Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Thursday, June 2, 2016

#घरोघरी_आयुर्वेद

#घरोघरी_आयुर्वेद

"आयुर्वेदात मानसिक रोगांवर उपचार आहेत का?" एका वाचकांचा प्रश्न. याचे निःसंदिग्ध उत्तर 'हो' असे आहे. मात्र आजकाल सर्वत्र पुरावे लागतात. त्यामुळे ही छोटीशी झलक.

काही व्यक्तींना कितीही आनंदाचा क्षण असला तरी त्यात काही विशेष झाले असे वाटत नाही. आनंदाचाच कशाला? अगदी दुःखाचा क्षण असला तरी ते फारसं मनाला लावून घेत नाहीत. सुख असो वा दुःख; 'ये भी दिन जाएँगे।' अशी त्यांची एकंदरीत भावना असते. विपश्यनेच्या भाषेत सांगायचे झाल्यास ते 'साक्षीभावाने' राहतात. ना आनंद ना दुःख. असे लोक फारच कमी असतात. त्यांना म्हणतात सात्विक.

एखादा विजय प्राप्त झाला की काही लोक अगदी गर्वाने फुलून जातात. आपल्या कष्टाचे चीज झाले असे मानतात. 'जितं मया।' अशी एकंदरीत गत. दुसरीकडे दुःख झाल्यावरही ते खचून जात नाहीत. संकटाच्या छाताडावर पाय देऊन उभी राहण्याची त्यांची प्रवृत्ती असते. स्वभावतःच असलेला 'अहं' या प्रतिक्रियेला कारणीभूत असतो. या व्यक्तींना म्हणतात राजसिक.

काहीजणांना सुख बोचतं असं म्हणतात. असे लोक सगळ्या सुखाच्या वातावरणात आणि सारं काही सुरळीत चालू आहे असं वाटत असतानाच काहीतरी खुसपट काढून ते सारंकाही बिघडवून टाकतात. स्वतःत कुढत बसतात आणि या दुःख उगळण्यालाच सुख मानतात. जणू काही दुःखाशिवाय सुखाचे स्वतंत्र अस्तित्वच नसावे. या व्यक्ती असतात तामसिक.

सत्व, रज आणि तम असे तीन मानसिक गुण आयुर्वेदाने मानले आहेत. अनुक्रमे पित्त, वात आणि कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये हे गुण आधिक्याने दिसतात. विशेष म्हणजे एखादी व्यक्ती सात्विक वा राजसिक वा तामसिक आहे हे कसे ओळखावे याचे वरील मार्गदर्शन अष्टांगहृदय या ग्रंथातील केवळ एका सूत्रात आलेले आहे. जिथे एक सूत्र माणसांच्या स्वभावाच्या ढोबळ वर्गीकरणातदेखील इतके सखोल वर्णन करते तिथे संपूर्ण आयुर्वेदातील मनोरोगांविषयीची माहिती किती असेल याचा अंदाज सहज बांधता यावा. 'मानसोपचारतज्ज्ञ' (त्यांच्या कार्यक्षेत्राबद्दल संपूर्ण आदर राखून) ही जमात अस्तित्वात नव्हती तेव्हापासून आजतागायत विविध मानसिक व्याधींना आयुर्वेद समर्थपणे हाताळत आहे.

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

(लेखकांचे #घरोघरी_आयुर्वेद हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.)

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
        आजची आरोग्यटीप
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

         *अन्नपचन* भाग 3

अन्नपचन होण्यासाठी आणखी एका गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे, ती म्हणजे मनाची शक्ती.

मन प्रसन्न असेल तरच खाल्लेलं अन्न अंगाला लागते, नाहीतर अनेकजण असंच सांगतात,
 "हा खातो खूप, पण मेलं जातं कुठे कळतच नाही."

पैज लावून जेवणारे अनेक जण असतात.
( म्हणजे होते, कारण आता पैज लावून जेवणे सोडाच, त्या कोलेस्टेरॉलच्या राक्षसाच्या भीतीपोटी मनसोक्त, पोटभर समाधानाने दोनवेळचं जेवता सुद्धा येत नाही.)

जिलब्या असोत किंवा लाडू, गुलाबजाम असोत वा श्रीखंड.
बरोबर पट्टीचा खाणारा असेल, आग्रह करकरून वाढणारी असेल,  तर खाण्यातली मजा काही औरच असते.

असं मनापासून ठरवून खाल्लं तर पाच पन्नास जिलब्या, एकदीड किलो श्रीखंड, साठ सत्तर गुलाबजाम असे सहज संपवणारी माणसे मी पण बघीतली आहेत.

असे खाणारी,  खाऊन पचवणारी ही माणऽसे गेऽऽली कुठे ? ?

गेले ते दिवस,
उरल्या त्या आठवणी
आणि
आता असे ऐकूनही
पडत नाही पचनी...

फाईल वाढवीत जायची
रक्ताच्या रिपोर्टस् ची,
दूरवर दिसत नाही
चाहुल आरोग्याची !!

आयुष्यभर मात्र,
 न चुकता औषध खात रहायची
वेळ आली बाकी काही
शिल्लक राहीलं नाही म्हणायची

कसं पचत असेल? एवढं खाऊन,
त्रास कसा होत नव्हता त्यांना ?
आम्ही मात्र अर्धी वाटी अळवाचे फतफते खाल्ले तरी बाधते हो आम्हास...
अश्या मुळमुळीत प्रकृत्या कशा बनल्या आताच्या जमान्याच्या...

कारण एकच,
मनाची शक्ती.
ज्यांनी ठरवले, त्यांनी पचवले !
नाही ठरवले, त्यांना नडले !!

याशिवाय दुसरं काही मिळणारच नाय्ये, अशी धारणा जेव्हा मनाची असते, तेव्हादेखील सगळं सहज पचून जाते. म्हणजे मनाचा पचनातील सहभाग तेवढाच महत्वाचा असतो.

समोर जे आहे, ते शांतपणे, समाधानाने, अन्नाची निंदा न करता खाल्ले तर पचन सुलभ होत असते.

भीती बाळगून खाल्ले तर सोन्याची पण माती होते, आणि भीती न बाळगता खाल्ले तर "तो" खाल्लेल्या मातीचे पण सोने करतो.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग  9673938021
03.06.2016
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

व्यायाम

* *आरोग्यसूत्रम्-३* *
२ जून २०१६

व्यायाम !!

*शरीरायासजनकं कर्म व्यायामसंज्ञितम् ।* सुश्रुतसंहिता सूत्रस्थान २४.३८

कालच्याच आरोग्यसूत्रात बघितले की व्यायाम हा नेहमीच पथ्य आहे; पण तो बलवान व स्निग्ध आहार घेणाऱ्यांसाठी !! शीतऋतुत (थंडीत) आणि वसंत ऋतुत तर विशेषतः व्यायाम अतिपथ्यकर आहे.
आयुर्वेदात दिनचर्या अध्यायात व्यायामाचे वर्णन असल्यामुळे व्यायाम ही रोज करण्याची गोष्ट आहे, हे स्पष्ट होते.
तरुणपणात कोल्हापूरवासी असलेले एक गृहस्थ सांगत होते की, “डॉक्टर, एके काळी खच्चून व्यायाम केलाय्. रंकाळ्यात उडी टाकली की एका दमात दुसऱ्या टोकाला जावून पोचत असू.” त्यावर म्हणले, “अहो, पण आता गुडघेदुखी सुरु झाली, त्याचे काय?” सारांश असा की, रोज केलेला व्यायाम त्या दिवसापुरताच असतो. शिवाय, या नित्याच्या व्यायामाने शरीरातील बल वाढून शारीरिक क्षमता वाढावयास हवी. उतारवयसुद्धा बलवान् असायला हवे.
यासाठी आयुर्वेदाने काही युक्त्या सांगितल्या आहेत; त्या विचारात घेतल्या तर शरीर बळकट राहून सांध्यांची झीज, इ. होणाऱ्या गोष्टी टळतील.

व्यायाम बलवान आणि स्निग्ध आहार घेणाऱ्या लोकांसाठी पथ्य आहे. दुर्बल व रोगग्रस्त, आहारात  स्निग्धांश कमी घेणाऱ्यांनी व्यायाम वैद्याच्या सल्ल्यानुसारच करावा.

*व्यायाम किती करावा?*
कोणताही ऋतु असो, व्यायाम अर्धशक्तिने करावा. अर्धशक्ति म्हणजे शारीरिक क्षमतेच्या निम्म्या प्रमाणात!
अर्धशक्ति याचाच अर्थ half of the physical strength असा आहे. आयुर्वेदाने किती वेळ व्यायाम करावा? याचे काही गणिती उत्तर दिलेले नसून प्रत्येकाच्या शरीरसामर्थ्यावर अवलंबून असलेली गोष्ट असल्याने त्याचे काही लक्षणांच्या आधारे वर्णन केले आहे.

*अर्धशक्तिचे लक्षण *
हृदिस्थानस्थितो वायुः यदा वक्त्रं प्रपद्यते ।
व्यायामं कुर्वतो जन्तोः तद्बलार्धस्य लक्षणम् ॥ सु.चि.२४.४८
शारीरिक आयास / व्यायाम सुरु केल्यानंतर ज्यावेळी तोंड उघडून श्वास घ्यावा लागेल, ती अर्धशक्तिची मर्यादा आहे. यापेक्षा अधिक व्यायाम केल्यास त्याने श्रम होतात, तो व्यायाम राहत नाही.
व्यायाम ही कधीतरी / अति प्रमाणात करण्याची क्रिया नाही. ही क्रमाक्रमाने वाढवत नेण्याची क्रिया आहे. *व्यायामश्च शनैः शनैः ।* व्यायाम हळूहळू, अर्धशक्तिने पण नियमितपणे (रोज) करावा.
कालांतराने असे लक्षात येईल की मनुष्याची अर्धशक्ति वाढतेय्. म्हणजे, सुरुवातीला तीन किलोमीटर धावल्यानंतर जर तोंड उघडून श्वास घ्यावा लागत असेल तर कालांतराने असे लक्षात येते की नियमित केलेल्या व्यायामाने आता चार किलोमीटर धावूनही श्वास घेण्यासाठी तोंड उघडावे लागत नाहीये. व्यायामातील सातत्याने हीच अर्धशक्ति वाढत जाते. शरीरक्षमता वाढते. ही प्रक्रिया अचानकपणे घडून येत नाही, ही दीर्घकालाने सतत प्रयत्नाने साध्य होणारी गोष्ट आहे.

हा अर्धशक्तिने व्यायाम करण्याचा नियम जर पाळला तर अतिरेकी व्यायामापासून मनुष्य दूर राहतो आणि क्रमाक्रमाने बलही वाढत जाते. अन्यथा अतिव्यायामाने होणारे पित्तप्रकोप, भ्रम, छर्दि (उलटी), तृष्णा (तहान), कास (खोकला), ज्वर, इ. विकार उत्पन्न होवू शकतात.

ज्यांच्या शरीरात वात व पित्तप्रकोप झाला आहे अशा रुग्णांनी आणि विकार नसताना भोजन केल्यानंतर किमान दीड तासपर्यंत तरी व्यायाम करु नये.

*व्यायाम प्रकार*
हल्ली व्यायामप्रेमींसाठी असंख्य व्यायामप्रकार उपलब्ध आहेत. पूर्वी मृगया (शिकार), द्वंद्वयुद्ध, शरसंधान, गदायुद्ध, सूर्यनमस्कार, आसने, आखाडा, पोहणे, अश्वारोहण, गजारोहण असे अनेक प्रकार प्रचलित होते. सर्व प्रकारांचा विचार केला तर सामान्यतः *चल व्यायाम* आणि *स्थिर व्यायाम* असे दोन प्रकार करता येतील.

शरीराला चपळपणा यावा यासाठी चल प्रकारचा तर शरीरातील बळ स्थिर व्हावे यासाठी आसनांसारखा स्थिर व्यायाम आवश्यक आहे. शरीरातील जडपणा कमी होईपर्यंत चल व्यायामाचा आश्रय घ्यावा, शरीर सुडौल, नेटके झाल्यानंतर शरीरस्थैर्यासाठी स्थिरव्यायाम करावेत.

स्थूलपणा कमी करण्यासाठी व्यायामासारखे दुसरे साधन नाही. * न च अस्ति सदृशं तेन किञ्चित् स्थौल्यापकर्षणम् ।* व्यायामी व्यक्तीस कुणीही सहज पराभूत करु शकत नाही. या व्यक्तीवर जरा (म्हातारपण) आक्रमण करु शकत नाही. शरीरातील मांसधातु स्थिर होतो. वयास अनुरूप असे शरीर होते. म्हातारपण दिसू लागलेले तरुण पुनः बलवान् होतात. कोणतेही अन्न पचवण्याची क्षमता उत्पन्न झाल्यामुळे या लोकांसाठी पथ्य-अपथ्याचा फारसा विचार करण्याची गरज पडत नाही. श्रम, औष्ण, शैत्य सहन करण्याची क्षमता प्राप्त होते. श्रेष्ठ आरोग्यलाभ होतो. *आरोग्यं चापि परमं व्यायामादुपजायते ।*

*व्यायामानंतर काय करावे?*
शरीराला झालेल्या आयासामुळे जो थकवा येतो, तो दूर करुन मगच नित्याच्या व्यवहाराला सुरुवात करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी व्यायामानंतर सर्व शरीराचे मर्दन करावे. हलक्या हाताने अंग रगडावे, त्याने स्नायु शांत होतात. उद्वेजित झालेले शरीर प्रसन्न आणि स्थिर होते. हे करणे शक्य नसेल तर किमान श्वासगति स्थिर होईपर्यंत पडून राहणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा व्यायामामुळे झालेल्या वातप्रकोपामुळे शरीराची उद्विग्न अवस्था कायम राहते. शवासन इ. मुळे शरीरातील गतिमान झालेल्या सर्व क्रिया शांत होतात म्हणून शवासन करण्याचेही हेच प्रयोजन आहे.

हल्ली व्यायामानंतर विविध प्रकारचे रस पिण्याचे फॅड प्रचलित झाले आहे. व्यायामानंतर (वजन कमी करणे हा हेतू असेल तर विशेषतः) थोडे कोमट पाणी प्यावे. दूध किंवा कोणताही घन आहार घेवू नये. शरीरातील चयापचय क्रिया व्यायामानंतर गतिमान झाल्याने व्यायामानंतर आपण जे आहार घेवू तो तत्काल शोषला जावून अंगी लागतो; आणि वजन कमी करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी वजन कमी होत नाही.

निष्कर्ष एवढाच की तारतम्याने अतिरेक न करता नियमितपणे, चिकाटीने आणि आयुर्वेदाने सांगितलेल्या युक्तीने व्यायाम केला तर परम आरोग्याची प्राप्ती होईल यात शंकाच नाही !

*वैद्य नीलेश कुलकर्णी*, पुणें.
 +९१-७७९८६२७८२३ / +९१-८८०५३३५५१२
vd.nilesh@gmail.com

Wednesday, June 1, 2016

हिंग

आयुर्वेद  सांगतो ~ हिंग !


पूर्वी जेव्हा स्वयंपाक घरी व्हायचा तेव्हा हिंगाची फोडणी जरूर दिली जायची . विशेष करून वरणाला . सगळ्या भाज्या आमट्या याचा बेस हा कांदा टोमेटो याचा लगदा किंवा सभ्य भाषेत 'प्युरी ' हा नसल्यामुळे मसाल्याच्या पदार्थात वैविध्यता होती . प्रत्येक जिन्नस जिभेवर आपली चव आणि सुंगंध याची नोंद देऊन जायचा . हिंग हा त्यातला महत्वाचा भाग आहे .

सध्या ज्या आणि जितक्या काही पोटाच्या आणि पचनाच्या वाढलेल्या तक्रारी आहेत त्यामागे पारंपारिक मसाल्याचा सुटलेला हात हे महत्वाचे कारण आहे . जड जड खायचे पण ते पचवायचे कसे ?हा प्रश्न काश्मीर पासून कन्या कुमारी पर्यंत आहे . . . कारण सर्वत्र अत्यंत वेगाने पसरलेल्या पंजाबी खाण्यात नक्की मसाला काय असतो हेच समजत नाही . . आपल्याकडे दोन पर्याय असतात . . ग्रीन ग्रेव्ही किंवा रेड ग्रेव्ही . . विषय संपला !! अर्थात पंजाबी पदार्थ हे पंजाबी घरात उत्तम होत असतील आणि काही घरात असे पदार्थ खाल्यावर हॉटेल मध्ये आपण काय 'कचरा ' खातो याची सुद्धा जाणीव होईल . त्यामुळे आक्षेप हा पंजाबी पदार्थावर नसून तो व्यावसायिक रित्या बनवण्याचा पद्धतीवर आहे याची नोंद घ्यावी .

तर आपण खाल्लेले जड अन्न हे अन्नच पचवते असे सांगतिले तर कोणाचा विश्वास बसेल ?? हे सत्य आहे प्रभू . . . भारतीय आहारशास्त्रात तशी योजनाच केली आहे . हिंग हा यातील एक प्रधान योद्धा ! हिंगाचे काही गुण पाहू :-

१. पाचक - यावर काही लिहिण्या आधीच तुम्हाला 'हिंगोली ' आठवली असेल ( हिंगोली गाव नाही हो . . गोळी ) . पोट गच्च भरले आहे . ढेकर अडकली आहे किंवा ती बाहेर यायला पण रस्ता नाही . अस्वस्थ होत आहे . . अशा वेळी तोंडात हिंगोली टाकतो आपण .. यातील हिंग हा महत्वाचा घटक .

हिंग हा गुणाने  उष्ण  आणि तीक्ष्ण आहे . त्यामुळे त्याचे पाचन आणि अग्नी दीपन याचे कार्य उत्तम प्रकारे घडते .

तसेच एखाद्या ठिकाणी वेदना असेल तर वेदना कमी करायला हिंगाचा लेप लावतात .

२. वात आणि कफ नाशक :- हिंगाचा उपयोग अनेक वात आणि कफजन्य व्याधींवर करतात .

३. पित्त वर्धक :- हिंगाचे आणि पित्ताचे गुण समान असल्याने हिंग हा पित्त वर्धक आहे . त्यामुळे पित्त प्रकृतीच्या लोकांनी याचा वापर जपून करावा .

४. रोगघ्नता :- हिंग हा शूल (वेदना ) , उदर , पोट फुगी , पोटात झालेले जंत आणि गुल्म नावाचा रोग यांचा नाश करतो .

इत्यादी !!

हिंग हा 'निर्यास ' स्वरुपात संकलित केला जातो . त्यामुळे त्यांचे संग्रहण ते आपल्या हातात येई पर्यंत त्यात काय आणि कोणत्या प्रकारची भेसळ झालेली असते याचा अंदाज करता येत नाही . त्यामुळे चांगल्या कंपनीचा हिंग वापरावा . त्यामुळे अपाय होत नाही !

हिंगाची हि थोडक्यात माहिती . असा बहुगुणी हिंग स्वयंपाकात जरूर असावा . . !!

वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
आयुर्वेद कोश (https://www.facebook.com/aarogyakosh/ )
९१७५३३८५८५

(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)

पावसाळ्यातील आहार विहार

# आयुर्वेदातुन आरोग्याकडे

🌥 पावसाळ्यातील आहार विहार 🌧

काही दिवसांनी पावसाला सुरूवात होईलच पावसाळ्यात बाह्य वातावरणात जसे बदल घडतात तसे शरीरातही बदल घडतात. या बदलानुसार आहार विहारीय बदल करणे आवश्यक आहे.
            पावसाळ्यात जेवनासोबत मधाचा अनुपान रूपाने वापर करावा. ज्या दिवशी अधिक थंड वातावरण असते त्या दिवशी शरीरातील वात अधिक प्रमाणात प्रकुपित असतो. त्यादिवशी वाताला कमी करण्यासाठी आंबट मीठ स्नेहयुक्त लोणच्या सारख्या पदार्थांचा उपयोग करावा.
             भुख चांगली राखण्यासाठी जुने यव, गहु, शाली तांदुळ यांचा नित्य उपयोग करावा. सोबतच उकळुन गार केलेले पाणी पिण्याकरिता उत्तम असते.
              पुर्वीच्या उन्हाळ्यातील आहार विहाराचे पालन केलेले नसल्याने उत्पन्न वाताच्या दमा, सांधेदुखी, पडसे, खोकला आदीं वाताच्या आजारांसाठी वातनाशक बस्ती आदी वातनाशक शरीरशुध्दीचे उपक्रम वैद्याच्या सल्ल्याने करावेत.

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
Mob no -- 9130497856, 9028562102
For what's up post send your request messege on above mob no

शिवांबू

#घरोघरी_आयुर्वेद

'शिवाम्बू'

शिवाम्बु चिकित्सा अथवा स्वमूत्र प्राशन करणे ही हंगामी प्रसिद्ध पावणारी गोष्ट आहे. त्वचा उत्तम राहण्यापासून ते पचन सुधारणे इथपर्यंत विविध लाभ या चिकित्सेने होतात असा दावा केला जातो. याच्या पुष्टीसाठी स्व. मोरारजी देसाई यांचे उदाहरणदेखील दिले जाते.

ही स्वमूत्र प्राशन पद्धती आयुर्वेदाची देणगी आहे असे जरी सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र तसे नाही. शिवाम्बूचा संदर्भ 'डामर तंत्र' या ग्रंथात आढळतो. हा ग्रन्थ आयुर्वेदाचा नसून तंत्रविद्येचा आहे. थोड्क्यात; स्वमूत्र प्राशन हे आयुर्वेदाने सुचवलेले नाही.

मग आयुर्वेद याबाबत काय सांगतो? कोणतेही मूत्र हे उष्ण आणि तीक्ष्ण गुणांनी युक्त असल्याने पित्त वाढवते. (याकरताच आम्ही गोमूत्रदेखील वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नये असे सतत सांगत असतो.) आयुर्वेदाने आठ उपयुक्त प्राण्यांच्या दुधाचे गुणधर्म वर्णन केले आहेत. यात मनुष्याचा अर्थात मातृस्तन्याचादेखील उल्लेख आढळतो. याच प्राण्यांच्या मूत्राचे औषधी गुणधर्मदेखील आयुर्वेदात वर्णन केलेले आहेत. मात्र यावेळेस 'मानवी मूत्र' वगळले आहे. सुश्रुतसंहितेत मात्र 'मानुषं तु विषापहम्।' अर्थात; मानवी मूत्र हे विष दूर करणारे आहे असा त्रोटक संदर्भ सापडतो. आजही गावाकडे विंचू वा सापाच्या दंशावर त्या माणसाचे मूत्र लावणे हा प्रकार आढळतो. बेअर ग्रील्ससारखे सुप्रसिद्ध परदेशी 'सरव्हाइव्हर्स'देखील असा वापर करण्याबद्दल त्यांच्या पुस्तकांत माहिती देतात. मात्र; आयुर्वेदाचा आणखी एक सिद्धांत असे सांगतो की विषाने विष दूर होते! थोड्क्यात विषहरणाचे काम करणारे मानवी मूत्र स्वतः विषारी गुणांनी युक्त असणार.

आधुनिक शास्त्रानुसार मूत्रनिर्मितीत किडनीद्वारे 'सिलेक्टिव्ह रिअँबसॉरप्शन' सारखी प्रक्रिया घडताना शरीराला आवश्यक घटक पुन्हा शोषले जातात आणि केवळ टाकाऊ घटक उत्सर्जित केले जातात. आपल्या शरीराबाहेर उत्सर्जित केले जाणारे पदार्थ पुन्हा आपल्याच शरीरात घ्यावे असे मत असणाऱ्या व्यक्ती घाम आणि मल या अन्य उत्सर्जित पदार्थांबाबत काय भूमिका घेणार?! (पशुवैद्यकाचा अभ्यास करता; गायींसारख्या प्राण्याच्या किडनीची रचना आपल्यासारखी नसल्याने वरील उपयुक्त प्रक्रिया त्यांच्यात योग्य प्रमाणात घडत नाही. त्यामुळे त्यांच्या मूत्रात मानवी शरीरास उपयुक्त पदार्थ मिळू शकतात.)

इतकी सारी माहिती देऊनही स्व. मोरारजीभाईंचा दाखला देण्याचा मोह अनावर होणाऱ्यांनी त्यांच्या दैनंदिन आहाराचीदेखील माहिती जरूर घ्यावी. आणि तरीही शिवाम्बुपानाचा हट्टच असेल तर अगदी ग्लास काठोकाठ भरून शिवाम्बुपान करावे. मात्र कृपा करून त्याचे बिल आयुर्वेदाच्या नावावर मात्र फाडू नये!!

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

वांग

आयुर्वेद कोश ~ वांग !!

''चिनॉय सेठ . . चांद पे दाग और हसीन चेहेरे पे वांग शोभा नही देते ''

राजकुमार ने असा कोणताही डायलॉग मारलेला नाही . पण हा डायलॉग मात्र खरा आहे . वांग याने त्रासलेले अनेक चेहेरे आजूबाजूला पाहायला मिळतात . यातील बहुतेकांना या वांगाचा 'न्यूनगंड ' असतो . याच न्यूनगंडातून अनेक क्रीम /जेल / औषधे यांचा भडीमार अंगावर आणि त्वचेवर सुरु असतो . एका दृष्टीने हे पाहायला गेले तर हे साहजिक आहे कारण त्वचा ही जरी शरीरावर असली तरी तिच्याशी निगडीत भाव -भावना -संवेदना या थेट मनाशी जोडलेल्या असतात . त्यामुळे त्वचेचा 'टोन ' बिघडला की मनाचा 'तोल ' हा जातो . तर . . . सौंदर्याला बाधा आणणारे सोरिएसिस सारखे गंभीर . . पिंपल्स सारखे जाहिराती आजार सोडले तर व्यंग / वांग हा आजार महत्वाचा आहे !

आधुनिक विज्ञानानुसार मेलेस्मा ( वांग ) हा आजार मेलेनोसाइटस यांचा अधिक प्रमाणाने होतो . स्त्रियांच्यात अधिक आढळणारा हा आजार घडवण्यात 'इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोन ' या संप्रेरकांचा वाटा असतो . तसेच 'थायरोइड ' या आजारात मेलेस्मा वाढल्याचे दिसून येते इत्यादी !!

आयुर्वेदानुसार क्रोध आणि परिश्रम याने प्रकुपित झालेला वायू हा पित्तसह मुखात येउन तोंडावर वेदना रहित , पातळ , काळसर असे डाग उत्पन्न करतो . त्याला 'वांग ' असे म्हणतात .

हा आजार एका दिवसात होत नाही . अनेक काळ वात आणि पित्ताचा प्रकोप करणारे हेतू सेवन करत राहिल्याने  हे दोष बिघडतात आणि वांगाची उत्पत्ती होते . मग हे दोष फक्त मुखातच जातात का ?? नाही . . काही वेळा हे दोष संपूर्ण शरीरात पसरून वेदना रहित आणि काळे असे डाग (आयुर्वेदोक्त शब्द मंडल ) उत्पन्न करतात याला 'निलिका ' असे नाव आहे .

आयुर्वेदानुसार यावर करता येण्या सारखे सोपे उपाय :-

१. मंजिष्ठा मधात वाटून त्याचा लेप वांगावर करावा .
२. जायफळाचा लेप लावावा .
३. मसूर दुधात वाटून त्यात तूप मिसळून त्याचा लेप लावावा . आयुर्वेद सांगतो , असा लेप लावल्याने चेहेरा ७ दिवसात कमळाप्रमाणे सुंदर होतो .
४. रक्तचंदन , लोध्र आणि कोष्ठ यांचा लेप लावावा . इत्यादी !!

सदर उपाय हे केवळ लेप स्वरूपाचे आहेत . वास्तविक 'वांग ' यासाठी रक्त मोक्षण , विरेचन इत्यादी पंचकर्मातील उपचार तसेच पित्त शामक , वात शामक , रक्त दुष्टी दूर करणारे , रक्त प्रसादान करणारे असे अभ्यंतर औषध उपचार आवश्यक असतात .

केवळ लेप देण्याचे कारण असे की , वांग घालवणारी क्रीम ही 'मेलेनीन 'वर काम करणारी असतात . आपल्या सौंदर्यासाठी चेहेऱ्यावर रासायनिक क्रीम चोपडून त्याच्या साईड इफेक्ट निस्तरण्या  साठी अजून एक क्रीम बाळगणे फारसे व्यावहारिक नाही . त्यामुळे हे आयुर्वेदिक लेप फायद्याचे ठरतात .

हे लेप लावत असताना किंवा वांगावर उपचार  घेत असताना डोकं आणि मन शांत ठेवणे फार महत्वाचे आहे . . . 'रागाने ' अनेक गोष्टी बिघडतात . . . . वांग हा त्यातलाच एक उपद्रव !!

(टीप - मेलेस्मा = वांग हे दोन्हीतील काही  समान लक्षण असल्याने लिहिले आहे . आधुनिक विज्ञान व आयुर्वेद यांच्यात हेतू , संप्राप्ती व चिकित्सा यात मुलभूत फरक आहेत . पण बिगर आयुर्वेदिक लोकांना पांडू म्हंटल की समजत नाही पण 'एनिमिया ' म्हंटले की ओळखीचा शब्द वाटतो . त्यामुळे येथे केलेली तुलना ही विषय स्पष्ट करायला तात्कालिक स्वरुपात केली आहे )

वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
आयुर्वेद कोश


9175338585
(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)

आरोग्य सूत्रम्

*आरोग्यसूत्रम् १*
दि. ३० मे २०१६

अन्नाद् भूतानि जायन्ते, जातानि अन्नेन वर्धन्ते ।
अद्यते अत्ति च भूतानि, तस्माद् अन्नम् तद् उच्यते ।। ... तैत्तिरीयोपनिषद्

आरोग्य ज्यावर अवलंबून आहे, असे घटक म्हणजे अन्न (आहार), विहार (वर्तन) आणि औषध होत.

या तीनही घटकांचा परस्पर सहयोगाने होणारा परिणाम म्हणजे आरोग्य होय. आपण बरेचदा केवळ 'आहार एके आहार' एवढाच मर्यादित विचार करतो; पण हेही खरे की रोग होईपर्यंत आहार हाच घटक सर्वाधिक महत्त्वाचा आहे. रोग झाल्यानंतर त्याच्या तीव्रतेनुसार औषध हा घटक अाधिक्याने विचारात घ्यावा लागतो. पण तोपर्यंत मात्र आहार हाच महत्त्वाचा मुद्दा आहे.

काश्यपसंहितेत *आहारो हि परमं भेषजम्* म्हणजे आहार हेच सर्वश्रेष्ठ औषध आहे, असे स्पष्ट विवेचन आहे.

विहार म्हणजे आपली दैनंदिन / ऋतु नुसार / व्याधिनुसार असणारी वर्तणूक होय. जसे; रोज स्नान करावे, हे निरोगी मनुष्यासाठीचे; तर ज्वर असताना स्नान करु नये, हे रोग्यासाठीचे आचरण होय. या दोन्हींचाही परिणाम स्वास्थ्य हा होय.

या वर्णनावरुन एव्हाना लक्षात आलेच असेल की, रोग होवू नये म्हणून आहार हा घटक अत्यंत महत्त्वाचा असून, रोग झाल्यानंतर करावयाच्या आहार बदलांनाच *पथ्य* असे म्हणतात. (पथ्य - हा वेगळ्या लिखाणाचा विषय होईल.)

आयुर्वेदाव्यतिरिक्त अन्य शास्त्रात क्वचितच आहार (अन्न) या विषयाबद्दल विस्ताराने वर्णन असेल. आधुनिक आहार शास्त्र (modern dietetics) व आयुर्वेदीय आहारसिद्धांत यात काही मूलभूत भेद आहेत, ते ओघाने चर्चेत येतीलच..

आजच्या या प्रस्तावनेनंतर वर उल्लेख केलेल्या तैत्तिरीयोपनिषदामधील सूत्राचा अर्थ पाहू..

अन्नापासून समस्त भूतमात्रांची उत्पत्ति होते, त्यांची वाढ होते.
भूतमात्र ज्याचे सेवन करतात (अद्यते), आणि जे भूतमात्रांना खाते(!) (अत्ति); ते अन्न होय!

अन्न जसे प्राण्यांचे स्वास्थ्यरक्षक आहे, तसे शास्त्रविरुद्ध सेवन केले तर रोगकारक होवून प्राणिमात्रास मारक ठरते (प्राण्यांचेच भक्षण करते). समर्थ रामदास स्वामींनी *आपण खातो अन्नासी । अन्न खाते आपणासी ।।* यातून हेच सुचविले आहे.

आता शास्त्रानुसार किंवा शास्त्रविरुद्ध म्हणजे काय? याचे आकलन झाले म्हणजे आपल्याला आहार समजला, असे होईल.

(क्रमशः)

*वैद्य नीलेश कुलकर्णी*, पुणें
+९१-७७९८६२७८२३ / +९१-८८०५३३५५१२
vd.nilesh@gmail.com

आरोग्य सूत्रम्

* *आरोग्यसूत्रम्-२* *
दि. १ जून २०१६

आहार आणि विहार या दोघांचाही एकत्र विचार केला तर त्याला आयुर्वेदाने *“आचारिकम्”* असे संबोधले आहे. *आचारिकम् इति आहारविहाराख्यम् ।* सुश्रुतसंहिता सूत्रस्थानम् १६.१५ डह्लण

आहाराबरोबरच तितकाच महत्त्वाचा घटक म्हणजे “विहार”!

विहार म्हणजे शरीराच्या क्षेपण (धावन, गमन, प्लवन, इ.) इत्यादी होणाऱ्या चेष्टा होत. *विहारः अङ्गक्षेपणादिका चेष्टा ।* चरकसंहिता चिकित्सास्थानम् १५.२३९ चक्रपाणिदत्तः

आयुर्वेदाने विशेषतः आचार्य सुश्रुतांनी शरीराच्या कोणत्या हालचाली या नेहमीच पथ्यकारक / आरोग्यरक्षक असतात, याची एक यादीच दिली आहे.
१. ब्रह्मचर्य
२. निवातशयन
३. उष्णोदकस्नान
४. निशास्वप्न
५. व्यायाम
हे पाच प्रकारचे विहार हे एकान्ततः म्हणजे नेहमीच पथ्यकारक आहेत.

स्वास्थ्य टिकविण्यासाठी या गोष्टी नियमित आचराव्या अशा आहेत. त्याने शरीरातील दोषांची वाढ न होता, उलटपक्षी दोष समप्रमाणात राहून शरीरातील सप्तधातूंना बळ मिळून स्वास्थ्यलाभ होतो.

*ब्रह्मचर्य* - ब्रह्मतत्त्व जाणून घेण्यासाठी करावयाचे आचरण. यात सर्व वैयक्तिक, सामाजिक, इ. नीतिमूल्यांचा समावेश होतो. केवळ स्वस्त्रीशी प्रजा उत्पन्न करण्यापुरते शरीरसंबंध आणि अन्य समयी ब्रह्मतत्त्वाचे चिंतन, असे याचे शास्त्राला अपेक्षित असलेले स्वरूप आहे.

*निवातशयन* - दिवसा झोपू नये आणि रात्री जागरण करु नये; हा आयुर्वेदाचा नियम एव्हाना सर्वश्रुत झालेला नियम आहे. ही झोप सुद्धा जिथे वारे वहात नाहीत, साक्षात् अंगावर वारा येणार नाही, परंतु सुयोग्य वायुवीजन होते, अशा गृहात घ्यावी; असे यातून सुचवावयाचे आहे. हल्ली फॅन लावून अगदी फॅनखाली झोपणारे, ए.सी. लावून झोपणारे, याशिवाय कारमधून प्रवास करताना सर्रास ए.सी. लावणारे महाभाग आढळतात. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात थंडाव्याचे सेवन करणे, आयुर्वेदानुसार वात वाढविण्यास कारणीभूत ठरते.

*उष्णोदकस्नान*- मुळात स्नान त्रिकाल करावे असे असले तरी किमान दिवसाच्या सुरुवातीला, सुख वाटले इतपत गरम पाण्याने करणे अपेक्षित आहे. अत्यंत कढत पाण्याने ही स्नान करणारी मंडळी आढळतात; त्यातही पुनः स्नानानंतर फॅनखाली उभे राहतात. हे प्रकार पुनः वात वाढविणारे आहेत.
याशिवाय, असेही लोक आढळतात की ज्यांनी आजपर्यंत कधीही उष्णोदकाने स्नान केलेले नाही. त्यांचे असे म्हणणे असते की कितीही थंडी असो मी थंड पाण्यानेच स्नान करतो. कालांतराने हे अतिरेकी प्रकार वातविकारांना कारणीभूत होतात.
स्नान करताना डोक्यावरुन मात्र फार गरम पाणी घेवू नये. खांद्याखाली मात्र सुखोष्ण असे गरम पाणी वापरावे. आचार्यांनी म्हणूनच केवळ स्नान असा शब्द न वापरता “उष्णोदकस्नान” असा शब्द वापरला आहे.

*निशास्वप्न*- दिवसभरात थकवा / शीण जावा व दुसरे दिवशी पुनः प्रसन्नपणे जाग यावी यासाठी रात्री किमान ७ ते ८ तास झोप होणे आवश्यक आहे. रात्री ९ वाजेपर्यंतच (खरे तर सूर्यास्तानंतर घन आहार घेवूच नये!!) हलका आहार घेवून जेवण ते झोपेची वेळ यात किमान दीड तास अंतर ठेवून मगच निद्राधीन व्हावे.

*व्यायाम*- शिस्तबद्ध पद्धतीने शरीर क्षमता वाढविण्यासाठी वाढविण्यासाठी केलेल्या हालचाली म्हणजे व्यायाम !
आम्ही रोज कामाच्या ठिकाणी खूप वेळा जिने चढ-उतार करतो, हाच आमचा व्यायाम! - हा मोठाच गैरसमज आहे. हा व्यायाम नसून श्रम होत. श्रम झाल्यास थकवा येतो तर व्यायामाने उत्साह वाढतो. ज्या व्यायामाने थकवा येतो, तो व्यायाम नसून श्रम आहेत, हे लक्षात घ्यावे.

यातील प्रत्येक मुद्द्याचा विस्तार शास्त्रांत बारकाव्यांसह मांडला आहे. तूर्तास एवढेच !

*वैद्य नीलेश कुलकर्णी*, पुणें
+९१-७७९८६२७८२३ / +९१-८८०५३३५५१२
vd.nilesh@gmail.com

Tuesday, May 31, 2016

तंबाखु सेवन एक दुष्टचक्र

# आयुर्वेदातुन आरोग्याकडे

 🍀 तंबाखु सेवन एक दुष्टचक्र ☘

तंबाखु सेवन हा भारतातील स्री पुरूष दोघांतही आवडीने चघळणारा जाणारा एक प्रमुख व्यसनी पदार्थ आहे. तंबाखु चघळल्याने कर्करोग होण्याचा धोका अत्याधिक असतो हा फार लांबचा विचार झाला.
             तंबाखु सेवनाने काहीही त्रास झाला नाही असे खाणारे लोक सांगतात. सोबतच सकाळी सुखकारक मलप्रवर्तन होते, पोट गच्च व्हायचे टाळले जाते, भुक लागते असे तंबाखुचे अनेक फायदे सांगितले जातात..
            आजपर्यंत तंबाखु खाण्याचा शरीरावर काय परिणाम झालाय याचे साधे परिक्षण म्हणजे तोंड ४ बोट सुखाने उघडते का हे पाहाणे होय.
            तंबाखु खाण्यारया लोकांत ते ३ किंवा २ किंवा त्याहीपेक्षा कमी उघडते हे प्रत्यक्ष स्वतः करून पाहीले तरी कळते त्यासाठी काही कागदी तपासणी करावयाची गरज नाही..
             शरीरातील सर्व क्रिया गती ह्या वाताशी संबधीत असतात. अशा ह्या वाताला विषवत गुणधर्म असलेल्या तंबाखुद्वारे प्रेरणा दिली जाते ती मग सकाळी सुखसारक मलप्रवर्तनासाठी असो वा जेवल्यानंतर पोट गच्च होऊ नये अन्नपचन नीट व्हावे याकरिता असो.
तंबाखु तात्काळ परिणाम न दाखवता कालांतराणे परिणाम दाखवते कारण ते तीव्र स्वरूपाचे विष नाही.
               मुखाची opening आकाशीय गुणधर्म कमी झाल्याने अन्नपचनची सुरूवातच तंबाखु खाणारया लोकांत बिघडवली जाते.. पुन्हा अन्नपचन होण्यासाठी व पोटाचा गच्चपणा टाळण्यासाठी तंबाखु जेवनानंतरही बडीशेप प्रमाणे खाल्ले जाते. असे तंबाखुचे दुष्टचक्र वर्षानुवर्ष चालते. आणि चक्राची गतीही वरचेवर वाढत जाते. तंबाखु नाही मिळाले तर वाताला प्रेरणा मिळत नाही. सुखकारक मलप्रवर्तनापासुन ते पोट गच्च राहणे, अन्नपचन नीट न होणे असे त्रास सुरू होतात..
        तंबाखुच्या दुष्टचक्रातुन जितके होईल तितके लवकर बाहेर पडावे. त्यासाठी योग्य आयुर्वेदीय सल्ला जवळच्या वैद्याकडुन घ्यावा..

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
Mob no -- 9028562102, 9130497856
( for what's up post send your request messege on above mob no or add 9028562102 what's up no in your group )

Visit Our Page