Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Saturday, December 5, 2015

स्त्री वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

स्त्री वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

      दाम्पत्याने विवाहानंतर किमान तीन वर्ष सतत प्रयत्न करूनही गर्भधारणा न होणे ह्याला वंध्यत्व म्हणतात. वंध्यत्वाचे वैद्यकीय कारण पुरुष किंवा स्त्री दोघांपैकी एकात किंवा दोघांमध्येही असू शकते. नेमके कारण शोधून त्याची चिकित्सा केल्याने गर्भधारणा होणे शक्य असते. नेमके कारण लक्षात आले नाही तर मात्र स्त्रीलाच दोषी ठरवून ‘पुनर्विवाह’ करण्याची मानसिकता अजूनही भारतात, विशेषतः अशिक्षित किंवा अति उच्चभ्रू समाजात दिसते.
३१ ते ४० वयोगटातील सुमारे ६३% विवाहित जोडप्यांना वंध्यत्व निवारणासाठी वैद्यकीय चिकित्सेचा आधार घ्यावा लागतो. ज्यामध्ये सुमारे ४१% पुरुषांमध्ये शुक्रबीज दोष तर सुमारे ४०% स्त्रियांमध्ये बीजकोषात साबुदाण्याप्रमाणे लहान कोष तयार होणे (PCOS) हा विकार सापडला. स्त्री वंध्यत्व ही एक फार मोठी समस्या आहे आणि त्यावर आयुर्वेदीय उपचार पद्धतीचा वापर करण्याची नितांत गरज आहे असे जाणवते. ह्या लेखात पुरुष व स्त्री वंध्यत्व ह्यापैकी फक्त स्त्री वंध्यत्व हाच विषय केंद्रित केला आहे.
आयुर्वेदात वर्णन केलेल्या ‘ऋतु, क्षेत्र, अम्बु आणि बीज’ ह्या ४ गोष्टी सुस्थितीत असतील तर गर्भधारणा होण्यास बहुदा अडचण येत नाही. आधुनिक वैद्यक शास्त्रात दिलेली वंध्यत्वाची कारणे देखील ह्या चार मध्ये सामावतात असे आपल्या लक्षात येईल.
     ऋतु - म्हणजे गर्भधारणेसाठी सुयोग्य काळ. स्त्रीसाठी वय वर्ष १६ पासून पुढे आणि मासिक रजःस्रावाच्या १० व्या दिवसापासून १८ व्या दिवसापर्यंत हा काळ गर्भधारणेसाठी योग्य असतो. म्हणूनच स्त्रीला ह्या काळात ‘ऋतुमती’ म्हणतात.
     क्षेत्र – गर्भाशय, बीजवाहिन्या, बीजकोष ह्या सर्व भागांना एकत्रितपणे ‘क्षेत्र’ समजावे. ह्यातील कोणत्याही भागात दोष असेल तर गर्भधारणा होऊ शकत नाही.
     अम्बु - झाडांच्या वाढीसाठी जसे खतपाणी तसेच गर्भाशयाच्या व गर्भाच्या पोषणासाठी जे जे काही आवश्यक घटक ते सर्व म्हणजेच "अम्बु". आधुनिक वैद्यक शास्त्राप्रमाणे इस्ट्रोजिन, प्रोजेस्टेरॉन, प्रोलॅक्टिन इ. संप्रेरकांचा समतोल असणे येथे अभिप्रेत आहे. ऋतुस्राव, गर्भधारणा, गर्भपोषण, स्तन्यनिर्मिती, रजोनिवृत्ती अशा सर्व स्थिती सुरळीत होण्यासाठी शरीरातील अन्तःस्रावी ग्रंथींचे कार्य अविरतपणे चालू असते. गर्भावस्थेत ह्यांचा समतोल गर्भाच्या पोषणासाठी अनिवार्य असतो.
     बीज - जन्मतः स्त्रीबीजकोषात ठराविक संख्यने सूक्ष्म स्वरुपात स्त्रीबीज दडलेली असतात. दर महिन्याच्या ठराविक दिवशी एक एक बीज परिपक्व होते व त्याचे पुरूषबीजाबरोबर मीलन झाले तर गर्भधारणा संभवते, अन्यथा मासिक स्रावाच्या वेळी स्त्री शरीरातून हे बीज बाहेर टाकले जाते. स्त्री व पुरुषबीजे निरोगी असली तरच गर्भधारणा व्यंगरहित घडते, निरोगी व सुदृढ बालक जन्माला येते.
स्त्री वंध्यत्वाची प्रमुख कारणे – आधुनिक वैद्यक शास्त्रानुसार
     • अनियमित रजःप्रवृत्ती (Irregular menstruation) किंवा रजःप्रवृत्ती न होणे (Amenorrhea) त्यामुळे स्त्रीबीज परिपक्वता न होणे (Anovulatory cycle) (अम्बु दोष)
वयाच्या साधारण १३ – १४ व्या वर्षी स्त्रीला प्रथम रजःप्रवृत्ती सुरु होते. संप्रेरकांच्या असंतुलनामुळे रजःप्रवृत्तीचे कालचक्र अनियमित होते. मानसिक ताण, आहारातील वैषम्य, हॉर्मोन्सच्या गोळ्या वारंवार घेणे, वजनाचे चढ-उतार, अति श्रम, जीर्ण आजार, केमोथेरपी, क्षकिरणांचा दुष्परिणाम अशा अनेक कारणांमुळे रजःप्रवृत्ती अनियमित होते. कारणांचा विचार करून चिकित्सेची आखणी करावी लागते.
     • गर्भाशयातील अंतस्त्वचेला (Endometritis) व बीजवाहिनीला शोथ (Salpingitis) त्यामुळे बीजवहनात अडथळा (Tubal obstruction) (क्षेत्र दोष)
ट्युबरक्युलोसिस किंवा लैंगिक आजारांमुळे होणारे जंतुसंसर्ग झाल्याने गर्भाशयाच्या व बीजवाहिनीच्या अंतस्त्वचेला सूज येते.
    • पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम (PCOS) (अम्बु विकृतीमुळे झालेला क्षेत्र दोष) –
बीजकोषात साबुदाण्याप्रमाणे कोष तयार होणे - सुमारे ४०% स्त्रियांमध्ये आजकाल हा विकार लहान वयातच झालेला आढळतो. बदलत्या जीवनशैलीचा परिणाम, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, चरबी वाढणे, थायरॉइड विकृती, मानसिक ताण, जीर्ण आजार, विद्युत चुंबकीय उपकरणांचा बेसुमार वापर ह्यासारख्या कारणांमुळे हॉर्मोन्सचे संतुलन बिघडणे ही ह्याची प्रमुख कारणे आहेत.
   • वंक्षणभागातील अवयवांचा शोथ (PID) (क्षेत्र दोष)
योनिमार्गात जंतुसंसर्ग झाल्यास गर्भाशय मुखाचे स्राव त्याचे नियंत्रण करण्यास समर्थ असतात. शरीराची एकंदर रोगप्रतिकारक्षमता खालावाल्यास हे जंतुसंक्रमण वंक्षण भागात पसरून शोथ निर्माण करतात.
   • गर्भाशय अंतरस्तर अस्थानता (Endometriosis) (क्षेत्र दोष)
ह्या अवस्थेत स्तराची जाडी वाढते आणि गर्भाशयाच्या आसपास जागा मिळेल त्या ठिकाणी हे स्तर पसरत जातात. त्यामुळे बीजवाहिनीत अडथळा निर्माण होतो व गर्भधारणेला प्रतिबंध होतो.
   • गर्भाशयात ग्रंथि होणे (Uterine fibroids) (क्षेत्र दोष)
ह्या ग्रंथी होण्याचे नेमके कारण अवगत नाही. परंतु ग्रंथी निर्माण झाल्यावर इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरोन संप्रेरकांची वाढ होते वा चिकित्सा करणे कठीण होते.
   • बीज परिपक्वता दोष व बीजकोशाला इजा होणे (Anovulatory cycle) (बीजदोष)
संप्रेरकांच्या संतुलनात, विशेषतः हायपोथॅलॅमसच्या क्रियेत बिघाड झाल्याने बीज परिपक्वता अनियमित होते. ह्याचा परिणाम प्रजनन यंत्रणांवर होऊन वंध्यत्व येते.
    • टॉर्च - (TORCH); आय.जी.जी. व आय.जी.एम.
विशिष्ट रोगांच्या समुच्चयाला टॉर्च संज्ञा दिली आहे. ह्या अंतर्गत खालील रोगांचा अंतर्भाव आहे -
T – TOXOPLASMOSIS
O – Other infections (Syphilis, Varicella Zoster, Parvovirus B-19, Listerosis & Coxsackie Virus)
R – RUBELLA
C – CYTOMEGALOVIRUS
H – HERPES SIMPLEX VIRUS – 2
     मानवी शरीरातल्या अति महत्वाच्या यंत्रणा, रचना किंवा अवयव यांचे संरक्षण करण्यासाठी शरीराची स्वतंत्र यंत्रणा सतत राबत असते. त्या यंत्रणेचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी प्लासेन्टल बॅरियर हा एक उंबरठा आहे. गर्भाचे पोषण मातेच्या रक्तापासून होत असते. त्यामुळे मातेच्या रक्तात काही दोष असले तर त्याचा परिणाम गर्भावर होऊ नये म्हणून हे बॅरियर गर्भ रक्षणाचे काम करते. परंतु काही जीवाणू किंवा विषारी द्रव्य ह्या बॅरियर मधून पण पार होतात. त्यामुळे गर्भस्राव, गर्भपात, मृतगर्भ किंवा व्यंग असलेला गर्भ उत्पन्न होतो. हा विषय आधुनिक वैद्यक शास्त्रात TORCH म्हणून वर्णन केलेला आहे. गेल्या काही वर्षात टॉर्च इन्फेक्शन बद्दल बरीच चर्चा होतांना दिसते. त्याबद्दल थोडी पण महत्वाची माहिती असणे आवश्यक आहे.
     संसर्गामुळे शरीरातील रोगप्रतिकार प्रणाली कार्यान्वित होते व त्या त्या जंतूंच्या विरोधात प्रतिद्रव्ये (Antibodies) निर्माण होतात. ह्या प्रतिद्रव्यांचे मापन करून टॉर्च संसर्गाचे सामर्थ्य किती आहे हे ठरविता येते. ही प्रतिद्रव्ये दोन प्रकारची असतात, आय.जी.जी. व आय.जी.एम. भूतकाळात झालेल्या संसर्गामुळे आय.जी.जी. प्रकारची प्रतिद्रव्ये रक्तात आढळतात तर नजीकच्या काळात झालेल्या आशुकारी संसर्गामुळे आय.जी.एम. प्रकारची प्रतिद्रव्ये रक्तात आढळतात. आय.जी.जी. प्रतिद्रव्ये आढळणे हे स्त्री स्वास्थ्याच्या दृष्टीने अनुकूल असते कारण त्या जंतूंच्या संसर्गाची भीती गर्भावस्थेत उरत नाही. ह्याउलट आय.जी.एम. प्रकारची प्रतिद्रव्ये रक्तात आढळली तर त्याची चिकित्सा करणे आवश्यक ठरते. आय.जी.एम. हे नुकत्याच झालेल्या संसर्गाचे द्योतक आहे व हे सूक्ष्म जंतु गर्भपोषणास अपाय करू शकतात. अयोग्य वाढ झाल्याने असा गर्भ मातेच्या उदरात टिकून रहात नाही. त्यामुळे गर्भस्राव, गर्भपात किंवा अकाली प्रसव होण्याची भीती राहते.
     • गर्भधारणक्षमता खालावणे (AMH)
अॅंटिम्युलेरियन हॉर्मोन चे प्रमाण बीजकोशाची प्रजनन क्षमता दर्शविते. पेशीविघातक परमाणुंच्या (Free radicals) आघातामुळे व वाढत्या वयामुळे हे प्रमाण खालावत जाते. १.० नॅनोग्रॅम/मि.ली. हे प्रमाण गर्भधारणेसाठी उत्तम समजले जाते. ०.७ ते ०.९ हे मध्यम व त्यापेक्षा कमी असणे हीन समजले जाते. PCOS विकारात मात्र हे प्रमाण विकृत स्वरुपात वाढलेले दिसते.
    • बीजवाहिनी अंतर्गत गर्भधारणा (Ectopic pregnancy)
स्त्रीबीज व शुक्रबीजाचे मिलन बीजवाहिनीत झाल्यावर अंडकोष (Zygote) फलित होतो. पुढे साधारणतः ८ ते १० दिवसांनी गर्भाशयात तो स्थानापन्न होतो. इस्ट्रोजेनमुळे बीजवाहिनीत ओलावा किंवा स्निग्धपणा येऊन ही क्रिया घडते. हे स्राव कमी प्रमाणात स्रावित झाले तर बीजवाहिनीत हा अंडकोष अडकून राहतो व बीजवाहिनी अंतर्गत गर्भधारणा होते.
    • शल्यकर्माचे विपरीत परिणिती (Postsurgical complication)
वंक्षण किंवा उदराच्या अधोभागातील शल्यकर्मामुळे त्या ठिकाणी तंतुमय पेशी (Adhesions) उत्पन्न होतात. ह्यामुळे गर्भाशय व बीजवाहिनींवर दबाव वाढतो जो प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो.
    • सहज विकार (Congenital Defects)
क्वचित प्रसंगी गर्भाशय व इतर प्रजनन यंत्रणेची निर्मिती होत नाही, गर्भाशय मुख सुईप्रमाणे अतिशय लहान असते, गर्भाशयात पटल असते, गर्भाशये दोन असतात, पुरेशी वाढ होत नाही. अशा विकारांचे परिणाम वंध्यत्वास कारणीभूत होतात.
     रोगनिदाना साठी काही प्रमुख चाचण्या
सर्व्हायकल म्युकस टेस्ट – ह्यात गर्भाशयमुखाचा स्राव घेऊन परीक्षण करतात. हा स्राव इस्ट्रोजेन संप्रेरकाच्या प्रभावाने होत असतो. स्त्रीबीज परिपक्व झाले की हा स्राव हलका पिवळसर रंगाचा होतो व तसे न झाल्यास हा स्राव घट्ट व चिकट राहतो. स्राव घट्ट असता शुक्रबीज गर्भाशयात सहजतेने जाऊ शकत नाही. अशा वेळी गर्भधारणा होत नाही.
ट्यूबल पेटन्सी – बीजकोषात तयार झालेले स्त्रीबीज बीजवहन नलिकेत येऊन थांबते. त्याठिकाणी शुक्रबीज येऊन शुक्र आणि स्त्रीबीजाचे मीलन होते. त्याकरिता ह्या बिजवाहिनीचा मार्ग मोकळा असावा लागतो. मार्गात अडथळा असेल तर हे मीलन न झाल्याने गर्भधारणा होत नाही. ही नलिका तपासण्यासाठी काही पद्धती आहेत.
  १. हिस्टोसालपिंजोग्राफी. ह्यात क्षकिरण यंत्राखाली रुग्णेला झोपविले जाते. क्षकिरण अपारदर्शक (X-ray opaque) द्रव्य गर्भाशयात प्रविष्ट करून ते बीजवाहिनीतून जाते किंवा नाही हे पाहिले जाते.
  २. लॅप्रोस्कोपी - बेंबीजवळ लहानसा छेद करून सूक्ष्म दुर्बीण आत घातली जाते. गर्भाशय, बीजवाहिन्या आणि आसपासचे संपूर्ण भाग व त्यातील दोष ह्यातून स्पष्ट दिसतात व त्यांची चिकित्सा ह्याच दुर्बिणीच्या सहाय्याने करता येतो.
   सोनोग्राफी - सोनोग्राफीच्या सहाय्याने गर्भधारणेसाठी योग्य काळ अगदी अचूकपणे कळू शकतो. बीजाची वाढ, परिपक्वता योग्यप्रकारे होते किंवा नाही हे स्पष्टपणे दिसते. गर्भाशय शोथ, एन्डोमेट्रिओसिस, बीजवाहिनी शोथ असल्यास तेही स्पष्ट दिसतात.
स्त्री वंध्यत्व - आयुर्वेदीय चिकित्सा सूत्रांचा संकलित विचार -
वंध्यत्व आणि गर्भावस्थेतील समस्यांचे आधुनिक वैद्यक शास्त्रात केलेले वर्णन PCOS, PID, AMH, Endometriosis, TORCH, Ectopic pregnancy अशा निरनिराळ्या पारिभाषिक संज्ञा वापरून केले आहे. काळ व भाषेच्या भिन्नतेमुळे आयुर्वेदात ह्या परिभाषा नाहीत. तरीही हे सर्व रोग, लक्षणे आणि उपद्रव आयुर्वेदोक्त “ऋतु, क्षेत्र, अम्बु, बीज” ह्या चौकटीतच चपखल बसल्याचे आपल्या लक्षात येईल. स्त्रीरोग, वंध्यत्व, दहा महिन्यांच्या गर्भावस्थेतील प्रत्येक टप्प्यात होणारे बदल, गर्भ व गर्भिणीची पोषक घटकांची नेमकी गरज ओळखून त्या त्या अवस्थेची चोख भरपाई करणारे कल्प सादर करणारे आयुर्वेद हे जगातील एकमेव वैद्यक शास्त्र आहे.
आयुर्वेदात वर्णन केलेला चिकित्सा क्रम आणि कल्प ह्यावर नक्कीच लाभदायक ठरतात.
चिकित्साक्रम व कार्यकारण विचार –
पंचकर्म - बस्ति चिकित्सा
          बस्ति चिकित्सा : गर्भधारणेपूर्वी यथोचित पंचकर्म चिकित्सा करून शरीरशुद्धी करावी ही संकल्पना आपण जाणतोच. त्यातही बस्ति चिकित्सा सर्वात महत्वाची आहे. ही चिकित्सा उभयतांनी करावी. ह्याने गर्भाशयातील अंतस्त्वचेला व बीजवाहिनीला शोथ व त्यामुळे बीजवहनात अडथळा, वंक्षणभागातील अवयवांचा शोथ (PID), गर्भाशयाच्या अंतस्त्वचेचा अवाजवी रोगट विस्तार (Endometriosis) ह्या विकारांवर मात करता येते.
अपानोऽपानगः श्रोणिवस्तिमेढ्रोरुगोचरः । शुक्रार्तवशकृन्मूत्रगर्भनिष्क्रमणक्रियः ।। अष्टांगहृदय, सूत्रस्थान १२/९)
अपानवायु गुदस्थानी रहात असून कटि, शिस्न व मांड्या ह्या ठिकाणी संचार करतो. तो शुक्र, आर्तव, मल, मूत्र व गर्भ ह्यांना योग्य काळी शरीराबाहेर काढण्याचे कार्य करतो. त्यामुळे वंध्यत्व चिकित्सा करतांना अपानवायूचा विचार महत्वाचा आहे.
        बस्ति चिकित्सेने अपानवायुचे अनुलोमन होऊन आतड्यातील मळाचे खडे सहजपणे बाहेर पडल्याने बीजकोशाला प्राणवायुयुक्त रक्ताचा पुरवठा सुरळीत होतो, परिणामी त्याचे प्राकृत कार्य सुधारते. ‘भीतीने गर्भगळीत होणे’ हा जरी वाक्प्रचार असला तरी ह्यात शास्त्र दडलेले आहे. अपान वायु प्राकृत अवस्थेत असेल तर तो योग्य काळपर्यंत गर्भ टिकवून धरतो आणि विकृत झाला तर मात्र हमखास गर्भाला बाहेर टाकतो असा बोध ह्यातून घ्यावा. म्हणून गर्भावस्थेत अपानाला सर्वात जास्त महत्व आहे. आतड्यातील अपान वायु, मळाचे खडे हे गर्भाशयाच्या आजूबाजूच्या रक्तवाहिन्यांवर व बीजवाहिन्यांवर दाब निर्माण करू शकतात. हा दाब नाहीसा करण्यासाठी बस्ति चिकित्सा महत्वाची ठरते. बस्ति चिकित्सेने अपानाचे कार्यही सुरळीत होते.
                 कृत्स्ना चिकित्सापि च बस्तिरेकैः । । अष्टाङ्गहृदय, सूत्रस्थान १९-८७
अपान वायूच्या विकारांसाठी बस्ति हीच सर्वश्रेष्ठ चिकित्सा आहे.
अपानवायु कशाने बिघडतो ?
                 अपानो रूक्षगुर्वन्नवेगाघातातिवाहनैः । यानयानासनस्थानचङ्क्रमैश्चातिसेवितैः ।।
                 कुपितः कुरुते रोगान्कृच्छ्रान्पक्वाशयाश्रयान् । मूत्रशुक्रप्रदोषार्शोगुदभ्रंशादिकान्बहून् ।। अ. हृदय,   निदानस्थान १६/२७-२८
        रूक्ष व गुरु अन्न सेवन, वेगांचा अवरोध, अतिशय कुंथणे, गाडीघोड्यावरून प्रवास करणे, फक्त बैठे काम करणे, सतत उभे राहणे, बेसुमार चालणे अशा कारणांमुळे अपानवायु कुपित होतो. ह्याने पक्वाशयाच्या आश्रयाने होणारे मूत्राघात, प्रमेह, शुक्रदोष, मूळव्याध, गुदभ्रंश सारखे कष्टसाध्य व्याधी उत्पन्न होतात.
ग्रंथात वर्णन केलेल्या ह्या कारणांव्यतिरिक्त काळानुसार इतर कारणांचाही विचार करणे आवश्यक आहे. जसे – अति प्रमाणात मैद्याचे पदार्थ सेवन करणे, कार्बोनेटेड शीतपेयांचे बेसुमार सेवन, कंबरेचा पट्टा (बेल्ट) फार घट्ट बांधणे, अतिप्रमाणात मांसाहार करणे, घाई घाईने व न चावता जेवण करणे, मोड आलेल्या कडधान्यांचे अधिक सेवन करणे, अकाली झोप घेणे व रात्र-रात्र न झोपणे (शिफ्ट ड्युटीज, रात्रीचे ड्रायव्हिंग मुळे) अशी अनेक कारणे अपानवायु बिघडवतात.
        मैद्यामुळे पाचक स्रावांना पचनयंत्रणेत येण्यास अडथळा होतो, शीतपेयांमुळे पाचकस्रावांची शक्ती कमी होते, कंबरेचा पट्टा कसून बांधण्यामुळे आतड्यांची चलनवलन गती मंदावते, मांसाहार पचण्यास जड असल्याने पाचकस्रावांना पचनास पुरेसा वाव मिळत नाही, घाईने जेवतांना अन्नाबरोबर भरपूर प्रमाणात हवा अन्नमार्गात घेतली जाते, कडधान्य पचनयंत्रणेत जाऊन आंबतात व फसफसतात, जागरणाने शरीराचे बायोलॉजिकल क्लॉक बिघडते. म्हणून अपानाचे संतुलन राखण्यासाठी ह्या सर्व गोष्टींचा विचारपूर्वक वापर करावा, कोणत्याही प्रकारचा अतिरेक होत नाही ह्याची खात्री करावी.
         मानसिक संतुलन उत्तम असेल तर गर्भ स्थिर राहतो व बिघडल्यास गर्भपात घडतो. स्वास्थ्यपूर्ण गर्भाधान होण्यासाठी उभयतांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे महत्वाचे आहे. भीती, चिंता, क्रोध, मानसिक दडपण निर्माण झाल्यास त्याचा पियुशिका ग्रंथींच्या संप्रेरकांवर (हॉर्मोन्सवर) परिणाम होतो. ह्याने प्रजनन क्षमताही कमी होते. औषधी चिकित्सा करतेवेळी हा मुद्दाही लक्षात घेणे गरजेचे आहे.
    औषधी चिकित्सा – (अ) प्रजांकुर नस्य (ब) फलमाह (क) प्रथमाह
वंध्यत्व निराकरण व्हावे, स्वास्थ्यपूर्ण गर्भाधान व्हावे, गर्भात दोष राहू नयेत, गर्भस्राव किंवा गर्भपात होऊ नये, गर्भ व गर्भिणीपोषण होऊन सुप्रजनन व्हावे म्हणून आयुर्वेद शास्त्राने गर्भस्थापक नस्य, फलसर्पि व मासानुमासिक पाठांची रचना केली आहे. त्यांचा अंतिम परिणाम प्रत्यक्षातही दिसून येतो. ह्यातील प्रत्येक वनस्पतीचा स्वतंत्रपणे सखोल अभ्यास केल्यावर आयुर्वेदाच्या मौलिक खजिन्याचे महत्त्व लक्षात येते.
अनेकविध जंतुसंसर्गांच्या संदर्भात एक गोष्ट सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे वैयक्तिक रोग-प्रतिकार शक्ति. गर्भिणीच्या शरीरातील ही शक्ती, जीवाणू व विषाणूंपासून गर्भाचे रक्षण करते. एकाच प्रकारचे विषाणू किंवा जीवाणू भिन्न शरीरात प्रविष्ट केले असता प्रत्येकाची प्रतिक्रिया निराळी असते. कोणाला रोगाची सौम्य लक्षणे निर्माण होतात तर कोणाला अतिशय तीव्र. म्हणूनच सर्व पाठांमध्ये निरनिराळ्या प्रकारे रोग-प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विशिष्ट वनस्पतींचा वापर केलेला आढळतो. काही वनस्पतींमुळे पांढऱ्या पेशी वाढतात तर काही यकृताचे कार्य सुधारतात. काहींनी रक्तातील लोहाचे प्रमाण वाढते तर काही पेशी रक्षक (Antioxidant) म्हणून कार्य करतात. काहींनी मूत्रवह संस्थेचे कार्य सुधारते तर काही मज्जा संस्थेला बळ देतात. नैसर्गिक स्वरुपात उपलब्ध असलेली जीवन सत्वे, खनिजे, लोह, कॅल्शियम, विविध प्रकारची संप्रेरके ह्या पाठांतील वनस्पतींमध्ये आहेत. थोडक्यात काय तर गर्भ व गर्भिणीच्या सर्वांगीण स्वास्थ्यासाठी एक “अभेद्य सुरक्षा कवच” ह्या पाठांच्या सेवनामुळे प्राप्त होते.
प्रजांकुर नस्य चिकित्सा - विश्लेषण:
       पंचकर्मांपैकी किमान विरेचन, नस्य आणि बस्ति चिकित्सेचा प्रयोग करावा. बीजदोष नाहीसे करण्यासाठी, बीज सामर्थ्यवान होण्यासाठी व उत्तम गर्भधारणा होण्यासाठी ह्या क्रिया आवश्यक आहेत.
हायपोथॅलॅमस, पियुशिका ग्रंथी आणि बीजकोशातून स्रावित होणाऱ्या संप्रेरकांचा समतोल स्त्रीच्या प्रजनन यंत्रणेला प्रामुख्याने उपयुक्त असतो. हायपोथॅलॅमस मधून गोनडोट्रॉपिन रीलीझिंग हॉर्मोन उत्पन्न होते. त्याचा प्रभाव फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आणि ल्युटिनायझिंग हॉर्मोनवर होतो ज्यामुळे मासिक रजःस्रावाचे चक्र वयाच्या १२ - १४ व्या वर्षापासून (पौगंडावस्थेपासून) ५० - ५२ वर्षे वयापर्यंत (रजोनिवृत्तीपर्यंत) चालू राहते. ह्यांच्या संतुलनामुळे स्त्रीबीज प्रवर्तन, परिपक्वता आणि बीजकोशातून इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन निर्मिती होते. ह्यांच्याच प्रभावाने स्तनपुष्टी, गर्भाशयाची वाढ, योनिमार्गातील ओलावा निर्माण होतो. ‘एन्डोमेट्रिऑसिस’ (गर्भाशयाची अन्तस्त्वचा इतरत्र पसरणे) विकाराची चिकित्सा करण्यासाठी एक प्रकारच्या रासायनिक द्रव्याचे नस्य (स्प्रेच्या रूपाने) आधुनिक वैद्यक शास्त्रात दिले जाते. नासामार्गे प्रविष्ट केलेल्या ह्या औषधाने हॉर्मोन्सचे संतुलन साधले जाते व सदर रोगाची चिकित्सा सफल होते. ह्यातून निष्कर्ष काढता येतो की नस्य चिकित्सेचा उपयोग स्त्री प्रजनन यंत्रणेवर हमखास होतो. ह्या विषयी आयुर्वेदीय ग्रंथात नमूद असलेल्या “गर्भस्थापक” नस्याचा विचार नक्कीच शास्त्राच्या भक्कम सूत्रांवर आधारित आहे हेही स्पष्ट होते.
         नस्य चिकित्सेची ही महती आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वी जाणून उपयुक्त वनस्पतींचे पाठ ग्रंथात विषद केले. त्यांना नव्याने अभ्यासून व शास्त्राच्या चौकटीत बसवून “प्रजांकुर नस्य” सिद्ध घृत स्वरुपात अक्षय फार्मा रेमेडीजने सादर केले आहे. ह्याचा वापर नस्य स्वरुपात गर्भधारणेच्या संकल्पापासून गर्भधारणा निश्चिती पर्यंत उभयतांनी करावयाचा आहे.
        चरक संहिता ह्या आद्य ग्रंथात महर्षी चरकाचार्यांनी काही विशिष्ट वनस्पतींचे वर्गीकरण ‘गर्भस्थापक औषधी’ म्हणून केले आहे. ह्याचे समर्थन काश्यप संहिता, सुश्रुत संहिता अशा ग्रंथातही नमूद आहे. ‘औषधी गर्भसंस्कार’ संकल्पनेचा आधार ग्रंथ “अष्टांगहृदय” ह्यामध्ये देखील महर्षी वाग्भट ह्यांनी त्याचे समर्थन करून औषध सेवनाचे विविध मार्ग व स्वरूप सांगितले आहे.
नस्याचे लाभ –
      ततः प्रजास्थापनाख्या दशौषधीः शिरसा दक्षिणेन च पाणिना धारयेत्। एताभिश्च सिद्धं पयो घृतं वा पिबेत्। . . . .  अष्टांगसंग्रह शारीर १ – ६२
    ऐन्द्रीब्राह्मीशतवीर्यासहस्रवीर्याऽमोघाऽव्यथाशिवाऽरिष्टावाट्यपुष्पीविष्वक्सेनकान्ता इति दशेमानि प्रजास्थापनानि भवन्ति . . . . सूत्रस्थान चरक ४/१८ (४९)
    लक्ष्मणादिनस्यदानं गर्भस्थापनार्थं, स्थितगर्भायाश्चमासत्रयाल्पान्तरे पुत्रापत्यजननार्थं नस्यदानमिति ll . . . . . . . सुश्रुत, शारीर २-३२
       “पिण्यासाठी व शिरोभागी धारण करण्यासाठी” सदर पाठाचा वापर करावा असा शास्त्रादेश आहे. शिरोभागी धारण करणे म्हणजेच ‘नस्य स्वरुपात वापर करणे’ असा अर्थ शास्त्रकारांना येथे अभिप्रेत आहे. “नासाहि शिरसो द्वारं” ह्या प्रस्थापित संकल्पनेनुसार व आधुनिक वैद्यकानुसारही नस्य हे प्रजनन संस्थेवर उत्तम कार्य करते. म्हणून ‘प्रजांकुर घृत’ नस्य रूपाने वापरावे. शास्त्राधार व आप्तवचन ह्या दोन्ही दृष्टिकोनातून ह्याचा वापर नस्य स्वरुपात करणे योग्यच आहे. काही द्रव्यांचे शोषण नाकाच्या मार्गाने त्वरित होते. हीच द्रव्ये पोटात घेतल्याने त्यावर अनेक पाचक स्रावांची क्रिया घडते व ‘ब्लड ब्रेन बॅरियर’ यंत्रणेमुळे कार्यकारी घटकांचे शोषण शिरोभागात होण्यास अडथळे निर्माण होतात. नाकाच्या श्लेष्मल स्तरातून ही द्रव्ये मेंदूच्या संपर्कात येतात व रसरक्तातही त्यांचे शोषण त्वरित होते. नाकातून प्रविष्ट केलेले द्रव्य अत्यल्प काळात रक्तसंवहनात पसरते. इंजेक्शन द्वारा दिल्या गेलेल्या औषधाइतक्याच कमी वेळात ह्याचा परिणाम होतो.
घृत हेच माध्यम का ?
       नस्य चिकित्सेत चूर्ण वापरल्यास नाकाच्या श्लेष्मल त्वचेत व्यवस्थितपणे शोषले जात नाही म्हणून नस्य हे द्रव स्वरुपात असावे. द्रव पदार्थांमध्ये जल आणि स्नेह असे दोन मुख्य प्रकार आहेत. त्यापैकी स्निग्ध द्रव्य (स्नेह) हे स्वभावतः मध्यवर्ती मज्जासंस्थेला सात्म्य असतात.
       स्निग्ध द्रव्यांतील भिन्न घटक हे बीजकोशाची प्रजनन क्षमता वाढविण्यात निपुण असतात. ह्यात फिश ऑईल, ऑलिव्ह ऑईल अशा स्निग्ध द्रव्यांचा समावेश आधुनिक वैद्यक शास्त्रात केला आहे. भारतात तूप निर्माण करण्याचे शास्त्र पुरातन काळापासून अवगत आहे. आयुर्वेदात ह्याला घृत म्हणतात. तुपामध्ये डिकोसाहेग्झिनॉइक अॅसिड (DHA) म्हणजे ओमेगा – 3, ह्याशिवाय ओमेगा – ६ सारखे प्रजनन क्षमता वाढविणारे उत्तम घटक आहेत. प्रसुतीच्यावेळी DHA योग्य प्रमाणात असणाऱ्या स्त्रियांची मुले ह्याचे प्रमाण कमी असलेल्या स्त्रियांच्या मुलांपेक्षा बौद्धिकदृष्ट्या जास्त सक्षम असतात. वजन वाढण्याच्या भीतीने ह्याचे सेवन हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे कदाचित वंध्यत्वाचे प्रमाणही वाढत असावे. आयुर्वेदानुसार घृत, तैल, वसा, मज्जा हे ४ स्निग्ध पदार्थ आहेत. ह्यापैकी ‘सामान्य-विशेष’ सिद्धांतानुसार ‘मज्जा’ हा स्निग्ध पदार्थ मध्यवर्ती मज्जासंस्थेला (CNS) नक्कीच अधिक पोषक ठरेल ह्यात शंका नाही. परंतु उपलब्धी, प्राणिज स्रोत, मनुष्याची मानसिकता आणि घृताचे गुण ह्यांचा विचार करून “घृत” हेच माध्यम नस्यासाठी वापरणे योग्य ठरते.
प्रजांकुर घृत नस्य -
प्रत्येक १० ग्रॅम प्रजांकुर घृतामधील घटकद्रव्ये व प्रमाण:
ऐन्द्री (Citrullus colocynthis), दुर्वा (Cynodon dactylon), अमोघा (Sterospermum suaveolens), विश्वक्सेना (Callicarpa macrophylla), अव्यथा (Hibiscus mutabilis), शिवा (Terminalia chubula), ब्राह्मी (Bacopa monnieri), वाट्यपुष्पी (Sida cordifolia), शतवीर्या (Asparagus racemosus), बहुपाद (Ficus benghalensis) प्रत्येकी २५० मिलिग्रॅम; गो घृत १० ग्रॅम; गो दुग्ध ४० ग्रॅम
वापरण्याची पद्धत (पुरुष व स्त्रियांसाठी) : बाटली प्रथम गरम पाण्यात ठेवून प्रजांकुर (घृत) पातळ करावे. पाठीवर झोपून ६ - ६ थेंब दोन्ही नाकपुड्यांत सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयाच्या वेळी टाकावे. २ - ३ मिनिटे तसेच पडून राहावे. गर्भधारणेच्या संकल्पापासून गर्भनिश्चिती पर्यंत हे नस्य करावे.
फलमाह (विलेपित वटी) :
मञ्जिष्ठाकुष्ठतगरत्रिफलाशर्करावचाः ॥
द्वे निशे मधुकं मेदां दीप्यकं कटुरोहिणीम् । पयस्याहिङ्गुकाकोलीवाजिगन्धाशतावरीः ॥
पिष्ट्वाक्षांशा घृतप्रस्थं पचेत्क्षीरचतुर्गुणम् । योनिशुक्रप्रदोषेषु तत्सर्वेषु प्रशस्यते ॥
आयुष्यं पौष्टिकं मेध्यं धन्यं पुंसवनं परम् । फलसर्पिरिति ख्यातं पुष्पे पीतं फलाय यत् ॥
म्रियमाणप्रजानां च गर्भिणीनां च पूजितम् । एतत्परं च बालानां ग्रहघ्नं देहवर्धनम् ॥
. . . . अष्टांग हृदय, उत्तरस्थान ३४/६३ – ६७
           ह्याचे सेवन सर्वप्रकारचे योनिदोष व शुक्रदोष ह्यासाठी हितावह आहे. हे आयुष्यवर्धक, पौष्टिक, बुद्धिवर्धक, धनवर्धक व उत्तम पुंसवन आहे. ऋतुकाळी घेतले असता गर्भधारणा होते म्हणून यास फलसर्पि असे म्हणतात. ज्या स्त्रियांची मुले जगत नाहीत त्यांस व गरोदर स्त्रियांस हे हितावह आहे. हे मुलांच्या ग्रहावर उत्तम असून त्याने त्यांचे शरीर चांगले पुष्ट होते.
            "फलमाह" हा पाठ अष्टांगहृदयात नमूद "फलसर्पि" मधील वनस्पतींनी निर्माण केला आहे. ह्या पाठातील वनस्पतींनी स्त्रीशरीराची रोग प्रतिकार क्षमता उत्तम प्रकारे वाढते, पेशी रक्षणाचे व स्त्रीबीज बलवर्धनाचे कार्य घडते. रजःप्रवृत्ती अजिबात न होणे किंवा अनियमित असण्याने स्त्रीबीज परिपक्व न होणे ह्यातून घडणाऱ्या वंध्यत्वावर उत्तम परिणाम करणारा हा स्वयंसिद्ध ग्रंथोक्त कल्प आहे. ह्यातील वनस्पती मोबाईल व इतर विद्युतचुंबकीय लहरींपासून प्रजनन यंत्रणेत कार्यरत असलेल्या अवयवांचे संरक्षण व संप्रेरकांचे संतुलन करतात. गर्भाशयात उत्पन्न होणाऱ्या ग्रंथींवरही (Uterine fibroids) ह्यातील वनस्पती उत्तम नियंत्रण करतात.
          मानवाने सेवन केलेल्या प्रत्येक घटकाचा परिणाम हा शरीरातील प्रत्येक पेशीवर होत असतो किंबहुना सर्व पेशींची जडणघडणच आहारातून किंवा औषधातून होत असते. आहारातून काही दोषयुक्त पदार्थ सेवन केले गेले तर त्याचा परिणाम इतर शारीरिक पेशींवर जसा होतो तसाच स्त्री बीजकोशातील बीजांवरसुद्धा होतो. ह्या बीजांना दोषमुक्त करण्यासाठी आयुर्वेदाच्या तिजोरीतला एक मौल्यवान पाठ म्हणजेच "फलमाह". ह्या पाठामध्ये असलेल्या प्रत्येक वनस्पतीचा उपयोग सुलभ गर्भधारणेसाठी व पुढे गर्भस्थैर्यासाठी नेमका कसा होतो?
     "फलमाह" - विज्ञाननिष्ठ निरूपण:
      गर्भावस्थेत क्ष-किरणांचा अनिष्ट परिणाम गर्भावर होतो हे आता सिद्ध झाले आहे. दैनंदिन जीवनात आजकाल आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवनवीन उपकरणांचा वापर वाढत आहे. मोबाईल फोन, मायक्रोवेव्ह, अनेक प्रकारची विद्युत उपकरणे, वाय फाय, फ्लुरोसंट ट्यूबलाईट, कॉर्डलेस फोन, ब्लूटूथ ह्या व अशा अनेक उपकरणांपासून विद्युत-चुंबकीय लहरी निर्माण होतात. शिवाय वातावरणात देखील अनेक प्रकारचे किरणोत्सर्जन सातत्याने चालूच असते. ह्या लहरींमुळे पेशींमधील डी एन ए वर आघात होतो. परिणामी पेशींची विकृत वाढ झपाट्याने होऊ लागते. ही वाढ कॅन्सर स्वरुपाची पण होऊ शकते. विद्युत-चुंबकीय लहरींचा विपरीत परिणाम स्त्रीच्या प्रजनन संस्थेवर होतो. गर्भिणी व गर्भ ह्या दोहोंवर ह्या लहरींचा होणारा परिणाम ह्या विषयी काही संशोधन -
     १) मायक्रोवेव्ह, हेअर ड्रायर, मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाह असणारे क्षेत्र अशा ठिकाणी काम करणाऱ्या गर्भिणींच्या बालकाला लहान वयातच दमा होण्याची शक्यता तीनपट अधिक असते
    २) गर्भिणी व गर्भ दोघांनाही मोबाईल फोन व टॉवर ह्यातून निर्माण होणाऱ्या लहरींच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. त्यातील किरणोत्सर्जामुळे गर्भवाढीसाठी कार्य करणा-या सूक्ष्म पेशींवर आघात होतो. वार (Placenta) ही गर्भरक्षणासाठी निसर्गनिर्मित रचना असते. ह्या लहरी, वारीचे संरक्षक कवच भेदून गर्भपात किंवा गर्भव्यंग उत्पन्न करू शकतात. गर्भावस्थेत ह्या लहरींचा परिणाम झालेल्या बालकात पुढे पौगंडावस्थेत मानसिक दोष निर्माण होतात.
ह्या उपकरणांपासून दूर राहणे तर आता शक्यच नाही. मग ह्याचे दुष्परिणाम कमी कसे करता येतील? काही संरक्षक कवच वनस्पतींपासून आपण मिळवू शकतो का? किरणोत्सर्जना पासून गर्भिणीचे व गर्भाचे संरक्षण कसे साधता येईल?   "फलमाह" पाठातील वनस्पतींचे लाभ गर्भधारणेपुर्वी व गर्भावस्थेत आहेतच. शिवाय विद्युत-चुंबकीय लहरींचा दुष्परिणाम टाळण्यासाठी देखील होण्याची शक्यता आहे. ह्याविषयी जगभरात झालेल्या संशोधनातून प्राप्त झालेले काही निवडक निष्कर्ष, माहिती व प्रत्येक वनस्पतीच्या गुणधर्मांचे थोडक्यात वर्णन पाहूया.
     मंजिष्ठा: मंजिष्ठा वनस्पतीत अलिझारिन नामक एक लाल रंगाचे द्रव्य असते ज्यामुळे रक्तपेशींमधील बीजदोष अर्थात विषारी परमाणु (फ्री रॅडिकल्स) आघातामुळे डी. एन. ए. वर होणारा दुष्परिणाम टाळता येतो. ही वनस्पती विद्युत-चुंबकीय लहरींचा आघात ६७% इतक्या प्रमाणात कमी करू शकते.
अक्कलकारा: ह्याच्या सेवनाने ल्युटिनायझिंग हॉर्मोन व फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन नामक अन्तःस्रावी ग्रंथींच्या स्रावांचे सुयोग्य संतुलन राखले जाते. स्त्रियांच्या बीजकोशामध्ये दडलेले बीज योग्यवेळी परिपक्व होण्यासाठी पियुशिका ग्रंथीच्या पुढच्या भागातून स्रवणाऱ्या ह्या हॉर्मोनची नितांत गरज असते. ह्याने एच.ए. टायटर आणि IgG मध्ये वाढ होऊन रोगप्रतिकारक्षमता उत्तम राखली जाते. अशाप्रकारे अक्कलकारा स्त्रीबीज परिपक्वतेच्या कार्यात निपुण आहे.
      तगर: गर्भाशयाच्या पेशींवर अवसादक कार्य तगराने होते म्हणजेच आकुंचन प्रसरण क्रिया ह्याने शांत होते. त्याचबरोबर प्रोस्टाग्लानडिन वरही अवसादक कार्य होत असल्याने सूज व वेदना शमन करण्याचे कार्य ह्याने साधते. ह्या वनस्पतीतील पेशीरक्षक गुण प्रसिद्ध आहेत व त्यांची क्रिया मुख्यतः मेंदुच्या कोषिकांवर होते. मानसिक ताण, निद्रानाश, चंचलता अशा लक्षणांवर अत्यंत उपयुक्त आहे. तगर मूळ उत्तम रेडिओ प्रोटेकटिव्ह असून किरणोत्सर्जजन्य विविध दुष्परिणाम पेशीतील डी एन ए वर होऊ देत नाही.
      त्रिफळा म्हणजेच हरीतकी, आमलकी व बिभितकी ह्यांचे समप्रमाणात मिश्रण. ह्या आयुर्वेदोक्त रसायन द्रव्यामुळे रक्तातील T जातीच्या पांढऱ्या पेशी व NK पेशींमध्ये वाढ होऊन रोगप्रतिकारक्षमता सुधारते.
      हरीतकी: जंतूसंसर्गा पासून बचाव करून शरीराची रोगप्रतिकारशक्ती सतत वाढवणारे हे एक श्रेष्ठ फळ आहे. पचन उत्तम ठेऊन शरीराला हलकेपणा देणे हा हरीतकीचा स्वभाव आहे. मेंदू, हृदय, यकृत, प्लीहा, प्रजनन संस्था, अस्थिसंधी, त्वचा, मूत्र विसर्जन संस्था किंवा शरीरातील इतर कोणतीही यंत्रणा असो, हरीतकी त्यांची सर्वतोपरी काळजी घेते.
     बिभीतक: विविध विषारी रसायनांमुळे किंवा आहारातील रासायनिक रंग, अन्नसंरक्षक घटक इ. च्या सेवनाने यकृत विकार होतात व गर्भाधारणेमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. बिभीतकाने यकृताचे कार्य उत्तम राखले जाते व गर्भनिरोधक अडथळे दूर केले जातात. ह्याशिवाय ह्यातील पेशीरक्षक गुण गर्भस्थापनेस सहाय्य करतात.
     आमलकी: ही वनस्पती सप्तधातु पोषक, म्हणजेच शरीर वाढीच्या प्रत्येक टप्प्यात आवश्यक असलेल्या पोषणाची सर्वांगीण क्षमता धारण करते. ह्यातील अस्कोर्बिक अम्ल वंध्यत्व नाहीसे करण्यात कमालीचे उपयुक्त आहे. पौगंडावस्थेत होणारे बदल, प्रजनन यंत्रणेला बळ देणे, अन्तःस्रावी ग्रंथींचा समतोल साधून गर्भस्थापनेस योग्य वातावरण तयार करणे अशा विविध गुणांनी समृद्ध आहे.
     वेखंड: वेखंडात उत्तम पेशिरक्षक गुण आहेत. त्यातील प्रोअॅन्थोसायनिडीन्स मुळे प्रजनन संस्थेच्या यंत्रणेवर विशेष कार्य होते व त्याला बळ प्राप्त होउन कार्य सुधारते. वेखंडाने रोगप्रतिकारक्षमताही वाढते.
     हरिद्रा: काही रासायनिक औषधांमुळे जननक्षमता नाश पावते. त्या औषधांपासून निर्माण होणारे घातक परमाणु संपूर्ण प्रजनन संस्थेवर आघात करून वंध्यत्व निर्माण करतात. हळदीच्या सेवनाने ही क्षमता पूर्ववत होऊ शकते. हळदीच्या आभ्यंतर प्रयोगाने रेडिएशनचे दुष्परिणाम हटतात. त्याचबरोबर SOD-1 आणि PRDX-1 मध्ये बदल होऊन रोगप्रतिकारक्षमता वृद्धिंगत होते.
     दारुहळद: ज्वरहर, जंतुसंसर्ग नाशक, यकृत शोधक, प्रमेह नाशक, कर्करोग निवारक, पेशीरक्षक, रक्तातील चरबी नियंत्रक अशा गुणांनी दारुहळद परिपूर्ण आहे. ह्यातील बर्बेरिन नामक रसायन मेंदूतील सिरोटोनिन व डोपामाईन्स चे संतुलन साधून मानसिक ताणतणाव नियंत्रण करण्यात उपयोगी आहे.
     यष्टिमधु: रेडिएशनमुळे संभवणारे बीजदोष, होणारा अंतस्त्वचा शोथ (म्युकोसायटिस), कष्टार्तव अशा स्थितीत लाभ होतो. ह्याचे उत्तम पेशीरक्षक म्हणून पण कार्य अवगत आहे.
      सारिवा: इम्युनोग्लोब्युलिन्स चे स्राव वर्धन व अडिनोसिन डिअमायनेझचे कार्य सुधार अशा दोन प्रकारे कार्य करून रोगप्रतिकार क्षमता सुधारण्यासाठी सारिवा उपयुक्त आहे. विद्युत-चुंबकीय लहरींमुळे यकृतावर होणारा दुष्परिणाम व डी एन ए वरील आघात ह्यांचे सारिवा मुळे संरक्षण होते.
       कुटकी: यकृतरोग निवारणात अग्रगण्य स्थानावर असलेली अशी ही कुटकी. त्यातील पिक्रोलिव्ह नावाचा घटक रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यात फारच उपयोगी आहे. कुटकी सेवनाने मॅक्रोफेज मायग्रेशन इंडेक्स (MMI) मध्ये वाढ होते, यकृताचे कार्य उत्तम राहते, सार्वदेहिक प्रतिकारशक्तीमध्ये कैक पटीने वाढ होते.
       विदारीकंद: विदारीकंदामुळे गर्भाशय, बीजकोष, गर्भाशय ग्रीवा आणि योनिमार्गातील ग्लायकोजेन चे संहनन सुधारते. ह्याशिवाय विदारीकंदामध्ये श्रेष्ठ पेशीरक्षक व रोगप्रतिकार क्षमता वर्धक गुण आहेतच.
      हिंगु: स्त्रियांच्या वंध्यत्वावर, अकाली होणाऱ्या गर्भस्रावावर, कष्टार्तव, श्वेतप्रदर, रक्तप्रदर अशा मासिक स्रावाच्या अनेक समस्यांवर हिंगाचा उपयोग होतो. ह्याने प्रोजेस्टेरॉनच्या स्रावात वाढ होते.
     शतावरी: स्त्री वंध्यत्वावर उत्तम कार्य करणारी ही वनस्पती आहे. शतावरीने शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा जागृत होते, प्रजनन यंत्रणेमधील सूज हटते, योनिमार्गातील ओलावा वाढतो, कोषातील बिजांची परिपक्वता वेळेवर होते, गर्भधारणेसाठी गर्भाशयाची स्थिती सुधारते, गर्भस्राव व गर्भपात होण्यापासून प्रतिबंध होतो, गर्भाची केंद्रीय मज्जा यंत्रणा व सुषुम्ना ह्यांचे कवच सांधण्याची क्षमता असलेले फोलिक अम्ल शतावरीमध्ये प्रचुर प्रमाणात आहे. अन्तःस्रावी ग्रंथींचे संतुलन राखून स्तन्यवाढीचे कार्य सुधारते. हिच्या सेवनाने पेश्यांतर्गत मायटोकॉनड्रिया वर कार्य होऊन रेडिएशनचा यकृतावर होणारा दुष्परिणाम टाळता येतो. त्यामुळे गर्भस्थापना व पोषणाची संपूर्ण जबाबदारी सांभाळण्याची क्षमता ह्या एका वनस्पतीमध्ये आहे. संपूर्ण गर्भावस्थेत जरी शतावरी सेवन केली तरी यत्किंचितही अपाय नाही उलट अनेक फायदेच होतात इतकी ती गुणकारी आहे. शतावरीमध्ये व्हिटॅमिन ए , बी १, बी २, सी, ई तसेच मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, आयर्न व फोलिक अम्ल आहे.
      अश्वगंधा: अश्वगंधाने गोनाडोट्रोपिन हॉर्मोन्स चे स्राव वाढून बीज परिपक्वतेस चालना मिळते व त्यामुळे वंध्यत्वावर मात करण्यात यश प्राप्त होते. अश्वगंधा सर्वश्रेष्ठ पौष्टिक आणि रोगप्रतिकार क्षमता वर्धकही आहे. हिच्या सेवनाने विद्युत-चुंबकीय लहरींमुळे होणारे दुष्परिणाम लक्षणीय मात्रेत कमी होतात व अपेक्षित परिणामात वृद्धी होते.
"फलमाह" च्या प्रत्येक विलेपित गोळीतील घटक व प्रमाण:
मंजिष्ठा (Rubia cordifolia), अक्कलकारा (Anacyclus pyrethrum), तगर (Valeriana wallichii), त्रिफला, शर्करा, वचा (Acorus calamus), हरिद्रा (Curcuma longa), दारुहरिद्रा (Berberis aristata), यष्टिमधु (Glycyrrhiza glabra), सारिवा (Hemidesmus indicus), अजमोदा (Apium graveolens), कटुका (Picrorrhiza kurroa), विदारीकंद (Pueraria tuberosa), हिंगु (Ferula narthex), अश्वगंधा (Withania somnifera) प्रत्येकी ३० मिलीग्रॅम; शतावरी (Asparagus racemosus) 60 mg; भावना द्रव्य - शतावरी (Asparagus racemosus) आवश्यकतेनुसार
सेवन विधी: (गर्भधारणा निश्चिती पर्यंत) २ - २ गोळ्या रोज दोन वेळा, घोटभर दुधाबरोबर, जेवणानंतर
गर्भधारणा निश्चिती नंतर प्रसूती पर्यंत: १ - १ गोळी रोज दोन वेळा, घोटभर दुधाबरोबर जेवणानंतर
प्रथमाह (विलेपित वटी) :
    मधुकं शाकबीजं च पयस्या सुरदारु च । . . . . अष्टाङ्गहृदय, शारीर स्थान, अध्याय २, श्लोक ५४
यष्टिमधु, शाकबीज, शतावरी व देवदार ह्या वनस्पतींचे संतुलित मिश्रण म्हणजेच "प्रथमाह". वास्तविक मूळ ग्रंथानुसार पयस्या म्हणजे क्षीरकाकोली वापरण्याचे विधान असले, तरी ही एक संदिग्ध वनस्पती आहे. त्यामुळे शास्त्रसंमत प्रातिनिधिक द्रव्य असलेल्या शतावरीचा वापर केला आहे.
    यष्टिमधु: गर्भधारणा होण्यापूर्वी स्त्रीबीज वाहिन्यांमधील श्लेष्मल अंतस्त्वचेची स्निग्धता संपन्न राहण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. गर्भधारणेच्या वेळी स्त्री-बीज व पुंबीजाचे मीलन बीजवाहिनीत होते. साधारणतः १० दिवसांनी हा फलित बीजकोष गर्भाशयात स्थानापन्न होतो. बीज वाहिनीतील स्निग्धता ह्या क्रियेसाठी आवश्यक असते. यष्टिमधु मधील ग्लाब्रीन व ग्लाब्रीडीन ह्या अल्कलॉइड मुळे इस्ट्रोजीनसदृश कार्य होते. बीजवाहिनी मधील श्लेष्मा व त्याचा स्निग्धपणा त्याने वाढतो. यष्टिमधु चे कार्य अशा प्रकारे गर्भस्थापनेच्या दृष्टीने उपयोगी होते अर्थात "बीजवाहिनी अंतर्गत गर्भधारणेची " (Ectopic pregnancy) शक्यता कमी होते.
     बीज दोष हा गुणसूत्रांमध्ये असतो व तो गर्भामध्ये येऊ शकतो. म्हणून गर्भधारणा होण्यापूर्वी बीजदोष निवारण करणे जरुरीचे आहे. यष्टिमधु मध्ये गुणसूत्रांमधील बीजदोष निर्मूलनाची क्षमता आहे. इथाइल मिथेन सल्फोनेट नामक विषारी द्रव्य पेशीतील डी. एन. ए. वर आघात करतात व त्याने बीजातील गुणसूत्र विकृत होतात. यष्टिमधु चा उपयोग ह्या विकृतीच्या निवारणासाठीही होतो.
     शाक बीज: हे बीज विविध प्रकारच्या १५ प्रथिनांनी संपन्न आहे. यकृताचे कार्य उत्तम राखण्याचे सामर्थ्यही ह्यात आहे. गर्भाशयातील अंतस्त्वचेची घनता कमी होणे हे वंध्यत्वाचे एक प्रमुख कारण आहे. ही घनता पूर्व स्थितीत आणण्याचे सामर्थ्य ह्यातील प्रथिनांमध्ये आहे. ज्यामुळे गर्भस्थापना होण्यास योग्य वातावरण निर्माण होते.
     शतावरी: गर्भाशयात झालेल्या शस्त्राघात जन्य गाठी (Surgical adhesions) आपल्या स्वगुणांनी नष्ट करण्याचे एकमेवाद्वितीय कार्य शतावरीने साध्य होते. त्यामुळे अर्थातच गर्भधारणेला अडथळा निर्माण करणारी एक आपत्ती नाहीशी होते. ह्याशिवाय शतावरी मुळे गर्भाशयातील अंतस्त्वचेचे पोषण उत्तम रीतीने होते व गर्भस्थापना होणे सहज सुलभ होते. सर्वांगीण मनोकायिक पोषण करणे हा तर शतावरीचा स्थायी भावच आहे.
       सुरदारु: पेशी चयापचय क्रियेत काही घातक परमाणु (Free radicals) तयार होतात. हे परमाणु गर्भाशयाच्या स्वास्थ्याला हानी पोचवतात. ह्या हानी पासून संरक्षण करण्याचे सामर्थ्य सुरदारुतील मटेरीसिनॉल, नॉरट्रकिलोजेनिन व डायबेंझिल-बुटायरो-लॅक्टोलिग्नान अशा तीन पेशीरक्षकांच्या सहाय्याने चुटकीसरशी साध्य होते.
"प्रथमाह"च्या प्रत्येक विलेपित गोळीतील घटक व प्रमाण
यष्टिमधु (Glycyrrhiza glabra), शाक बीज (Tectona grandis), शतावरी (Asparagus racemosus), सुरदारु (Cedrus deodara) प्रत्येकी १२५ मिलीग्राम
भावना द्रव्य: शतावरी (Asparagus racemosus) १२५ मिलीग्राम
सेवन विधी: २ - २ गोळ्या रोज दोन वेळा घोटभर दुधाबरोबर, जेवणापूर्वी
लेखक –
प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
लेखक –आयुर्वेद वाचस्पति
सहयोगी प्राध्यापक, पोदार वैद्यक महाविद्यालय व रुग्णालय, वरळी, मुंबई
भ्रमणध्वनी - +919819686299
ईमेल – subhashmarlewar@gmail.com
drjalukar@akshaypharma.com

Friday, December 4, 2015

वार्धक्य ,आज़ार व आरोग्य

वार्धक्य ,आज़ार व आरोग्य



लहानपन देगा देवा
मुंगीसाखरेचा रवा
वार्धक्य आले देवा
सोबती आयुर्वेद हवा...!!
लहानपणात मुलांचे लाड,आजारपने आई वडील प्रेमाने काढतात ,पन वार्धक्य आले की येनार्या आजाराला काढतांना मुले सोबत असो वा नसों पन आयुर्वेद नक्की च जवळ असावा... तो मित्र आहे ,सखा आहे...!!
४० - ५० शी नंतर वार्धक्यात आपन कधी पोहचलो हे लक्षातही येत नाही,आयुष्यभर जे कधीच आपलें नसते त्यासाटी दिन रात मेहनत करुन शरीर झिजवुन सुख सोयी जमवल्या पन ते करतांना वाढलेले वजन,रक्तदाब ,शुगर,तानतणाव हे ही जमवतो .. व आज़ार सुरु होतात.....
असे का होते बरे? मग मोठ्या डाँक्टरकडे आपन जातो तो औषधे लिहुन देतों व म्हनतो ही औषधे आता कायमस्वरुपी घ्या.....!! विचार करनारी गोष्ट आहे ... त्यावेळी वाटते... पन त्या विचाराला उत्तर हे आयुर्वेद हे मिळते...
स्वस्थस्य स्वास्थ रक्षणम्..!! मानसाला स्वस्थ कसे राहता येईल व त्याचे स्वास्थ्य कसे निरोगी ठेवता येईल तेच आयुष्याचा वेद आयुर्वेद सांगते . दिनचर्या ,रुतुचर्या,ह्याचे सुंदर वर्णन आयुर्वेदात केले आहे,सकाळीं लवकर उठुन मुखमार्जन , मलमुत्रविसर्जन केल्यानंतर १ ग्लास कोमट पाणी प्यावे.. तसेच तेल अभ्यंग ,स्नान केल्यानंतर प्राणाचा आयाम- प्राणायाम करावे.. त्यात अनुलोम विलोम ई करावे
न्याहारी मग ते सकाळी काहीही पन ते अन्न ताजे असने गरजेचे आहे,मग ते उकमा,पोहे, ई तसेच आहारात तेलकट,शिळे पदार्थ कटाक्षाने टाळावे कारन शिळे अन्न च मलबध्दतेसाठी कारणीभुत ठरते व परिनामी आजार उद्भवतात तसेच मीठ कमी असने नेहमी चांगलेच....!!
दुपारचे जेवन हे सुर्यमध्यावर गेल्यास होने गरजेचे आहे कारन सुर्याचा आपल्या जाठराग्नीवर फार परीनाम पडत असतो,सुर्योदयावेळेनुसार उठने तसेच सकाळच्या कफ वर्धक वातावरनात व्यायाम तसेच गरम पदार्थाचे सेवन महत्वाचे...हि सर्व प्रकिया हि कफनाशक असली पाहीजे तसेच दुपारी सुर्य मध्य असता पित्तकाळ सुरु होतो त्यामुळे जेवनही होने गरजेचे काळ १२-२
आहार - चपाती( गहु/ ज्वारी/ नाचनी/ बाजरी)
सर्व पालेभाज्या व कप भर ताक जेवल्यानंतर घ्यावे..तसेच जेवल्यानंतर ३० मि नंतर पाणी प्यावे ..
जेवल्यानंतर लगेच झोपु नये तर थोडे चालावे जेने करुन अण्न पचन चांगले होते.. व पाणी नेहमीच पिताना कोमट घ्यावे...!!
संध्याकाळी सुर्यास्तानंतर जेवन अल्प करुन म्हनजेच ७ -८ दरम्यान चपाती भाजी घ्यावे,उगाच फार उशीरा जेवने हे अपचनास कारन ठरते.. रात्री झाेपतांना १ कप भर दुध नियमाने घ्यावे...
असा आहार व विहार हा रुतुनुसार बदलतोही त्यामुळे योग्य आयुर्वेद तज्ञ कडुन मार्गदशन घ्यावे....
वार्धक्यात गुडघेदुखी ,कंबरदुखी व मनक्याचे आजार ,दमा,पोटाचे विकार हे सतत त्रास देत असतात त्यामुळे औषधि चिकित्सा व पंचकर्म चिकित्सा ही फार लाभदायक ठरते,पंचकर्म शरीर शुध्दी चिकिक्सेने शरीरातील वाढलेले आज़ार कमी होतात ,त्यात स्नेहन,स्वेदन म्हनजेच शरीराची औषधी तेलाने मालीश व औषधी द्रव्याची वाफ दिली जाते जेनेकरुन शरीरावरील सुज,वेदना कमी होतात तसेच वाढलेल्या दोशांना एकमार्ग मिळुन ते कोष्टात जमा होतात व वमन,विरेचन ,बस्ती ,शिरोधारा,नस्य ह्या पंचकर्म चिकित्सेने वाढलेल्या दोषांना शरीराबाहेर काढता येते ...
हि पंचकर्म चिकित्सा हि शरीरातील बारीक पेशी मधील Toxic (दुष्य ) बाहेर काढन्यास मदत करते जेनेकरुन गुडघे मनके ई मघील झिज असो वा पोटाचे विकार असो वा हाता पायाची सुजीत असो हि कमी होन्यास मदत होते...
ज्याप्रमाने रुतुनुसार आहार बदलतो त्याप्रमाने रुतुनुसार पंचकर्म करनेही चांगलेच..
पावसाळ्यात वाताचे आज़ार जास्त होतात त्यात गुडघे,मनक्याचे आज़ाराचे वेदना प्रबळ होतात त्यामुळे त्यात बस्ती चिकित्सा म्हनजेच औषधी तेल वा काढ्याचा (Enema)बस्ती घ्यावा हे प्रकर्षाने Nervous system चेतनासंस्थेवर काम करते ह्या सर्व नसा Neutrition आहार शोषनासाठी पक्वाशयात प्रविष्ट असतात ,झाडाची मुळें जसे पानी व इतर मुलद्व्य मुळातुन शोषतात त्याप्रमानेच ह्या नसाही पक्वाशयातुनच आहार शोषुन घेतात त्यामुळे ह्या नसांमध्ये वा पर्यायी हाडांमध्ये काही बिघाड झाल्यास तर त्याचे मुळ कारन हे पक्वाशयच असते म्हनजेच मल मुत्र विघटन वा अन्नपचन ह्यात बिघाड हा होतोच,त्सामुळे ह्या चेतना संस्थेचे आज़ार बरे करतांना पक्वाशयाचा विचार करने गरजेचे ठरते व गुदमार्गे दिलेल्या बस्ती मध्ये आजारानुसार औषधी तेल वा काढ़े वापरुन ते आज़ार काही दिवसातच बरे होतात.
तसेच हिवाळ्यात पित्ताचे आज़ार वाढतात त्यात अम्लपित्त,अंगावर खाज ई आज़ार हे स्नेहन,स्वेदन करुन औषधी तुप पिन्यास देवुन दोषांना एकत्रित करुन जुलाब एकाच दिवशी देवुन बाहेरसकाढले जातात.. ह्यात कुठलाही त्रास होत नाही
ह्यात एक गोष्टी लक्षात घेतली पाहीजे ती हि की,औशधी तुप जे पिन्यास दिले जाते ते शरीरातील सुक्ष्मातीसुक्ष्म पेशीपर्यत पोहचुन तेथील वाढीव दोशांना कोष्ठात म्हनजेच पोटात घेवुन येते व मग शरीरातुन ते जुलाबावाटे काढावे,ह्यात पुरवीं स्नेहन स्वेदन केल्याने शरीराला काही त्रास होत नाही परंतु वैद्याच्याच मार्गद्शनाने पंचकर्म करावे..
तसेच उन्हाळा पुरवी कफासाठी वमन म्हनजेच उल्टी देवुन कफ बाहेर काढला जातो हि प्रकिया विरेचनासारखी स्नेहन व स्वेदन
दिले जाते व नंतर वमन .. देतात...
तसेच रुतुवितरित आजारांनुसार कधीही पंचकर्म केले तर ते वैद्याच्या सल्यानुसार करावे....
जसी गाडीची सर्विसींग केल्यानंतर चांगले आँईल व पेट्रोल गरजेचे असते तसेच रसायन औषधे हि गरजेची असतात.. जेने करुन शरीराला बल,प्रतिकार शक्ती व अपुनर्भव चिकित्सा म्हनजेच तो आज़ार परत होवु नये हि चिकित्सा... पंचकर्मनंतर केली जाते....!!
वर्षातुन एकदा पंचकर्म केल्याने शरीर रोगमुक्त व त्याची प्रतिकार शक्ती नक्कीच वाढते व आज़ार होन्यापासुन आपन तो रोखु शकतो...!!
त्यामुळे वार्धक्य हो शाप नसुन आयुर्वेद संगे वरदान आहे..
आयुर्वेद सर्वासाठी....!!!
साईनाथ आयुर्वेद
ठाणे/ पुणे.
9821832578

Monday, November 30, 2015

"स्वानंदीच्या लेखणीतून..."

"स्वानंदीच्या लेखणीतून..."


"बरे झाले रिकामी भेटलीस."
देशपांडे काकू वैद्या स्वानंदीच्या केबिनमधे शिरत म्हणाल्या.
"ओह, sorry हं काकू; मी तुमच्या 'पुजेला' नाही येऊ शकले."
कोकिला व्रताच्या 'उद्यापनाला' जाऊ न शकल्याने संकोचून स्वानंदी म्हणाली.
"ठीक आहे, एका अर्थाने 'बरेच' झाले, व्रत करून माझ्यासारखी तूच आजारी पडली असतीस; तर मला औषध कोणी दिले असते."
काकू मोकळेपणाने बोलल्या.

काकुंचा हाच स्वभाव तिला आवडतो, चार दिवसापूर्वी त्या  'ह्याच' व्रतासाठी तिला बोलवायला आल्या होत्या; तेव्हा तिने pt. चे कारण दिले, तर म्हणाल्या होत्या,"तुम्हा आजकालच्या मुलींना व्रत- वैकल्याचा भारी 'कंटाळा'. वगरे वगरे...!"
आणि आज हे!
असे 'निरागस' त्याच वागू शकतात.

"कशी झाली पूजा?"- स्वानंदी मनगटावर हात ठेवत 'नाड़ी परिक्षण' करत म्हणाली.
बस.....

पुढची 15-20 मिनिटे त्या पूजा,कहाणी,आरती,प्रसाद.. मग होम, उद्यापन,पुरणाचे मांडे व खीरीचा साग्र संगीत 'नैवेद्य' ह्याबद्दलचे 'रसभरीत' वर्णन ऐकवत बसल्या.
"पुजेचे तीन दिवस उपवास असून,एवढी धावपळ करूनही कसे 'प्रसन्न' वाटायचे.
आणि काल उपवास सोडला आणि आज सकाळपासून डोके चढले.
अपचन,acidity,चक्कर, थकवा काही विचारू नकोस."
काकुंनी एका दमात आजार आणि आजाराचे कारण दोन्ही सांगून टाकले.

"काकू ,काल तुम्ही 'यज्ञ ' करताना तूप,कापूर, समिधा हळू हळू टाकून ,शेवटच्या आहुतिपर्यन्त 'अग्नि' तेवत ठेवला की, अग्नि प्रज्ज्वलित झाल्यावर एकदम सर्व आहुति टाकल्यात?"
स्वानंदीच्या प्रश्नाने काकू गोन्धळल्या.
"अगं एकदम टाकला तर अग्नि विझुन नाही का जाणार?"

"मग काकू, हीच गोष्ट तुमच्या पोटातल्या 'जाठराग्निला' देखील लागू होते.
तीन दिवस 'उपवास' म्हणजेच 'लंघन' करून तुम्ही पोटातील 'जाठराग्निचा यज्ञ' छान पेटवलात;
पण नैवेद्य रूपी समिधा 'एकदम' टाकून तो 'विझायला' मदतच केलीत.
तुमच्या कोकिला गौरीने सांगितले होते का, की मला पुरणाचे मांडे आणि खीर हवी?"

आता ही माझी कहाणी ऐका.....
1. जेवणापूर्वी आले ,लिम्बु ,सैंधव चावून खावे.
2. भूक 'लागल्यावरच' दोन घास भूक 'राहील' असे जेवावे.
3. दुपारचे जेवण 12 ला आणि रात्रीचे सुर्यास्तापूर्वी करावे.
4. दुपारी झोप 'वर्ज्य'.
5. रात्री शतपावली 'नेमाने'.
6. हलका व्यायाम, योगासने, प्राणायाम आणि क़पाल भाति रिकाम्या पोटी 'रोज'.
7.आहारात सुंठ,मीरे,पींपळी, हींग जीरे,सैंधव, लसुण ह्याचा पुरेसा वापर.
8.पुढील 5 दिवस आहाराचे प्रमाण क्रमाने वाढवणे.
9. जुना तांदूळ किंवा भाजलेल्या तांदुळाची पेज, मुगाचे कढण, साळीच्या लाह्यांची पेज, मऊ भात, मुगाची खिचड़ी आदि गोष्टी क्रमाने फ़ोडणी शिवाय व नंतर फोड़णी देवून खावे.
10. स्वतःच्या मना 'पूर्वी' वैद्यांचे म्हणणे ऐकावे.

ही साठा उत्तराची कहाणी दहा उत्तरी सुफ़ल संपूर्ण!!!"
तिने लिस्ट लिहून कागद काकुंच्या हातात सोपवला.

"बाई ग, त्यापेक्षा तू मला saline लावून 2-3 तास झोपवले असतेस, इतर डॉक्टरां सारखे!"
काकू कागद वाचून म्हणाल्या.

"त्याने तुमच्या पोटातील 'gas' वाढला असता आणि 'पायावरची सुजही'; शिवाय 'किडनी' मैडमचे काम वाढले असते."
हसत हसत स्वानंदी म्हणाली.

"हो ,पण तू ही कामच वाढवलेस, शिवाय पुढे श्रावणात उपवास आहेतच की अजून,आत्ताच जरा चांगले चुंगले खावून घेणार होते."
काकू हिरमुसुन म्हणाल्या.

"काकू मी तुमच्या 'पचन संस्थेचे 'काम 'कमी' केलेय,
आणि असेच नियम तुम्ही कोकिला गौरीसाठी करतच होता ना; तेच आता 'आत्म देवतेसाठी'करायचे!
'दाक्षायणीला सुद्धा दहा हजार वर्षे कोकिला रुपात राहिल्यावर पार्वतीचा जन्म निळाला' , मी तुम्हाला 5-6 दिवस सांगितले आहे फ़क्त."
स्वानंदी हसत म्हणाली.

"म्हणजे ,तू कहाणी वाचलीस तर,व्रत करणारेस वाटते." काकुंची कळी खुलली.
"हो काकू,पण व्रत स्वताच्या शरीरासाठी आयुर्वेदोक्त पद्धतीने!

"आणि हो श्रावण सुरु होण्यापूर्वी जसे 'देवघर' स्वच्छ कराल ,तसेच पंचकर्म विशेषतः 'बस्तीने'शरीर 'शुद्ध' करायला विसरु नका."

"हो ग बाई, आणि तुझ्याकडून आयुर्वेदोक्त उपवासाच्या पदार्थांची लिस्ट पण घेऊन जाईन!"
जाताना काकुंच्या चेहऱ्यावरचे 'हास्य' हीच खरी स्वानंदीची fees होती!
-
वैद्या सोनाली तन्मय गायकवाड़
आदित्य आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय
आडगाव, नाशिक 422003

Email- drsonali2014@gmail.com
ब्लॉग--
beliveindetox.wordpress.com

पुरुष वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

पुरुष वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून




पुरुष वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून
गर्भधारणेसाठी ऋतु – क्षेत्र – अम्बु – बीज हे चार घटक सुयोग्य स्थितीत असणे आवश्यक आहे. ऋतु म्हणजे योग्य काळ, क्षेत्र म्हणजे ठिकाण, अंबु म्हणजे आवश्यक असे सर्व हॉर्मोन्स व बीज म्हणजे सामर्थ्यवान पुरुष व स्त्रीबीज.
हे चार घटक सर्वदृष्टीने समृद्ध आणि सामर्थ्यवान होण्यासाठी गर्भधारणेपूर्वी पुरुष व स्त्री दोघांनी पंचकर्माने शरीरशुद्धी करावी असा शास्त्रादेश आहे. दैनंदिन चयापचयातून तसेच निरनिराळ्या विद्युतचुंबकीय लहरींपासून काही विषारी घटक सतत निर्माण होत असतात. त्यांना पेशी विघातक परमाणु (फ्री रॅडिकल्स) म्हणतात. पुरुष व स्त्रीबीजांवर तसेच अम्बु म्हणजे हॉर्मोन्सचे असंतुलन फ्री रॅडिकल्समुळे होऊन त्यांचे अनिष्ट परिणाम संपूर्ण प्रजनन यंत्रणेवर होतात. परिणामी त्यांचे प्राकृत कार्य आणि सामर्थ्य खालावते. मानसिक क्लेश, ताणतणाव, वाढते प्रदूषण, फास्ट फूड मधून सेवन केले जाणारे रासायनिक प्रिझर्व्हेटिव्हज किंवा रंग, वाढते वय अशा गोष्टींचा दुष्परिणाम देखील तितकाच महत्वाचा आहे. ह्या सर्व अनिष्ट गोष्टींचा प्रतिकार करून पुरुषबीज सामर्थ्य उत्तम ठेवणे हाच ह्या लेखाचा प्रमुख उद्देश आहे.
ऋतु – ऋतु म्हणजे काळ.
पूर्णषोडशवर्षा स्त्री पूर्णविंशेन सङ्गता शुद्धे गर्भाशये मार्गे रक्ते शुक्रेऽनिले हृदि ।। अ. हृदय, सूत्रस्थान १/८
सोळा वर्ष पूर्ण झालेली शुद्ध गर्भाशय असलेली स्त्री, जिचा अपत्यमार्ग, रक्त, शुक्रवायु, हृदयातील वायु अदूषित असेल व ती वीस वर्ष पूर्ण झालेल्या निरोगी पुरुषाबरोबर मैथुन करेल तिला उत्तम वीर्यवान संतती प्राप्त होते. ह्या श्लोकात पुरुषाच्या वयाचे वर्णन स्पष्ट आहे. अर्थात पुरूषबीज ह्या वयात उत्तम व स्वास्थ्यसंपन्न असते. ह्यालाच योग्य ऋतु समजावे. ह्यापेक्षा लहान वयात शुक्रबीज अविकसित असतात व वय जसजसे वाढत जाते तसतसे त्याची क्षमता कमी होऊ लागते.
क्षेत्र – शुक्रनिर्मिती आणि वहन करणारी संपूर्ण यंत्रणा म्हणजे क्षेत्र. शुद्ध शुक्र निर्मिती होण्यासाठी ही सर्व यंत्रणा सुस्थितीत आणि कार्यक्षम असणे जरुरीचे आहे. ही क्षेत्ररचना सकस राहण्यासाठी आहार, पंचकर्म चिकित्सा आणि औषधी चिकित्सा फलदायी ठरते. पुढे हा विषय विस्ताराने मांडला आहे.
अम्बु – ह्याठिकाणी शुक्राणुंसाठी खतपाणी म्हणजे अम्बु. बीजातून रोपटे व पुढे वृक्ष स्वरूप प्राप्त होण्यासाठी खतपाणी आवश्यक आहे. समृद्ध शुक्रधातुसाठी सुयोग्य हॉर्मोन्स (संप्रेरके) असा अर्थ येथे अभिप्रेत आहे. एफ. एस. एच.; एल, एच, टेस्टोस्टेरॉन ह्या संप्रेरकांचा असमतोल असल्यास औषधांच्या सहाय्याने सुधारता येतो.
बीज – बीज म्हणजे शुक्राणु. गर्भधारणा यशस्वी होण्यासाठी शुक्राणूंची संख्या किमान २० दशलक्ष असणे आवश्यक आहे. ह्यापैकी फक्त एकच शुक्राणु गर्भधारणा होण्यास पात्र ठरतो तरीदेखील ही संख्या कमी असून चालत नाही. ह्या शुक्राणूंना विशिष्ट गती असावी लागते. ह्या गतीला मोटिलिटी म्हणतात. हा शुक्राणु गर्भाशयात प्रवेश करून पुढे बीजवाहिनीच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचतो. एकूण शुक्राणूंपैकी कमीतकमी ३० % शुक्राणुंनी आपली विशिष्ट गती किमान एक तास टिकवून ठेवण्याची गरज असते.
       शुक्राणूंच्या रचनात्मक दोषांमुळे वंध्यत्व आणि बीजदोषजन्य विकृती उत्पन्न होऊ शकतात. ह्याला मॉर्फलॉजिकल दोष म्हणतात. ह्यात पेशीतील डी. एन. ए. ची स्थिती बिघडलेली असते. त्यामुळे बीजदोषजन्य अनुवांशिक व्याधी उत्पन्न होतात. ह्यांना म्युटेजेनिक डिसऑर्डर्स म्हणतात. पंचकर्म व विशिष्ट औषधोपचारांनी ह्यावर मात करता येऊ शकते. परंतु हा विषय मोठ्या संशोधनाचा आहे. सध्या फक्त शास्त्राधारित सूत्रांच्या आधारे गृहीतकांच्या (Hypothetical) स्वरुपात हा विषय मांडता येतो.
      प्राकृत शुक्रधातूचे मापन किमान २ मिली असावे. त्यात फ्रुक्टोजची मात्रा ३ मिलीग्राम प्रति मिली असावी. वीर्य द्रावित होण्याचा काळ २० मिनिटांपेक्षा कमी असू नये. ह्या सर्व गोष्टी वीर्य तपासणी करून समजू शकतात. काही चिह्ने व रुग्ण सांगतो त्या लक्षणांद्वारे इलाज करणे वंध्यत्वाच्या दृष्टीने आवश्यक ठरते. स्वप्नावस्था, शीघ्रपतन, मैथुनेच्छा न होणे, लिंगाला आवश्यक असलेला ताठरपणा प्राप्त न होणे अशा ह्या समस्या आहेत.
वरील सर्व लक्षणांची सविस्तर माहिती घेऊन आवश्यक त्या दोषावर सुयोग्य उपचार करून पुरुष वंध्यत्वाचा इलाज करता येतो.
      वृषणकोषात (Scrotum) दोन वृषणग्रंथी (Testicles) असतात. ह्या ग्रंथींमध्ये शुक्राणूंची उत्पत्ती होते. पुढे सेमिनल व्हेसिकल्स नावाच्या कोषिका असतात, त्यातून वीर्याची उत्पत्ती होते. पौरुष ग्रंथींमधून (Prostate gland) चिकटसर द्रव ह्यात मिसळला जाऊन शुक्र धातु समृद्ध होतो. मेंदूतील विशिष्ट यंत्रणा उत्तेजित झाल्याने शुक्रवाहिन्यांच्या मार्गाने शुक्राणु व वीर्याचे हे मिश्रण शिस्नातून बाहेर टाकले जाते.
      पुरुष वंध्यत्व चिकित्सा करतांना सर्वप्रथम वीर्य तपासणी केली जाते. ह्या तपासणीत शुक्राणूंची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आल्यावर त्याची चिकित्सा करावी लागते. ह्यासाठी अश्वगंधा, शतावरी, कवचबीज, गोक्षुर, तालिमखाना, विदारीकंद सारख्या वनस्पतींचा उपयोग होतो. ह्या वनस्पतीच्या सेवनाने शुक्राणूंची संख्या वाढते खरी परंतु हे शुक्राणु वीर्य स्खलनाच्या वेळी पुरेशा प्रमाणात बाहेर पडत नाहीत असे अनेक वेळा लक्षात येते. त्याची कारणे समजून उपचार करणे आवश्यक आहे.
      शुक्राणूंची उत्पत्ती झाल्यावर शुक्रवाहिन्यांच्या मार्गाने वीर्य शिस्नापर्यंत येते. ह्या मार्गात काही अडथळा आला तर शुक्राणूंची कमतरता दिसून येते. आतड्यातील अपान वायु, मळाचे खडे हे त्या भागातील रक्तवाहिन्यांवर व शुक्रवाहिन्यांवर दाब निर्माण करू शकतात. हा दाब नाहीसा करण्यासाठी बस्ति चिकित्सा महत्वाची ठरते. बस्ति चिकित्सेने अपानाचे कार्यही सुरळीत होते.
अपानोऽपानगः श्रोणिवस्तिमेढ्रोरुगोचरः । शुक्रार्तवशकृन्मूत्रगर्भनिष्क्रमणक्रियः ।। अष्टांगहृदय, सूत्रस्थान १२/९)
अपानवायु गुदस्थानी रहात असून कटि, शिस्न व मांड्या ह्या ठिकाणी संचार करतो. तो शुक्र, आर्तव, मल, मूत्र व गर्भ ह्यांना योग्य काळी शरीराबाहेर काढण्याचे कार्य करतो. त्यामुळे शुक्र धातूची चिकित्सा करतांना अपानवायूचा विचार महत्वाचा आहे.
अपानवायु कशाने बिघडतो ?
अपानो रूक्षगुर्वन्नवेगाघातातिवाहनैः । यानयानासनस्थानचङ्क्रमैश्चातिसेवितैः ।।
कुपितः कुरुते रोगान्कृच्छ्रान्पक्वाशयाश्रयान् । मूत्रशुक्रप्रदोषार्शोगुदभ्रंशादिकान्बहून् ।। अ. हृदय, निदानस्थान १६/२७-२८
   रूक्ष व गुरु अन्न सेवन, वेगांचा अवरोध, अतिशय कुंथणे, गाडीघोड्यावरून प्रवास करणे, फक्त बैठे काम करणे, सतत उभे राहणे, बेसुमार चालणे अशा कारणांमुळे अपानवायु कुपित होतो. ह्याने पक्वाशयाच्या आश्रयाने होणारे मूत्राघात, प्रमेह, शुक्रदोष, मूळव्याध, गुदभ्रंश सारखे कष्टसाध्य व्याधी उत्पन्न होतात.
     ग्रंथात वर्णन केलेल्या ह्या कारणांव्यतिरिक्त काळानुसार इतर कारणांचाही विचार करणे आवश्यक आहे. जसे – अति प्रमाणात मैद्याचे पदार्थ सेवन करणे, कार्बोनेटेड शीतपेयांचे बेसुमार सेवन, कंबरेचा पट्टा (बेल्ट) फार घट्ट बांधणे, अतिप्रमाणात मांसाहार करणे, घाई घाईने (न चावता) जेवण करणे, मोड आलेल्या कडधान्यांचे अधिक सेवन करणे, अकाली झोप घेणे व रात्र-रात्र न झोपणे (शिफ्ट ड्युटीज, रात्रीचे ड्रायव्हिंग मुळे) अशी अनेक कारणे अपानवायु बिघडवतात. मैद्यामुळे पाचक स्रावांना पचनयंत्रणेत येण्यास अडथळा होतो, शीतपेयांमुळे पाचकस्रावांची शक्ती कमी होते, कंबरेचा पट्टा कसून बांधण्यामुळे आतड्यांची चलनवलन गती मंदावते, मांसाहार पचण्यास जड असल्याने पाचकस्रावांना पचनास पुरेसा वाव मिळत नाही, घाईने जेवतांना अन्नाबरोबर भरपूर प्रमाणात हवा अन्नमार्गात घेतली जाते, कडधान्य पचनयंत्रणेत जाऊन आंबतात व फसफसतात, जागरणाने शरीराचे बायोलोजिकल क्लॉक बिघडते. म्हणून अपानाचे संतुलन राखण्यासाठी ह्या सर्व गोष्टींचा विचारपूर्वक वापर करावा, कोणत्याही प्रकारचा अतिरेक होत नाही ह्याची खात्री करावी.
शुक्रावृतेऽति-वेगो वा न वा निष्फलता ऽपि वा ॥ अ. हृदय, निदानस्थान १६/३८
   अपानवायुचे शुक्रधातुला आवरण झाल्यास शुक्राचा अतिशय वेग येतो किंवा अजिबात येत नाही, त्याने गर्भोत्पत्ती होत नाही.
कुपित वायूची लक्षणे . . .
स्रंसव्यासव्यधस्वाप-साद-रुक्-तोद-भेदनम् ॥ सङ्गाङ्ग-भङ्ग-संकोच-वर्त-हर्षण-तर्षणम् ।
कम्प-पारुष्य-सौषिर्य-शोष-स्पन्दन-वेष्टनम् ॥ स्तम्भः कषायरसता वर्णःश्यावोsरुणोsपि वा ।
. . . . अष्टांगहृदय, सूत्रस्थान १२/४९
   स्रंस म्हणजे अवयव आपल्या नैसर्गिक स्थानापासून खाली सरकणे, व्यास म्हणजे आकारमान वाढणे, व्यध – इजा होणे, स्वाप – निश्चल होणे, रुक् – रुजा किंवा वेदना होणे, तोद – टोचल्याप्रमाणे दुखणे, भेदन – आरपार छिद्र होणे, संग होणे म्हणजे दोष साठणे, अंगभंग – विकलांगत्व येणे, संकोच – आकुंचन पावणे, वर्त – उलटणे किंवा चुकीच्या दिशेला वळणे, हर्षण – रोमांच, तर्षण – तहान लागणे, कम्प – थरथरणे, पारुष्य – कर्कशपणा, सौषिर्य – भेगा पडणे, शोष – कोरडेपणा, स्पंदन – केंद्रित स्वरूपाच्या हालचाली होणे, वेष्टन – लेप केल्याप्रमाणे संवेदना होणे, स्तम्भ – निश्चल होणे, कषायरसता – तोंडास तुरट चव येणे, वर्णःश्यावोsरुणोsपि – काळपट किंवा सूर्याप्रमाणे तांबडा वर्ण येणे.
    पुरुष वन्ध्यतेबद्दल विचार करतांना ह्या प्रत्येक संज्ञेचा सखोल विचार अपानवायुच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. त्याकरिता पुरुष लैंगिक अवयव व पुरुषबीज ह्यातील दोषांसाठी बस्ति चिकित्सेचा नितांत उपयोग होतो हे ध्यानात ठेवावे.
    अपानवायुचा संबंध मानसिक स्वास्थ्याशी निगडीत आहे. “भीतीने गर्भगळीत होणे” ही जुनी म्हण आहे. मानसिक संतुलन बरोबर असेल तर गर्भ स्थिर राहतो व बिघडल्यास तो गर्भपात घडवतो. स्वास्थ्यपूर्ण गर्भाधान होण्यासाठी पुरुषांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे महत्वाचे आहे. भीती, चिंता, क्रोध, मानसिक दडपण असतांना पुरुषांचे लैंगिक अवयव कार्यक्षम राहू शकत नाहीत. अशा अवस्थेत निरोगी व सत्ववान गर्भाधान होणे शक्य नसते. औषधी चिकित्सा करतेवेळी हा मुद्दाही लक्षात घेणे गरजेचे आहे.
    थोडक्यात पंचकर्मांपैकी किमान विरेचन, नस्य आणि बस्ति चिकित्सेचा प्रयोग करावा. बीजदोष नाहीसे करण्यासाठी, बीज सामर्थ्यवान होण्यासाठी व उत्तम गर्भधारणा होण्यासाठी ह्या क्रिया आवश्यक आहेत.
आता आहाराबद्दल बघूया
सौम्यं स्निग्धं गुरु शुक्लं मधुगन्धि मधुरं पिच्छिलं बहु बहलं घृततैलक्षौद्रान्यतमवर्णं च शुक्रं गर्भाधानयोग्यं भवति॥ . . . . अष्टाङ्गसङ्ग्रहः, शारीरं स्थानम् १ / ४
शुक्र धातूचे वर्णन – सौम्य, स्निग्ध, शुक्ल वर्ण, मधाप्रमाणे गंध असणारे, मधुर, पिच्छिल, बहु, बहल, घृत, तैल, क्षौद्र (मधाप्रमाणे) दिसणारे असे शुक्र गर्भाधानास योग्य असते. आयुर्वेदाच्या “सामान्य – विशेष” सिद्धांतानुसार शुक्रधातुच्या समान असणारे गुण त्याच्या पोषणास उपयुक्त ठरतात. विरुद्ध गुणांच्या पदार्थ सेवनाने शुक्रक्षय होतो. आहारातील घटकांचा विचार केल्यास दूध, तूप, मधुर रसाचे पदार्थ हे शुक्र धातुच्या पोषणासाठी लाभदायक होतात.
सौम्य – सोम म्हणजे चंद्र ही ह्या शब्दची व्युत्पत्ती. चंद्राप्रमाणे शीतल (ज्यामध्ये आग्नेय गुणाचा अभाव आहे). शीतल गुणांमुळे शुक्रधातूची वाढ होणे अभिप्रेत आहे. वृषणकोशाची निर्मिती करतांना निसर्गाने ह्याला शरीराबाहेर टांगलेल्या अशा स्थितीत रचले ज्यामुळे त्याला हवेशीर वातावरण मिळेल व उष्णता किंवा ऊब तुलनेने कमी मिळेल. मानवी शरीराचे सर्वसाधारण तापमान ३७० सेंटीग्रेड किंवा ९८.६०० फॅरनहाईट्स इतके असते. एवढ्या तापमानात शुक्रबीज जास्त काळ टिकत नाहीत. ४० सेंटीग्रेड इतक्या थंड तापमानात ठेवल्यास शुक्रबीज टिकतात परंतु त्यांचे चलनवलन स्तब्ध होते. २०० सेंटिग्रेड तापमानात शुक्रबीज सर्वात जास्त काळ टिकतात व चलनवलनही अबाधित राहते. म्हणून शुक्रधातुच्या रक्षणासाठी व वाढीसाठी तापमान कमी असणे आवश्यक आहे.
स्निग्ध: शुक्रधातु व वीर्य ह्या दोन गोष्टी निराळ्या आहेत. शुक्रधातु म्हणजे प्रत्यक्ष शुक्रबीज तर वीर्य म्हणजे ज्या द्रवामध्ये ह्या बीजांचे पोषण होते तो द्रव. स्निग्धता असल्याने शुक्रबीजांचे सुयोग्य पोषण होते. रुक्षतेमुळे बीजांचे कुपोषण होण्याची शक्यता असते. शुक्रधातूचे वहन, चलनवलन उत्तम राहण्यासाठी ह्या ‘स्निग्ध’ गुणाचा उपयोग होतो.
गुरु : गुरु म्हणजे जड. पंचमहाभूतांतील पृथ्वी आणि जल महाभुते फक्त गुरु आहेत व ह्यांच्या संयोगाने मधुर रस तयार होतो. शुक्रधातु मधुर असल्याने त्यात स्वाभाविकपणे पृथ्वी आणि जल महाभूतांचे प्राधान्य असते. मधुर रसाने त्याची वृद्धी होते असा अर्थ ध्यानात येतो. पण प्रत्यक्षात मात्र मधुमेही रुग्णांमध्ये शुक्रक्षीणता आढळते हे कसे? हे कोडे उलगडण्यासाठी शारीरक्रियेचा पाया लक्षात घेणे आवश्यक आहे. मधुमेहात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्याचे परिणमन धातु पोषणासाठी होत नाही. इन्सुलिनला धात्वग्नि समजावे. म्हणजे ह्याठिकाणी धात्वग्नि दुर्बल झाल्याने रस-रक्तातील पोषक घटक पुढील धातूंपर्यंत पोचत नाहीत अर्थात त्यामुळे शुक्र दौर्बल्य निर्माण होते.
शुक्लवर्ण : शुक्रधातु उत्तम असेल तर त्याचा वर्ण शुक्ल म्हणजे स्वच्छ पांढरा असतो. इतर कोणत्याही धातूच्या मलीनतेमुळे काही दोष निर्माण झाला तर वर्ण बदलतो. कफाचा वर्ण शुक्ल आहे व शुक्रधातुशी त्याचे साधर्म्य आहे. सामान्यतः कफ वर्धक आहार विहाराने शुक्रवृद्धी होते.
सर्वसामान्य लैंगिक समस्यांबद्दल काही खुलासा
स्वप्नावस्था – झोपेत नकळतपणे वीर्यस्खलन होणे म्हणजे स्वप्नावस्था. “मनी वसे ते स्वप्नी दिसे” ही म्हण ह्या समस्येशी निगडीत आहे. मनात सतत लैंगिक विचार असले तर त्याची परिणीती स्वप्नातही होते. मेंदूतील हायपोथॅलॅमसद्वारा संप्रेरकांमध्ये तसे बदल होतात आणि स्वप्नावस्था निर्माण होते.
हस्तमैथुन – हस्तमैथुन म्हणजे मैथुनावस्थेचे काल्पनिक चित्र रचून हाताने शिस्नपीडन करून वीर्यपात घडविणे. सातत्याने लैंगिक विचार केल्याने मनावर कामवेग आरूढ होतो व त्यातून ही क्रिया करण्याची इच्छा निर्माण होते. हस्तमैथुन केल्याने लिंग लहान होते, वीर्य पातळ होते, वंध्यत्व येते असे अनेक गैरसमज समाजात चर्चिले जातात. हे निव्वळ गैरसमज असल्याने मनात कोणतीही अशी भीती बाळगू नये. परंतु “अति सर्वत्र वर्जयेत्” हा नियम लक्षात ठेवावा.
    स्वप्नावस्था किंवा हस्तमैथुन ह्या दोन्ही अवस्था मानसिक दोषांमुळे व चुकीच्या आहारामुळे उत्पन्न होऊ शकतात. रज व तम ह्या दोन प्रकारच्या मानसिक दोषांच्या प्रभावाने, त्याचबरोबर मद्यपान, अमलीपदार्थ सेवन, अति मांसाहार, तामसी अन्न अशा कारणांमुळे ह्या अवस्था निर्माण होतात. सात्विक चिंतन, मनन, अभ्यास, वाचन, सुविचार अशा साध्या सोप्या गोष्टींचा अंगिकार व सुयोग्य संतुलित आहार केल्याने ह्या समस्यांपासून चार हात लांब राहणे शक्य आहे.
वीर्य पातळ होणे – हस्तमैथुन किंवा स्वप्नावस्था दीर्घकाळ राहिल्याने “वीर्य पातळ झाले” असी तक्रार अनेक रुग्ण करतात. हे म्हणणे चुकीचे आहे. अशा कारणांमुळे वीर्य पातळ होत नाही किंवा वंध्यत्व येत नाही. हा गैरसमज डोक्यातून काढून टाकावा. ह्यामुळे मानसिक असंतुलन मात्र वाढते आणि “आपण काहीतरी चुकीच्या कृत्यामुळे मोठ्या रोगाला बळी पडलो” अशी भीती वंध्यत्वाला कारणीभूत होते. वीर्य पातळ असो की घट्ट, त्यातील शुक्रबीजांची संख्या, चलनवळण गती, फ्रुक्टोजची पातळी हीच प्रजननक्षमतेला जबाबदार असते.
लिंग उत्थान समस्या – कुपित अपानवायु, मानसिक क्लेश आणि अपुरा रक्तसंचार ही तीन प्रमुख कारणे लिंग उत्थान समस्येशी निगडीत आहेत. नळाला रबरी पाईप जोडून पाणी जोरात सुरु केल्यावर पाईप ताठ होतो. लिंग उत्थान क्रिया नेमकी अशीच होते. पाईप वर बाहेरून दाब पडला किंवा त्यातील रक्त संचारात काही अडथळा आला तर रक्तसंचार खंडित होतो व उत्थान क्रिया बंद पडते किंवा कमी होते. आतड्यांमध्ये माळाचे खडे किंवा गॅस भरल्यामुळे शिस्नाच्या खालच्या बाजूला असलेल्या रक्तवाहिन्यांवर दाब पडतो व रक्तसंचार मंदावतो. ३० एम.एम.एच.जी. एवढा रक्तदाब लिंग सुप्तावस्थेत असतांना राहतो. लिंग पीडनाने हा दाब ९० ते १०० एम.एम.एच.जी. एवढा वाढतो. उत्तेजक शब्द, स्पर्श, रुप, रस व गंध अशा कारणांमुळे केंद्रीय मज्जा यंत्रणा उत्तेजित होऊन हा रक्तसंचार वाढविते.
     मानसिक क्लेशनिवारक औषधे, बस्ति चिकित्सा, रक्तसंचार संतुलित करणारी औषधे योग्य सल्ल्याने घेतल्यावर उत्थान क्रिया सुरळीत होऊन उत्थान प्राकृत होते. ह्यात वयाची मर्यादाही महत्वाची आहे. तरुण वयात ज्याप्रकारे उत्थान होते तेढ्या प्रमाणात उत्थान होण्याची अपेक्षा वय वाढल्यानंतर करणे नक्कीच चुकीचे आहे. मधुमेही, स्थौल्य व उच्च रक्तदाबाचे रुग्ण ह्यांच्या समस्या निराळ्या असतात. प्रकृती, आहार, वय, रोगावस्था अशा गोष्टींचा विचार करून चिकित्सा करावी लागते.
प्रजांकुर व अश्वमाह – शुक्रबीज निर्मिती, स्वास्थ्य व गर्भस्थापनेसाठी दोन परिपूर्ण पाठ
गेल्या २५ वर्षांपासून अक्षय उद्योग समूह आयुर्वेद व आरोग्य क्षेत्रात विक्रमी वाटचाल करीत आहे. वनौषधींची लागवड, आयुर्वेदीय औषधांची निर्मिती, विपणन, आरोग्यविषयक पुस्तकांचे प्रकाशन, संशोधन व विकास अशा अनेक लोकोत्तर कार्यात मनाचे स्थान मिळविले आहे. वैद्यकीय, औषधनिर्मिती शास्त्र, कायदा, अर्थकारण अशा विविध क्षेत्रातील व्यासंगी तज्ञ ह्या उपक्रमात सहभागी आहेत.
     पुरुष वंध्यत्व निवारणार्थ विविध शारीरिक व मानसिक भावांचा विचार करीत, औषधी घटकांचा सखोल अभ्यास करून पुरुषबीज समृद्धीसाठी अक्षय उद्योग समूहाने ‘प्रजांकुर नस्य’ व ‘अश्वमाह’ नावाची दोन अभिनव उत्पादने सादर केली आहेत. ह्यातील प्रत्येक औषधी द्रव्याच्या कार्मुकतेबद्दल आधुनिक वैद्यक शास्त्रात उपलब्ध झालेल्या संशोधनाचे सारांश स्वरुपात संदर्भ देऊन विषयाला परिपूर्णता दिली आहे.
प्रजांकुर नस्य चिकित्सा - विश्लेषण:
      मानवी शरीरात टेस्टोस्टेरॉन नामक संप्रेरक (हॉर्मोन) उत्पन्न होते. हे मुख्यतः वृषणकोषातून व अल्प प्रमाणात स्त्रियांच्या बीजकोशातून स्रावित होते. थोड्या प्रमाणात अॅड्रिनल ग्रंथीमधूनही ह्याची निर्मिती होते. हे एक धातुपोषक असे संप्रेरक आहे.
पुरुषांमध्ये प्रजनन यंत्रणा, वृषणग्रंथी, पौरुष ग्रंथी, मांसपोषण, अस्थिपोषण, जांघेतील ब खाकेतील केस, दाढी-मिशा ह्या सर्व बदलांमध्ये टेस्टोस्टेरॉन महत्वाची भूमिका बजावते. ह्याशिवाय अस्थिधातूचा ठिसूळपणा (ऑस्टिओपोरोसिस) काबूत ठेवण्यास हे हॉर्मोन समर्थ आहे.
     पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण स्त्रियांपेक्षा ७ ते ८ पट अधिक असते. पुरुषांमध्ये चयापचयात त्याचा अधिक वापर होत असल्याने निर्मितीची क्षमता सुमारे २० पट अधिक अशी निसर्गाने प्रदान केली आहे. ह्याची निर्मिती पियुशिका (पिट्युटरी) ग्रंथीच्या अधिपत्याखाली होते. ह्यातून फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन (FSH) व ल्युटिनायझिंग हॉर्मोन (LH) अशी दोन संप्रेरके उत्पन्न होतात. ल्युटिनायझिंग हॉर्मोनमुळे टेस्टोस्टेरॉन निर्मितीस प्रेरणा मिळते तर दोहोंच्या एकत्रित प्रभावाने शुक्रबीज निर्मिती होते.
      पुरुष वंध्यत्वाची चिकित्सा करतांना पियुशिका ग्रंथी आणि वृषणग्रंथी अशा दोन्ही स्तरांवर विचार करणे आवश्यक आहे. वृषणग्रंथी दोषांमध्ये गालगुंड (Mumps), व्हेरिकोसील, अनडिसेंडेड टेस्टीज, वृषणग्रंथी शोथ, हायड्रोसील, इपिडायडेमिस (शुक्रवहन नलिका) शोथ अशा विकारांचा समावेश होतो. त्यानुसार त्या त्या विकाराची चिकित्सा करावी लागते. पियुशिका ग्रंथीमध्ये दोष असेल तर त्याची चिकित्सा ‘नस्य’ रूपाने करता येते. रुग्णाच्या रक्ततपासणीतून टेस्टोस्टेरॉन मापन करता येते. ह्याची किमान पातळी ३०० ते १००० नॅनोग्राम प्रति डेसिलिटर एवढी असणे आवश्यक आहे. ही पातळी कमी असल्याचे आढळले तर पियुशिका ग्रंथीच्या चाचण्या करणे आवश्यक ठरते. ह्यातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे पियुशिका ग्रंथीच्या प्रभावाखाली सर्व प्रजनन यंत्रणा केंद्रित असते. म्हणूनच आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून नस्याचा उपयोग प्रजनन यंत्रणेवर हमखास लाभदायक ठरेल असा निष्कर्ष काढता येतो.
      आधुनिक वैद्यक शास्त्रात टेस्टोस्टेरॉनची जेल स्वरुपात नासामार्गे चिकित्सालयीन चाचणी (Clinical Trial) घेण्यात आली. ह्या चाचणीत ३०६ रुग्णांवर ह्याचा प्रयोग केला. ३०० नॅनोग्राम प्रति डेसिलिटरपेक्षा कमी असलेल्या रुग्णांवर ३ महिने रोज २ वेळा हे द्रव्य नस्य स्वरुपात प्रविष्ट करून त्यांच्या टेस्टोस्टेरॉन पातळीचे मापन केले असता ९०% रुग्णांची टेस्टोस्टेरॉन पातळी विहित प्रमाणात वाढली. ह्यावरून गर्भस्थापनेत नस्याचे महत्व सिद्ध होते.
       वंध्यत्व व गर्भस्थापनेत नस्याची अशी उपयुक्तता आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वी जाणली व उपयुक्त वनस्पतींचे पाठ ग्रंथात विषद केले आहेत. त्यांना नव्याने अभ्यासून व शास्त्राच्या चौकटीत बसवून “प्रजांकुर नस्य” म्हणून अक्षय उद्योग समूहाने सादर केले आहे.
     चरक संहिता ह्या आद्य ग्रंथात महर्षी चरकाचार्यांनी काही विशिष्ट वनस्पतींचे वर्गीकरण गर्भस्थापक औषधी म्हणून केले आहे. ह्याचे समर्थन कश्यप संहिता, सुश्रुत संहिता अशा ग्रंथातही नमूद आहे. औषधी गर्भसंस्कारांचा आधार ग्रंथ “अष्टांगहृदय” ह्यामध्ये महर्षी वाग्भट ह्यांनी देखील त्याचे समर्थन करून औषध सेवनाचे विविध मार्ग व स्वरूप सांगितले आहे.
ऐन्द्रीब्राह्मीशतवीर्यासहस्रवीर्याsमोघाsव्यथाशिवाsरिष्टावाट्यपुष्पीविष्वक्सेनकान्ता इति दाशेमानि प्रजास्थापनानि भवन्ति l . . . . . . . चरक, सूत्रस्थान ४/१८ (४९)
लक्ष्मणादिनस्यदानं गर्भस्थापनार्थं, स्थितगर्भायाश्चमासत्रयाल्पान्तरे पुत्रापत्यजननार्थं नस्यदानमिति ll . . . . . . . सुश्रुत, शारीर २-३२
चरक संहिता वर्णित वनस्पतींचा सुयोग्य वापर करून अक्षय फार्मा रेमेडीजने सिद्ध घृत स्वरुपात “प्रजांकुर” नावाने सादर केले आहे. ह्याचा वापर नस्य स्वरुपात गर्भधारणेच्या संकल्पापासून गर्भधारणा निश्चिती पर्यंत करावयाचा आहे.
नस्याचे लाभ
ऐन्द्रीब्राह्मीशतवीर्यासहस्रवीर्याऽमोघाऽव्यथाशिवाऽरिष्टावाट्यपुष्पीविष्वक्सेनकान्ता इति दशेमानि प्रजास्थापनानि भवन्ति ।। . . . . सूत्रस्थान चरक ४/१८ (४९)
ततः प्रजास्थापनाख्या दशौषधीः शिरसा दक्षिणेन च पाणिना धारयेत्। एताभिश्च सिद्धं पयो घृतं वा पिबेत्। . . . . . अष्टांगसंग्रह शारीर १ – ६२
    “पिण्यासाठी व शिरोभागी धारण करण्यासाठी” सदर पाठाचा वापर करावा असा शास्त्रादेश आहे. शिरोभागी धारण करणे म्हणजेच ‘नस्य स्वरुपात वापर करणे’ असा अर्थ येथे शास्त्रकारांना अभिप्रेत आहे. “नासाहि शिरसो द्वारं” ह्या प्रस्थापित संकल्पनेनुसार व आधुनिक वैद्यकानुसारही नस्य हे प्रजनन संस्थेवर उत्तम कार्य करते. म्हणून ‘प्रजांकुर घृत’ नस्य रूपानेही प्रभावी ठरते. शास्त्राधार व आप्तवचन ह्या दोन्ही दृष्टिकोनातून ह्याचा वापर नस्य स्वरुपात करणे योग्यच आहे. काही द्रव्यांचे शोषण नाकाच्या मार्गाने त्वरित होते. हीच द्रव्ये पोटात घेतल्याने त्यावर अनेक पाचक स्रावांची क्रिया घडते व ‘ब्लड ब्रेन बॅरियर’ यंत्रणेमुळे कार्यकारी घटकांचे शोषण शिरोभागात होण्यास अडथळे निर्माण होतात. नाकाच्या श्लेष्मल स्तरातून ही द्रव्ये मेंदूच्या संपर्कात येतात व रसरक्तातही त्यांचे शोषण त्वरित होते. सुमारे १५ ते ३० मिनिटांत नाकातून प्रविष्ट केलेले द्रव्य रक्तसंवहनात पसरते असे सिद्ध झाले आहे. इंजेक्शन द्वारा दिल्या गेलेल्या औषधाइतक्याच कमी वेळात ह्याचा परिणाम होतो असे संदर्भही मिळतात.
घृत हेच माध्यम का ?
      नस्य द्रव्यांमध्ये चूर्ण वापरल्यास नाकाच्या श्लेष्मल त्वचेत व्यवस्थितपणे पसरले जात नाही म्हणून नस्य द्रव्य द्रव स्वरुपात असावे. द्रव पदार्थांमध्ये जल आणि स्नेह असे दोन मुख्य प्रकार आहेत. त्यापैकी स्नेह (स्निग्ध द्रव्य) हे स्वभावतः मध्यवर्ती मज्जासंस्थेला सात्म्य आहे. आयुर्वेदानुसार घृत, तैल, वसा, मज्जा हे ४ स्निग्ध पदार्थ आहेत. ह्यापैकी ‘सामान्य-विशेष’ सिद्धांतानुसार ‘मज्जा’ हा स्निग्ध पदार्थ मध्यवर्ती मज्जासंस्थेला (CNS) नक्कीच अधिक पोषक ठरेल ह्यात शंका नाही. परंतु उपलब्धी, प्राणिज स्रोत व मनुष्याच्या मानसिकतेचा विचार करून “घृत” हेच माध्यम वापरणे योग्य ठरते.
प्रत्येक १० ग्रॅम प्रजांकुर घृतामधील घटकद्रव्ये व प्रमाण: 
ऐन्द्री (Citrullus colocynthis), दुर्वा (Cynodon dactylon), अमोघा (Sterospermum suaveolens), विश्वक्सेना (Callicarpa macrophylla), अव्यथा (Hibiscus mutabilis), शिवा (Terminalia chubula), ब्राह्मी (Bacopa monnieri), वाट्यपुष्पी (Sida cordifolia), शतवीर्या (Asparagus racemosus), बहुपाद (Ficus benghalensis) प्रत्येकी २५० मिलिग्रॅम; गो घृत १० ग्रॅम; गो दुग्ध ४० ग्रॅम
      वापरण्याची पद्धत (पुरुष व स्त्रियांसाठी) : प्रथम बाटली गरम पाण्यात ठेऊन प्रजांकुर (घृत) पातळ करावे. आडवे झोपून ६ - ६ थेंब दोन्ही नाकपुड्यांत पहाटे सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयाच्या वेळी टाकावे. २ - ३ मिनिटे तसेच पडून राहावे. गर्भधारणेच्या संकल्पापासून गर्भनिश्चिती पर्यंत हे नस्य करावे.
अश्वमाह वटी – चिकित्सा विश्लेषण :
       "अश्वमाह" हे सात औषधांचे सुरेख मिश्रण आहे. बऱ्याच शुक्रवर्धक व शुक्रस्तंभक औषधी पाठांचे वर्णन करतांना 'अश्व' हा शब्द 'शक्तीच्या संदर्भात' वापरला असतो किंवा त्या औषधाच्या माहिती पत्रकात चक्क घोड्याचे चित्र असते. "अश्वमाह" मध्ये "अश्वगंधा" ही प्रधान व अत्यंत गुणकारी वनस्पती अग्रक्रमांकाने वापरली असल्यामुळे ह्या पाठाला 'अश्वमाह' नाव दिले आहे. हा पाठ रसायन, वाजीकरण, शुक्रप्रवर्तक, शुक्रवर्धक, शुक्रस्तंभक, शुक्रदोष नाशक तसेच, शुक्रबीज संख्या, वीर्याचे प्रमाण व मैथुनशक्ती वाढवणारा अशा गुणांनी परिपूर्ण आहे.
    अश्वगंधा (Withania somnifera) : मानसिक ताण-तणावामुळे कॉर्टिसॉल नामक हॉर्मोन वाढून मेंदूवर विपरीत परिणाम होतो व शुक्रधातु निर्मिती रोडावू लागते. मेंदूतील पिट्युटरी किंवा सुप्रारीनल ग्रन्थिच्या विकारामुळे हा रोग होतो. अश्वगंधामुळे रक्तातील कॉर्टिसॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. कॉर्टिसॉल वाढल्यामुळे होणारे इतर दुष्परिणामही ह्याने कमी होतात. शिवाय रोडावलेली शुक्राणूंची संख्या वाढते. हिच्या सेवनाने विद्युत-चुंबकीय लहरींमुळे होणारे दुष्परिणाम देखील लक्षणीय मात्रेत कमी होतात व अपेक्षित परिणामात वाढ होते.
    आत्मगुप्ता (Mucuna pruriens) : आत्मगुप्ता आपल्या पेशीरक्षक गुणांमुळे शुक्राणूंची संख्या व चलन-वलन गती वाढवते त्याचबरोबर रक्तातली शर्करा पातळी शरीराला आवश्यक तेवढ्या नैसर्गिक पातळीत आणते.
    श्वदंष्ट्रा (Tribulus terrestris) : श्वदंष्ट्रा सेवनाने ६० दिवसांमध्ये क्षीणशुक्र म्हणजेच ऑलिगोस्पर्मिया नाहीसा होऊन शुक्रबीज संख्येत ७८.११ % वाढ होते.
    नारायणी (Asparagus racemosus) : वाजीकर गुणांच्या दृष्टीने Sildenafil citrate हे औषध जगप्रसिध्द आहे. परंतु त्याचे दुष्परिणामही तेवढेच लक्षणीय आहेत. नारायणी ही उत्तम वाजीकर असून पूर्णपणे निर्दोष अशी वनस्पती आहे. Sildenafil citrate व नारायणी ह्यांच्या तुलनात्मक संशोधनातून हा निष्कर्ष प्राप्त झाला. थोडक्यात नारायणी वाजीकर गुणांनी परिपूर्ण वनस्पती आहे. हिच्या सेवनाने विद्युत-चुंबकीय लहरींमुळे यकृतावर होणारा दुष्परिणाम टाळता येतो. पेश्यांतर्गत मायटोकॉन्ड्रिया वर कार्य होऊन हे संरक्षण प्राप्त होते.
    कोकिलाक्ष (Hygrophila spinosa) : वाजीकरण आणि शुक्राणुवर्धन ह्या दोन्ही मध्ये श्रेष्ठ अशी ही वनस्पती आहे. अनापत्यता, लैंगिक दुर्बलता, शुक्रमेह अशा विकारांमध्ये ही अत्यंत उपयुक्त आहे. कोकिलाक्ष सेवनाने "हॉर्मोनल व न्युरो-हॉर्मोनल" यंत्रणेत बदल घडून हे परिणाम दृष्ट स्वरुपात साकार होतात. रक्तातील टेस्टोस्टेरॉन, कोलेस्टेरॉल व प्रथिनांमध्ये समतोल राखून ही वृष्य, वाजीकर व धातुपोषक कार्य करते.
     अक्कलकारा (Anacyclus pyrethrum) : वीर्यवर्धन, शुक्राणु संख्यावर्धन, बलवर्धन व प्रजनन शक्ती सुधार अशा अनेक बीजस्वास्थ्योपयोगी गुणांनी समृद्ध अशी ही वनस्पती आहे. हिच्या सेवनाने वृषण ग्रंथींचा आकार व वजन वाढते, पौरुषग्रंथीचा आकार वाढतो, शुक्रवाहिनीचा व्यास वाढतो, वृषणाला रक्त पुरवठा सुधारतो, शिस्नाचा ताठरपणा तीन पटीने वाढतो. अर्थातच प्रजननाच्या दृष्टीने सर्व अनुकूल गुण ह्या वनस्पतीत ठासून भरले आहेत.
      नागवल्ली पत्र (Piper betle) : नागवल्ली पत्र म्हणजे सर्वांना सुपरिचित असलेले विड्याचे पान. मानसिक ताण-तणाव हे वंध्यत्वाचे एक प्रमुख कारण आहे आणि यावर इमिप्रामाईन नामक औषध आधुनिक वैद्यकात दिले जाते. नागवल्ली व इमिप्रामाईन यांच्या तौलनिक अभ्यासातुन नागवल्लीचा मानसिक ताण-तणाव निर्मूलनाचा गुण इमिप्रामाईन पेक्षा अधिक श्रेष्ठ आहे हे सिद्ध झाले. ह्यातील सुगंधी द्रव्याचा परिणाम मज्जा यंत्रणेवर होऊन एपिनेफ़्रिन व नॉरएपिनेफ़्रिन चे स्राव उत्तेजित होतात ज्यामुळे मज्जा यंत्रणेला प्रोत्साहन मिळते. शिवाय "चेविकॉल" हे तिखट द्रव्य उत्तम पाचक व उत्तेजकाचेही कार्य करते. नागवेलीपत्रातील रसायन विद्युत-चुंबकीय लहरींमुळे होणाऱ्या शुक्रदोष निवारणात समर्थ आहे.
पाठातील प्रत्येक घटकाची माहिती घेतल्यावर असे स्पष्ट हो�
लेखक –
वैद्य संतोष जळूकर
संचालक,
अक्षय फार्मा रेमेडीज,
 मुंबई
+917208777773
drjalukar@akshaypharma.com

Thursday, November 26, 2015

आहारयोग

आहारयोग

लेख क्रमांक 10

नमस्कार मंडळी!
काय मग?
तांदुळाच्या पिठाच्या गरम उकडीचे, मऊसूत, चाफेकळी नाकाच्या, सुबक पाकळ्यांच्या, भरपूर गूळ-खोबरे-वेलचीयुक्त सारणाच्या मोदकांचा - साजूक तुपाच्या धारेबरोबर - शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध असा सर्वांगांनी आस्वाद घेतलात की नाही? बाप्पांनी येताना पाऊसही आणला म्हणून आनंदात अम्मळ एखादा मोदक जास्तच खाल्ला असेल तरी हरकत नाही हं।
या लेखात पाहूया तळणीचे मोदक -
गव्हाची कणिक / रवा-मैदा / कणिक-रवा-मैदा इ. च्या कमी-जास्त संयोगातून मोदकाचे आवरण तयार केले जाते.
हे पीठ भिजवताना काही ठिकाणी ते दुधात भिजवतात तर काही ठिकाणी दूध-पाणी वा फक्त पाणी. तेल वा तुपाचे मोहन घातले तर पदार्थ खुसखुशीत होतो.
सारण म्हणून काही ठिकाणी ओले-खोबर-गूळ वा डाळीचे पुरण वा सुक्या खोबऱ्याचे पिठीसाखरेचे वा पंचखाद्सायाचे सारण असते.
तळणीच्या मोदकांचे घटक व त्यांचे गुणधर्म पुढीलप्रमाणे -
गहू - गहू हे स्निग्ध, शीतल, वात-पित्तदोष कमी करणारे, दाह कमी करणारे, हाडे सांधण्यासाठी उपयुक्त, शरीरास स्थिरता - बळकटी आणणारे, बल वाढवणारे, जीवनशक्ति वाढवणारे आणि म्हणूनच रोजच्या आहारात पोळी/रोटी/फुलका या स्वरूपात समाविष्ट झाले आहेत.
कणिक - कोंड्यासकट दळलेले गहू म्हणजे कणिक.
रवा - हेच गहू जाडसर दळून गव्हाचा रवा तयार करतात.
मैदा - पूर्वी मैदा हा गहू स्वच्छ धुवून, सुकवून, जात्यावर दळून घेऊन, मलमल वा धोतराचे पान वा साडी यावरून गाळून घेऊन वापरत. तांदुळाची पिठी करतात तीच कृती. सध्या बाजारात मिळणारा मैदा मात्र अनेक कृत्रिम रसायनांनी युक्त असल्याने तब्येतीला घातकच.
तेलात तळलेले गव्हाचे पदार्थ हे दृष्टिसाठी वाईट - डोळ्यांवर वाईट परिणाम करणारे असे आयुर्वेद शास्त्र सांगते. तेव्हा, पुरी, सामोसे, शंकरपाळे, करंजी, मोदक इ. गव्हाचे वा रवा/मैद्याचे पदार्थ साजूक तुपातच तळावेत. तरच ते चवीला ही आणि तब्येतीलाही अत्युत्तम. सण साजरा करायचाय, सणाचा आनंद घ्यायचाय पण ते करताना परवडत असतानाही तुपाऐवजी तेल त्यातून रिफाईंड वा गव्हाऐवजी मैदा वा साखर-गूळाऐवजी कृत्रिम गोडवा आणणारे पदार्थ वापरून स्वतःचीच फसवणूक कशाला करावी बरं? पूर्वजाच्या तब्येतीचे दाखले द्यायचे तर त्यांच्याच चांगल्या खाण्याच्या सवयी व चांगली जीवनशैली आपणही आत्मसात करावी हे खरे ना?
तेव्हा तळणीचे गव्हाचे मोदक गव्हाच्या कणकेचेच, आकाराने लहान करा व रिफाईंड तेलाऐवजी शक्यतो साजूक तुपात तळा आणि आस्वाद घ्या - बघा काय फर्मास लागतात.
कणकेचे मोदक अंमळ जास्त खाऊन सुस्ती आली असेल वा अजीर्ण झाले असेल तर काकडी खायला विसरू नका.
गहू वा गव्हाच्या पदार्थांचे अजीर्ण काकडीने कमी होते. म्हणूनच पुरणपोळी ही पोटाला जड झाली तर कणकेच्या अजीर्णावर काकडी आणि हरभऱ्याचा डाळीवर वा पुरणावर कोवळा मुळा हे अजीर्ण कमी करणारे उतारे आहेत.
खोबरे - गेल्यावेळी आपण ओल्या खोबऱ्याचे गुण पाहिले. यावेळी -
सुके खोबरे - हे स्निग्ध, पचायला जरा जड, दाह व मलावष्टम्भ करणारे, रुचकर, बल व वीर्य वाढविणारे आहे.
साखर - ही थंड असून दाह, तहान, उलटी, मूर्च्छा, रक्तदोष व पित्तदोष कमी करते. ही साखर जितके कृत्रिम पदार्थ न वापरता तयार केली असेल तेवढी अर्थातच तब्येतीला चांगली म्हणून ब्लीच न केेलेली साखर शक्यतो वापरावी.
विशेष माहिती -
आपल्याला माहीतच असेल की आपले अनेक भारतीय पण प्रांतीय पदार्थ दुसऱ्या प्रांतातही प्रसिद्ध आहेत. मोदक हे भारताच्या पश्चिम, पूर्व व दक्षिण किनारपट्टीवर स्थानिक पक्वान्न म्हणून प्रसिद्ध आहेतच. संस्कृत व मराठी प्रमाणेच ओरिया, गुजराती व कोंकणी भाषेतही त्यांना 'मोदक'च म्हणतात. तमिळ 'मोदक' वा 'कोळकटै', मल्याळी भाषेत 'कोळकटै', कानडी भाषेत 'मोदक' किंवा 'क़डबू', तेलगू भाषेत 'कुडुमु' म्हणतात.
उकडीचे मोदकाप्रमाणेच पण टोक व मुखऱ्या नसणारे, सारण भरून गोल वळलेले कौळकटै हे केरळ व दक्षिण तामिळनाडूत प्रसिद्ध आहेत. तामिळनाडूत हे कोळकटै गणपतीचाच नेवैद्य मानले जातात.
तसेच ओरिसा, आसाम, बंगाल येथे तांदुळपिठाच्या उकडीची पातळ पारी करून त्यात गूळ-खोबऱ्याचे सारण भरून घडी घालून केळीच्या पानांवर पातोळ्याप्रमाणे वाफवतात त्याला 'पीठा' म्हणतात.
म्हणजेच आपली खाद्यसंस्कृती, परंपरा भारतभर कश्या पसरल्या आहेत त्यावरूनच किती जुन्या आहेत व अजूनही टिकून आहेत हे जाणवते, आपणही त्या टिकवून पुढे पोचवायला हव्यात. नव्याचे तारतम्याने स्वागत हवेच पण जुने सोडून नव्हे. जुन्याचा आदर व नित्य वापरही हवाच यासाठीच हा लेखनप्रपंच.
© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
skype ID - tanugokhale
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

आहारयोग

आहारयोग

लेख क्रमांक 9

#‎गणपती‬ ‪#‎मोदक‬ ‪#‎तांदूळ‬ ‪#‎नारळ‬ ‪#‎गूळ‬ ‪#‎साजूकतूप‬
नमस्कार मंडळी!
आधी आपण पाहिले की जेवणात सहाही रसांचा समावेश असावा. त्यातही सुरुवात गोडाने करावी. त्यानंतर आंबट, खारट पदार्थ, त्यानंतर तिखट, कडू व तुरट पदार्थ क्रमाने घ्यावेत.
आपल्या पारंपारिक जेवणात विशेषतः महाराष्ट्रीयन वा भारतीय जेवणात सुरवात गोडाने वा नैवैद्याने, खीर, पुरण इ. ने करायची पद्धत आहे. तसेच सर्व जेवण झाल्यावर शेवटही तुरट पदार्थाने म्हणजे विडा वा सुपारीने करायची पद्धत आहे आणि ती योग्य आहारक्रमाला व योग्य पचनाला धरूनच आहे.
सध्या मात्र विविध कोर्सेसच्या पाश्चात्य पद्धतींमुळे - सुरुवात भूक वाढविणाऱ्या(?!) तिखट, आंबट पदार्थांनी - सूप्स, व स्टार्टर्सनी केली जाते.
जेव्हा भूक चांगली लागली असेल तेव्हाच जेवावे असा नियम असल्यामुळे - चांगल्या भुकेच्यावेळी जाठराग्नि बलवान् असताना पचायला जड असणारे पदार्थ आधी खाणे योग्य, म्हणून गोड खाणे योग्य. गोड पदार्थांनी वात-पित्ताचे शमनही होते.
तिखट-आंबट पदार्थांनी भूक नसताना ती निर्माण करणे (appetizers) हे कार्य घडते. म्हणजे जेव्हा शरीर/पोट व मन खाण्यासाठी तयार नाही अशावेळी ते मुद्दाम तयार करणे. सूप्स ने भूक लागण्याऐवजी पोट भरतेच असा अनेकांचा अनुभव असेलच. अशा चमचमीत आरंभक वा स्टार्टर्सनी अन्न नीट न पचता वात-पित्ताच्या अनेक तक्रारी निर्माण होतात. तसेच जेवणांती गोड खाल्यानेही कफाचे विकार होतात. पदार्थ तेच पण जेवणाचा क्रम चुकल्यानेही विकार होतात. तेव्हा सुरुवात गोडाने करणे कधीही उत्तम. गोड फळे ही जेवणात सुरुवातीलाच खावीत; जेवल्यावर नव्हे.
आज आपण अशा गोड पदार्थानेच सुरुवात करूया.
आजचा पदार्थ - मोदक. गणपती येऊ घातलेत आणि घरोघरी मोदक तर होणारच. तेव्हा आबालवृद्धांना आवडणाऱ्या या मोदकांविषयीच जाणून घेऊ या.
मोदक या संस्कृत शब्दाचा अर्थच मोद देणारा - आनंद देणारा आणि म्हणूनच गणपतीला प्रिय असा आहे.
कोणत्याही पूजेत नैवेद्याचा मान असतो तसा गणपतीच्या पूजेत मोदकांचाच मान. मोदकांचा आकार हा नारळाप्रमाणे असतो. नारळ हा अर्थातच परिपूर्णतेचे, सुफळतेचे प्रतिक आहे. मोदक उकडीचे असोत वा तळणीचे. वरची पारी ही जितकी पातळ व नितळ, जितक्या पाकळ्या जास्त तितका करणारीचा हात सुग्रण. सुबक, पातळ पारीचे, भरपूर व एकसारख्या मुखऱ्या वा पाकळ्या असलेले, भरपूर सारण भरलेले, फार गोड नाही व अगोडही नाहीत असे मोदक म्हणजे गृहिणीच्या सुग्रणपणाचा व कलेचा कसच. चव, पारी, आकार, सारण हे सर्व जेव्हा उत्तम जमतं तेव्हाच मोदक होतो, तेव्हाच करणारीला व खाणाऱ्यांना दोघांनाही मनापासून मोद - आनंद मिळतो.
सारण भरून केलेले व न भरता केलेले मोदक असेही प्रकार आहेत. न भरता केलेले म्हणजे खव्याचे, आंब्याचे, चॉकलेटचे, तिळाचे, पनीरचे, काजूचे, फुटाण्याचे, तसेच स्ट्रॉबेरी, पिस्ता, इ. चवींचे खव्याचे मोदक म्हणजे फक्त मोदकांचा आकार असलेले बर्फीचे प्रकार.
सारण भरून केलेले मोदकच खरे पारंपारिक मोदक होय.
महाराष्ट्रात विशेषतः दोन प्रकारे मोदक करायची पद्धत आहे. उकडून व तळून. कोकणात तसंच पश्चिम महाराष्ट्रात बहुतांशी उकडीचे मोदक केले जातात. विदर्भ, खानदेश, मराठवाडा, या देशावरच्या भागांमधे बहुतांशी तळलेले मोदक केले जातात. म्हणजेच नारळ मुबलक असलेल्या ठिकाणी ओल्या नारळाचे उकडीचे मोदक करायची पद्धत आहे तर जिथे नारळ होत नाहीत त्या भागात सुके किसलेले खोबरे वापरून मोदक करण्याची पध्दत आहे. हल्ली हेल्थ कॉन्शस लोक बेक्ड मोदकही करतात.
उकडीचे मोदक - उकडीच्या मोदकाला ओले खोबरे व गूळ यांचे शिजवलेले सारण असते. उकडून करायच्या मोदकांमध्ये तांदूळ पिठीचे, कणकेचे, क्वचित् ज्वारीच्या पिठाचे मोदक करून ते उकडतात. तांदळाची उकड काढून, ओलं खोबरं व गूळ यांचं सारण भरून उकडतात. उपवासाला वरईचे मोदकही उकडून करतात. तसेच पोह्याचे पीठ भिजवून तेही उकडून वा तळून मोदक करता येतात. मैद्याची पारी करून त्यात गूळ-खोबऱ्याचे सारण भरून गोड मोमोज् प्रमाणेही मोदक होतात.
तळणीचे मोदक - तळणीचे मोदक हे कणीक किंवा मैदा किंवा रवा-मैदा यांच्यापासून बनवितात. यात ओले खोबरे-गूळ / ओले खोबरे-साखर / सुके खोबरे-पिठीसाखर असे सारण असते. खव्याचे, सुका मेव्याचे, पुरणाचे सुद्धा मोदक करतात.
पारंपारिक तळणीचे मोदक म्हणजे सुकं खोबरं किसून ते थोडंसं भाजून घेऊन त्यात पिठी साखर, भाजलेली खसखस, चारोळी, सुका मेवा, वेलदोडा पूड वा पंचखाद्य घालून सारण तयार करायचं आणि कणिक वा रवा-मैदा भिजवून त्याची लाटी करून त्यात हे सारण भरून मोदक करायचे आणि तेलात वा तुपात तळायचे. मराठवाड्यात तिळ-गूळाचे सारण भरूनही तळणीचे मोदक करतात व संक्रांतीनंतर येणाऱ्या तिलकुंद चतुर्थीला त्याचा नेवैद्य दाखवतात.
लुसलुशीत उकडीच्या मोदकांवर साजूक तूप घातल्याने त्याची चव ही वाढते तसेच तो पचायलाही मदत होते. मोदक जरा वेळाने निवल्यावर खाण्यातच मजा आहे नाहीतर सारणाने तोंड भाजते. गार झाल्यानंतर तितकासा तो चांगला लागत नाही.
मोदकातील तांदूळ, खोबरे, गूळ हे सर्व पदार्थ पुष्टी करणारे आहेत. कोणताही गोड पदार्थ जसा पचायला जडच तसाच मोदकही. पण तांदूळ-नारळ-गूळ हे एकमेकांना पचवायला मदत करतात.
तांदूळ - तांदूळ हे मधुर, बलदायक, रुचिकर, थंड, वातपित्त कमी करणारे, पचायला हलके असे नित्य सेवन करण्याच्या धान्यांमध्ये श्रेष्ठ आहे आणि म्हणूनच रोजच्या जेवणात त्यांचा समावेश योग्यच आहे.
तांदूळ पचायला हलके पण तांदुळाच्या पिठाची उकड पचायला जड असते. त्यामुळे पातळ पारी व बेताचे गोड सारण असलेले, व्यवस्थित उकडलेले मोदक तूप घालून खाणे हेच योग्य.
वजन वाढेल म्हणून तांदूळ वर्ज्य.. म्हणून मोदक वर्ज्य असा विचार नकोच.
हल्ली खोबरे ही कोलेस्टेरॉलच्या भीतीने हद्दपार होत आहे. नारळाने वाईट कोलेस्टेरॉल वाढत नाहीच उलट चांगले कोलेस्टैरॉल वाढते असे आताचे संशोधन सांगते.
नारळ - ओले खोबरे हे पचायला जड, स्निग्ध, थंड, पित्तशामक आहे. शरीरातील दाह, तहान कमी करणारे, बल देणारे, केसांसाठी हितकर, कान्ति वाढवणारे आहे.
गूळ - गूळ हा पचायला जड, उष्ण, कफ-वात कमी करणारा, श्रम-थकवा कमी करणारा आहे. गूळ जेवढा जुना तेवढा वापरायला चांगला.
सध्या तुपाबद्दल बरेच नाराजीचे सूर ऐकू येतात. सर्वच स्नेहांना सरसकट त्याज्य वा वाईट ठरवणे म्हणजे सोने, चांदी, तांबे, लोखंड इ. सर्व धातू एकाच भावाने मोजण्यासारखे आहे.
मुळातच तूप विशेषतः गाईच्या दुधाचे लोण्यापासून कढवलेले तूप हे बुद्धि, कांति, स्मृति वाढवणारे, बल्य, वात-पित्त कमी करणारे, थकवा घालवणारे आहे. जठराग्नि वाढवून, वीर्यवर्धक, दृष्टिला हितकर, शरीराला स्थैर्य, बळकटी देणारे तूप हे रोजच्या जेवणात असायलाच हवे.
तात्पर्य काय - परवाचे संशोधन काल खोटे ठरते, कालचे आज.. तेव्हा पारंपारिक पद्धतींवर जास्त विश्वास ठेवा आणि कॅलरी, फॅट्स् इ. च्या मोजमापात न अडकता आनंदाने बाप्पांचे स्वागत करा, स्वतःही मोदक नक्की कराच, इतरांनाही खाऊ घाला, सणाचा आनंद द्विगुणित करा. मधुमेह असेल वा इतर काही विकार असतील तरच हात आखडता घ्या वा आपल्या वैद्यांच्या सल्लाने वागा. वर्षातून एकदा वा क्वचितच होणारे मोदक यावेळी मात्र निश्चिंत मनाने खा. अजीर्ण होऊ नये म्हणून जरा दोन घास कमीच जेवा इतकंच.
पुढील रविवारीही गणपती असणार आहेत - तेव्हा मोदकांविषयी थोडी अधिक माहिती पुढील रविवारी.
© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
skype ID - tanugokhale
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

आहारयोग

आहारयोग


लेख क्रमांक 8

नमस्कार!
आधीच्या लेखांमध्ये आपण आहाराचे व आहारसेवनाचे नियम यांविषयी माहिती घेतली. ते लक्षात ठेवणे सोपे जावे म्हणून चरकाचार्यांनी सांगितल्याप्रमाणे थोडक्यात त्यांची उजळणी खालीलप्रमाणे:-
1. अन्न हे नेहमी गरम, ताजेच खावे. ताजे अन्नच सर्वाधिक चविष्ट लागते व गरम, ताजा पदार्थ पचविणे हे शरीरालाही सोपे असते.
2. अन्न हे नेहमी स्निग्ध असावे – म्हणजे योग्य त्या फिल्टर्ड तेलांचा (उदा. शेंगदाणा, तीळ, मोहोरी, खोबरेल इ. देशानुसार) (रिफाईण्ड तेल अजिबात नको) व साजूक तूप, साय, घरचे लोणी यांचा समावेश जेवणात आवर्जून करा. चांगल्या स्नेहाने पोटातील अग्नि अन्न योग्य प्रकारे पचवू शकतो.
3. आहार योग्य मात्रेतच घ्या. योग्य मात्रेतील आहार पचल्यावर अन्नाचे सर्व फायदे मिळतात, कमी अन्नाने कुपोषण होते व अतिखाल्ल्याने पचनशक्तिवर ताण येतो.
4. आधीचे अन्न वा आहार पचल्यावरच पुढील अन्न वा आहार घ्यावा. अशाने अपचन व त्यातून होणारे बहुतांशी सर्व विकार टाळता येतात.
5. एकमेकांना पूरक असेच पदार्थ जेवणात असावेत. एकमेकांना मारक पदार्थ खाऊ नयेत.
6. आपण राहतो त्या भौगोलिक हवामानातील पदार्थच रोजच्या जेवणात असावेत. तसेच खाण्याची वा जेवण्याची जागा व वातावरण ही शांत, आनंदी असावे.स्वतःच्या प्रकृतीला व काही व्याधी असतील तर त्या व्याधीत पथ्यकर असेच अन्न असावे.
7. जेवणाची व अन्न शिजविण्याची साधनसामग्री योग्य असावी. कोणत्याही भांड्यात, विशेषतः प्लॅस्टिक, मेलामाईन, थर्माकोल यांचा वापर टाळावा. तसेच नॉनस्टिक भांड्याचाही वापर टाळावा.
8. घाईघाईत किंवा रेंगाळत जेवू नये.
9. न हसता, न बोलता जेवावे.
10. प्रसन्नतेने व मन लावून जेवावे.
पटल्यास स्वतःच्या स्वयंपाकघरात प्रिंट काढून चिकटवा, आपल्या नातेवाईक, मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर करा. सोशल नेटवर्किंगवर ही माहिती शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा.
आतापर्यंत आपण अन्न कसे व का सेवन करायचे याविषयी माहिती घेतली. पुढील लेखापासून प्रत्यक्ष अन्नातील घटक, त्यांचे गुणधर्म यांची माहिती करून घेऊया.
© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
skype ID - tanugokhale
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

आहारयोग

आहारयोग


लेख क्रमांक 7 (क्रमशः)

नमस्कार!
5. देश – म्हणजे सभोवताल वा परिसर व तेथील हवामान, तिथे पिकणारी धान्ये, फळे, भाज्या यांचा योग्य वापर. सध्या जग म्हणजे ग्लोबल व्हिलेज झाले आहे. इटलीतला पास्ता सिंगापूर मध्येही मिळतो आणि उत्तम चायनीज जेवण अमेरिकेतही मिळते. भारतापुरते बोलायचे तर वाळंवटासारखे रूक्ष प्रदेश ते आसाम-मेघालय वा केरळ सारखे सदाहरित, आर्द्र, दमट हवामानाचे प्रदेश वा पुणे-नाशिक सारखे साधारण प्रदेश. या प्रत्येक ठिकाणी हवामानाप्रमाणे धान्य व भाज्या, फळे पिकतात व तेच तिथल्या हवामानाला खाणे हे योग्य आहे. बघा बरं – दक्षिणेकडची इडली – दिल्लीत त्याच चवीची बनत नाही आणि पचतही नाही. तसेच गव्हाचे पदार्थ दक्षिणेकडे खाण्याचे प्रमाणही कमीच. पण हा भेद लक्षात न घेता सरसकट दाक्षिणात्यांचा आहार असलेले इडली-डोसे नाश्त्याचे पदार्थ झाले आणि उत्तरेकडचे गव्हाचे पदार्थ रोटी, फुलका हे दुपारच्या जेवणात सामावले गेले – ते केवळ सोयीमुळे – शरीर व आहारच्या योग्यायोग्यतेचा विचार करून नव्हे. पूर्वीपासून व्यापारामुळे वा आक्रमणांमुळे, स्थलांतरामुळे जागतिक अनेक पदार्थांची देवण-घेवाण झाली पण त्या-त्या परदेशी पदार्थांचा समावेश हळूहळू झाला. त्या त्या पदार्थांचा वापर हळूहळू वाढला, शरीराला त्या पदार्थांची ओळख करून दिली गेली, ते पचवायला – सवयीचे व्हायलाही वेळ दिला गेला. काल जाहिरात दिसली आणि आज लगेच तो पदार्थ पोटात असे नाही झाले. तो पदार्थ कसा आहे, त्यावर काय संस्कार केले तर तो आपल्याला पचेल, तो कधी खावा याविषयीचे आडाखे बांधले गेले असावेत व त्यानुसार तो आपल्या पद्धतीत कसा बसेल त्याप्रमाणे त्यांचा वापर केला गेला. उदा. – बटाटे. मूळचे भारतीय नसलेले बटाटे – आज कोणत्याही पदार्थ – उपवासाचा वा मेजवानीचा – बटाट्याशिवाय करणे म्हणजे जरा डोके खाजवावेच लागते . आज नैवेद्याच्या पानातही बटाटा नसेल तर समाधान होत नाही ना? नवनवीन पदार्थ खाण्याची हौस सगळ्यांनाच असते पण ते जरा तारतम्याने. ह्ल्ली घर हेही हॉटेलचे मेन्यू कार्डप्रमाणे आज पंजाबी, उद्या दाक्षिणात्य, परवा राजस्थानी, गेला बाजार विकेंडला चायनीज, मेक्सिकन, थायी, इटालियन... अबब.. पुरे.. कोणत्याही एका पदार्थाची शरीराला सवय व्हायला वेळ द्यावा लागतो, त्यात सर्व जगच पोटात लोटू पाहायचे असते आपल्याला. पंचतारांकित हौटेलातील बुफे प्रकरण म्हणजे साक्षात अन्नाचे विश्वरूपदर्शनच. पण त्यासाठी पोटालाही कृष्णाप्रमाणे गोवर्धन पेलण्याची ताकद असायला हवी, औषधरूपी गोपाळांनी काठ्या लावून तो उदरातला डोंगर व्यवस्थित पचणार नाही.
6. काल – अन्न सेवन करण्याचा योग्य काळ महत्त्वाचा. आधीचे अन्न पचल्यावरच पुढचा आहार घ्यायला हवा. आधीचे जेवण जर पचले नसेल तर जसे दह्यात कितीही दूध घाला ते नासतच जाते, त्याचप्रमाणे आधीचे अन्न न पचता त्यावर पुढील अन्न घातले गेले तर ते पचनशक्तिवर ताण निर्माण करते व त्यातून अनेक रोगांची निर्मिती होते. दिवसा 10 ते 12 या वेळात मुख्य दुपारचे जेवण घेणे अगदी योग्य. त्यातूनही ज्यांना जमत नाही त्यांनी निदान 2 पूर्वी तरी हा आहार घ्यायलाच हवा. तसेच रात्रिचे जेवण ही सूर्यास्तापूर्वी किंवा नंतर परंतु 9 च्या आत घ्यायला हवा. काळानुसारही अन्नात बदल करायला हवेतच. स्निग्ध, पचायला जड पदार्थ हिवाळ्यात नियमित खाणे योग्य होय तर पावसाळ्यात अग्नि वा पचनशक्ति मंद झालेली असताना स्निग्ध पण हलके, गरम अन्न-पान हे योग्य. दिवसातील वेगवेगळ्या वेळा, ऋतु या बरोबरच वयाच्या अवस्थांनुसारही खाण्यापिण्यात बदल करायला हवेत. वाढीच्या वयात पौष्टिक पदार्थ जसे योग्य तसेच वृद्धापकाळात पौष्टिक पण पचायला हलके, पथ्यकर पदार्थ खायला हवेत. स्त्रियांच्याही बाला-कुमारी-स्त्री-गर्भवती-माता-रजोनिवृत्ता या अवस्थांनुसारही खाण्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. जसे हे काल खाणारा व निसर्गातील काळ व शारीरिक अवस्थांतील काळ यांचा जसा विचार करायला हवा तसाच विचार अन्न-धान्य-फळे-भाच्या यांच्या नैसर्गिक उपलब्धिंच्या काळाचाही विचार करायला हवा. काही फळे, भाज्या,धान्ये ही विशिष्ट ऋतुनुसार मिळतात तर काही बारमाही मिळतात. आंब्याचे महत्त्व उन्हाळ्यात जितके तितके बारमाही मिळायला लागल्यावर राहिल काय? आता वर्षभर लोक आम्रखंड, आमरस, पन्हे या गोष्टी खाउ-पिऊ शकतात पण नैसर्गिकपणे मिळणारा रसरसलेला आंबा कुठे आणि कृत्रिम द्रव्ये घालून टिकवलेले बर्फात टिकवलेले वा बाटलीबंद वा कॅन्ड पदार्थ – हे फक्त चवीचेच चोचले. एरवी वापरताना त्यांचे प्रमाण नगण्यच व क्वचितच खावे. रोगाच्या अवस्थांनुसारही अन्नपानाचे नियम बदलतात तेव्हा त्याविषयी वैद्यांकडूनच सल्ला घ्यावा.
7. उपयोग संस्था – उपयोगसंस्था म्हणजे अन्नसेवनाचे नियम. जसे आधीचे अन्न पचल्यावरच पुढचा आहार घ्यावा तसेच तो कसा कुठे कोणत्या स्वरूपात सेवन करावा इ. ही लक्षात घ्यायला हवे. अन्न हे सुखाने खाता येईल इतपत गरम, स्निग्ध (तेलकट वा तळलेले नव्हे), योग्य प्रमाणात, विरुद्ध नसलेले हवे. तसेच मनस्थितीही शांत, प्रसन्न हवी. अन्न हे न हसता, न बोलता, अति घाईने वा रेंगाळत सेवन करू नये. अन्न ज्याठिकाणी सेवन करायचे आहे ते ठिकाणही योग्य हवे. रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करत, उभ्याने, हसत, गप्पा मारत, डास-माशा हाकलत, वाहनांच्या वा वाद्यांच्या गोंगाटात अन्न खाणे हा सध्याच्या तरुणाईच्या दिनचर्येचा महत्त्वाचा भाग झाला आहे. घरीही शांतपणे कुटुंबियांबरोबर शांतपणे, मोजके पण प्रेमळ संवाद साधत जेवायची पद्धतही लोप पावत आहे. कानात बूचे घालून वा टीव्ही वरील नवरसांनी भरलेल्या मालिका वा कार्यक्रम बघत जेवणे म्हणजे नुसतेच पोट भरणे. नावडते पदार्थ मुलांच्या पोटात घालायची आईची आवडती जागा म्हणजे टीव्ही. त्याचा बघता बघता कधी अतिरेक होतो कळतच नाही.
8. उपभोक्ता – अन्न-पान घेणारी व्यक्ती म्हणजे उपभोक्ता – म्हणजे आपण स्वतः. वरील सर्व नियम पाळताना आपण स्वतः अन्न-पान कसे घ्यावे – स्वतःच्या तब्येतीनुसार, तक्रारींनुसार, शारीरीक-मानसिक अवस्थेनुसार, पचनशक्तिनुसार, आधीचे अन्न पचल्यावरच व भूक-तहान लागल्यावरच अन्न-पान सेवन करावे. स्वतःचे शरीर व मनःस्थिती योग्य असताना खाल्ले अन्न हेच सर्व फायदे मिळवून देते. हल्ली उठल्या-उठल्या काहीतरी तोंडात घातल्याशिवाय लोकांचा दिवस सुरू होत नाही. भूक असो वा नसो, आंघोळ झालेली असो वा नसो, पोट साफ झालेले असो वा नसो – तोंड धुतले की खाणे सुरू. कालांतराने सकाळी खाण्याऐवजी औषधांनीच दिवसाची सुरूवात करावी लागते तरी चुकीच्या सवयी सोडाव्यात, त्यात बदल करावेत हे लक्षातच येत नाही.
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे। सहज हवन होते नाम घेता फुकाचे।।
जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म। उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म।।
खरोखर जसे यज्ञकर्म करताना योग्य वेळ, शांतता, पावित्र्य, योग्य सामग्री लागते तसेच अन्नसेवन करतानाही आवश्यक आहे. लहानपणापासून हा श्लोक आपण म्हणत, ऐकत असतो, पण तो उमजून त्याप्रमाणे वागणे हे जेव्हा जमेल तेव्हाच खरे.
© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
skype ID - tanugokhale
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

Visit Our Page