Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Thursday, February 18, 2016

सूतिका परिचर्या अर्थात काळजी बाळंतीणीची . . . .


सूतिका परिचर्या अर्थात काळजी बाळंतीणीची . . . .
‘मातृत्व’ ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यतील एक विशेष व आनंददायी घटना असते. मात्र प्रसूतीनंतर योग्य काळजी घेतली गेली तरच ती खऱ्या अर्थाने आनंददायी ठरते. प्रसूतीच्यावेळी स्त्रीचा एक पाय भूलोकांत तर दुसरा पाय यमलोकात असतो असे काश्यपाचार्यांनी म्हटले आहे. सूतीकावस्था ही प्राकृत स्थिती असली तरीही प्रसववेदनांनी शल्यभूत असा गर्भ बाहेर टाकल्यानंतर तिच्या शरीरात धातुक्षय व बलक्षय निर्माण होतो. हा क्षय भरून शरीर प्राकृत अवस्थेत येईपर्यंत तिला सूतिका परिचर्येचे पालन करणे आवश्यक असते. अन्यथा त्याचे दूरगामी परिणाम होऊन स्थिरत्व, दृढत्व, निरोगीपण राहणे शक्य होत नाही.
सूतायाश्चापि तत्र स्यादपरा चेन्न निर्गता l प्रसूताऽपि न सूता स्त्री भवत्येवं गते सति ll
. . . . . का.स. खिल, सूतिकोपक्रमणीयाध्याय
अपरापतन जेव्हां पूर्ण होते तेव्हांच स्त्रीला ‘सूतिका’ म्हणून संबोधले जाते.
सूतिकावस्था कालावधी –
सार्ध मासान्ते l म्हणजेच स्त्रीची सूतिकावस्था दीड महिन्यापर्यंत असते.
१. प्रथम १० दिवस : क्षत आणि व्रणामुळे ह्या काळातील परिचर्या व्रणरोपणाच्या दृष्टीने करावी. गर्भाशयात ज्या ठिकाणी अपरा विभक्त होते त्याठिकाणी ह्याचा केंद्रबिंदू असतो.
२. प्रथम दीड महिना : ह्या काळातील परिचर्या विशेषतः स्तन, स्तन्य आणि त्र्यावर्ता योनीच्या स्वास्थ्यरक्षणाच्या दृष्टीने आखली आहे. गर्भाशयाची पूर्वस्थिती प्राप्त करणे स्तन्यपुष्टी ह्या काळात अभिप्रेत आहे.
३. पुढील रजोदर्शनापर्यंतची कालमर्यादा : २ ते ६ महिन्यांपर्यंत हा कालावधी असू शकतो. काही सूतिकांमध्ये रजोदर्शन होण्यापूर्वीच पुन्हा गर्भधारणा होऊ शकते त्यांना ‘मिंध्या’ गर्भिणी म्हणतात.
सूतिका परिचर्या आवश्यकता –
प्रसूतीनंतर स्त्रीशरीर व उदाराचा खालचा भाग शिथिल होतो, वाढतो, शरीराला लट्ठपणा आणि बेडौलपणा येतो. शारीरिक दौर्बल्याबरोबरच मानसिक दौर्बल्यही आलेले असते. म्हणून सूतिका परिचर्येचे पालन करणे आवश्यक आहे.
१) सूतिका व्रणी असते
२) तिच्यात रक्तस्रावजन्य व क्लेदजन्य धातुक्षय असतो
३) प्रसवक्रियेतील प्रवाहणामुळे वातप्रकोप झालेला असतो
४) धातुक्षय झाल्यामुळे अग्निमांद्य व धात्वाग्निमांद्य येते
५) ह्या काळात होणारे स्तन्यप्रवर्तन
६) योनिदोष व ग्रहबाधा ह्यांपासून सूतिकेचे संरक्षण करावे लागते
प्रसूतीच्यावेळी जेव्हां अपरा गर्भाशायापासून विलग होते तेव्हां त्याठिकाणी व्रण निर्माण होतो. म्हणून सूतिकेला व्रणी म्हणतात आणि त्यानुसार तिची व्रणरोपण किंवा क्षतरोपण चिकित्सा करावी लागते.
सूतिका कालांतर्गत परिवर्तन -
१) गर्भाशयाचा आकार कमी होणे (Involution of uterus) : अपरापतनानंतर लगेच गर्भाशय संकोच होऊन नाभीच्या खाली जघन संधानकाच्या ५ इंच वर असते. पुढे गर्भाशयाची उंची प्रतिदिन १.२५ सेंटीमीटरने कमी होते. ११-१२ व्या दिवशी गर्भाशय संकोचन श्रोणीमध्ये पूर्णपणे स्थिरावते.
२) गर्भाशयाच्या निम्नखंड व ग्रीवेमध्ये परिवर्तन : प्रसवानंतर गर्भाशयग्रीवेत क्षत होते. ग्रीवामुख हळूहळू संकुचित होते. जसजसे गर्भाशयमुख संकुचित होते, तसतशी ग्रीवा कठीण व जाड होते व ग्रीवागुहा पुनःनिर्मिती होते.
३) योनी व योनिमुख : प्रसवानंतर योनी व योनिमुख संकुचित होतात. परंतु अप्रसवेच्या स्थितीपर्यंत येत नाहीत व योनिशैथिल्य येते. तेथे वात दूषित होतो. योनीच्या अतिशैथिल्यामुळे पती व पत्नी दोघांचेही कामजीवन असमाधानी राहून मानसिक स्वास्थ्य खालावते. ह्याकरिता चिकित्सा अन्यत्र वर्णन केली आहे. (सूतिका परिचर्या तत्व क्र. ८ पाहावे)
सूतिका परिचर्या तत्वे –
१. आश्वासन : अपरापतन व प्रसव काळातील रुग्णेची मानसिक अवस्था लक्षात घेता ‘आश्वासन चिकित्सा’ सामान्य असली तरी आवश्यक आहे.
२. स्नेहन व मर्दन : सूतिकेच्या अधोदर, कटि व पृष्ठभागी दररोज सकाळी व संध्याकाळी बला तेल, तीळतेल, चंदनबला लाक्षादि तेल, सूतिकाभ्यंग तेल पैकी एकाने अभ्यंग करावे. त्यानंतर हळदीचे वस्त्रगाळ चूर्ण अंगात जिरवावे व उष्णोदकाने स्नान घालावे. मर्दनाने प्रकुपित वाताचे व तज्जन्य शूलाचे शमन होते. स्नानानंतर कटिप्रदेशी स्वेदन (शेक) करावे.
३. पट्टबंधन : वेष्टयेत् उदरम् l म्हणजेच पोट बांधणे, पश्चात स्वच्छ व जाड वस्त्राने कुक्षी, पार्श्व, पृष्ठ, उदर हे भाग घट्ट बांधावे. ह्याने गर्भवाढीमुळे शिथिल झालेल्या उदरात वायूचा प्रवेश होत नाही, उदाराचा आकार वाढून शरीर बेडौल होत नाही.
४. स्नेहपान : पट्टबंधनानंतर पचेल इतका स्नेह दीपन – पाचन द्रव्यांसमवेत द्यावा. ह्यात पिंपळी, पिंपळीमूळ, चव्य, चित्रक, सुंठ, ओवा, जिरे, सैंधव, मरीच अशा द्रव्यांचा समावेश होतो. प्रसवामुळे उत्पन्न झालेल्या वातप्रकोपासाठी स्नेहपान चिकित्सा अत्यंत महत्वाची ठरते.
५. गर्भाशयशोधन : प्रसूतीनंतर गर्भाशयशोधनासाठ
ी मास, कृष्णबोळ गुळासोबत द्यावा व दशमूलारिष्ट समभाग पाण्यातून द्यावे. शिवाय लताकरंज आणि पिंपळमूळ चूर्णाचा उपयोग करावा. ह्याने गर्भाशय प्राकृत स्थितीत येण्यास मदत होते.
६. कोष्ठशोधन : कोष्ठशोधनार्थ एरंडतैल सुंठीच्या काढ्यासोबत द्यावे. ह्यामुळे प्रकुपित वायूचे शमन व मलशोधन होते. कोष्ठशोधनाने दोषदुष्टी दूर होऊन आमसंचिती होत नाही.
७. रक्षोघ्न : सूतीकेस उष्णोदकाने योनिप्रक्षालन करावयास सांगून योनिधूपन करावे. ह्यासाठी चंदन, धूप, लसूण साल, ओवा, शेपा, वचा, कोष्ठ, अगरु अशी प्रकृतीनुसार दव्ये वापरावीत.
८. योनिशैथिल्य : प्रसूतीनंतर योनिशैथिल्य आल्यास लोध्र साल, पलाशबीज, उदुंबरफल चूर्ण तेलात मिसळून त्याचे योनिधारण करावे. अम्ल – कषाय सिद्ध तेलाचे पिचुधारण करून मग क्षीरी वृक्षांच्या काढ्याने योनिधावन करावे. सायंकाळी योनिभागी अभ्यंग करून धूपन करावे. ह्याने योनिभाग निर्जंतुक होऊन शोफ, लाली, व्रण भरून येतात. अपत्यपथ व योनि संकुचित होऊन प्राकृत स्वरूपात येतात. ह्याचबरोबर सूतिकेने सर्वांग अभ्यंग करून घ्यावा. प्रसूतीपश्चात मातृ स्वास्थ्यरक्षणासाठी ‘सूतिकाभ्यंग तेल’ वापरावे.
प्रसवामुळे सर्व धातु दुर्बल होऊन त्यांची झीज होते. ही झीज भरून काढण्यासाठी व गर्भाशयाचा प्राकृत संकोच होण्यासाठी विशेष अभ्यंग तेलाचा पाठ अष्टांगहृद्य शारीरस्थान २/४७ मध्ये वर्णन केलेला असून महर्षी वाग्भटांचा ‘गर्भविकास व मातृपोषणाचा’ विचार करतांना हे विसरून कसे चालेल?
आहार व विहार –
सुश्रुताचार्यांनी अभ्यंगानंतर वातघ्न औषधीपान व तद्नंतर परिषेक करण्यास सांगितले आहे. पंचकोल चूर्ण उष्णोदकाबरोबर, विदारिगंधादि सिद्ध स्नेह यवागु / क्षीर यवागु पानार्थ द्यावे. नंतर यव, कोल, कुलत्थ सिद्ध जांगल मांसरस, शालिगोदन बल आणि अग्निनुसार द्यावे.
कच्च्या डिंकाचा लाडू, सुंठ + तूप + साखर सकाळी घ्यावे. ह्यामुळे अधोदराच्या स्नायूंना बल प्राप्त होते व योनिशैथिल्य कमी होते.
लसणीचे तिखट, मुरलेले लिंबाचे लोणचे ह्यामुळे संचित क्लेद, रज, जरायु शेष बाहेर पडण्यास मदत होते. लसूण घालून तांदळाची धिरडी, तिखट मिठाचा सांजा सेवन करावा. लसणामुळे पुनर्नवीभवन, स्नायूंची झीज भरून काढणे व योनिभागाचे विवृतास्यत्व कमी होते.
सुंठ, गूळ, तूप घातलेल्या सुंठीच्या वड्या, खसखस घालून आल्याच्या वड्या, मेथी, सुंठ, आले, लसूण, जुने तांदूळ, ओवा, आवडत असल्यास बाळंतशोपा, बडीशेप यांचा वापर करून पथ्यकर अन्नाचा वापर करावा. ह्याने दर्जेदार व मुबलक दूध बालकाला मिळते.
खारीक पूड ओल्या खोबऱ्याबरोबर व दूध द्यावे, नाचणीची कांजी, कढण असे द्रव पदार्थ भरपूर द्यावे. ह्यामुळे स्त्रीची प्रकृती स्वस्थ राहून बांधा सुदृढ होतो. स्तनभागाला शैथिल्य येऊ नये म्हणून घट्ट बंध बांधावा.
आहारामध्ये खालील खीरींचा समावेश करावा –
• खारीक – बदाम खीर • खसखस – बदाम खीर • आहाळीवाची खीर • कापसाच्या सरकीची खीर • कणीक तुपात भाजून दुधात घालून केलेली खीर
ह्या खीरींमुळे वायूचा उपशम होतो, शरीराची झीज भरून निघते व स्तन्य निर्मिती मुबलक होऊन बालकाला उत्तम दुधाचा पुरवठा होतो.
देश व काळानुसार परिचर्या बदलते –
• मुंबईसारख्या आनूप देशात अभिष्यंद अधिक असल्याने स्नेहपान कमी व स्वेदन अधिक करावे.
• सोलापूर सारख्या कोरड्या म्हणजेच जांगल प्रदेशात स्नेह अधिक प्रमाणात द्यावा. मुलगा झाल्यास तेल व मुलगी झाल्यास तूप द्यावे असे काश्यपमुनी सांगतात.
• साधारण देशात स्नेह व स्वेद दोन्ही करावेत.
• विदेशी लोकांमध्ये मांसरस, रक्त किंवा मांसाचे सूप देतात.
• कंदमुळे, ओट्स, बीट, बटाटे इ. पदार्थांचा वापर आहारात करावा.
• ह्याशिवाय कुलसात्म्याचा विचार करून आहार द्यावा.
औषधी योग –
१. बृहत् पंचमुळांचा काढा सैन्धवासह , २. सौभाग्यशुण्ठी पाक, ३. मिश्री, पुनर्नवा, गोक्षुर, जेष्टमध चूर्ण तुपाबरोबर द्यावे. ४. सुंठ, साखर, तूप द्यावे, ५. विदारीकंद क्वाथ सैन्धवासह द्यावा. तूप, पिठीसाखर, केशर खाण्यास द्यावे ६. अनुलोमनासाठी भारङ्गी, काकडशिङ्गी, धामसा ह्यांचा क्वाथ द्यावा ७. गुडुची – आमलकी सिद्ध क्षीर द्यावे. ८. सूतिका कषाय –
सूतिका काळामध्ये त्र्यावर्ता योनि स्वस्थितीत येण्यासाठी भावप्रकाश वर्णित सूतिका कषायाचा वापर म. आ. पोदार रुग्णालयात मी करीत असतो.ह्याचा निश्चित असा लाभ झाल्याचे माझ्या निदर्शनास आले. ह्या पाठामध्ये गुडुची, सुंठ, सहचर, मुस्ता, उशीर, त्वक्, बृहत् पंचमुळे ह्या द्रव्यांचा वापर केलेला आहे. ह्या द्रव्यांची भरड समान मात्रेत घेऊन त्याचा ४० मिली काढा जेवणानंतर २ वेळा पानार्थ वापरावा. सदर काढा संचित दोष बाहेर पाडण्यासाठी असून स्वस्थ सुतीकेने वापरण्यासाठी आहे.
ह्या सूतिका कषायामुळे दीपन, पाचन व वातानुलोमन होऊन सूतिकारोग नियंत्रणात येतात.
Extra daily nutrient allowances for lactation (WHO / FAO – 1974)
Energy: 2600 Kcal, Protein: 44 gm, Vitamin D: 7.5 µg, Vitamin E: 8 mg, Vitamin C: 60 mg, Vitamin B2: 1.3 mg, Vitamin B3: 14 mg, Vitamin B6: 2 mg, Folate: 400 µg, Vitamin B1: 1.1 mg, Calcium: 800 mg, Iron: 18 mg, Zinc: 15 mg
योगासने –
प्रसूतीपश्चात नियमित योगासनांचा अभ्यास केल्यास वजन कमी होण्यास मदत होते, स्नायूंची कार्यक्षमता सुधारते, तणाव कमी होतो, शारीरिक उर्जा वाढण्यास मदत होते. ह्यात पुढील आसनांचा अवलंब करावा –
मार्जारासन (Pelvic floor exercise), पवनमुक्तासन (Full squats/ Squat hold), उत्तान ताडासन (Toe taps / Bridge), वक्रासन (Kick backs), उत्कटासन (Brisk walking posture), भुजंगासन (Modified cobra posture)
वरील योगासनांचा आभास एकाच वेळेस न करता ती आपल्या शारीरिक बलानुसार, झेपेल तीच योगासने करावीत. क्रमाक्रमाने मार्जारासनापासून सुरुवात करून दरदिवशी एका आसनाचा अभ्यास करावा. त्यामुळे शरीराच्या प्रत्येक अवयवाला लाघव प्राप्त होते, अग्नि प्रदीप्त होतो व सूतिकेला पूर्ववत कर्मसामर्थ्य प्राप्त होते. ह्या संदर्भात भारतीय शास्त्रज्ञ, महर्षी वाग्भट ह्यांनी अष्टांगहृदयात चपखल वर्णन केले आहे. ही आसने करतांना यम, नियमांचा अभ्यास सूतिकेने करावा अशी अपेक्षा आहे. प्राणायामादि प्रकार, नियम पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावरच करावेत.
ज्याप्रमाणे एखादे जुने वस्त्र खूप मळले असता ते धुवून स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला तर ते फाटण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे सूतिका अत्यंत थकलेली व म्लान असल्याने जर तिला विकार झाला तर उपचार करणे कठीण असते. म्हणून सूतिका परिचर्येचे पालन करावे. ह्याने स्त्रीची प्रकृती उत्तम राहून वाढलेल्या गर्भाशयाचे आकुंचन योग्य होऊन तो प्राकृत स्थितीत जाणे व योनिभागाला प्राकृत आकार येऊन तेथील स्नायूंचे बल वाढणे, त्याचप्रमाणे श्रमजनित थकवा, जननेंद्रियांची शक्ती पुन्हा भरून येणे व अंतरेंद्रिये म्हणजे ‘फलकोषादिकांचे स्रवण योग्य होणे हे उद्देश साध्य होतात.
लेखक
प्राध्यापक वैद्य सुभाष मार्लेवार, M. D. (Ayurved),
स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग, पोदार वैद्यक महाविद्यालय, मुंबई ४०० ०१८
+917738086299
+919819686299
subhashmarlewar@gmail.com
वैद्या पौर्णिमा हिरेमठ
M. S. Gyn (Scholar)

No comments:

Post a Comment

Visit Our Page