Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Thursday, February 11, 2016

आयुर्वेदातील भावना संस्कार आणि नॅनोटेक्नोलॉजी

आयुर्वेदातील भावना संस्कार आणि नॅनोटेक्नोलॉजी
        एका मीटरच्या १,०००,०००,००० (एक अब्ज भाग) एवढ्या सूक्ष्म भागाला नॅनोपार्टिकल म्हणतात. अशा नॅनोपार्टिकल भागाच्या औषधीनिर्माण शाखेला नॅनोटेक्नोलॉजी म्हणून प्रसिद्धी मिळत आहे. २९ डिसेंबर १९५९ रोजी रिचर्ड फिनमन नामक शास्त्रज्ञाने नॅनोटेक्नोलॉजी विषयावर प्रथम भाषण केले. ही नॅनोटेक्नोलॉजी मानवी शरीरात निसर्गाने जन्मतः बसवून दिली आहे असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही हे आपल्या लक्षात येईल.
         अन्नाचे चर्वण करतांना भौतिक विघटन आणि रासायनिक प्रक्रिया अशा दोन घडामोडी होतात. पचनसंस्थेतील सूक्ष्म स्रोतसंमध्ये आहार घटकांचे सुयोग्य शोषण होण्यासाठी ह्या दोन क्रिया आवश्यक असतात. दातांच्या घर्षणाने अन्नकण बारीक होतात आणि लाळेतील रसायनांच्या सहाय्याने अन्नकण पचनयंत्रणेत शोषले जाण्यासाठी आवश्यक अशा स्वरुपात तयार होतात. ह्याच संकल्पनेतून नॅनोटेक्नोलॉजीचा उगम झाला असावा. आयुर्वेदात, विशेषतः धातू व खनिजांच्या वापराच्या संदर्भात हा विचार अधिक मोलाचा असल्याचे दिसून येते.
          अत्यंत सूक्ष्म प्रमाणात वापरलेले औषधी द्रव्य नॅनोपार्टिकल स्वरुपात वापरल्याने द्रव्यातील गुणधर्म अधिक समृद्ध होतात व मूळ द्रव्यातील विषारी अंश नाहीसा होतो असे वर्णन नॅनोटेक्नोलॉजी विषयात दिले आहे. त्यासाठी भौतिक विघटन व रासायनिक प्रक्रिया करणारी यंत्रणा वापरली जाते. लाळेमध्ये पाण्याव्यतिरिक्त इलेक्ट्रोलाईट्स, म्युकस, ग्लायकोप्रोटीन्स, पाचक स्राव, जंतुविघातक द्रव्य, इम्युनोग्लोब्युलिन्स ए आणि लायसोझाईम असे घटक असतात. त्यामुळे अन्नातील काही विषारी किंवा दोष उत्पन्न करणारे घटक निष्क्रिय केले जातात. नॅनोनायझेशनमुळे सेवन केलेले औषधी द्रव्य पचनयंत्रणेतील जास्तीतजास्त स्तरांवर पोचते, त्वरित विरघळते, पूर्णपणे शोषले जाते, आतड्यातून शोषले गेल्यानंतर योग्यत्या यंत्रणेकडे पोचविले जाते, शोषण व स्थैर्य अधिक दृढ होते [enhanced permeability and retention (EPR)], नॅनोनायझेशन केलेले द्रव्य अधिक टिकाऊ होते.
           औषधी कल्पांच्या बाबतीत विचार करतांना ह्या नॅनोटेक्नोलॉजीचा सहभाग महत्वाचा आहे. आयुर्वेदानुसार सेवन केलेले अन्न किंवा औषध प्रथम रस धातूमध्ये शोषले जाते, नंतर रक्तात, पुढे मांस, मेद, अस्थि, मज्जा व शेवटी शुक्र धातूवर त्याचा सूक्ष्म अंश पोचतो. ह्या सर्व अडथळ्यांच्या शर्यतीतून पार होण्यासाठी औषध अत्यंत सूक्ष्म स्वरुपात असणे आवश्यक आहे. त्याकरिता भावना व मर्दन करणे अपरिहार्य आहे. असे न केल्यास औषध शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचणे अशक्य आहे. ह्या शास्त्रीय सिद्धांतावर औषधी गर्भसंस्काराची उभारणी केली आहे.
Dr. Santosh Jalukar
7208777773
9969106404

No comments:

Post a Comment

Visit Our Page