श्रावण मास, नको तब्येतीला त्रास !
सणवार साजरे करणे यासारखा आनंद मनुष्याला इअतर कशात मिळत असेल असे मला वाटत नाही. वर्षभर आपण कोणते ना कोणते सण, उत्सव साजरे करीतच असतो. मात्र चातुर्मास म्हणजे या सगळ्या सणवारांचा राजा असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या चातुर्मासाला धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्व आहे. मंगळागौर, नागपंचमी,नारळी पौर्णिमा, गणपती, नवरात्र, दसरा, द्वाळी असे अनेक सण, उत्सव याच काळात साजरे होतात. असे असले तरी या चार महिन्यांमध्ये श्रावण महिन्याचे महत्व जरा अधिकच आहे.
धर्मशास्त्रानुसार चातुर्मासाचा आरंभ आषाढी एकादशीला होतो. या एकादशीलाच “शयनी एकादशी” असेही म्हणतात. कारण या दिवशी भगवान विष्णु शयन करतात, झोपी जातात आणि कार्तिकी / प्रबोधिनी एकादशीला ते जागे होतात अशी समजुत आहे. जेव्हा देव झोपलेले असतात त्या काळात असुरांचे, राक्षसांचे बळ वाढलेले असते. सर्वत्र त्यांचेच साम्राज्य पसरलेले असते. अशावेळी मनुष्याने या असुरांपासुन स्वतःचे रक्षण करणे आवश्यक आहे. हे राक्षस, असुर म्हणजे कोणी प्राणीमात्र आहेत असे समजण्याऐवजी काम, क्रोध, लोभ, द्वेष, असुया , मत्सर यासारखे षड्-रिपु म्हणजेच असुर होय असे मला वाटते. आयुर्वेदानुसार सत्व हा मनाचा गुण आहे आणि रज व तम हे मनाचे दोष आहेत. यापैकी रज व तम वाढले की काम-क्रोध आदी भाव मनात वाढीस लागतात. थोडक्यात कामक्रोधादी भावांचा नाश करण्यासाठी मनाचा सत्व गुण वाढविणे हा योग्य उपाय आहे. म्हणुनच चातुर्मासात किंवा श्रावणात यम, नियम, आहाराविषयीचे नियम, धार्मिक ग्रंथांचे पठण, तुलसीपूजन, दानधर्म, उपवास, लंघन, देवदर्शन यासारख्या सात्विकता वाढविणा-या गोष्टींचा अवलंब करणे फायद्याचे ठरते यात शंका नाही.
ज्याप्रमाणे आपले वागणे आपल्या मनावर प्रभाव टाकत असते त्याचप्रमाणे आपला आहारदेखिल मनावर प्रभाव करीत असतो आणि मनाचा आहारावर प्रभाव पडत असतो. उदाहरणासाठी आपल्याला सांगता येईल कि नासके, खराब, व्यवस्थित न शिजवलेले अन्न मनामध्ये उद्विग्नता, घृणा निर्माण करते आणि परिक्षेच्या काळात मनावर आलेल ताण भूक कमी करतो, अपचन-अजीर्ण-अम्लपित्त यासारखे त्रास निर्माण करतो. थोडक्यात अन आणि आहार यांचा खुप जवळचा संबंध आहे. श्रावण महिना म्हणजे पावसाळ्याचा काळ आहे. त्यामुळे मुळातच निसर्गतः शरीरात वातदोष वाढलेला असतो, भूक मंदावलेली असते. जर या काळात पथ्य पाळले नाही तर पचन बिघडून वेगवेगळे शारीरिक त्रास सुरु होतो आणि मनालाही त्याचा त्रास होतो.
चातुर्मास आणि त्यातही श्रावण म्हणजे नुसती उपास-तापासांची रेलचेल असते. खरंतर मूळ शब्द “उपास” हा नसून तो आहे “उपवास”. त्या शब्दाची फोड होते उप + वास. “उप” म्ह्णजे जवळ आणि “वास” म्हणजे राहणे. “देवाच्या जवळ राहणे” असा लाक्षणिक अर्थ उपवास या शब्दातून व्यक्त होतो आणि नुसतेच देवाच्या जवळ राहणे असे नाही तर देवाजवळ तहानभूक विसरून राहणे अपेक्षित आहे. व्यवस्थित खाऊन-पिऊन देवाची पूजा अचना करायला मन तयार होणार नाही. उपवासाला भरपूर खाल्लेल्या खाण्याने आलेले आळस , सुस्ती हे मनाला आणि शरीराला स्वस्थता लाभू देणार नाहीत आणि म्हणुनच उपवासाने पूर्ण लंघन, एकभूक्त किंवा लघ्वशन अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र “एकादशी आणि दुप्पट खाशी” ही म्हण प्रत्ययास येते. उपवासाला चालणा-या पदार्थांची यादी पाहिली कि ज्यांनी या गोष्टी उपवासाला चालतात असे ठरविले त्यांचे खूप कौतुक (?) वाटते. हे सगळे पदार्थ पचायला जड या श्रेणीत बसतात. उपवासाला आणि चातुर्मासात चालणारे आणि न चालणारे पदार्थ म्हणजे भगर, साबुदाणा, शिंगाडा, राजगिरा, बटाटा, रताळी, दही, ताक, कांदा आणि लसुण असे आहेत. यातील कांदा आणि लसुण सोडून इतर सगळे पदार्थ उपवासाला चालत असले तरी त्यांचे गुणधर्म बघितल्यानंतर आपण आपलेच ठरवायचे की त्यांचे सेवन उपवासाला करायचे कि नाही ?
१) भगर – भगरीलाच वरी असेही नाव आहे. बहुधा जेथे नाचणी पिकते तिथेच भगरही पिकते. याचा भात, लाट्या, पीठ तयार करून वापर केला जातो. वरी गोड, तुरट रसाची असून वृष्य (मैथुनक्षमता वाढविणारी ) आहे. शरीरातील वात आणि पित्त यांचा नाश करणारी असल्याने थोड्या प्रमाणात खायला हरकत नाही.
२) साबुदाणा – एका प्रकारच्या स्टार्चपासूनहा पदार्थ बनविला जातो. ताडासारख्या जातीच्या वृक्षापासून हा तयार होतो. खिचडी किंवा तळलेला वडा या स्वरूपात हा पचायला अतिशय जड असणारा हा पदार्थ आहे. त्यामुळे उपवासाला अजिबात खाऊ नये. अगदिच खायचाच असेल तर दुधात बनविलेली खीर बरी. पण आव, अपचन, भूक नसणे यात या कडे बघूही नये. मुळात ज्यांना साबुदाणा खुप आवडतो त्यांनी एकदा साबुदाण्याच्या कंपनीला भेट द्यावी. नंतर साबुदाणा खायची इच्छा मरते हे मात्र नक्की.
३) शिंगाडा – पाण्यात तयार होणारी ही वेल आहे. याची फळे आपण वापरतो. शिंगाडा गोड रसाचा, थंड गुणाचा, पचायला जड, पित्त-रक्तविकार,दाह यांचा नाशक आहे. बळ देणारा शिंगाड्याच्या पीठाचा शिरा तहान, जुलाब, संग्रहणी, गर्भस्त्राव यात उपयुक्त असला तरी कमी मात्रेत खाण्यास योग्य आहे.
४) राजगिरा – पुरुषभर उंचीचे हे झुडुप असते. याची लागवड केली जाते. याच्या बियांमध्ये पुष्कळ पौष्टीक गुण आहेत. लघवीला साफ करणार आणि रक्तातील दोष दूर करणारा राजगिरा मूळव्याधीतही फायद्याचा आहे. पचायला हलका असल्याने सर्व उपवासाला चालणा-या पदार्थांमध्ये याचा नंबर एक लागतो.
५) बटाटा व रताळी – कंदमूळ या प्रकारात मोडणारे हे दोन्ही पदार्थ गोड रसाचे, थंड, पचायला जड, बळ वाढविणारे आहेत. कच्चा बटाटा दाह करणारा आणि कैफ आणणारा आहे. मात्र उकडल्यावर हे दोष कमी होतात ( नष्ट नाही. ). मधुमेही, संग्रहणी, जुलाब व पोटात मुरडा येणा-या रोग्यांनी बटाटा टाळावा. आग होणे, लघवीच्या तक्रारीत रताळी उपयुक्त आहे. पण हे दोन्ही पदार्थ तारतम्याने खावे.
६) दही आणि ताक – दही हे उष्ण ( थंड अजिबात नाही ) , बूक वाढविणारे, पचायला जड, पचल्यावर आंबट रस तयार करणारे, पित्त-रक्तविकार-सूज-मेद-कफ वाढविणारे आहे. त्यामुळे उपवासाला इतर पदार्थ पचन बिघडविणारे असतांना त्यात भरीसभर म्हणुन दही अजिबात खाऊ नये. मात्र दह्यात चारपट पाणी टाकुन, रवीने घुसळुन लोणी काढलेले ताक मात्र ह्या पृथ्वीवरचे अमृत आहे. ताक हे तुरट गोड रसाचे, पचल्यावर गोड होणारे, पचायला हलके, उष्ण, तृप्ती देणारे आणि वातनाशक आहे. म्हणुन उपवासाला दह्यापेक्षा ताक चांगले. मात्र अंगाची आग, रक्तपित्त, चक्कर येणे यात ताक टाळावे.
७) कांदा आणि लसुण – वर आपण उपवासाला आणि चातुर्मासात चालाणा-या (?) पदार्थांची माहिती पाहिली. पण कांदा आणि लसुण हे न चालणरे पदार्थ आहे. कांदा हा भरपूर औषधी गुणयुक्त असला तरी तो रज आणि तम दोष वाढविणारा आहे तसेच तो अमेध्य (बुध्दीला उपयुक्त नसणारा) आहे. त्यामुळे चातुर्मासात किंवा श्रावणात जेव्हा मनाचा सत्व गुण वाढणे अपेक्षित आहे तेव्हा कांदा त्याला मारक ठरतो कारण तो रजोतमोवर्धक आहे. राहू चोरून अमृत प्यायला, त्यामुळे त्याचा गळा कापतांना जे अमृताचे थेंब खाली पृथ्वीवर पडले त्यातुन लसुणाची उत्पत्ती झाली अशी एक कथा आहे. थोडक्यात असुरांपासुन लसणाची उत्पत्ते झाली आहे त्यामुळे तो याकाळात वर्ज्य आहे. अन्यथा लसुणामध्ये औषधी गुण ठासून भरलेले आहेत.
उपवासाला चालणारे पदार्थ, त्यांचे गुणधर्म बघितल्यानंतर “एकादशी अन दुप्पट खाशी” ही म्हण खोटी पाडली पाहिजे असे वाटते. कारण आपण फक्त उपवासाला भरपूर खातो आणि इतर वेळी मात्र फार पथ्याने राहतो अशी परिस्थीती नाही. आणि म्हणुनच इतर काळात केलेल्या अपथ्यामुळे शरीरात तयार झालेले दोष उपवासाने, लंघनाने कमी करण्यासाठी उपवास हा कडकडीत करून पचनशक्तीला काम करायला अवसर दिला पाहिजे तर तो उपवास आपल्याला लाभेल.
लंघनाने होणारे फायदे वाचले तर तुम्हीही माझ्या म्हणण्याला दुजोरा द्याल यात शंका नाही.
“विमलेन्द्रियता सर्गो मलानां लाघवं रुचिः ।
क्षुत्तृट्सहोदयः शुध्दहृदयोद्गारकण्ठता ॥
व्याधीमर्दवमुत्साहः तन्द्रानाश्चलंघिते ॥“ ( अष्टांग हृदय/सुत्र/१४)
थोडक्यात सर्व इंद्रिये (कर्मेन्द्रिय,ज्ञानेन्द्रिय,मन) प्रसन्न होणे, शरीरातील मळ बाहेर टाकला जाणे, अंगाला हलकेपणा येणे, रुची उत्पन्न होणे, भूक आणि तहान यांचा एकाचवेळी योग्य प्रादुर्भाव होणे, हृदय आणि कंठ शुध्द होणे, शुध्द ढेकर येणे ( कडवट-आंबट ढेकर नसणे), शारीरिक रोगांचा जोर कमी होणे, उत्साह वाढणे आणि झापड- तंद्रा कमी होणे हे सगळे फायदे लंघनाने होतात.
हे सगळे पाळले गेले तर आपल्या पूर्वीच्या आचार्यांना उपवासाने अपेक्षित असलेले ध्येय आपण गाठू शकू, नाही का ?
७, गुंजाळ एव्हेन्यु, महिला बँकमागे,
इंदिरानगर,
नाशिक – ४२२००९
फोन – ९४२०४६२०५ / ९८८११५०२७२
No comments:
Post a Comment