औषधी गर्भसंस्कार उत्पादने व प्रचलित मासानुमासिक पाठ,
एक तौलनिक अभ्यास !
(फक्त वैद्यकीय व्यावसायिकांसाठी)
तौलनिक अभ्यास !
‘कोण बरोबर’ ह्यापेक्षा ‘काय बरोबर’ हे लक्षात घेणे अधिक महत्वाचे
आयुर्वेदोक्त सर्व पाठ अत्यंत सखोल अभ्यासातून निष्कर्ष स्वरुपात ग्रंथात दिले आहेत. त्यांचा उपयोग चिकित्सेत करतांना झापडं लाऊन करणे नक्कीच चुकीचे ठरेल. शास्त्रशुद्ध संकल्पना, निर्माण पद्धती ह्यांची युक्तिपूर्वक अंमलबजावणी केल्यास चिकित्सेत अपयश मिळणे असंभव.
बाजारातून कोणतीही लहानशी वस्तू किंवा जिन्नस घेतांना आपण चौकसपणे उपलब्ध असलेल्या अन्य तत्सम वस्तूंचा दर्जा, किंमत इ. गोष्टी पडताळून पाहतो. मग गर्भावस्थेत जे पाठ आपण रुग्णांना देणार त्यांच्या दर्जाबद्दल आपल्याला खात्री असणे नक्कीच गरजेचे आहे. अक्षय निर्मित “औषधी गर्भसंस्कार” उत्पादने आणि प्रचलित उत्पादनांची माहिती व्हावी आणि नीरक्षीर न्यायाने आपण त्यांचा पडताळा करून मगच चिकित्सेत वापर करावा हा प्रांजळ हेतू ह्या अभ्यासामागे आहे.
सर्वप्रथम निर्माण पद्धतीबद्दल बघूया –
रसः कल्कः शृतः शीतः फाण्टश्चेति प्रकल्पना l पञ्चधैव कषायाणां पूर्वं पूर्वं बलाधिका ll . . . . अष्टांगहृदय, कल्पस्थान ६/८
स्वरस, कल्क, शृत (क्वाथ), शीत, फान्ट अशा पाच कषाय कल्पना पूर्व पूर्व क्रमाने बलवान आहेत. म्हणजेच गुणांच्या दृष्टीने स्वरस सर्वात अधिक बलवान, त्यानंतर कल्क, नंतर शृत (काढा), पुढे शीत व शेवटचा फाण्ट हा गुणांच्या दृष्टीने सर्वात कमी प्रभावी असतो. मासानुमासिक कल्पांमध्ये वर्णन केलेल्या बहुतांशी वनस्पती ओल्या मिळणे जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे शास्त्रवचनानुसार अक्षयनिर्मित मासानुमासिक कल्पांमध्ये 'कल्क संकल्पना' वापरून पाठ निर्मिती केली आहे. प्रचलित मासानुमासिक उत्पादनांमध्ये क्वाथाचाच नव्हे तर घन क्वाथाचा वापर केलेला दिसतो. म्हणून अक्षयनिर्मित मासानुमासिक कल्प प्रचलित उत्पादनांच्या तुलनेत अधिक प्रभावी सिद्ध होतात.
विशिष्ट पाठ ज्या ग्रंथातून घेतले आहेत त्याच ग्रंथातील सूत्रांचा वापर औषध निर्मितीच्या वेळी करणे अनिवार्य ठरते. अष्टांगहृदयातील मासानुमासिक पाठांमध्ये, फक्त वनस्पतींचा नामोल्लेख आहे. ह्याच ग्रंथातील पुढील सूत्रानुसार सदर पाठांचा वापर कल्कस्वरुपात करण्याचा शास्त्रादेश आहे.
कल्पयेत्सदृशान् भागान् प्रमाणं यत्र नोदितम् ।
कल्कीकुर्याच्च भैषज्यमनिरूपितकल्पनम् ।। . . . . अष्टांगहृदय, कल्पस्थान ६/२४
पाठात घटकांचे प्रमाण उल्लेखित नसल्यास त्यांचा वापर समप्रमाणात करावा, ज्याठिकाणी वनस्पती कोणत्या स्वरुपात वापराव्यात असा स्पष्ट उल्लेख नसेल त्याठिकाणी कल्क स्वरुपात वापरणेच श्रेष्ठ समजावे.
‘कल्क’ निर्माण प्रक्रिया
कल्कः पिष्टो द्रवाप्लुतः . . . . अष्टांगहृदय कल्पस्थान ६/९
द्रव्यमात्रं शिलापिष्टं शुष्कं वा जलमिश्रितम्। . . . . शारंगधर २/५/३५
वनस्पती दगडावर वाटून कल्क करावा व शुष्क असल्यास चूर्णाबरोबर पाणी वापरून मर्दन करावे म्हणजे कल्क तयार होतो.
मर्दनात अप्रत्यक्ष उष्णता (उर्जा) अपेक्षित आहे. ह्या निर्माण पद्धतीत वनस्पतींमधील सुगंधी व उडनशील कार्यकारी घटकांचे रक्षण होते, औषधाची कार्मुकता वाढते, औषध टिकाऊ बनते व पचन यंत्रणेच्या सूक्ष्म स्रोतसांमध्ये सहज शोषले जाते.
“औषधी गर्भसंस्कार” पाठांची रचना करतांना ह्या सूत्रांनुसार वनस्पतींच्या चूर्णाला पाण्याऐवजी त्या पाठातील मुख्य कार्यकारी वनस्पतीच्या स्वरस किंवा क्वाथाची भावना दिली जाते. गुणवर्धन होण्यासाठी ही प्रक्रिया अधिक उपयुक्त ठरते. ह्याउलट प्रचलित पाठनिर्माण करतांना वनस्पतींच्या घनांचा (रसक्रिया) उपयोग केलेला दिसतो. क्वाथामध्ये उष्णता दिली जाते व गाळून त्यांना पुन्हा प्रखर उष्णता दिली जाते.
क्वाथादीनां पुनः पाकाद् घनत्वं या रसक्रिया ।
- - - - - - - - - - - - -
आता औषध सेवन मात्रेविषयी बघूया -
पेष्यस्य कर्षमालोड्यं तद् द्रवस्य पलत्रये । . . . . अष्टांगहृदय, कल्पस्थान ६/१३
कल्काची मध्यम मात्रा १ तोळा म्हणजे म्हणजे दिवसाला सुमारे १० ग्रॅम एवढी सांगितली आहे.
“औषधी गर्भसंस्कार” उत्पादनांमध्ये प्रत्येक गोळीत वनस्पती औषधाचे प्रमाण ५०० मिलिग्रॅम आहे. २ - २ गोळ्या रोज २ वेळा घेण्यामुळे दिवसाची एकूण मात्रा २ ग्रॅम होते. पाठातील कार्यकारी द्रव्याची भावना देऊन मर्दन केल्यामुळे गुणात दुप्पट वाढ होते असे तज्ञांनी सांगितले. म्हणजेच ही मात्रा ४ ग्रॅम धरणे समर्पक होईल. गर्भावस्थेत स्त्रीची संवेदनशील अवस्था समजून मध्यम मात्रेऐवजी लघु मात्रा देणे अधिक योग्य, म्हणजेच १ तोळा ऐवजी अर्धा तोळा पुरेशी आहे.
क्वाथाची मध्यम मात्रा ४ तोळे म्हणजे दिवसाला सुमारे ४० ग्रॅम एवढी सांगितली आहे.
क्वाथं द्रव्यपले कुर्यात्प्रस्थार्धं पादशेषितम् । . . . . अष्टांगहृदय, कल्पस्थान ६/१३
क्वाथासाठी वनस्पती द्रव्याची मात्रा १ पल म्हणजे ४ तोळे घेण्याचा संदर्भ आहे. प्रचलित उत्पादनांमध्ये ग्रंथोक्त मात्रेचा विचार केल्यास ह्या उत्पादनांच्या २५० मिलिग्रॅमच्या किमान १६० गोळ्या दिल्यास मात्रा पुरेशी होईल. गर्भावस्था नाजुक व संवेदनशील असल्याने निम्म्या मात्रेत औषध द्यावे असा विचार केला तरीही ८० गोळ्या द्याव्या लागतील.
- - - - - - - - - - - - -
प्रत्यक्षात -
“औषधी गर्भसंस्कार” उत्पादनांच्या गोळीचे वजन ६०० मिलिग्रॅम
घटक द्रव्यांचे वजन ५५० मिलिग्रॅम (भावना व मर्दन संस्कार करून)
एक्सीपियंट्स चे प्रमाण जेमतेम ५० ते ६० मिलिग्रॅम
प्रचलित उत्पादनांमध्ये –
गोळीचे वजन ५५० मिलिग्रॅम ; घटक द्रव्यांचे वजन २४० ते २५० मिलिग्रॅम
घन स्वरुपात द्रव्य प्रमाण सुमारे २४ ते ४८ मिलिग्रॅम
एक्सीपियंट्स चे प्रमाण ५२६ ते ५०२ मिलिग्रॅम एवढ्या बेसुमार मात्रेत
ज्या मात्रेत औषधी द्रव्य देण्याची आवश्यकता आहे, त्या मात्रेत एक्सीपियंट्स वापरल्याचे आढळते.
काही प्रचलित मासानुमासिक कल्पांमध्ये वनस्पतींचे घन समप्रमाणात वापरलेले दिसतात. वास्तविक प्रत्येक वनस्पतीचे घन रूपांतरित गुणोत्तर (Yield) भिन्न असते. त्यामुळे ग्रंथोक्त पाठाप्रमाणेच घन समप्रमाणात वापरले तर मूळ वनस्पतींचे प्रमाण विभिन्न होते. शास्त्रोक्त सूत्रांचे उल्लंघन झाल्याने अशा पाठांच्या कार्मुकतेबद्दल संभ्रम निर्माण होतो.
अष्टांगहृदयात १० भिन्न पाठ गर्भावस्थेच्या १० महिन्यांसाठी दिलेले आहेत. गर्भावस्था दहा महिन्यांची कशी हे शास्त्राधारे समजून मगच अक्षयने औषधी गर्भसंस्कार पाठांची योजना केली आहे. ह्या १० महिन्यांच्या पाठांमध्ये एकूण ३१ वनस्पतींचा अंतर्भाव आहे. त्यापैकी ८ वनस्पतींचा वापर अनेक वेळा (दोन, तीन व पाच वेळा) केलेला आहे.
- - - - - - - - - - - - -
वनस्पतींची अचूक ओळख व प्रतिनिधि द्रव्ये
मूळ ग्रंथाच्या भाषांतरित आवृत्तीमध्ये काही दोष किंवा विसंगती असू शकते. त्यामुळे चुकीच्या वनस्पतीचा अंतर्भाव पाठात केला जाऊ शकतो. अशावेळी संस्कृत श्लोकांचा सखोल अभ्यास करून मगच द्रव्य निश्चिती केली पाहिजे. केवळ भाषांतर पाहून औषधनिर्मिती केली तर पाठ चुकीचे होतील आणि अपेक्षित लाभ प्राप्त होणार नाहीत. त्याचप्रमाणे पाठातील काही विशिष्ट घटक संदिग्ध किंवा अनुपलब्ध असल्यास त्यांच्या ऐवजी प्रतिनिधि द्रव्यांची योजना शास्त्रकारांनी केली आहे.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
प्रत्येक महिन्याच्या पाठांचा तौलनिक अभ्यास
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
पहिला महिना -
मधुकंशाकबीजंच पयस्या सुरदारुच । . . . . अष्टांगहृदय, शारीरस्थान २/५४
मधुक, शाकबीज, पयस्या, सुरदारु . . . हा आहे पहिल्या महिन्याचा पाठ.
पयस्या म्हणजे क्षीरकाकोली. अष्टवर्गातील ह्या वनस्पतीचा समावेश एकूण ४ पाठांमध्ये आहे.
राज्ञामप्यष्टवर्गस्तु यत्तोSयमतिदुर्लभः ।
तस्मादस्य प्रतिनिधिं गृह्णीयात्तद् गुणं भिषक् ।।
. . . . भावप्रकाश निघंटु, हरितक्यादि १४३
अष्टवर्गातील वनस्पती अत्यंत दुर्मिळ व राजालाही दुर्लभ आहेत. म्हणून वैद्यांनी त्यांच्या प्रतिनिधि द्रव्यांचा वापर करावा.
सगर्भावस्थेचा विचार करता शतावरी हे सर्वोत्तम प्रतिनिधि द्रव्य ठरते म्हणून औषधी गर्भसंस्कार पाठांमध्ये सर्वत्र पयस्या ऐवजी शतावरीचा वापर केला आहे.
अक्षय निर्मित “प्रथमाह” पाठ
मधुक, शाकबीज, शतावरी, सुरदारु - प्रत्येकी १२५ मिलिग्रॅम; भावना द्रव्य: शतावरी १२५ मिलिग्रॅम
प्रचलित पाठ -
यष्टिमधु, साग बीज, क्षीरकाकोली, देवदार प्रत्येकी ६० मिलिग्रॅमचा घन
९ महिन्याच्या दोन प्रचलित पाठांमध्ये क्षीरकाकोलीचा तर नवव्या महिन्याच्या पाठात विदारीकंदाचा वापर केला आहे. पहिल्या व तिसऱ्या पाठात वापरण्यासाठी जर क्षीरकाकोली उपलब्ध होते तर नवव्या महिन्याच्या पाठात विदारीकंद का वापरला ?
- - - - - - - - - - - - -
दुसरा महिना
अश्मन्तकः कृष्णतिलास्ताम्रवल्ली शतावरी । . . . . अष्टांगहृदय, शारीरस्थान २/५४
अश्मंतक, कृष्ण तिळ, मंजिष्ठा, शतावरी . . . हा आहे दुसऱ्या महिन्याचा पाठ
अक्षय निर्मित “द्वितिमाह” पाठ -
अश्मंतक, कृष्ण तिळ, मंजिष्ठा, शतावरी प्रत्येकी १२५ मिलिग्रॅम; भावना द्रव्य: अश्मंतक १२५ मिलिग्रॅम
प्रचलित पाठ -
अश्मंतक, कृष्ण तिळ, मंजिष्ठा, शतावरी प्रत्येकी ६० मिलिग्रॅमचा घन
सर्व वनस्पती योग्य असल्याचे दिसते. मात्र द्रव्यांचे प्रमाण व निर्माण पद्धती शास्त्राधारे चुकीची ठरते.
- - - - - - - - - - - - -
तिसरा महिना
वृक्षादनीपयस्या च लता चोत्पलसारिवा । . . . . अष्टांगहृदय, शारीरस्थान २/५५
वृक्षादनी, पयस्या, लता, उत्पलसारिवा . . . हा आहे तिसऱ्या महिन्याचा पाठ.
वृक्षादनी ही संदिग्ध व अपरिचित वनस्पती आहे.
प्रियङ्गुः फलिनी कान्ता लता च महिलाह्वया | - भावप्रकाश निघन्टु, कर्पुरादि १०१
लता म्हणजे प्रियंगु.
उत्पलसारिवा म्हणजे श्वेतसारिवा
अक्षय निर्मित “तृतिमाह” पाठ -
शतावरी, प्रियंगु, श्वेत सारिवा प्रत्येकी १६५ मिलिग्रॅम; भावना द्रव्य: शतावरी १६५ मिलिग्रॅम
प्रचलित पाठ -
क्षीरकाकोली, श्वेत सारिवा, कृष्ण सारिवा प्रत्येकी ८० मिलिग्रॅमचा घन
मूळ श्लोक न पाहता अष्टांगहृदय मराठी भाषांतरानुसार हा पाठ केलेला दिसतो. क्षीरकाकोली ह्या संदिग्ध व दुष्प्राप्य वनस्पतीचा वापर केला आहे.
- - - - - - - - - - - - -
चौथा महिना
अनन्ता शारिवा रास्ना पद्मा च मधुयष्टिका । . . . . अष्टांगहृदय, शारीरस्थान २/५५
अनंतमूळ, सारिवा, रास्ना, पद्मा, मधुयष्टि . . . हा आहे चौथ्या महिन्याचा पाठ
अक्षय निर्मित “चतुर्माह” पाठ -
अनंतमूळ, कृष्ण सारिवा, रास्ना ऐवजी कुलिंजन, पद्मा, यष्टिमधु प्रत्येकी १०० मिलिग्रॅम; भावना द्रव्य: अनंतमूळ १०० मिलिग्रॅम
रास्ना ऐवजी कुलिंजन वापरण्याचा उद्देश -
अष्टांगहृदयकारांना अभिप्रेत असलेली रास्ना, प्रचलित रास्नांपेक्षा भिन्न असावी असे वाटते. भावप्रकाश निघन्टु मध्ये एकूण ५ भिन्न वनस्पतींना रास्ना नावाने संबोधले आहे. त्यातील प्रामुख्याने वापरली जाणारी Pluchea lanceolata सोनामुखीप्रमाणे भेदन तर Inula racemosa गर्भाशय संकोचक आहे. सदर गुणधर्मांनुसार गर्भावस्थेत ह्यांचा वापर करणे अयोग्य ठरते. कार्मुकतेचा अभ्यास करून प्रतिनिधि द्रव्य कुलिंजनचा वापर केला आहे.
प्रचलित पाठ -
धमासा, रास्ना, सारिवा, मंजिष्ठा, जेष्टमध प्रत्येकी ५० मिलिग्रॅमचा घन
रास्ना बद्दल विवेचन आपण आत्ताच पाहिले. मूळ श्लोकात धमाशाचा उल्लेखही नाही. भावप्रकाश निघन्टु मध्ये धमासा हा अनंतमूळाचा पर्याय सांगितला आहे. मराठी भाषांतरातही धमासा म्हटले आहे. जेस्टेशनल डायबिटिसचा धोका सगर्भावस्थेच्या चौथ्या महिन्यात सर्वाधिक असतो. धमाशात केन शुगर २६.४%, इनव्हर्ट शुगर्स ११.६%, मेलिझिटोझ ४७.१% अशा ३ प्रकारच्या शर्करा असतात, म्हणून अशावेळी धमासा वापरणे चुकीचे वाटते. एकंदरितच प्रचलित पाठात ५ वनस्पतींपैकी ३ वनस्पती चुकीच्या असल्याचे दिसते.
- - - - - - - - - - - - -
पाचवा महिना
बृहतीद्वयकाश्मर्यक्षीरिशुङ्गत्वचा घृतं । . . . . अष्टांगहृदय, शारीरस्थान २/५६
रिंगणी, डोरली, काश्मरी, वडसाल, वटांकुर . . . हा आहे पाचव्या महिन्याचा पाठ.
अक्षय निर्मित “पंचमाह” पाठ -
रिंगणी, डोरली, काश्मरी, वटांकुर, वडसाल प्रत्येकी १०० मिलिग्रॅम; भावना द्रव्य: वडसाल १०० मिलिग्रॅम
प्रचलित पाठ -
रिंगणी, डोरली, वडसाल, वटांकुर प्रत्येकी ६० मिलिग्रॅमचा घन
ह्यात काश्मरीचा वापरच नाही. वास्तविक 'गर्भशोष' अवस्थेत काश्मरी उपयुक्त असल्याचे वर्णन भावप्रकाश निघन्टुमध्ये आहे. त्यामुळे हा पाठही अपूर्ण असल्याचे दिसते.
- - - - - - - - - - - - -
सहावा महिना
पृश्निपर्णी बला शिग्रुः श्वदंष्ट्रा मधुपर्णिका । . . . . अष्टांगहृदय, शारीरस्थान २/५६
पिठवण, बला, शेवगा, गोखरू, मधुपर्णिका . . . हा आहे सहाव्या महिन्याचा पाठ.
गम्भारी भद्रपर्णी च श्रीपर्णी मधुपर्णिका I भावप्रकाश निघन्टु, गुडुच्यादि १४
मधुपर्णिका म्हणजेच गम्भारी.
अक्षय निर्मित “षष्ठमाह” पाठ -
पिठवण, बला, शेवगा, गोखरू, गम्भारी प्रत्येकी १०० मिलिग्रॅम; भावना द्रव्य: बला १०० मिलिग्रॅम
प्रचलित पाठ -
पिठवण, चिकणा, शेवगा, गोक्षुर प्रत्येकी ६० मिलिग्रॅमचा घन
ह्यात गम्भारीचा समावेशच नाही. 'गर्भशोष' अवस्थेत उपयुक्त असल्यामुळे हिचा अंतर्भाव अनिवार्य वाटतो.
- - - - - - - - - - - - -
सातवा महिना
शृङ्गाटकं बिसं द्राक्षा कसेरु मधुकं सिता । . . . . अष्टांगहृदय, शारीरस्थान २/५७
शृंगाटक, कमळ, द्राक्ष, कसेरु, यष्टिमधु, खडीसाखर . . . हा आहे सातव्या महिन्याचा पाठ.
अक्षय निर्मित “सप्तमाह” पाठ -
शृंगाटक, कमळ, द्राक्ष, कसेरु, यष्टिमधु, खडीसाखर प्रत्येकी ८५ मिलिग्रॅम; भावना द्रव्य: यष्टिमधु ८५ मिलिग्रॅम
कसेरुमध्ये नैसर्गिक प्रोजेस्टेरॉन असल्याचे सिध्द झाले आहे. गर्भावस्थेत सर्वात अधिक प्रोजेस्टेरॉनची आवश्यकता सातव्या महिन्यात असते व ही गरज कसेरुच्या सहाय्याने भरून निघते.
प्रचलित पाठ
शिंगाडा, कमल, द्राक्ष, कचोरा, जेष्टमध, खडीसाखर प्रत्येकी ४० मिलिग्रॅमचा घन
अष्टांगहृदय मराठी भाषांतरात 'कसेरु' ऐवजी 'केसरु' असा मुद्रण दोष दिसतो. त्यानुसार भाषांतरही 'केशर' असे केलेले आहे. मात्र हिंदी आवृत्तीमध्ये श्लोकात व भाषांतरातही कसेरुच म्हटले आहे.
प्रचलित पाठात इतर ५ द्रव्ये जरी मूळ ग्रंथानुसार असली तरी कसेरु ऐवजी कचोरा वापरला आहे. 'कसेरु' आणि 'कचोरा' ह्यात फक्त उच्चार साधर्म्य आहे. गर्भावस्थेच्या दृष्टीने कोणताही उपयुक्त गुण कचोरामध्ये नाही.
- - - - - - - - - - - - -
आठवा महिना
कपित्थबिल्वबृहतीपटोलेक्षुनिदिग्धिकात् । . . . . अष्टांगहृदय, शारीरस्थान २/५८
कपित्थ, बिल्व, बृहती, पटोल, इक्षु, निदिग्धिका . . . हा आहे आठव्या महिन्याचा पाठ.
अक्षय निर्मित “अष्टमाह” पाठ -
कपित्थमूळ, बिल्वमूळ, बृहती, पटोल, इक्षु मूळ, निदिग्धिका प्रत्येकी ८५ मिलिग्रॅम; भावना द्रव्य: निदिग्धिका ८५ मिलिग्रॅम
प्रचलित पाठ -
कवठमूळ, बेलमूळ, रिंगणी, पटोलपत्र, इक्षुमूळ, डोरली प्रत्येकी ४० मिलिग्रॅमचा घन
सर्व वनस्पती योग्य असल्याचे दिसते. मात्र द्रव्यांचे प्रमाण व निर्माण पद्धती अशास्त्रीय आहे.
- - - - - - - - - - - - -
नववा महिना
नवमे शारिवानन्तापयस्यामधुयष्टिभिः l . . . . अष्टांगहृदय, शारीरस्थान २/५९
सारिवा, अनंता, क्षीरकाकोली, मधुयष्टि . . . हा आहे नवव्या महिन्याचा पाठ.
अक्षय निर्मित “नवमाह” पाठ -
सारिवा, अनंता, शतावरी, यष्टिमधु प्रत्येकी १२५ मिलिग्रॅम; भावना द्रव्य: शतावरी १२५ मिलिग्रॅम
प्रचलित पाठ -
अनंतमूळ, धमासा, विदारीकंद, जेष्टमध प्रत्येकी ६० मिलिग्रॅमचा घन
अष्टांगहृदय हिंदी भाषांतरात दोन (श्वेत व कृष्ण) सारिवा आहेत. मराठी भाषांतरात सारिवा आणि धमासा आहे. धमासा योग्य वाटत नाही. पयस्या म्हणजे क्षीरकाकोली. अन्य पाठात वापरण्यासाठी जर ही उपलब्ध झाली तर ह्या पाठात विदारीकंद का वापरला? विदारीकंद घन स्वरुपात वापरल्याचे म्हटले आहे. ग्रंथोक्त पद्धतीने घन करण्याचा प्रयत्न केला तर विदरीकंदाची खळ बनते, घन होतच नाही.
- - - - - - - - - - - - -
दहावा महिना
योजयेद्दशमे मासि सिद्धं क्षीरं पयस्यया l अथवा यष्टिमधुकनागरामरदारुभिः ll . . . . अष्टांगहृदय, शारीरस्थान २/६०
क्षीरकाकोली, यष्टिमधु, सुंठ, देवदारु . . . हा आहे दहाव्या महिन्याचा पाठ.
अक्षय निर्मित “दशमाह” पाठ -
शतावरी, यष्टिमधु, सुंठ, देवदार प्रत्येकी १२५ मिलिग्रॅम; भावना द्रव्य: शतावरी १२५ मिलिग्रॅम
प्रचलित पाठ -
दहाव्या महिन्यासाठी पाठ निर्मितीच नाही म्हणजेच अपूर्ण चिकित्सा.
स्त्री शारीरक्रियेचा विचार न करता सगर्भावस्था कालावधीची सांगड इतर कालमापन पद्धतीशी घालून केलेली ९ महिन्यांच्या पाठांची निर्मिती संपूर्णतः अशास्त्रीय वाटते.
- - - - - - - - - - - - -
एकं शास्त्रं अधीयानो न विद्यात शास्त्र निश्चयः।
तस्मात् बहुश्रुतम शास्त्रम विजानीयात चिकित्सकः।। . . . . सुश्रुत संहिता, सूत्रस्थान ४/७
एका शास्त्राने शास्त्र निश्चय होत नाही म्हणून वैद्याने अनेक शास्त्रांचा अभ्यास करुन मग चिकित्सा करावी.
ह्या उक्तीनुसार विशेषतः आयुर्वेद अभ्यासकांनी सिद्धांत, निदान-चिकित्सा, द्रव्यगुण विज्ञान, मान परिभाषा, भैषज्य कल्पना, अर्थकारण अशा सर्वच दृष्टिकोनातून सदर माहितीचा उपयोग करून ‘नीर क्षीर’ विवेक बुद्धीने सुयोग्य अशा औषधी कल्पांचा वापर व्यवसायात करावा.
+917208777773