Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Friday, March 25, 2011

ग्रहांचे स्वभावगुण दर्शन



सर्व ग्रहांचे आपल्या स्वभावावर कशा प्रकारचे परिणाम होतात याची माहिती घेऊ.
रवी :
नीतीमान, करारीपणा, तत्वज्ञानी, स्पष्टवक्तेपणा,परखडपणा, अधिकारी वृत्ती, नेतृत्वगुण,कर्तुत्व, शासक, न्यायी, निर्भीडपणा, सत्यवादी, विश्वासू, उत्साह, खिलाडू वृत्ती,परोपकारीपणा, मानसन्मान,
बिघडला असता दिमाख, दिखाऊ वृत्ती, अहंकारी,गर्विष्ठपणा, हेकटपणा, अरेरावी. अट्टाहास,कर्मठपणा      
चंद्र :       
कोमलता, शीतलता, वात्सल्य,प्रेम,माया,ममता,सात्विकता,निरागसपणा,कुटुंब प्रेमी, जीवना विषयी आसक्ती, स्वप्नाळू शांतताप्रेमी, आशावादी, भावनाशील,वाचेतील गोडवा,लोकप्रियता, मातृभक्त, बदलाची आवड असते,गतिमान जीवन
बिघडला असता अति चंचलता, धरसोडपणा, हळवेपणा, भावनाप्रधानता, अति संवेदनाशील, केव्हाही मूड बदलणारा, भावनातिरेक,हिस्टेरिक,झटकन निराश होणारा,   
मंगळ:
धाडसी,साहसी,पराक्रमी, महात्वाकांशी,सामर्थ्यवान,अधिकारी वृत्ती,प्रभुत्व गाजविणे,लढवय्या,अन्य्याय सहन न करणारा,  सत्तत संघर्ष करणारा, कठोर मेहनती,
बिघडला असता तापट. आततायी, अतिरेकी, एक घाव दोन तुकडे करण्याची वृत्ती, दूरदृष्टीचा अभाव, अविचारी, क्रूरपणा, नमते न घेणारा, जुलुमी वृत्ती, तामसी, भोगी,उतावळेपणा दुराग्रही.
बुध:
चांगली आकलन शक्ती, ग्रहण शक्ती, चिकित्सक वृत्ती, तार्किक वृत्ती, उत्कृष्ट वक्तृत्व, वादविवादपटू, विनोदी खेळकर स्वभाव, थोडासा वात्रटपणा, समयसूचकता., वाचन लेखनाची आवड,
बिघडला असता धरसोड वृत्ती, बालिशपणा, अति बडबडी वृत्ती, एकाच वेळी अनेक विषयात रस, एक ना धड भाराभार चिंध्या, स्वताचे ठोस मत नसणारा, बिनबुडाचा लोटा.
गुरु:
संयमी,भारदस्त,शांत,धार्मिक,सात्विक,रुढी प्रिय, सभ्य, सुसंस्कृत,सौजन्यपूर्ण, श्रेष्ठ विचार असणारा, परिपक्व वृत्ती, आस्तिक, परोपकारी, न्याय्यी वृत्ती, अध्ययन अध्यापनाची आवड असणारा, सल्लामसलत करणारा, वृद्धीकारक, प्रसरणक्षमता असलेला.
बिघडला असता मोठेपणाचा हव्यास असणारा, अव्यवहारी, कोणतेही बंधन न मानणारा, क्षमतेबाहेर जाऊन कार्य करणारा, चांगुलपणाचा अतिरेक करणारा.
शुक्र:
रसिक, सौंदर्य दृष्टी, कलासक्त, प्रणयी हलकी फुलकी वृत्ती, छानछोकीची आवड असणारा, नीटनेटकी राहणी, लडिवाळपणा, तारुण्य सुलभ अवखळपणा, भिन्न लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण, जगा आणि जगू द्या वृत्ती. 
बिघडला असता व्यसनी, विलासी वृत्ती, चैनी स्वभाव, केवळ स्वताच्या सुखाचा विचार करणारी, उधळपट्टी करण्याची वृत्ती, स्वैर वृत्ती.
शनी:
विचार पूर्वक संथ गतीने काम करणारा, धोरणी,मुत्सद्दी,शांत, चिकाटी वृत्ती, चिवटपणा, सहनशील,मितव्ययी, अंथरूण पाहून पाय पसरणारा, चिंतन प्रिय, पारमार्थिक उन्नतीकडे कल असणारा, गुढ शास्त्राची आवड असणारा.
बिघडला असता नैराश्यवादी, वैरागी वृत्ती, काहीशी रुक्ष वृत्ती, नकारात्मक बाजूचा अधिक विचार करणारा, अतिमंद काम करणारा, थंड वृत्तीचा, प्रतिसाद न देणारा,
राहू:
हा ग्रह नाही तर छाया बिंदू आहे. सर्पाचे तोंड किवा शरीराचा कमरेवरील भाग आहे. या ग्रहाकडे चांगले गुण नाहीत. क्षुद्र विचार, लबाडीची वृत्ती,फसवाफसवी,संशयी वृत्ती, व्यभिचारी, चौर्य कर्म करणारा,असत्य बोलणारा, कारस्थानी वृत्ती,  संभ्रमात टाकणारा, ज्या स्थानात असेल त्या स्थानाचे फळ बिघडविणारा, गारुडी विद्येची आवड असणारा, अघोरी शक्तीचा कारक, मातंग वृतीचा, उलथापालथ करणारा, विजोड, विषम गोष्टींचा कारक., शापित वृत्तीचा.
केतू :
हा ग्रह नाही तर छाया बिंदू आहे. सर्पाची शेपटी किवा शरीराचा कमरेखालील भाग आहे.संन्यस्त वृत्ती, पारलौकीक जीवनाचा कारक,अध्यात्मिक वृत्ती, पूर्व जन्मातील अतृप्त वासनाचा कारक, कुंडलिनी शक्तीचा कारक. पत्रिकेत ज्या स्थानात असेल त्या स्थानाने दर्शविलेल्या गोष्टी संबंधी अतृप्त वासना दर्शवितो.
हर्शल, नेपच्यून आणि प्लुटो
ग्रह मालेतील हे अर्वाचीन ग्रह आहेत. पारंपारिक ज्योतिषात या ग्रहांना नक्षत्र दिलेले नाही त्यामुळे कालगणनेसाठी वापरल्या जाणाऱ्या दशा  पद्धतीत या ग्रहांना स्थान नाही.गोचर भ्रमणा वरून या ग्रहांच्या फळाचा विचार करावा लागतो. हे ग्रह अतिमंद गती आहेत त्यामुळे सर्व साधारण सामान्य जीवन जगणाऱ्या माणसाच्या आयष्यात या ग्रहांचा विशेष प्रभाव दिसत नाही. दुसऱ्या ग्रहाबरोबर शुभ अथवा अशुभ योग करत असतील तर त्यांचे परिणाम विशेषत्वाने जाणवतात. या ग्रहांचा प्रभाव सामाजिक, धार्मिक, राजकीय,जागतिक, वैज्ञानिक जीवनाशी अधिक संबंधित आहे. असे असले तरी त्या ग्रहांचे मनुष्य स्वभावावर होणारे परिणाम पुढे दिले आहेत. 
हर्शल:
हा ग्रह म्हणजे मंगळ आणि बुध या ग्रहांची अधिक शक्तिशाली आवृत्ती आहे. कुशाग्र बुद्धिमता,संशोधक वृत्ती,शास्त्रज्ञ, गुढ शास्त्राची आवड, सुधारणावादी, परिवर्तनवादी,पुरोगामी विचारशैली, 
बिघडला असता पराकोटीचा नास्तिक, क्रूर,उग्र स्वभाव, तिरसट,एककल्ली, रुढीबाह्य वर्तन, विक्षिप्त.लहरी स्वभाव, ध्यानीमनी नसता आकस्मिक बदल घडविणारा. कृष्णमूर्ती पद्धती प्रमाणे ज्या स्थानाचा उपनक्षत्रस्वामी या ग्रहाशी संबंधित असेल त्या स्थाना संबंधी विचित्र फळ दर्शवितो.
नेपच्यून:
हा ग्रह म्हणजे चंद्र,गुरु आणि शुक्र या ग्रहांची अधिक प्रभावशाली वृत्ती आहे.शांत, गुढ,अति संवेदनाशील स्वभाव, तत्वज्ञानी,आध्यात्मिक,कवी वृत्तीचा,स्वप्नाळू, चांगली अंतः स्फूर्ती,वैचारिक प्रगल्भता. अनामिक संकेत देणारा, तंतू वाद्याची आवड असणारा,
बिघडला असता अतिगूढ,अंतरमनाचा ठावठिकाणा न लागणारा, हळवा, अति स्वप्नाळू, एखादी गोष्ट गृहीत धरून चालणारा, गैरसमजातून घोटाळे निर्माण करणारा.
प्लुटो:
हा ग्रह अतिमंद गती आहे. या ग्रहाचा शोध लागल्यापासून राशि चक्राचा एक फेरा अजून पूर्ण झालेला नाही. त्यामुळे या ग्रहाच्या गोचर भ्रमणाविषयी अजून पुरसे संशोधन झालेले नाही. या ग्रहाचा संबंध अतिसूक्ष्म मानसिक जाणिवेशी आहे,हा ग्रह अद्वैत तत्व ज्ञान दर्शविणारा आहे, सामाजिक क्रांती,लढाया,निरनिराळी संक्रमणे या ग्रहाखाली येतात, कोणत्याही गोष्टीचा पूर्ण विध्वंस करून नवनिर्निती करणे हा या ग्रहाचा गुणधर्म आहे. पत्रिकेतील अष्टम स्थान म्हणजे मृत्यू स्थानाचा कारक आहे. पत्रिकेत जय स्थानात असेल त्या स्थानासंबंधी एखादे अशुभ फळ देतो.
जेव्हा एखाद्या ग्रहाला स्थानबल,राशिबळ चांगले असेल, जर तो लग्नेश ग्रहाचा मित्र असेल आणि त्याच्याशी शुभयोग  करत असेल तर त्या ग्रहाचे जातकाच्या स्वभावावर शुभ परिणाम झालेले दिसतील. या उलट जेव्हा एखाद्या ग्रहाला स्थानबल,राशिबळ चांगले नसेल, जर तो लग्नेश ग्रहाचा शत्रू असेल आणि त्या ग्रह बरोबर अशुभ योग करत असेल तर त्या ग्रहाचे जातकाच्या स्वभावावर अशुभ परिणाम झालेले दिसतील.
रामराम.                                   
.                       

No comments:

Post a Comment

Visit Our Page