#घरोघरी_आयुर्वेद
खास पावसाळ्यासाठी आयुर्वेदीय पाककृती: 'मुदग यूष'
साहित्य आणि कृती:
साधारणपणे कडधान्ये वापरून यूष तयार केले जातात. याकरता; ज्या कडधान्याचे यूष बनवायचे आहे ते कडधान्य ५० ग्रॅम घ्यावे. त्यामध्ये ६५० मिली पाणी घालावे आणि मध्यम आचेवर शिजवण्यास ठेवावे. कडधान्ये व्यवस्थितपणे शिजल्यावर तसेच पाणी सुमारे निम्मे आटल्यावर तयार झालेले मिश्रण एकत्रित घोटून व त्यानंतर गाळून घ्यावे. अशाप्रकारे तयार झालेल्या युषामध्ये वर दिल्याप्रमाणे आपल्या आवडीनुसार प्रकार करता येतात. आयुर्वेदात प्रामुख्याने मुगाचे यूष हे अधिक प्रमाणात नमूद केल्याचे दिसते. पावसाळ्यासाठी खास मुद्ग यूष बनवत असताना त्यात डाळिंबाचा रस घालून; त्याला आंबट-गोड चवीचे करावे. याने पावसाळ्यात शरीरात वाढणारा वात आणि साचणारे पित्त आटोक्यात राहतात.
अन्य गुणधर्म:
- मुगाचे कढण हे पचायला हलके असते आणि वाताला कमी करते.
- शस्त्रक्रिया झाल्यावर घ्यावयाचा आहार अथवा प्रसुतीनंतर घेण्यासाठी म्हणून त्यात तूप व खडीसाखर मिसळून दिल्यास उपयुक्त ठरते. (मधुमेहींना मध घालून द्यावे.)
- पित्ताचा त्रास होवून पोटात दुखत असल्यास खडीसाखर मिसळून यूष द्यावे.
- अतिसारामध्ये सुंठपूड घालून यूष द्यावे.
- कफाचे विकार असल्यास वा मधुमेहींनी यूष घ्यायचे असल्यास त्यात सैंधव, हिंग व सुंठ घालून घ्यावे.
- उलटी होणे, जुलाब होणे, वारंवार तहान लागणे अशा तक्रारींवर मुग भाजून तयार केलेल्या मुद्ग युषामध्ये लाह्या आणि मध मिसळून दिल्यास अधिक लाभ होतो.
- वातामुळे सांधे दुखणे वा संधीवातासारखा त्रास असल्यास मुद्ग युषामध्ये तूप घालून द्यावे.
या पावसाळ्यात गरमागरम मुदग यूष ची मजा चाखा. मस्त खा आणि स्वस्थ राहा.
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
(छायाचित्र: प्रातिनिधिक, नेटवरून साभार)
No comments:
Post a Comment