Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Tuesday, March 15, 2016

#‎घरोघरी_आयुर्वेद‬

“तुम्ही वैद्य लोकं खाण्याची खूप पथ्य सांगता बुवा.....लोक त्यांच्या आवडीचं खातायत हे तुम्हाला बघवतच नाही. म्हणून मी आयुर्वेदापासून चार हात लांब असतो.”
काही कामाच्या निमित्ताने चेन्नईत दौऱ्यावर असताना एका हॉटेलमध्ये जेवायला बसल्यावर आमच्यासह असलेल्या एका मध्यमवयीन व्यक्तींनी हा बॉम्ब टाकला.
“इथे प्रश्न रुग्णाच्या आवडीचा नसून; त्याच्या भल्याचा आहे. जे पदार्थ खाऊन आरोग्याला अपाय होतो असेच पदार्थ आम्ही टाळायला सुचवतो. त्यात आम्हाला आनंद मिळतो असं कोणाला वाटत असल्यास करणार काय?” इति मी.
“कसला काय अपाय होणार आहे? माझाच आहार बघा आता....आणि सांगा काय अपाय होणार आहे.”
असं म्हणून या गृहस्थांनी अट्टाहासापायी चिकन स्वीट कॉर्न सूप, तंदुरी चिकन, तंदुरी रोटी, पनीर बटर मसाला, चिकन बिर्यानी आणि शेवट ‘स्वीट डिश’ म्हणून आईसक्रीम असा त्यांच्या ‘आवडीचा’ आहार घेतला. त्यात भर म्हणजे हे गृहस्थ संपूर्ण जेवणभर पाण्याऐवजी कोल्ड्रिंकच पीत होते. आईसक्रीम मागवण्यापुर्वी वाडगाभर दही खाऊन मग त्यांनी मला विचारलं;
“काय मग...तुम्ही यालाच विरुद्धाहार म्हणता नं? काही नसतं तसं. खायचं बिनधास्त. तुमचा आयुर्वेद काय सांगेल आता माझ्या या आहाराबद्दल?”
मी केवळ हसून उत्तर देण्याचं टाळलं.
“सांगा की वैद्यराज. उत्तर द्यावच लागेल”
“आयुर्वेद हे माणसांसाठीच शास्त्र आहे हो. तुमच्यासारख्यांनी दुर्लक्ष करावं आयुर्वेदाकडे!!” अखेरीस आमचा फटका बसलाच.
चेन्नईचा निसर्ग आपल्या स्वभावाला जागलाच आणि रात्री मुसळधार पाऊस पडला. सकाळी ६ वाजता माझ्या दारावर थाप पडली. दार उघडतो तर काय; या सद्गृहस्थांच्या पत्नी हजर!
“डॉक्टर; ह्यांना पहाटेपासून ताप आहे. तुम्ही तपसायला येता का?”
मी लगेच तपासायला गेलो. नाडी परीक्षण आणि उदर परीक्षण केल्यावर अजीर्ण झाल्याचे निदान करून दिवसभर भूक लागल्यावर पेज अन्यथा लंघन आणि सुंठीचे गरम पाणी घेण्यास सुचवलं आणि माझ्या कामाला लागलो. संध्यकाळपर्यन्त त्यांचा ताप उतरला आणि ठणठणीत झाले.
आपले वैद्य जे पथ्य सांगतात त्यांमागे काही कारणं असतात हे नेहमी लक्षात ठेवा. पथ्य पाळणाऱ्या मनुष्याला औषधांची गरजदेखील पडत नाही असं सांगणारं एकमेव शास्त्र म्हणजे आयुर्वेद.
‘पथ्य-बिथ्य काही नसतं. आडवं-तिडवं कसंही खायचं. काही होत नाही.’
असं ज्यांना वाटतं त्यांनी लक्षात नेहमी ठेवा......वेळ सांगून येत नसते. आग लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा सुरुवातीपासूनच काळजी घेतलेली काय वाईट?
© वैद्य परीक्षित स. शेवडे
(आयुर्वेदतज्ज्ञ- लेखक- व्याख्याते)
श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद; डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

No comments:

Post a Comment

Visit Our Page