Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, August 3, 2016

नेत्रविकार हेतु (भाग १)

                                                  !!! नेत्रविकार हेतु (भाग १) !!!

हेतु म्हणजे कारण –
डोळ्याच्या विकारांचे कारणांपैकी “उष्णाभितप्तस्य जलप्रवेशात्” हे एक कारण आहे. या कारणाचा अर्थ – उन्हाने किंवा उष्णतेने सर्वतः गरम झाल्यानंतर थंड पाण्यात प्रवेश केला किंवा थंड पाण्याचा उपयोग उष्णता निवारणासाठी शरीरावर केला तर नेत्रविकार होण्याची शक्यता असते. (जसे तंबाखू हे कर्करोगाचे कारण समजले जाते पण तंबाखू सेवन करणाऱ्याला किंवा धुम्रपान करणाऱ्याला कर्करोग होईलच असे नाही.) या कारणाचे २ भाग आहेत. ‘उष्णाभितप्त’ आणि ‘शीत जल उपयोग’. निरनिराळ्या कारणांसाठी सर्वांनाच उन्हात वारंवार जावे लागते. प्रत्यक्ष उन्हात जावे लागले नाही तरी उष्णतेने शरीर गरम होईल अशी अनेक कारणे घडतात. जसे घरी किंवा हॉटेलमध्ये नोकरी निमित्त भट्टी, गरम वारा, वाफ वा प्रत्यक्ष अग्नीचा संपर्क होणे. शेती, बांधकाम मजुरी, स्वयंपाकी इ. वातानुकूलित वातावरणातून बाहेर जाणे – येणे अशा सातत्याने होणाऱ्या घटना दैनंदिन जीवनात सतत होत असतात. त्यांचा परिणाम डोळे, नाक, घसा, कान, त्वचा ह्यांवर होत असतो. ‘अभि’ या उपसर्गाचा अर्थ – कडे, जवळ, प्रत्यक्ष, वरून किंवा सर्वबाजूंनी असे होतात. ह्यातील कडे शब्दाने पायास, विशेषतः तळपायास अधिक उष्णता लागली तर डोळे आणि डोक्याकडे त्याचा परिणाम होतो. तळपायाची आग मस्तकात जाणे हा वाक्प्रचार असला तरी शास्त्रीय पठडीवर आधारित आहे.
“द्वे पादमध्ये पृथुसन्निवेशे सिरे गते ते बहुधा च नेत्रे। ताम्रङ्क्षणोद्वर्तनलेपनादीन् पादप्रयुक्तान् नयनं नयन्ति॥ . . . . अष्टांगसंग्रह, उत्तरस्थान १६/६६
डोळ्याजवळ आणि प्रत्यक्ष या दोन्हीचा परिणाम प्रत्येकाच्या अनुभवाचा आहे.
वरून म्हणजे डोक्यावरून सूर्याचे ऊन किंवा गरम पाण्याने वारंवार डोक्यावरून स्नान करणे. गरम पाण्याने स्नान केल्याने चक्षुरेंन्द्रियाची शक्ती कमी होते असे दिनचर्येत स्पष्ट सांगितले आहे. “उष्णाम्बुना अध: कायस्य परिषेक: बलावह:। तेन एव तु उत्तम-अङ्गस्य बलहृत् केश-चक्षुषाम् l”
शेवटचा अर्थ ‘सर्व बाजूंनी’ – सर्व बाजूंनी उष्णतेचा परिणाम, ह्यात ‘त्वचा’ म्हणजेच सर्व शरीरावर आवरण असलेल्या स्पर्शनेन्द्रियाचा समावेश होतो. ह्याचा डोळ्यांशी फारच जवळचा संबंध आहे. अभ्यंगाने त्वचेचे आणि डोळ्यांचे स्वास्थ्य (दृष्टिप्रसाद) उत्तम राहते. त्वचेचे विकार डोळ्यांना अधिक त्रास देणारे असतात. उदा. कुष्ठ, श्वित्र, देवी, अतिसार (डीहायड्रेशन होऊन त्वचेवर सुरकुत्या) असे विकार डोळ्यांचे तेज घालवितात. शिवाय गर्भजनन शास्त्रानुसार (Embriyology), डोळ्यातील लेन्स, काही ग्रंथी, कॉर्नियाचा स्तर (कृष्ण / तेजोमंडल), वर्त्मांची त्वचा इ. primitive ectoderm पासून झाली आहे असे आधुनिक वैद्यकशास्त्र म्हणते. त्वचेत भरपूर पाणी असते त्याचप्रमाणे लेन्स मध्येही ६०.६५% पाणी असते. त्वचेला होणारा उष्णतेचा त्रास डोळ्यांपर्यंत पोचतो हे लक्षात येण्यासाठी सध्या एवढेच स्पष्टीकरण पुरे. ह्यात कंडक्शन, कन्व्हेक्शन व रेडिएशन द्वारा त्वचा आणि डोळ्यांवर परिणाम होतो. उष्णतेचे सर्वसामान्य श्रुत आणि दृश्य परिणाम म्हणजे उष्णता, लाली, दाह, स्रोतसांच्या सिरामुखाचा विस्फार होणे. Heat expands & cold contracts हे पदार्थ विज्ञानाचे तत्त्व सर्वत्र लागू आहे.
जल प्रवेशात – उष्णतेने शरीर इंद्रिये तप्त झाली म्हणजे पित्त वाढते आणि रक्तदुष्टी होण्यास मदत होते. श्वासामार्गे फुप्फुसात जाणारी गरम हवा रक्तात गरमपणा (पित्त) वाढविते आणि हा त्रास कमी व्हावा म्हणून बहुतेक सर्वजण बाहेरून आल्यावर थंड किंवा साध्या पाण्याने चेहरा आणि हातपाय धुतात, गळ्यापर्यंत व बगलेतही थंड पाण्याचा हात लावतात. टॉवेलने पुसून नंतर थंड पाणी पितात. म्हणूनच बाहेरहून आलेल्या पाव्हण्याला प्रथम पाणी देण्याची आपल्याकडे प्रथा आहे. ह्याला अपवाद क्वचितच आढळतो. एकूण काय तर उन्हातून आल्यावर थंड उपचार त्वरित केले जातात व हे केल्याने बरे वाटते, थकवा कमी होतो, मन प्रसन्न होते. “ल्हादनं जीवनं स्तंभं प्रासादं रक्तपित्तयोः” ही लक्षणे जाणवतात आणि म्हणून प्रायः सर्वत्र असे केले जाते.
बरे वाटते पण बरे आहे का?
बरे वाटणे बरे असतेच असे नाही, या बद्दल सूज्ञ वाचकांना अनेक गोष्टी माहीत असतीलच. उन्हाने तापल्यास शीतोपचार ही स्वाभाविक चिकित्सा आहे पण चिकित्सा केव्हां आणि कशी करावी हा मुद्दाही विचार करण्याचा आहे. उदा. ज्वरात काल हे औषध म्हणजे ‘काहीही औषध न घेता थोडी वाट पाहणे’. हा देखील एक उपचार आहे ना? प्रसूतीच्या वेळी अवींचा त्रास होतो पण योनिमुखाचा विस्तार होण्याची वाट पाहतात ना? अतिसारातही त्वरित रोकण्यासाठी उपचार करीत नाहीत. थोडक्यात ‘उष्णाभिताप्तस्य जल प्रवेश केव्हा करावा हे लक्षात घेतले पाहिजे.
उष्णाभितप्तस्य जल प्रवेश हा हेतु आणखीन कुठे आहे असा विचार केला तर ‘कुष्ठ विकाराकडे बोट दाखविता येईल. कुष्ठ हा त्वचेचा विकार आहे. त्वचा आणि नेत्राबद्दल नुकतेच विवेचन केले आहे, ते वाटल्यास पुन्हा वाचून विचार करा. ऊन थंड या विषयाचा उल्लेख शल्यतंत्रातील ‘पायना’ मध्ये झाला आहे. शास्त्राची धार तीक्ष्ण राहावी व ति तशीच टिकावी यासाठी शस्त्र चांगले तापवून लगेच थंड पाण्यात टाकले जाते. त्यामुळे धातूला कडकपणा त्येतो आणि त्याची धार अधिक काळ टिकते. आपल्या विळ्याची धार कडक – टिकावू होण्यासाठी शेतकरी आपला विळा लोहाराकडे देतो. लोहार घासून धार काढतो आणि तापवून त्याला पाणी देतो. अर्थात पायना क्रियेने धातूतील नरम आणि लवचिकपणा जाऊन कडकपणा आणि ठिसूळपणा येतो. तशीच क्रिया शरीरातल्या नेत्रावयवांवरही घडते. डोळ्यातील जे भाग त्वक जातीचे (Ectodermal) आहेत ते कडक होऊन त्यांचा लवचिकपणा जातो शिवाय ताण घेण्याची शक्ती कमी होते. दूरचे – जवळचे पाहण्यासाठी लेन्सची आणि त्यावर नियंत्रण करणाऱ्या स्नायूंची accomodation करण्याची क्षमता खालावते. गरम काचेवर पाणी टाकल्यास काच फुटते त्याचप्रमाणे उपरोक्त कारणांमुळे गरम झालले धातुघटक सतत गरम थंड असा हेतु होत राहिल्याने डोळ्यातील नाजुक आणि संवेदनशील भागांवर व्रण निर्माण होतात, ठिसूळपणा येतो व परिणामी दृष्टिदोष होतात.
एकदा गरम एकदा थंड –
असे लक्षण आणि चिकित्सा यांचाही विचार करावा असे मला वाटते. वैद्यकातील सान्निपातिक व्याधीकडे पहा.
ज्वर : सान्निपातिक ज्वरात क्षणे दाहः क्षणे शीतः असे लक्षण असते. चिकित्सेतही गरम वाटता थंड उपचार आणि थंड वाटता गरम उपचार करावा लागतो. बालकाला जन्मानंतर श्वसनात काही त्रास असेल तर अंगावर गरम व थंड पाणी आलटून पालटून टाकतात. उष्णतेने प्रसरण व थंडीने संकोच होतो. परिणामी जीवलक्षण प्राप्त होण्यासाठी ही चिकित्सा फलदायी होते. उष्णतेने वायु प्रसरण पावतो व पुढे जाऊन स्रोतोरोध नष्ट करतो. थंडीने पुन्हा संकोच पावून विरुद्ध गती मिळते. अशी पुढे – मागे गती झाल्याने श्वासोच्छवास सुरु होतो. कित्येकवेळा अनेक उपचार केलेले रोगी हे निसर्गोपचारकाचे थंड – गरम (व्यत्यास) चिकित्सेने बरे होतात. ह्या तत्त्वाचा अवलंब करून काही बरे न होणारे नेत्ररोग औषधांच्या जोडीला युक्तिपूर्वक योजना करून चिकित्सा करता येईल. पण नेहमी उन्हातून आल्यावर किंवा भट्टीकाम करून आल्यावर त्वरित थंडगार पाण्याचा वापर हा टाळला पाहिजे. आत्यायिक अवस्थेत अशी चिकित्सा करणे आवश्यक असले तरी सतत केल्याने डोळे, कान, नाक, त्वचा अशा इंद्रियांना नक्कीच हानिकारक ठरू शकते. हे टाळण्यासाठी गरम आणि थंड चिकित्सेत किमान १० मिनिटांचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. एकदम माठातील किंवा फ्रीजचे पाणी, थंडपेय किंवा आईसक्रीम घेणे योग्य नाही हे ध्यानात ठेवावे. पुरेसा वेळ (अॅक्लमटायझेशन) देऊन नंतर स्नान केले तरी हरकत नाही. सिरा कडक होणे ह्या क्रियेला आधुनिक वैद्यकात स्क्लेरोसिस म्हणतात. यामुळे डोळ्यातील सिरा व सिराघटित अवयव यांतील कडकपणा वाढून रक्तदाब वाढतो व रक्तस्रावाची पार्श्वभूमी तयार होते. एकंदरीत मानेच्या वरच्या भागांतील रोगांना आमंत्रण दिल्यासारखे होईल. पूर्वी चुलीवरून तवा उतरवल्यावर तो इतर भांड्यांपासून लांब ठेवण्याची पद्धत होती. तो थंड झाल्यावर एकत्र ठेवला जात असे. तापलेल्या तव्यावर पाणी पडले तर तो लवकर फुटतो. अशा प्रकारची ओढाताण डोळ्यांना सहन होणे शक्य नाही. आधीच आहार, विहार आणि निरनिराळी औषधे डोळ्यांमध्ये ख वैगुण्य तयार करतातच त्यातून ही गरम – थंड ची भर पडली तर दोषवैषम्य होण्यास वेळ लागणार नाही.
आपले पूर्वज खरे आप्त होते. त्यांनी दिलेल्या सल्ल्याला आजच्या वैद्यकात पुरावा मिळो न मिळो, पण अंधश्रद्धा म्हणून का होईना, तो पाळला तर आपल्याला स्वास्थ्य उत्तम राखण्यास नक्कीच फायदा होईल. “आयुर्वेदोपदेशेषु विधेयः परमादरः ॥


वैद्य श्रीनिवास जळूकर
माजी अधिष्ठाता, पोदार वैद्यक महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई
+919969106404
shriniwasjalukar@gmail.com

No comments:

Post a Comment

Visit Our Page