सशस्त्र क्रांतीच्या प्रवर्तकाचा जन्म
खिस्ताब्द १८०० चे शेवटचे पर्व चालू झाले. ब्रिटिशांनी त्यांच्या कूटनीतीने संपूर्ण हिंदुस्थानवर हळूहळू कब्जा मिळविण्यास प्रारंभ केला. ब्रिटिश गव्हर्नर जनरल डलहौसीने एकामागून एक संस्थाने खालसा करण्यास प्रारंभ केला. हिंदुस्थानातील जनतेत आणि संस्थानिकांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध असंतोषाचा अग्नी धुमसू लागला आणि १८५७ मध्ये स्वातंत्र्ययुद्धाचा वणवा भडकला. हिंदुस्थानात ठिकठिकाणी ब्रिटिशांविरुद्ध उठाव चालू झाले. याच धामधुमीत रायगड जिल्ह्यातील पनवेलजवळील शिरढोण या गावी ४ नोव्हेंबर १८४५ या दिवशी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. हेच ते स्वातंत्र्य चळवळीच्या सशस्त्र क्रांतीचे प्रवर्तक वासुदेव बळवंत फडके !
ब्रिटिशांविरुद्धची पहिली ठिणगी
वासुदेव बळवंत फडके यांचे प्राथमिक शिक्षण शिरढोणला झाल्यावर माध्यमिक शिक्षणासाठी प्रथम त्यांनी कल्याण आणि नंतर मुंबई गाठली. ब्रिटिश सरकारचे प्रशस्तीपत्रक नको म्हणून त्यांनी अंतिम परीक्षेपासून दूर रहाणे पसंत केले. नंतर एक-दोन नोकर्या सोडून लष्कराच्या हिशेब खात्यात नोकरीस लागले. या वेळी त्यांची मुंबईहून पुण्यास बदली झाली. पुणे येथे नोकरी करीत असतांना त्यांनी तलवारबाजी, दांडपट्टा, घोड्यावर बसणे यांचे शिक्षण घेतले. शिरढोणला असलेली त्यांची आई अत्यवस्थ असल्याचे त्यांना कळले; पण ब्रिटिश अधिकार्याने त्यांची रजा नामंजूर केल्याने त्यांना आईच्या अंत्यदर्शनापासून मुकावे लागले आणि इथेच वासुदेवांच्या मनात ब्रिटिशांविरुद्धची पहिली ठिणगी पडली. १८७६ ते ७८ या काळात महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला. दुष्काळात सापडलेल्यांना ब्रिटिश सरकार मदत
करीत नाही, हे पाहून वासुदेवांच्या मनातील ठिणगीचे वणव्यात
रूपांतर झाले.
भारतभूमीला स्वतंत्र करण्याची शपथ
वासुदेव बळवंत फडकेंनी क्रांतीकारकांचे प्रेरणास्रोत असलेल्या छ. शिवाजी महाराजांना स्मरून ब्रिटीश सरकार उलथून पाडण्याची आणि भारतभूमीला ब्रिटिशांपासून मुक्त करण्याची शपथ घेतली. त्यांनी बुरुड, रामोशी समाजातील तरुणांना एकत्र आणून एक सेना उभारली. आपल्या सैन्याच्या खर्चाकरिता आणि शस्त्रास्त्रांकरिता त्यांनी गावातील धनिकांना लुटले; पण देश स्वतंत्र होताच त्यांना नुकसानभरपाई देण्याचे आश्वासनही दिले. त्यांनी ब्रिटिशांचा खजिना आणि ठाणी लुटली.
भारतमातेचा तेजस्वी सुपुत्राला मानाचा मुजरा
खिस्ताब्द १८७९ मध्ये वासुदेव बळवंत फडके यांच्या बंडांनी पुणे आणि रायगड जिल्ह्यांत ब्रिटिशांना ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले ! त्यांना पकडण्यासाठी ब्रिटीश सरकारने ५ सहस्र रुपयांचे इनामही लावले; पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. अखेर फितुरी आणि आजारपण यांनी जेरीस आलेले वासुदेवराव पठाणांचे पगारी सैन्य उभारण्याकरिता विजापुरास निघाले असता देवरनावडगी या ठिकाणी ब्रिटिशांनी त्यांना गाठले. त्यांच्यावर खटला चालवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. तुरुंगातील निकस अन्न, आत्यंतिक कष्टाची कामे, खराब हवा आणि क्षयरोग यांनी वासुदेवराव पोखरून गेले. आजारपण आणि अन्नत्यागामुळे १७ फेब्रुवारी १८८३ या दिवशी हा भारतमातेचा तेजस्वी सुपुत्र, दत्तात्रयांचा निस्सीम भक्त आणि छ. शिवाजी महाराजांचा सेवक अनंतात विलीन झाला ! १७ फेब्रुवारीला येणार्या त्यांच्या पुण्यदिनी, भारतमातेच्या या सुपुत्राला, आद्यक्रांतीवीराला सर्व राष्ट्रभक्तांचा मानाचा मुजरा!
पनवेलपासून पळस्पा फाट्याच्या पुढे तीन-चार कि.मी.वर मुंबई-गोवा महामार्गावर ‘शिरढोण’ हे आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मगाव आहे. गावात वासुदेवरावांचा जन्म झाला तो वाडा आज दयनीय अवस्थेत उभा आहे. वासुदेवरावांच्या वाड्यासमोर वैâ. विष्णू गोपाळ तथा बापूसाहेब फाटक यांच्या पुढाकारांनी उभारलेले एक स्मृतीमंदिर आहे. १७ फेब्रुवारीला या स्मृतीमंदिरात वासुदेवरावांच्या पुण्यदिनाचा कार्यक्रम होणार आहे. ज्या क्रांतीवीरांच्या प्रेतांच्या पायघड्यांवरून स्वातंत्र्यलक्ष्मी चालत आली, त्या सशस्त्र क्रांतीचे प्रवर्तक आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्यासमोर सारेजण नतमस्तक होतात.
अस्तित्वाला या देशाच्या जाग आणली खरी ।
म्हणोनी तुजला संबोधन हे आद्यक्रांतीकारी ।।
No comments:
Post a Comment