!!! स्त्री आचार आणि आरोग्य !!!
प्रा. डॉ. उषा देशमुख
एम. डी., डी. सीएच (आयु.)
प्राध्यापक व विभागप्रमुख, बालरोग चिकित्सा
रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय, वरळी, मुंबई
+919423107039
drusha1954@gmail.com
‘आचार’ अर्थात आचरण, प्रत्येकाच्या आचरणावर त्या व्यक्तीचे स्वास्थ्य अवलंबून असते. स्वास्थ्य संवर्धन व संरक्षण यासाठी आयुर्वेदात दिनचर्या, ऋतुचर्या वर्णिली आहे. शास्त्रानुसार आचरण केले, तर निश्चितच स्वास्थ्य संरक्षण होते. स्त्री स्वास्थ्यानुसार कुटुंब स्वास्थ्य पर्यायाने समाजस्वास्थ अवलंबून असते, म्हणूनच स्त्री स्वास्थ्य संरक्षणास विशेष महत्व आहे.
नदी, वृक्ष हे अनादी काळापासून मनुष्याची व सृष्टीची अविरत सेवा करीत आहेत. या सेवेत आणखी एक नाव जोडायला पाहिजे आणि ते म्हणजे स्त्री. कुटुंबासाठी कष्ट करता करता तिच्या ठिकाणी आघात कधी होतो हे कळत देखील नाही. कुटुंबाच्या सुख शांतीसाठी ती अविरत कष्ट करत असते. त्यात हल्ली अर्थार्जन ही नवीन जबाबदारी टाकली आहे. निसर्गानेसुद्धा नवनिर्माणाची म्हणजेच सर्जन कार्याची फार मोठी जबाबदारी स्त्रीवर टाकली आहे. उलटपक्षी ह्या कार्यासाठीच स्त्रीची निर्मिती झाली आहे. नवनिर्मितीची फार मोठी जबाबदारी शिरावर घेऊन ती आपले आयुष्य जगत असते. स्त्री शब्दाची व्याख्या पाहता हे लक्षात येईल,
स्त्यायेते शुक्रशोणिते अस्यां सा स्त्री l
शुक्रशोणितास एकत्र आणते ती स्त्री.
भगवदगीतेत देखील सर्जनासाठी स्त्री हाच आधार मानला आहे.
प्रकृती स्वामवष्टम्भ विसृजामि पुनः पुनः l
भूतग्रामीनः कृत्स्नमवशं प्रकृतेवर्शांत llअ. ९/८ गीता.
हाती प्रकृती घेऊन जागवी मी पुनः पुनः l
भूतांचा संघ हा सारा प्रकृतीच्या अधीन जो l
अर्थात स्त्रीचा आधार घेऊनच पुन्हा पुन्हा सृष्टीची देवाणघेवाण होत असते, आणि या कार्यासाठीच तिला निसर्गाने अधिक शक्तिशाली बनवले आहे.
स्त्री जेव्हा नाग्निका, कन्या, गौरी या विविध अवस्थांमधून जात असते, त्या प्रत्येक टप्प्यात तिच्यात परिवर्तन होत असते. ‘उमलणे आणि फुलणे’ ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. ‘उमलणे’ हे स्वाभाविक असते. परंतु ‘फुलण्यासाठी’ वातावरणाची सोबत लागते. अर्थात हे वातावरण नसेल तर स्त्रीत्व-विकासास बाधा येऊ शकते. उदा. बालवयात मुलगी म्हणून योग्य प्रकारे पोषण मिळाले नाही तर कुपोषणाच्या परिणामी स्त्री-विशिष्ट अवयवांचा विकास होणार नाही. कारण आहार रसावरच स्त्री-विशिष्ट अवयवांचे पोषण अवलंबून असते. ‘रज’ आणि ‘स्तन्य’ हे रसधातूचे दोन उपधातु आहेत. रसधातु समृद्ध असेल तर उपधातु निर्मितीहि चांगल्या प्रकारे होईल. कन्या ह्या अवस्थेत असताना ‘किम नियन्ति’ या विवंचनेने ग्रासलेले माता, पिता तिचे संगोपन प्रामाणिकपणे करतीलच असे नाही. मुलगी झाली म्हणून तिला अंगावर न पाजणारी आई देखील मी रुग्णालयात पाहिली आहे. मुलगी म्हणजे परक्याचे धन ह्याच भावनेतून झालेल्या तिच्या संगोपनामुळे तिच्या शारीरिक-मानसिक व्यक्तिमत्वाचा विकास उत्तमरित्या होऊ शकेलच असे नाही. स्त्री आरोग्याच्या दृष्टीने तिच्या संगोपनाचा विचार अतिशय महत्वाचा आहे. बालवयात संगोपनाच्या दृष्टीने झालेला भेदभाव कदाचित तिच्या उमलण्यावर, पुढे फुलण्यावर होऊ शकतो. स्त्रीत्वाचा विकास करणाऱ्या घटकांवर मनोभिघाताचा परिणाम होऊ शकतो. बालवयात झालेले मनोभिघात पुढे स्त्रीत्वाचा परिपूर्ण विकास न होण्यास कारणीभूत होऊ शकतात.
‘आचार’ अर्थात आचरण, प्रत्येकाच्या आचरणावर त्या व्यक्तीचे स्वास्थ्य अवलंबून असते. स्वास्थ्य संवर्धन व संरक्षण यासाठी आयुर्वेदात दिनचर्या, ऋतुचर्या वर्णिली आहे. शास्त्रानुसार आचरण केले तर निश्चितच स्वास्थ्य संरक्षण होते. स्त्री स्वास्थ्यावर कुटुंब स्वास्थ्य पर्यायाने समाज स्वास्थ्य अवलंबून असते. म्हणूनच स्त्री स्वास्थ्य संरक्षणास विशेष महत्व आहे.
स्त्री हि मूलं अपत्यानां स्त्री रक्षति रक्षिता l
जागतिक स्तरावर ‘प्रजनन व शिशु स्वास्थ्य संरक्षण’ (RCH) ही योजना गांभीर्याने राबवली जात आहे. इसवी सना पूर्वीपासून आयुर्वेदात स्त्री स्वास्थ्य रक्षणाला विशेष महत्व दिले आहे. अपत्याचे मूलस्थान असलेले स्त्रीचे स्वास्थ्य संरक्षण कसे करावे, यासाठी तिच्या अवस्थांनुसार रजःस्वला परिचर्या, गर्भिणी परिचर्या, सूतिका परिचर्या म्हणजे या अवस्थेत स्त्रीने कशाप्रकारे आचरण करावे हे प्रामुख्याने सांगितले आहे. स्त्रीत्व प्रकट होण्याचे पहिले लक्षण म्हणजे रजःस्राव, स्तनपुष्टी, आर्तववहस्रोतसातून प्रतिमाह स्रवणारा भावविशेष म्हणजे रजःस्राव.
जर आर्तववहस्त्रोतस स्वस्थ, प्राकृत असेल तर ‘गते पुराणे नवेच अवस्थिते’ या नियमाप्रमाणे प्रतिमाहः रजःस्राव प्रवर्तनात नियमितता आवश्यक आहे आणि ह्यात सातत्य असणे आवश्यक आहे. या सातत्यावर स्त्रीच्या आचरणाचा, अर्थात आहारात्मक आणि विहारात्मक परिणाम होत असतो. ह्या काळात अवलंबण्यासाठी खास रजःस्वला परिचर्या सांगितली आहे. स्त्रीच्या प्रत्येक अवस्थेत तिच्या आचरणाला महत्व आहे. मासिक पाळीच्या तीन दिवसात स्त्रीला ‘रजःस्वला’ हे विशेषण आहे. या काळात योनीमार्गातून सुमारे तीन ते पाच दिवसापर्यंत किंचित काळसर वर्णाचा रक्तस्राव होत असतो. या अवस्थेत स्त्रीने काही विशेष आहार-विहार सांभाळणे आवश्यक आहे. जुन्याकाळी ह्या दिवसात स्त्री अस्पृश्य समजली जात असल्यामुळे काही चांगल्या गोष्टी आपोआप आचरणात येत असत. वैज्ञानिक दृष्टीकोनातून ते योग्यच आहे. आज त्या नियमाचा मुद्दाम उल्लेख करणे आवश्यक आहे.
"आर्तवस्रावदिवसात् त्र्यहं सा ब्रह्मचारिणी।
शयीत दर्भशय्यायां पश्येदपि पतिं न च॥
करे शरावे पर्णे वा हविष्यं त्र्यहमाचरेत्।
अश्रुपातं नखच्छेदमभ्यङ्गमनुलेपनम्॥
नेत्रयोरञ्जनं स्नानं दिवास्वप्नं प्रधावनम्।
अत्युच्चशब्दश्रवणं हसनं बहुभाषणम्॥
आयासं भूमिखननं प्रवातञ्च विवर्जयेत्।
या अवस्थेत रजःस्रावामुळे स्त्री शरीरात आलेले दौर्बल्य वातप्रकोपास कारणीभूत होते. त्यामुळे पुन्हा वातप्रकोप होणारे आचरण टाळावे. तसेच धातुक्षयामुळे आलेले दौर्बल्य हे जंतु-व्याधि संसर्गास कारणीभूत होते. म्हणूनच ब्रह्मचर्याचे पालन करावे. शृंगार, शोक, दिवास्वप्न (दिवसा झोपणे), उटणे लावणे, फार मोठे आवाज ऐकणे, फार हसणे, सारखी बडबड, धावपळ करणे, श्रमाची कामे करणे, खूप जोरदार हवा अंगावर येईल असा विहार – अर्थात वाहन चालवणे – आदि गोष्टी टाळाव्यात. कोष्ठाचे शोधन होईल असा आहार असावा. लघु, लवकर पचणारा उदा. दूध, यव, लाजामंड, मुगाची खिचडी, विविध फळे यांचा आहारात वापर करावा. या काळात धातुक्षयामुळे उत्पन्न होणारे अग्निमांद्य लक्षात घेऊन आहार घ्यावा. अतिस्निग्ध, तळलेले, पचायला जड पदार्थ टाळावेत. सौंदर्य प्रसाधने वापरणे हे कामोत्तेजक असल्यामुळे ती या अवस्थेत अनिष्ट आहेत. ह्या काळात संभोग केल्यास स्त्रीच्या योनीमार्गात जंतु-व्याधी संसर्ग होऊ शकतो. श्रमाची कामे वा फार हालचाल केली तर रजःस्राव अधिक प्रमाणात होतो आणि अतिशय थकवाही येतो. यासाठी विश्रांतीची आवश्यकता आहे. अशाप्रकारे आचरण केले नाही तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर लगेच दिसतातच असे नाही, परंतु आदर्श आरोग्याच्या दृष्टीने काळाच्या ओघात शरीराची हानी व्हायची ती होतच असते. गर्भधारणा, प्रसूती, अपत्य संगोपन, स्तन्य निर्मिती या गोष्टी जशा व्हायला हव्यात तशा होत नाहीत. त्यामध्ये अनेक प्रकारच्या व्यथा, पीडा आणि स्त्रीरोग निर्माण होण्याची शक्यता असते. मासिक पाळी नियमांचे पालन केले नाही तर त्याचे गंभीर व दीर्घकालीन परिणाम गर्भावर व मासिक रजःस्रावावर होतात. खरेतर मासिक रजःस्रावामुळे स्त्री शरीराला बऱ्याच व्याधींपासून संरक्षण मिळते. उदा. हृदयरोग, आम्लपित्त, प्रमेह आदि. काहींना ह्या गोष्टी पटणार नाहीत. कारण ही लक्षणे घेऊन बऱ्याच स्त्रिया आमच्याकडे येत असतात. परीक्षणाअंती असे लक्षात येते, की त्यांच्या मासिक स्रावात विकृती असते. अनियमित मासिक स्राव, अतिशय कमी प्रमाणात स्राव होणे वा स्राव अकाली बंद होणे (रजोनिवृत्ती) इ. मासिक रजःस्राव हे स्त्रीशरीराला मिळालेले एक वरदानच आहे. रजःकाल, गर्भावस्था, प्रसवावस्था व सूतीकावस्था ह्या काळात केलेले योग्य आचरण स्वास्थ्य संरक्षण करणारे तर मिथ्याचरण हे व्याधी संभवास कारणीभूत होतात. मिथ्याचार हे स्त्रीरोगांसाठी महत्वाचे कारण आहे.
गर्भिणीने विषमचेष्टा, अतिश्रमाची कामे केली तर अकाली गर्भपात होण्याची शक्यता असते. गर्भिणी अवस्थेत योग्य प्रमाणात आणि पोषक आहार घेतला नाही तर ‘गर्भशोष’ म्हणजे कमी वजनाचे बालक जन्माला येते. किंबहुना प्रसवसमयी अधिक रक्तस्राव होणे, कळा घेण्यासाठी शक्ती नसल्यामुळे प्रसवास विलंब होऊन बालकावर आघात होण्याची शक्यता असते. म्हणून गर्भिणीने योग्य आहार, विविध फळांचे सेवन आणि विश्रांती ह्या गोष्टी कटाक्षाने आचरणात आणाव्यात.
प्रसावानंतर सूतीकावस्थेत देखील स्त्रीने काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रसवामुळे स्त्री शरीर दुर्बल झालेले असते. श्रम आणि रक्तस्रावामुळे दुर्बल झालेल्या शरीरास विश्रांती आणि बलवर्धक चिकित्सा, आहार – विहार यांची आवश्यकता असते. श्रमपरिहारासाठी सूतीकेस तैलाभ्यंग करणे तितकेच महत्वाचे आहे. ह्या अवस्थेत जसा स्त्रीचा विचार केला जातो, तसाच बालकाच्या पोषणाच्या दृष्टीने देखील विचार करून स्त्रीने आहार – विहार सेवन करावा. स्तन्यामार्फतच बालकाचे पोषण होत असल्यामुळे स्तन्यवृद्धीकर आहार (म्हणजे आहळीव, खसखस, दूध, तूप अशा स्वरूपाचा आहार) घ्यावा. शारीरिक विश्रांतीसोबतच मानसिक स्वास्थ्य देखील स्तन्य निर्मितीस कारणीभूत होत असल्यामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य संवर्धन ह्या गोष्टींचा विचार करून आचरण करावे. सध्या जागतिक स्तरावर कष्टतम असलेल्या महाभयंकर व्याधी या मिथ्या आचरणाच्या परिणामी उद्भवतात. उदा. लैंगिक संबंधातून होणाऱ्या व्याधी, फिरंग, उपदंश, एड्स ह्या व्याधींची संपूर्ण माहिती टी.व्ही., रेडिओवर आपण पाहतो, ऐकतो. तेव्हा स्त्री आचरण आणि स्त्रीचे स्वास्थ्य संरक्षण किती महत्वाचे आहे हे लक्षात घेऊन परंपरागत जपलेल्या नियमांचे शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करून त्याचे पालन करावे. त्याचे अवडंबर वा रूढीचे स्तोम माजू देऊ नये.

No comments:
Post a Comment