Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, November 2, 2016

थंडीच्या काळातील आहार

🌿 थंडीच्या काळातील आहार 🌿

गोधुमपिष्टमाषेक्षुक्षीरोत्थविकृतीः शुभाः |
नवमन्नं वसां तैलं... || वा.सु.३/१२-१३

गव्हाच्या पीठापासुन बनविलेले पदार्थ, उडीद दाळ, ऊसाचा रस, गुळाचे पदार्थ, दुधापासुन निर्मित पदार्थ ( दही, पनीर, ताक, लोणी,तुप आदी ) नविन तांदुळाचा भात, वसा, तेल यांचे सेवन थंडीच्या काळात करावे.

🍚 हिवाळ्यातील दही 🍚

गुरू स्निग्धं सुमधुरं कफकृद्वलवर्धनम् |
वृष्यं मेध्यश्च हैमन्तं पुष्टिदं तुष्टिवृध्दिदम्||
वृष्यं बलकरं पैत्तं श्रमस्यापहरं परम्|
शैशिर सघनं चाम्लं मधुरं पिच्छलं गुरू||  हारितसंहिता

हेमंत रूतुमधील दही पचावयास जड, स्नेहयुक्त, गोड कफबलवर्धक, बुध्दीवर्धक, तुष्टी पुष्टी, संतोषकारक असते.
शिशिर रूतुमधील दही बलवर्धक, शुक्रवर्धक, पित्तवर्धक, श्रेष्ठ श्रमहरण करणारे, घन (घट्ट) गुणाचे, आंबट गोड चविचे, गुळगुळीत, पचावयास जड असे असते.

दही खाताना खालील नियम पाळावेत.

1⃣ कधीही रात्री दही खाऊ नये.

2⃣तुप वा साखरेशिवाय दही कधीही खाऊ नयेत.

3⃣ मुगाच्या युषाशिवाय वा मधाशिवाय दही खाऊ नयेत.

4⃣ गरम करून कधीही दही खाऊ नयेत.

5⃣  किंवा आवळ्याशिवाय दही खाऊ नयेत.

वरील नियमाशिवाय दहीसेवन केले तर शरीरातील दोष बिघडुन ताप, रक्तपित्त, विसर्प, त्वचाविकार, पाण्डुरोग, भ्रम, उग्र कावीळ आदी आजार उत्पन्न होऊ शकतात...

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड
Mob no -- 9028562102, 9130497856

बफेलो जेवण आणि आपले आरोग्य


   बफे/बुफे जेवण पद्धती आज सगळ्यांच्या परिचयाची आहे. अन्नाची नासाडी होऊ नये, जितकं लागेल तितकाच खाता येईल, स्टॅंडर्ड मेंटेन होईल अश्या अनेक कारणासाठी हि पद्धती प्रसिद्ध आहे. आजच्या बफे( बफेलो) संस्कृतीत बफेलो सारखाच आपण अन्न सेवन करतांना दिसतो. जशी म्हैस एकठिकाणीं बसून जेवत नाही ती इकडून इकडे वेगवेगळे गवत, कडबा इत्यादी खत असते त्याच प्रमाणे ताट घेऊन माणूस पूर्ण टेबलवर ठेवलेल्या अन्नाभोवती हिंडत असतो. जिथे वाटलं तिथे थांबतो, ताटात घेतो- चरतो. संपल कि पुन्हा हिंडणे सुरु. चायनीज, भारतीय इत्यादी आंतराष्ट्रीय पद्धतीने बनविलेल्या डिशेस तो फस्त करीत आनंद लुटत असतो. बफेलो जेवणाच्या निमित्ताने उभेराहून जेवण, विरुद्धआहार सेवन करणे ह्या चुकीच्या गोष्टी मनुष्य करीत असतो.
       आयुर्वेदानुसार आहार सेवन हे खाली बसूनच झाले पाहिजे. वातावरण शांत, मनप्रसन्न पाहिजे टीव्ही समोर जेवण आयुर्वेदाला मान्य नाही. जेवणात आहाराचा क्रम योग्य असला पाहिजे. आजच्या बफेलो पध्दत्तीत स्वीट डिश शेवटी घ्यायची असते. आयुर्वेद म्हणतो कि प्रथम मधुर रस म्हणजे गोड पदार्थांचे सेवन करावे. त्यानंतर आंबट व खारट व शेवटी तिखट व कडू रसाचे सेवन करावे. 
    असे का? ह्याने आहार पचण्यास मदत होते. पचना संबंधी विकार उद्भवत नाहीत. आहार सेवनाचे अधिक नियम आपण पुढील लेखात लवकरच बघुया.
 ©वैद्य.भूषण मनोहर देव.
ज्योती आयुर्वेद, जळगाव/अंतुर्ली 
8379820693

आहार विधी

१. उष्णमश्नीयात् -- गरम अन्न खावे त्याने अन्न चविष्ट तर लागतेच सोबतच भुक वाढते, अन्नाचे पचन लवकर होते, वाताचे अनुलोमन होते, अतिरिक्त कफ कमी होतो. यामुळेच नेहमी गरम अन्न खावे.
     एकदा गरम केलेले अन्न परत गरम करू नये ते परत गरम केल्यास विषवत बनते.
   याउलट नेहमी थंड अन्न खाणे चविष्ट तर नसतेच सोबतच भुक कमी करते, उशीरा पचते, वाताचे अनुलोमन करत नाही, कफाला वाढवते.

२. स्निग्धमश्नीयात् -- तेल वा तुपादि स्नेहाचे संस्कार केलेले पदार्थ खावेत.
त्याने अन्नाची चव वाढते, जाठराग्नि प्रदीप्त होते, अन्नाला लवकर पचविते, वाताचे अनुलोमन करते, शरीराची वृध्दी करते, इंद्रीयांना द्रढ बनविते, बलवर्धन करते, वर्ण चांगला बनविणारे असते. यामुळेच स्निग्ध तुप तैल संस्कार युक्त आहार घ्यावा याऊलट स्नेहरहित आहार वरील गुणधर्माच्या विरोधी असतो.

३. मात्रावदश्नीयात् -- उदराचे तीन भाग मानुन १ भाग अन्नाने भरावा, १ भाग द्रवाने भरावा व १ भाग वातादी दोषांसाठी रिकामा ठेवावा. जी आहाराची मात्रा सुखाने जिरेल तीच योग्य मात्रा होय.

४. जीर्णे$श्नीयात्ः -- पुर्वीचे जेवन पचल्यानंतरच पुन्हा आहार घ्यावा. पुर्वीचे अन्न पचल्यावर जेंव्हा भुक लागते, शरीरातील स्रोतसांची मुख शुध्द झाल्यावर, शुध्द ढेकर आल्यानंतर, वात मुत्र मलंचा त्याग केल्यावर घेतलेला आहार हा शरीराला दुषीत न करता शरीराची पुष्टी करून आयुष्य वाढवतो. अजीर्णात घेतलेला आहार शरीराला दुषीत करितो व आयुष्य कमी करतो.

५. वीर्याविरूध्दमश्नीयात् -- विरूध्द अन्नाचे सेवन करून नये.
   विरूध्द पदार्थ सेवनाने शास्रानुसार पुढील आजार होतात.
नपुंसकता, आंधळेपणा, विसर्प( herpes zoster), जलोदर( पोटात पाणी साचणे),विस्फोट(शरीरावर फोड निर्माण होणे), उन्माद, भंगदर, मुर्च्छा, मद, पोट गच्च होणे, गळ्याचे आजार,पांडुरोग (रक्त कमी होणे) आमविष (पचन न झाल्याने उत्पन्न विष) पांढरा कोड,  विविध त्वचाविकार सोरियासिस, ग्रहणीरोग (ibs), सर्वांगास सुज, अम्लपित्त, ताप,सर्दी पडसे, संतानदोष, गर्भात दोष किंवा बाळाचा मृत्यु हे सर्व विकार विरूध्द पदार्थ सेवनाने होतात. फक्त विविध आजार टाळण्यासाठीच नाहीतर उत्तम संतती प्रजानिर्मितीसाठी देखील विरूध्द पदार्थ टाळावेत. नाहीतर कालांतराने गंभीर परिणाम दिसावयास लागतात. विरूध्द सेवन करणारया लोकांनी तो बंद करावा काही त्रास असल्यास आयुर्वेदीय चिकित्सा विषयक सल्ला जरूर घ्यावा.

६. इष्ट देशे इष्टसर्वाेपकरणं चाश्नीयांत -- मनानुकुल स्थानी, भोजनाच्या संपुर्ण सामुग्रीसह आहार घ्यावा..
अप्रिय जागी आहार घेणे मानसिक विकारांचे कारण ठरते.

७.नातिद्रुतमश्नीयात् -- फार गतीने लवकर लवकर आहार घेऊ नये. अशा प्रकारे आहाराचे सेवनाने अवसाद निर्माण होतो, तो योग्य प्रकारे आमाशयात पोहचत नाही.

८.नातिविलम्बितमश्नीयात् -- फारच हळुवारपणे भोजन करू नये. त्याने तृप्ती होत नाही सोबतच अाहार अधिक मात्रेने पोटात जातो. वाढलेला आहार थंड बनतो व अन्नाचा विषमपाक होतो.

९.अजल्पन्नहसन् तन्मना भुञ्जीत--  बडबड न करता व न हसता मन लावुन आजार सेवन करावा नाहीतर घेतलेल्या आहाराने अवसाद निर्माण होतो, अन्न योग्य प्रकारे आमाशयात पोहचत नाही आणि अशा आहाराच्या गुण दोषांची उपलब्धी निश्चित सांगता येत नाही.
          आहारविधी नुसार आहार घेणे निरोगी राहण्यासाठी अत्यावश्यक आहे नाहीतर सर्व प्रकारचे आजार मनुष्याचा पिच्छा सोडत नाहीत.

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड
Mob no -- 9028562102, 9130497856

Saturday, October 29, 2016

व्यायाम

🍀 🍀

  स्निग्ध आहार (तुपतेलयुक्त) आहार घेणारया लोकांनी व बळकट लोकांनी थंडीच्या काळात व वसंत रूतूमध्ये आपल्या शक्तीच्या निम्मा व्यायाम करावा. व इतर काळात म्हणजे  पावसाळ्यात व उन्हाळ्यात शरीराचे बल कमी असल्याने अल्प व्यायाम करावा किंवा व्यायाम करू नये.
व्यायाम आणि मेहनत (exertion) यात basik फरक आहे. व्यायाम हा शरीराचे बल वाढवतो तर exertion मुळे शरीराची झीज होते..
          अतिव्यायाम केल्याने तहान लागणे क्षय  दम लागणे रक्तपित्त शरीरातील विविध opening मधुन रक्त पडणे थकवा दुर्बलता खोकला ताप वांती हे विकार उत्पन्न होतात.                                 त्यामुळेच काळानुरूप तुप तैल आदींनी युक्त स्निग्ध आहारासह अर्धशक्ति व्यायाम करावा. स्निग्ध आहाराचा समावेश नसताना केलेला व्यायाम शरीराची झीज घडवुन नुकसान करतो..

🍀 व्यायामाचे लाभ 🍀

लाघवं कर्मसामर्थ्यं स्थैर्यं दुःखसहिष्णुता|
दोषक्षयो ग्निवृध्दिश्च व्यायामादुपजायते|| च.सु. ७/३२

व्यायाम केल्याने शरीरास लाघवता (हलकेपणा) प्राप्त होतो.आळस दुर होतो.
कर्मसामर्थ्यं म्हणजे काम करण्याची कष्ट करण्याची क्षमता वाढते.
स्थैर्य प्राप्त होते. शारीर आणि मानस दोन्हींमध्ये स्थिरता येते. मनाची चंचलता दुर होते.
दुःखसहिष्णुता म्हणजे दुख कष्ट सहन करण्याची क्षमता वाढते. दुःख पचवण्याची मनाची तयारी वाढते.
शरीरातील मेद विकृत कफ आदी दोष वाढले असता त्यांचा क्षय व्यायामाने होतो.
व्यायामाने अग्निमध्ये (भुकेत) वाढ होते..फक्त व्यायाम अगोदरच्या नियमानुसार स्निग्ध आहारासह   अर्धशक्ती रूतुनुसार करावा.म्हणजे वरील लाभ होतात.

   🍀  व्यायामाची लक्षणे  🍀

ह्रदयस्थो यदा वायुर्वक्त्रं शीघ्रं प्रपद्यते|
मुखं च शोषं लभते तब्दलार्धस्य लक्षणम्||
किंवा ललाटे नासायां गात्रसंधिषु कक्षयोः|
यदा संजायते स्वेदो बलार्धं तु तदा$$दिशेत्||

बलार्ध लक्षण--- व्यायाम केल्यानंतर जेंव्हा ह्रदयातील वायु मुखात येत असेल आणि तोंड कोरडे पडत असेल तेंव्हा बलार्ध (शक्तीच्या अर्धा व्यायाम झाला समजावे.
          किंवा व्यायाम केल्यानंतर जेंव्हा कपाळ, नाक, सांध्याचे ठिकाणी तसेच काखेत घाम येत असेल तेंव्हा आपल्या ताकदिच्या अर्धा व्यायाम झाला असे समजावे.

श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड
Mob no _ 9130497856, 9028562102

Friday, October 28, 2016

धन्वंतरी रूप – एक चिंतन

आज धन्वंतरी जयंती! आरोग्य शास्त्राच्या देवतेचा दिवस!

#hindu_god_of_medicine

केवळ आपल्या भारतीय परंपरेतच नाही तर प्राचीन ग्रीक संस्कृतीत सुद्धा प्रत्येक गोष्टीची देवता नेमून दिलेली असायची. प्रत्येक देवतेचे स्वरूप ठरवताना त्यामागे एक सखोल विचार असायचा. एका अव्यक्त शक्तीचे मूर्त स्वरूप कुणी आणि कसे ठरवले असा मला नेहेमी प्रश्न पडायचा ......गणपतीचे रूप असे ठराविकच का? शंकराच्या जटा, त्याचे नील स्वरूप, भस्म विलेपित त्याची काया, असेच त्याचे स्वरूप का? किंवा आपल्या दुर्गा देवीचे दहा हातांमध्ये दहा गोष्टी असेच स्वरूप का? या मागील पौराणिक कथांचा भाग सोडला आणि नीट चिंतन केले तर त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण भौतिक रूपाची कल्पना येते.

आयुर्वेदाला प्रवेश घेतल्यावर “धन्वंतरी” देवतेचा पहिला परिचय झाला. मूर्ती पूजेत फारसे स्वारस्य नसल्याने थोडीफार “विष्णू” सारखी देवता एवढीच नोंद तेव्हा मी घेतली. समुद्र मंथनातून आलेल्या “आयुर्वेदाचे” जसजसे वैचारिक मंथन सुरू झाले तसतसे “धन्वंतरीच्या” स्वरूपाबद्दल ओढ वाटायला लागली. या मूर्त स्वरूपाची रचना अशीच का? याबद्दल जागृत झालेल्या ‘जिज्ञासेमुळे’ अनेक कोडी उलगडली. आपल्या शास्त्रावरचा विश्वास अधिक दृढ झाला.

भगवान विष्णूप्रमाणे रचना असलेल्या धन्वंतरीच्या चारही भुजांमध्ये शंख, चक्र, जालौका आणि अमृतघट अशा ४ वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या गोष्टी याच क्रमाने का आल्या असतील या मागे देखील खूप शास्त्र आहे. ही रचना मुख्यत: रस-रक्त परिभ्रमण ( circulation)  सूचित करणारी आहे.

बघा हं…….

देवाचे मूर्त स्वरूप हे ‘हृदयाचे’ प्रतिक आहे अशी कल्पना करा. चार हात जणू हृदयाचे चार कप्पे आहेत. वरचे दोन आलिंद – atrium आणि खालचे दोन निलय - ventricle. हृदयातून निघालेले रक्त सर्व शरीरात फिरून पुन: हृदयात प्रथम उजव्या आलिंदात—right atrium मध्ये येते. फिरून पुन: त्याच जागी येणे या गतीला “चक्रवत” म्हणजेच circulatory म्हणतात त्याचेच प्रतिक म्हणून या कप्प्यात “चक्र” आले.

आता हे फिरून पुन: शुद्ध होण्यासाठी आलेले रक्त त्याच्या खालच्या कप्प्यात उजव्या निलायात—right ventricle मध्ये येते. इथून रक्त शुद्ध होण्यासाठी फुप्फुसाकडे जाते. अशुद्ध रक्त पिऊन रक्त शुद्ध करणाऱ्या जळवा या रक्तशुद्धीच्या प्रतीकात्मक म्हणून येथे आल्या.

फुप्फुसामधून शुद्ध रक्त डाव्या आलिंदात—left atrium मध्ये येते.
अर्वाचीन शास्त्रानुसार, शुद्ध रक्त left ventricle मधून महाधमनी (aorta) द्वारे पुन: सर्वत्र फिरत राहते. परंतु येथे एका महत्वाच्या बाबीचे विश्लेषण करणे गरजेचे आहे, जे आयुर्वेदात हजारो वर्षांपूर्वी आपल्या थोर ऋषीमुनींनी करून ठेवलेय! सृष्टीतील कोणत्याही पदार्थाचे सेवन आपण करतो तेव्हा आपले शरीर, मन आणि इंद्रिये ते तसेच स्वीकारत नाही. ते सात्म्य होण्यासाठी, शारीरादि भावांमध्ये त्याचे रूपांतर होण्यासाठी योग्य ते संस्कार होणे गरजेचे असते. जसे आहारावर “पाचक अग्नि” संस्कार!

या specific बाबतीत आकाश आणि वायू महाभूतांचे शब्द-स्पर्श-गुण भूयिष्ठ संस्कार या शुद्ध रक्तावर होतात. तेव्हा जी नादोत्पत्ती होते त्यालाच व्यवहारात हृदयाचे ठोके अथवा दिल की धडकन, अथवा लब-डब heart sound म्हणतात. शब्द अथवा ध्वनी यांचे प्रतिक म्हणून या डाव्या कप्प्यात “शंख” आले आहे.

अर्वाचीन शास्त्रामध्ये respiratory system  मध्ये नाक, pharynx आणि फुप्फुस हे अवयव येतात. तर आयुर्वेदानुसार “अंबरपियूषाचा – oxygen” चा स्वीकार जरी फुप्फुसात होत असला तरी त्याला जीवनीय गुणांनी युक्त करण्याचे काम हे हृदयात होत असल्याने प्राणवह स्रोतासाचे मूळ, फुप्फुस न सांगता, हृदय सांगितले आहे.
आता असे हे शुद्ध्योत्तर  संस्कारित रक्त त्या व्यक्तीस सात्म्य झाल्याने सर्व पेशींना जीवनीय झाल्याने अमृतासमान आहे. असे हे अमृतासमान रक्ताचे धारण डाव्या निलयात— left ventricle होत असल्याने या कप्प्याचे प्रतिक ‘अमृतघट’ आहे.

‘मंथन’ या प्रक्रियेत खरोखर खूप गवसते. या मूर्त स्वरूपामागील  कारण मीमांसेने माझा आयुर्वेदावरचा विश्वास अधिकाधिक दृढ होत गेला. याचे ग्रंथोक्त शास्त्रीय विवेचन कुठेही आलेले नाही. (काही वैद्य मंडळी आधी हेच विचारतील म्हणून आधीच सांगितले). “हे असेच का?” या जिज्ञासेपोटी  निर्माण झालेला  logical  विचार आहे.

समुद्रमंथनातून निरोगी जीवसृष्टीसाठी आयुर्वेद शास्त्र घेऊन आलेल्या “भगवान धन्वंतरी” यांचा आशीर्वाद चराचर सृष्टीला निरंतर लाभत राहो, ही प्रार्थना!!!

जय भगवान धन्वंतरी!

©वैद्य ज्योत्स्ना पेठकर
परिवर्तन आयुर्वेद
सुख प्रसव आणि संगोपन
९७६४९९५५१७

Tuesday, October 18, 2016

स्त्रियांत आजाराची कारणे

🍀 स्रियांत आजारांची कारणे 🍀

विरूध्दमद्याध्यशनादर्जीर्णादगर्भप्रपातादतिमैथुनाच्च | यानाध्वशोकाद्तिकर्षणाच्च भाराभिघाताच्छयनाद्दिवा च||                    वंगसेनस्रिरोगाधिकार

स्रियांत विरूध्द अन्न उदा. दुध+मीठ, मुगाची खिचडी+ दुध, शिळे वा दोन वेळा गरम केलेले अन्न आदी विरूध्द अन्न व विरूध्द क्रिया फ्रीजचा वापर केल्याने स्रियांत आजार उत्पन्न होतात.
            पुर्वीचे अन्न पचले नसताना देखील पुन्हा जेवन केल्याने स्रियांत आजार उत्पन्न होतात. जेवन केल्यानंतर पुन्हा पहिल्या ३ तासात काही खाऊ नये व ६ तास काही खाल्ल्याशिवाय राहु नये.
         नेहमी अजीर्ण होत असेल तर स्रियांचे विकार उत्पन्न होतात. अजीर्ण होउ नये याकरिता योग्य वेळी म्हणजे भुक लागली असता हितकारक आहार घ्यावा.
           गर्भपात झाला तरीदेखील स्रियांत आजार उत्पन्न होतात. अतिमैथुनाने देखील स्रियांत आजार उत्पन्न होतात. अत्याधिक प्रवास दुचाकीचा अधिक वापर केल्याने देखील स्रियांत आजार उत्पन्न होतात.
    नेहमी शोक दुखामुळे देखील स्रियांत आजार उत्पन्न होतात. कर्षन करणारी कारणे नेहमी उपवास करणे, उपाशीपोटी राहणे, अवजड कामे करणे जड वजन उचलणे, मार लागणे आदी कारणांमुळे स्रियांत आजार उत्पन्न होतात.
          दिवसा जेवणानंतरची झोप आजार निर्मितीचे प्रमुख कारण स्रियांत दिसते. दिवसा झोपल्याने कफपित्तवाढुन कफपित्ताने उत्पन्न आजार डोकेदुखी, अर्धडोकेदुखी वजन वाढने आदी आजार उत्पन्न होतात.
     वरील कारणे टाळली तर स्रियांत आरोग्य राखता येइल. सोबत काही कारणे घडली असतील आणि काही त्रास असल्यास चिकित्सा आहार विहाराचा  योग्य सल्ला जरूर घ्यावा..

      🍀रजस्वला परिचर्या🍀
    (पाळीच्या काळातील नियम)

मासिक रजस्राव सुरू झाल्यानंतर स्रिंयानी पुढील नियमांचे पालन केले असता विविध आजारांपासुन  (pcod, cyst, fibriods) दुर राहता येते......
१.झोपण्यासाठी चटईचा वापर करणे गादी वैगेरे न वापरणे...
२. शारीरीक व मानसिक हिंसा न करणे, ब्रह्मचर्य पालन करणे..
३.सात्विक आहाराचे सेवन करावे...
४.या काळात रडणे, नखे काढणे,अंगाला तैल उटणे लावणे, डोळ्यात काजळ वा अंजन लावणे, स्नान करणे, दिवसा झोपणे, धावणे, मोठे शब्द एेकणे, फार हसणे, फार बोलणे,फार श्रम करणे,भुमिखनन करणे, वारा लागेल ठिकाणी बसणे, अशा वायुला बिघडवणारया प्रकुपित करणारया गोष्टी करू नयेत...
  वरील नियम पाळावेत कारण शरीरातील वायु महिणाभरात जमा झालेले दुषीत रक्त शरीराबाहेर काढतो आणि स्रियांची शारीर शुध्दी करून आरोग्य टिकवतो.जर वरील नियम पाळले नाहीत तर वायुचा प्रकोप होतो आणि प्रकुपीत वायु दुषीत रक्ताला शरीरात पसरवुन वांग, त्वचाविकार, लठ्ठपणा, केस गळणे, pcod,fibriods, cyst.आदी विविध आजार निर्माण करतो....
    स्रियांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी रजस्रावाच्या काळात वरील नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. पाळीच्या तक्रारी ह्याच स्रिंयामध्ये सर्व आजारांसाठी कारणीभुत ठरतात.मासिक पाळीच्या छोट्या मोठ्या तक्रारींसाठी योग्य उपचार केले नाही तर भविष्यात गंभीर दुष्पपरिणामांचा सामना करावा लागतो.

श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड
Mob no - 9028562102, 9130497856

Thursday, September 29, 2016

हृदयाचे संरक्षण

ह्रदयाचे संरक्षण 👇🏻👇🏻👇🏻

तन्महत् ता महामूलास्तच्चौजः परिरक्षिता |
परिहार्या विशेषेण मनसो दुःखहेतवः ||
ह्रद्यं यत्स्याद्यदौजस्यं स्रोतसां यत्प्रसादनम् |
तत्तत् सेव्यं प्रयत्नेन प्रशमो ज्ञानमेव च || च.चि.३०/१३-१४

महत् अतिमहत्वाचा अवयव असलेल्या ह्रदयाचे, ह्रदयापासुन निघणारया धमन्यांचे, ह्रदयाच्या ठिकाणी असलेल्या ओजाचे रक्षण करत असताना विशेषतः मनाला संतप्त करणारया कारणांचा परित्याग करावा.
  जो जो आहार विहार ह्रदयाचे संरक्षण करणारा असेल, ओजाचे वर्धन करणारा असेल सोबतच हदय असमंतातील स्रोतसांना निर्मळ ठेवणारा असेल अशा आहार विहाराचे प्रयत्न पुर्वक सेवन करावे.
तसेच शांतीमय वातावरण राखावे सोबचत ज्ञानाची उपासना करत राहावे.

ह्रदय संरक्षक आहार विहार👇🏻👇🏻👇🏻
गाईचे दुध व तुप हे ओजवर्धन करणारे नित्य सेवनीय पदार्थ आहे.
असात्म्य पदार्थ ज्यामुळे खाल्यानंतर लगेच त्रास होतो असा आहार टाळावा.
मद्याचे गुणधर्म ओजच्या विरूध्द असल्याने मद्य ह्रदयासाठी अहितकारक नुकसान दायक ठरते.
शरीरातील रस रक्त विशुध्द तयार होण्याकरिता देशानुरूप, काळानुरूप, स्वतः च्या शरीरास सात्म्य असा आहार सेवन करावा.
              विहारात महत्वाचा आहे तो व्यायाम तो अर्धशक्ती प्रमाणातच करावा.
अति कष्ट करणे व व्यायाम करणे यात मोठा फरक आहे. व्यायामाने बल वाढते तर अति कष्टाने शरीराची झीज होऊन बल कमी होते.

व्यायाम details👇🏻👇🏻👇🏻
http://ayushdarpanmarathi.blogspot.in/2015/12/blog-post_89.html?m=1

ओजाचे रक्षण👇🏻👇🏻👇🏻

ओज आयुर्वेदीय संकल्पना
http://ayushdarpanmarathi.blogspot.in/2016/01/blog-post.html?m=1

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड
Mob no - 9028562102, 9130497856

Tuesday, September 27, 2016

#स्वास्थ्याची_गुरुकिल्ली

#स्वास्थ्याची_गुरुकिल्ली
#ऋतुचर्या_पालन
#आयुर्वेदामृत
#ऋतुसंधी
#शरदऋतु_शोधन_पंचकर्म

अन्न ,वस्त्र आणि निवारा ....माणसाच्या या मुलभूत गरजांमध्ये
एक मुलभूत गरज add करावी लागेल ती म्हणजे स्वास्थ्य !!!
कारण, अन्नादी तीनही गरजा सध्या सहजपणे पूर्ण होताना दिसतायेत,
पण स्वास्थ्य मात्र दुर्मिळ होत चाललेय !

अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्याला आजारातून बरे करण्यास नक्कीच मदत करतेय,
पण स्वास्थ्य लाभण्यास नाही !

माणूस हा निसर्ग साखळीतला एक महत्वाचा जीव आहे.
पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने निसर्गातली प्रत्येक गोष्ट आपल्यात reflect होत असते.
निसर्गात जसे ऋतूंचे चक्र चालू असते त्यानुसार सृष्टीत बदल जाणवू लागतात.
सहा ऋतूंच्या बदलाची जाणीव आपल्याला शरीर करून देत असतेच.
या सर्व ऋतुंनुसार शरीरातील त्रिदोषांच्या ( वात पित्त आणि कफ) अवस्था बदलत असतात.
दोषांच्या संचय, प्रकोप,आणि प्रशम या तीनही अवस्था ऋतूनुसार अनुभवण्यास मिळतात.
संचय म्हणजे प्रत्येक दोष ऋतुनुसार स्वतःच्या स्थानात साचत असतो
प्रकोप म्हणजे प्रत्येक दोष ऋतुबदलल्यावर आपल्या साचलेल्या स्थानातून बाहेर पडण्यास
उत्सुक झालेली अवस्था.
प्रशम म्हणजे पुनः होणार्‍या ऋतुबदलानुसार वाढलेले दोष हळूहळू कमी होणे.

उदाहरणार्थ ,
वर्षा ऋतु म्हणजे पावसाळा ( जुन, जुलै , ऑगस्ट व सप्टेंबर )
हा पित्त संचायाचा आणि वात प्रकोपाचा काळ असतो.

ग्रीष्मात ( उन्हाळयात ) तीव्र सूर्यकिरणांच्या उष्णतेमुळे स्नेह(स्निग्धता) कमी होऊन
रुक्षता (कोरडेपणा) वाढल्याने कफ कमी होऊन वात हळू हळू वाढत जातो म्हणजे
वाताचा संचय होतो. त्यानंतर येणार्‍या पावसाळ्यात अम्लपाकी भूबाष्पाने, मलिन पाण्याने
व मंदाग्नि(भूक कमी होणे), ओलसरपणा, त्यातून गारठा व अम्लविपाक सृष्टीत वाढल्याने
झालेल्य परिवर्तनामुळे वाताचा प्रकोप होतो.
अश्या वातावरणात, उष्ण-तीक्ष्ण (गरम), दीपन ( अग्नि = भूक वाढवणारे) पाचन(पचन करणारे)
स्निग्ध( तैलयुक्त), आंबट व तिखट चव असलेले पदार्थ खाण्याची इच्छा पण होते आणि
ह्यावेळी ते वातशमन व अग्निवर्धनासाठी उपयुक्त पण असतात.
परंतु, त्याचवेळी हळूहळू अम्लपणा मुळे पित्त संचय होत असतो.
शरद ऋतुत ( ऑक्टो च्या हिट उष्णते मध्ये ) प्रखर सुर्यकिरणांच्या तीक्ष्णतेमुळे
शरीर तापते व पित्ताचा प्रकोप होतो.

म्हणजे येऊ घातलेल्या शरद ऋतु ( बोली भाषेत ऑक्टोबर )
पित्ताचा प्रकोपाचा काळ असतो.
यानुसार आपल्या शरीरात लक्षणे, व्याधी जाणवू लागतात.  जसे
अम्लपित्त
शीतपित (अंगावर पित्त/गांध्या उमटणे),
घामोळ्या
गोवर
कांजण्या
नागिण ( हर्पिस )
मुखदूषिका ( पिंपल्स )
अति तहान होणे,
उन्हाळी लागणे,
डोके दुखीचा त्रास होणे,
क्वचित पाळीत अतिप्रमाणात राज:स्राव (ब्लीडींग) होणे,
गुद-लघवीवाटे रक्तस्राव होणे-
घोळणा फुटणे,
कावीळ
ताप
इ. उष्णतेचे इतर काही विकार होणे ....
ही सगळी लक्षणे पित्ताच्या प्रकोपाची असतात.
शरीर INTEL INSIDE असल्यामुळे आत चालणाऱ्या घडामोडी
वेगवेगळ्या लक्षणाच्या रुपात आपल्याला लक्षात आणून देत असते.

याच पद्धतीने इतर सर्व ऋतूत दोषांच्या अनुषंगाने घडामोडी चालू असतात.

हे साचलेले दोष अनेक आजारांसाठी कारणीभूत असतात.
यांना वेळीच बाहेर जर काढले नाही तर स्वास्थ्य लाभण्यास अडचणी निर्माण होतात.
याच साठी आयुर्वेदात “शमन” चिकित्सेबरोबरच “शोधन” चिकित्साही सांगितली आहे. त्या त्या ऋतूत साचणाऱ्या अथवा प्रकोप अवस्थेत असणाऱ्या दोषांना त्या त्या अवस्थेत बाहेर काढणे स्वास्थ्यासाठी आवश्यक असते.

त्यामुळे पित्तशामक असा आहारविहार योजावा लागतो
जसे कडू गोड व तुरट रसांचे पचायला हलके अन्न योजावे लागते.
साठेसाळी मूग ही धान्ये
पडवळ सारखी भाजी
खडीसाखर
आवळा
मध

जांगल( बारीक प्राण्यांचे ) मांस ह्यांचे सेवन
तसेच तिक्त घृतपान (कडूचवीच्या औषधींनी सिद्ध तूप पिणे)
शमनासाठी अपेक्षित ठरते.
ह्या ऋतुचर्येतील शमन म्हणजे पथ्य आहारासाठी आपल्या वैद्यांचा सल्ला जरुर घ्यावा.

स्वस्थ राहण्यासाठी जशी दिनचर्या आवश्यक आहे,
तशीच ऋतु चर्या देखील !
ऋतु बदलला की त्या त्या ऋतु नुसार आपला आहार
आणि इतर गोष्टीत बदल करणे आवश्यक असते.
काही कारणास्तव या मुलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष होते
आणि आजारपणाचा पाया इथूनच घातला जातो.

ऋतुचर्या पालनात आहार विहार यांच्या बदलासोबत आवश्यक असते,
त्या त्या ऋतूत साचणाऱ्या अथवा प्रकोप करणाऱ्या दोषांचे शोधन !
म्हणून
ह्या काळात
दुष्ट पित्त व त्यासह दुष्ट रक्ताचे शोधन अपेक्षित असते
त्यासाठी अनुक्रमे विरेचन  व रक्तमोक्षण ह्या शोधन चिकित्सा उपयुक्त ठरतात

तेव्हा आयुर्वेद-अनुसारी मित्रहो...
सध्या शरद ऋतु सुरु होणार आहे.
या काळात शरीरात साचलेली उष्णता "विरेचनव रक्तमोक्षण" या शोधन चिकित्सेद्वारे
शरीराबाहेर काढून स्वस्थ राहण्यासाठी शरीराला मदत करा.
यासाठी आपल्या भागातील उत्तम आयुर्वेद तज्ञांकडून या विषयी मार्गदर्शन घेऊन,
आपल्या प्रकृतीनुसार आणि निदानानुसार
स्नेहपान युक्त विधिवत विरेचन करण्यास प्राधान्य द्या !

ऋतुनुसार शोधन घ्या आणि स्वास्थ्य अबाधित राखा !

©वैद्य ज्योत्स्ना पेठकर
९७६४९९५५१७
परिवर्तन आयुर्वेद
सुख प्रसव आणि संगोपन

Visit Our Page