Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Monday, February 22, 2016

बीजग्रंथीदोष – बीजग्रंथीविकार Polycystic Ovarian Disease / Syndrome (PCOD / PCOS)


बीजग्रंथीदोष – बीजग्रंथीविकार
Polycystic Ovarian Disease / Syndrome (PCOD / PCOS)
“मातृत्व” म्हणजे स्त्रीजातीला लाभलेले सर्वात मोठे वरदान !! पण आजकाल बऱ्याच स्त्रिया यापासून वंचित रहात आहेत. ह्याचे कारण ‘वंध्यत्व’, आजकालच्या युगातील भयंकर समस्या, अगदी मृत्यूपेक्षाही भयंकर. . . . !! सामान्य भाषेत वंध्यत्व म्हणजे मूल न होणे.
आयुर्वेदात गर्भधारणेसाठी चार प्रमुख कारणे सांगितली आहेत.
ध्रुवं चतुर्णां सान्निध्याद्गर्भः स्याद्विधिपूर्वकम् | ऋतुक्षेत्राम्बुबीजानां सामग्र्यादङ्कुरो यथा || सु. शा. २/३३
१. ऋतु – गर्भधारणा होण्यासाठी योग्य काळ (रजःस्रावानंतरचे १२ ते १६ दिवस)
२. क्षेत्र – गर्भधारण करण्यासाठी अवयवांची उत्तम स्थिती (गर्भाशय)
३. अम्बु – गर्भपोषणासाठी लागणारा रसधातु
४. बीज – दोषरहित व सर्वगुणसंपन्न पुरुष व स्त्रीबीज
ह्या चार कारणांमध्ये काही बिघाड असणे हीच वंध्यत्वाची कारणे आहेत. ह्यात सर्वात महत्वाचे व मुख्य कारण आहे “बीजदुष्टी”.
बीजदुष्टी विषयावर सविस्तर बोलायचे झाल्यास त्याचा विचार खालीलप्रमाणे करता येईल.
          आयुर्वेदामधील कार्यकारणभाव सिद्धांतानुसार कारणाशिवाय कोणत्याही कार्याची उत्पत्ती होत नाही. गर्भनिर्मितीसाठी लागणारे समवायी कारण म्हणजे बीज होय.
आयुर्वेदामधील बीज ह्या मुद्द्याला आधुनिक विचारांमध्ये मांडायचे झाल्यास :-
१) स्त्रीबीज म्हणजे Ovum, Ovaries विषयीच्या समस्या
२) पुरूषबीज (Sperms)
          आधुनिक शास्त्रानुसार हा व्याधी म्हणजे Polycystic Ovarian Disease / Syndrome (PCOD / PCOS) होय. सुमारे ५० ते ७३ % स्त्रियांमध्ये हाच विकार वंध्यत्वाला कारणीभूत असतो. (PCOD / PCOS) हा एक विविध व्याधी लक्षणसमुच्चय आहे, ज्यामध्ये – आर्तव क्षय / अनार्तव (Oligomenorrhoea / Amenorrhoea), वंध्या / नष्टार्तव (Anovlulation), असृजा योनि (DUB), स्त्रियांना दाढी-मिशा येणे (Hirsutism), मेदवृद्धी (Weight gain), त्वचेवर काळ्या जाडसर वळ्या होणे (Acanthosis nigricans / Hyperpigmentation on neck & face), इन्सुलिन प्रतिकार (Insulin resistance), जननयंत्रणेतील अन्तःस्रावी ग्रंथींच्या स्रावांचा उद्रेक + स्त्रियांना दाढी-मिशा येणे + इन्सुलिन प्रतिकार ह्या व्याधींचा समुच्चय (Hair-AN syndrome) ह्यांचा समावेश होतो.
         सध्याच्या धावपळीच्या जीवनात आहार, विहार आणि आचार ह्यातील असमतोल, अवेळी भोजन - प्रवास, निकृष्ट खाद्यपदार्थ, मलमूत्र वेगांना रोखण्याची सवय, विविध चिंता, मानसिक ताणतणाव, व्यायामाचा अभाव, मोबाईल सदृश विद्युतचुंबकीय लहरींचा उपसर्ग इ. कारणांमुळे मासिक रजःस्राव तसेच स्त्रीबीज निर्माण प्रक्रियेवर विपरीत परिणाम झालेला दिसून येत आहे.
            लाक्षणिक तत्वांवर वेध घेतल्यास आयुर्वेदोक्त आर्तवक्षय, अल्पार्तव इ. अवस्थांमध्ये त्याचे वर्गीकरण करता येते.
“आर्तवक्षये यथोचित काले अदर्शनम् अल्पता योनिवेदना वा l”
आर्तवक्षयात योग्यवेळी मासिक रजोदर्शन न होणे अर्थात (Irregular menses) - आदर्शनं (Amenorrhea), योनिवेदना (dyspareunia) ही लक्षणे दिसून येतात.
आर्तवक्षयाची संप्राप्ती दोन प्रकारे वर्णन करता येते.
क्षयात्मक संप्राप्ती - ह्यात रसादिधातूंमध्ये दुष्टी असते. त्यामुळे रसधातूनंतर निर्माण होणारे उत्तरोत्तर धातु पुष्ट होत नाहीत. परिणामी रसदुष्टीमुळे आर्तवक्षय, रक्तदुष्टीमुळे मुखदूषिका, मांसदुष्टी, मेदोदुष्टी (धात्वाग्निदुष्टीमुळे मेदसंचिती) इ. लक्षणे दिसून येतात.
मार्गावरोधात्मक संप्राप्ती – ह्यामध्ये धात्वाग्निमांद्य किंवा दुष्टी इतक्या प्रमाणात नसते परंतु रजोरूप आर्तवाचा मार्ग अवरुद्ध होतो.
“. . . तत् अधः प्रतिहतः उर्ध्वं आगच्छत् ll”
त्यामुळे रजाला उर्ध्वगति प्राप्त होते व ते उर्ध्वगामि रज उदर (गर्भाशय) व स्तनप्रदेशी संचित होऊन तेथे पोषण करते. ह्यामध्ये वजन वाढणे हे लक्षण दिसून येते.
अशाप्रकारे आयुर्वेदानुसार हा लक्षणसमुच्चय वर्णन करता येतो. PCOD / PCOS मध्ये स्त्रीबीज वेळेवर तयार होत नसल्याने स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे हे प्रधान कारण आहे.
PCOD / PCOS Investigations
(1) USG (Pelvis) shows ˃ 12 follicles of 2-9 mm diameter, increased ovarian volume ˃ 10 cm3 (2) LH elevated ˃ 10 mIU/ml; (3) LH : FHS ˃ 3 : 1 (4) Elevated serum Oestradiol, Oestrone (5) Androstenedione (6) ↑ Serum testosterone (7) ↑ Serum Insulin (8) ↑ Prolactin (9) BMI ˃ 25 kg/m2 (10) Waist to hip ratio ˃ 0.85
PCOD / PCOS चिकित्सा
आधुनिक वैद्यक शास्त्रानुसार Weight reduction, Combined O.C. pills, Spironolactone, Metformin, Surgery (Endoscopic cauterization)
आयुर्वेदानुसार चिकित्साक्रम – शोधन - शमन चिकित्सा व संतुलित आहार – विहार
शोधन चिकित्सा: पंचशोधन किंवा पंचकर्म हे आयुर्वेदाचे ठळक वैशिष्ट्य आहे. बीजशुद्धीकरिता शरीरशुद्धी होणे महत्वाचे आहे. ह्यात वमन, विरेचन, बस्ति, नस्य व रक्तमोक्षण क्रियांचा अंतर्भाव होतो.
वमन : विशिष्ट औषधी द्रव्यांच्या सहाय्याने उलटी करविणे म्हणजे वमन. बीजदुष्टीमध्ये जेव्हां कफदोष प्राधान्य असते तेव्हां वमनाचा उपयोग होतो.
विरेचन : तोंडावाटे औषध देऊन मलप्रवृत्तीद्वारे दोष बाहेर काढण्याच्या क्रियेला विरेचन म्हणतात. बीजातील पित्तप्रधान दोषदुष्टीच्या निर्हरणासाठी ह्या क्रियेचा उपयोग होतो.
बस्ति : गुदमार्गाने (किंवा योनिमार्गाने – उत्तरबस्ति) औषधी द्रव्य प्रविष्ट करून दोषनिर्हरण करण्याच्या क्रियेला बस्ति चिकित्सा म्हणतात. गर्भाशय, अंडाशय (Ovaries) इ. अवयव हे अपानवायूच्या कार्यक्षेत्रात येतात व बस्ति ही अपानवायुची प्रधान चिकित्सा आहे.
बस्तिचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात.
१) आस्थापन / निरूह बस्ति – ह्यामध्ये औषधी द्रव्यांचा क्वाथ तयार करून त्याला गुदमार्गे प्रविष्ट करतात. ह्याकरिता दशमूळ क्वाथाचा वापर प्राधान्याने केला जातो. दशमूळ क्वाथ हा कफवातशामक, दीपन, आमपाचक व शोथहर आहे. दशमूळ क्वाथातील द्रव्यांमध्ये बीजकोशातील स्थानिक शोथ (cystic follicles) कमी करण्याची गुणवत्ता आहे. ह्यामुळे हायपोथॅलॅमिक पिट्युटरी ओव्हेरियन अॅक्सिस (HPO Axis) चे नियंत्रण होऊन उत्तम बीज परिपक्वतेस मदत होते.
२) अनुवासन बस्ति - ह्यामध्ये औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेली तेले गुदमार्गे प्रविष्ट केली जातात. तीळ तेल, सहचर तेल सारख्या विविध तेलांचा उपयोग ह्यासाठी प्रसिद्ध आहे. तेल हे सर्वात श्रेष्ठ वातहर द्रव्य आहे. ह्याने वाताचे अनुलोमन होऊन मासिक रजःस्रावाचे चक्र सुरळीत होण्यास मदत होते.
नस्य : नाकाने औषधी द्रव्य प्रविष्ट करण्याच्या क्रियेला नस्य म्हणतात. हे औषध शृङ्गाटक मर्मापर्यंत पोहोचते व आपले कार्य करते. गर्भधारणेसाठी आवश्यक असलेली मस्तिष्कातील यंत्रणा संतुलित करून पुरुषबीज निर्मिती उत्तम रीतीने व्हावी व स्त्रीबीज निर्मितीसाठी आवश्यक होर्मोन्सचे संतुलन व्हावे ह्यासाठी आयुर्वेदात गर्भस्थापक / प्रजास्थापक वनस्पतींचा उल्लेख आहे. पुरुषांत टेस्टोस्टेरॉन व स्त्रियांमध्ये FHS व LH वर ह्यांची क्रिया घडते हे आधुनिक वैद्यक शास्त्रानेही मान्य केले आहे. ‘नासाहि शिरसो द्वारं . . .’ ह्या सूत्रानुसार ह्या वनस्पतींचा प्रयोग नस्यस्वरूपात करावा.
“ऐन्द्रीब्राह्मीशतवीर्यासहस्रवीर्याsमोघाsव्यथाशिवाsरिष्टावाट्यपुष्पीविष्वक्सेनकान्ता इति दाशेमानि प्रजास्थापनानि भवन्ति l” . . . . . . . चरक, सूत्रस्थान ४/१८ (४९)
उपतोक्त संदर्भानुसार प्रजास्थापक वनस्पतींनी सिद्ध केलेल्या घृताची निर्मिती एका नामांकित कंपनीने केली असून त्यावर अधिक संशोधन सुरु आहे. ‘प्रजांकुर’ नावाने उपलब्ध असलेले हे घृत होर्मोन्सचे संतुलन साधित ह्या विकारात नक्कीच उपयुक्त होईल असा विश्वास वाटतो.
रक्तमोक्षण – विशिष्ट मात्रेत शरीरातून रक्त बाहेर काढण्याच्या क्रियेला रक्तमोक्षण म्हणतात. रक्तातील पित्तदोष काढून टाकण्यासाठी ही चिकित्सा आहे. स्त्रीच्या हिमोग्लोबिनची पातळी व इतर लक्षणे पाहून मगच रक्तमोक्षण करण्याबाबत निर्णय घ्यावा. लोखंडी कढया, तवे, पातेल्या, पळ्या ह्यांसारख्या स्वयंपाकातील भांड्यांची जागा टेफलॉन विलेपित भांड्यांनी घेतल्याने हिमोग्लोबिनची पातळी सहसा खालावलेलीच असते. शिवाय स्त्रियांमध्ये मासिक रजःस्रावामुळे रक्तक्षय होतो. त्यामुळे रक्तमोक्षण करण्याची विशेष आवश्यकता भासत नाही.
शोधन चिकित्सेनंतर शमन चिकित्सेमध्ये प्रामुख्याने खालील योग वापरले जातात:-
शतपुष्पा + शतावरी; हरीतकी + शुण्ठी; लताकरंज + यष्टिमधु + यवक्षार; पाठा + त्रिकटु + कुटज; सारिवा + मंजिष्ठा; तिल + गुड + भरङ्गी. त्याचबरोबर कल्पांमध्ये कुमारी आसव; दशमूलारिष्ट; लाताकरंज घन वटी; चंद्रप्रभा वटी; पुष्पधन्वा; रजःप्रवर्तनी वटी; आरोग्यवर्धिनी ह्यांसोबत फलमाह वटीचा वापर उत्तम ठरेल.
उत्तम, सकस व योग्य आहार, व्यायाम, योगासने, सूर्यनमस्कार, सर्वांगासन, पश्चिमोत्तानासन, हलासन, प्राणायाम ह्यांचाही उपयोग होतो असे दिसून येते.
PCOD / PCOS मध्ये आहार
          जगण्यासाठी अन्न ही मानवाची प्राथमिक गरज आहे. परंतु काळाच्या ओघात हेच अन्न विकृत पद्धतीने सेवन करण्याची सवय समाजात जडली व अनेक प्रकारच्या संतर्पणजन्य आजारांचे कारण बनू लागली आहे.
ताजा, सकस, सात्विक, लघु आहार व शिळा, निकृष्ट, तामसी, गुरु अशा दोन प्रकारच्या आहारप्रणाली आहेत. पहिली आरोग्यदायी तर दुसरी रोगकारक आहे.
           ह्यामध्ये मेदसंचिती असल्यास वजन कमी करणे अपरिहार्य आहे. स्थूल असणाऱ्या रुग्णांनी भोजनाच्या वेळा ठरवून सकाळी पोटभर नाश्ता, दुपारी मध्यम भोजन व रात्री अल्प आहार घ्यावा. नाश्त्यामध्ये फळे, फळांचा रस असावा. दुपारी षड्रसात्मक असा मध्यम आहार घ्यावा. ह्यात दूध, खिचडी, केळी, गरम दही, गरम मध, फळे घेण्याचे टाळावे. दुपारचे जेवण भरपेट नसावे. जेवणानंतर दुपारी झोपणे अत्यंत रोगकारक आहे. “भुक्त्वा राजवदासीत यावदन्नक्लमो गतः ततः पादशतं गत्वा . . . ” अर्थात जेवणानंतर राजासारखे बसून विश्रांती घ्यावी व अन्नमद (जडपणा) गेल्यानंतर शतपावली करावी असा शास्त्रादेश आहे.
पथ्य – अर्थात काय खावे?
• पालेभाज्या, बीट, फळे, डाळींचे सूप, टाक, सरबत, भाज्यांचे सूप, गरम पाणी
• भाजलेले पदार्थ, गरम अन्न, व्यवस्थित शिजवलेले अन्न, बदाम, काजू, भाकरी, नाचणी, बाजरी, उडीद, मूग, मसूर, कुळीथ, कांदा, लसूण, तीळ, अंडी, मासे
• उसाचा रस, मध, जव, मका, साजुक तूप
अपथ्य – अर्थात काय खाणे टाळावे?
• आंबा, केळी, दूध व फळे एकत्रितपणे (फ्रूटसालड)
• मलई, लस्सी, फ्रीजचे पाणी / अन्य शीतपेये, दही, सलाड
• बेकरीचे पदार्थ, सामोसा, वडा, पेस्ट्री, केक्स, चॉकलेट्स, मिठाया, खवा, लोणी, डबाबंद पदार्थ
• गरम दही, शिळे अन्न, आंबवलेले पदार्थ, तळलेले पदार्थ, शेंगदाणे, सॅंडविच
लेखक –
प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार (आयुर्वेद वाचस्पति)
स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग, पोदार वैद्यक महाविद्यालय
+917738086299
+919819686299
subhashmarlewar@gmail.com

Sunday, February 21, 2016

आयुर्वेदातुन आरोग्याकडे

आयुर्वेदातुन आरोग्याकडे
चहा बिस्कीट वा दुध बिस्कीट
लहान मुलांपासुन ते मोठ्यामध्ये आवडीने खाल्ले जाणारे १ combination म्हणजे चहा बिस्कीट वा दुध बिस्कीट.
दुध पौष्टीक पदार्थ बिस्कीटाचा कोरडापणा दुर कमी करण्यासाठी द्रवरूपी दुधाचा व चहाचा उपयोग होतो.
बिस्कीट तयार झाल्यानंतर काही दिवसानी वा काही महिण्यांनी वा १-२ वर्षांनी कंपनीतुन आपल्या घरी पोहचतात.
कुठल्याही पदार्थांवर संस्कार झाल्यानंतर ते लगेच एका अहोरात्रीत खाणे अपेक्षीत असते. रात्र उलटुन गेल्यानंतर ते पर्युषित म्हणजे शिळे अन्न बनते.
नुसते बिस्कीट खाणे म्हणजे शिळे अन्न खाणे होय. नेहमी शिळे अन्न खाल्ल्यानंतरचे होणारे त्रास नेहमी फक्त बिस्कीट खाणारया व्यक्तीस होऊ शकतात.
गरम चहा अथवा गरम दुधासह थंड असलेले बिस्कीट खाणे हे संयोग विरूध्द अन्नाचे उदाहरण ठरते. कारण थंड व गरम यांचा संयोग विरूध्द गुणात्मक होतो.
नमकीन खारे बिस्कीट दुध वा चहासह घेणे हेही विरूध्द अन्नाचा १ प्रकार होतो. कारण मीठ व दुधाचा संयोग विरूध्द ठरतो.
नेहमी विरूध्द पध्दतीतील चहा दुध बिस्कीट खाण्यात येत असतिल तर विरूध्द अन्न सेवन जन्य व्याधी उत्पन्न होऊ शकतात..
🍀विरूध्द पदार्थ सेवनाने होणारे त्रास🍀
विरूध्द पदार्थ सेवनाने शास्रानुसार पुढील आजार होतात.....
नपुंसकता, आंधळेपणा, विसर्प( herpes zoster), जलोदर( पोटात पाणी साचणे),विस्फोट(शरीरावर फोड निर्माण होणे), उन्माद, भंगदर, मुर्च्छा, मद, पोट गच्च होणे, गळ्याचे आजार,पांडुरोग(रक्त कमी होणे) आमविष(पचन न झाल्याने उत्पन्न विष) पांढरा कोड, विविध त्वचाविकार सोरियासिस,ग्रहणीरोग( ibs),सर्वांगास सुज, अम्लपित्त, ताप,सर्दी पडसे, संतानदोष, गर्भात दोष किंवा बाळाचा मृत्यु हे सर्व विकार विरूध्द पदार्थ सेवनाने होतात. फक्त विविध आजार टाळण्यासाठीच नाहीतर उत्तम संतती प्रजानिर्मितीसाठी देखील विरूध्द पदार्थ टाळावेत नाहीतर कालांतराने गंभीर दिसावयास लागतात.विरूध्द सेवन करणारया लोकांनी तो बंद करावा काही त्रास असल्यास आयुर्वेदीय चिकित्सा विषयक सल्ला जरूर घ्यावा......
🔥 विरूध्द अन्न पचविणारे व्यक्ती 💪🏻
व्यायामस्निग्धदीप्ताग्निवयःस्थबलशालिनाम् | विरोध्यपि न पीडायै सात्म्यमल्पं च भोजनम्|| वा.सु. ७/४६
व्यायाम करणारे, स्निग्ध आहार घेणारे, अग्नि भुक चांगली असणारे, तरूणवयात व बलवान अशा लोकांत जरी विरूध्द अन्न सेवन केले तरी फारसे विकार होत नाही. तसेच सवयीमुळे व कमी प्रमाणात विरूध्द अन्न फारसे बाधक ठरत नाही...
बिस्कीट आजच्या काळातील निर्मित पदार्थ आहे तरी तो आयुर्वेदातील असेवनीय पदार्थांपैकी १ मानता येईल. म्हणजे न खाण्याजोगा पदार्थ..
असेवनिय पदार्थ हे इतर काहीही खाण्यास उपलब्ध नसताना भुक भागविण्यासाठी खाता येऊ शकतात.
किंवा बिस्कीटाचा काही विशिष्ट लोकांत औषधी म्हणुन उपयोग होत असेल तर खाता येऊ शकते. पण ही condition rare च असेल.. नित्य बिस्कीट सेवन करणारयांनी गुणधर्मांचा विचार आवश्य करावा...

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका 
नांदेड
 9028562102, 9130497856
( if you want daily post on whats up plz send your name & whats up no on --- 9028562102 )

Thursday, February 18, 2016

सूतिका परिचर्या अर्थात काळजी बाळंतीणीची . . . .


सूतिका परिचर्या अर्थात काळजी बाळंतीणीची . . . .
‘मातृत्व’ ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यतील एक विशेष व आनंददायी घटना असते. मात्र प्रसूतीनंतर योग्य काळजी घेतली गेली तरच ती खऱ्या अर्थाने आनंददायी ठरते. प्रसूतीच्यावेळी स्त्रीचा एक पाय भूलोकांत तर दुसरा पाय यमलोकात असतो असे काश्यपाचार्यांनी म्हटले आहे. सूतीकावस्था ही प्राकृत स्थिती असली तरीही प्रसववेदनांनी शल्यभूत असा गर्भ बाहेर टाकल्यानंतर तिच्या शरीरात धातुक्षय व बलक्षय निर्माण होतो. हा क्षय भरून शरीर प्राकृत अवस्थेत येईपर्यंत तिला सूतिका परिचर्येचे पालन करणे आवश्यक असते. अन्यथा त्याचे दूरगामी परिणाम होऊन स्थिरत्व, दृढत्व, निरोगीपण राहणे शक्य होत नाही.
सूतायाश्चापि तत्र स्यादपरा चेन्न निर्गता l प्रसूताऽपि न सूता स्त्री भवत्येवं गते सति ll
. . . . . का.स. खिल, सूतिकोपक्रमणीयाध्याय
अपरापतन जेव्हां पूर्ण होते तेव्हांच स्त्रीला ‘सूतिका’ म्हणून संबोधले जाते.
सूतिकावस्था कालावधी –
सार्ध मासान्ते l म्हणजेच स्त्रीची सूतिकावस्था दीड महिन्यापर्यंत असते.
१. प्रथम १० दिवस : क्षत आणि व्रणामुळे ह्या काळातील परिचर्या व्रणरोपणाच्या दृष्टीने करावी. गर्भाशयात ज्या ठिकाणी अपरा विभक्त होते त्याठिकाणी ह्याचा केंद्रबिंदू असतो.
२. प्रथम दीड महिना : ह्या काळातील परिचर्या विशेषतः स्तन, स्तन्य आणि त्र्यावर्ता योनीच्या स्वास्थ्यरक्षणाच्या दृष्टीने आखली आहे. गर्भाशयाची पूर्वस्थिती प्राप्त करणे स्तन्यपुष्टी ह्या काळात अभिप्रेत आहे.
३. पुढील रजोदर्शनापर्यंतची कालमर्यादा : २ ते ६ महिन्यांपर्यंत हा कालावधी असू शकतो. काही सूतिकांमध्ये रजोदर्शन होण्यापूर्वीच पुन्हा गर्भधारणा होऊ शकते त्यांना ‘मिंध्या’ गर्भिणी म्हणतात.
सूतिका परिचर्या आवश्यकता –
प्रसूतीनंतर स्त्रीशरीर व उदाराचा खालचा भाग शिथिल होतो, वाढतो, शरीराला लट्ठपणा आणि बेडौलपणा येतो. शारीरिक दौर्बल्याबरोबरच मानसिक दौर्बल्यही आलेले असते. म्हणून सूतिका परिचर्येचे पालन करणे आवश्यक आहे.
१) सूतिका व्रणी असते
२) तिच्यात रक्तस्रावजन्य व क्लेदजन्य धातुक्षय असतो
३) प्रसवक्रियेतील प्रवाहणामुळे वातप्रकोप झालेला असतो
४) धातुक्षय झाल्यामुळे अग्निमांद्य व धात्वाग्निमांद्य येते
५) ह्या काळात होणारे स्तन्यप्रवर्तन
६) योनिदोष व ग्रहबाधा ह्यांपासून सूतिकेचे संरक्षण करावे लागते
प्रसूतीच्यावेळी जेव्हां अपरा गर्भाशायापासून विलग होते तेव्हां त्याठिकाणी व्रण निर्माण होतो. म्हणून सूतिकेला व्रणी म्हणतात आणि त्यानुसार तिची व्रणरोपण किंवा क्षतरोपण चिकित्सा करावी लागते.
सूतिका कालांतर्गत परिवर्तन -
१) गर्भाशयाचा आकार कमी होणे (Involution of uterus) : अपरापतनानंतर लगेच गर्भाशय संकोच होऊन नाभीच्या खाली जघन संधानकाच्या ५ इंच वर असते. पुढे गर्भाशयाची उंची प्रतिदिन १.२५ सेंटीमीटरने कमी होते. ११-१२ व्या दिवशी गर्भाशय संकोचन श्रोणीमध्ये पूर्णपणे स्थिरावते.
२) गर्भाशयाच्या निम्नखंड व ग्रीवेमध्ये परिवर्तन : प्रसवानंतर गर्भाशयग्रीवेत क्षत होते. ग्रीवामुख हळूहळू संकुचित होते. जसजसे गर्भाशयमुख संकुचित होते, तसतशी ग्रीवा कठीण व जाड होते व ग्रीवागुहा पुनःनिर्मिती होते.
३) योनी व योनिमुख : प्रसवानंतर योनी व योनिमुख संकुचित होतात. परंतु अप्रसवेच्या स्थितीपर्यंत येत नाहीत व योनिशैथिल्य येते. तेथे वात दूषित होतो. योनीच्या अतिशैथिल्यामुळे पती व पत्नी दोघांचेही कामजीवन असमाधानी राहून मानसिक स्वास्थ्य खालावते. ह्याकरिता चिकित्सा अन्यत्र वर्णन केली आहे. (सूतिका परिचर्या तत्व क्र. ८ पाहावे)
सूतिका परिचर्या तत्वे –
१. आश्वासन : अपरापतन व प्रसव काळातील रुग्णेची मानसिक अवस्था लक्षात घेता ‘आश्वासन चिकित्सा’ सामान्य असली तरी आवश्यक आहे.
२. स्नेहन व मर्दन : सूतिकेच्या अधोदर, कटि व पृष्ठभागी दररोज सकाळी व संध्याकाळी बला तेल, तीळतेल, चंदनबला लाक्षादि तेल, सूतिकाभ्यंग तेल पैकी एकाने अभ्यंग करावे. त्यानंतर हळदीचे वस्त्रगाळ चूर्ण अंगात जिरवावे व उष्णोदकाने स्नान घालावे. मर्दनाने प्रकुपित वाताचे व तज्जन्य शूलाचे शमन होते. स्नानानंतर कटिप्रदेशी स्वेदन (शेक) करावे.
३. पट्टबंधन : वेष्टयेत् उदरम् l म्हणजेच पोट बांधणे, पश्चात स्वच्छ व जाड वस्त्राने कुक्षी, पार्श्व, पृष्ठ, उदर हे भाग घट्ट बांधावे. ह्याने गर्भवाढीमुळे शिथिल झालेल्या उदरात वायूचा प्रवेश होत नाही, उदाराचा आकार वाढून शरीर बेडौल होत नाही.
४. स्नेहपान : पट्टबंधनानंतर पचेल इतका स्नेह दीपन – पाचन द्रव्यांसमवेत द्यावा. ह्यात पिंपळी, पिंपळीमूळ, चव्य, चित्रक, सुंठ, ओवा, जिरे, सैंधव, मरीच अशा द्रव्यांचा समावेश होतो. प्रसवामुळे उत्पन्न झालेल्या वातप्रकोपासाठी स्नेहपान चिकित्सा अत्यंत महत्वाची ठरते.
५. गर्भाशयशोधन : प्रसूतीनंतर गर्भाशयशोधनासाठ
ी मास, कृष्णबोळ गुळासोबत द्यावा व दशमूलारिष्ट समभाग पाण्यातून द्यावे. शिवाय लताकरंज आणि पिंपळमूळ चूर्णाचा उपयोग करावा. ह्याने गर्भाशय प्राकृत स्थितीत येण्यास मदत होते.
६. कोष्ठशोधन : कोष्ठशोधनार्थ एरंडतैल सुंठीच्या काढ्यासोबत द्यावे. ह्यामुळे प्रकुपित वायूचे शमन व मलशोधन होते. कोष्ठशोधनाने दोषदुष्टी दूर होऊन आमसंचिती होत नाही.
७. रक्षोघ्न : सूतीकेस उष्णोदकाने योनिप्रक्षालन करावयास सांगून योनिधूपन करावे. ह्यासाठी चंदन, धूप, लसूण साल, ओवा, शेपा, वचा, कोष्ठ, अगरु अशी प्रकृतीनुसार दव्ये वापरावीत.
८. योनिशैथिल्य : प्रसूतीनंतर योनिशैथिल्य आल्यास लोध्र साल, पलाशबीज, उदुंबरफल चूर्ण तेलात मिसळून त्याचे योनिधारण करावे. अम्ल – कषाय सिद्ध तेलाचे पिचुधारण करून मग क्षीरी वृक्षांच्या काढ्याने योनिधावन करावे. सायंकाळी योनिभागी अभ्यंग करून धूपन करावे. ह्याने योनिभाग निर्जंतुक होऊन शोफ, लाली, व्रण भरून येतात. अपत्यपथ व योनि संकुचित होऊन प्राकृत स्वरूपात येतात. ह्याचबरोबर सूतिकेने सर्वांग अभ्यंग करून घ्यावा. प्रसूतीपश्चात मातृ स्वास्थ्यरक्षणासाठी ‘सूतिकाभ्यंग तेल’ वापरावे.
प्रसवामुळे सर्व धातु दुर्बल होऊन त्यांची झीज होते. ही झीज भरून काढण्यासाठी व गर्भाशयाचा प्राकृत संकोच होण्यासाठी विशेष अभ्यंग तेलाचा पाठ अष्टांगहृद्य शारीरस्थान २/४७ मध्ये वर्णन केलेला असून महर्षी वाग्भटांचा ‘गर्भविकास व मातृपोषणाचा’ विचार करतांना हे विसरून कसे चालेल?
आहार व विहार –
सुश्रुताचार्यांनी अभ्यंगानंतर वातघ्न औषधीपान व तद्नंतर परिषेक करण्यास सांगितले आहे. पंचकोल चूर्ण उष्णोदकाबरोबर, विदारिगंधादि सिद्ध स्नेह यवागु / क्षीर यवागु पानार्थ द्यावे. नंतर यव, कोल, कुलत्थ सिद्ध जांगल मांसरस, शालिगोदन बल आणि अग्निनुसार द्यावे.
कच्च्या डिंकाचा लाडू, सुंठ + तूप + साखर सकाळी घ्यावे. ह्यामुळे अधोदराच्या स्नायूंना बल प्राप्त होते व योनिशैथिल्य कमी होते.
लसणीचे तिखट, मुरलेले लिंबाचे लोणचे ह्यामुळे संचित क्लेद, रज, जरायु शेष बाहेर पडण्यास मदत होते. लसूण घालून तांदळाची धिरडी, तिखट मिठाचा सांजा सेवन करावा. लसणामुळे पुनर्नवीभवन, स्नायूंची झीज भरून काढणे व योनिभागाचे विवृतास्यत्व कमी होते.
सुंठ, गूळ, तूप घातलेल्या सुंठीच्या वड्या, खसखस घालून आल्याच्या वड्या, मेथी, सुंठ, आले, लसूण, जुने तांदूळ, ओवा, आवडत असल्यास बाळंतशोपा, बडीशेप यांचा वापर करून पथ्यकर अन्नाचा वापर करावा. ह्याने दर्जेदार व मुबलक दूध बालकाला मिळते.
खारीक पूड ओल्या खोबऱ्याबरोबर व दूध द्यावे, नाचणीची कांजी, कढण असे द्रव पदार्थ भरपूर द्यावे. ह्यामुळे स्त्रीची प्रकृती स्वस्थ राहून बांधा सुदृढ होतो. स्तनभागाला शैथिल्य येऊ नये म्हणून घट्ट बंध बांधावा.
आहारामध्ये खालील खीरींचा समावेश करावा –
• खारीक – बदाम खीर • खसखस – बदाम खीर • आहाळीवाची खीर • कापसाच्या सरकीची खीर • कणीक तुपात भाजून दुधात घालून केलेली खीर
ह्या खीरींमुळे वायूचा उपशम होतो, शरीराची झीज भरून निघते व स्तन्य निर्मिती मुबलक होऊन बालकाला उत्तम दुधाचा पुरवठा होतो.
देश व काळानुसार परिचर्या बदलते –
• मुंबईसारख्या आनूप देशात अभिष्यंद अधिक असल्याने स्नेहपान कमी व स्वेदन अधिक करावे.
• सोलापूर सारख्या कोरड्या म्हणजेच जांगल प्रदेशात स्नेह अधिक प्रमाणात द्यावा. मुलगा झाल्यास तेल व मुलगी झाल्यास तूप द्यावे असे काश्यपमुनी सांगतात.
• साधारण देशात स्नेह व स्वेद दोन्ही करावेत.
• विदेशी लोकांमध्ये मांसरस, रक्त किंवा मांसाचे सूप देतात.
• कंदमुळे, ओट्स, बीट, बटाटे इ. पदार्थांचा वापर आहारात करावा.
• ह्याशिवाय कुलसात्म्याचा विचार करून आहार द्यावा.
औषधी योग –
१. बृहत् पंचमुळांचा काढा सैन्धवासह , २. सौभाग्यशुण्ठी पाक, ३. मिश्री, पुनर्नवा, गोक्षुर, जेष्टमध चूर्ण तुपाबरोबर द्यावे. ४. सुंठ, साखर, तूप द्यावे, ५. विदारीकंद क्वाथ सैन्धवासह द्यावा. तूप, पिठीसाखर, केशर खाण्यास द्यावे ६. अनुलोमनासाठी भारङ्गी, काकडशिङ्गी, धामसा ह्यांचा क्वाथ द्यावा ७. गुडुची – आमलकी सिद्ध क्षीर द्यावे. ८. सूतिका कषाय –
सूतिका काळामध्ये त्र्यावर्ता योनि स्वस्थितीत येण्यासाठी भावप्रकाश वर्णित सूतिका कषायाचा वापर म. आ. पोदार रुग्णालयात मी करीत असतो.ह्याचा निश्चित असा लाभ झाल्याचे माझ्या निदर्शनास आले. ह्या पाठामध्ये गुडुची, सुंठ, सहचर, मुस्ता, उशीर, त्वक्, बृहत् पंचमुळे ह्या द्रव्यांचा वापर केलेला आहे. ह्या द्रव्यांची भरड समान मात्रेत घेऊन त्याचा ४० मिली काढा जेवणानंतर २ वेळा पानार्थ वापरावा. सदर काढा संचित दोष बाहेर पाडण्यासाठी असून स्वस्थ सुतीकेने वापरण्यासाठी आहे.
ह्या सूतिका कषायामुळे दीपन, पाचन व वातानुलोमन होऊन सूतिकारोग नियंत्रणात येतात.
Extra daily nutrient allowances for lactation (WHO / FAO – 1974)
Energy: 2600 Kcal, Protein: 44 gm, Vitamin D: 7.5 µg, Vitamin E: 8 mg, Vitamin C: 60 mg, Vitamin B2: 1.3 mg, Vitamin B3: 14 mg, Vitamin B6: 2 mg, Folate: 400 µg, Vitamin B1: 1.1 mg, Calcium: 800 mg, Iron: 18 mg, Zinc: 15 mg
योगासने –
प्रसूतीपश्चात नियमित योगासनांचा अभ्यास केल्यास वजन कमी होण्यास मदत होते, स्नायूंची कार्यक्षमता सुधारते, तणाव कमी होतो, शारीरिक उर्जा वाढण्यास मदत होते. ह्यात पुढील आसनांचा अवलंब करावा –
मार्जारासन (Pelvic floor exercise), पवनमुक्तासन (Full squats/ Squat hold), उत्तान ताडासन (Toe taps / Bridge), वक्रासन (Kick backs), उत्कटासन (Brisk walking posture), भुजंगासन (Modified cobra posture)
वरील योगासनांचा आभास एकाच वेळेस न करता ती आपल्या शारीरिक बलानुसार, झेपेल तीच योगासने करावीत. क्रमाक्रमाने मार्जारासनापासून सुरुवात करून दरदिवशी एका आसनाचा अभ्यास करावा. त्यामुळे शरीराच्या प्रत्येक अवयवाला लाघव प्राप्त होते, अग्नि प्रदीप्त होतो व सूतिकेला पूर्ववत कर्मसामर्थ्य प्राप्त होते. ह्या संदर्भात भारतीय शास्त्रज्ञ, महर्षी वाग्भट ह्यांनी अष्टांगहृदयात चपखल वर्णन केले आहे. ही आसने करतांना यम, नियमांचा अभ्यास सूतिकेने करावा अशी अपेक्षा आहे. प्राणायामादि प्रकार, नियम पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावरच करावेत.
ज्याप्रमाणे एखादे जुने वस्त्र खूप मळले असता ते धुवून स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला तर ते फाटण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे सूतिका अत्यंत थकलेली व म्लान असल्याने जर तिला विकार झाला तर उपचार करणे कठीण असते. म्हणून सूतिका परिचर्येचे पालन करावे. ह्याने स्त्रीची प्रकृती उत्तम राहून वाढलेल्या गर्भाशयाचे आकुंचन योग्य होऊन तो प्राकृत स्थितीत जाणे व योनिभागाला प्राकृत आकार येऊन तेथील स्नायूंचे बल वाढणे, त्याचप्रमाणे श्रमजनित थकवा, जननेंद्रियांची शक्ती पुन्हा भरून येणे व अंतरेंद्रिये म्हणजे ‘फलकोषादिकांचे स्रवण योग्य होणे हे उद्देश साध्य होतात.
लेखक
प्राध्यापक वैद्य सुभाष मार्लेवार, M. D. (Ayurved),
स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग, पोदार वैद्यक महाविद्यालय, मुंबई ४०० ०१८
+917738086299
+919819686299
subhashmarlewar@gmail.com
वैद्या पौर्णिमा हिरेमठ
M. S. Gyn (Scholar)

Monday, February 15, 2016

केस शरीरासाठी तैल


केस शरीरासाठी तैल
ऊर्ध्वमूलमधः शाखमृषयः पुरूषं विदुः|
मूलप्रहारिणस्तस्माद् रोगान् शीघ्रतरं जयेत्||
सर्वेन्द्रियाणि येनास्मिन् प्राणा येन च संश्रिताः|
तेन तस्योत्तरमागंस्य रक्षायामादृतो भवेत|| वा.उ.
           शरीराचे मुळ उर्ध्व भागी म्हणजे डोक्याच्या ठिकाणी आहे तर शरीरातील इतर भाग फांद्याप्रमाणे पसरलेले आहेत. सर्व इंद्रिय व प्राण शिरोभागी संश्रित असल्याने शिरोरूपी उत्तम अंगाचे रक्षण करावे.
केस फक्त सुंदर दिसावे याकरिता नसुन शरीरूपी मुळांची शेवटची टोक केस मानता येऊ शकतात. ज्यांच्या साह्यायाने काही प्रमाणात तेलरूपी पोषण शरीरात पोहचवता येते. केसांना लावलेले तेल सर्व शरीरात पोहचते. फक्त केसांसाठी नाहीतर पुर्ण शरीरासाठी डोक्याला तेल लावणे आवश्यक आहे...
काही ब्युटीशिअन तेल लावु नये असे सांगतात. अशा प्रकारे डोक्याला तेल न लावणे म्हणजे शरीराला मिळणारा पोषणाचा १ मार्ग बंद करणे होय..
          नारळाचे व डोक्याचे रचनात्मक साधर्म्य असल्या कारणाने डोक्याला तेल लावण्याकरिता खोबरेल तेल उत्तम असते. प्रकृती अनुशंगाने योग्य सल्ल्याने इतर तेलही केसांना लावन्यासाठी वापरता येतील. केसांना तेल लावणे हे फक्त केसांसाठीच नाही तर सर्व शरीरासाठी उपयोगी असते.
केसांना तेल न लावणारयांनी याचा विचार जरूर करावा...
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड.
वैद्य गजानन मॅनमवार
9028562102, 9130497856

Friday, February 12, 2016

"औषधी गर्भसंस्कार"


"औषधी गर्भसंस्कार"
'गर्भविकास व मातृपोषणाचा अद्भुत संगम'
         प्रजनन हा प्रत्येक सजीव प्राण्याचा नैसर्गिक धर्म आहे. अन्य प्राण्यांपेक्षा मनुष्य हा बौद्धिकदृष्ट्या श्रेष्ठ असल्याने केवळ प्रजनन नव्हे तर सु-प्रजनन होण्यासाठी काय करावे, कसे करावे, कोणी करावे, ह्या सर्व गोष्टींचे लाभ प्राप्त करण्यासाठी औषधी गर्भसंस्कारांचे महत्व आहे. ह्या विषयांच्या सखोल अभ्यासातून निर्मित १८ आयुर्वेदीय औषधी कल्पांचा संच म्हणजेच "औषधी गर्भसंस्कार".
संस्कार कशासाठी ?
         सोन्याचांदीचे दागिने पाहतांना आपले डोळे दिपून जातात पण मूळ खाणीतून मिळणारे सोने आहे तशा स्थितीत कधीही वापरता येत नाही. त्यात अनेक धातू, खनिजे, माती आणि अशुद्धी असतात. ह्या सर्वांमधून शुद्ध स्वरूपात सोने मिळविण्यासाठी त्यावर कित्येक संस्कार करावे लागतात. नंतर त्यातून दागिने घडविले जातात. अन्न पदार्थांवरही निरनिराळे संस्कार करावे लागतात तेव्हा ते पदार्थ रूपाने खाण्याजोगे होतात. संस्कार न करता प्रजनन होणे शक्य आहे पण सु-प्रजननासाठी शास्त्रशुद्ध आणि नैसर्गिक वनस्पतींचा वापर करून निर्माण केलेली उत्पादने खऱ्या अर्थाने सु-प्रजनन साध्य करू शकतात. हे आहे संस्कारांचे महत्व.
काळाची गरज :
        काळानुसार वाढत असलेला शैक्षणिक कालावधी, मानसिक ताणतणाव, स्वतंत्र कुटुंब पद्धती, खाद्यपदार्थातील कृत्रिम व रासायनिक रंग / प्रिझरव्हेटिव्हज, मोबाइल सदृश किरणोत्सर्गाचा दुष्परिणाम, प्रदूषण, लग्न करण्यासाठी कायद्याची वयोमर्यादा, भरमसाठ लोकसंख्या व त्यामानाने वैद्यकीय सुविधांची कमतरता अशा अनेक गोष्टी गर्भावस्थेतील दुष्परिणामांसाठी  कारणीभूत होतात. प्रजनन तर प्रत्येकच प्राणी करतो पण हे सर्व घटक अन्य प्राण्यांच्या बाबतीत होत नाहीत. प्रदूषण व विद्युतचुंबकीय लहरींचे परिणाम मात्र अन्य प्राण्यांवरही होतांना दिसतात. त्यामुळेच हल्ली चिमण्या अगदी दिसेनाशा झाल्या आहेत. मग गर्भाशयात वाढत असलेल्या चिमण्या जीवाला धोका पोचणार नाही का? त्यामुळे वंध्यत्व (मूल न होणे), बीजदोष (जेनेटिक आजार), प्रसूतीच्यावेळी अडचणी, गर्भस्राव, गर्भपात अशा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. गर्भावस्थेत होणारे निरनिराळे आजार व त्यातून गर्भावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी आयुर्वेदाच्या तिजोरीत अनेक अनमोल रत्नांचा खजिना दडलेला आहे. ह्या खजिन्याची गुरुकिल्ली म्हणजेच "औषधी गर्भसंस्कार".
दहा महिन्यांची गर्भावस्था :
         केवळ आयुर्वेदातच नव्हे तर ऋग्वेदापासून सत्यनारायणाच्या कथेपर्यंत किंवा मराठी विश्वकोशातही गर्भावस्था दहा महिन्यांची असल्याचे वर्णन मिळते. ही कालगणना भिंतीवरच्या प्रचलित दिनदर्शिकेनुसार नसून स्त्रीच्या मासिक ऋतुचक्रानुसार, म्हणजेच २८ दिवसांचा महिना धरून केली आहे. ह्याप्रमाणे २८० दिवस असो किंवा ४० आठवडे, गर्भावस्थेचे आयुर्वेदाचे गणित किती तंतोतंत आहे हे स्पष्ट होते.
औषधी गर्भसंस्कारांमधील १८ उत्पादनांचा संक्षिप्त परिचय :
अश्वमाह - पुरुष बीज सर्वांगीण सामर्थ्य वर्धनासाठी
प्रजांकुर घृत - श्रेष्ठ गर्भस्थापक नस्य, पुरुष व स्त्री उभायतांसाठी
फलमाह - निरोगी स्त्रीबीजप्रवर्तन, गर्भपोषण व विद्युतचुंबकीय लहरींचे दुष्परिणाम रोखण्यासाठी
प्रथमाह ते दशमाह - आचार्य वाग्भट वर्णित गर्भावस्थेच्या १० महिन्यांचे १० मासानुमासिक कल्प
• किक्किस निवृत्ति तेल - किक्किस (स्ट्रेचमार्क) नियामक उदराभ्यंग तेल
• सुप्रसव पिचु तेल - प्रसूतीमार्ग सुस्निग्ध, लवचिक व निर्जंतुक करून नैसर्गिक - सुलभ प्रसूतीसाठी
• सूतिकाभ्यंग तेल - गर्भावस्था व प्रसूतीचा शीण घालवून उत्तम मातृ आरोग्यासाठी
• क्षीरमाह - दर्जेदार व मुबलक स्तन्य निर्मितीसाठी
• हेमप्राश - शास्त्रोक्त सुवर्णप्राशन कल्प, बालकाच्या बौद्धिक आणि रोगप्रतिकार क्षमता वर्धनासाठी
सुप्रजननासाठी शास्त्रशुद्ध व काळाच्या कसोटीवर पारखून सिद्ध झालेले आयुर्वेदीय उपाय म्हणजेच "औषधी गर्भसंस्कार". ह्या "औषधी गर्भसंस्कारांचा" वापर करून अभेद्य असे सुरक्षा कवच निर्माण करता येईल. एवढेच नव्हे तर गर्भधारणा, गर्भविकास आणि मातृपोषण ह्या तीनही उद्देशांची परिपूर्ती साध्य होईल.
https://www.facebook.com/groups/

 
+917208777773
aushadhigarbhasanskar/

Thursday, February 11, 2016

आयुर्वेदातील भावना संस्कार आणि नॅनोटेक्नोलॉजी

आयुर्वेदातील भावना संस्कार आणि नॅनोटेक्नोलॉजी
        एका मीटरच्या १,०००,०००,००० (एक अब्ज भाग) एवढ्या सूक्ष्म भागाला नॅनोपार्टिकल म्हणतात. अशा नॅनोपार्टिकल भागाच्या औषधीनिर्माण शाखेला नॅनोटेक्नोलॉजी म्हणून प्रसिद्धी मिळत आहे. २९ डिसेंबर १९५९ रोजी रिचर्ड फिनमन नामक शास्त्रज्ञाने नॅनोटेक्नोलॉजी विषयावर प्रथम भाषण केले. ही नॅनोटेक्नोलॉजी मानवी शरीरात निसर्गाने जन्मतः बसवून दिली आहे असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही हे आपल्या लक्षात येईल.
         अन्नाचे चर्वण करतांना भौतिक विघटन आणि रासायनिक प्रक्रिया अशा दोन घडामोडी होतात. पचनसंस्थेतील सूक्ष्म स्रोतसंमध्ये आहार घटकांचे सुयोग्य शोषण होण्यासाठी ह्या दोन क्रिया आवश्यक असतात. दातांच्या घर्षणाने अन्नकण बारीक होतात आणि लाळेतील रसायनांच्या सहाय्याने अन्नकण पचनयंत्रणेत शोषले जाण्यासाठी आवश्यक अशा स्वरुपात तयार होतात. ह्याच संकल्पनेतून नॅनोटेक्नोलॉजीचा उगम झाला असावा. आयुर्वेदात, विशेषतः धातू व खनिजांच्या वापराच्या संदर्भात हा विचार अधिक मोलाचा असल्याचे दिसून येते.
          अत्यंत सूक्ष्म प्रमाणात वापरलेले औषधी द्रव्य नॅनोपार्टिकल स्वरुपात वापरल्याने द्रव्यातील गुणधर्म अधिक समृद्ध होतात व मूळ द्रव्यातील विषारी अंश नाहीसा होतो असे वर्णन नॅनोटेक्नोलॉजी विषयात दिले आहे. त्यासाठी भौतिक विघटन व रासायनिक प्रक्रिया करणारी यंत्रणा वापरली जाते. लाळेमध्ये पाण्याव्यतिरिक्त इलेक्ट्रोलाईट्स, म्युकस, ग्लायकोप्रोटीन्स, पाचक स्राव, जंतुविघातक द्रव्य, इम्युनोग्लोब्युलिन्स ए आणि लायसोझाईम असे घटक असतात. त्यामुळे अन्नातील काही विषारी किंवा दोष उत्पन्न करणारे घटक निष्क्रिय केले जातात. नॅनोनायझेशनमुळे सेवन केलेले औषधी द्रव्य पचनयंत्रणेतील जास्तीतजास्त स्तरांवर पोचते, त्वरित विरघळते, पूर्णपणे शोषले जाते, आतड्यातून शोषले गेल्यानंतर योग्यत्या यंत्रणेकडे पोचविले जाते, शोषण व स्थैर्य अधिक दृढ होते [enhanced permeability and retention (EPR)], नॅनोनायझेशन केलेले द्रव्य अधिक टिकाऊ होते.
           औषधी कल्पांच्या बाबतीत विचार करतांना ह्या नॅनोटेक्नोलॉजीचा सहभाग महत्वाचा आहे. आयुर्वेदानुसार सेवन केलेले अन्न किंवा औषध प्रथम रस धातूमध्ये शोषले जाते, नंतर रक्तात, पुढे मांस, मेद, अस्थि, मज्जा व शेवटी शुक्र धातूवर त्याचा सूक्ष्म अंश पोचतो. ह्या सर्व अडथळ्यांच्या शर्यतीतून पार होण्यासाठी औषध अत्यंत सूक्ष्म स्वरुपात असणे आवश्यक आहे. त्याकरिता भावना व मर्दन करणे अपरिहार्य आहे. असे न केल्यास औषध शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचणे अशक्य आहे. ह्या शास्त्रीय सिद्धांतावर औषधी गर्भसंस्काराची उभारणी केली आहे.
Dr. Santosh Jalukar
7208777773
9969106404

Saturday, February 6, 2016

तांबुल सेवन (पान खाणे)

 तांबुल सेवन (पान खाणे) 🍀
      कात कफपित्त यांचा नाश करतो तर चुना हा कफ व वाताचा नाश करतो. या दोघांचा संयोग झाला असता तिन्ही दोषांचे शमन होते.
      तांबुल सेवनाने मुख निर्मल व सुंगधी होते. सोबतच कांती वाढते.
सकाळच्या विड्यात सुपारी अधिक प्रमाणात टाकावी. दुपारच्या विड्यात कात अधिक टाकावी तर सांयकाळच्या विड्यात चुना अधिक टाकावा. या रितीने तांबुलसेवन गुणकारी ठरते.
नागवेलीपानाच्या शेवटी आयुष्य, मध्ये लक्ष्मी व मुळाच्या ठिकाणी यश आहे. म्हणुन तांबुलसेवी व्यक्तीने पानाचा शेवट मुळ व मध्य टाकुन द्यावे.
       पानाचे मुळ खाल्ल्यास रोगप्राप्ती, अग्रभाग खाल्ल्यास पाप लागते, मध्य भाग सेवन केल्यास आयुष्य कमी होते. पानांच्या शिरा खाल्ल्यास बुध्दीनाश होतो.
       तांबुलसेवन केल्यानंतर प्रथम चांगला चावावा. प्रथम तयार झालेला रस विषासारखा असतो तो थुंकुन टाकावा. पुन्हा चर्वणानंतर तयार होणारा रस रेचक असल्या कारणाने थुंकुन टाकावा. तिसरा तयार झालेला रस खावा. तो रसायना सारखा काम करतो.
तांबुल अतिप्रमाणात सेवन केल्याने शरीर, दृष्टी, केश, दात, कान, वर्ण, अग्नि, बल यांचा क्षय होतो.
तसेच शोष (atropy), रक्त पित्ताचे आजार उद्भवतात.
ज्या लोकांना दातांचे रोग, विष, मुर्च्छा, मद, क्षयी व रक्तपित्ताचे आजार असलेल्यांनी तांबुल सेवन करू नये.
आधुनिक काळातील तांबुलसेवनाचे गुणधर्म त्यातील टाकलेल्या पदार्थानुसार थोडेफार बदलतात. बडीशेप चेरी गुलकंद मसाला etc पदार्थानुसार.......
(Ref -- सार्थ भावप्रकाश पुर्वखंड)
वैद्य गजानन मॅनमवार

श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र 
पावडेवाडी नाका
 नांदेड
Mob - 9130497856, 9028562102

लहान वयात दृष्टिदोष

लहान वयात दृष्टिदोष -
आजकाल अगदी लहान वयात मुलांना चष्मे लागतात. पूर्वी चाळीशीनंतरच बहुधा चष्मा वापरावा लागत असे. लहान वयात दृष्टिदोष निर्माण होण्यामागे नेमके काय कारण असावे असा विचार केल्यावर एक महत्वाची गोष्ट लक्षात आली.
शरीरात ५ ज्ञानेंद्रिय असतात. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक. ह्यापैकी डोळे सोडून चार ज्ञानेंद्रियांचा विकास गर्भावस्थेत थोडा थोडा झालेला असतो. डोळ्यांचे कार्य मात्र जन्मानंतर सुरु होते. पूर्वी प्रसूती झाल्यानंतर बाळंतिणीसाठी एक विशिष्ट खोली असायची. ह्या खोलीत फारसा उजेड नसायचा, किंबहुना ही खोली जरा अंधारीच असायची. नवजात बालकाच्या डोळ्यांवर आघात करणारा प्रखर प्रकाश तान्ह्या बाळाच्या डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून ह्या खोलीची रचना केली जात असे.
ज्याप्रमाणे तान्ह्या बाळाला झणझणीत ठेचा कोणी खायला देत नाही, फटाक्याची लड त्याच्या जवळपास लावत नाही किंवा फ्रीजचे पाणी किंवा गरमागरम चहा पाजत नाही, त्याचप्रमाणे प्रखर प्रकाशापासूनही त्याचे रक्षण करणे अत्यंत महत्वाचे आहे. हळूहळू बाळाला उजेडाची सवय केली तर कदाचित लहान वयात होणारे दृष्टिदोष टाळता येतील. जुन्या काळातील चालीरीती उगाच प्रचलित नाही झाल्या. त्यामागे सखोल विचार आहे आणि वैज्ञानिक दृष्टीकोन आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
वैद्य संतोष जळूकर
+917208777773
drjalukar@akshaypharma.com

Thursday, February 4, 2016

रक्त बिघडवणारी कारणे.

रक्त --आयुर्वेदीय विचार 🌺
रक्तं सर्वशरीरस्थं जीवस्याधारमुत्तमम्| स्निग्धं गुरू चलं स्वादु विदग्धं पित्तवभ्दवेत्|| सार्थ भावप्रकाश
आयुर्वेदीय शास्रानुसार रक्त सर्व शरीराचा आधार जीवन आहे. गुणधर्मानुसार स्निग्ध (स्नेहयुक्त), गुरू (जड), चल (गतिमान), स्वादु (गोड) बिघडल्यानंतर पित्ताप्रमाणे दुषीत होते....
रक्त बिघडवणारी कारणे.
१.मद्यसेवन विकृत प्रकारचे अधिक मात्रेत उष्ण high alcohol level hard drinks चे सेवन करणे
२.अतिनमकीन पदार्थांचे सेवन करणे, अतिआंबट पदार्थांचे सेवन करणे, अतिप्रमाणात तिखट पदार्थ खाणे, तिळाचे तेल खाणे, उडीद दाळ अधिक खाणे ही देखील रक्त बिघडवणारी कारणे आहेत...
३.दही दह्यावरचे पाणी, विरूध्द आहार सेवन करणे, सडलेले दुर्गंधीत पदार्थांच्या सेवनाने, जड पदार्थ खाऊन दिवसा झोपल्याने, अतिरागावणे, अति उन्हात फिरणे, आगिजवळ काम करणे, उलटी आदींचा वेग रोखल्याने specially नेहमी antaacid खाणे,मार लागणे, शारीरीक व मानसिक संतापाने, पुर्वीचा आहार पचला नसताना पुन्हा जेवन करणे आदी कारणामुळे देहाचा मुळ रक्त बिघडते...
शुध्द रक्त निर्मातीसाठी
शरीरात शुध्द चांगल्या प्रकारचे रक्त निर्माण होण्याकरिता शास्रकारांनी देशसात्म्य, काळसात्म्य आणि ओकसात्म्य यांना अनुसरण सम्यक आहार तथा आचरण विधीच्या पालनाने शुध्द रक्त निर्माण होते.
१. ज्या देशात आपण राहतो तेथेच उत्त्पन्न होणारे धान्य वापरणे.जसे कोकणात भात आणि आपल्याकडे गहु ज्वारी बाजरी ईत्यादी.
२. काळानुरूप आहार घेणे उदा.उन्हाळ्यात आंबे पन्हे लिंबु सरबत घेणे. रूतुचर्या नुसार आहार विहाराचे पालन करणे.
३.व्यसनी पदार्थांचा त्याग करणे किंवा त्यांच्या आहारी न जाणे.
अशा विधीचे पालन केल्यानंतर तयार होणारे शुध्द रक्त बलवर्धक , वर्ण सुधारणारे, सुख आरोग्यदायक, दीर्घायुकारक असते.....
रक्तवाढीचे कृत्रिम उपाय परिणाम
शरीरातील रक्त कमी झाले असता blood transfusion इतरांचे रक्त घेण्याचा एक उपाय केला जातो. तसेच रक्ताच्या पेशीही शरीरात चढविल्या जातात. तात्कालीक स्वरूपात त्यांचे काम होते. पण त्याचे परिणाम शरीरावर दीर्घकाल दिसतात. इतरांचे रक्त पेशी शरीरात सहज सात्म्य होत नाहीत. Splenomegaly प्लीहावृध्दी ताप, शरीरातील रक्ताचे अवयावांच्या कामात बिघाड नंतर काही दिवसांनी दिसतो. रक्ताचे काम कृत्रीम विषाप्रमाणे शरीरात होते. अत्यावश्यक अवस्थेतच गरज असताना कृत्रीम उपाय blood transfusion आदी उपयुक्त प्राणाच्या रक्षणाकरिता..
रक्तदुषीत होऊ नये याकरिता वरील रक्ताच्या बिघाडाची कारणे टाळता येतील.
तसेच शुध्द रक्त निर्मिती करिता निसर्ग रूतुचर्या दिनचर्यानुसार आहार करता येइल...
प्रकृती सारता दशविध परिक्षण नजिकच्या वैद्याकडुन करावे व आहार विहाराचे योग्य मार्गदर्शनही घ्यावे....

श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र 
पावडेवाडी नाका
 नांदेड
वैद्य गजानन मॅनमवार
9028562102, 9130497856

Wednesday, February 3, 2016

सुलभ प्रसव व सुप्रजेसाठी उपाययोजना.......

सुलभ प्रसव व सुप्रजेसाठी उपाययोजना.........
         सुलभ प्रसव, सुप्रजा व प्रजनन आरोग्य ही संकल्पना चरक, काश्यपादि काळापासून चिंतनीय मानली जाते. ह्यासाठी महर्षि काश्यप ह्यांनी ‘काश्यपसंहिता’ हा ग्रंथ साकारलेला आहे. ह्या ग्रंथात बालकांच्या सुदृढपणाचे रहस्य दडलेले आहे. ह्याउलट चरकसंहिता, अष्टांगसंग्रह इ. ग्रंथात माता व बालक ह्या दोघांच्या जीवित्वाची हमी, सुलभ प्रसवाचे उपाय, सुप्रजा व यशस्वी बाळंतपणाची जबाबदारी तत्कालीन समयी घेण्यात आलेली आहे. त्यामुळे सुप्रजननाची संकल्पना अनादि कालापासून चालत आलेली आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
         प्रजनन आरोग्यामध्ये प्रजनन क्षमता, प्रजनन नियमन व गरोदरपणापासून प्रसवापर्यंत सर्व अवस्था सुखरूप होणे ह्या गोष्टींचा समावेश होतो. गरोदरपण व लैंगिक आजारांचा संसर्ग ह्या भीतीपासून मुक्त करणे, लिंगभेद, वृद्धत्व, स्त्रियांना सक्षम करणे, मासिक पाळीतील आरोग्य इत्यादि विषयांचा समावेश प्रजनन आरोग्यामधे होतो. ह्या लेखामधे सुलभ प्रसव व सुप्रजा ह्या दोन बाजूंचा आपण परामर्ष घेऊया.
सुप्रजा निर्मिती कशासाठी ?
      भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली आहे. ह्यात गर्भाधानापासून अंतेष्टीपर्यंत सोळा संस्कार वर्णन केलेले दिसतात. हे संस्कार क्रमाने गर्भाधानापासून प्रसवापर्यंत व बालकाच्या जन्मापासून विवाहापर्यंत केल्यास सुप्रजा निर्मिती होऊ शकते. यंत्रतंत्र युगात जगत असताना हे कसे शक्य आहे? असा विचार दांपत्याच्या मनामध्ये येऊ शकतो. पालकांनी आता विचार करायला हवा की देशाची शक्ती केवळ लोकसंख्येवर नव्हे तर सुसंस्कारित अपत्यांना जन्म देण्यामध्ये आहे. देशाच्या प्रतिमेची काळजी आता प्रत्येकानेच करायला हवी.
        मातृत्व ही प्रेमाचा गौरव करणारी घटना आहे. ह्यासाठी डझनावारी मूलं जन्माला घालण्याची आवश्यकता नाही. सुसंस्कारित अशी एक किंवा दोन अपत्ये पुरेशी आहेत. जन्मच द्यावयाचा असेल तर जन्म देण्यायोग्य विवेकानंद, शिवाजी, ज्ञानेश्वर, श्रीकृष्ण, बुद्ध, नागार्जुन, चरक, सुश्रुत आणि काश्यप ह्यांना द्यायला हवा, जो मातापित्यांची प्रतिमा उजळवेल, आपल्या परिवाराचा व देशाचा विकास करेल अशांनाच जन्माला घालावे.
सुप्रजाजनन शक्य आहे काय?
         मनुष्याचा शारीरिक व बौद्धिक विकास होऊ लागला तेव्हा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य पण त्याला मिळाले. स्त्री-पुरुषांनी केवळ आनंदासाठी एकत्र येणे वेगळे मात्र सुप्रजननासाठी दोघे जेव्हा एकत्र येतात तेव्हा काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. आपण इतर गोष्टींमध्ये वैज्ञानिक चिंतन करतो, पण स्वत:बाबत मात्र ते करत नाही. स्वतःबाबत मात्र आपण मोठे अवैज्ञानिक आहोत. बागेतील फुलझाडांची आपण जशी काळजी घेतो तसेच आपल्या बाबतीतही करायला हवे. एखादी गोष्ट घडण्यापूर्वी त्या गोष्टीबद्दल सर्वांगीण विचार करावा. गोष्ट घडून गेल्यावर उहापोह करण्यात अर्थ नाही. म्हणून विवाहाबाबत शास्त्रमर्यादा पाळावी. शास्त्रविहित वयात विवाह होऊन गर्भधारणा झाल्यास मूल अधिक संपन्न होण्याची शक्यता आहे. गर्भाधानासाठी उत्तम शुक्र, निकोप स्त्रीबीज, दोहोंची व्याधिविरहित शरीरे म्हणजेच प्रजनन – विषयक कुठलाही आजार नसावा. ह्यासाठी दांपत्याने वैज्ञानिक तपासणी, उपचार ह्यांचा उपयोग करून घ्यायला हवा. कारण लुळी-पांगळी, वजनाने कमी, बुद्धिहीन, कायम आजारी असलेली मुले जन्माला येण्यापेक्षा मुलाला जन्मच न देणे निश्चितच योग्य ठरेल.
           बाळाचे जीवन गर्भधारणेपासूनच सुरु होत असते. म्हणून दांपत्याने आधीपासून आचार रसायनाचे सेवन करावे. प्रत्येक दांपत्याने असा संकल्प करावा की, जो पर्यंत मी सदाचार व ध्यान करण्यास समर्थ होत नाही तो पर्यंत मी मुलाला जन्म देणार नाही. कारण चंगेजखान, नादिरशहा, हिटलर, रामन-राघवन, सद्दाम हुसैन, लादेन अशांना जन्म देऊन काय फायदा ?
           बुद्धिहीनांनी लोकसंख्या वाढविणे देशाच्या दृष्टीने धोक्याचे ठरत आहे. बुद्धिहीन वर्गाला समज देऊन प्रजनन थांबविणे, कुटुंबनियोजन सक्तीचे करणे, सुप्रजाजनन, दोन मुलांमध्ये अंतर ठेवणे आता गरजेचे झाले आहे. कुटुंबनियोजन ऐच्छिक ठेवल्यास सुप्रजाजनन, प्रतिभा, बुद्धिमत्ता ह्यांची क्षती होण्याची शक्यता आहे. सुप्रजा निर्मितीबद्दल सूक्ष्मपणे विचार विचार करून आचरण केले तर देशाची प्रतिमा निश्चितच विकसित होईल ह्यात शंका नाही.
आयुर्वेद पंचकर्म आणि सुप्रजा :-
         सुप्रजा निर्मितीसाठी प्रजोत्पादनास योग्य काळ, शुद्ध गर्भाशय, स्त्रीबीज, पुरूषबीज, दांपत्याचे सर्व शारीरिक व मानसिक भाव कारणीभूत ठरतात. म्हणूनच स्त्री व पुरुष ह्या दोघांनीही गर्भाधानापुर्वी स्नेहन, स्वेदन व आयुर्वेदातील पंचकर्मोपचार तज्ञाकडून करून घ्यावेत. शरीर शुद्धी झाल्यावर सात्विक आहार-विहार करावा. पुरुषाने औषधीसिद्धी तूप व स्त्री ने तेल व उडिदाचा प्रयोग वैद्याच्या मदतीने करावा. गर्भाधानकाळामधे पहिल्या महिन्यापासून ते दहाव्या महिन्यापर्यंत आयुर्वेदात वर्णन केलेली गर्भिणी परिचर्या व मासानुमासिक चिकित्सा करावी. ह्या चिकित्सेमुळे बाळाची वाढ उत्तम होते. गर्भपाताची भीती राहत नाही. गर्भिणी विषाक्ततेची शक्यता राहत नाही. पूर्णमास व प्राकृत प्रसव होतो. मृतगर्भ जन्माला येत नाही. पहिल्या तीन महिन्यांमधे होणाऱ्या उलट्या व मळमळ थांबते. गरोदरपणात मातेस झटके येत नाहीत व रक्तदाबही नियंत्रित राहतो. योनिगत रक्तस्त्राव होत नाही, सूतिका रोगाची भीती राहात नाही. शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. ह्या सर्व गुणांमुळे गर्भिणी स्त्रियांनी ही औषधे घेऊन गरोदरपणामधे होणाऱ्या गुंतागुंती टाळाव्यात. ही औषधे महाराष्ट्रात अनेक आयुर्वेद रुग्णालयातून अनेक तपे वापरात आहेत. गेल्या पस्तीस वर्षापासून म.आ.पोदार रुग्णालयात ही वापरात असून यशस्वी बाळंतपणाचे रहस्य ह्यात दडलेले आहे. समाधानी माता व तिच्या कुशीत झोपलेलं गुटगुटीत बाळ हा कुटुंबाच्या दृष्टीने आनंदाचा क्षण आहे. त्यासाठी खालील औषधे प्रत्येक मातेने आवर्जून वापरावीत.
औषधे वापरण्याची पध्दत :-
        जुनी पद्धत - औषधांची पाच ग्रॅम भरड रात्रभर पाण्यात भिजत घालावी. औषधाच्या वजनाच्या दुप्पट पाणी घालून अर्धे पाणी उरेपर्यंत मंद आचेवर काढा तयार करावा. मिश्रण गाळून घ्यावे व तो काढा सकाळ – संध्याकाळ दोन वेळा घ्यावा. अशी ९ महिनेपर्यंत काढे देण्याची पूर्वी पद्धत होती.
         अक्षय फार्मा रेमेडीज ह्या अनुभवसिद्ध औषध निर्मिती कंपनीने ह्या औषधी पाठांवर सखोल शास्त्रीय संशोधन करून त्यांना गोळ्यांच्या स्वरुपात सादर केले आहे. पाठांमधील प्रत्येक वनस्पतीचा सुयोग्य परिचय व त्याची कार्मुकता शास्त्रीय पद्धतीने अभ्यासून प्रसिद्ध केली आहे. ह्यात विशिष्ट नॅनोटेक्नोलॉजी सदृश शास्त्रीय निर्माण पद्धती वापरून ह्या गोळ्या गुणधर्माने अधिक श्रेष्ठ बनविल्या आहेत. काही अनुपलब्ध किंवा संदिग्ध वनस्पतींच्या ऐवजी श्रेष्ठ गुणांच्या प्रातिनिधिक द्रव्यांचा वापर करीत हे पाठ प्रचारात आणण्याचे कौतुकास्पद कार्य केले आहे. पूर्वीच्या काढ्यांपेक्षा ह्या गोळ्या घेण्यास अधिक सुलभ आहेत. स्त्रीच्या ऋतुचक्राच्या अनुषंगाने २८ दिवसांचा महिना व २८० दिवसांची म्हणजेच १० महिन्यांची गर्भावस्था ह्या शास्त्रीय सिद्धांतावर आधारित १० महिन्यांचे १० पाठ निर्माण केले.
गर्भिणी मासानुमासिक पाठ
पहिला महिना: यष्टिमधु, सागाचे बीज, शतावरी, देवदार
दुसरा महिना: आपटा, काळेतीळ, मंजिष्ठा, शतावरी
तिसरा महिना: शतावरी, प्रियंगु, श्वेत सारिवा
चौथा महिना: अनंतमूळ, कृष्णसारिवा, कुलिंजन, कमलपुष्प, यष्टिमधु
पाचवा महिना: रिंगणी, डोरली, शिवण फळ, वटांकुर, वड साल
सहावा महिना: पृश्निपर्णि, बला, शिग्रु, श्वदंष्ट्रा (गोखरू), मधुपर्णिका
सातवा महिना: शृंगाटक, कमलगट्टा, द्राक्ष, कसेरु, यष्टिमधु, शर्करा
आठवा महिना: कपित्थ, बिल्व, बृहति, पटोल, इक्षु, निदिग्धिका
नववा महिना: सारिवा, अनंता, शतावरी, यष्टिमधु
दहावा महिना: शतावरी, यष्टिमधु, सुंठ, देवदार
कुसंतती पेक्षा वांझ राहणे केव्हाही उत्तम :-
       श्रीसमर्थ, श्रीचक्रधर, छत्रपती शिवाजी सारखा नरश्रेष्ठ मानव जातीचे कल्याण करतो. “आमचे काय बुवा?” म्हणून देवावर हवाला ठेवणारे दांपत्य क्लिब समजावे. म्हणून सर्वांनी शास्त्राज्ञा पाळून विधिपूर्वक सुप्रजाजनन करावे. चांगली संतती व्हावी ही प्रत्येकाची इच्छा असते, पण कृती मात्र नसते. नुसती फुंकर मारून बासरी वाजत नाही. उत्तम रागदारी बाहेर पडण्यास बोटांचा युक्तिपूर्वक उपयोग करावा लागतो. त्याचप्रमाणे सुप्रजननासाठी योग्य कृती घडली पाहिजे. संतती एकच असावी व ती पुरुषोत्तत्म अशा स्वरुपाची असावी. कन्या असेल तर ‘स्त्रीत्व’ असणारी शूर साम्राज्ञी असावी, अन्यथा खंडोगती प्रजा काय कामाची ?
सुलभ प्रसव म्हणजे काय ?
योनिमार्गाने, डोक्याकडून, माता व बालकाला कुठल्याही प्रकारची इजा न होता होणारी प्रसूती ह्यास सुलभ प्रसव म्हणता येईल.
सुलभ प्रसूतीसाठी मातृत्वाचे खालील नियम प्रत्येकाने लक्षात ठेवावे:-
1. गर्भवती स्त्री ने धुम्रपान व मद्यपान करू नये. त्यामुळे बालकास इजा होऊ शकते.
2. गर्भवती राहिल्यापासून प्रसूती होईपर्यंत दहा वेळा तज्ञांकडून तपासणी करावी.
3. प्रसूती वेळेपर्यंत मातेचे वजन दहा किलोने वाढले पाहिजे.
4. दहा तास विश्रांती, ज्यात झोप – दुपारी दोन तास व रात्री आठ तास.
5. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण दहा ग्रॅम पेक्षा कमी नसावे.
6. दहा महिन्यांपर्यंत मातेचे लसीकरण पूर्ण झालेले असावे.
7. पहिला डोस – अठरा आठवड्यात, दुसरा डोस – चोवीस आठवड्यात
8. गरोदरपणातील जोखिमीची प्राथमिक चिह्ने व लक्षणांचे ज्ञान असावे
9. गरोदर मातेला रुग्णालयात नेण्याचे नियोजन असावे.
10. प्रसूती प्रशिक्षित व्यक्तींकडून करून घ्यावी.
11. कळा सुरु झाल्यापासून दहा ते बारा तासात प्रसव पूर्ण झाला पाहिजे.
12. बालकाचे श्वसन, रोदन, ध्वनि, रंग, प्रतिक्रिया ह्या गोष्टी व्यवस्थित असाव्यात.
13. प्रसूतीपश्चात दहा आठवड्यांपर्यंत तपासणी करावी.
14. दहा महिन्यांपर्यंत बालकास स्तनपान द्यावे.
15. बालकाच्या वयाच्या दहाव्या महिनापर्यंत लसीकरण पूर्ण झालेले असावे.
16. आईचे दूध हेच बाळासाठी सर्वोत्तम आदर्श असे अन्न आहे. ‘केवळ स्तनपान’ आणि ‘बाळ रडेल तेव्हाही स्तनपान’ हा मंत्र सर्व मतांनी लक्षात ठेवावा. स्तनपान शक्यतो दोन वर्षेपर्यंत चालू ठेवावे.
       गरोदरपणासाठी वर्णन केलेली सर्व औषधे घ्यावीत त्याबरोबर विशिष्ट वनस्पतींनी युक्त काढयांचा अस्थापन बस्ति आठव्या महिन्यात घ्यावा. नवव्या महिन्यापासून प्रसूतीपर्यंत योनीभागी ‘सुप्रसव पिचु तेलाचा’ पिचु दररोज रात्रभर ठेवावा. ह्या पिचुधारणेने विटपाचे कठीणत्व जाऊन त्याठिकाणी मृदुत्व येते, प्रसवमार्गात स्निग्धता निर्माण होते, योनीमार्गात लवचिकता निर्माण होऊन स्नायूंची शक्ती वाढते. ह्यामुळे विटपछेद (एपिझिओटॉमी) करण्याची वेळ येत नाही.
         सुखप्रसवासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सकारात्मक विचार मातेला देता येतात. प्रसुतीच्या वेळी अशा सूचना वारंवार देऊन सुख-प्रसव घडून आणता येतो. ह्याला आश्वासन चिकित्सा म्हणतात. गर्भिणी परीक्षणामुळे व विविध तपासण्यांमुळे जोखमीच्या शक्यता शोधून काढणे सहज शक्य आहे. सुख प्रसव ही नक्कीच अवघड बाब नाही. ह्या चिकित्सा घेण्याची मातेची मानसिक तयारी हवी. केवळ प्रसूतीतज्ञ कुशल असून भागणार नाही.
प्रजनन आरोग्यातील आयुर्वेदाचा सहभाग :-
सर्वंकष प्रजनन व बाल आरोग्य सेवा ह्यात एकूण पन्नास प्रकारच्या सेवा शासन पुरवीत असते. ह्यात आयुर्वेदाचा सहभाग पुढील प्रमाणे असू शकतो.
माता – बाल संगोपन :-
प्रसूतीपूर्व तपासणी
प्रसूतीपश्चात काळजी
प्रशिक्षित व कुशल व्यक्तीमार्फत प्रसूती
सर्वंकष प्रजनन व बाल आरोग्य सेवा :-
१) लैंगिक शिक्षण
२) विवाहपूर्व समुपदेशन
३) आहार – विहार सल्ला
४) बालआरोग्य शालेय प्रशिक्षणात आयुर्वेदाचा सहभाग
५) स्पष्ट कारण नसलेल्या वंध्यत्वाबाबत मार्गदर्शन व उपचार
६) बालक अतिसारसंबंधी आयुर्वेदोक्त उपचार
७) प्रसवकालीन गुंतागुंतीचे व्यवस्थापन
८) चाळीशी नंतरची घ्यावयाची आरोग्य विषयक काळजी
९) स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान करणे.
महाराष्ट्र शासनाकडून अपेक्षा :-
1. आयुर्वेद पदवी व पदव्यूत्तर प्रशिक्षण घेतलेल्या संबंधीत विषयातील तज्ञांना आधुनिक प्रशिक्षण सक्तीने द्यावे.
2. स्त्री व पुरुष टाका व बिनटाक्याचे वंध्यत्वीकरण शस्त्रकर्म प्रशिक्षण इच्छुक वैद्यकीय व्यावसायिकांना द्यावे.
3. सुरक्षित गर्भपाताचे प्रशिक्षण इच्छुक वैद्यकीय व्यावसायिकांना मिळण्याची व्यवस्था करावी
4. राज्य सेवेतील आयुर्वेद वैदकीय अधिकारी वर्ग - २ व वर्ग - ३ ह्यांना आयुर्वेदिक औषधांचा वापर करण्याची सक्ती करावी
5. जिल्हा आयुर्वेद विस्तार अधिकारी ह्यांच्या आयुर्वेद ज्ञानाचा वापर पूर्ण जिल्ह्यात करून आयुर्वेदाव्यतिरिक्त इतर कामे त्यांच्यावर लादू नयेत.
       प्रजनन आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी एकात्मिकरित्या झाली तर स्त्रियांचे सर्वांगीण आरोग्य आणि पर्यायाने समाजाचेच आरोग्य सुधारण्यासाठी प्रजनन आरोग्य सेवेचा दीर्घकाळ उपयोग होईल असे वाटते.
लेखक –
प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति,
सहयोगी प्राध्यापक,
स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग,
रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय
मुंबई ४०० ०१८
+917738086299
+919819686299
subhashmarlewar@gmail.com

Tuesday, February 2, 2016

चरबी वाढण्याची शास्रीय कारणे

चरबी वाढण्याची शास्रीय कारणे 🍀
१. श्लेष्मलाहारसेविन --- कफ वाढविणारे पदार्थ अत्याधिक प्रमाणात खाणे.. यात दुध तुप दही मिठाई सारख्या पदार्थांचा समावेश होतो.
२. अध्यशन --- अगोदरचे अन्न पचलेले नसताना देखील पुन्हा जेवन करणे ह्या कारणाने देखील चरबी वाढण्यास मदत होते.
३. अव्यायाम् --- नेहमी दुध तुप पनीर सहित इतर पौष्टीक पदार्थ सेवन करणे पण व्यायाम बिल्कुल न करणे हे अत्याधिक प्रमाणात चरबी वाढविणारे कारण ठरते.. व्यायाम हा चरबी कमी करणारया उपक्रमात श्रेष्ठ सांगितला आहे. फक्त व्यायाम हा योग्य प्रमाणात व योग्य सल्ल्याने करावा.
४. दिवास्वप्न --- दिवसा जेवनानंतर झोपणे हे कफपित्त दोन्ही प्रकुपित करते सोबत चरबीही वाढविते. दिवसा जेवनानतंरची झोप आजांरासाठी शरीरातील जमीन सुपिक बनविते.
चरबी वाढल्याने उपद्रव स्वरूप खालील त्रास दिसावयास लागतात..
१. क्षुद्रश्वास --- थोडेसे श्रम कष्ट वा १-२ मजल्याच्या पायरया चढल्या तरी दम लागतो. जाड व्यक्तींमध्ये दम लागत असेल तर गरजेपेक्षा अधिक चरबी वाढली हे समजुन येते.
२. पिपासाक्षुत् --- तहाण व भुक अधिक प्रमाणात लागते वा मंद होउन जाते.
३. नेहमी झोपावे वाटते आळस नेहमीच असतो.
४. घामाचा दुर्गंध येतो घामाचे प्रमाण वाढते वा शरीरातील अवरोधाने एकदम कमी प्रमाणात घाम येतो.
५. थोडेसे कष्ट श्रम सहन होत नाहीत..
६. शरीरात फक्त चरबी अधिक प्रमाणात वाढत असल्याने चरबी रहित शरीरातील इतर अवयवांचे पोषण होत नाही. हाडांसारखे अवयव झिजायला लागतात.
अशीच अवस्था खुप दिवस राहील्यास प्रमेह, भगंदर, ताप, गंभीर वातविकार असे त्रासदायक आजार होतात.
चरबी वाढणारी वरील कारणे टाळुन उपद्रव स्वरूप होणारया आजारांपासुन दुर राहता येते..
वैद्य गजानन मॅनमवार

श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र
पावडेवाडी नाका नांदेड

Mob- 9028562102, 9130497856

Visit Our Page