Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Tuesday, September 25, 2012

स्वयंपाकाचे शास्त्र

भारतीय जीवनशैलीत आहारशास्त्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक स्त्री किंबहुना पुरुषसुद्धा येनकेन प्रकारे आहारशास्त्राशी निगडित आहे. रॉबर्ट मॅककॅरिसन नावाच्या आहारतज्ज्ञांच्या मते योग्य प्रकारचा आहार आरोग्य शाबूत ठेवण्याचा, तर अयोग्य आहार हा रोगवाढीसाठीचा एकमेव महत्त्वपूर्ण घटक आहे.

आंघोळ करणे, रात्रीची झोप घेणे या गोष्टी जशा आपण बेमालूमपणे करतो. तसाच रोजचा स्वयंपाकही बेमालूमपणे किंवा सवयीने पार पाडला जातो. पण कसातरी स्वयंपाक उरकून पोट भरणे हा आपला हेतू नसतोच. तो सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीने होणे गरजेचे आहे.

रोजच्या जेवणातला वरणभात तयार करणे हेसुद्धा शास्त्रच आहे. तांदूळ धुताना ब-याच जणींना तो खूप रगडून भरपूर पाण्यात धुण्याची सवय असते. तांदळात अळ्या होऊ नयेत म्हणून बोरिक पावडर लावण्याची गरज असते. ही पावडर निघून जाण्यासाठी खूप चोळून आणि अतिरिक्त पाण्याचा वापर करून तांदूळ धुतल्यास त्यातील 40 टक्क्यांपर्यंत थायामिन आणि ‘निकोटिनिक अ‍ॅसिड’ वाढत जाते.

हॉटेलमधला स्टीम राइस ब-याचदा आपण घरी करतो. जास्त पाण्यात तांदूळ शिजवून जास्तीचे पाणी फेकून दिल्यावर मोकळा भात तयार होतो. पण या पाण्यासोबत मिनरल्सदेखील जातात. त्यासाठी माफक पाण्याचा वापर करावा. यामुळे अन्नातील मोडियम, पोटॅशियम आणि कॅल्शियमचा आपल्याला पुरेपूर वापर करता येईल.

ब-याच कुकरी शोजमध्ये असे सांगितले जाते की, पालेभाज्या शिजवताना त्यावर झाकण ठेवले नाही तर त्या हिरव्यागार दिसतात. पण भाज्या न झाकता शिजवल्यास त्यातील व्हिटॅमिन सी नष्ट होते. म्हणूनच शक्यतोवर अन्न पे्रशर कुकरमध्ये शिजवावे. अन्नाला जितकी जास्त काळ उष्णता दिली जाते, तितकी त्यातील पोषणमूल्ये कमी-कमी होत जातात. स्निग्ध पदार्थ म्हणजे तेल, तूप, जितके जास्त गरम करू तितके त्यातील हानिकारक पदार्थांचे प्रमाण वाढते. ब-याचदा तळण केलेले तेल-तूप आपण पुन्हा फोडणीसाठी वापरतो, पण हे तेल-तूप वापरणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.

अन्नाच्या पोषक तत्त्वांची जपणूक करण्यासाठी काही गोष्टींचे पालन करा-
* भाज्या शिजवताना झाकून ठेवा.
* डाळ, तांदूळ धुताना रगडून धुणे टाळा.
* भाज्या वाहत्या पाण्यात आधी धुवा, मग चिरा.
* वारंवार अन्न गरम करणे टाळावे.
* वरण, भाज्या शिजवताना शक्यतो आम्लरसाचा वापर करा.
* अन्न जपून वापरा, वाया घालवू नका. आपण वाचवलेल्या अन्नात इतर शेकडो व्यक्तींना भोजन मिळू शकते.
 
 
 
 

Sunday, September 23, 2012

तुळस ही गणेश पूजनात निषिद्ध का?

भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा अपवाद वगळता तुळस ही गणेश पूजनात निषिद्ध का? त्याची कथा...

धर्मध्वज राजाची लावण्यवती कन्या 'वृंदा' ही उपवर झाली होती. तीने आपल्या पित्यास माझे लग्न विष्णूशी लावून द्या असा हट्ट धरला. त्यावर धर्मध्वजाने तिला दैवी वरा
चा ध्यास सोडून मानवी वर सुचविण्यास सांगितले. परंतु वृंदाने त्यांचे ऐकले नाही. ती विष्णूवनात जाऊन चतुर्भुज विष्णूचे ध्यान व जप करुन लागली. वृंदेने एकचित्ताने एक लक्ष वर्ष उग्र तप केले व त्याच्या प्रभावाने तिला अंतर्ज्ञान प्राप्त झाले.

एकदा वृंदेने भागीरथी नदीच्या तिरावर विघ्नेश्वर गणेशास ध्यानमग्न पाहिले. अंतर्ज्ञानाने तिला गणेश हा विष्णूरुप असल्याचे ज्ञान झाले व ती गणेशावर मोहित झाली. वृंदेने श्रीगणेशाचे ध्यान भंग केले. डोळे उघडताच तो म्हणाला, "हे माते, तू कोण आहेस? माझ्या ध्यानाचा भंग का करत आहेस? गणेशउपासनेत एकचित्त असणा-याची एकाग्रता भंग करणा-यास नरकात जावे लागते, त्यामुळे पुन्हा माझ्या ध्यानात भंग आणू नकोस" त्यावर वृंदा म्हणाली "मी धर्मध्वजाची कन्या असून नाना तपांनी प्रभावयुक्त आहे, मला तुझ्याशी विवाह करायचा आहे तरी माझा त्वरित स्वीकार कर ". त्यावर गणेशाने तिला समजावले, "मी तुझ्याशी विवाह करु शकत नाही. विवाह करुन मी मोहपाषात अडकणार नाही. तू तुझ्या तपासम तुल्यबळ असा वर पहा".

गणपतीच्या नकाराने संतापलेल्या वृंदेने, "तू विवाह करशीलच" असा शाप दिला. शापास प्रतिउत्तर म्हणून गणेशाने वृंदेस, "तू वृक्ष होऊन मूढ योगीत पडशील" असा शाप दिला. हा दारुण शाप ऐकताच वृंदा घाबरुन थरथर कापू लागली व तिने गणाधीशाची क्षमा मागितली.

दयावान गणेशाने तिची तपश्चर्या लक्षात घेऊन तिला सांगितले, "देवी तू येथून जा, वनात तुला असूर भेटेल त्यावर तू आसक्त होशील, असूर मरताच पतिव्रते तू आपल्या देहास चितेच्या अग्नीत त्यागशील व वृक्षरुप तुळस होशील. महाविष्णूस शाप देऊन शिळारुपी शाळीग्राम करशील. त्यानंतर भावी काळात विष्णूची पत्नी म्हणून निरंतर रममाण होशील. माझ्या कृपेने तू धन्य होशील. देवांना तुझी पुत्रपुष्पे सदैव मान्य होतील. अन्य काष्ठासम तुला त्रैल्योक्यात कोणीही मानणार नाही तर तुझ्या काष्ठांच्या माळा सकळ जन गळयात भक्क्तीभावाने घालतील. विष्णूची पत्नी म्हणून मानव तुजला पुजतील. तथापि, मला तू वर्ज्य असशील यात मात्र संशय नाही."

गणेशास वंदन करुन चिंताक्रांत वृंदा वनात तप करण्यासाठी निघून गेली. वृंदा एकचित्त 'गणेश नाममंत्र जपत ' तप करत होती. दीड लक्ष वर्षे उलटून गेल्यावर गणेश प्रसन्न झाले व तिच्यासमोर प्रकट झाले. हर्षभरीत वृंदा त्यांना प्रणाम करुन स्तुतिस्तोस्त्र गाऊन पूर्वी केलेल्या चुकीची क्षमा मागू लागली. त्यावर गणेशाने तिला वरदान दिले "तू गाणपत्य होशील. वर्षातून एकदा तुला माझ्या पूजेत स्थान मिळेल. भाद्रपद शुक्ल चतुर्थीस तुझे पत्र मला भक्तीभावाने वाहिल्यास ते मला पावन होतील. भाद्रपद शुक्ल चतुर्थीस मला वाहिल्या जाणा-या एकवीस प्रकारच्या पत्रीत तुझ्या पत्रांचाही समावेश असेल व केवळ त्या दिवशीच तुझे पत्र मला वाहिलेले चालेल अन्य दिवशी तुझे पत्र माझ्या पूजनात चालणार नाही."

असे बोलून श्रीगणेश अंतर्धान पावले व वृंदेचे मन प्रसन्न व हर्षोत्फुल झाले.

सर्व पूजांमध्ये महत्त्वाचे स्थान असणा-या तुळशीस गणपती पूजनात निषिद्ध मानले जाते. परंतु, वर्षातून एकदा गणेश चतुर्थीस (भाद्रपद शुक्ल चतुर्थीस) तिचा समावेश गणेश पूजनात केला जातो. त्या दिवशी गणपतीला वाहिल्या जाणा-या एकवीस पत्रींमध्ये तुळसही असते.

गणेशास भाद्रपद शुक्ल चतुर्थीस वाहिल्या जाणा-या एकवीस पत्री पुढीलप्रमाणे आहेत: (१) पिंपळ, (२) देवदार, (३) बेल, (४) शमी, (५) दूर्वा, (६) धोतरा, (७) तुळस, (८) भृंगराज / माका, (९) बोर, (१०) आघाडा, (११) रुई/मांदार, (१२) अर्जुन/अर्जुनसादडा, (१३) मरवा, (१४) केवडा/केतकी, (१५) अगस्ती/ हादगा, (१६) कन्हेर/ करवीर, (१७) मालती/मधुमालती, (१८) डोरली/बृहती, (१९) डाळिंब, (२०) शंखपुष्पी/विष्णुकांत, (२१) जाई/चमेली.
http://www.facebook.com/umesh.kulkarni.35

'लक' (Luck) म्हणजे काय?

'लक' (Luck), नशीब, तकदीर नांवाचा काहीतरी प्रकार आस्तित्वात आहे. त्याच्या आपल्या आयुष्याशी फार जवळचा संबंध आहे. त्याचे आपल्या आयुष्यावर अनेक बरे वाईट परिणाम होत असतात ही गोष्ट मला वाटते सगणेजणच मान्य करतील.
आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही तर ' I am unlucky', ' माझे नशीबच खराब आहे किंवा ही गोष्ट माझ्या नशीबातच नाही, ' मेरी तकदीरही खराब है!' असे म्हणत आपण आपल्या नशीबाला दोष देत बसतो. जर दुसर्यार कोणाला एखादी गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे मिळाली तर मग आपण लगेचच ' Oh! He is a lucky guy!', 'त्याचे नशीब जोरदार आहे किंवा त्याला नशिबाची साथ आहे.', 'उसकी तकदीर बहोत अच्छी है! उसको तकदीरकी साथ है!' असे म्हणुन त्याच्या नशीबाला आपण त्याचे 'क्रेडीट' देतो. 
थोडक्यात आपण आपल्या यायुष्यातल्या पराभवाला, कमी प्रगतीला, स्वप्नभंगाना 'लक' किंवा 'नशीब' जबाबदार धरतो. तर ई
तरांच्या विजयाला, प्रगतीला त्यांच्या 'अचीव्हमेन्टसना' पण त्यांच्या 'लक' किंवा नशीबाला जबाबदार धरतो.
तर असा हा न दिसणारा, कोणत्याही सायंटिफीक पद्धतीने ज्याचे आस्तित्व सिद्ध होऊ शकत नाही, पण ज्याची आपल्याला पावलोपावली जाणीव होत असते असा हा 'लक फॅक्टर'!
पण 'लक'(Luck) म्हणजे नक्की काय? त्याची नक्की अशी कांही डेफीनेशन आहे कां? कीस चीज का नाम 'लक' है? असे अनेक प्रश्न माझ्या मनांत गेली अनेक वर्षे निर्माण होत होते. हा बहुतकरुन मनाचा खेळ आहे असे मी समजत होतो. शेवटी सगळे कांही नशीबावर अवलंबुन असते असा एक घातक वाकप्रचार आपल्याकडे शिकवला जातो. आपण बरेच जण याचे शिकार होऊन अनेक गोष्टी नशिबावर सोडुन देण्याची घातक सवय लाऊन घेतो. 'असेल हरी तर देईल खाटल्यावरी' या प्रकारची मनोवृत्ती तयार करुन प्रयत्नवाद सोडून देतो किंवा मर्यादीत प्रयत्नांवर भिस्त ठेवतो. मी सुद्धा थोडाफार याच कॅटेगरीतला आहे.
पण अचानक मला 'Luck' या शब्दाची व्याख्या मिळाली. ती खालील प्रमाणे.
L – Labor
U- Under
C-Correct
K- Knowledge
Labor under correct knowledge means LUCK!
अचूक ज्ञानाच्या जोरावर केलेले कष्ट किंवा मेहेनत म्हणजे नशीब.
या ठिकाणी अचूक ज्ञानाबरोबरच कष्ट किंवा मेहेनत पण महत्वाची! नुसतेच कष्ट किंवा मेहेनतिचा उपयोग नसतो तर नुसतेच अचून ज्ञान उपयोगाचे नसते. तर नशीब घडवण्यासाठी या दोन्हिंचेही उत्तम कॉम्बीनेशन करावे लागते. ज्यांना हे जमते ते भराभर पुढे जातात व नशीबवान ठरतात. ज्यांना हे जमत नाही ते मागे रहातात व कमनशिबी ठरतात.
ही नवीन दृष्टी घेऊन मी अनेक यशस्वी व्यक्तींचा अभ्यास केला. दिवसाला बारा बार तास, चौदा-चौदा तास कष्ट करणे त्यांच्या अंगवळणी पडले होते. पण त्याच बरोबर आपण ज्या क्षेत्रांत काम करीत आहोत त्या क्षेत्राचे ज्ञान अद्ययावत किंवा अप टु डेट ठेवण्यासाठीपण ते प्रचंड मेहेनत घेत असतात. त्यासाठी ते खुबिने ईतरांचा उपयोग करुन घेत असतात. वेळ प्रसंगी तज्ञांचा सल्ला घेण्यामधे त्यांना कमीपणा वाटत नाही. शाळा कॉलेजमधील शिक्षणापेक्षा किंवा डिग्रयांच्या सर्टिफिकेटपेक्षा अनुभवातुन मिळणार्याज ज्ञानावर त्यांचा भर असतो. म्हणुनच इंजिनीयरींगचे कोणत्याही प्रकारचे क्वालिफिकेशन नसताना ईयता चौथीपर्यंत शिकलेला थॉमस अल्वा एडीसन किंवा अमेरीकेतील बारावी पर्यंत शिकलेला स्टीव्ह जॉब्ज जागातील सर्वात हुषार इंजिनीयर्स समजले जातात, ते केवळ 'Lucky' किंवा नशीबवान होते म्हणुन नव्हे!
तुम्हाला 'Lucky' व्हायचे आहे कां 'Unlucky' रहायचे आहे हे तुमचे तुम्हीच ठरवायचे आहे.....














Tuesday, September 11, 2012

डेंग्यू आजारापासून बचाव कसा करावा?


 
मराठवाड्यात गेल्या काही वर्षांपासून डासांनी व पिसवांनी होणा-या आजारांनी साथीचे स्वरूप घेतले आहे. पाऊस पडला की, उघडी गटारे, साचलेले पाणी, उकीरडे यामुळे डासांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. मग डासांमुळे होणारा संसर्ग म्हणजे ‘डेंग्यू’, मलेरिया, चिकुनगुन्या समाजात साथीचे रूप धारण करतात. डेंग्यू आजार पांढ-या व दिवसा चावणा-या तसेच साठवलेल्या पाण्यातून वाढलेल्या डासांमुळे होतो.

डेंग्यू आजार ठरावीक वेळापत्रकाप्रमाणे वागतो. त्यामुळे या आजाराची लक्षणे जरी विविध असली तरी, त्याच्या वेळापत्रकाप्रमाणे आपण त्यातील गंभीरता जाणून घेऊ शकतो. प्रथम लक्षणापासून ते बरे वाटेपर्यंतचा कालावधी साधारण 10 दिवसांपेक्षा जास्त नसतो.

लक्षणे : सुरुवातीला ताप येणे, अंग भरून येणे, हा ताप उतरण्यासाठी दर चार तासांनी औषधी घ्यावी लागतात. तरीही तो पूर्णपणे नॉर्मल होत नाही. याचे वैशिष्ट्य म्हणजे तो चार-पाच दिवस सारखा वारंवार येतो. रुग्ण या आजाराने खूप गळालेला असतो. हा ताप 5 किंवा 6 दिवसांनी कमी होतो. ताप कमी झालेला असला तरी रुग्ण खूप गळालेला किंवा थकलेला वाटतो.

याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जोपर्यंत रुग्णांच्या अंगात ताप असतो तोपर्यंत तो गंभीरच नसतो. रक्तातील प्लेटलेट्स या एक लाखांपेक्षा जास्त असतात. ब-याच जणांना ताप उतरल्यानंतर वैद्यकीय सल्ल्याची गरज वाटत नाही, पण डेंग्यू ताप उतरल्यानंतर रु ग्ण गंभीर होण्याची शक्यता जास्त असते. डेंग्यूत होणारे दुष्परिणाम 6 ते 9 दिवसांपर्यंत असतात.

- डोकेदुखी, अंग दुखणे डोळ्यापाठीमागे प्रचंड वेदना होणे.
- भूक मंदावणे, चक्कर येणे, थंड घाम सुटणे, उलटी होणे.
- अंगावर गोवरासारखे पुरळ येतात.
- डोळे लाल होणे, डोळे आल्यासारखा भास होणे, पण डोळ्यातील घाण येत नाही.

प्लेटलेट्सचे प्रमाण कमी झाल्याचे आपण ऐकतो. अगदी खेड्यातून रुग्ण पेशी कमी झाल्या म्हणून दवाखान्यात येतो, पण महत्त्वाचे म्हणजे प्लेटलेट्स देण्याची गरज नसते. जर रुग्णास रक्तस्राव होत असेल तरच प्लेटलेट्स द्यावयास पाहिजे. रक्तस्राव नसताना जर रक्ताचे घटक रुग्णास दिले तर त्याची प्रकृती सुधारण्याऐवजी बिघडण्याची शक्यता जास्त असते.

ताप उतरल्यानंतर अजून एक लक्षण जे थोडे अवघड असते. ते म्हणजे फ्ल्यूड शिफ्ट आपल्या शरीरातील पाणी व क्षार हे पोटात, छातीत जमा व्हायला लागते. हा काळ तापानंतर एक किंवा दोन दिवस असतो. रुग्णाला पोट दुखणे, उलटी होणे, दम लागणे अशी लक्षणे दिसतात. अशावेळी तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणे योग्य.

6 ते 7 दिवसानंतर तळहात-तळपाय यांना खाज सुटते. ती एक दिवस टिकते. नंतर आपोआप कमी होते.

निदान : वरील लक्षणावरून डेंग्यूचे निदान करणे फारसे अवघड नाही. सुरुवातीच्या 3 दिवसांत जर निदान करायचे असेल तर एनएसआय नावाची एक रक्त तपासणी करावी लागते, पण ती अजून सगळीकडे उपलब्ध नाही. म्हणून त्याला 5 ते 6 दिवस डेंग्यूसदृश आजार म्हणावे. सातव्या दिवशी डेंग्यू कॅट, IgM, IgG Elisa Test करणे आवश्यक असते.

उपचार
- डासांचे निर्मूलन करणे हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला गेला पाहिजे. वैयक्तिक प्रतिबंध, परिसर स्वच्छ ठेवणे, साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, रुग्णाबाबत नगरपालिका व आरोग्य विभागास कळवणे.
- ताप असेपर्यंत आराम करणे, भरपूर पाणी पिणे, पॅरासिटेमॉल गोळी घेणे.
- संभाव्य धोक्याबाबत माहिती असणे, तशी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेणे.
- ताप उतरल्यानंतरच आजार गंभीर वळण घेऊ शकतो. याची जाणीव असणे गरजेचे आहे.
- रक्तातील घटक फक्त रक्तस्राव असणा-या पेशंटसाठी राखून ठेवणे.
- या आजारासोबत अजून काही कारणामुळे रक्त घटक कमी झाले आहेत काय? हे वैद्यकीय अधिका-यांकडून जाणून घेणे.
 
http://www.facebook.com/drvilas.ujawane 
 

डॉ. विलास उजवणे (DrVilas Ujawane)

Friday, August 31, 2012

दूध पिणे -

दूध पिणे -
आयुर्वेदानुसार दूध हे अमृत आहे हे आपण नेहमी ऐकत आलो आहोत. ग्रंथांचे
वाचन नं करता किंवा तज्ज्ञांना नं विचारता बहुतेकांनी त्याच्यावर
विश्वासही ठेवलेला असतो. या विषयी आयुर्वेद शास्त्र काय म्हणते सांगताय
- वैद्य श्री अनंत धर्माधिकारी

प्रश्नोत्तरे:

प्रश्नं १: रोज दूध पिणे जरूरी आहे असे बहुतेकांना वाटते.आयुर्वेदाचा या
बाबतित काय सल्ला आहे?

उत्तर: दररोज दूध पिण्याची गरज नाही. योग्य रितीने तयार केलेली भारतिय
थाळी सर्व आवश्यक जिवनसत्वे(व्हिटॅमिन), रोग प्रतिकारक
तत्वे(इम्युनायझर्स) व खनिजे (मिनरलस) यांनी परिपूर्ण असते. थाळीतील
प्रथिने (प्रोटिन) व इतर पौष्टिक तत्वांनी आरोग्य लाभते, वृद्धिंगत होते
व टिकुन रहाते. परंतु सप्लिमेंटसची आवश्यकता असलेल्यांनी खालील नियमांचे
पालन करून दुधाचे सेवन करावे:

नियम क्र १: दुधाचे सेवन करण्यापुर्वी आधी खाल्लेले सर्व अन्न पचलेले
असायला हवे. अर्धे पचलेले अन्नं पोटात असताना सेवन केल्यास रोगकारक
अवस्था तयार होते. वात कफ व पित्त या विकारांमधे एकाच वेळी वाढ होते.

नियम क्र. २: अजिबात व्यायाम नं करणार्‍याने अजिबात दूध प्यायचे नाही.

नियम क्र ३: चांगली भुक लागल्याशिवाय कधीही प्यायचे नाही.

नियम क्र ४: दूध आणि फळं कधीही एकत्रं खायची नाहीत.

नियम क्र ५: रात्री दूध कधीही प्यायचं नाही.

नियम क्र ६: सकाळी उठल्यावर लगेच दूध प्यायचं नाही.

नियम क्र ७: व्यायामकरून भूक लागल्यावरच प्यायचं.

प्रश्नं २: वाढत्या वयाच्या मुलांनी दिवसातुन एकदा किंवा दोनदा दूध
प्यावे असा सर्वसाधारण समज आहे. आयुर्वेद या बाबतित काय सांगते?

उत्तर: वयाच्या ५-६ वर्षापर्यंतच दूध द्यावे.

प्रश्नं ३: गरोदर स्त्रियांनी दूध पिणे गरजेचे असते काय?

उत्तर: सप्लिमेंटसची आवश्यकता भासल्यास गरोदर स्त्रिया दूध पिऊ शकतात,
मात्रं उत्तर क्र. १ मधील नियम पाळणे आवश्यक आहे.

प्रश्न ४: स्तनपान देणार्‍या मातेला दूध पिणे गरजेचे असते काय?

उत्तर: वरील क्रं ३ प्रमाणेच

प्रश्न ५: आहारात दुग्धजन्य पदार्थांचा वापर टाळुन सुदृढ जिवन जगणे शक्य आहे का?

उत्तर: आहारातील इतर घटक कोणते यावर अवलंबुन आहे. भारतिय थाळी पद्धतीचे
जेवण उपलब्ध असल्यास शक्य आहे.

प्रश्न ६: आयुर्वेदात दुधाचे पर्याय सुचवले आहेत का?

तुप, ताक,मुगडाळ, सुके खजुर,आवळे इ. द्यावे. (अपवाद पाच ते सहा वर्षापर्यंत)

प्रश्न ७: गायींचे पालनपोषण व आहार या विषयी आयुर्वेद काय सांगते?

आयुर्वेदात या विषयी जे नियम आहेत, त्यात उत्पादन वाढीपेक्षा गुणवत्तेवर
भर दिलेला आहे. ते नियम खालीलप्रमाणे:

दिवसा गाय गोठ्यात बांधलेली नसावी. गायीला दिवसभर चरायला सोडणे आवश्यक
आहे. विविध प्रकारचे हिरवे गवत जिथे नैसर्गिकरित्या उगवते तेथे गाईला
चरायला द्यावे. अशा ठिकाणी सहाजिकच गवताची निवड गाय स्वतःच करते. विविध
प्रकारच्या गवतामुळे दुधात आवश्यक गुण निर्माण होतात.
बाहेर ढगाळलेले वातावरण नसावे. दिवसभर फिरून होणारा व्यायाम व दिवसभर
मिळणारा सूर्याचा स्वच्छ प्रकाश यामुळे गायीचे आरोग्य सुधारते.
संध्याकाळी परत आल्यावर गाईचे दूध काढावे. त्या दुधात तिखट कडु व तुरट हे
आवश्यक रस भरपूर प्रमाणात आढळतात. असे दूध चवीला गोड लागते, पचायला हलके
असते तसेच आरोग्यवर्धक असते. असे दूध आवश्यकतेनुसार, उत्तर क्र १ मधे
सांगितलेल्या नियमांचे पालनकरून रोज प्यायला हरकत नाही.

प्रश्नं ८: वर सांगितलेले नियम नं पाळता दूध काढले असेल,उदा. गोठ्यात
बांधलेल्या गाईचे दूध काढले असेल तर त्या दुधाचे तुप किंवा दही खाल्ले तर
चालते का?

उत्तर: अगदी कमी प्रमाणात. दररोज ४०-५० मिली ताक पिता येईल.

Monday, August 27, 2012

संशोधन

१८व्या शतकात दक्षिणेतील तंजावर येथील सत्ताधीश सर्फोजी राजे भोसले (दुसरे) डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करत होते, अशी माहिती नुकतीच उजेडात आली आहे. त्यामुळे भारतही याक्षेत्रात त्याकाळी मागे नव्हता, ही बाब अधोरेखित होत आहे. त्यांनी तंजावरवर १७९८ ते १८३२ या काळात राज्य केले आणि ते एक उत्तम नेत्ररोगतज्ज्ञ होते. त्यांनी अनेक प्रजाजनांच्या डोळ्यांच्या तक्रारींवर औषधपाणी तर केलेच पण अनेक नेत्र शस्त्रक्रियाही केल्याचे पुरावे आता मिळाले आहेत. 

चेन्नईतील शंकर नेत्रालयातील तज्ज्ञ, तामिळनाडूच्या पुरातत्व खात्याचे माजी संचालक आणि कांचीपुरम विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. नागस्वामी यांनी काही ऐतिहासिक दस्तावेज सर्फोजी राजांचे सध्याचे वंशज एस. बाबाजी राजा भोसले यांच्याकडून हस्तगत केले. त्यात सर्फोजी राजे यांनी केलेल्या नेत्र शस्त्रक्रियांची शास्त्रीय वर्णने आणि नोंदी आहेत. या हस्तलिखितांवर आधारीत शोधनिबंध 
त्यांनी इंडियन जर्नल ऑफ ऑप्थॅल्मोलॉजी या शास्त्रीय नियतकालिकात नुकताच प्रसिद्ध केला.

या नोंदीच्या आधारे अशी माहिती पुढे आली आहे की सर्फोजी राजे धन्वंतरी महाल नावाने नेत्र रुग्णालय चालवत असत. आज ज्या ठिकाणी सेंट पीटर्स चर्च आहे त्या जागेवर पूर्वी हे रुग्णालय होते. राजांना आपल्या कामात डॉ. मॅकबीन नावाचे इंग्लिश नेत्रतज्ज्ञ मदत करत असत. राजांनी उपचार केलेल्या रुग्णांविषयीच्या नोंदी मोडी लिपीत तसेच इंग्रजी भाषेतही उपलब्ध आहेत. या विषयावरील माहिती आम्ही या वर्षी दुबई येथे भरलेल्या वर्ल्ड ऑप्थॅल्मोलॉजी कॉन्फरन्समध्ये मांडली. आजवर आधुनिक नेत्र शस्त्रक्रियांचे श्रेय युरोपीय शास्त्रज्ञांना दिले जात असे. पण ही बाब खरोखरच आश्चर्यकारक आहे की त्याच काळात भारतातील लोकही या क्षेत्रात तितकेच महत्त्वाचे कार्य करत होते, असे मत शंकर नेत्रालयाचे तज्ज्ञ डॉ. ज्योतिर्मय विश्वास यांनी व्य्कत केले. डॉ. जॅक्स डॅव्हिएल या फ्रेंच नेत्रविशारदाने मोतीबिंदूवरील प्रभावी शस्त्रक्रियेची माहिती सर्वप्रथम १७५२ मध्ये फ्रेंच अ‍ॅकॅडेमी ऑफ डर्जरीला सादर केली.

साधारण त्याच काळात सर्फोजी राजांच्या नोंदीत कॉर्निया, लेन्स, कंजक्टिव्हा आदि शास्त्रीय परिभाषेतील संज्ञा वापरलेल्या आढळतात. सर्फोजी राजे यांनी त्या काळी ५ ते ६० वर्षे वयोगटातील ४४ रुग्णांवर केलेल्या इलाजांची माहिती ५० हस्तलिखितांमध्ये सापडली आहे. त्यात सुईच्या साह्याने मोतीबिंदू काढणे, तसेच आज ज्याला ल्युकोमा आणि अ‍ॅमॉरॉसिस म्हणतात त्या व्याधींवरही उपचार केल्याच्या नोंदी आहेत. त्यात ९ सप्टेंबर १८२७ रोजी एका ४५ वर्षांच्या रुग्णावर केलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या आणि १५ ऑगस्ट १८२७ रोजी एका १५ वर्षे वयाच्या मुलीच्या जंतुसंसर्ग झालेल्या डोळ्यांवर केलेल्या शस्त्रक्रियेचे उल्लेख आहेत.

या उपचारांत निळी गोळी, जळू, एरंडाचे तेल, रेवाचिनी (रूबार्ब) चूर्ण अशा भारतीय औषधींबरोबरच खडूचे चूर्ण, पेपरमिंटचा द्राव, सिल्व्हर नायट्रेट यांसारख्या युरोपीय द्रव्यांचाही वापर केल्याच्या नोंदी आहेत. निळी गोळी नावाने उल्लेख असलेल्या देशी पदार्थाचे नेमके स्वरूप आता माहित नसले तरी जंतुसंसर्ग कमी करण्यासाठी आणि वेदनाशामक म्हणून त्याचा व्यापक आणि प्रभावी वापर होत असल्याचे दिसून आले आहे. डोळ्यांची सूज उतरवण्यासाठी आणि शस्त्रक्रियेनंतर वेदना शमवण्यासाठी जळूंचा वापर केला जात असे. बरे होऊन घरी परतताना रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी संमती दिल्याबद्दल आणि प्रकृतीत सुधारणा झाल्याबद्दल इनाम म्हणून २ रुपये दिले जात, अशाही नोंदी सापडल्या आहेत.

Tuesday, June 12, 2012

परीक्षेच्या उंबरठ्यावर....!

चौथी स्कॉलरशिप ते दहावी, बारावी, स्पर्धात्मक परीक्षा घराच्या उंबरठय़ापर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. सध्याच्या स्पर्धेच्या युगात मार्काच्या आंधळय़ा शर्यतीत भाग घेतल्यावाचून पर्याय नाही. मग मुलांच्या मागे अभ्यासाचा धाकदपटशा लावायचा की नाही? या संभ्रमात सध्या तमाम पालकवर्ग आपले शरीर, मन, भावनिक आरोग्य हरवून बसला आहे. ३० ते ४५ वर्षे या वयोगटातील स्त्री-पुरुषांना उच्च रक्तदाब, निद्रानाश, पोटाच्या वाढत्या तक्रारी (मनो-कायिक आजारांना) तोंड द्यावे लागत आहे. यासाठी पालकांनी स्वत: संयम बाळगणे, आवश्यक आहे तरच ते आपल्या पाल्याची परीक्षेची पूर्वतयारी करून घेऊ शकतील.
आयुर्वेदाच्या माध्यमातून या काही टिप्स :
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी परीक्षा जवळ आल्या की स्वाभाविकच अभ्यासाचा ताण वाढतो आणि रात्रीची जागरणे आणि अभ्यासाचे वाढते तास मुलांच्या शरीर-मनावर तणाव निर्माण करतात. त्यातून क्लासेसचे दडपण असेल तर विचारायलाच नको. हा ताण कमी करायचा असेल तर त्यासाठी पुढील गोष्टींची पालकांनी काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना सकाळी लवकर उठून अभ्यास करण्याचे महत्त्व पटवून द्यावे. सूर्योदयाच्या सुमारास बाह्य वातावरणातून मेंदूला आपोआपच तरतरी, एकाग्रता, कार्यक्षमता वाढवण्याचे रसायन मिळत असते, त्याचा फायदा घ्यावा.
संपूर्ण शरीराला तिळाच्या तेलाचा हलकासा मसाज शरीर-मनाला उभारी देतो, थकवा कमी करतो, आजारांविरोधी प्रतिकारक्षमता वाढवतो.
नाकात गाईच्या तुपाचे २-२ थेंब लावल्याने सर्दीपासून संरक्षण होते, नाकाच्या आतील त्वचेचे प्रदूषणविरोधी काम सुरू राहते.
तळपायाला व केसांना रोज मसाज केल्याने डोळय़ांचे आरोग्य सुधारते.परीक्षा जवळ आल्या असल्या तरी विद्यार्थ्यांनी नियमित व्यायाम करणे, निदान सूर्यनमस्कार घालणे अपरिहार्य आहे, कारण व्यायामामुळे आळस दूर होतो.
तुळस, ज्येष्ठमध अशा वनौषधींचा वापर प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी करता येतो.
परीक्षांच्या काळात मुलांची झोप हमखास वाढते. अशावेळी खोटी झोप म्हणजेच आळस ओळखून पिण्यासाठी गरम पाण्याचा वापर, आठवडय़ातून एकदा एरंड तेल किंवा सुंठीचे तज्ज्ञांच्या सल्ल्याने चाटण द्यावे.
जेवणात मिठाई अरबट-चरबट पदार्थ, ब्रेड, मैद्याचे पदार्थ, बाहेरचे खाद्यपदार्थ देणे टाळावे. पिण्याच्या पाण्यासंदर्भात योग्य काळजी घ्यावी.
मुलं आजारी पडल्यास लगेचच तज्ज्ञांची मदत घेऊन योग्य औषधोपचार करावे. घरातील वातावरण :घरातील वातावरणाचा मुलांच्या अभ्यासावर परिणाम होत असतो. त्यामुळे पालकांनी या काळात परस्परांतील मतभेद, वादविवाद दूर ठेवावे.
टीव्ही, कॉम्प्युटर बंद असे ओरडत पालकांनी रुद्रावतार धारण केला तर भीतीमुळे मुलांच्या मेंदूतील स्रवांवर परिणाम होतो. परिणामी स्मरणशक्तीही कमी होते. म्हणून टीव्ही, कॉम्प्युटरसाठी किती वेळ द्यावा याचं महत्त्व मुलांना संवादातून पटवून द्या.
वेखंड, गुग्गुळ, अगुरू, धूप इ. वनौषधी धुपनाने घरातील वातावरण पवित्र आणि सकारात्मक बनवण्याचा प्रयत्न करावा. लक्षात ठेवा खेळीमेळीच्या आणि आनंदी वातावरणाचा अभ्यासावर चांगला परिणाम होतो.
औषधे व रसायनांचा उपयोग :प्रत्येक मुलाची स्मरणशक्ती, ग्रहणक्षमता, धारणक्षमता त्याच्या प्रकृतीवर आणि क्षमतेवर अवलंबून असते. योग्य वाढीसाठी उत्तम आहार, विहार, योगसाधना यांची मदत घ्यावी.
गाईचे दूध, तूप, ब्राह्मी, ज्येष्ठमध, अश्वगंधा, मण्डूकपर्णी, वेखंड इ. औषधी आणि रसायन द्रव्ये मन तसेच भावभावनांवरचे तणाव कमी करून अभ्यासात स्थिरता वाढवतात. तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्याचा वापर करून घ्यावा.

- डॉ. जितेश प्र. पाठक
आयुर्वेदाचार्य:
http://www.facebook.com/drjiteshpathak

Saturday, April 14, 2012

नोकरी करणाऱ्या स्त्रिया व त्यांचे आरोग्य

जे काही सामिजिक बदल घडले, घडत आहेत त्याचा परिपाक म्हणून पुरुषाच्या बरोबरीने स्त्रियांनी देखील नोकरी करावी हि प्रत्येकाची इच्छा असतेच व कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यासाठी त्याची आवश्यकता देखील भासते.

स्त्रिया तुलनेने नाजूक प्रकृतीच्या असल्यामुळे त्यांना बाहेरील नोकरीचे कष्ट व त्याच बरोबर स्वतःच्या घरातील श्रम हे दोन्हीही आपल्या क्षमतेपेक्षा अधिक पडतात. म्हणूनच त्यांचे आरोग्य बिघडण्याची अधिक शक्यता असते. तसेच स्त्री ही आपले घरकुल सांभाळणारी प्रमुख जबाबदार व्यक्ती असल्याने तिचे आरोग्य बिघडल्यास त्याचा परिणाम सर्व घरावर होऊ शकतो. म्हणूनच नोकरी करणाऱ्या स्त्रीयाच्या कुटुंबीयांनी व स्वतः स्त्रीने स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. 

नोकरी कुठलीही असली तरी स्त्रीला आपली नाजूक प्रकृती, मासिक पाळी, विवाहपूर्व काळ, विवाह पश्चात काळ, गर्भारपण, बाळंतपण, रजोनिवृत्ती या शारीरिक बदलत्या परीस्थितीना तोंड द्यावेच लागते.

गर्भारपण व बाळंतपण यासाठीची मिळणारी रजा संपल्यावर स्त्रीला लगेचच नोकरीला पुन्हा जायचे असते. या काळात योग्य उपचार व आवश्यक विश्रांती न मिळाल्यास शरीराची झीज भरून येत नाही आणि सांध्याचे विकार, स्थूलता अशा अनेक समस्यांनी स्त्री ग्रासली जाते. 

अंगावर दूध पिणारे बाळ घरी टाकून जावे लागत असल्याने स्त्रीची मानसिक ओढाताण होते. स्तनात दूध साठून नंतर त्याचे इन्फेक्शन इ. त्रास देखील होतो.

चाळीशीनंतर शरीरात हार्मोनल बदल घडून मासिक पाळी नैसर्गिक रित्या थांबते त्यास रजोनिवृत्ती असे म्हणतात. या काळात मन नाजूक बनते. व अशातच सेवा जेष्ठतेने नोकरीच्या अनेक महत्वाच्या जबाबदारया त्या स्त्री वर पडतात.

घ्यावयाची काळजी -
आयुर्वेद शास्त्रा नुसार वाताज, पित्तज, कफज अशा तीन प्रकृती आहेत. आयुर्वेद तद्याकडे जाऊन आपली प्रकृती तपासून त्या अनुसार आहार, विहार व उपचार घ्यावेत. 

काम करताना आपण विविध ढबीत बसून बघावे व त्यानंतर ठरवावे की, नेमक्या कोणत्या ढबीत बसल्यावर आपला देह हा अवघडला जात नाही.
पाठीस पोक न काढणे, अंधारात काम न करणे, खूप पूढे वाकून बसून काम न करणे, पायावर पाय टाकून न बसणे, जर काँप्युटरवर काम करताना ऍडजेस्टेबल खुर्चीचा वापर करावा. आपण काम करताना ज्या खूर्चीवर बसतो, ती आपल्या कंबरेखालील भागास आधार देणारी हवी. आपल्या कंबरेस जर आधार मिळत नसेल, तर कुशन ठेवून तो द्यावा.
जर लघवीस लागली, तर शक्यतो ती दाबून ठेवू नये, कारण यामुळे देखील काही अपाय होऊ शकतो.
जेवण गरम राहील अशा टिफिनमध्ये न्यावे. यात हिरव्या भाज्या, दही डाळ इ. समावेश असावा. सारखा चहा, कॉफीवर जोर देवू नये. तसेच चहाबरोबर खाण्यास मोडावलेली कडधान्ये (उदा. मूग,मटकी, सोयाबीन्स्‌) न्यावीत.
काँप्युटरवर वा टाइपरायटरवर काम करणार्‍या स्त्रियांनी नेहमी लक्षात ठेवावे की, हातांना खूप ताण बसून देऊ नये. हात थोडे ढिले सोडून व हलक्या हातानेच टाइप करावे.
जेव्हा बसाल, तेव्हा आपली कंबर, गुडघे, पायांच्या पोटर्‍या यावर दाब पडेल, अशा प्रकारे बसणे टाळावे. हात व पायांची बोटे हालत राहतील, असे काम करावे.


- डॉ. जितेश प्र. पाठक 
आयुर्वेदाचार्य 
http://www.facebook.com/drjiteshpathak


  • 8275007220
  • 9960507983

Monday, January 9, 2012

कर्करोग विरोधी आहार विहार

नवीन संशोधनांनी आपल्या कर्करोग संबंधातील प्रतिबंधात्मक काळजी आणि उपचार या संबंधातील विचारात अनेक मुलभूत बदल केले आहेत. आपल्या खाद्यपदार्थातील काही पदार्थ हे कर्करोगाची वाढ करण्यास किंवा वाढीला प्रोत्साहन देण्यात नक्की वाटा उचलतात हे आता नक्की समजले आहे, तर काही पदार्थ हे त्याच्या वाढीवर नियंत्रण घालतात किंवा आळा बसवितात हे देखील सिद्ध केले आहे. संशोधनांनी असे लक्षात आले आहे की, किमान ३५% कर्करोगांमध्ये आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, विशेषत: ज्यात जास्त प्रमाणात स्निग्ध पदार्थ आहेत असे व प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ यांचा विपरीत परिणाम होत असतो. आपल्या खाद्य-सवयी बदलल्या तर यातील अनेक कर्करोग नियंत्रित करता येतील असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

कर्करोग नियंत्रण आणि उपचार करणाऱ्या संस्थांच्या मते कर्करोग हे जगात मृत्यूचे दुसऱ्या क्रमांकाचे कारण आहे.
शरीरातील अवयवांमध्ये पेशींची अनियंत्रित वाढ म्हणजे कर्करोग असे सामान्यत: म्हणता येईल. या वाढीची सुरवात, एखाद्या विशिष्ठ रसायनामुळे, एखाद्या विषाणू (व्हायरस) मुळे, वातावरणीय विषारी पदार्थामुळे ज्यांना एखाद्या विकासकांनी आणखीन घातक वळण दिले आहे, जसे आपल्या शरीरातील हार्मोन्स किंवा खाद्यपदार्थ. आपली जीवन पद्धती, विशेषत: खाद्य-सवयी कर्करोगाच्या नियंत्रणामध्ये फार महत्वाचा घटक आहे. कर्करोगाची घातकता कमी करण्यासाठी व तो आपल्याला होणार नाही याची काळजी घेण्यासाठी वनस्पती-जन्य विशेषत: शाकाहारी आहार निवडा.

कर्करोग नियंत्रक आहार:

फळे आणि भाज्या यांचा आहारातील वापर वाढवा...

अ. आहारात भाज्या आणि फळे यांचा वापर मोठ्या प्रमाणात असेल तर त्याने अनेक घातक कर्क-रोगांना आपोआपच खीळ बसेल. भाज्या व फळे, बायो-फ्लेवोनॉईडस व इतर वनस्पतीजन्य रसायने, फायबर, फॉलेट, व अँटिऑक्सिडंट्स (बिटा-कॅरोटीन आणि क जीवनसत्व) यांनी समृद्ध असतात. या सर्व पदार्थांनी कर्करोग वाढ होण्याची प्रक्रिया कमी किंवा बंद होते. फळे आणि भाज्या यांत अनेक अशी रसायने, न्युट्रीयंट्स जसे जीवनसत्व, फायटो-रसायने किंवा इतर वनस्पती जन्य रसायने असतात ज्यामुळे कर्करोगावर नियंत्रण ठेवता येते.

आ. या न्युट्रीयंट्स मुळे काही प्रकारच्या कर्क-रोगांना पायबंद घालता येऊ शकतो. कृसिफेरस भाज्या जसे, कांदा, लसूण्‍, ब्रोकोली व कॉलीफ्लॉवर आणि आंबट फळे जशी, ग्रेप-फ्रुट आणि संत्री, रास्पबेरी, स्ट्रॉ-बेरी, ब्लॅक-बेरी अशा विविध बेरीज, हिरव्या पालेभाज्या जसे पालक इ. यांचा आहारातील समावेश वाढवा. दिवसाकाठी ५ ते ९ सर्विन्गज या प्रमाणात कच्ची फळे आणि भाज्या आहारात घ्या.

इ. यातील उपयुक्त रसायने कर्करोग वाढीसाठी उपयुक्त असलेल्या पेशींचा नायनाट करून किंवा त्यांना निष्क्रिय करून आपले कार्य करीत असतात. (by preventing precancerous changes in cellular genetic material due to carcinogens by inducing the formation of protective enzymes -).(रक्षक/नियंत्रक  एन्झाईम्स ची ऊत्पत्ती केल्याने ते शरीरातील पेशींमधील जनुकीय(जेनेटिक) घटकांमधे कार्सिनोजेन्स (कॅन्सर उत्पादक घटक) मुळे होणारे कॅन्सरपूर्वीचे  बदल्‍ नियंत्रित करू शकतात.शरीरातील डीएनए च्या तंदुरुस्ती साठी आणि दुरुस्ती साठी फोलेट हे खास करून कार्य करीत असते.

विविधरंगी फळे आणि भाज्या खा :

फळे आणि भाज्या यांच्यातील विविध रंगद्रव्य आणि रसायने, ज्यांनी भाज्या आणि फळांना आकर्षक रंग प्राप्त होतात ते देखील कर्क रोगांशी प्रतिकार करण्यात मदत करीत असतात. आहार तज्ञ आता किमान ३ वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या आणि २ रंगांची फळे आहारात समविष्ट करावी असे सांगतात. गर्द-हिरव्या पालेभाज्या, तसेच गर्द-पिवळी, नारिंगी आणि लाल फळे व भाज्या यांचा आहारात समावेश असावा. किमान एक सर्व्हिंग क जीवनसत्व युक्त फळे (लिंबू जातीची - मोसंबी, नारिंगी इ.) आणि कृसिफेरस भाज्या आहारात असणे आवश्यक आहे.

अनेक फळे आणि भाज्यांमध्ये एकापेक्षा जास्त प्रकारच्या कर्क-रोगांशी लढण्याची शक्ती असतेखालीएक विविध फळे आणि भाज्या यांची यादी दिली आहे :

-जीवनसत्व युक्त :

आंबट जातीची फळे, स्ट्रॉ-बेरीज, आंबा, मोड आलेली धान्ये, कॉलीफ्लॉवर व बटाटा.

बिटा-कॅरोटिन युक्त :

आंबट जातीची फळे, रताळी, गाजर, लाल-भोपळा, पपई, आंबा आणि ओला-जर्दाळू

तंतुमय पदार्थ :

मका, कडधान्ये, ब्रोकोली, मोड आलेली धान्ये, सालासकट बटाटा, गाजर, सफरचंद, बेरीज आणि अंजीर

फोलेट युक्त पदार्थ :

हिरव्या पालेभाज्या जसे पालक, संत्र्याचा रस इ.

 जीवनसत्व युक्त पदार्थ :

ड जीवनसत्व हे कर्करोग प्रतिबंधात महत्वाची भूमिका पार पाडत असते. सूर्यप्रकाश हा ड जीवनसत्वाचा अतिशय चांगला स्रोत आहे हे आपण सारेच जाणतो. आपले शरीर हे, सूर्य प्रकाशातील अतिनील किरणांपासून अतिशय पटकन आणि उपयुक्त पद्धतीने आपल्याला ड आणि ड३ जीवनसत्व, अगदी काही दिवसांत उपलब्ध करून देण्यासाठी बनलेले आहे. सूर्यप्रकाशा बरोबरच आहारात देखील ड जीवनसत्व युक्त आहार घेणे उपयुक्त ठरते हे सिद्ध झाले आहे. या मध्ये अ आणि ड जीवनसत्व असलेले दूध (फॉर्टिफाईड दूध), कडधान्ये, फळांचा रस, आणि ज्यात नैसर्गिक रित्या ड जीवनसत्व जास्त प्रमाणात आहे असे पदार्थ जसे अंडी, मासे, यांचा समावेश आहारात करावा.

क्रमश: - पुढील लेखात कर्करोगाशी मुकाबला करू शकणाऱ्या आणखी अन्नपदार्थांची माहिती करून घेऊ...

संदर्भ:
१. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र : मृत्यूची मुख्य कारणे...
२. अमेरिकन कर्करोग सोसायटी : कर्करोग नियंत्रण आहार नियमावली
३. राष्ट्रीय कर्करोग संस्था : कोम्पिमेंतरी व पर्यायी औषधे - वार्षिक अहवाल
४. राष्ट्रीय कर्करोग संस्था : ड जीवनसत्व व कर्करोग प्रतिबंध - शक्तीस्थळे आणि मर्यादा
५. जर्नल ऑफ क्लिनिकल न्युट्रिशन : ड जीवनसत्वाचे कर्करोग प्रतिबंधातील महत्व
६. साधक व बाधक आहार

विशेष टीप : शास्त्रीय संशोधनांतून अजून अमुक एक पदार्थ कर्करोगाशी मुकाबला करू शकतो, किंवा कर्करोग नियंत्रण करू शकतो असे निश्चित सिद्ध झालेले नाही. तथापि, विशिष्ठ पदार्थ आहारात समाविष्ट केल्यास सर्वसाधारण प्रकृतीस्वास्थ्याबरोबरच कर्करोग नियंत्रण होऊ शकते…डॉक्टर अमिता पुरोहित




विराज नाईक यांनी केलेला मराठी अनुवाद...

DrAmita Kulkarni Purohit

http://www.facebook.com/purohitamita

 

Visit Our Page