Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, August 31, 2016

अजीर्णाची कारणे

😬 अजीर्णाची कारणे😁

अत्यंबुपानाद्विषमाशनाश्च सन्धारणात्स्वप्नविपर्य्ययाच्च |
काले$पि सात्म्यं लघु चापि भुक्तमन्नं न पाकं भजते नरस्य || वंगसेन

१ अतिअंबुपान -- जेवताना वा इतर वेळी अत्याधिक प्रमाणात जलपान करणे अजीर्ण उत्पतीचे कारण बनते
त्याकरिता खालीलप्रमाणे जलसेवन करावे...

🍀 पाणी पिण्याचा विधी 🍀

अत्यम्बुपानाच्च विपच्यते$न्नं निरम्बुपानाच्च स एव दोषः|
तस्मान्नरो वह्निविवर्द्धनाय मुहुर्मुहु..

फार पाणी प्याले तर अन्न चांगले पचत नाही, तसेच पाणी पिलेच नाही तरी अन्न नीट पचत नाही. त्यामुळेच मनुष्याने
अग्निप्रदीप्ति (भुक वाढीसाठी) करिता थोडे थोडे जलसेवन करावे....

२.विषमाशन --  अकाले बहु चाल्पं वा भुक्तं तु विषमाशनम् |
                      अवेळी , थोड्या प्रमाणात किंवा फार कमी प्रमाणात खाणे होत असल्यास अजीर्ण होऊ शकते.

3. वेगधारण -- मल मुत्राचे वेग आलेले असताना अडवुन ठेवल्याने वात बिघडुन अजीर्ण निर्माण होते.
१३ अधारणिय वेगांचे कधीही धारण करू नये.

४.स्वप्नविपर्यय -- नेहमी रात्री जागरण केल्याने रूक्षता वाढीस लागुन भुक कमी झाल्याने अजीर्ण होऊ शकते.
    रात्री जागरण झाल्यास सकाळी जागरणाच्या निम्मा वेळ जेवनापुर्वी झोपुन घ्यावे.

५. दिवास्वप्नं -- दिवसा जेवनानंतर झोपल्याने कफपित्त वाढुन अजीर्ण निर्माण होते.

वरील कारणांमुळे वेळेवर व हलके अन्न खाणारया लोकांना अजीर्णाचा त्रास होतो.

☘ अजीर्णाची मानसिक कारणे 🍀
ईर्षा, भिती, क्रोध, लोभ, शोक, दैन्य, द्वेष या मानसिक कारणांनी केलेले भोजन व्यवस्थित पचत नाही.

☘नेहमी नेहमी अजीर्णाचे उपद्रव 🍀
मुर्च्छा प्रलापो वमथुः प्रसेकः सदनं भ्रमः| उपद्रवा भवन्त्येते मरणञ्चाप्यजीर्णतः ||

मूर्च्छा, प्रलाप, उलटी, मुखातुन लाळ गळणे, ग्लानि उत्पन्न होणे, चक्कर येणे हे उपद्रव निर्माण होतात. तसेच मरण देखील उपद्रव स्वरूपी येऊ शकते.

अजीर्णात कारणानुरूप केलेली चिकित्सा फलदायी ठरते. एकच उपाय सर्वांना उपयोगी ठरत नाही.
कारणे टाळली तर नेहमी नेहमी अजीर्णाचा त्रास ही होणार नाही.
नेहमी होणारया अजीर्णाकडे होणारे दुर्लक्ष त्रासदायक ठरते काहीवेळा जीवावरही बेतु शकते.. अजीर्णात दुर्लक्ष करू नये हे पक्के लक्षात असावे.

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड
Mob no - 9028562102, 9130497856

Monday, August 29, 2016

गुडघे दुखी

सदाशिव पेठेत राहणाऱ्या या मध्यमवयीन बाई गुडघेदुखीसाठी पहिल्यांदा क्लिनिकमध्ये आल्या त्याला बरोब्बर चार वर्षं झाली.
पाचएक वर्षांपूर्वी त्यांच्या दोन्ही गुडघ्यांमध्ये वेदना सुरू झाल्या.
उठता-बसताना, मांडी घातल्यानंतर, उकीडवे बसून उठताना, जिने चढता-उतरताना तीव्र वेदना होत.
सोबतच दोन्ही बाजूंना कमरेतून कळा येत. सायटिकेचा त्रास होऊ लागला.
पुण्यातल्या नामांकित हॉस्पिटलमधल्या सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञांना दाखविले.
त्यांनी सांगितल्यानुसार काही तपासण्या केल्या. गुडघ्यांच्या एक्स्-रे मध्ये 'ऑस्टिओआर्थ्रायटीस' असल्याचे समजले. गुडघ्याच्या सांध्यांमधली हाडे एकमेकांवर घासत होती. सांध्यातल्या हाडांच्या मधली कूर्चा-कार्टिलेज झिजलेली, हाडांमधे असलेले नैसर्गिक अंतर कमी झालेले. एकूण सगळ्याच हाडांची एकमेकांशी असलेली अलाईनमेंट बिघडलेली.
डॉक्टरांनी सांगितले, "कार्टिलेज झिजलेले आहे, हाडे झिजलेली आहेत. असा संधिवात औषधांनी बरा होत नाही. औषधे देऊन पाहू, पण फरक पडला नाही तर गुडघ्यांच्या सांधे बदलाचे 'नी रिप्लेसमेंट' ऑपरेशन करावे लागेल."
नंतरचे काही दिवस वेदनाशामक औषधे, कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स्, गुडघ्यांचे व्यायाम, वजन घटविण्यासाठी प्रयत्न, सांध्यावर लावण्याची मलमे असे उपचार झाले.औषधे सुरु असेपर्यंत तात्पुरती वेदना कमी होई. पण पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. त्यात औषधांमुळे सतत पित्ताचा त्रास सुरू झाला. 
शेवटी सांधेबदलाचे ऑपरेशन करण्याचे ठरले.
हल्ली पुण्यात या प्रकारची ऑपरेशन्स मोठ्या प्रमाणात होतात. ऑपरेशन करायचा निर्णय होऊनदेखील ऑपरेशनची तारीख मात्र तीन आठवड्यांनंतरची मिळाली.

दरम्यानच्या काळात बाईंनी वर्तमानपत्रात माझा लेख वाचला आणि 'बघुया तर खरं' अश्या विचाराने तपासायला आल्या.
सगळा इतिहास आणि तपासणी करून सिंहनाद, प्रतापलंकेश्वर, रास्नासप्तक, लाक्षादी, गंधर्व, आंघोळीपूर्वी लावण्यासाठी महाविषगर्भ तेल अशी औषधे सुरु केली. सोबत पथ्ये आणि हालचालींचे नियम सांगितले.
१५ दिवसांनंतर वेदना जरा कमी झाल्या. सायटिकेचा त्रास तर जवळजवळ पूर्णपणे कमी झाला.
बाईंना जरा हुशारी आली. आत्मविश्वास वाटू लागला. आणखी काही दिवस आयुर्वेदाचीच औषधे चालू ठेवायची, ऑपरेशनचे नंतर बघू असे त्यांनी ठरविले.

या घटनेला बरोबर चार वर्षे झाली.
या काळात बाईंनी अतिशय नियमितपणे औषधे घेतली..
पहिल्या पंधरा दिवसांत कमी झालेली सायटिकेची वेदना पुन्हा एकदाही उद्भवली नाही.
गेल्या चार वर्षांत दोन वेळा अमेरिकेला मुलीकडे, एकदा युरोपला सहलीला आणि अनेकदा भारतातल्या काही ठिकाणी सहलीला जाऊनही एकदाही वेदनाशामक औषधे घ्यावी लागली नाहीत. रोज दोनेक किलोमीटर चालतात, पुण्यात गाडी चालवतात.
परवा सहज उत्सुकता म्हणून त्यांनी दोन्ही गुडघ्यांचे एक्स्-रे करून घेतले. रिपोर्ट घेऊन त्यांच्या डॉक्टरना भेटायला गेल्या. एक्स्-रे पाहून डॉक्टर म्हणाले, "औषधे देतो. ऑपरेशनची काही गरज नाही." त्यावर बाई म्हणाल्या,"तुम्ही चार वर्षांपूर्वी ऑपरेशन सांगितले होतेत. दरम्यानच्या काळात मी आयुर्वेदाची औषधे घेतली. माझ्या वेदना फार कमी झाल्या आहेत. आता मला बरे वाटते आहे." डॉक्टरना हे फारसे आवडले नसावे. ते म्हणाले,"आयुर्वेदाच्या औषधांनी हे आजार बरे व्हायला लागले, तर त्या माणसाला 'नोबेल' पुरस्कारच द्यावा लागेल्!"

बाई काल क्लिनीकमध्ये आल्या तेव्हा मला त्यांनी हा किस्सा सांगितला.
वास्तविक, संधिगत वात, सायटिका आणि अश्या अनेक वातविकारांवर उत्तम आयुर्वेद उपचार उपलब्ध आहेत, हे सर्वांना माहित आहेच.
काही दिवसांपूर्वीच टाईम्स् ऑफ इंडियाच्या मुलाखतीत प्रतिनिधीशी बोलताना मी म्हटलं होतं, आयुर्वेद आणि ऍलोपॅथी एकत्र आले, तर भारत वैद्यकीय महासत्ता बनू शकेल!"
बाईंचा आजार कमी झाला होता, हे तर खरेच होते!
राहिला प्रश्न 'नोबेल' पुरस्काराचा... वेदना कमी झाल्याने वाढलेल्या आत्मविश्वासानं बाईंच्या जगण्यात ऑपरेशन न करता अमूलाग्र बदल झाला होता.
आयुर्वेदाबद्दलची त्यांची आणि माझीही श्रद्धा कितीतरी वाढली होती.

..अश्या शेकडो रुग्णाच्या समाधानी डोळ्यात माझा 'नोबेल्' पुरस्कार मला केव्हाच मिळाला होता.

Dr. Atul Rakshe
9422034506
पुणे

Sunday, August 28, 2016

माती खाण्यापासुन उत्पन्न होणारे त्रास

माती खाण्यापासुन उत्पन्न होणारे त्रास

विशेषतः स्रियांमध्ये माती खडु  खाण्याची सवय पाहावयास मिळते.
शरीरातील रक्त धातु कमी झाल्यावर माती खडु गेरू खाण्याची इच्छा होते आणि बरयाच स्रिंया व लहान मुले माती खडु खात असतात.
  अशा प्रकारे माती खडु खाण्याची सवय असणारयांच्या शरीरावर काय परिणाम होतो ते पाहणे महत्वाचे आहे.
        कुठल्याही प्रकारचे मातीसेवन शरीरातील रसादी सात धातुंना रूक्ष शुष्क बनवुन खाल्लेल्या पदार्थांसही रूक्ष बनविते. मातीचे पचन न झाल्याने ती शरीरातील स्रोतसांत शिरून त्यास बंद करून पांडुरोग उत्पन्न करते.

पांडु रोगाची सामान्य लक्षणे

शरीरातील रक्त व चरबी कमी होते, शक्ती कमी होते, इंद्रीये शिथिल होतात, अंग ठेचल्यासारखे होते, मन फार कोमल होते, डोळ्याचे कोनाडे सुजतात, राग अत्याधिक येतो, वारंवार थुंकणे, थोडे बोलणे, अन्न व थंड पदार्थ न अावडणे, केस गळणे, भुक मंदावणे, माड्यां गळुन जाणे, ताप, दम लागणे, चक्कर येणे, कानात गुजगुज होणे, श्रमाशिवाय थकवा येणे अश्या प्रकारचे त्रास होतात..
    योग्य शास्रोक्त आयुर्वेदीय उपचार घेतले तर अशा त्रासापासुन मुक्तता मिळु शकते.. नाहीतर कावीळ पासुन ते गाठी पर्यंतचे सर्व आजार उपद्रव स्वरूपी होऊ शकतात.
माती खडु आदी खाण्याची सवय असणारयांनी नजिकच्या चांगल्या वैद्याकडुन तपासणी करून औषधी पथ्यापथ्य पंचकर्मांचा सल्ला अवश्य घ्यावा.

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड

जादूचा डबा......!!!

#सामान्य_आयुर्वेद

जादूचा डबा......!!!

अरे काय झालं? एवढा काय शिंकतोयस? काल दहीहंडी फोडताना भिजला असणार, थांब एकच मिनिट.......
आणि आतून एक डबा येतो. त्यातून एक एक एक स्ट्रिप्स् बाहेर पडतात. सगळ्या अर्धवट फाडलेल्या. कधीतरी आजारी असताना कुठल्यातरी डाॅक्टरने दिलेली औषधं तशीच राहतात. आणि ही औषधं राहतात, नेहमीच, न चुकता.

दिलेली औषधं वेळेत संपवण्याचा कार्यक्रम केला तर अशी औषध रहात नाहीत. पण जरा कुठे बरं वाटायला लागलं की औषध थांबतं आणि त्याला स्टँडबायवर ठेवलं जातं. "वत्सा, तू आता या दिव्य डब्यामधे स्थानापन्न होऊन वाट बघ. म्हणजे येत्या कलियुगामधे जेंव्हा मनुष्यगण पुन्हा रोगग्रस्त होतील तेंव्हा तुझा पुनर्जन्म होईल आणि तू पीडित जनांच्या कामी येऊन तुला मोक्षप्राप्ती होईल." असा वरदान घेऊन त्या गोळ्या हायबरनेट होतात.

मग कुणी कलियुगीन मानव हंडी फोडताना भिजतो आणि गोळ्यांचा मोक्षासाठी डब्यातून पुनर्जन्म होतो.

प्रत्येक घरात एक डबा असतो. त्यात सगळी औषधं असतात. तापावर ही गोळी, खोकल्यावर ते पातळ औषध, सर्दीवर ती कॅप्सूल; आणि बरंच काही.

औषध वेळेत न संपवणे हा एक रोग. 'डाॅक्टर हे औषध कशावर?' या प्रश्नामागचा उद्देश बऱ्याचदा उत्कंठा नसून, पुढे कधी वापरता येईल, असाच असतो.

खोकल्यावर औषध घेतलं जातं, मग सर्दी होते. सर्दीच्या गोळ्या अवतरतात, त्या घेतल्या जातात, सर्दी सुकते; आणि शिंका सुरू होतात. शिंकांची गोळी प्रकटते आणि शिंका थांबवते; आणि ताप येतो. मग तापाच्या गोळ्या मर्त्यलोकी येतात आणि ताप उतरतो. मग थंडी वाजून ताप येतो. अरे बापरे हा काय नवीन प्रकार? अंग एवढं गरम असून सुद्धा थंडी कशी वाजते? याच्यावर काही गोळ्या आहेत का??????........ म्हणून अखंड डब्बा दर्शन होतं. आणि समजतं आपण मोठ्या संकटात अडकलोय. या राक्षसाला मारणारं शस्त्र अापल्याकडे नाहीये.

मग सर्व देवतांनी संकटसमयी भगवान विष्णूंना आठवल्यासारखं आपल्याला भगवान वैद्य आठवतात. मग वैद्य विचारतात, "कुणी सांगितलं होतं या गोळ्या घ्यायला?"
("तुम्हीच," असं हे मनातल्या मनात)

मग काय......वैद्यकाकांचा खर्च वाचवायला जाऊन खर्च वाढतो.

म्हणून योग्य वेळी वैद्यांचा सल्ला घेणे नेहमीच उत्तम. तो सल्ला पाळून सर्व औषधे वेळच्या वेळी संपवणे आणखीनच उत्तम. कारण औषध आणि त्यांचं प्रमाण रुग्णाच्या अवस्थेवरून ठरवूनच दिलेलं असतं. एक्स्ट्रा गोळ्या बॅकपसाठी नसतात, तर त्यामागे वैद्याचा विचार असतो. आपल्याला दिलेलं औषध दुसऱ्याला लागू पडेलच असं नाही. म्हणून आपल्याला दिलेलं औषध आपणच घ्यावं, वैद्याच्या सल्ल्याने, संपूर्ण.....

तुम्ही सांगताय ते एकदम मान्य, पण.........
डबा मात्र आम्ही मेन्टेन करून ठेवणारच, अगदी व्यवस्थित.

[म्हणून प्रिस्क्रिप्शन्स् एवढ्या खतरनाक लिपीमधे लिहिण्याची प्रथा सुरू झाली असावी.]

©वैद्य अमित पाळ.
॥श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद॥
गोमंतक
email- dramitsva@gmail.com

Vaidya Amit Pal

Monday, August 22, 2016

' त्या ' विषयातले 'शास्त्र '

आयुर्वेद कोश ~ ' त्या ' विषयातले 'शास्त्र ' !!

काही दिवसांपूर्वी एक पुस्तक प्रदर्शन पाहायला गेलो होतो . एक मध्यम वयाचा आणि दुसरा तरुण वयाचा मनुष्य संपूर्ण प्रदर्शनाला प्रदक्षिणा करून एका विशिष्ट जागी काही क्षण थांबत होते . सीआयडी , अस्मिता , लहानपणी थरार , तिसरा डोळा अशा सीरिअल आणि 'रॉ , एफ बी आय एजन्ट ' वाले सिनेमे चिक्कार पाहीले असल्याने सतत कोणीतरी आपल्या पाठलागावर आहे असा 'सेन्स ' जागा असतो . त्यामुळे ज्या जागी आपण जाऊ त्या जागेची , तिथल्या माणसांची 'रेकी ' करायची जुनी सवय आहे . स्लीपर सेल मधला एखादा किंवा स्नायपर  टपून बसलाअसेल तर ?? :p असो . . . तर हे दोन व्यक्ती 'त्या ' विशिष्ट जागी जाऊन ,लोकांपासून लपवून काय वाचतात ? हे बघितले तर 'सेक्स ' संदर्भातली काही पुस्तके तिथे होती . . . हि पुस्तके पाहण्याचा 'पेटर्न ' असा की आजूबाजूला कोणी नसताना 5 मिनिट  पुस्तक पाहायचे . .भिरभिरत्या नजरेने इकडे तिकडे पाहायचे . .  गर्दी वाढू लागली की कल्टी मारायची . . गर्दी ओसरली की हजर . .

भारतात सर्वाधिक सुरसकथा कशावर असतील तर त्या सेक्स वर . . मी मुद्दाम सेक्स हा शब्द वापरतोय . याचे कारण सोपे आहे . . काम शास्त्र यात शास्त्र आहे तर सेक्स मध्ये केवळ 'अंधानुकरण ' !! एका वृत्तपत्रात रोज एक सदर 'भारतातील लोक सेक्स याबाबत किती अज्ञानी आहेत ' हे दाखवायला समर्पित असते . त्यातील प्रश्न पाहीले तर फिंगर टीप वर असलेल्या माहितीच्या साठ्यातून (यास सरळ साधा सोपा शब्द मोबाईल ) लोक फक्त मनोरंजन घेतात . भारतात सर्वाधिक सर्च होणारी सेलिब्रिटी . . सनी लिऑन !! हे सर्च करण्यात अत्याधिक वेळ घालवून उरलेला वेळ ते स्टोअर आणि शेअर करण्यात खर्ची घालणारे सेक्स या विषयाबाबत अनेक फँटसि घेऊन फिरत असतात . . .

वृत्तपत्र यातून कसल्या कसल्या 'गोळ्या ' सतत 'ऑन ' राहायचे सल्ले देत असतात . एखाद्या तरुण किंवा तरुणीच्या आयुष्यात 'अजून काहीच नाही ' हा विषय त्या 'सर्कल ' मध्ये थट्टेचा विषय असतो . ज्यांच्या आयुष्यात बरंच काही असतं त्यांना सगळं असूनही असमाधानी आणि अतृप्त फिलिंग असतं . कारण सुखाची व्याख्या जशी आपली आपण शोधायची असते तशी समाधानाची व्याख्या आणि परिपूर्ती आपली आपण ठरवायची असते . ' क्लिप आमचा गुरु ' या भंपक न्यायाने एकतर लिंगाची लांबी , स्लखन होण्यासाठी लागणारे तासंतास , मोठ मोठ्याने ओरडणे वगैरे या सर्वांची गोळाबेरीज म्हणजे 'सेक्स ' अशी समजूत होण्याचे आणि त्यांना जाहिराती इत्यादी यातून खतपाणी घालायचे प्रकार वाढत आहेत .

 लिंग आणि योनी याबाबत 'अभ्यास ' किती लोक करतात ?? आपल्याच शरीरातील एखाद्या अवयवाची माहिती आणि काळजी घेणे यात 'गैर ' काहीच नाही . सेक्स यावर हजारो कोटी मिळवणारी कोणती कंपनी स्त्री -पुरुष यांच्या 'जननेंद्रियांची ' काळजी आणि स्वछता यावर जागृती करण्यास 1 रुपया तरी खर्च करते ?? कोणत्या साईट वर काय 'एक्स्ल्युसिव्ह ' आहे याची 'बित्तमबातमी ' असणाऱ्या किती लोकांनी 'स्मेग्मा ' हा शब्द ऐकला आहे ? त्याची सफाई नाही केली तर काय परिणाम होऊ शकतात याचा शोध घेतला आहे ?? स्त्रियांच्या बाबत सुद्धा हेच . . पाळी सुरु असताना एक पॅड वापरल्याने ट्रेन च्या पायरी पासून ते हिमालयाच्या शिखरापर्यंत सर्व काही 'पादाक्रांत ' करायच्या कोट्यवधी रुपयांच्या  जाहिराती करणारे पाळी नंतर योनी स्वछता कशी करायची यावर किती रुपये खर्च करतात ?? अशी उदाहरणे असंख्य देता येतील या सर्वांचा लसावि एकच . . की आपले शरीर आणि 'तो ' विषय याची 'शास्त्रीय ' माहिती घेण्यात काहीच गैर  नाही !

बरं सेक्स हि काय 'रोज ' करायची गोष्ट आहे का ? जरी केली तरी त्या नंतरचा आहार काय असावा याबाबत कोणी 'जनहित मै ' काही जारी करतं का ?? वर्तमान पत्रातले कात्रण दुकानात नेऊन मी 'त्या ' गोळ्या , ' ते ' तेल आणि 'तो ' स्प्रे आणला पण त्याच्या वापराने 'ती ' समस्या सुटते का ?? आचार्य सुश्रुत ' क्षीण बलीयं   वाजीकरणाम  चिकित्सितं ' असे  सांगतात . आता यातील क्षीण बलीय म्हणजे कोण ? ज्याच्या शुक्राचा नियमित क्षय होत असतो आणि तो भरून काढण्यासाठी काहीच उपाय योजना होत नाही असा तो अशी अगदी सामान्य व्याख्या करणे शक्य आहे .  ' बाल्ये विद्या ग्रहणादीनर्थां  कामं च यौवने स्थविरे धर्मम मोक्षम च ' असे म्हणतात . त्यामुळे 'त्या ' विषयाचा यौवनात उपभोग घेत असताना त्याची पूर्ण आणि शास्त्रीय माहिती घेऊन मगच पुढे जाणे आवश्यक आहे . .

'तो ' विषय म्हणून त्याची शास्त्रीय माहिती न घेणे आणि 'क्लिप माझा गुरु ' या भंपक पणाने  पुढे जात राहणे अनेक व्याधींना निमंत्रण देणारे आहे . . कामशास्त्र किंवा सेक्स यावर मताची ' अश्लील पिंक ' टाकायला जसे आपले वय , शैक्षणिक पात्रता आणि अनुभव याचे बंधन नसते तर त्याची शास्त्रीय माहिती जाणून घ्यायला बंधन कशाला हवे ?? म्हणूनच म्हंटले आज 'त्या ' विषयावर थोडेफार लिहावे . . .वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे

आयुर्वेद कोश(https://web.facebook.com/aarogyakosh/ )

(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)

Wednesday, August 3, 2016

बस्ति व आयुर्वेद

   
                                           बस्ति व आयुर्वेद

बस्ति ही वातदोषांवरील श्रेष्ठ चिकित्सा आहे. जवळपास सर्वारोगांमध्ये हितकर आहे. सध्या पंचकर्म नावाचा जे स्तोम माजवले जात आहे, ते फक्त “Massage” नव्हे तर त्यात बस्ति हे सुद्धा एक कर्म आहे. आयुर्वेदातील “अर्ध चिकित्सा“ असेही आचार्यांनी बस्ति या उपक्रमाला संबोधिले आहे. आणि खरच, तशी ती आहे देखील. कारण ६०-७०% शारीरिक विकार हे वातदोष मुळेच होतात. त्या वातावर काम करणारा उपक्रम म्हणूनच तर बस्तिला “पंचकर्म” मध्ये असाधारण स्थान दिला गेलं आहे. वातदोष वाढल्या मुळे वेगवेगळ्या प्रकारचे अस्थिविकार/संधीविकार उद्भवतात जसे की सांधे दुखणे ( हाताच्या, पायाच्या, कमरेच्या, पाठीच्या, मानेच्या इतर ), हातापायात मुंग्या येणे, सांधे आखडणेे, एवढेच नव्हे तर डोके दुखणे ह्या तक्रारीसाठी पण बस्ति उपयुक्त चिकित्सा ठरते . बस्ति साठी वापरली जाणारी औषधे ही तैल, काढा, दुध, मध, गोमूत्र इतर ह्या स्वरुपात असतात.
बस्ति म्हणजेच “Enema” असे जे म्हटले जाते ते साफ चुकीचे आहे. “Enema” हा बस्तिचा प्रकार आहे अस आपण म्हणु शकतो पण सर्व बस्ति हे त्यात नाही समाविष्ट करू शकत कारण “Enema” मध्ये नेहमी केवळ मलप्रत्यागम/पोट साफ करण्यासाठी गुदामार्गाद्वारे glycerine किंवा Soap Water सारखे द्रव्य दिले जातात तर बस्ति मध्ये गुदमार्ग व्यतिरिक्त मूत्रमार्ग, योनीमार्ग, व्रणातून सुद्धा औषधि द्रव्य प्रविष्ट केली जातात. बस्ति साठी वापरली जाणारी औषधे ही जरी तैल, काढा, दुध, इतर ह्या स्वरुपात असतात. तरीही कोमट तैल हे वातासाठी सर्वश्रेष्ठ आहे.
बस्ति ही लहान बाळ, तरुणपणी आणि वृद्ध ह्या तिन्ही वयोगटांना देता येते. डोळ्यांसाठी पण हितकर आहे.मलशोधन करते. नेहमी बस्ति घेतल्यामुळे तारुण्य टिकून राहते किंवा म्हातारपण लवकर येत नाही, स्वस्थ आयुष्य आणि बल वाढते, शरीराला स्थिरता देते, भूख व स्मरणशक्ती चांगली ठेवते व वाढवते. त्वचेची कांती, आवाज उत्तम करते.
एवढेच नव्हे तर अपत्य होण्यासाठी (गर्भधारणा होत नसेल तर), वजन कमी करण्यासाठी(स्थौल्य) किव्हा वाढवण्यासाठीही बस्तिचा उपयोग होतो. तरीही नवज्वर, अजीर्ण, अग्निमांद्य सारख्या अवस्थेमध्ये बस्ति निषिद्ध आहे व म्हणूनच तज्ञ वैद्यांच्या सल्ला व मार्गदर्शनाशिवाय कोणीही बस्ति चा प्रयोग स्वत: करू नये.
© DrSuraj Patlekar, MS(Ayu)
Shree Vyankatesh Aayurved
Margao, Goa
(लेखक हे योगासनातील तज्ञ तसेच मणक्याचे विकार/ सांधेदुखी अश्या वातांच्या विकारांवरील आयुर्वेदीय उपचार तज्ञ आहेत).

गर्भावस्था व बस्ति चिकित्सा

                                                                    !!! गर्भावस्था व बस्ति चिकित्सा !!!

अपानो अपानगः श्रोणिवस्तिमेढ्रोरुगोचरः शुक्रार्तवशकृन्मूत्रगर्भनिष्क्रमणक्रियः l . . . . अ. हृ. सूत्रस्थान १२/९
      मोठे आतडे (पक्वाशय) हे अपान वायूचे मुख्य स्थान आहे. हा अपान वायु उदराचा खालचा भाग, मूत्राशय (बस्ति) आणि प्रजनन यंत्रणेच्या भागात राहतो. शुक्रनिष्क्रमण, मासिक रजःस्राव, मल वेग प्रवर्तन, मूत्र वेग प्रवर्तन आणि प्रजनन ह्यांचे कार्य सुरळीत ठेवणे हे अपान वायूचे कार्य आहे.
      कोणतेही काम करण्यापूर्वी त्या कामासाठी साठी निवडलेली जागा निर्मळ असावी ह्याबाबत दुमत असणे शक्य नाही. पूजा असो, स्वयंपाक असो वा दुसरे कोणतेही शुभकार्य असो स्वच्छतेला पर्यायच नाही. दिवसाची सुरुवातही मलमूत्र विसर्जन आणि स्नानाने केली जाते. शरीराची स्वच्छता जशी आपण बाहेरून करतो तशीच आतूनही करण्याची गरज असते. पूर्वी घरातील वडील मंडळी सर्व लहानामोठ्यांना आठवड्यातून एकदा ‘एरंडेल तेल’ पिण्याची सक्ती करीत असत. शरीराची आतून स्वच्छता करण्यासाठी ही प्रथा चांगली होती परंतु काळाच्या ओघात लोकांना ह्याचा विसर पडला. मात्र अशी स्वच्छता गर्भावस्थेत करणे योग्य नाही व शक्य नाही म्हणून काही निराळ्या प्रकाराने स्वच्छता करून मगच गर्भधारणेचा विचार करावा. आयुर्वेदात ह्यासाठी पंचकर्म करून देहशुद्धी करण्याचे वर्णन आहे. वमन, विरेचन, बस्ति, नस्य आणि रक्तमोक्षण अशा ५ देहशुद्धीकर क्रियांना एकत्रिपणे ‘पंचकर्म’ म्हणतात. गर्भाधानाचा संकल्प केल्यावर ह्या ५ पैकी किमान बस्ति चिकित्सा तरी स्त्री-पुरुषांनी नक्कीच करून घेतली पाहिजे.
बस्ति म्हणजे काय –
    साध्या शब्दात बस्ति म्हणजे एनिमा. शौच मार्गाने तेल आणि काढे वापरून मोठ्या आतड्याद्वारे करण्याची ही एक चिकित्सा पद्धती आहे. इसवी सन पूर्व १५०० वर्ष इजिप्तच्या वैद्यकीय चिकित्सेत कोलोन लॅव्हेज म्हणजे आतड्यांची स्वच्छता करण्याचे उपाय ताडपत्रांवर लिखित आहे. ह्यामध्ये फक्त पाण्याचा वापर केला जात असे. आयुर्वेद शास्त्र त्याहीपेक्षा पुरातन आहे आणि त्यात बस्ति चिकित्सेचा उल्लेख पंचकर्म विषयात आढळतो. त्यात तेल, तूप, मध, काढे, गोमूत्र अशी अनेक प्रकारची द्रव्ये वापरली जातात.
     आयुर्वेदाने शरीराचे ढोबळ मानाने तीन हिस्से केले आहेत. डोक्यापासून हृदयापर्यंत कफाचा, हृदयापासून बेंबी (नाभी) पर्यंत पित्ताचा आणि बेंबीच्या खालचा वाताचा. गर्भाचे वास्तव्य शरीराच्या खालच्या भागात (वाताच्या) असल्याने तेथे स्वच्छता आणि स्निग्धता असणे गर्भवाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.
आयुर्वेदाने वाताच्या चिकित्सेत बस्ति चिकित्सेचे महत्व श्लोकरूपाने दिले आहे.
तस्यातिंवृद्धस्य शमाय नान्यद्वस्तेर्विना भेषजमस्ति किञ्चित् l
तस्माश्चिकित्सार्द्ध इति प्रदिष्टः कृत्स्ना चिकित्सा अपि च बस्तिरेकैः ll अ. हृ. सूत्रस्थान १९/८७
अतिप्रमाणात वाढलेल्या वाताला नियंत्रणात ठेवण्यासाठी बस्ति पेक्षा दुसरी कोणतीही चिकित्सा श्रेष्ठ नाही, अर्थात बस्ति हीच सर्वश्रेष्ठ चिकित्सा आहे.
स्त्री व पुरुषाने गर्भधारणेपूर्वी ही चिकित्सा करणे अत्यंत आवश्यक आहे किंबहुना बस्ति चिकित्सा केल्याशिवाय गर्भधारणा होऊ देणे म्हणजे कोणतीही पूर्वतयारी न करता लांबच्या प्रवासाला जाण्यासारखे आहे.
पुरुषांमध्ये बस्तिचे महत्व -
       पुरूषबीज (शुक्र) निर्मिती वृषणात होते. त्याठिकाणी तयार झालेले शुक्र उदराच्या खालच्या भागात असलेल्या इंगॉयनल कॅनलच्या मार्गे शिस्नातून बाहेर पडते. ह्या कॅनलवर अख्ख्या उदराचा दाब पडतो. त्यामुळे उदरातील रचना जेवढ्या हलक्याफुलक्या असतील तेवढे ह्याचे वहन कार्य सुलभ होते. बरेचदा शुक्र तपासणी केल्यावर शुक्राणूंची संख्या कमी असल्याचे निदर्शनास येते. अशावेळी फक्त बस्ति चिकित्सा करून पुन्हा तपासणी केल्यास ही संख्या वाढल्याचे दिसते. बस्तिमुळे आतड्यातील मळाचे खडे, साठलेला वायु बाहेर पडून जातो आणि इंगॉयनल कॅनलवरचा दाब हटतो. नळाला रबरी पाईप लावून नाल सोडला पण पाईपवर कोणी पाय ठेऊन उभा राहिला तर पाईपमधून पाणी बाहेर पडणार नाही व पाय हटवला की ताबडतोब पाणी येऊ लागते तसाच हा प्रकार आहे. वैद्यांनी बस्ति सुचवल्या बरोबर रुग्ण म्हणतात “आम्हाला दररोज शौचाला साफ होते, मग ही भानगड कशाला?” त्याचे उत्तर – “घरी रोज दैनंदिन साफसफाई आपण करतोच तरीही सणासुदीच्या वेळी कपाटे, पलंग किंवा इतर फर्निचर बाजूला केल्यावर लक्षात येते की त्यामागे किती मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. शरीरातही असाच कचरा साठतो आणि त्याचा दाब इंगॉयनल कॅनलवर पडून शुक्रवहनात अडथळा होतो. शिवाय हा दाब शुक्रजनन यंत्रणेला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्त वाहिन्यांवरही पडतो. त्यामुळे त्या भागांना प्राणवायूची कमतरता होते. परिणामी त्यांचे शुक्रजननाचे कार्य खालावते. झोपेत हातावर उशीचा किंवा शरीराच्या इतर भागाचा दाब पडल्यामुळे हाताला मुंग्या येतात, बधिरता येते व त्याची हालचाल जवळजवळ बंद पडण्याची वेळ येते. दाब नाहीसा झाल्यावर परत रक्तपुरवठा सुरळीत होऊन त्याचे कार्य पूर्ववत सुरु होते. तसाच हा प्रकार आहे. बस्ति द्रव्यांमध्ये तेल, तूप, वनस्पतींचे काढे इत्यादींचा वापर धातुपोषणासाठी होतो आणि संपूर्ण प्रजनन यंत्रणेचे उत्तम प्रकारे सर्व्हिसिंग होते.
स्त्रियांमध्ये बस्तिचे महत्व -
        स्त्री शरीरामध्ये बस्तिचे कार्य अधिक व्यापक स्वरूपाचे असते कारण गर्भाच्या संपूर्ण वाढीची जबाबदारी तिच्या स्वास्थ्यावरच अवलंबून असते. पुरुषांमध्ये प्रजनन यंत्रणेच्या सर्व्हिसिंग साठी जसा बस्तिचा उपयोग होतो तंतोतंत तसाच उपयोग स्त्री शरीरातही होतो. बीजकोष, बीजवाहिन्या, गर्भाशय ह्या भागांवरील दाब आणि त्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांवरील दाब हटतो. परिणामी त्यांचे कार्य निर्विघ्नपणे सुरु होते. गर्भधारणा झाल्यावर गर्भाशयाचा आकार हळूहळू वाढू लागतो. बाजूचा दाब हटल्यामुळे गर्भाशयाचा विस्तार होण्यास पुरेशी जागा उपलब्ध होते. अशी जागा उपलब्ध न झाल्यास गर्भाची वाढ होण्यात बाधा येऊ शकते. गर्भाधानापूर्वी ही चिकित्सा केल्याने गर्भवाढीमध्ये अडथळा येत नाही.
गर्भधारणेनंतर -
      गर्भधारणेनंतर आठव्या महिन्यापर्यंत पंचकर्मातील कोणताही उपक्रम करू नये. गर्भधारणेपूर्वी केलल्या देहशुद्धीचा सुपरिणाम आठव्या महिन्यापर्यंत टिकून राहतो. शास्त्रादेशानुसार आहार-विहाराकडे लक्ष केंद्रित करावे जेणेकरून गर्भपोषण योग्यप्रकारे होत राहील.
आठव्या महिन्यात बस्ति महत्व -
      आठव्या महिन्यापासून गर्भाचे आकारमान जास्त वाढते म्हणून आयुर्वेदात आठव्या महिन्यात पुन्हा खालील औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेले बस्ति देण्यास सुचविले आहे.
शुष्कमूलककोलाम्लकषायेण प्रशस्यते । शताह्वाकल्कितो वस्तिः सतैलघृतसैन्धवः । . . . . अ.हृ. शारीर १/६५
अष्टमे बदरोदकेन बलातिबलाशतपुष्पापललपयोदधिमस्तुतैललवणमदनफलमधुघृतमिश्रेणास्थापयेत् पुराणपुरीषशुद्ध्यर्थमनुलोमनार्थं च वायोः, ततः पयोमधुरकषायसिद्धेन तैलेनानुवासयेत्, अनुलोमे हि वायौ सुखं प्रसूयते निरुपद्रवा च भवति, अत ऊर्ध्वं स्निग्धाभिर्यवागूभिर्जाङ्गलरसैश्चोपक्रमेदाप्रसवकालात्; एवमुपक्रान्ता स्निग्धा बलवती सुखमनुपद्रवा प्रसूयते | . . . . संदर्भ: सुश्रुत संहिता, शारीर १०/४
      आठव्या महिन्यात ओज अस्थिर असते. अशा वेळी गर्भस्थैर्यासाठी विशिष्ट द्रव्यांनी सिद्ध असा निरूह बस्ति प्रयोग ग्रंथात नमूद आहे. अष्टांगहृदयकारांनी ह्यामध्ये शुष्क मुळा, आंबट बोरे, बडीशेप, तिळ तेल, तूप व सैंधव ह्या द्रव्यांचा अंतर्भाव केला आहे. सुश्रुत संहितेत बोरे, बला, अतिबला, बडीशेप, मांसरस, दुध, दह्याची निवळ, तेल, मीठ, गेळफळ, मध व तूप असा पाठ सांगितला आहे. निरुह बस्ति मुळे आतडी स्वच्छ होतात, त्यानंतर "सुप्रसव पिचु तेलाचा" अनुवासन बस्तिही घेणे आवश्यक आहे. ह्यामुळे प्रसुती अतिशय सहज व सुलभ होते. ह्या औषधी द्रव्यांचा नेमका लाभ कसा होतो हे आजच्या घडीला सांगणे कठीण आहे. सूज्ञ आणि जाणकार मंडळींनी “अप्तोपदेश” समजून ह्या चिकित्सांचा अनुभव घ्यावा. अनेक वैद्यक व्यावसायिकांनी ह्या बस्तिचा प्रयोग आपल्या रुग्णांवर करून त्यापासून होणारे लाभ प्रत्यक्ष पाहिले आहेत. आयुर्वेदीय औषधे आणि चिकित्साक्रम निर्धोक असतात असे सर्वमान्य असले तरीही वैद्यांच्या सल्ल्याशिवाय केवळ वाचून किंवा ऐकून बस्तिप्रयोग करणे योग्य नाही हे कायम लक्षात ठेवावे.

लेखक
वैद्य संतोष जळूकर
संचालक – अक्षय फार्मा रेमेडीज, मुंबई
+917208777773
drjalukar@akshaypharma.com

नेत्रविकार हेतु (भाग १)

                                                  !!! नेत्रविकार हेतु (भाग १) !!!

हेतु म्हणजे कारण –
डोळ्याच्या विकारांचे कारणांपैकी “उष्णाभितप्तस्य जलप्रवेशात्” हे एक कारण आहे. या कारणाचा अर्थ – उन्हाने किंवा उष्णतेने सर्वतः गरम झाल्यानंतर थंड पाण्यात प्रवेश केला किंवा थंड पाण्याचा उपयोग उष्णता निवारणासाठी शरीरावर केला तर नेत्रविकार होण्याची शक्यता असते. (जसे तंबाखू हे कर्करोगाचे कारण समजले जाते पण तंबाखू सेवन करणाऱ्याला किंवा धुम्रपान करणाऱ्याला कर्करोग होईलच असे नाही.) या कारणाचे २ भाग आहेत. ‘उष्णाभितप्त’ आणि ‘शीत जल उपयोग’. निरनिराळ्या कारणांसाठी सर्वांनाच उन्हात वारंवार जावे लागते. प्रत्यक्ष उन्हात जावे लागले नाही तरी उष्णतेने शरीर गरम होईल अशी अनेक कारणे घडतात. जसे घरी किंवा हॉटेलमध्ये नोकरी निमित्त भट्टी, गरम वारा, वाफ वा प्रत्यक्ष अग्नीचा संपर्क होणे. शेती, बांधकाम मजुरी, स्वयंपाकी इ. वातानुकूलित वातावरणातून बाहेर जाणे – येणे अशा सातत्याने होणाऱ्या घटना दैनंदिन जीवनात सतत होत असतात. त्यांचा परिणाम डोळे, नाक, घसा, कान, त्वचा ह्यांवर होत असतो. ‘अभि’ या उपसर्गाचा अर्थ – कडे, जवळ, प्रत्यक्ष, वरून किंवा सर्वबाजूंनी असे होतात. ह्यातील कडे शब्दाने पायास, विशेषतः तळपायास अधिक उष्णता लागली तर डोळे आणि डोक्याकडे त्याचा परिणाम होतो. तळपायाची आग मस्तकात जाणे हा वाक्प्रचार असला तरी शास्त्रीय पठडीवर आधारित आहे.
“द्वे पादमध्ये पृथुसन्निवेशे सिरे गते ते बहुधा च नेत्रे। ताम्रङ्क्षणोद्वर्तनलेपनादीन् पादप्रयुक्तान् नयनं नयन्ति॥ . . . . अष्टांगसंग्रह, उत्तरस्थान १६/६६
डोळ्याजवळ आणि प्रत्यक्ष या दोन्हीचा परिणाम प्रत्येकाच्या अनुभवाचा आहे.
वरून म्हणजे डोक्यावरून सूर्याचे ऊन किंवा गरम पाण्याने वारंवार डोक्यावरून स्नान करणे. गरम पाण्याने स्नान केल्याने चक्षुरेंन्द्रियाची शक्ती कमी होते असे दिनचर्येत स्पष्ट सांगितले आहे. “उष्णाम्बुना अध: कायस्य परिषेक: बलावह:। तेन एव तु उत्तम-अङ्गस्य बलहृत् केश-चक्षुषाम् l”
शेवटचा अर्थ ‘सर्व बाजूंनी’ – सर्व बाजूंनी उष्णतेचा परिणाम, ह्यात ‘त्वचा’ म्हणजेच सर्व शरीरावर आवरण असलेल्या स्पर्शनेन्द्रियाचा समावेश होतो. ह्याचा डोळ्यांशी फारच जवळचा संबंध आहे. अभ्यंगाने त्वचेचे आणि डोळ्यांचे स्वास्थ्य (दृष्टिप्रसाद) उत्तम राहते. त्वचेचे विकार डोळ्यांना अधिक त्रास देणारे असतात. उदा. कुष्ठ, श्वित्र, देवी, अतिसार (डीहायड्रेशन होऊन त्वचेवर सुरकुत्या) असे विकार डोळ्यांचे तेज घालवितात. शिवाय गर्भजनन शास्त्रानुसार (Embriyology), डोळ्यातील लेन्स, काही ग्रंथी, कॉर्नियाचा स्तर (कृष्ण / तेजोमंडल), वर्त्मांची त्वचा इ. primitive ectoderm पासून झाली आहे असे आधुनिक वैद्यकशास्त्र म्हणते. त्वचेत भरपूर पाणी असते त्याचप्रमाणे लेन्स मध्येही ६०.६५% पाणी असते. त्वचेला होणारा उष्णतेचा त्रास डोळ्यांपर्यंत पोचतो हे लक्षात येण्यासाठी सध्या एवढेच स्पष्टीकरण पुरे. ह्यात कंडक्शन, कन्व्हेक्शन व रेडिएशन द्वारा त्वचा आणि डोळ्यांवर परिणाम होतो. उष्णतेचे सर्वसामान्य श्रुत आणि दृश्य परिणाम म्हणजे उष्णता, लाली, दाह, स्रोतसांच्या सिरामुखाचा विस्फार होणे. Heat expands & cold contracts हे पदार्थ विज्ञानाचे तत्त्व सर्वत्र लागू आहे.
जल प्रवेशात – उष्णतेने शरीर इंद्रिये तप्त झाली म्हणजे पित्त वाढते आणि रक्तदुष्टी होण्यास मदत होते. श्वासामार्गे फुप्फुसात जाणारी गरम हवा रक्तात गरमपणा (पित्त) वाढविते आणि हा त्रास कमी व्हावा म्हणून बहुतेक सर्वजण बाहेरून आल्यावर थंड किंवा साध्या पाण्याने चेहरा आणि हातपाय धुतात, गळ्यापर्यंत व बगलेतही थंड पाण्याचा हात लावतात. टॉवेलने पुसून नंतर थंड पाणी पितात. म्हणूनच बाहेरहून आलेल्या पाव्हण्याला प्रथम पाणी देण्याची आपल्याकडे प्रथा आहे. ह्याला अपवाद क्वचितच आढळतो. एकूण काय तर उन्हातून आल्यावर थंड उपचार त्वरित केले जातात व हे केल्याने बरे वाटते, थकवा कमी होतो, मन प्रसन्न होते. “ल्हादनं जीवनं स्तंभं प्रासादं रक्तपित्तयोः” ही लक्षणे जाणवतात आणि म्हणून प्रायः सर्वत्र असे केले जाते.
बरे वाटते पण बरे आहे का?
बरे वाटणे बरे असतेच असे नाही, या बद्दल सूज्ञ वाचकांना अनेक गोष्टी माहीत असतीलच. उन्हाने तापल्यास शीतोपचार ही स्वाभाविक चिकित्सा आहे पण चिकित्सा केव्हां आणि कशी करावी हा मुद्दाही विचार करण्याचा आहे. उदा. ज्वरात काल हे औषध म्हणजे ‘काहीही औषध न घेता थोडी वाट पाहणे’. हा देखील एक उपचार आहे ना? प्रसूतीच्या वेळी अवींचा त्रास होतो पण योनिमुखाचा विस्तार होण्याची वाट पाहतात ना? अतिसारातही त्वरित रोकण्यासाठी उपचार करीत नाहीत. थोडक्यात ‘उष्णाभिताप्तस्य जल प्रवेश केव्हा करावा हे लक्षात घेतले पाहिजे.
उष्णाभितप्तस्य जल प्रवेश हा हेतु आणखीन कुठे आहे असा विचार केला तर ‘कुष्ठ विकाराकडे बोट दाखविता येईल. कुष्ठ हा त्वचेचा विकार आहे. त्वचा आणि नेत्राबद्दल नुकतेच विवेचन केले आहे, ते वाटल्यास पुन्हा वाचून विचार करा. ऊन थंड या विषयाचा उल्लेख शल्यतंत्रातील ‘पायना’ मध्ये झाला आहे. शास्त्राची धार तीक्ष्ण राहावी व ति तशीच टिकावी यासाठी शस्त्र चांगले तापवून लगेच थंड पाण्यात टाकले जाते. त्यामुळे धातूला कडकपणा त्येतो आणि त्याची धार अधिक काळ टिकते. आपल्या विळ्याची धार कडक – टिकावू होण्यासाठी शेतकरी आपला विळा लोहाराकडे देतो. लोहार घासून धार काढतो आणि तापवून त्याला पाणी देतो. अर्थात पायना क्रियेने धातूतील नरम आणि लवचिकपणा जाऊन कडकपणा आणि ठिसूळपणा येतो. तशीच क्रिया शरीरातल्या नेत्रावयवांवरही घडते. डोळ्यातील जे भाग त्वक जातीचे (Ectodermal) आहेत ते कडक होऊन त्यांचा लवचिकपणा जातो शिवाय ताण घेण्याची शक्ती कमी होते. दूरचे – जवळचे पाहण्यासाठी लेन्सची आणि त्यावर नियंत्रण करणाऱ्या स्नायूंची accomodation करण्याची क्षमता खालावते. गरम काचेवर पाणी टाकल्यास काच फुटते त्याचप्रमाणे उपरोक्त कारणांमुळे गरम झालले धातुघटक सतत गरम थंड असा हेतु होत राहिल्याने डोळ्यातील नाजुक आणि संवेदनशील भागांवर व्रण निर्माण होतात, ठिसूळपणा येतो व परिणामी दृष्टिदोष होतात.
एकदा गरम एकदा थंड –
असे लक्षण आणि चिकित्सा यांचाही विचार करावा असे मला वाटते. वैद्यकातील सान्निपातिक व्याधीकडे पहा.
ज्वर : सान्निपातिक ज्वरात क्षणे दाहः क्षणे शीतः असे लक्षण असते. चिकित्सेतही गरम वाटता थंड उपचार आणि थंड वाटता गरम उपचार करावा लागतो. बालकाला जन्मानंतर श्वसनात काही त्रास असेल तर अंगावर गरम व थंड पाणी आलटून पालटून टाकतात. उष्णतेने प्रसरण व थंडीने संकोच होतो. परिणामी जीवलक्षण प्राप्त होण्यासाठी ही चिकित्सा फलदायी होते. उष्णतेने वायु प्रसरण पावतो व पुढे जाऊन स्रोतोरोध नष्ट करतो. थंडीने पुन्हा संकोच पावून विरुद्ध गती मिळते. अशी पुढे – मागे गती झाल्याने श्वासोच्छवास सुरु होतो. कित्येकवेळा अनेक उपचार केलेले रोगी हे निसर्गोपचारकाचे थंड – गरम (व्यत्यास) चिकित्सेने बरे होतात. ह्या तत्त्वाचा अवलंब करून काही बरे न होणारे नेत्ररोग औषधांच्या जोडीला युक्तिपूर्वक योजना करून चिकित्सा करता येईल. पण नेहमी उन्हातून आल्यावर किंवा भट्टीकाम करून आल्यावर त्वरित थंडगार पाण्याचा वापर हा टाळला पाहिजे. आत्यायिक अवस्थेत अशी चिकित्सा करणे आवश्यक असले तरी सतत केल्याने डोळे, कान, नाक, त्वचा अशा इंद्रियांना नक्कीच हानिकारक ठरू शकते. हे टाळण्यासाठी गरम आणि थंड चिकित्सेत किमान १० मिनिटांचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. एकदम माठातील किंवा फ्रीजचे पाणी, थंडपेय किंवा आईसक्रीम घेणे योग्य नाही हे ध्यानात ठेवावे. पुरेसा वेळ (अॅक्लमटायझेशन) देऊन नंतर स्नान केले तरी हरकत नाही. सिरा कडक होणे ह्या क्रियेला आधुनिक वैद्यकात स्क्लेरोसिस म्हणतात. यामुळे डोळ्यातील सिरा व सिराघटित अवयव यांतील कडकपणा वाढून रक्तदाब वाढतो व रक्तस्रावाची पार्श्वभूमी तयार होते. एकंदरीत मानेच्या वरच्या भागांतील रोगांना आमंत्रण दिल्यासारखे होईल. पूर्वी चुलीवरून तवा उतरवल्यावर तो इतर भांड्यांपासून लांब ठेवण्याची पद्धत होती. तो थंड झाल्यावर एकत्र ठेवला जात असे. तापलेल्या तव्यावर पाणी पडले तर तो लवकर फुटतो. अशा प्रकारची ओढाताण डोळ्यांना सहन होणे शक्य नाही. आधीच आहार, विहार आणि निरनिराळी औषधे डोळ्यांमध्ये ख वैगुण्य तयार करतातच त्यातून ही गरम – थंड ची भर पडली तर दोषवैषम्य होण्यास वेळ लागणार नाही.
आपले पूर्वज खरे आप्त होते. त्यांनी दिलेल्या सल्ल्याला आजच्या वैद्यकात पुरावा मिळो न मिळो, पण अंधश्रद्धा म्हणून का होईना, तो पाळला तर आपल्याला स्वास्थ्य उत्तम राखण्यास नक्कीच फायदा होईल. “आयुर्वेदोपदेशेषु विधेयः परमादरः ॥


वैद्य श्रीनिवास जळूकर
माजी अधिष्ठाता, पोदार वैद्यक महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई
+919969106404
shriniwasjalukar@gmail.com

Visit Our Page