*आयुमित्र*
*शेतकरी असंसर्गजन्यव्याधी आणि आयुर्वेद*
मित्रांनो,
सध्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश ह्या राज्यांमध्ये अन्नदात्याचे आंदोलन सुरू आहे. विषय सगळ्यांना माहिती आहेच.आंदोलन योग्य कि अयोग्य? खरंच शेतकरी करताय का राजकारणी घडवून आणताय? शेतकरी पायजमा/धोतर घालून आंदोलन का करत नाहीत? जीन्स घालून का करताय? अन्नाची नासाडी अन्नदाता का करतोय? असे अनेक प्रश्न लोक उपस्थित करीत आहेत. ह्याचे उत्तर शोधणे किंवा ह्यावर मत देण्यासाठीचा हा लेख नाही. शेतकरी आणि त्यांच्या मधील वाढत्या असनसर्गजन्य व्याधी हा विषय आहे.
मी स्वतः शेतकरी कुटुंबातील आहे. पण मी फक्त शेती पहिली/देखरेख केली आहे पण कधी प्रत्यक्ष राबलो नाही क्वचितच कधीतरी काम केल्याचे आठवते. सर्व केलं ते माझ्या काकांनी किंवा बाबांनीच. माझ्या गावातील संपूर्ण लोक शेतीवरच अवलंबून आहेत. मी एक सर्व्हे केला होता. त्यात मला 30%लोक हे बीपीच्या त्रासाने ग्रासलेले आढळले. जेव्हा केव्हा गावात मृत्यच्या बातम्या येतात तेव्हा समोर हार्ट अटॅक, लखवा, डायबेटीज, किडनीचे आजार हेच करण समोर येतात.(मृत्यूच्या कारणांचा पूर्ण डेटा उपल्बध न नाही)
असंसर्गजन्य व्याधी म्हणजे ज्या संसर्गाने होत नाहीत. जसे बीपी, डायबेटीज, कँसर, लखवा, स्थौल्य, मानसिक व्याधी ह्यात येतात. शेतकरीच नाही तर एकूणच जनतेत असंसर्गजन्य व्याधींचे प्रमाण वाढत चालले आहे. आधी शेतकरी बंधूंमध्ये असंसर्गजन्य व्याधींचे प्रमाण अत्यल्प होते. परंतु ते आता वाढत चालले आहे. ग्रामीण भागात सुद्धा ह्या व्याधी वाढत आहेत. असंसर्गजन्य व्याधींचे प्रमुख करणे पुढील प्रमाणे असतात. व्यायामाचा अभाव, व्यसन, स्थौल्य, तंबाखूचा वापर हे आहेत. शेतकऱयांच्या बाबतीत अजून एक कारण जोडावेसे वाटते ते म्हणजे शेतीसाठी काढलेले कर्ज, उत्पादनाला न मिळणारा योग्य भाव, पिकांची चिंता, वातावरणाची चिंता, पावसाची चिंता, पीक नुकसानाची चिंता ह्यामुळे होणारा मानसिक ताण, नैराश्य, चिंता हे सुद्धा महत्वाचे आहेत. ह्यामुळे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. ह्यातूनच आत्महत्या करण्याचे प्रमाणसुद्धा दिसून येते.
*आयुर्वेद काय सांगतो?*
आयुर्वेद असंसर्गजन्य व्याधी टाळण्यासाठी दिनचर्या, ऋतूचर्या, पंचकर्म, वेगधारण न करणे, सदवृत्त पालन ह्या गोष्टी वर्णन केल्या आहेत. ह्यासाठी योग, प्राणायाम ह्या सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. शेती आणि आयुर्वेद ह्यांचासुद्धा जवळचा संबंध आहे. आयुर्वेद अन्नालासुद्धा औषध मानतो. म्हणून विचारपूर्वक आहार-विहार ठेवल्यास असंसर्गजन्य व्याधी टाळता येतात. आपल्या परिवारापुरता किंवा आपल्या शक्य होईल तितक्या भागात सेंद्रिय शेती केल्यास अनेक धोके शेतकरी बंधूंचे कमी होऊ शकतात.
कर्ज, पिकांना न मिळणारा भाव ह्या चिंतादी मुळे येणारा ताण टाळता येणं कठीण आहे पण आयुर्वेद व योग ह्यांच्या माध्यमातून नक्कीच आपण ताण कमी करू शकतो. दिनचर्याआदींचे पालन करून, व्यासनमुक्ती करून आपले आरोग्य अन्नदाता नक्कीच रक्षण करू शकतो. अशी मला आशा आहे.
सध्या शेतकऱ्याच्या तापलेल्या विषयात एक आयुर्वेदाचा वैद्य म्हणून शेतकऱ्याच्या आरोग्याविषयी लिहावेसे वाटले म्हणून आजची पोस्ट.
*– वैद्य भूषण मनोहर देव*
*ज्योती आयुर्वेद जळगाव*
*7588010703*
*drbhushandeo@gmail.com*
http://wp.me/p7ZRKy-8F