबत 'व्यायाम शोष  ' नावाचा एक रोग होऊ शकतो !

क्षय किंवा शोष म्हणजे सामान्य भाषेत सुकणे . . बल हानी होणे !! आपल्या ताकदी पेक्षा अधिक व्यायाम , वजन उचलणे , कुस्ती करणे इत्यादी क्रिया केल्याने शरीरातील रसादि धातूंचा क्षय होऊन शरीर कृश होणे , कापणे (थरथरणे ) , बल , कांती (शरीराचे तेज ) , तोंडाची चव , अग्नी (पचन शक्ती ) कमी होते . यातून एक शब्दात सांगायचे तर 'चरख्यातून पिळून काढलेल्या उसासारख्या मनुष्य बलहीन , तेज नसलेला , वाळलेला दिसायला लागतो ' अशा व्यायामाचा काही उपयोग है क्या 'रे सुलतान ? '

व्यायाम करत असताना शास्त्रीय दृष्टिकोनातून व्यायाम , त्याला पूरक असा आहार , दोहोंना बल देणारी निद्रा (झोप ) ही अत्यावश्यक असते . मला बारीक व्हायचंय म्हणून मी डाएट पण करणार आणि जिम मध्ये 100 किलो चे 'स्कॉट्स ' पण मारणार हे 'धाडस ' अत्यंत चुकीचे आहे . एकदम 'हार्ड कोअर ' व्यायाम सुरू आणि आहार 'टोटली बंद ' यातून तुझ्या शरीराचे नुकसान होतं 'रे सुलतान ' !!

व्यायाम करणे , जिम ला जाणे यास कोणताही विरोध नाही . . पण त्याच्या 'अतिरेकाने ' नसत्या वयात नसती दुखणी निस्तरावी लागतात याचे वाईट वाटते . अनेकदा पंचविशीत केलेली 'सुलतान ' गिरी चाळीशीत डोके वर काढते त्यावेळी डोक्याला हात मारून घेणे यापलीकडे हातात काहीच रहात नाही . त्यामुळे शेवटी इतकंच लक्षात ठेव 'रे सुलतान ' . .

> व्यायाम ही हुय्या हुप्पा करायची गोष्ट नाही . ते शास्त्र आहे .
>व्यायामातले शास्त्र कळले तर 'स्वास्थ्य ' नाही कळले तर 'दवाखाना '
>व्यायाम -आहार - झोप यांचा समतोल 'अत्यावश्यक ' .
>आहार /सप्लिमेंट /मांसाहार सुरू करत असताना आधी आपल्या पचन शक्ती चा विचार .
>कमी वेळेत अधिकाधिक मसल्स पम्प करण्याचा अट्टाहास चूक .
>शारीरिक क्षमता ओढून ताणून व्यायाम करणे म्हणजे साहस .
>मुख्य व्यायामाच्या आधी 'वॉर्म अप ' आणि नंतर 'मसल्स रिलॅक्स ' करणे . तेलाने मसाज करणे आवश्यक . . .
> एसी मध्ये व्यायाम करणाऱ्यांना 'मनाचा मुजरा ' इत्यादी !!

स्टिरॉईस आणि सप्लिमेंट यावर स्वतंत्र लिहीनच . . पण 'खून मे तेरी मिट्टी . . मिट्टी मै तेरा खून . . ' असलेल्या 'जुनुनी सुलतान ' च्या स्वास्थ्याची काळजी वाटली म्हणून वास्तवाची थोडीफार कल्पना देणारा लेख लिहिला . . . सिर्फ तेरे लिये . . रे सुलतान !!

वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
9175338585

आयुर्वेद कोश (https://www.facebook.com/aarogyakosh/ )

(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)

Thursday, November 26, 2015

आहारयोग

आहारयोग

लेख क्रमांक 10

नमस्कार मंडळी!
काय मग?
तांदुळाच्या पिठाच्या गरम उकडीचे, मऊसूत, चाफेकळी नाकाच्या, सुबक पाकळ्यांच्या, भरपूर गूळ-खोबरे-वेलचीयुक्त सारणाच्या मोदकांचा - साजूक तुपाच्या धारेबरोबर - शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध असा सर्वांगांनी आस्वाद घेतलात की नाही? बाप्पांनी येताना पाऊसही आणला म्हणून आनंदात अम्मळ एखादा मोदक जास्तच खाल्ला असेल तरी हरकत नाही हं।
या लेखात पाहूया तळणीचे मोदक -
गव्हाची कणिक / रवा-मैदा / कणिक-रवा-मैदा इ. च्या कमी-जास्त संयोगातून मोदकाचे आवरण तयार केले जाते.
हे पीठ भिजवताना काही ठिकाणी ते दुधात भिजवतात तर काही ठिकाणी दूध-पाणी वा फक्त पाणी. तेल वा तुपाचे मोहन घातले तर पदार्थ खुसखुशीत होतो.
सारण म्हणून काही ठिकाणी ओले-खोबर-गूळ वा डाळीचे पुरण वा सुक्या खोबऱ्याचे पिठीसाखरेचे वा पंचखाद्सायाचे सारण असते.
तळणीच्या मोदकांचे घटक व त्यांचे गुणधर्म पुढीलप्रमाणे -
गहू - गहू हे स्निग्ध, शीतल, वात-पित्तदोष कमी करणारे, दाह कमी करणारे, हाडे सांधण्यासाठी उपयुक्त, शरीरास स्थिरता - बळकटी आणणारे, बल वाढवणारे, जीवनशक्ति वाढवणारे आणि म्हणूनच रोजच्या आहारात पोळी/रोटी/फुलका या स्वरूपात समाविष्ट झाले आहेत.
कणिक - कोंड्यासकट दळलेले गहू म्हणजे कणिक.
रवा - हेच गहू जाडसर दळून गव्हाचा रवा तयार करतात.
मैदा - पूर्वी मैदा हा गहू स्वच्छ धुवून, सुकवून, जात्यावर दळून घेऊन, मलमल वा धोतराचे पान वा साडी यावरून गाळून घेऊन वापरत. तांदुळाची पिठी करतात तीच कृती. सध्या बाजारात मिळणारा मैदा मात्र अनेक कृत्रिम रसायनांनी युक्त असल्याने तब्येतीला घातकच.
तेलात तळलेले गव्हाचे पदार्थ हे दृष्टिसाठी वाईट - डोळ्यांवर वाईट परिणाम करणारे असे आयुर्वेद शास्त्र सांगते. तेव्हा, पुरी, सामोसे, शंकरपाळे, करंजी, मोदक इ. गव्हाचे वा रवा/मैद्याचे पदार्थ साजूक तुपातच तळावेत. तरच ते चवीला ही आणि तब्येतीलाही अत्युत्तम. सण साजरा करायचाय, सणाचा आनंद घ्यायचाय पण ते करताना परवडत असतानाही तुपाऐवजी तेल त्यातून रिफाईंड वा गव्हाऐवजी मैदा वा साखर-गूळाऐवजी कृत्रिम गोडवा आणणारे पदार्थ वापरून स्वतःचीच फसवणूक कशाला करावी बरं? पूर्वजाच्या तब्येतीचे दाखले द्यायचे तर त्यांच्याच चांगल्या खाण्याच्या सवयी व चांगली जीवनशैली आपणही आत्मसात करावी हे खरे ना?
तेव्हा तळणीचे गव्हाचे मोदक गव्हाच्या कणकेचेच, आकाराने लहान करा व रिफाईंड तेलाऐवजी शक्यतो साजूक तुपात तळा आणि आस्वाद घ्या - बघा काय फर्मास लागतात.
कणकेचे मोदक अंमळ जास्त खाऊन सुस्ती आली असेल वा अजीर्ण झाले असेल तर काकडी खायला विसरू नका.
गहू वा गव्हाच्या पदार्थांचे अजीर्ण काकडीने कमी होते. म्हणूनच पुरणपोळी ही पोटाला जड झाली तर कणकेच्या अजीर्णावर काकडी आणि हरभऱ्याचा डाळीवर वा पुरणावर कोवळा मुळा हे अजीर्ण कमी करणारे उतारे आहेत.
खोबरे - गेल्यावेळी आपण ओल्या खोबऱ्याचे गुण पाहिले. यावेळी -
सुके खोबरे - हे स्निग्ध, पचायला जरा जड, दाह व मलावष्टम्भ करणारे, रुचकर, बल व वीर्य वाढविणारे आहे.
साखर - ही थंड असून दाह, तहान, उलटी, मूर्च्छा, रक्तदोष व पित्तदोष कमी करते. ही साखर जितके कृत्रिम पदार्थ न वापरता तयार केली असेल तेवढी अर्थातच तब्येतीला चांगली म्हणून ब्लीच न केेलेली साखर शक्यतो वापरावी.
विशेष माहिती -
आपल्याला माहीतच असेल की आपले अनेक भारतीय पण प्रांतीय पदार्थ दुसऱ्या प्रांतातही प्रसिद्ध आहेत. मोदक हे भारताच्या पश्चिम, पूर्व व दक्षिण किनारपट्टीवर स्थानिक पक्वान्न म्हणून प्रसिद्ध आहेतच. संस्कृत व मराठी प्रमाणेच ओरिया, गुजराती व कोंकणी भाषेतही त्यांना 'मोदक'च म्हणतात. तमिळ 'मोदक' वा 'कोळकटै', मल्याळी भाषेत 'कोळकटै', कानडी भाषेत 'मोदक' किंवा 'क़डबू', तेलगू भाषेत 'कुडुमु' म्हणतात.
उकडीचे मोदकाप्रमाणेच पण टोक व मुखऱ्या नसणारे, सारण भरून गोल वळलेले कौळकटै हे केरळ व दक्षिण तामिळनाडूत प्रसिद्ध आहेत. तामिळनाडूत हे कोळकटै गणपतीचाच नेवैद्य मानले जातात.
तसेच ओरिसा, आसाम, बंगाल येथे तांदुळपिठाच्या उकडीची पातळ पारी करून त्यात गूळ-खोबऱ्याचे सारण भरून घडी घालून केळीच्या पानांवर पातोळ्याप्रमाणे वाफवतात त्याला 'पीठा' म्हणतात.
म्हणजेच आपली खाद्यसंस्कृती, परंपरा भारतभर कश्या पसरल्या आहेत त्यावरूनच किती जुन्या आहेत व अजूनही टिकून आहेत हे जाणवते, आपणही त्या टिकवून पुढे पोचवायला हव्यात. नव्याचे तारतम्याने स्वागत हवेच पण जुने सोडून नव्हे. जुन्याचा आदर व नित्य वापरही हवाच यासाठीच हा लेखनप्रपंच.
© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
skype ID - tanugokhale
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

आहारयोग

आहारयोग

लेख क्रमांक 9

#‎गणपती‬ ‪#‎मोदक‬ ‪#‎तांदूळ‬ ‪#‎नारळ‬ ‪#‎गूळ‬ ‪#‎साजूकतूप‬
नमस्कार मंडळी!
आधी आपण पाहिले की जेवणात सहाही रसांचा समावेश असावा. त्यातही सुरुवात गोडाने करावी. त्यानंतर आंबट, खारट पदार्थ, त्यानंतर तिखट, कडू व तुरट पदार्थ क्रमाने घ्यावेत.
आपल्या पारंपारिक जेवणात विशेषतः महाराष्ट्रीयन वा भारतीय जेवणात सुरवात गोडाने वा नैवैद्याने, खीर, पुरण इ. ने करायची पद्धत आहे. तसेच सर्व जेवण झाल्यावर शेवटही तुरट पदार्थाने म्हणजे विडा वा सुपारीने करायची पद्धत आहे आणि ती योग्य आहारक्रमाला व योग्य पचनाला धरूनच आहे.
सध्या मात्र विविध कोर्सेसच्या पाश्चात्य पद्धतींमुळे - सुरुवात भूक वाढविणाऱ्या(?!) तिखट, आंबट पदार्थांनी - सूप्स, व स्टार्टर्सनी केली जाते.
जेव्हा भूक चांगली लागली असेल तेव्हाच जेवावे असा नियम असल्यामुळे - चांगल्या भुकेच्यावेळी जाठराग्नि बलवान् असताना पचायला जड असणारे पदार्थ आधी खाणे योग्य, म्हणून गोड खाणे योग्य. गोड पदार्थांनी वात-पित्ताचे शमनही होते.
तिखट-आंबट पदार्थांनी भूक नसताना ती निर्माण करणे (appetizers) हे कार्य घडते. म्हणजे जेव्हा शरीर/पोट व मन खाण्यासाठी तयार नाही अशावेळी ते मुद्दाम तयार करणे. सूप्स ने भूक लागण्याऐवजी पोट भरतेच असा अनेकांचा अनुभव असेलच. अशा चमचमीत आरंभक वा स्टार्टर्सनी अन्न नीट न पचता वात-पित्ताच्या अनेक तक्रारी निर्माण होतात. तसेच जेवणांती गोड खाल्यानेही कफाचे विकार होतात. पदार्थ तेच पण जेवणाचा क्रम चुकल्यानेही विकार होतात. तेव्हा सुरुवात गोडाने करणे कधीही उत्तम. गोड फळे ही जेवणात सुरुवातीलाच खावीत; जेवल्यावर नव्हे.
आज आपण अशा गोड पदार्थानेच सुरुवात करूया.
आजचा पदार्थ - मोदक. गणपती येऊ घातलेत आणि घरोघरी मोदक तर होणारच. तेव्हा आबालवृद्धांना आवडणाऱ्या या मोदकांविषयीच जाणून घेऊ या.
मोदक या संस्कृत शब्दाचा अर्थच मोद देणारा - आनंद देणारा आणि म्हणूनच गणपतीला प्रिय असा आहे.
कोणत्याही पूजेत नैवेद्याचा मान असतो तसा गणपतीच्या पूजेत मोदकांचाच मान. मोदकांचा आकार हा नारळाप्रमाणे असतो. नारळ हा अर्थातच परिपूर्णतेचे, सुफळतेचे प्रतिक आहे. मोदक उकडीचे असोत वा तळणीचे. वरची पारी ही जितकी पातळ व नितळ, जितक्या पाकळ्या जास्त तितका करणारीचा हात सुग्रण. सुबक, पातळ पारीचे, भरपूर व एकसारख्या मुखऱ्या वा पाकळ्या असलेले, भरपूर सारण भरलेले, फार गोड नाही व अगोडही नाहीत असे मोदक म्हणजे गृहिणीच्या सुग्रणपणाचा व कलेचा कसच. चव, पारी, आकार, सारण हे सर्व जेव्हा उत्तम जमतं तेव्हाच मोदक होतो, तेव्हाच करणारीला व खाणाऱ्यांना दोघांनाही मनापासून मोद - आनंद मिळतो.
सारण भरून केलेले व न भरता केलेले मोदक असेही प्रकार आहेत. न भरता केलेले म्हणजे खव्याचे, आंब्याचे, चॉकलेटचे, तिळाचे, पनीरचे, काजूचे, फुटाण्याचे, तसेच स्ट्रॉबेरी, पिस्ता, इ. चवींचे खव्याचे मोदक म्हणजे फक्त मोदकांचा आकार असलेले बर्फीचे प्रकार.
सारण भरून केलेले मोदकच खरे पारंपारिक मोदक होय.
महाराष्ट्रात विशेषतः दोन प्रकारे मोदक करायची पद्धत आहे. उकडून व तळून. कोकणात तसंच पश्चिम महाराष्ट्रात बहुतांशी उकडीचे मोदक केले जातात. विदर्भ, खानदेश, मराठवाडा, या देशावरच्या भागांमधे बहुतांशी तळलेले मोदक केले जातात. म्हणजेच नारळ मुबलक असलेल्या ठिकाणी ओल्या नारळाचे उकडीचे मोदक करायची पद्धत आहे तर जिथे नारळ होत नाहीत त्या भागात सुके किसलेले खोबरे वापरून मोदक करण्याची पध्दत आहे. हल्ली हेल्थ कॉन्शस लोक बेक्ड मोदकही करतात.
उकडीचे मोदक - उकडीच्या मोदकाला ओले खोबरे व गूळ यांचे शिजवलेले सारण असते. उकडून करायच्या मोदकांमध्ये तांदूळ पिठीचे, कणकेचे, क्वचित् ज्वारीच्या पिठाचे मोदक करून ते उकडतात. तांदळाची उकड काढून, ओलं खोबरं व गूळ यांचं सारण भरून उकडतात. उपवासाला वरईचे मोदकही उकडून करतात. तसेच पोह्याचे पीठ भिजवून तेही उकडून वा तळून मोदक करता येतात. मैद्याची पारी करून त्यात गूळ-खोबऱ्याचे सारण भरून गोड मोमोज् प्रमाणेही मोदक होतात.
तळणीचे मोदक - तळणीचे मोदक हे कणीक किंवा मैदा किंवा रवा-मैदा यांच्यापासून बनवितात. यात ओले खोबरे-गूळ / ओले खोबरे-साखर / सुके खोबरे-पिठीसाखर असे सारण असते. खव्याचे, सुका मेव्याचे, पुरणाचे सुद्धा मोदक करतात.
पारंपारिक तळणीचे मोदक म्हणजे सुकं खोबरं किसून ते थोडंसं भाजून घेऊन त्यात पिठी साखर, भाजलेली खसखस, चारोळी, सुका मेवा, वेलदोडा पूड वा पंचखाद्य घालून सारण तयार करायचं आणि कणिक वा रवा-मैदा भिजवून त्याची लाटी करून त्यात हे सारण भरून मोदक करायचे आणि तेलात वा तुपात तळायचे. मराठवाड्यात तिळ-गूळाचे सारण भरूनही तळणीचे मोदक करतात व संक्रांतीनंतर येणाऱ्या तिलकुंद चतुर्थीला त्याचा नेवैद्य दाखवतात.
लुसलुशीत उकडीच्या मोदकांवर साजूक तूप घातल्याने त्याची चव ही वाढते तसेच तो पचायलाही मदत होते. मोदक जरा वेळाने निवल्यावर खाण्यातच मजा आहे नाहीतर सारणाने तोंड भाजते. गार झाल्यानंतर तितकासा तो चांगला लागत नाही.
मोदकातील तांदूळ, खोबरे, गूळ हे सर्व पदार्थ पुष्टी करणारे आहेत. कोणताही गोड पदार्थ जसा पचायला जडच तसाच मोदकही. पण तांदूळ-नारळ-गूळ हे एकमेकांना पचवायला मदत करतात.
तांदूळ - तांदूळ हे मधुर, बलदायक, रुचिकर, थंड, वातपित्त कमी करणारे, पचायला हलके असे नित्य सेवन करण्याच्या धान्यांमध्ये श्रेष्ठ आहे आणि म्हणूनच रोजच्या जेवणात त्यांचा समावेश योग्यच आहे.
तांदूळ पचायला हलके पण तांदुळाच्या पिठाची उकड पचायला जड असते. त्यामुळे पातळ पारी व बेताचे गोड सारण असलेले, व्यवस्थित उकडलेले मोदक तूप घालून खाणे हेच योग्य.
वजन वाढेल म्हणून तांदूळ वर्ज्य.. म्हणून मोदक वर्ज्य असा विचार नकोच.
हल्ली खोबरे ही कोलेस्टेरॉलच्या भीतीने हद्दपार होत आहे. नारळाने वाईट कोलेस्टेरॉल वाढत नाहीच उलट चांगले कोलेस्टैरॉल वाढते असे आताचे संशोधन सांगते.
नारळ - ओले खोबरे हे पचायला जड, स्निग्ध, थंड, पित्तशामक आहे. शरीरातील दाह, तहान कमी करणारे, बल देणारे, केसांसाठी हितकर, कान्ति वाढवणारे आहे.
गूळ - गूळ हा पचायला जड, उष्ण, कफ-वात कमी करणारा, श्रम-थकवा कमी करणारा आहे. गूळ जेवढा जुना तेवढा वापरायला चांगला.
सध्या तुपाबद्दल बरेच नाराजीचे सूर ऐकू येतात. सर्वच स्नेहांना सरसकट त्याज्य वा वाईट ठरवणे म्हणजे सोने, चांदी, तांबे, लोखंड इ. सर्व धातू एकाच भावाने मोजण्यासारखे आहे.
मुळातच तूप विशेषतः गाईच्या दुधाचे लोण्यापासून कढवलेले तूप हे बुद्धि, कांति, स्मृति वाढवणारे, बल्य, वात-पित्त कमी करणारे, थकवा घालवणारे आहे. जठराग्नि वाढवून, वीर्यवर्धक, दृष्टिला हितकर, शरीराला स्थैर्य, बळकटी देणारे तूप हे रोजच्या जेवणात असायलाच हवे.
तात्पर्य काय - परवाचे संशोधन काल खोटे ठरते, कालचे आज.. तेव्हा पारंपारिक पद्धतींवर जास्त विश्वास ठेवा आणि कॅलरी, फॅट्स् इ. च्या मोजमापात न अडकता आनंदाने बाप्पांचे स्वागत करा, स्वतःही मोदक नक्की कराच, इतरांनाही खाऊ घाला, सणाचा आनंद द्विगुणित करा. मधुमेह असेल वा इतर काही विकार असतील तरच हात आखडता घ्या वा आपल्या वैद्यांच्या सल्लाने वागा. वर्षातून एकदा वा क्वचितच होणारे मोदक यावेळी मात्र निश्चिंत मनाने खा. अजीर्ण होऊ नये म्हणून जरा दोन घास कमीच जेवा इतकंच.
पुढील रविवारीही गणपती असणार आहेत - तेव्हा मोदकांविषयी थोडी अधिक माहिती पुढील रविवारी.
© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
skype ID - tanugokhale
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

आहारयोग

आहारयोग


लेख क्रमांक 8

नमस्कार!
आधीच्या लेखांमध्ये आपण आहाराचे व आहारसेवनाचे नियम यांविषयी माहिती घेतली. ते लक्षात ठेवणे सोपे जावे म्हणून चरकाचार्यांनी सांगितल्याप्रमाणे थोडक्यात त्यांची उजळणी खालीलप्रमाणे:-
1. अन्न हे नेहमी गरम, ताजेच खावे. ताजे अन्नच सर्वाधिक चविष्ट लागते व गरम, ताजा पदार्थ पचविणे हे शरीरालाही सोपे असते.
2. अन्न हे नेहमी स्निग्ध असावे – म्हणजे योग्य त्या फिल्टर्ड तेलांचा (उदा. शेंगदाणा, तीळ, मोहोरी, खोबरेल इ. देशानुसार) (रिफाईण्ड तेल अजिबात नको) व साजूक तूप, साय, घरचे लोणी यांचा समावेश जेवणात आवर्जून करा. चांगल्या स्नेहाने पोटातील अग्नि अन्न योग्य प्रकारे पचवू शकतो.
3. आहार योग्य मात्रेतच घ्या. योग्य मात्रेतील आहार पचल्यावर अन्नाचे सर्व फायदे मिळतात, कमी अन्नाने कुपोषण होते व अतिखाल्ल्याने पचनशक्तिवर ताण येतो.
4. आधीचे अन्न वा आहार पचल्यावरच पुढील अन्न वा आहार घ्यावा. अशाने अपचन व त्यातून होणारे बहुतांशी सर्व विकार टाळता येतात.
5. एकमेकांना पूरक असेच पदार्थ जेवणात असावेत. एकमेकांना मारक पदार्थ खाऊ नयेत.
6. आपण राहतो त्या भौगोलिक हवामानातील पदार्थच रोजच्या जेवणात असावेत. तसेच खाण्याची वा जेवण्याची जागा व वातावरण ही शांत, आनंदी असावे.स्वतःच्या प्रकृतीला व काही व्याधी असतील तर त्या व्याधीत पथ्यकर असेच अन्न असावे.
7. जेवणाची व अन्न शिजविण्याची साधनसामग्री योग्य असावी. कोणत्याही भांड्यात, विशेषतः प्लॅस्टिक, मेलामाईन, थर्माकोल यांचा वापर टाळावा. तसेच नॉनस्टिक भांड्याचाही वापर टाळावा.
8. घाईघाईत किंवा रेंगाळत जेवू नये.
9. न हसता, न बोलता जेवावे.
10. प्रसन्नतेने व मन लावून जेवावे.
पटल्यास स्वतःच्या स्वयंपाकघरात प्रिंट काढून चिकटवा, आपल्या नातेवाईक, मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर करा. सोशल नेटवर्किंगवर ही माहिती शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा.
आतापर्यंत आपण अन्न कसे व का सेवन करायचे याविषयी माहिती घेतली. पुढील लेखापासून प्रत्यक्ष अन्नातील घटक, त्यांचे गुणधर्म यांची माहिती करून घेऊया.
© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
skype ID - tanugokhale
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

आहारयोग

आहारयोग


लेख क्रमांक 7 (क्रमशः)

नमस्कार!
5. देश – म्हणजे सभोवताल वा परिसर व तेथील हवामान, तिथे पिकणारी धान्ये, फळे, भाज्या यांचा योग्य वापर. सध्या जग म्हणजे ग्लोबल व्हिलेज झाले आहे. इटलीतला पास्ता सिंगापूर मध्येही मिळतो आणि उत्तम चायनीज जेवण अमेरिकेतही मिळते. भारतापुरते बोलायचे तर वाळंवटासारखे रूक्ष प्रदेश ते आसाम-मेघालय वा केरळ सारखे सदाहरित, आर्द्र, दमट हवामानाचे प्रदेश वा पुणे-नाशिक सारखे साधारण प्रदेश. या प्रत्येक ठिकाणी हवामानाप्रमाणे धान्य व भाज्या, फळे पिकतात व तेच तिथल्या हवामानाला खाणे हे योग्य आहे. बघा बरं – दक्षिणेकडची इडली – दिल्लीत त्याच चवीची बनत नाही आणि पचतही नाही. तसेच गव्हाचे पदार्थ दक्षिणेकडे खाण्याचे प्रमाणही कमीच. पण हा भेद लक्षात न घेता सरसकट दाक्षिणात्यांचा आहार असलेले इडली-डोसे नाश्त्याचे पदार्थ झाले आणि उत्तरेकडचे गव्हाचे पदार्थ रोटी, फुलका हे दुपारच्या जेवणात सामावले गेले – ते केवळ सोयीमुळे – शरीर व आहारच्या योग्यायोग्यतेचा विचार करून नव्हे. पूर्वीपासून व्यापारामुळे वा आक्रमणांमुळे, स्थलांतरामुळे जागतिक अनेक पदार्थांची देवण-घेवाण झाली पण त्या-त्या परदेशी पदार्थांचा समावेश हळूहळू झाला. त्या त्या पदार्थांचा वापर हळूहळू वाढला, शरीराला त्या पदार्थांची ओळख करून दिली गेली, ते पचवायला – सवयीचे व्हायलाही वेळ दिला गेला. काल जाहिरात दिसली आणि आज लगेच तो पदार्थ पोटात असे नाही झाले. तो पदार्थ कसा आहे, त्यावर काय संस्कार केले तर तो आपल्याला पचेल, तो कधी खावा याविषयीचे आडाखे बांधले गेले असावेत व त्यानुसार तो आपल्या पद्धतीत कसा बसेल त्याप्रमाणे त्यांचा वापर केला गेला. उदा. – बटाटे. मूळचे भारतीय नसलेले बटाटे – आज कोणत्याही पदार्थ – उपवासाचा वा मेजवानीचा – बटाट्याशिवाय करणे म्हणजे जरा डोके खाजवावेच लागते . आज नैवेद्याच्या पानातही बटाटा नसेल तर समाधान होत नाही ना? नवनवीन पदार्थ खाण्याची हौस सगळ्यांनाच असते पण ते जरा तारतम्याने. ह्ल्ली घर हेही हॉटेलचे मेन्यू कार्डप्रमाणे आज पंजाबी, उद्या दाक्षिणात्य, परवा राजस्थानी, गेला बाजार विकेंडला चायनीज, मेक्सिकन, थायी, इटालियन... अबब.. पुरे.. कोणत्याही एका पदार्थाची शरीराला सवय व्हायला वेळ द्यावा लागतो, त्यात सर्व जगच पोटात लोटू पाहायचे असते आपल्याला. पंचतारांकित हौटेलातील बुफे प्रकरण म्हणजे साक्षात अन्नाचे विश्वरूपदर्शनच. पण त्यासाठी पोटालाही कृष्णाप्रमाणे गोवर्धन पेलण्याची ताकद असायला हवी, औषधरूपी गोपाळांनी काठ्या लावून तो उदरातला डोंगर व्यवस्थित पचणार नाही.
6. काल – अन्न सेवन करण्याचा योग्य काळ महत्त्वाचा. आधीचे अन्न पचल्यावरच पुढचा आहार घ्यायला हवा. आधीचे जेवण जर पचले नसेल तर जसे दह्यात कितीही दूध घाला ते नासतच जाते, त्याचप्रमाणे आधीचे अन्न न पचता त्यावर पुढील अन्न घातले गेले तर ते पचनशक्तिवर ताण निर्माण करते व त्यातून अनेक रोगांची निर्मिती होते. दिवसा 10 ते 12 या वेळात मुख्य दुपारचे जेवण घेणे अगदी योग्य. त्यातूनही ज्यांना जमत नाही त्यांनी निदान 2 पूर्वी तरी हा आहार घ्यायलाच हवा. तसेच रात्रिचे जेवण ही सूर्यास्तापूर्वी किंवा नंतर परंतु 9 च्या आत घ्यायला हवा. काळानुसारही अन्नात बदल करायला हवेतच. स्निग्ध, पचायला जड पदार्थ हिवाळ्यात नियमित खाणे योग्य होय तर पावसाळ्यात अग्नि वा पचनशक्ति मंद झालेली असताना स्निग्ध पण हलके, गरम अन्न-पान हे योग्य. दिवसातील वेगवेगळ्या वेळा, ऋतु या बरोबरच वयाच्या अवस्थांनुसारही खाण्यापिण्यात बदल करायला हवेत. वाढीच्या वयात पौष्टिक पदार्थ जसे योग्य तसेच वृद्धापकाळात पौष्टिक पण पचायला हलके, पथ्यकर पदार्थ खायला हवेत. स्त्रियांच्याही बाला-कुमारी-स्त्री-गर्भवती-माता-रजोनिवृत्ता या अवस्थांनुसारही खाण्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. जसे हे काल खाणारा व निसर्गातील काळ व शारीरिक अवस्थांतील काळ यांचा जसा विचार करायला हवा तसाच विचार अन्न-धान्य-फळे-भाच्या यांच्या नैसर्गिक उपलब्धिंच्या काळाचाही विचार करायला हवा. काही फळे, भाज्या,धान्ये ही विशिष्ट ऋतुनुसार मिळतात तर काही बारमाही मिळतात. आंब्याचे महत्त्व उन्हाळ्यात जितके तितके बारमाही मिळायला लागल्यावर राहिल काय? आता वर्षभर लोक आम्रखंड, आमरस, पन्हे या गोष्टी खाउ-पिऊ शकतात पण नैसर्गिकपणे मिळणारा रसरसलेला आंबा कुठे आणि कृत्रिम द्रव्ये घालून टिकवलेले बर्फात टिकवलेले वा बाटलीबंद वा कॅन्ड पदार्थ – हे फक्त चवीचेच चोचले. एरवी वापरताना त्यांचे प्रमाण नगण्यच व क्वचितच खावे. रोगाच्या अवस्थांनुसारही अन्नपानाचे नियम बदलतात तेव्हा त्याविषयी वैद्यांकडूनच सल्ला घ्यावा.
7. उपयोग संस्था – उपयोगसंस्था म्हणजे अन्नसेवनाचे नियम. जसे आधीचे अन्न पचल्यावरच पुढचा आहार घ्यावा तसेच तो कसा कुठे कोणत्या स्वरूपात सेवन करावा इ. ही लक्षात घ्यायला हवे. अन्न हे सुखाने खाता येईल इतपत गरम, स्निग्ध (तेलकट वा तळलेले नव्हे), योग्य प्रमाणात, विरुद्ध नसलेले हवे. तसेच मनस्थितीही शांत, प्रसन्न हवी. अन्न हे न हसता, न बोलता, अति घाईने वा रेंगाळत सेवन करू नये. अन्न ज्याठिकाणी सेवन करायचे आहे ते ठिकाणही योग्य हवे. रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करत, उभ्याने, हसत, गप्पा मारत, डास-माशा हाकलत, वाहनांच्या वा वाद्यांच्या गोंगाटात अन्न खाणे हा सध्याच्या तरुणाईच्या दिनचर्येचा महत्त्वाचा भाग झाला आहे. घरीही शांतपणे कुटुंबियांबरोबर शांतपणे, मोजके पण प्रेमळ संवाद साधत जेवायची पद्धतही लोप पावत आहे. कानात बूचे घालून वा टीव्ही वरील नवरसांनी भरलेल्या मालिका वा कार्यक्रम बघत जेवणे म्हणजे नुसतेच पोट भरणे. नावडते पदार्थ मुलांच्या पोटात घालायची आईची आवडती जागा म्हणजे टीव्ही. त्याचा बघता बघता कधी अतिरेक होतो कळतच नाही.
8. उपभोक्ता – अन्न-पान घेणारी व्यक्ती म्हणजे उपभोक्ता – म्हणजे आपण स्वतः. वरील सर्व नियम पाळताना आपण स्वतः अन्न-पान कसे घ्यावे – स्वतःच्या तब्येतीनुसार, तक्रारींनुसार, शारीरीक-मानसिक अवस्थेनुसार, पचनशक्तिनुसार, आधीचे अन्न पचल्यावरच व भूक-तहान लागल्यावरच अन्न-पान सेवन करावे. स्वतःचे शरीर व मनःस्थिती योग्य असताना खाल्ले अन्न हेच सर्व फायदे मिळवून देते. हल्ली उठल्या-उठल्या काहीतरी तोंडात घातल्याशिवाय लोकांचा दिवस सुरू होत नाही. भूक असो वा नसो, आंघोळ झालेली असो वा नसो, पोट साफ झालेले असो वा नसो – तोंड धुतले की खाणे सुरू. कालांतराने सकाळी खाण्याऐवजी औषधांनीच दिवसाची सुरूवात करावी लागते तरी चुकीच्या सवयी सोडाव्यात, त्यात बदल करावेत हे लक्षातच येत नाही.
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे। सहज हवन होते नाम घेता फुकाचे।।
जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म। उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म।।
खरोखर जसे यज्ञकर्म करताना योग्य वेळ, शांतता, पावित्र्य, योग्य सामग्री लागते तसेच अन्नसेवन करतानाही आवश्यक आहे. लहानपणापासून हा श्लोक आपण म्हणत, ऐकत असतो, पण तो उमजून त्याप्रमाणे वागणे हे जेव्हा जमेल तेव्हाच खरे.
© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
skype ID - tanugokhale
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

आहारयोग

आहारयोग

लेख क्रमांक 6

नमस्कार!

आहाराचा समयोग साधण्यासाठी म्हणजेच योग्य आहार घेणे व तो पचवून त्याचे पूर्ण फायदे मिळणे यासाठी आयुर्वेदाने 8 गोष्टींचा विचार करायला सांगितले आहे. त्यांना म्हणतात आहारविधिविशेषायतन. थोडक्यात आहाराचा योग्य-अयोग्य विचार करताना तो खालील निकषांवर करावा.
1. प्रकृति
2. करण
3. संयोग
4. राशि
5. देश
6. काल
7. उपयोगसंस्था
8. उपभोक्ता
आयुर्वेद हे शास्त्र शरीर हे एखाद्या यंत्राप्रमाणे काळ-काम-वेग किंवा ऍव्हरेज किती देते मग त्या शरीराला कॅलरीज् किती घालाव्या अशा भाषेत बोलत नाही. मुळात कॅलरीज् ही संकल्पना ही पूर्णतः तर्कशुद्ध वा शास्रीय नाही पण त्याविषयी नंतर कधीतरी. आयुर्वेद हे शरीराला धर्म, अर्थ, काम व मोक्ष मिळविण्याचे साधन मानते. अशा या शरीराचे व मनाचे रोग होऊ नयेत म्हणून योग्य खाणे हे फार फार महत्त्वाचे आहे याविषयी तर आता दुमत नसावे. रोगाच्या चिकित्सेत असे म्हटले आहे की जर पथ्य नीट पाळले गेले तर औषधाची गरजच काय, आणि जर पथ्य पाळायचे नसेल तर औषधाचा उपयोग काय? यावरुनच योग्य खाणे मग ते स्वस्थ माणसाने असो वा रुग्णाने किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट आहे. विशेषतः हृद्रोगी वा प्रमेही लोकांचे उदाहरण घ्या बरं. पथ्य पाळलेच नाही आणि फक्त औषधावरच विसंबून राहिले तर चालेल का?
तर या वरील आठ गोष्टींचा थोडक्यात परिचय करून घेऊ.
1. प्रकृति – येथे प्रकृति हा शब्द आहाराशी संबंधित आहे. म्हणजेच पदार्थाचा स्वभाव, थंड/गरमपणा, पचायला जड वा हलकेपणा इ. व्यवहारात आपण नेहमीच बघतो व विचार करतो की सामान्य शाकाहारी जेवणापेक्षा मांसाहारी जेवण पचायला जड असते, गोड पदार्थ तिखट पदार्थांपेक्षा पचायला जड असतात, इ. एकेरी पदार्थांबाबत विचार करताना गहू हा तांदळापेक्षा पचायला जड असतो, मांस हे भाज्यांपेक्षा पचायला जड असते, दुधी, दोडका या भाज्या बटाटे, पनीर इ. पेक्षा पचायला हलक्या व त्रास न करणाऱ्या असतात इ. नेहमीच्या तांदुळापेक्षा साठेसाळी हा तांदूळ पचायला हलका व पथ्यकर असतो इ.
2. करण – करण म्हणजे पदार्थांच्या वर होणारे वेगवेगळे संस्कार. संस्कारांमुळे पदार्थाचे गुणधर्म वाढतात वा कमी होतात किंवा पूर्ण बदलतात ही. उदा. – तांदुळ हे पचायला हलके. त्यातही साळीच्या लाह्या या पचायला भातापेक्षाही हलक्या. पण चुरमुरे व पोहे, इडली-डोसे इ. तांदुळाचे पदार्थ, तांदुळाच्या पिठाची उकड, विविध भाज्या, धान्ये, मांस इ. घालून केलेले पुलाव वा बिर्याणी इ. सर्व पचायला जड असतात. तेव्हा पथ्याचे पदार्थ म्हणताना रुग्ण व रोगानुसार विचार करणे महत्त्वाचे. पथ्य म्हटल्यावर सरसकट इडली पचायला हलकी वा तांदुळाची उकड चालेल असे म्हणणे बरोबर नाही. किंवा दूध आवडत नाही तर दही खा वा ताक प्या वा पनीर खा हे म्हणणेही बरोबर नाही. विशेषतः दही हे सूज वाढवणारे आहे तर ताक हे सूज कमी करणारे आहे. दह्यातील हा बदल ते घुसळल्यामुळे व पाणी घातल्याने होतो. आधुनिक आहारशास्त्रानुसार यात पाण्याखेरीज काहीच घातले नाही इतपतच मर्यादित विचार आहे आणि म्हणूनच त्यांच्या मते दही वा ताक दोन्हीही सारखेच.
तसेच कच्चे अन्न खाण्यापेक्षा त्यावर अग्निसंस्कार झालेले अन्न पचायला तुलनेने हलके असते. चुलीवरचे अन्न, उकडलेले अन्न, विस्तवावर प्रत्यक्ष अग्निवर ठेवून शिजवलेले अन्न, मायक्रोव्हेवमध्ये शिजवलेले अन्न अशा अनेक प्रकारे शिजवलेल्या अन्नाचे गुण वेगवेगळे व परिणाम ही वेगवेगळे. तसेच भाजलेले, उकडलेले, तळलेले, कच्चे इ. प्रत्येक प्रकारात अन्नाचे गुण बदलतात. म्हणून केवळ दुधी हा हृद्रोग्यासाठी हितकर असे म्हणून ज्यात-त्यात व कशाहीप्रकारे शिजवलेला दुधी खाऊन चालणार नाही. पारंपारिक बिन मसाल्याची भाजी न करता दुधीचे कोफ्ते, पुऱ्या, पराठे, हलवा, पावभाजी इ. अनेक प्रकारे खालेल्ल्या दुधीचे परिणाम हवे तसे मिळणार नाहीत, फक्त मानसिक समाधान (खोटे) मिळेल.
3. संयोग – संयोग म्हणजे पदार्थांचे एकत्रिकरण. जसे कच्चे पोहे व दूध हा संयोग. पोहे हे दूध-साखरेबरोबर खाल्ले असता उत्तम बलदायक आहेत. तसेच पोह्याचे अजीर्ण झाले असता दूध प्यायल्यानेही पोहे पचायला व त्याचे अजीर्ण कमी व्हायला मदत होते. याउलट दूध व आबंट पदार्थ, फळे, तिखटमिठाच्या पदार्थासोबत खाणे हा विपरीत संयोग. याने दोष वाढून रोगनिर्मितीला वाव मिळतो. तसेच दही व चिकन, मासे व दूध, मध गरम करणे वा गरम पदार्थासोबत खाणे वा गरम पाण्यात घालून पिणे हे विकृतच.
4. राशि – म्हणजे प्रमाण. पदार्थाचे वा आहारचे प्रमाण हे व्यक्तिसापेक्ष बदलते. जेवणातील प्रत्येक घटकाचे प्रमाण व संपूर्ण जेवणाचे प्रमाण या दोन्हीचा विचार करणे महत्त्वाचे आहे. सरसकट वयोमानानुसार किती खावे असे न सांगता भुकेप्रमाणे व पचनशक्तिप्रमाणे खावे हे उत्तम. तसेच आपल्या पांरपारिक जेवणात मुख्य धान्य गहू, तांदूळ, क्वचित ज्वारी हे असते व त्याला डाळींची, भाज्यांची जोड दिलेली असते. लोणचे-चटण्या या चव वाढविण्यासाठी, अन्न पचायला मदत करण्यासाठी असतात. पण म्हणून भाजी चिमूटभर व लोणचे वाटीभर असेतर आपण जेवत नाही व तसे जेवूही नये. चमचाभर ठेचा वा लोणच्याबरोबर पूर्ण जेवण संपवणारी माणसे आहेत, पण हे योग्य नाही.
(क्रमशः)
© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
skype ID - tanugokhale
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

आहारयोग

आहारयोग

लेख क्रमांक 5

नमस्कार!
आधीच्या लेखांमध्ये आहाराच्या अयोग-अतियोग-मिथ्यायोगाबद्दल आपण थोडक्यात माहिती करून घेतली. आज आहाराच्या समयोगाविषयी माहिती घेऊ या.
मंडळी, आधीचे लेख वाचताना एक गोष्ट तर नक्कीच लक्षात आली असेल ना? ती अशी की – चुकीच्या आहार सेवनाने म्हणजेच आहाराच्या अयोग-अतियोग-मिथ्यायोग झाल्याने निर्माण झालेले आजार जर दूर करायचे असतील तर काय करायला हवे आणि काय नको हे समजून घेताना केवळ त्या चुका टाळणे एवढेच पुरेसे नाही तर योग्य पद्धत अवलंबणे हेही महत्त्वाचे आहे. खरेतर कोणत्याही चुकीच्या वा घातक गोष्टीने त्रास झाला तर ती गोष्ट पूर्णपणे बंद करणे गरजेचे असते हे आपण बघतो, जमेल तसे पाळतो पण त्या चुकीच्या गोष्टीचा प्रभाव कमी करण्यासाठी शरीराला हितकर अश्या चांगल्या गोष्टींचा वापरही करायला हवा हेही तितकेच खरे, हो ना? जसे हृद्रोग्याने आपल्याला रोग का झाला याचे कारण समजून घेऊन ते बंद करायला हवेच पण त्याचबरोबर शरीराला हितकर अशा चांगल्या सवयींचा अंतर्भाव नियमितपणे करायलाच हवा. जेवणात तेल-तूप पूर्ण बंद करणे, ओट्स्, जवस, इ. धान्यांचा वापर वाढवणे हा त्यावरचा पूर्ण उपाय नाही तर म्हणजेच आहाराच्या मिथ्यायोगाने झालेल्या हृद्रोगात, स्निग्ध पदार्थांचा अयोग (तेल-तूप पूर्णपणे बंद करणे) वा काही पदार्थांचा अतियोग (ओट्स्, नवनवीन तेले, जवस यांचा अमर्याद वापर करणे) हा त्यावरचा पूर्ण उपाय नसून संपूर्ण शरीराला आणि विशेषतः हृदयाला हितकर अश्या द्रव्यांचा, सवयींचा, पद्धतींचा वापर नियमित करणे व त्यापासून दुसरे कोणतेही आजार निर्माण न होता, आहे तोच आजार आटोक्यात ठेवता येणे वा बरा करता येणे म्हणजेच समयोग साधणे असे म्हणणे बरोबर ठरेल.
तर समयोग साधण्यासाठी या छोट्या छोट्या सवयी कोणत्या, कोणकोणते पदार्थ आपण उठल्यापासून निजेपर्यंत पोटात घालत असतो याचा सारासार विचार करायला हवा.
1. आपल्या रोजच्या छोट्या-छोट्या सवयींकडे डोळसपणे बघायला हवे ही पहिली पायरी.
2. चुकीच्या सवयी कोणत्या हे कळले की त्या बदलल्या पाहिजेत ही दुसरी पायरी.
3. बदलल्यानंतर कोणत्याही जाहिरातींना भुलून न जाता त्या चांगल्या सवयींवर ठाम राहाणे ही तिसरी पायरी. असे घडले तरच आपण आहाराचा व गंभीरपणे विचार करत आहोत असे म्हणता येईल.
आयुर्वेदानुसार स्वस्थ व्यक्तिची लक्षणे सागितली आहेत ती अशी –
समदोषः समाग्निश्च समधातुमलक्रियाः।
प्रसन्नात्मेन्द्रियमनः स्वस्थ इत्यभिधीयते।।
सुश्रुतसंहिता सूत्रस्थान 15/10
म्हणजेच सोप्या भाषेत - शरीरातील सर्व घटक योग्य प्रमाणात असणे, भूक वेळच्यावेळी लागणे, त्यानंतर खाल्लेल्या अन्नाचे पचन योग्य होणे, शरीरातील सर्व लहान-मोठ्या क्रिया सुरळीत चालू असणे, आत्मा, मन व इंद्रिय हे प्रसन्न असणे ही ती लक्षणे होय.
WHO नेही Health ची व्याख्या सांगताना म्हटले आहे -
Health is a state of complete physical, mental and social well-being and not merely the absence of disease or infirmity.
“मला काहीही होत नाही, रोज मी दही खातो, शिकरण खातो, मी अजून तरी धडधाकट आहे” वा “रोज मी भेळ खाते” वा “रोज मी दोन पेग दारु पितो - काय धाड भरलीये मला?” अशी वाक्ये आपल्याला नेहमी ऐकू येतात. संवाद तेच फक्त चुकीच्या द्रव्यांची यादी न संपणारी. आता असे म्हणणे म्हणजे स्वतःबद्दल अति-आत्मविश्वास, चुकीच्या गोष्टीचे समर्थन आणि भविष्याकडे डोळेझाक असेच म्हणायला हवे.
किंवा - "पूर्वी मी फार तिखट खात होते, आताशा मात्र नाही चालत" म्हणजेच त्या पूर्वी खाल्लेल्या तिखटाचे दुष्परिणाम शरीर अजूनही भोगतंय आणि तिखट खाण्याची वा पचविण्याची शरीराची सहनशक्ती त्यामुळे कमी झालेली आहे. बघा बरं, लहानपणी खाल्लेली चिंचा,कैऱ्या,पेरू आता या मध्यम वा उतार वयात खायचा प्रयत्न केल्यास त्रास होतोच. ते पदार्थ वाईट नसतातच फक्त ते सध्या आपल्या शरीराला हितकर आहेत वा नाही याचा विचार प्रामुख्याने व्हायला हवा.
हितकर असे अन्न-पान योग्य प्रमाणात, योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीने शिजवून, योग्य प्रकारे व नियमित सेवन करणे, ते पचविणे व एकूण देनंदिन व्यवहारही त्याला पूरक असा वा कमी त्रासदायक करणे म्हणजे समयोगाच्या दृष्टीने आपण योग्य पाऊल उचलले आहे असे म्हणायला हरकत नाही.
आहाराच्या समयोगाचे फायदे म्हणजे स्वास्थ्य मिळणे व ते दीर्घकाल टिकणे हे वेगळे सांगायला नकोच, नाही का? अर्थातच आहार बरोबर विहार व आचार हेही महत्त्वाचेच व सर्व एकमेकांवर अवलंबून असल्याने आहारानुसार विहार-आचार व विहार-आचारानुसार आहार हा बदलायलाच हवा. जसे रोज सात्त्विक पूजा करणाऱ्या वा साधना करणाऱ्या योग्याने तामसी आहाराच्या वाटेला जाऊच नये तसेच. विद्याभ्यास करणाऱ्यांनीही मीठ कमीत कमी खावे कारण त्याने इंद्रियांवर विशेषतः डोळ्यांवर वाईट परिणाम होतो परंतु आजच्या मुलांना चष्मा लागण्याचे प्रमाण वाढण्याचे मुख्य कारण - टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर यांचबरोबर विविध कंपन्यांचे वेफर्स, बटर-चीझयुक्त पदार्थ, वेगवेगळे बाजारी सॉस, लोणची, फरसाण, बिस्किटे, पापड, रेडीमेड शीतपेये हेही आहेत. त्यामुळे फक्त गॅजेट्स्च्या वापरावर बंदी घालून पुरणार नाही, आहारातील बदल प्रामुख्याने करायलाच हवेत.
विषय आजच्या एका लेखात संपणार नाही म्हणून समयोगासाठी ही प्रस्तावना. समयोग साधण्यासाठी काय कसे खावे-प्यावे, कसे पचवावे, त्यांचे फायदे व त्यापासून स्वास्थ्य कसे मिळवावे व राखावे हे पुढच्या लेखापासून विस्तृतपणे जाणून घेऊया.
© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
skype ID - tanugokhale
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

आहारयोग

आहारयोग

लेख क्रमांक 4

नमस्कार!
आधीच्या लेखात आपण अयोग व अतियोग याविषयी माहिती घेतली. आजचा विषय – आहाराचा मिथ्यायोग.
खरंतर आज जे काही खाण्याच्या नावाखाली केले व खाल्ले जाते ते बहुतांशी सर्व मिथ्यायोग या प्रकारात मोडते असे म्हणायला हरकत नाही. आजच्या बहुतांशी रोगांचे मूळही या मिथ्यायोगात आहे.
मिथ्या म्हणजे अयोग्य, विकृत. जे खाऊ नये ते खाणे, जसे खाऊ नये तसे खाणे, जेव्हा खाऊ नये तो व्हा खाणे. अन्न म्हणून उपयोगी असणाऱ्या वा फायद्याच्या धान्य वा पदार्थांऐवजी जे अन्न नाही ते खाणे.
उदाहरणार्थ – आज-कालचे बहुतांशी बाजारी पदार्थ विशेषतः तयार अन्न वा प्रोसेस्ड फूड. मूळ घटक किती सत्त्ववान आहे या पेक्षा तो किती स्वस्त आहे, किती मुबलक उत्पन्न होतो, किती कमी खर्चात तो लोकांपर्यंत पोहोचवू शकतो यावर बहुतांशी कंपन्यांचे लक्ष असते व त्यातच त्यांचा सर्वाधिक स्वार्थ=फायदा दडलेला असतो.
उदा- ब्रेकफास्ट फूड म्हणून मक्याच्या रोस्टेड पोह्यांना (corn flakes) जगभर मान्यता मिळाली आहे. किंमत कमी(?), चवीसाठी अनेक स्वादांमध्ये उपलब्ध, शिवाय आबालवृद्धांसाठी उपयुक्त अशा जाहिराती पाहिल्यावर कोणाला भुरळ पडणार नाही? दूध घातले तर अधिक पौष्टिक अशी समजूत झाल्याने असल्याने मागणी वाढली नाही तरच नवल. विदेशी कंपन्यांबरोबरच देशी कंपन्याही त्यात मागे नाहीत. जणू काही विदेशी कोणतीही यशस्वी गोष्ट दिसली की ती भारतातही तयार झालीच पाहिजे यालाच प्रगती म्हणत असावेत – मग ती चुकीची गोष्ट वा वस्तू भारतीय ग्राहकांसाठीच का असेना.
वस्तुस्थिती अशी आहे की – पूर्वी मका हा गुरांचे अन्न म्हणून मिळत असे. अगदी गुरांनी खाण्यालायकच कडक दाणे, रवंथ करावा लागेल असे पीक. त्याचेच कोवळे कणीसच देशी वाण आपल्याकडे खात असत तोही सर्रास नव्हे.
सध्या मिळणाऱा गोड मका (sweet corn) हा GMO – Genetically Modified Organism या स्वरूपात मिळतो. कडक मक्यावर अमेरिकन शास्त्रज्ञांनी प्रयोग करून तो मऊ, गोड बनवला. जरा गूगल वर शोधलेत – तर बरीचशी माहिती मिळेल. GMO हा आजच्या लेखाचा विषय नाही म्हणून इथे सविस्तर आत्ता लिहित नाही, पुन्हा कधीतरी नक्की लिहिन.
हाच GMO मका आज सर्व पदार्थांमध्ये वापरला जातो. म्हणजे जे धान्य खाण्याच्या लायकीचे नाही ते कंपन्या कशा बेमालूमपणे आपल्याला खायला घालतात याचे हे उत्तम उदाहरण. शिवाय हे बनवताना – कितीतरी कृत्रिम वास व चवींचे घटक व प्रिझर्व्हेटिव्ज वापरली जातात त्याचेही दुष्परिणाम आहेतच.
हे झाले 1 उदारहण. मिथ्यायोगात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो यासाठी एक-दोन लेख अपुरेच पण थोडक्यात समजून घेण्यासाठी खालील गोष्टी उदाहरणादाखल पाहूया.
1. स्वतःची प्रकृती, राहाण्याचे ठिकाण, पचनशक्ति, वातावरण व ऋतु, शारीरिक बल, वय या नुसार आहाराचे नियम न पाळणे.
2. चांगले व वाईट पदार्थ एकत्र करून खाणे – उदा – शिळे व ताजे पदार्थ एकत्र करून खाणे.
3. पहिले अन्न न पचता दुसरे अन्न पोटात घालणे.
4. चांगलाच पदार्थ पण विकृत करून खाणे – उदा – दूध मुद्दाम नासवून त्याचे चीज, पनीर इत्यादि करून खाणे.
5. विरुद्धाहार – उदा – दूध व फळे दोन्ही गुणकारी आहेत पण स्वतंत्रपणे खाल्यासच. दुधाचे फायदे मिळण्यासाठी नुसते दूध प्यावे कोणतेही खारट,आंबट,तुरट,तिखट,कडू पदार्थ न घालता. गोड पदार्थही शक्यतो सल्ल्याशिवाय घालू नयेत. हल्लीच्या मुलांना नुसते दूध दिले तर पालकांनाही ते पूर्णान्न वाटत नाही, मुलांनाही दुसरी चव घातल्याशिवाय ते घशाखाली उतरत नाही. असो. तर फळे ही गुणकारीच पण दुधाच्या संयोगाने तो पदार्थ विकृत होतो आणि फायदे दोन्हीचेही मिळत नाहीत, फक्त चवीचे तात्पुरते समाधान.
6. अन्न पुन्हा-पुन्हा गरम करून खाणे, मुद्दाम शिळे खाणे.
7. आंबवलेले, नासलेले, तार आलेले, बुरशीयुक्त अन्न खाणे.
8. चुकीच्या पद्धतीने जेवणे – उदा – गोडाने सुरुवात करण्याऐवजी जेवल्यावर गोड खाणे
9. स्वतःसाठी योग्य नसलेले अन्न खाणे. एखाद्या व्यक्तिला त्याच्या तब्येतीसाठी वा तक्रारींसाठी काही विशिष्ट पदार्थ सुचवला जातो. उदा. जवस. पण याचा अर्थ जवस हे सर्व प्रकृतीच्या सर्वच लोकांना चालतील असे नाही. पण हा सारासार विचार न करता सर्रास जवसाचा आजकाल सगळे अनिर्बंध विना सल्ला वापर करताहेत. जवसाविषयी माहिती पुढील पैकी एका अंकात नक्की लिहिणार आहे.
10. चुकीच्या वातावरणात खाणे – जसे मोबाईल वा TV बघत, पुस्तक वाचत इ.
वरील गोष्टी वानगीदाखलच पण आज जास्त दिसून येतात. त्यात बदल कसा व का घडवायचा हे त्या त्या विषयी सविस्तर लिहिनच. आजसाठी इतके पुरे. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी अन्नाचा समयोग म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी. धन्यवाद.
© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
skype ID - tanugokhale
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

आहारयोग


आहारयोग

लेख क्रमांक 3

आज आहाराच्या अतियोगाविषयी जाणून घेऊया.
अतियोग म्हणजे गरजेपेक्षा जास्त खाणे, जास्त वेळा सेवन करणे, भूक न लागताही खाणे, वेळेवर वा अवेळी पण पचायला अति जड, अति स्निग्ध, थंड, एकाच प्रकारचे वा रसाचे अन्न उदा फक्त गोडच वा तिखटच अन्न खाणे, जेवताना 2 घास कमी खावे असे असूनही केवळ जिभेला चांगले लागतेय म्हणून खाण्या-पिण्याचा अतिरेक करणे, तडस लागेपर्यंत जेवणे, जेवल्यावर सुस्ती, जडपणा जाणवणे म्हणजे अतियोग.
वजन जास्त असणारे वा मेद/चरबी जास्त असणार्या व्यक्तिंमध्ये अन्न प्रमाणतः जास्त असतेच असे नाही, मात्र पचायला जड, अयोग्य, अतितेलकट-तुपकट अन्नपदार्थ वेळी-अवेळी खाण्याने शरीर अतिबाळसेदार, फोपसे होते.
काही व्यक्ति सांगतात - की अगदी हवा ही सुद्धा अंगी लागते smile emoticon.. विनोद बाजूला ठेवला तर हवा ही अंगी लागते यासाठी पूर्वीचा चुकीचा आहार-विहार कारणीभूत आहे आणि त्याचे परिणाम आजही दिसताहेत असेच म्हणायला हवे.
आधीच्या लेखात वजन कमी करण्याचे अशास्त्रीय व चुकीचे पर्याय वापरले जातात असे लिहिलेय. त्याचप्रमाणे वजन वाढविण्यासाठीही फक्त केळी, वेगवेगळे flavoured शेक्स्, High protein, Soy, Malt इ.युक्त supplements, यांचा अयोग्य, अधिक व अनिर्बंध वापर याचेही दुष्परिणाम कालांतराने दिसतातच. केवळ खाणेच नव्हे तर Steroids सारख्या औषधांनीही वजन वाढणे, सूज येणे असे दुष्परिणाम दिसतात. जाहिरातींच्या मागे न लागता, आपल्या आयुर्वेदीय तज्न्य वा वैद्याला विचारून आपल्या पचनशक्ति व भुकेप्रमाणे खाणे हेच योग्य आहे.
बरे असे अति व अयोग्य खाण्याचे इतर दुष्परिणाम काय तर याने फक्त शरीरातील चरबीच जास्त वाढते, पण इतर सर्व शरीरघटकांचे योग्य पोषण न झाल्याने, दिसायला शरीर मोठे मात्र ताकद नाही असे होते, सूज येते, घाम येतो, कायम जडपणा, सुस्ती, निरुत्साह जाणवतो, केसांचे, त्वचेचे रोग होतातच शिवाय प्रमेह, मेदोरोग, हृदय, वृक्क/किडनीवर परिणाम, अंतःस्रावी ग्रंथीवर दुष्परिणाम, लघवीच्या तक्रारी, घामाच्या तक्रारी इ. अनेक तक्रारी निर्माण होतात. यावर आहार-विहार-जीवनशैली बदलणे हाच उपाय आहे हे कळत असूनही फक्त dieting वा पाणीच भरपूर पिणे, नुसती फळेच खाणे वा वेगवेगळे रस घेणे, वजन कमी करणाऱ्या गोळ्या घेणे, HRT, इन्सुलीन, थायराॅईड, इस्ट्रोजेन अशी hormonal treatment घेणे, केवळ ओटस्, सोया, काॅर्नफ्लेक्स असेच खाणे, कोणताही व्यायाम पण तोही प्रकृती,काल,वय,शरीराची गरज यांकडे दुर्लक्ष करून करणे अशा मार्गांनी कायमचा नव्हे तर तात्पुरता उपाय होतो, अपायही होतो. अशाने आलेले आजारपण लांबते. शिवाय आजारांचे स्वरूपही गंभीर असते.
जसे अन्नाबद्दलचे तसेच कोणतेही पेये अगदी पाणी सुद्धा पिण्याचा अतिरेक होऊन चालत नाही. पाणी न पिता इतरच पेये घेणे मग ती soft drinks असो वा hard drinks, चहा वा काॅफी इ पेये - त्यांच्या अतिरेकानेही त्रास होतात, शरीराचे योग्य पोषण होत नाही, प्रमेह, सूज येणे, यकृत्, किडनीवर ताण येऊन त्याची दुखणी निर्माण होणे असे विकार प्रामुख्याने होतात. विकतच्या पेयांतील कृत्रिम घटकांचे त्रास कैक पटींनी जास्त व दीर्घकालीन आहेत.
बघा बरं - जीभ व पोट हे स्वास्थ्य राखण्यासाठी आहेत, चोचले पुरविण्यासाठी नाहीत हे कळायला काही रोगच व्हावे लागतात, त्याशिवाय किंवा तरीही आपण मूळ कारणांचा विचार करत नाही यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते? अज्ञानात सुख असते असे म्हणतात. तात्पुरते खरे असेलही ते पण दुर्लक्ष करण्यात मात्र सुख व कायमचे हित नक्की नाही.. हो किनई?
मागील लेखात लिहिल्याप्रमाणे आपल्या मौल्यवान शरीराशी, मनाशी संवाद साधलात का? साधला असेल तर उत्तमच. कालच हा संवाद साधायचा होता खरा, पण आजही, आत्ताही सुरुवात करू शकतोच की आपण.. तर सुरुवात करा, शरीराशी संवाद साधा- स्वतःच्या मनात डोकावून पाहा.. अगदीच नाही काही कळलं तर विचारा की आपल्या वैद्यांना.. अगदी समाधान होईपर्यंत विचारा पण मग मात्र खरोखरीच योग्य खाण्याचा मार्ग स्वीकाराच ही कळकळीची विनंती.

© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
skype ID - tanugokhale
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

आहारयोग

आहारयोग

लेख क्रमांक 2 -
आज आहाराच्या अयोगाविषयी जाणून घेऊया.
अयोग म्हणजे कमी खाणे, गरजेपेक्षा कमी अन्न सेवन करणे, कमी वेळा सेवन करणे, भूक लागूनही न खाणे, वेळेवर वा अवेळी पण निकस, सत्त्वरहित, refined अन्न खाणे, अन्नातून जे गुण बल, ओज, स्थैर्य, पुष्टि, समाधान इ. मिळणे आवश्यक आहे ते न मिळणे म्हणजे अयोग.
हल्ली केवळ वजन कमी करणे वा सडपातळ दिसणे या कारणासाठी dieting चे फॅ़ड आलेले दिसते आहे. विविध औषधे- गोळ्या- वरून लावायचे लेप, spot reduction, यांबरोबरच अनेक 'diet' foods वा weight loss supplements, fat burners इ. नावांनी अगणित उत्पादनांच्या जाहिरातींचा मारा होताना दिसतोय. यातील योग्य-अयोग्य काय हे ठरविणे अवघ़ड होत चाललेले आहे कारण बरेचदा अनेक वैद्यकीय व्यावसायिकही अशा उत्पादनांचे वा सेवांचे promotion / endorsement - करताना दिसतात. ज्याअर्थी एक डाॅक्टरच सांगतो आहे त्या अर्थी ते बरोबरच असेल असे स्वत:चे समाधान करून घेतले जाते. जसे नट-नट्या फक्त पैश्यांसाठीच जाहिराती करतात- त्या वापरत नाहीत तसेच हेही आहे. कोणीही वैद्यकीय व्यावसायिक जर व्यक्तिला वा रुग्णाला न तपासता सरसकट एखाद्या उत्पादनाची जाहिरात करत असेल तर ते चूकच आहे. कायद्याने तर वैद्यकीय व्यावसायिकांना अश्या विशिष्ट उत्पादनांचे endorsement / promotion करण्यावर बंदीच आहे. म्हणजे कायद्याने चूक असलेल्या गोष्टींचाही आपण कसा स्वतःसाठी गैरवापर करतो? त्यातून जर कालांतराने त्या उत्पादनाने वा सेवेने कोणाला त्रास झाला, कोणत्या चाचणीत त्या गोष्टी अहितकारक आहेत असे दिसले तर मात्र आपण पुन्हा सरकारलाच दोषी ठरवून मोकळे होतो. जरी या वस्तू वा उत्पादने योग्य रीतिने तयार झाल्या तरी त्या सेवन करणे योग्य कसे? केवळ दोन मिनिटात भूक मिटवणारा पदार्थ हा वेळेअभावी सोयीस्कर असेलही पण म्हणून तो शरीरास हितकर आहे असे कसे म्हणू शकतो आपण? म्हणून कोणतेही बाजारी तयार अन्न मग ते packed food असो वा ready-mixes असो वा parcel असो - ते योग्य आहे का - पूर्ण जेवणाचा फायदा देणार आहे का की नुसतेच चमचमीत खाऊन पोटची खळगी भरून खोटे समाधान देणारे आहे याचाही विचार करा.
भूक नसतानाही वारंवार थोडे थोडे खात राहाणे - दर दोन तासांनी तोंड उष्टावणे यानेही शरीराची खाण्याची गरज भागत नाहीच तसेच व्यवस्थित जेवणाने मिळणारे समाधानही मिळत नाही. चटकन वजन कमी होण्यासारखे (दुः)परिणाम याचे असतीलही पण तिकडे कोण लक्ष देणार? सडपातळ दिसणे- दिसण्यावरून वाहवा मिळवणे यासाठी तर हा अट्टाहास.
बरे असे कमी व अयोग्य खाण्याचे इतर दुष्परिणाम काय तर याने अंगातील रक्त कमी होते, शरीराचे बल वा ताकद कमी होते, त्वचा रूक्ष होते, केस गळतात, लवकर पांढरे होऊ लागतात, सांधे झिजायला लागतात, कमी कष्टानेही दम लागतो, चिडचिड होते, सतत काहीतरी दुखत राहाते, झोप पुरत नाही वा लागतच नाही, मानसिक धैर्य ही कमी होते. त्यातून काही आजारपण आले तर त्यासाठी प्रतिकारशक्ती कमी झाल्याने आजारपण लांबते. शिवाय आजारांचे स्वरूपही गंभीर असते.
बघा बरं - केवळ बारीक दिसण्याच्या अट्टाहासासाठी वा केवळ जेवायला वा योग्य अन्न शिजवायला नाही म्हणून मिळेल ते तोंडात वेळी-अवेळी टाकल्याने आपण स्वतःलाच फसवत असतो.
वाहनात इंधन नाही वा चाकांत हवा भरली नाही वेळेवर तर आपण तिथे हयगय करत नाही - लगेच भरतो कारण ती गैरसोय टाळणे आपल्याला सुचते व आपण तसे जमवतोही. भले दोन पैसे जास्त जाऊदे पण वाहनाचे नुकसान नको म्हणून इंधनही उच्च प्रतीचे भरतो. मग देवाने दिलेल्या या सुंदर आजन्म बरोबर असणाऱ्या आपल्या शरीराकडे आपण का बरे दुर्लक्ष करतो - कारण ते बिचारे सहन करत राहते. काहीतरी बिनसतय हे सांगायचा ते प्रयत्नही करत राहते पण आपण मात्र चक्क दुर्लक्ष करतो किंवा मागील लेखात लिहिल्याप्रमाणे तात्पुरते उपाय करतो. अति झाल्यास मात्र दीर्घकालीन व महागड्या तपास्ण्या-उपाययोजना कराव्याच लागतात. त्यापेक्ष्या वेळीच तहान-भूक, मल-मूत्र प्रवृत्ति, झोप येणे इ. शरीराच्या रोजच्या छोट्या पण महत्त्वाच्या संवादाकडे नीट लक्ष द्या. बघा बरे तुमचे शरीर तुमच्याशी काय आणि कसा संवाद साधतेय - जरा कान देऊन - मन लावून - पुस्तके-फोन-टीव्ही-इंटरनेट बंद ठेवून एकदा ऐका तरी..
© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

आहारयोग

आहारयोग
लेख क्रमांक - 1
अन्न-पान हे प्रत्येक जीवाचे जगण्यासाठीचे साधन. मूलभूत गरज. पण मनुष्याच्या बाबतीत ही गरज चैनीचे रूप कधी घेते हेच कळत नाही. जसा आर्थिक स्तर उंचावतो तसा गरजेतून चैनीकडे प्रवास सुरू होतो. जगण्यासाठी खाणे हे वास्तव खाण्यासाठी जगणे यात बदलते आणि जोवर काही रोगनिदान वा त्रास होत नाही तोवर बिनबोभाट सुरू राहते. एकदा का काही बिनसू लागले, शारीरिक वा मानसिक तक्रारी जाणवू लागल्या की मग त्यांच्या तीव्रतेनुसार घरातील वडिलधाऱे, शेजार-पाजारी, सहकारी यांना विचारून वा दूरदर्शन, वृत्तपत्रातील जाहिराती वाचून नाहीतर सरळ कोपऱ्यावरच्या केमिस्टकडून मनानेच वा त्याच्या सल्ल्याने औषध(?) घेऊन उपाय केल्याचे तात्पुरते समाधान मिळवणे असे प्रथमोपचार केले जातात. काही बहाद्दर तर फेसबुकवरही आपल्या लक्षणांचा वा त्रासाचा जाहीर प्रचार-प्रसार करतात व तिथे सल्ले मिळवतात. ते योग्य असतातच असे नाही कारण प्रश्नकर्त्याच्या तक्रारी, सवयी, जीवनशैली याविषयी काहीही माहिती न घेता वा विचारता सर्वचजण ऐकीव वा स्वानुभवातून सल्ले देऊ लागतात. अगदी घरगुती उपायांपासून ते विविध पेन-कीलर्स, अँटीबायोटीक्स, अँटीहिस्टामिनिक्स्, व्हिटॅमिन्स्, स्टिराॅईडस् इ. च्या गोळ्या, सिरप, मलमे, इ प्रिस्क्रीप्शन, तसेच जिम लावा, चालायला जा, टेकडी चढा, पोहायला जा असेही सल्ले व्यक्ति-प्रकृति न बघता दिले जातात. यातून कधीतरी तात्पुरते बरे वाटते तर कधी त्रास वाढतो आणि मग मात्र वैद्यकीय सल्ला घेणे भाग पडते. केवळ तुमच्या लक्षणांवर व माहितीवर अवलंबून न राहता तपासण्यांचा सल्ला दिला जातो. त्यात काही त्रास दिसला तर त्यावरील विशेष औषधे दिली जातात. अन्यथा मानसिक कारणे आहेत असा निष्कर्ष काढला जातो. गरजेनुसार स्पेशालिस्ट वा मानसोपचारतज्न्याचा वा तात्पुरते औषध देऊन घरचा रस्ता दाखवला जातो. येथेच हे चक्र संपत नाही तर पुनःपुन्हा चालू राहाते. कालांतराने हृदयरोग, प्रमेह, संधिवात, दमा, त्वचारोग, कर्करोग, इ. भारदस्त रोग कायमचे ठाण मांडतात. त्यांचा पाहुणचार म्हणून तपासण्या व औषधे ही जन्मभरासाठी सोबत करतात. आपल्या नातेवाईकांना विशेषतः आई-वडिलांना होणारा त्रास आपल्याला व्हायला लागला की तो आनुवंशिकच आहे असे समजूत करून घेतली जाते पण तो आपल्यालाही होउ शकतो याची कल्पना असूनही त्यासाठी preventive काही केले मात्र जात नाही. अश्या गंभीर-दीर्घकालीन रोगांचे निदान झाल्यावर मात्र आहाराविषयी, जीवनशैली सुधारण्यासाठी जरा जागरूकता येते, त्या आजाराविषयी अनेक सल्ले दिले - घेतले जातात, विविध पुस्तके-साईट्स् वर माहिती मिळवून त्याचा उपयोग करायचे प्रमाण वाढते, जSरा आधी हे कळले असते तर असे हळहळून सुरुवातीला क़डक पथ्य पाळणे, लवकर उठून जिम, फिरायला जाणे यापासून ते सोयीस्कर पळवाटा काढणे असा प्रवास सुरू होतो तो अगदी शेवटपर्यंत.
आपण या वरील वर्णनात कुठे बसतो का याचा विचार करा बरं. होय असे उत्तर असेल तर आजच, आत्ताच सावध होण्याची गरज आहे आणि जाणीवपूर्वक आहारात-जीवनशैलीत बदल करण्याची गरज आहे. वरील वर्णन आपल्याला अजिबात लागू नसेल तर सध्यातरी अभिनंदन कारण हे कदाचित भविष्यातही घ़डू शकते, तेव्हा सावधान!
याच वरील विचारांनी आणि अनेक रुग्ण, लांबचे-जवळचे नातेवाईक यांच्या शंका व त्यांचे निरसन करण्यासाठी, आयुर्वेद हे शास्त्र म्हणून आजही कसे शाश्वत आहे हे सांगण्यासाठी या पानाद्वारे आपल्यापर्यंत पोचायचे ठरविले. पारंपारिक जीवनशैली, विशेषतः आहाराचे महत्त्व, ते बनविण्याच्या, खाण्याच्या पद्धतीतील योग्य-वाईट बदल यांविषयीचे लेखन इथे असणार आहे. आयुर्वेद म्हणजे केवळ हे खाऊ नका-ते खाऊ नका असे नकारार्थी सांगणारे शास्त्र नाही तर ते तुम्हाला कमी अपायकारक वा जास्तीतजास्त हितकर कसे होतील हे सांगणारे शास्त्र आहे यासाठीच हा खटाटोप. जीवनशैली महत्त्वाची आहेच, त्याबद्द्ल विषयानुरूप लिहिनच.
आहारयोग
आहार म्हणजे जे जे आपल्या अन्ननलिकेवाटे पोटात जाते तो आहार. योग म्हणजे जोडले जाणे. या आहाराशी आपण कसे जो़डले जातोय त्यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो.
योगाचे चार प्रकार - अयोग (पचनशक्तिपेक्षा कमी खाणे), अतियोग (पचनशक्तिपेक्षा जास्त खाणे), मिथ्यायोग (पचन विकृत करणारे वा चुकीचे खाणे) व समयोग (पचायला योग्य असे खाणे).
यातील स्वास्थ मिळ्ण्यासाठी व टिकण्यासाठी समयोग असणे हेच गरजेचे आहे व इतर योग टाळणे हेही महत्त्वाचे आहे. आपल्या प्रकृतिनुसार, वयानुसार, जीवनशैली, नोकरी / व्यवसायानुसार, जीवनांतील अवस्थांनुसार, राहाण्याचे ठिकाण व ऋतुनुसार योग्य असे अन्न-पान, योग्य वेळेला शिजवणे, योग्य वेळेला खाणे, आनंदाने खाणे इतकेच नाही तर ते नीट पचवून त्यापासून कोणताही त्रास न होता शरीरास बल, ऊर्जा मिळणे इतके साधले तरच त्या घेतलेल्या अन्न-पानाचा समयोग होय. हा समयोग जाणून घेऊया व निरोगी होण्याचा प्रयत्न करू या, निरोगी राहूया हाच 'आहारयोग' या पानाचा उद्देश.
© वैद्य तनुजा गोखले, पुणे.
tanugokhale@gmail.com
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735
नम्र विनंती - येथे दिली जाणारी माहिती ही आयुर्वेदानुसार योग्य आहाराविषयीची सर्वसामान्य माहिती आहे, ती प्रत्येक व्यक्तिस वा रुग्णास लागू पडेलच असे नाही. येथे वाचून आपल्या रोगावर उपाय करू नयेत वा इतरांना सुचवू नयेत. उपाय करण्यासाठी वैद्यकीय तज्न्यांचा विशेषतः आयुर्वेदीय उपचार करणाऱ्या वैद्यांचा सल्ला घ्यावा ही विनंती.

Visit Our Page